गुजरात फाइल्स : दुष्प्रचार व वास्तवातील भेदरेषा


गुजरात फाईल्स हा राजकारणातील गुन्हेगारीकरण आणि त्यातून राजकीय सक्षमीकरण घडवून आणण्याची प्रक्रिया नागडी करून सांगणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. मागील २० वर्षांत तथाकथित हिंदुहृदयसम्राट नरेंद्र मोदींचा राजकीय उदय आणि २००२ची गोधरा दंगलीसंदर्भात जे काही, रिपोर्ट, बातम्या, शोध वार्तांकन, सर्वेक्षणं सत्यशोधन अहवाल बाहेर आले, त्यातील सर्व खुलाश्यांना संदर्भाची, पुराव्याची मजबूत भिंत उभी करणारा पुरवणी अहवाल म्हणूनही या पुस्तकाकडे पाहता येईल.

राजकीय वजन वाढविण्यासाठी पक्षांतर्गत विरोधकांना बाजुला सारणं, राजकीय विरोधकांचं चारित्र्यहनन करणं, नोकरशाहीवर वचक बसविण्यासाठी त्यास गैरकृत्यास सहभागी करून घेणं, प्रमोशनच्या खिरापती वाटण्यासाठी गुन्हेगारी प्रोफाइलिंगचं चलन सुरू करणं. राजकीय आकांचं लक्ष वेधण्यासाठी व पक्षांतर्गत प्राबल्य वाढविण्यासाठी राजकारणाचं गुन्हेगारीकरण करणं, आपलं महत्त्व (?) वाढविण्यासाठी शत्रुत्वाचा आभास निर्माण करणं, त्या शत्रुला टिपून अंतिमत: ‘मीमहत्त्वाचा का आहे, हे दाखवण्याचा किंवा सिद्ध करण्याचा आटापिटा अशी असंख्य स्वीकृती, कबुली, धक्कादायक खुलासे, प्रसंग व अनपेक्षित घटनांनी भरलेलं पुस्तक म्हणजे गुजरात फाईल्स होय.

गोधराची वांशिक दंगल येणाऱ्या दोन दशकांचं राजकारण, समाजकारण, अर्थकारण, देशाची अंतर्गत सुरक्षा, परराष्ट्र संबंध, सांस्कृतिक चळवळ, संसदीय लोकशाही व अंतिमत: जनमाणसाला प्रभावित करणारी घटना होती. एखाद्या नेत्याची केवळ राजकीय उंची वाढवण्यासाठी घडविण्यात आलेल्या या वंशविच्छेदी नरसंहाराला हिंदू धर्मनिष्ठा, धर्मभिमान व शेकडो वर्षांचा सूड म्हटलं गेलं. एकानंतर एक मानवी जीवाची हत्या करणं. त्या हत्येला नैतिक ठरविण्यासाठी दुष्प्रचारांचा डोंगर उभा करणं. त्यातून समाजिक दुफळी तयार करून बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्य अशी विभागणी करून हिंदू मतांचं पीक घेणं या दीर्घ प्रोजक्टला गुजरात मॉडल म्हटलं गेलं. एका समाजघटकांविरोधात शत्रुभावी जनमानस घडविणे; त्याचा अंतिम शेवट अमर्याद व अनियंत्रित सत्ता हस्तगत करणं हे मोदींच्या राजकारणाचं एकमेव सूत्र होतं, हे गुजरात फाइल्स सिद्ध करते.

वाचा : तालिबान-भाजप मैत्री भारतीय मुस्लिमांच्या मुळावर

वाचा : लाळघोट्यांची शरणागती, बदनामी मुस्लिमांची !

वाचा : काश्मिरच्या ‘अर्धवट’ फाइल्स

अमर्यादित आकांक्षा

गुजरात दंगलीला दोन दशकाहून अधिक कालावधी लोटला आहे. परंतु राष्ट्रीय राजकारणावर त्याचे दरदिवशी पडसाद दिसतात. ७ ऑक्टोबर २००७ला गुजरातचा मुख्यमंत्री होईपर्यंत नरेंद्र मोदी संघाचे पूर्णवेळ प्रचारक व भाजपचे सर्वसामान्य कार्यकर्ते होते. मुख्यमंत्री होण्यापूर्वी मोदींना गुजरातमध्ये कोणीही ओळखत नव्हतं. १९९५च्या विधानसभा निवडणूक प्रचारात ते सहभागी होते. पण लवकरच निवडणूक प्रचारातील त्यांचे कारनामे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपच्या इतर कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले. फोडाफोडी व पक्षांतर्गत कुरघोड्यांची मोदींवर दोषसिद्धी झाली. परिणामी त्यांना गुजरातबाहेर पाठवण्यात आलं होतं.

पक्षाने मोदींचा गुजरात प्रवेश बंद केला. त्यांच्या परतीवर बंदी घातली. त्यांना हरियाणा व हिमाचल प्रदेशचं प्रभारी केलं गेलं. पण तिथंही ते स्वस्थ बसून नव्हते. फोडाफोडी, वशिलेबाजी, पक्षांतर्गत कुरघोड्या सातत्याने चालू होत्या. त्यांच्याविरोधात, ते दोन्ही राज्यातील परिस्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळत असल्याच्या तक्रारी हायकमांडकडे येत राहिल्या.

वास्तविक, तिथं बसूनही गुजरात सरकार अस्थिर करू पाहत होते. १९९५ ते २००१ या कालावधीत गुजरातमध्ये ४ मुख्यमंत्री झाले. केशुभाई-सतीश मेहता-दिलीप पारीख व पुन्हा केशुभाई! उत्तर भारतात बसून मोदींच्या मुख्यमंत्री केशुभाईंविरोधात कुरघोड्या चालुच होत्या. ते सीएमविरोधात फाइली तयार करून दिल्लीत मीडिया हाऊसला चकरा मारत होते. पक्षातील वरीष्ठांकडे मोर्चेबांधणी करत होते. आपले वशीले लावत होते. आणि अचानक त्यांच्या प्रयत्नांची शिकस्त पूर्ण झाली.

तिकडे केशुभाईंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला अन् मोदींचा वनवास संपला. मुख्यमंत्री होण्यासाठी ते गुजरातला परतले. अशा रीतीने ७ ऑक्टोबर २००१ रोजी मोदी गुजरातचे १४वे मुख्यमंत्री झाले. त्यांचा कालावधी काही महिन्यांचा राहणार होता. कारण २००२ला विधानसभेची मुदत संपणार होती.

वाचा : मनातील हिंदू-मुस्लिम बायसचे काय करायचे?'

वाचा : ‘बाप्तिस्मा ते धर्मांतर’ : आंबेडकरी जाणिवांचे स्वकथन

वाचा : काफ़िराना : सांप्रदायिक व धर्मांधतेला नेमस्त उत्तर

अस्थिर स्थितीला संधीत बदलणं

मोदी सीएम झाले खरे, पण त्यांना कोणीही पसंत करत नव्हतं. सर्वासाठी ते अनोळखीबाहेरील होते. ही अवस्था मोदींसाठी राजकीयदृष्ट्या आव्हानात्मक होती.

त्या काळात जगभरात हाहाकार माजला होता. अमेरिकेत ट्विन टावरवर अतिरेकी हल्ला झाल्याने अमेरिकेने अफगाणविरोधात युद्ध पुकारलं होतं. जगभरात इस्लामी फोबियाचं वातावरण होतं. भारतात ब्राह्मणी मीडियाने त्यात आग ओतण्याचं काम केलं. संघाने या परिस्थितीचा फायदा घेण्याचं काम सुरू केलं. खासगी वृत्त वाहिन्यांच्या कार्यक्रमांचं पेव फुटलं होतं. १९९५ सालापासून सीएनएन या झोयोनिस्ट मीडियाने आशियात पाय पसरवणं सुरू केलं होतं. भारतासह, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, भुताण, नेपाळ आणि मालदिवला तो दाखल झालेला होता. प्रथमच या झायोनिस्ट मीडियाने आधुनिक प्रशिक्षणाने सज्ज मीडियाकर्मी स्टुडियोत बसवले होते.

वेल ट्रेंड मीडियाकर्मी, एंकर, पत्रकार व आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा २४/७ तास चालणाऱ्या या वृत्त वाहिन्या इस्रायली व अमेरिकेचा साम्राज्यवादी अजेंडा चालवित होत्या. अशा सीएनएनचं अनुकरण अनेक भारतीय खासगी न्यूज चॅनेलने सुरू केलं. तेदेखील कळत-नकळत झायोनिस्ट अजेंडा चालवित होते. परिणामी २००१च्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या हल्ल्यानंतर इस्लामदहशतवाद हा न्यूज चॅनेलला भारी उत्पन्न मिळवून देणारा उपक्रम ठरला. स्वाभाविक मुस्लिमद्वेषाने पछाडलेल्या आरएसएसने हा कार्यक्रम उचलून धरला. त्याने हळूहळू आपली लोक मीडियात घुसवली. हे न्यूज चॅनेल लादेन व अल् कायद्याच्या नावाने सर्वसामान्यांना भयगंडात लोटत होते. या स्थितीचा फायदा उचलत विहिंप व आरएसएसने भारतात हिंदू विरुद्ध मुस्लिम असं वातावरण तापवण्याचं काम सुरू केलं. मीडियाकृपेने देशात अमेरिकेचा जयघोष व लादेनच्या नावाने ठिकठिकाणी दुष्प्रचार सुरू झाला होता. त्याचे पुतळे जाळले जाऊ लागले होते.

विहिंप व संघाने आयोध्येत बाबरी मस्जिदच्या जागेवर राम मंदिरासाठी कारसेवा घोषित केली. त्यासाठी रस्त्यावर येऊन त्रिशुल वाटपाचे कार्यक्रम सुरू झाले. देशभरातून साधू, महंत, कारसेवक इत्यादींचे जत्थेच्या जत्थे त्रिशुल, लाठ्या-काठ्या घेऊन आयोध्येत दाखल होऊ लागले होते. केंद्रातील वाजपेयी सरकारने अमेरिकेच्या दहशतवादविरुद्ध युद्धाला पाठिंबा म्हणून सिमी संघटनेवर बंदीची घोषणा केली. हे निमित्त साधून महाराष्ट्रात विहिंप व संघाने वातावरण अस्थिर करणं सुरू केलं. त्याचा परिणाम सासवड व लगेचच मालेगावला मुस्लिमविरोधी दंगली झाल्या. अशा प्रकारे संघाने हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष सुरू केला.

वाचा : ‘काश्मिर फाइल्स’च्या अनुपम अंकलना पत्र

वाचा : याकूब मेमन : या अन्यायाला कोण का विसरणार?

वाचा : ख्वाजा युनूसचं अखेर झालं तरी काय?

आमदार होताच चौथ्या दिवशी दंगल

आयोध्येतून कारसेवा पार पाडून विहिंप नेते व साधुंची एक ट्रेन गुजरातला दाखल झाली. त्यातील एक कोचने गोधरा स्टेशनवर पेट घेतला. मीडियाने हाहाकार माजवला की ही ट्रेन संतप्त मुस्लिमांनी पेटवली. अनेक अहवालातून हे सिद्ध झालेलं आहे की कोचला आग बाहेरून नव्हे, तर आतून लावण्यात आलेली होती.  पण दुर्दैवी घटना तर घडून गेली होती. त्याचं बालंट मुस्लिम येणं नियतीचा खेळ होता.

ज्येष्ठ पत्रकार राजदिप सरदेसाई गोधरा जळित कांडला नव्यानेच मुख्यमंत्री झालेल्या नरेंद्र मोदींसाठी मोठी संधी म्हणतात. मोदींनी एकेठिकाणी म्हटलं होतं, आमदार होताच तिसऱ्या दिवशी मी जळितकांड घटनेची पाहणी करण्यासाठी माझा पहिला दौरा केला.

अद्याप गुजरातसाठी अनोळखी असलेल्या एका मुख्यमंत्र्याला आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मोठी संधी चालून आली होती. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या संधीचं सोनं करता येईल, ही कल्पना मोदींच्या मेंदूत तरळली. हा खुलासा २०१३ साली गुजरात काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष अर्जून मोढवाडिया यांनी केला होता. त्यांनी म्हटलं होतं, निवडणुका जिंकण्यासाठी नरेंद्र मोदींनी सामाजिक धुव्रीकरण घडवून आणलं. त्यासाठी त्यांनी प्रथम २००२ मध्ये साबरमती एक्सप्रेसचा एस-६ कोच पेटवला. त्यानंतर गुजरातला पेटवून त्यांनी सामाजिक विभागणी घडवून मताचं राजकारण केलं, असं सर्वांना वाटतं.

याउलट भाजपचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता यांनी तर दंगल घडवण्यासाठी मोदींनीच गोध्रा घटनेला चिथावणी दिली होती, असं सांगितलं होतं. त्यांनी ‘आउटलूक’ला म्हटलं होतं की, २७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या होत्या. याची त्यांना जाणीव होती. “मी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असूनही, मला या बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं गेलं नव्हतं... कदाचित माझी मतं सर्वश्रुत असल्यामुळे आणि मी त्यांच्या योजनांना पाठिंबा दिला नसता. पण बातमी पसरते आणि मोदींनी बैठकांमध्ये अधिकाऱ्यांना काय सांगितलं होतं, हे आम्ही सर्वांनी इतरांकडून ऐकलं.”

मोदींनी या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचे ठरवले. मोदींनी ट्रेन जळित कांडातील मृतदेह अहमदाबादला आणले. दुसऱ्या दिवशी विहिंपने गुजरात बंदची हाक दिली. सरकारने बंदला पाठिंबा दिला. दगावलेल्या कारसेवकांच्या मृतदेहाची मिरवणूक काढण्यात आली. स्वाभाविक वातावरण तंग झाले व त्याचे हिंसक पडसाद उमटू लागले. ठिकठिकाणी दंगली सुरू झाल्या. पाहता-पाहता राज्याने पेट घेतला.

राज्य सरकारने दंगलखोरांना खुली छूट दिली. मुख्यमंत्री मोदींनी वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संतप्त नागरिकांनी आपला राग व्यक्त करू देण्याचा मौखिक आदेश काढला. अशा पद्धतीने इतिहासात झालेल्या अन्यायाचा सूड उगवण्यासाठी हिंदूंना मोकळीक देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासन व अधिकाऱ्यांना निष्क्रिय राहण्याच्या सूचना केल्या. या मौखिक आदेशासंदर्भात नंतरच्या काळात अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत.

गुजरात फाइल्समध्ये या बैठकीसंदर्भात केलेले स्टिंग व खुलासे भयंकर आहेत. दंगल काळात पदावर असलेले अहमदाबाद पोलीस कमिश्नर, राज्याचे मुख्य सचिव, माहिती सचिव, राज्य पोलीस कमिश्नर, गृह मंत्रायलयाचे अधिकारी, सीएमओ कार्यालयातील अधिकाऱ्यांचा दंगलीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग, दंगलकाळातील त्यांचे कॉल रेकॉर्ड इत्यादींचे मुबलक तपशील या पुस्तकात आढळतात.

संबंध ७२ तास गुजरात पेटेलेले होते. या तीन दिवसात सरकारने दंगलखोरांवर कारवाई न करण्याचे आदेश काढले होते. चोहीकडे नंगानाच सुरू होता. मुख्यमंत्र्याच्या आदेशाप्रमाणे विहिंप नेत्यांनी, त्यांच्या समर्थक गुंडानी ७२ तास यथेच्छ राग काढला. याची स्पष्ट कबुली नोकरशाही लेखिकेच्या समक्ष देते.  

सीएमओकडून मुस्लिम मोहल्ल्यावर लक्ष ठेवण्याच्या खास सूचना देण्यात आलेल्या होत्या. सत्ताधारी पक्षातील आमदार, विहिंप नेते ठिकठिकाणी जाऊन झुंडीला उत्तेजन देत होते, प्रक्षोभक भाषणं करत होते. संघ-विहिंप-भाजप नेत्याकडून प्रक्षोभक भाषणांची रीघ सुरू झाली होती. प्रत्येक भाषणात बहुसंख्य समादायाला मुस्लिमांविरोधात चिथावण्याचे प्रयत्न होते. पोलीस संरक्षणात भाजपचे आमदार, नेते, विहिंपचे पुढारी मुस्लिमविरोधी भाषणं देऊन झुंडीला हिंसेला प्रोत्साहित करत होते, याचे असंख्य दाखले संबंधित पुस्तक देते.

नंतरच्या काळात तहलकाचे शोध पत्रकार आशिष खेतान यांनी दंगलीत सामील असलेल्या अनेकांचे स्टिंग केलेले आहेत. त्यात दंगलखोर आपण कसा मुस्लिमांना धडा शिकवला, कशी हिंसा केली, रक्तापात कसा माजवला याविषयी आभिमानाने सांगतात. पण, राणा यापुढे जाऊन त्यावेळी मुख्यमंत्री काय करत होते, पोलीस प्रशासन, नोकरशाही व अधिकारी, भाजप-विहिंप नेते काय विचार करत होते, कोणाच्या सूचना, आदेशावरून झुंडीला उत्तेजित करत होते, पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून निष्क्रियता पत्करली होती, याविषयी अनेक धक्कादायक पुरावे गोळा केले आहेत. प्रत्येक पुरावे व खुलाशांची लिंक सीएमओ, नरेंद्र मोदी, गृहमंत्रालय इत्यादीपर्यंत जाऊन भिडते.

दंगलकाळात टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी प्रकाशित झाली, त्याचं शीर्षक होतं प्रत्येक क्रिया प्रतिक्रियेला आमंत्रण देते म्हणजे, एव्हरी अॅक्शन इनव्हाइट्स इक्वल अँड ऑपोझिट रिअॅक्शन असं मुख्यमंत्री सूचित करतात. खुद्द मुख्यमंत्री संभ्रमित करमारी वधाने मीडियासमोर करत होते. विहिंप नेते, भाजप आमदार, त्यांचे समर्थक गुंड हिंसेला व रक्तापात घडवणारी भाषणं देत सुटली होती. मीडिया हे जघन्य अपराध सर्व लाइव्ह दाखवत होता.

काँग्रेस माजी खासदार एहसान जाफरी असो वा मुस्लिम आयपीएस अधिकाऱ्याच्या घराबाहेर हजारो विहिंपचे गुंड मुस्लिमद्वेषी घोषणाबाजी करत होते. हजारोच्या झुंडीला उत्तेजित करत होते. श्रीयुत जाफरी मदतीसाठी वारंवार फोन करत होते. पण कोणीही प्रतिसाद देत नव्हता. मुस्लिम आयपीएसच्या मदतीला डिपार्टमेंटची लोक आल्याने तो बचावला पोलीस, पण जाफरी मारले गेले. गुंडांनी जाफरीचं घेर पेटवून दिलं. त्यात त्याचं सारं कुटुंब जळून मरण पावले.

पुस्तकात अहमदाबादचे पोलीस आयुक्त पीसी पांडेय यांचे स्टिंग धक्कादायक आहे. पी.सी. पांडे यांचं दंगलीबाबतचं विकृत मत पुस्तकात नोंदवलं आहे. त्यांनी दंगलीचा मुस्लिमाविरोधात हिंदूंचा प्रतिशोध म्हटलं. म्हणतात, “…आधीच्या दंगलीत हिंदूना छळलं जात होतं आणि मुस्लिमांचं वर्चस्व होतं. पण यावेळी २००२ला जे घडलं ते तर घडणारच होतं. तो हिंदूचा सूड होता. त्याचप्रमाणे १९९५ नंतर लोकांना वाटत होतं की हे आपलं सरकार आहे, म्हणजेच ते भाजपच सरकार होतं.

एकूण सर्वच स्टिंगमध्ये त्यावेळी अधिकारवाणी पदावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या निर्लज्ज कबुलीतून  सिद्ध होतं की, गुजरातची दंगल ही राज्य प्रायोजित होती. त्याला दिल्लीच्या वरीष्ठ नेत्याची संमती होती. मोदी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष त्यात सामील होते. त्यांच्याकडून आदेश घेऊन क्रिया किंवा निष्क्रियता पत्करली जात होता.

पुस्तकात नोरडा पाटिया भागात दंगली घडविण्याच्या आरोपी माया कोडनानी यांचं स्टिंग आहे. त्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीसमोर देशातील मुस्लिम समुदायाविरोधात उघडपणे द्वेशी मानसिकता प्रदर्शित करतात. पुस्तकात त्यांची मुस्लिमविरोधी मतं त्यांच्याच शब्दात देण्यात आलेली आहेत. एकेठिकाणी त्यांनी मोदींविरोधात तक्रारही केली आहे. मोदी अमित शहांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतात, पण माझ्यासाठी नाही. याचं कारण मला कळत नाही, असं त्यांनी म्हटलं. अनेक ठिकाणी त्यांनी राज्यसंस्था व मोदींवर पक्षपाताचा आरोप केलेला आहे.

कोडनानी प्रमाणेच अनेक अधिकारी नरेंद्र मोदी व अमित शहांवर अशाच प्रकारचा आरोप करतात. वापरून फेकून दिलं, अशी त्यांची खंत राणा क्षणोक्षणी अधोरेखित करतात.

वाचा : सांसद कि हत्या औऱ पदोन्नती की सौगात

वाचा : बेगुनाहों की हिरासतों में मौत और मुसलमानों में विश्वास खोती सरकार

वाचा : इंडियन मुजाहिदीन सिर्फ आय. बी. की कल्पना है

राजकीय विरोधकांचा बंदोबस्त

२००२च्या दंगलीनंतर गुजरात राजकीय गुन्हेगारीची प्रयोगशाळा झाली होती. जहाल हिंदुत्वाची पायाभरणी करून मोदी आपला राजकीय उदय करू पाहत होते. दंगलीनंतरही दीर्घकाळ मुस्लिमविरोधी वातावरण तापवून ठेवण्यात त्यांना यश आलं. त्यासाठी त्यांनी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या दहशतवाद, मुस्लिमविरोधी व इस्लामविरोधी भयगंडाच्या मोहिमेचा आधार घेतला. तथाकथित दहशतवादातून आपली राजकीय उंची वाढवण्यासाठी प्रयत्नशील झाले. परिणामी त्याचा त्यांना मोठा राजकीय फायदा मिळाला. हिंदू हृदयसम्राट म्हणून त्यांनी आपली प्रतिमा तयार केली. आपण हिंदूंचे संरक्षणकर्ते आहोत, असं जनमाणसावर ठसविण्याचा प्रयत्न केला. त्यातून विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवलं.

तत्पूर्वी त्यांनी स्वपक्षातील आपल्या राजकीय हळहळू करत बाजुला सारलं, त्याचं राजकीय करिअर संपुष्टात आणलं, नवे मित्र जोडले, नोकरशाहीला अधिक जवळ केलं. मतदारसंघाची पुनर्बांधणी करण्यापासून ते मुस्लिमांची नावं मतदान यादीतून गायब करण्यापर्यंत विविध कुरघोड्या अमलात आणल्या. पारपंरिक भाजपविरोधी असलेल्या व आता मोदीविरोधी झालेल्या मुस्लिमांना मतदानच करता येऊ नये, यासाठी त्यांनी केलेली कारस्थाने अनेक पुस्तकं, मीडिया रिपोर्ट, संस्थांचे अहवाल इत्यादीत नोंदवलेली आहेत.

पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या संपूर्ण टर्ममध्ये मोदींनी आपली हिंदुधार्जिणी प्रतिमा तयार करून ती वाढवण्यासाठी खूप प्रत्यत्न केले. आपले राजकीय हितशत्रूंना बाजुला केलं. थेट शत्रूंना शरणागत होण्यास भाग पाडलं. ज्यांनी विरोध केला त्यांची राजकीय कारकीर्द कायमची संपवली. मोदींच्या राजकीय उदयापूर्वी प्रविण तोगडिया गुजरामध्ये मोठे प्रस्थ होते. विहिंपच्या कामातून ते देशभरात पोहचले होते.

वास्तविक, मोदी व तोगडियांची हिंदुत्व कारकीर्द एकाच वेळी सुरू झाली होती. नव्वदच्या दशकात अडवाणींनी काढलेल्या सोमनाथ ते आयोध्या रथयात्रेत दोघे एकत्र होते. मोदी, तोगडियांच्या स्कुटरवर मागे बसून एकत्र संघाला मजबूत करण्याच्या कामासाठी गुजरातभर फिरत होते. मोदी हे तोगडियापेक्षा वयाने लहान होते.  एका अर्थाने तोगडिया त्यांचे मार्गदर्शक होते. पण, मुख्यमंत्री होताच मोदींनी सर्वांत आधी तोगडियांचा प्रभाव निष्प्रभ करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यात त्यांना यशही आलं. नंतर हरेन पंड्या यांना बाजुला केलं.

मंत्रिमंडळातील तब्बल १४ खाती त्यांनी आपल्याकडे ठेवली होती. त्यामुळे मंत्रिमंडळातील अनेकजण त्यांच्यावर नाराज होते. राजदीप सरदेसाई यांनी लिहिलं आहे की मोदी आपल्याला एखाद्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असं गुजरातमधील अनेक भाजप नेत्यांना त्यांना सांगितलं होतं.

वाचा : बीजेपी राज में मुसलमान

वाचा : आरएसएस आणि वर्तमान राजकारण

वाचा : चिकित्सा डॉ. आंबेडकरांच्या ‘हिंदुकरणा’ची

सूड तंत्राचे बळी

गोधरा दंगलीचे पडसाद जगभर उमटले होते. आंतरराष्ट्रीय मीडियाने त्यास राज्यपुरस्कृत दंगा म्हटलं. भारतातही प्रचंड हाहाकार माजला. केंद्रात भाजपची सत्ता होती. पंतप्रधान वाजपेयींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. परिणामी मोदींना हटविण्याच्या चर्चा सुरू झाल्या. मोदींच्या राजकीय कारकीर्दीसाठी ही चर्चा संकटाची चाहूल होती. नुकतच त्यांचं राजकीय करिअर सुरू झालं होतं, आता ते संपेल अशी चिन्ह दिसू लागली.

मग मोदींनी पक्षश्रेष्ठीच्या नजरेत आपलं महत्त्व वाढविण्याचे प्रयत्न सुरू केलं. दंगलीमुळे मोदी दहशतवाद्यांच्या निशान्यावर आले, असा दुष्प्रचार सुरू झाला. ठिकठिकाणी जीवंत बॉम्ब पेरले जाऊ लागले. सतत तथाकथित टिफीन बॉम्ब सापडण्याचे एकच सत्र सुरू झालं. मोदींच्या हत्येचा कट सुरू झाला, त्यातून हे बॉम्ब पेरले जात आहेत, अशा बातम्या मीडिया देऊ लागला.

अशा पद्धतीने स्फोट घडविण्याचे आरोप ठेवून निष्पापांना पकडून त्यांना दहशतवादी सिद्ध करण्याचा एक अत्यंत घाणेरडा खेळ सुरू झाला. एका मागून एक आरोपी जेरबंद होऊ लागल्याने स्वाभाविक मोदी महत्त्वाचे मानले, समजले जाऊ लागले. या कृतीतून मोदींनी दोन प्रमुख लाभ घेतले. एक तर सतत मुस्लिमविरोधी वातावरण राज्यात राहील आणि त्याचा थेट राजकीय फायदा आपल्याला मिळेल, अशी योजना तयार झाली. दुसरं, मी हिंदूंचा सरंक्षक आहे, मी मुस्लिमांच्या तथाकथित अत्याचारातून तुमची सुटका करू शकतो, अशी कल्पना रंगवण्यात त्यांना यश आलं. आधीच पुराणमतवादी असलेल्या गुजराती जनतेने ही कल्पना हातोहात घेतली.

दंगलीनंतर हिंदू हृदयसम्राट ही आपली छवी संपुष्टात येईल, हे लवकरच मोदींना कळलं. मग त्यांनी जो खेळ सुरू केला, तो अतिशय भयानक होता. दहशतवादाची लाच्छंने लावून सर्वसामान्य मुस्लिम युवकांना लक्ष्य करण्यात येऊ लागलं. ज्या-ज्या लोकांनी दंगलीत मदतकार्य केलं, हिंसा रोखल्या, हिंदुत्व गुंडांना चोप दिला, पोलिसांना प्रश्न केला, एफआयआर दाखल केली अशा सर्वांना शांततावाद्यांना दहशतवादी सिद्ध करण्याचा एक गलिच्छ खेळ सुरू झाला. अक्षरधाम हल्ल्यात दहशतवादी म्हणून अटक केलेले व ११ वर्षे छळ केलेले आरोपी दंगलीत मदत शिबीर चालवणारे व इतर सेवाकार्य पुरवणारे होते.

२०१६ची आकडेवारी सांगते की, गुजरातच्या तुरुंगात देशातील सर्वाधिक मुस्लिम कैदी होते. राज्याच्या विविध जेलमध्ये २४० मुस्लिम कैदी असून, त्याखालोखाल ८४६ दोषी आणि १,७२४ विचाराधीन (अंडरट्रायल) कैदी आहेत. गृह मंत्रालयाच्या २०१६च्या आकडेवारीनुसार देशात ८२,१९० मुस्लिम तुरुंगात आणि पोलीस कोठडीत आहेत. त्यापैकी २१,५५० दोषी, ५९,५५० विचाराधीन आणि ६५८ लॉक-अपमध्ये आहेत. ही संख्या देशभरातील एकूण मुस्लिम कैद्यांच्या एक तृतीयांश आहे.

हिंदुत्व गुंडामार्फत अशा लोकांची यादी मंत्र्याकडे, अमित शहांकडे येत होती. मग अमित शहा स्वत:हून फोन करून शांततावाद्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना व भाजपविरोधकांचा बंदोबस्त करण्याच्या वैयक्तिक सूचना पोलीस विभागाला देत. अशा रितीने निष्पाप मंडळी अटक होते, त्यांच्यालर देशद्रोही, हिंदूद्रोही व दहशतवादी असल्याचा ठपका ठेवला जात.

राणा अय्यूब यांनी या संदर्भात केलेले खुलासे अतिशय भेदक आहेत. त्यांनी तत्कालीन एटीएस प्रमुख राजन प्रियदर्शी यांचं स्टिंग केलं. त्यात प्रियदर्शी म्हणतात, मी जेव्हा राजकोट इथं आयजीपी होतो तेव्हा जुनागडजवळ जातीय दंगली झाल्या होत्या. मी काही (हिंदू) लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला. हे कळताच गृहमंत्र्यांनी (शहा) मला फोन केला आणि विचारलं, राजनजी, तुम्ही कुठे आहात? मी म्हणालो, सर जुनागडला आहे. ते म्हणाले, ही तीन नावं लिहून घ्या आणि या तिघांना अटक करा.

त्यावर मी त्यांना म्हणालो की सर हे तिघं माझ्यासोबत बसलेले आहेत. आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की हे तिघेही मुस्लिम आहेत. येथील परिस्थिती त्यांच्यामुळेच पूर्ववत झाली आहे. या लोकांच्या प्रयत्नामुळेच हिंदू मुस्लिम एकत्र आले आहेत. परिणामी दंगली थांबल्या आहेत.

तेव्हा ते म्हणाले, सीएम साहब ने कहा है.  मी म्हणालो, सर जरी हा आदेश मुख्यमंत्र्याचा असला तरी मी काही करू शकत नाही. कारण हे तिघेही निर्दोष आहेत.

वाचा : आंबेडकरांच्या हिंदुत्वाचे अश्रू

वाचा : जहांगीर पुरी : गांधी-आंबेडकरांना स्वीकारल्याची शिक्षा!

वाचा :आयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल!

फेक एन्काउंटर

बनावट चकमक हा याच क्रमातील एक घाणेरडा प्रकार होता. आपल्या राजकीय विरोधकांना संपवणे व आपली हिंदू हृदयसम्राट प्रतिमा तयार करणं हे दोन उद्देश यातून साध्य करण्यात आले. अर्जुन मोढवाडिया नावाच्या स्थानिक काँग्रेस नेत्याने या संदर्भात केलेला खुलासा राणा अय्यूब यांच्या स्टिंगचं महत्व अजून द्विगुणीत करतो. मोढवाडिया म्हणाले होते, दंगलीनंतरही समाजात विभागणी कायम राहावी आणि भयाचं वातावरण कायम राहावं यासाठी दर एक-दोन महिन्याला काही लोकांना पकडून गोळी मारून त्यांची हत्या केल्यानंतर त्यांना अतिरेकी घोषित करण्यात येऊ लागलं. हे दहशतवादी मोदींना मारण्यासाठी आले होते, असं दाखविण्याचा प्रयत्न झाला.

पुढे मोढवाडिया म्हणतात, अशा घटना २००३ ते २००६ पर्यंत चालू होत्या. सोहराबुद्दीन, कौसरबी व तुलसी प्रजापती एन्काउंटर खटल्यात २००६मध्ये तीन सिनियर पोलीस अधिकाऱ्यांना अटक झाली, त्यानंतर एकही तथाकथित दहशतवादी मोदींना मारण्यासाठी गुजरातला आला नाही आणि असे फेक एन्काउंटरही झाले नाहीत.”

२०१३ साली मोढवाडिया यांनी हा खुलासा केला होता. राणा अय्यूब यांनी या प्रक्रियेत सहभागी अधिकाऱ्यांची थेट कबुलीनामे घेतलेले आहेत. त्यांच्या जबानीतून हे सिद्ध होतं की, मोदींनी आपली राजकीय उंची वाढवण्यासाठी दहशतवादी म्हणून असंख्य निष्पाप मुस्लिमांची फेक एन्काउंटर घडवून आणली. अशा बनावट चकमकीसंदर्भातील केलेले खुलासे, कुबलीनामे राणा अय्यूब यांच्या पुस्तकातील महत्त्वाचा गाभा आहेत.

एका बनावट चकमकीत सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी, व त्याचा सहकारी तुलसी प्रजापती मारला गेला. एन्काउंटरपूर्वी सोहराबुद्दीन अमित शहांचा व्यावसायिक पार्टनर होता. सोहराबुद्दीन राजस्थानच्या मार्बल व्यावसायिकाकडून खंडणी वसूल करत होतो. या व्यवसायात शहा त्याचे एक भागीदार होते पण जेव्हा सोहराबुद्दीन डोईजड ठरू लागला, त्याचा काटा काढला गेला. एकाच वेळी तिघांची हत्या करण्यात आली. या संदर्भात राणा अय्यूब यांनी केलेल्या सोध पत्रकारितेमुळे अमित शहा जेलमध्ये गेले. सोहराबुद्दीन एन्काउंटर कालावधीत आरोपी थेट शहांच्या संपर्कात होते. हे सीबीआयने सीडीआरमधून सिद्ध केलं. पुढे त्यांना जामीन मिळाला पण गुजरातमधून शहांना तडिपार करण्यात आलं. आपल्या प्रभावाचा वापर करून खटल्यातील पुरावे नष्ट करू नये, तक्रारदारांना धमकावू नये, म्हणून कोर्टाने ही काळजी बाळगली होती.

२०१४मध्ये मोदींची सत्ता येताच अमित शहांनी या खटल्यातून स्वत:ला दोषमुक्त करून घेतलं. त्यासाठी सीबीआयच्या स्पेशल कोर्टाच्या न्यायाधिशावर दवाब टाकल्याचे त्यांच्यावर आरोप झाले. न्या. ब्रिजमोहन लोया यांची हत्या याच प्रकरणातून झाली, असा खुलासा करणारे एक पुस्तक २०२१ साली प्रसिद्ध शोध पत्रकार निरंजन टकले यांनी लिहिलं आहे. राणा अय्यूब यांनी गुजरात फाइल्समध्ये या व इतरही अन्काउंटर खटल्याचे असंख्य पुरावे, कुबलीजबाब व सहभाग उघडकीस आणला आहे.

अशाच एका बनावट चकमकीत १९ वर्षीय इशरत जहाँ मारली गेली होती. ती मुंबईच्या माटुंगा येथील खालसा कॉलेजची बीएससीची विद्यार्थिनी होती. एका मित्रांसोबत कामानिमित्त नाशिकला गेली होती. तिथून तिचं अपहरण करण्यात आलं आणि काही दिवसांनंतर एन्काउंटरमध्ये मारली गेली, असं दाखवलं गेलं. या एन्काउंटर प्रक्रियेत सामील असलेल्या अनेक अधिकाऱ्यांची कबुली गुजरात फाइल्समध्ये आहे. प्रत्येकजण म्हणतो की, इशरत दहशतवादी नव्हती. ती नाहक मारली गेली. या उलट इशरत सोबत मारला गेलेला प्रणेश पिल्लई हा गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांना भेटायला आलेला होता. अपहरण करून त्याचा एन्काउंटर करण्यात आला. त्याचे वडील गोपिनाथन पिल्लई यांनी या संदर्भात मीडियाला दिलेली माहिती धक्कादायक आहे. पण, राणा अय्यूब यांनी इशरत फेक अन्काउंटरचा उल्लेख वारंवार केला आहे, पण प्रणेश पिल्लईची चर्चा टाळली आहे. तो खटकतो.

किंबहुना लेखिकेने हरेन पंड्या या भाजपच्या प्रभवी नेत्याच्या कॉट्रक्ट किलिंगच्या अधिक खोलात जाण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात लेखिकेने केलेले खुलासे धक्कादायक आहेत. हरेन पंड्या खून खटल्यात हल्लेखोरांनी निवडलेली किलर महत्त्वाचा होता. हल्लेखोर मुस्लिम होता. तो का होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही. गुजरात दंगलीत राज्यात मुस्लिमविरोधी वातावरण तयार करण्यात राजकीय आकांनी आपली संपूर्ण ताकद लावली होती. या मुस्लिम हल्लेखोरांना निवडून दुहेरी फायदा उचलण्यात आला.

हरेन पंड्या यांच्या वडिलांनी स्पष्टपणे आरोप केला की केला होता की मुस्लिम द्वेशाचा आधार घेऊन माझ्या मुलाला संपवण्यात आलेलं आहे. त्याच्या राजकीय विरोधकांनी त्याला मारलं, असे ते आजही म्हणतात. हरेन पंड्या यांच्या पत्नीचे धक्कादायक खुलासे व निष्कर्ष राणा अय्यब पुस्तकात दिलेले आहेत. गुजरात दंगलीसंदर्भात पंड्यांनी एसआयटीसमोर धक्कादायक खुलासे केले होते. ते बाहेर पडून मोदींची खुर्ची जाऊ शकते अशी शक्यता होती. पण त्यापूर्वीच पंड्या मारले गेले. 

राजदिप सरदेसाई यांनी केलेले खुलासे धक्कादायक आहेत. ते लिहितात, दंगलीनंतर काही दिवसांनी ते अहमदाबादमधल्या आमच्या ऑफीसमध्ये एक बातमी घेऊन आले. ही बातमी म्हणजे जणू काही बॉम्बगोळाच होता. मोदींनी दंगल भडकू दिली याचा पुरावा माझ्याकडे आहे, ते म्हणाले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, २७फेब्रुवारीच्या रात्री मोदींनी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि जनतेला आपला क्षोभ व्यक्त करू द्या असं त्यांना सांगितलं. त्यांनी हे ऑन रेकॉर्ड बोलावं असं मी त्यांना म्हटलं. त्यांनी नकार दिला. पण माझ्यापुढे काही कागदपत्रं ठेवली. ...पंड्यांनी मला जे ऑन रेकॉर्ड सांगायला नकार दिला तेच त्यांनी त्या वर्षीच्या मे महिन्यात एका निवृत्त न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली बसलेल्या सिटिझन ट्रायब्यूनलला सांगितलं.

पण त्यांचे वडील विठ्ठल पंड्या मात्र शेवटपर्यंत आपल्या मुलाच्या हत्येला राजकीय खून म्हणत राहिले. म्हटलं होतं, “माझ्या मुलाचा मृत्यू ही एक पूर्वनियोजित, राजकीय हत्या होती... याची फेरचौकशी झालीच पाहिजे.” हरेन पंड्याची पत्नी  जागृती पांड्या यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. इतकंच नव्हे तर, “हरेन मुस्लिमांमध्ये लोकप्रिय होते, त्यांनी त्यांची हत्या केली नसती”, असेही त्यांनी म्हटलं होतं. राणा अय्यूबला त्यांनी याची पुनरावृत्ती केली आहे.

पुढे टिपीन बॉम्ब प्रकरणी व दहशतवादाच्या इतर आरोपीत अटक झालेल्या असंख्य आरोपींवर हरेन पंड्या खून खटल्यातील मुख्य आरोपी, षडयंत्रकारी, कारस्थानी, मास्टरमाईंडचा आरोप ठेवण्यात आला. कालांतराने १३ आरोपींनी शिक्षा सुनावली. पण हरेन पंड्या यांच्या म्हणण्याप्रमाणे खरे आरोपी अजूनही मोकाट आहेत. गुजरात फाइल्स पुस्तकातील हरेन पंड्या हे शेवटचं प्रकरण आहे. खरं तर या प्रकरणाने पुस्तक सुरू व्हायला हवं होतं.

संबंधित पुस्तक गुजरात दंगलीनंतर १५ वर्षांनी गुजरात फाइल्स प्रकाशित झालेलं आहे. या कालावधीत दंगल व दहशतवादाचे आरोप ठेवून जेरबंद करण्यात आलेले बहुतांश मुस्लिम आरोपी निर्दोष सुटले. तर खरे दंगलखोर जेलमध्ये गेले. शिक्षा भोगून आले. मोदी सत्तेत येताच एन्काउंटर वा दंगलीतील प्रत्येक आरोपी एक तर दोषमुक्त झाला किंवा त्याला जामीन मिळाला. मोदींनीही दंगलीच्या आरोपातून स्वतला क्लिनचिट मिळवून तो खटला बंद करून घेतला.

२०१४च्या मे महिन्यात मोदींनी प्रचंड बहुमत मिळवून दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली. त्याच दिवशी अक्षरधाम मंदिर हल्ल्याच्या आरोप ठेवून ११ वर्षे जेलमध्ये सडवलेले सर्व मुस्लिम आरोपी निर्दोष सुटले. मग हल्ला कोण केला? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. राणा अय्यूब यांनी पुस्तकात मोदींच्या अनेक कृष्णकृत्यांचा रहस्यभेद केलेला आहे. अधिकाऱ्यांनी सर्व दृष्कृत्यांचा पर्दाफाश केला. पण अक्षरधाम हल्ल्याचे खरे आरोपी कोण? याबद्दल सर्वांनी मौन बाळगलं.

आज मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची राजकीय उंची प्रचंड वाढलेली दिसते. अमित शहा व नरेंद्र मोदी हेच आज सरकारचे दोन चेहेरे आहेत. या दोघांवशिवाय सरकारमध्ये तिसरा कोणीही दिसत नाही.

गुजरात दंगल होऊन दोन दशकं उटली आहेत. या कालावधीत मोदी बलाढ्य नेता म्हणून उदयास आले. दरम्यानच्या काळात दंगल व एन्काउंटरविषयी असंख्य पुरावे, धक्कादायक रिपोर्ट बाहेर पडलेले आहेत. त्या सर्व अहवालांतील खुलासे व राजकारणाला गुजरात फाइल्ससंदर्भ-साहित्य मिळवून देते.

महात्मा गांधींच्या गुजरातमधील राजकीय संस्कृती व नैतिकतेच्या पतनाचा काळा इतिहास या पुस्तकातून बाहेर पडतो. अर्थातच २००२ नंतर अनपेक्षितपणे गुजरातच्या राजकारणात शिरकाव करणाऱ्या नरेंद्र मोदींच्या, राजकीय उदयाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे.

गुजरातच्या हिंदुत्व प्रयोगशाळेत तयार झालेलं मुस्लिमविरोधी राजकारण, त्यांचं सामाजिक व सांस्कृतिक उद्धवस्तीकरण, दुष्प्रचारी मानसिकता आणि अमानवीकरणाचा एक अंतहीन व न थांबणारा प्रवास या पुस्तकातून उलगडतो. पुस्तकातील एक-एक शब्द, ओळ, वाक्य, पॅराग्राफ, युक्तिवाद व त्यानंतर विवेचन क्षणोक्षणी हादरवून सोडते. दहशतवाद या शब्द-संज्ञेला राजकीय शस्त्र करणाऱ्या अमर्यादित राजकीय आकांक्षेच्या पडद्याआड लपलेलं दाहक वास्तव पुस्तकातून बाहेर पडते. देशाच्या राष्ट्रीय राजकारणाला प्रभावित करणाऱ्या व राजकीय संस्कृतीला बदलणाऱ्या आणि ब्राह्मणी वर्चस्ववादी सांस्कृतिक राजकारण उलगडून दाखवते. दहशतवाद, दहशतवादाचा आभास, दहशतवादाचे आरोप, एन्काउंटर इत्यादीतील दुष्प्रचार व वास्तवातील स्पष्ट भेदरेषा अधोरेखित करते.

लेखिकने एक पत्रकार म्हणून ज्या तटस्थेने हे पुस्तक लिहिले, युक्तिवाद केले, संदर्भाची जोडणी केली ते या पुस्तकाचं यश म्हणता येईल. पुस्तक प्रकाशित होऊन १० वर्षे उलटली तरी त्याची चर्चा अजूनही संपलेली नाही.

##

पुस्तकाचं नाव : गुजरात फाइल्स : अनॉटॉमी ऑफ कव्हर अप

लेखिका : राणा अय्यूब

प्रकाशक : राणा अय्यूब, मुंबई-२०१६

पाने : २०४

किंमत : २९५

भाषा : इंग्रजी (हिंदी, मराठी, गुजराती, उर्दू, मल्याली, कन्नड, तमिळ)

संदर्भ सूची :

१) प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, मुस्लिम, हिंदुत्व आणि वास्तव, भूमी प्रकाशन लातूर-२००७

२) राजदिप सरदेसाई, २०१४ : देशाचा चेहरा बदलणारी निवडणूक, अक्षर प्रकाशन,मुंबई-२०१५

३) राणा अय्यूब, गुजरात फाइल्स, मुंबई-२०१६  

४)आउटलूक, १० नोव्हेंबर २००७, A Murder Foretold

५) जनसत्ता, ४ मे २०१६, मुसलमानों को जेल में डालने में गुजरात सबसे आगे, एक तिहाई मुस्लिम बंदी अकेले मोदी के राज्य में.

६) अर्जून मोढवाडिया, १३ ऑक्टोबर २०१३, Arjun Modhwadia:Evidences say Modi is the biggest political beneficiary in all fake encounters, (https://lnk.ua/XFWguzN7p)

७) अब्दुल कय्यूम  मन्सुरी, ग्यारह साल सलाखों के पीछे, (उर्दू) जमियत उलेमा ए हिंद-मुंबई-२०१५

कलीम अज़ीम, पुणे

मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,53,इस्लाम,43,किताब,27,जगभर,132,पत्रव्यवहार,4,राजनीति,310,व्यक्ती,26,संकलन,65,समाज,272,साहित्य,81,सिनेमा,22,हिंदी,55,
ltr
item
नजरिया: गुजरात फाइल्स : दुष्प्रचार व वास्तवातील भेदरेषा
गुजरात फाइल्स : दुष्प्रचार व वास्तवातील भेदरेषा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjANTBzTvmWAu5EL1BNDVcxTcUpXusV2FyGTTd8vKQ6rh7c-QY49zdEpjPYhafl617z8yUi3-5cl7GjZUcp3nGsHmCdmXceneSv4FGqlWNoKriDcbj8aJI-XLPFw3dIjIavkTAA15ZUW9wvKIGAZh9g6hYqsPlUrpu9Al9tqWAm1C0k32HRiK83qwEJlvZm/w640-h398/DA0FYnjXkAAsHJ0.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjANTBzTvmWAu5EL1BNDVcxTcUpXusV2FyGTTd8vKQ6rh7c-QY49zdEpjPYhafl617z8yUi3-5cl7GjZUcp3nGsHmCdmXceneSv4FGqlWNoKriDcbj8aJI-XLPFw3dIjIavkTAA15ZUW9wvKIGAZh9g6hYqsPlUrpu9Al9tqWAm1C0k32HRiK83qwEJlvZm/s72-w640-c-h398/DA0FYnjXkAAsHJ0.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2026/04/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2026/04/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content