‘बाप्तिस्मा ते धर्मांतर’ : आंबेडकरी जाणिवांचे स्वकथन

बाप्तिस्मा ते धर्मांतरइसादास भडके यांचं स्वकथन प्रा. सूर्यनारायण रणसुभे सरांच्या संग्रहातून हाती लागलं. शीर्षक इतकं सुंदर होतं की हात पटकन रॅककडे गेला. लातूर ते पुणे प्रवासात थोडसं वाचून झालं. नंतर राहून गेलं. माझ्या रॅकमध्ये साचलेल्या असंख्य पुस्तकातून हे माझी नजर आपल्याकडे खेचण्यास यशस्वी झालं. गेल्या तीन-चार दिवसात पुस्तकात रमलो.

एकूण आत्मकथनात वेगळेपणा जपणारे अनेक पैलू जोडलेले आहेत. दोन धर्माचा सामाजिक-सांस्कृतिक ठेवा म्हणून या संग्रहाकडे पाहता येईल. प्रथा, पंरपरा, रुढी, श्रद्धा, अंधश्रद्धा, व्यवहार ज्ञान, दारिद्र्य, बकालता, परावलंबित्व व जगण्याचा संघर्ष असा याचा एकूण पट आहे.

पुस्तकाचा मुख्य विषय म्हणजे आंबेडकरी चळवळ व त्यातून दलित समुदायाविषयी निर्माण झालेली आत्मियता लेखकाला धर्मांतराकडे कशी नेते, असा आहे. धर्मांतर करताना स्वखुषीने केलेलं असलं तरी सोडलेल्या धर्माला भलंबुरं बोलणं किंवा तिची चिकित्सा, समीक्षा लेखक करत नाही. जुना धर्म सोडताना लेखकाला अतिव दुख: झालेलं आहे.

‘बाप्तिस्मा ते धर्मांतर’ या स्वकथनाचे तीन टप्पे पाडता येतील. पहिल्या भागात वडिलांचे धर्मांतर व नवधर्माचा वावर, कुटुंबाची सामाजिक स्थिती, दारिद्र्यता, बकालता व जीवनाचा संघर्ष मांडला आहे. दुसऱ्या भागात तत्कालीन सामाजिक व राजकीय स्थिती, लेखकाचं शिक्षण, विद्यार्थी दशा, आंबेडकरी चळवळीतील सहभाग व सामाजिक भान आलेलं आहे. तिसऱ्या भागात आंबेडकरी चळवळीतील संलिप्तता व वैचारिक द्वंद्व व धर्मांतर तथा रोजगार असा पट आहे.

सुरुवातीला कुटुंबियांचं धर्मांतर, स्थानिक ख्रिस्ती संस्कृती व त्याचे सामाजिक सहसंबंध, नाती-गोती, त्याचं धर्मांचरण, इतर नातेवाइकांचं बौद्ध धर्माचरण, त्यांच्याशी होणारा जातीय भेद इत्यादीचं मार्मिक कथन आलेलं आहे. लेखक आपल्या इतर बौद्ध धर्मीय नातलग व आपलं ख्रिस्ती धर्मीय कुटुंब यातील प्रथा-परपंरा, श्रद्धाभाव एकसारखा कसा आहे, याची मांडणी करतात.

वाचा : आरएसएसप्रणीत राजकारणाचा इतिहास : ‘मनुचा मासा’


लेखकाचा जन्म ख्रिस्ती धर्मात झालेला आहेत. पण आपल्या धर्मात पूर्वाश्रमीच्या महार जातीच्या प्रथा-परंपरा-रुढी-वर्तन व्यवहार कसा आला, याचा शोध घेताना लेखक आपल्या मूळ जातसमुदाय व त्यातून आलेला नव्या धर्माकडे आकर्षित होतो.

लिहितात, “गडिसूर्ला सारख्या गावात दोन जागतिक धर्मांनी प्रवेश केला. गावातली माणसं फार शिकली नव्हती. विचारवंत नव्हती. तत्त्ववेत्तेही नव्हते. व्यवस्थेप्रमाणं जसं जगणं वाट्याला आलं तसं जगायचे. जी माणसं पिढ्यान्पिढ्या गावकुसाबाहेर जगत होती, ज्याचं माणूसपण नाकारलं, त्यांचा वाट्याला स्वातंत्र्यानंतर नवीन विचार आला. आपलं जीवन कोणत्या दिशेनी घडवायचं याची संधी मिळाली.”

ख्रिस्ती धर्म वैश्विक आहे, त्यामुळे तो आपल्याला बरा वाटतो, असं लेखक म्हणतात. हजारो वर्षांपासूनची जातव्यवस्थेला नाकारून या धर्माने सर्व शोषित-वंचित जात-समुदायाला आपलसं केलं. सेवाभाव या वृत्तीने वर्णाश्रमाच्या जोखडातून मोठ्या समाजाला मुक्त केलं. या नवधर्माने विषमता नष्ट करून समानतेचं तत्त्व दिलं. या ख्रिस्ती धर्मात प्रवेशाच्या कुठल्याही अटी-शर्थी नव्हत्या. शोषित-पीडित समाजघटकाला आहे त्या स्थिती स्वीकारणे हे उदात्त धेय्य त्यापुडे होतं. भेदाभेदावर आधारित समाजात ईश्वराची मानवीय कल्पना व समानतेचं तत्त्व अनेकांना नव्या धर्माकडे आकर्षित करून घेतलं.

नव्या धर्माने केवळ ईश्वर व त्याची आराधना पद्धती बदलली. परंतु वर्गसंघर्ष व जातदाहकता तशीच राहिली. शिवाय प्रथा-परंपरा-रुढी पूर्वाश्रमीच्या राहिल्या. काही बाबतीत देवकल्पना व त्याच्या पूजनाची पद्धतीही तशीच राहिली. नवधर्मातील धर्ममार्तंड आपला धर्म व त्याच्या मूलभूत ऐहिक कल्पना नवसमाजापर्यंत पोहचवण्यास असमर्थ ठरले. त्याविषयी लेखक पुढील शब्दात व्यथा मांडतात,

“गडिसूर्ला सारख्या ठिकाणी ख्रिस्ती धर्माला पाहिजे तसं पोषक वातावरण नव्हतं, थातुरमातुर वातावरण होतं. काहींचा फायदा झाला. काहींचं नुकसान झालं. फायदा झाला ते मानायला तयार नाहीत. ते मूळ प्रवाहापासून दूर जाण्यातच धन्यता मानतात. जे मूळ प्रवाहाला ओळखतात, ते वैचारिक पातळीवर एक येतात. आपआपल्या धर्माचे संस्कार आपआपल्या धर्माबद्दल आपुलकी निर्माण करणारे वाटले, इतर धर्माबद्दल आपुलकीची भावना निर्माण करणारे वाटले नाहीत.”

धर्मांतर करूनही पूर्वाश्रमीच्या जात-देव-धर्म कल्पना आहे तसाच राहिल्या. काही बाबतीत हा सांस्कृतिक संकर उल्लेखनीय ठरला. त्याने भारताची बहुसांस्कृतिक ओळखीला पुढे नेलं. परंतु ख्रिस्ती धर्मात जातिव्यवस्था, वर्णभेद, उच्चनिच भाव बोकाळला. शुद्ध व अशुद्ध कल्पना फोफावल्याने नवधर्मांतरित समाज पंथ व वर्गात विभागला गेला. लेखक या संमिश्र प्रथा-परंपरा व त्यातून आलेल्या अंधश्रद्धाचं सामाजिक विश्लेषण करतात.

लेखकाने अनेक ठिकाणी बौद्ध धर्म व ख्रिस्ती धर्मपरंपरेतील साधर्म्य व एकसंधता अधोरेखित करतात. ख्रिस्ती धर्मियांच्या स्थानिक परंपरा व रिवाजातील लोकसांस्कृतिकता ठळकपणे मांडतात. लेखकाचे अनेक बौद्ध धर्मीय नातलगांच्या अंगात येते. त्याविषयी चिंतिन करताना लिहितात, “बापाचं आईच्या अंगात येणं. देवीचं येणं, माझ्या विद्यार्थी जीवनाला कलंकित करणारं होतं.”

अंधश्रद्धेविषयी चिंतन करताना लेखकाला मार्ग सापडतो. लिहितात, “...माझ्या मनात साचलेल्या अंधश्रद्धाविषयक संकल्पनांचं निराकरण झालं. त्याचा शोध घेण्याची दृष्टी यातून मला मिळाली, भोंदू बाबांची फसवेगिरी, जादूटोणा, भूतप्रेत, भानामती हे कसं थोंतांड आहे. माणसं त्याच्या आहारी कशी जातात, हे लक्षात आलं. ...आईच्या अंगात दैवी शक्ती असती, तर आमच्या वाट्याला दुःखदारिद्र्य का आलं असतं? उलट आमचं जगण असह्य झालं. कष्ट करणं बंद झालं. परीक्षेची फी भरायला सुद्धा पैसे राहात नव्हते.” 


समाजातील रुढी-प्रथांच्या अवडंबराविषयी लेखकाला सतत चिंता जाणवत राहते. लिहितात, “गावात ख्रिश्चन लोक सणावारालाच प्रार्थना करताना दिसायचे. घरी अपवादात्मक बायबल वाचन, प्रार्थना करत. पोळा-दिवाळी, दसरा, रक्षाबंधन, नागपंचमी, होळी सर्वच साजरे करीत. गावातले काही ख्रिस्ती लपून-छपून नागपंचमी करत. गावात ख्रिश्चनांना महारच समजले जायचं. महार म्हणूनच वागणूक मिळायची. पण काही ख्रिस्ती स्वतःला वेगळे समजत. ‘जयभीम’ केलं की ‘नमस्ते’ करत. माधव मामा, दामाजी बुगा, काशिनाथ बुगा ख्रिश्चन पद्धतीनी वागण्याचा प्रयत्न करत. काही ख्रिस्ती बौद्धांना महार समजत. आपण महार आहोत हे विसरून जात.”

लेखकाने सव्वाशे पानात दलित, ख्रिस्ती समाजघटकातील परंपरा, श्रद्धाभाव, सहजीवन, ईश्वरकल्पना, रुढीविषयी विस्ताराने लिहिले आहे. ते करताना आपली जडणघडणीचा सारही मांडला आहे.

शेवटच्या २५ पानात धर्मांतराविषयी लिहिलं आहे. तत्पूर्वी आंबेडकरी चळवळीतील वावर, दलितांचे प्रश्न, समस्या, अत्याचार, अन्याय, राजकारण इत्यादींशी समरस होतानाचे चिंतण केले आहे. लेखकांचे दलित समुदायाशी असलेले जैविक संबंध, आत्मियता व जवळीकतेमुळे बौद्ध धम्म स्वीकारण्याकडे त्यांचा कल गेला.

त्याविषयी लेखक म्हणतात, “भारतातले बहुसंख्य शूद्र आहेत. व्यवस्थेनी स्वार्थाकरिता त्यांना शूद्र केले. जातिव्यवस्था निर्माण झाली, हे सगळं उलगडायला लागलं. खरा इतिहास समजू लागला. इतिहास आपला होता. मूठभर लोकांनी तो बदलवला. हा देश आपला आहे. आपण या देशाचे आहोत, असं वाटू लागलं.”

लेखक दलितांचा सामाजिक व राजकीय संघर्ष व मूलभूत प्रश्नांशी एकरूप होतो. त्याचा परिपाक म्हणून लेखक आपली पूर्वाश्रमीची दलित ओळख जपण्याचा प्रयत्न करू लागतो.

लिहितात, “मी गडिसूर्याचा, माझा बाप गडिसूर्याचा, पणजोबा हा टाडाळा या गायचा. पणजोबी गडिसूर्याची. पणजोबा ढगल्या गेला. आमचा इतिहास एवढाच आहे. फता दोन-तीन पिढ्यांचा, त्याच्या आधीचे उत्खनन करता येत नाही. ‘शूद्र पूर्वी कोण कोण होते?’ व ‘अस्पृश्यता’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ वाचल्यानंतर, ‘आपण कोण होतो?’ याची जाणीव झाली.”

दलित चळवळ व बाबासाहेबांच्या विचारांनी लेखक प्रगल्भ होत गेले व त्यांच्यामध्ये वैचारिक बदल झाला. बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून धर्मांतर केले, याविषयी लेखक पानोपानी चिंतन करतात. बाबासाहेबांचं जीवन प्रेरणा व बुद्धाच्या विचारातून बौद्ध धर्म स्वीकारावा, असं लेखकाला वाटते.

ही आत्मियता अधिक दृढतेने कशी वृद्धिगंत करता येईल, हा लेखकाचा प्रयत्न आहे. लिहितात, “मी बौद्ध धम्माचे विचार आत्मसात करू लागलो. बौद्ध धम्म स्वीकृत करावा ही मानसिकता बनली.”

लेखकाला जुना धर्म सोडताना दुख: होत राहते. त्याविषयी लिहितात, “धर्मांतराचा निर्णय मी माझ्या मनानी घेतला. ज्या धर्मात माझं बालपण गेलं, संस्कार झाले, विद्यार्थी जीवन घडलं, जडण-घडण झाली, असा हा ख्रिस्ती धर्म सोडत असल्याच्या वेदना मला झाल्या. ते स्वाभाविकही होते. ख्रिस्ती धर्मानी आधार दिला नसता तर शिकलो असतो की नाही? कदाचित गावात गुरढोरं राखत राहिलो असतो. जो धर्म सर्वस्व वाटायचा, जगातला सर्वश्रेष्ठ धर्म वाटायचा, तो धर्म सोडताना अतीव वेदना होऊ लागल्या.”

पुढे लिहितात, “मी ख्रिस्ती धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात प्रवेश केला. मी बुद्धप्रिय झालो. मला या प्रसंगात पंचशील व बावीस प्रतिज्ञा मोझेसनी सांगितलेल्या दहा आज्ञांत काही बाबतीत साम्य वाटलं.” लेखक म्हणतात, “धर्मांतराच्या घटनेकडे मी संशोधक व अभ्यासू दृष्टीनी पाहू लागलो. खऱ्या अर्थानी माझं ‘विचारांतर’ झालं, वैचारिक मन्वंतर झालं. मी सदाचाराचा मार्ग स्वीकारला. मला वैज्ञानिक दृष्टी प्राप्त झाल्याचा आनंद झाला. मी स्वतःला समाधानी मानू लागलो.” 

वाचा : काश्मिरची राजकीय कहाणी : ‘आतिश ए चिनार’

धर्मांतरानंतर होत असलेल्या चर्चा, वादांना लेखक अत्यंत शांतपणे सामोरे जातात. कुटुंबियांची साथसंगत लेखकासाठी महत्त्वाची होती. आपल्या एका मार्गदर्शकाच्या चर्चेला उत्तर देताना लेखक म्हणतात, “देवधर्माला नतमस्तक होणं आणि बुद्धाला शरण जाणं यात फरक आहे. तुम्ही म्हणता तेवढं हे सोपं नाही. बौद्ध धम्माचा स्वीकार करण्यापर्यंतचा माझा प्रवास, दगडाची ठेच लागली की दगडाला शेंदूर लावून पूजा करण्याइतका सरळ-सोपा नाही. अंधश्रद्धेचा नाही. अंधारात हातवारे करण्याचा नाही. तर माझा प्रवास मला डोळस वाटतो. बुद्धीला पटणारा आहे. सम्यक दृष्टीचा आहे.”

ख्रिस्ती धर्मातून बौद्ध धर्म स्वीकारणे हे लेखकाच्या दृष्टीने अंधश्रद्धेतून बाहेर पडणं होतं. लेखकाच्या आसपास अनेकांनी ख्रिस्ती धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारला होता. ही कृती पाहून जातीच्या नावाने मिळणाऱ्या सवलती लाटणे असा धर्मांतराचा उद्देश आहे, असं लेखकाला वाटते. लिहितात, “काही ख्रिस्ती झालेल्यांनी आपल्या मुलांना सवलती मिळाव्या म्हणून शाळेत ‘महार’ अशी नोंदणी केली. काहींनी ‘ख्रिश्चन’ अशी नोंदणी केली. काही ख्रिश्चनांनी बौद्ध पद्धतीनी लग्न करून नंतर बायकोचा बाप्तिस्मा करून त्यांना ख्रिस्ती केलं.”

एका मार्गदर्शकाविषयी लिहितात, “मी धर्मंतराविषयी सांगितल्यावर त्यांच्यात उदासिनता जाणवली. आम्ही जात जरी बदलवली, तरी नियमित चर्चला जातो. प्रभूची प्रार्थना करतो. धर्म बदलवला नाही, असं बेंडले यांनी सांगितलं. मी बेडले यांच्याशी, त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला असेल, या भूमिकेतून बोलत होतो. बेंडले यांनी मला पूर्ण सहकार्य केलं, चांगली वागणूक दिली, पण बाबासाहेबांचा उपयोग फक्त सोयी-सवलतीसाठी करतात यांची खंत मला वाटली.”

लेखक विद्यार्थी दशेत म्हणजे एम.ए.ला असताना धर्मांतर करतात. पण सामजिक व आर्थिक प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभे होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी लेखक अभ्यासाचा मार्ग स्वीकारतात. एम.फील करून प्राध्यापकीच्या जाहिराती शोधत राहतात. त्याचा शोध संपतो व त्यांना रोजगार मिळतो. लेखक गरीबी, निर्धनता, दारिद्र्येच्या कचाट्यातून सुटतात. परंतु सामाजिक भान म्हणून आपल्या उत्पन्नातील कही भाग चळवळीसाठी खर्च करावा, असं त्यांना वाटत राहते. त्यातून ते शोषित वंचिताच्या सामाजिक-आर्थिक उत्थान व सहकार्यासाठी उभे राहतात.

लेखकाने धर्मांतराच्या सामाजिक परिस्थितीविषयी केलेलं चिंतन मार्मिक आहे. लिहितात, “कोणताच धर्म परकीय नसतो. धर्माचा इतिहास सर्वांना महत्त्वाचा आहे. भारतावर ज्यांनी ज्यांनी आक्रमणं केली व ज्यांनी ज्यांनी भारताला गुलाम केलं, त्यांनी त्यांनी आपआपला धर्म भारतात आणला. काही धर्मातरं बळजबरीनी झाली. काही सेवा करून प्रचार करून झाली. काही प्रलोभनांनी झाली. भारतातल्या मातीतला, संस्कृतीतला व देशातला बौद्ध धम्म जगभर पसरला. तो शांतीच्या मार्गानी, हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार ख्रिश्चन धर्म व मुस्लिम धर्मासारखा जाणवत नाही. कदाचित जातिव्यवस्थेची उतरंड त्याला कारणीभूत असावी?”

पुढे लिहितात, “माझ्या बापाचा अंत्यसंस्कार ख्रिस्ती पद्धतीनी झाला. पेटीत बंद करून मातीत पुरण्यात आलं. बौद्ध धम्मात अंत्यसंस्कार प्रेत जाळून करण्यात येतो. आगीची भीती सर्वांनाच असते. मलाही वाटते. चटका जरी लागला, तरी माणूस घाबरतो. मेल्यावर बौद्ध धम्मात जाळतात. त्याची भीती वाटायची, मी बौद्ध अंत्यसंस्कार पद्धती जाणून घेतली. तेव्हा लक्षात आलं, बौद्ध धम्माप्रमाणे मृत्यू अटळ आहे. माणूस स्वर्गात किंवा नरकात कुठेच जात नाही. तो पंचतत्त्वांत विलीन होतो. माणूस ज्या घटकांपासून तयार झाला, त्याच घटकांत विलीन होतो. हे जाणल्याबर मनातली भीती नष्ट झाली.” 



विविध धर्मातील महिलांच्या स्थितीविषयी लेखकाने काही निरिक्षणे मांडलेली आहेत. लिहितात, “महिलांना त्या-त्या धर्मात किती स्वातंत्र्य देण्यात आलं, हा संशोधनाचा विषय आहे. एकाही स्त्रीनी धर्म स्थापन केला नाही, असे म. फुले म्हणतात. त्यामुळे धर्मग्रंथांत स्त्रियांच्या अधिकारांचा विचारच करण्यात आला नाही. बौद्ध धम्मात स्त्रियांना समतेचे स्थान आहे. ख्रिश्चन धर्मात प्रोटेस्टंट पंथात महिला रेव्हरंड झाल्याचं दिसत नाही. बौद्ध धम्मात भिक्खू संघात स्त्रिया दिसतात. प्रोटेस्टंट पंथात फादर विवाह करतात. बौद्ध धम्मात भिक्खूंना विवाह करता येत नाही. विवाह करायचा असल्यास ‘चिवर’ त्यागावा लागतो. कॅथॉलिक पंथात नन्स विवाह करताना दिसत नाहीत. त्या-त्या धर्माप्रमाणे धर्म कल्पना आहेत. बौद्ध धम्मात स्त्री-स्वातंत्र्य अबाधित आहे. हिंदू धर्मांनी भारतीय स्त्रियांना कसं नागवलं, हे वेगळं सांगायला नको.”

एका दलित ख्रिस्ती लेखकाचे हे आत्मकथन अनेक अर्थाने चिंतनशील आहे. ख्रिस्ती समाजजीवन, धर्मकल्पना, रचना, पंथ, संस्कृती, जातियता, वर्णश्रेष्ठता इत्यादीविषयी अधिकचं भाष्य लेखकाने टाळलं आहे. शिवाय हे स्वकथन असल्याने तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थितीचं कतन ओघानेच येते. परंतु त्याला लेख पूर्कणत: न्याय देऊ शकले नाही. ‘स्व’कथनातून बाहेर पडून निवडक ठिकाणी सामाजिकेचे उतारे व विश्लेषण मांडतात.

समग्र आत्मकथन म्हणून त्यात उणिवाही जाणवतात. परंतु दलित साहित्याची मीमांसा म्हणून या लखकानाकडे पाहिल्यास स्वाभाविक त्यातील उणिवा दुर्लक्षित होतात. ‘बाप्तिस्मा ते धर्मांतर’ नावाचं हे दलित स्वकथन मुख्य प्रवाही चर्चाविश्वातून दुर्लक्षित का राहिलं असाही प्रश्न शेवटी पडून जातो.

##

नाव : बाप्तिस्मा ते धर्मांतर

लेखक  : इसादास भडके

पाने  : १६५

किंमत  : १५० रुपये

प्रकाशक  : लेणी प्रकाशन, चंद्रपूर

………

कलीम अज़ीम, पुणे

मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ‘बाप्तिस्मा ते धर्मांतर’ : आंबेडकरी जाणिवांचे स्वकथन
‘बाप्तिस्मा ते धर्मांतर’ : आंबेडकरी जाणिवांचे स्वकथन
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgPtiLsLxfO2F3XXb91KTTAknR_1NX_bVGalknUuN0fjH4Tz6FLavag2aWwIzYR3SHmYFK1gVcuw7qrqp22BRm2k3cWbkeckNkbM8d6ffeWGaWEKa4lv5iAF9Wh9gY5_AbgaQlgKzgXqccQ_tdSxmah39cp0AAfl7BIEacHw6tqfw8uFeIzPqxg4A7b9Yvw/w640-h354/WhatsApp%20Image%202025-04-14%20at%2011.36.38_bc652e66.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgPtiLsLxfO2F3XXb91KTTAknR_1NX_bVGalknUuN0fjH4Tz6FLavag2aWwIzYR3SHmYFK1gVcuw7qrqp22BRm2k3cWbkeckNkbM8d6ffeWGaWEKa4lv5iAF9Wh9gY5_AbgaQlgKzgXqccQ_tdSxmah39cp0AAfl7BIEacHw6tqfw8uFeIzPqxg4A7b9Yvw/s72-w640-c-h354/WhatsApp%20Image%202025-04-14%20at%2011.36.38_bc652e66.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2025/04/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2025/04/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content