आयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल!

कोरोनाच्या महाभयंकर रोगराईत मानवाच्या जीवाची रक्षा करण्याचे प्रयत्न जगभरात होत आहेत. अगदी त्याचवेळी भारतात राम मंदिर भूमिपूजनाचा भव्य सोहळा पार पडला. त्यात किती कोटीची उधळण झाली हा विषय जरी बाजूला ठेवला तरी तोपर्यंत वायरसमुळे सुमारे 50,000 पेक्षा अधिक भारतीयांनी जीव गमावला होता. 

कोरोना आटोक्यात आणण्यासंदर्भातील उपाययोजनेची चर्चा अन्य ठिकाणी सुरू असल्याने त्यावर भाष्य सयुक्तिक नाही. ते काम सरकार आणि आरोग्य विभागावर सोपवूया. तुर्तास येणाऱ्या काळात बहुसंख्यांकवादाच्या आक्रमकतेतून प्रादूर्भित झालेल्या ‘कम्युनल वायरस’पासून देशाचे, लोकशाहीचे आणि धर्मनिरपेक्ष समाजाचे रक्षण कसे करायचे हे मात्र सर्वसामान्याच्या हाती आहे.

या पार्श्वभूमीवर भारताच्या संमिश्र संस्कृतीविषयी आस्था ठेवून असलेल्या नागरिकांच्या मनात चिंता निर्माण होणे रास्त आहे. आयोध्येत भूमिपूजन पार पडताच कानपूर, दिल्लीत मस्जिदीवर हल्ले झाल्याचे वृत्त होते. ‘काशी मथुरा..’ पूर्वीची पार्श्वभूमी तयार होत आहे का? अशी भिती व्यक्त झाली. 

या घटनांमुळे भारताच्या संमिश्र संस्कृतीचे वाहक असलेले वाराणसीकर मात्र चिंतित आहेत. वाराणसी कॉरीडॉर प्रकल्पातून तिथल्या जुन्या इमारती व प्राचीन मंदिराचे समतलीकरण करण्यात आले. त्यांच्या इच्छेविरुद्ध स्थानिकांना स्थलांतरित केले गेले. परिणामी तिथला सामान्य नागरिक हतबल झालेला आहे. मोठ्या अनर्थाची चाहूल लागल्याने तो अस्वस्थ आहे.



दुसरीकडे देशभरातील अल्पसंख्य समुदाय अनामिक दहशतीखाली वावरत आहेत. विशेषत: मुस्लिम समुदाय हतबल झाला आहे. एक तर त्याने सहजीवनाच्या मोबदल्यात तडजोड स्वीकारली किंवा तो बहुसंख्याकवादापुढे शरणागत झाला आहे. आज त्याच्यापुढे इतर प्रश्नांपेक्षा अस्तित्वावर आलेले संकट अधिक महत्त्वाचे आहे. एकीकडे स्वातंत्र्याची पंच्चाहत्तरी साजरी होत आहे तर दुसरीकडे मात्र ‘बाय चॉईस’ भारतीयत्व स्वीकारलेला हा समाज आपल्याच मायभूमीत उपेक्षित व अस्थिर झाला आहे. त्याची अगतिकता समजून घेण्याची गरज आहे.

देश आक्रमक बहुसंख्यकवांद्यांनी पूर्णत: आपल्या पंखाखाली घेतला असल्यचे चित्र आज निर्माण झाले आहे. राजकीय महत्वाकांक्षेने ग्रस्त झालेला हा घटक अन्य धर्मीयाकडे तुच्छतेने पाहत आहेत. त्याला हिंदुत्वप्रणित राष्ट्रवादापुढे दूसरे काही सूचत नाही. त्याने भारतीय सार्वभौमत्व आणि संसदीय लोकशाहीवर आधारित राष्ट्रवादाचे उद्ध्वस्तीकरण केले आहे. 

सत्तापक्ष सांगेल तीच राष्ट्रनिष्ठा अशा भ्रमात तो आहे. राजकीय सोय म्हणून सत्तापक्षाने मतदारांना व समर्थकांना देशभक्तीच्या भुलीचं इंजेक्शन देऊ केलेले आहे. या सूज मधून मतदार म्हणवणारा गट बाहेर पडू इच्छित नाही. चावी दिले जाणाऱ्या निर्जीव खेळण्याप्रमाणे त्याचे रुपांतर झालेले आहे.

प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष इशारा आला की हे गट संघटित होतात. त्यामुळेच लक्ष्यकेंद्री हल्ले वाढले आहे. दिल्ली दंगलीच्या आरोपपत्रात चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जात आहे. दडपशाहीचे धोरण स्वीकारून सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सिविल सोसायटीला दंगलींला कारणीभूत ठरवून त्यांच्यावर गुन्हे नोंदवले जात आहेत. जो पक्ष भाजपविरोधात बोलेल त्यांचा कायदेशीर बदोबस्त केला जात आहे. ब्रिटिशांपेक्षा अधिक कठोरपणे कायद्याचा दुरुपयोग भारतीयाविरुद्धच केला जात आहे. जर हेच सूडबुद्धीवर आधारित रामराज्य असेल तर पुढे काय? भगवान रामाच्या नावाने मानवी समाजावर कोसळलेले हे संकट कसे दूर करायचे हा विचार प्रथम करण्याची गरज आहे.

राजकीय हिंदू धर्म धारण केलेल्या या रामराज्यात बहुधर्मीय नागरिकाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गैरहिंदू (गैरब्राह्मण)ची बदनामी, छळ, उपमर्द, अवहेलना व अवमान केला जात आहे. लोककल्याणावर आधारित रामराज्याची कल्पना महात्मा गांधींनी केली होती. मुहंमद इकबाल यांनी रामाला ‘इमामे हिंद’ म्हटले होते.

लबरेज़ है शराबे-हक़ीक़त से जामे-हिन्द
सब फ़ल्सफ़ी हैं खित्ता-ए-मग़रिब के रामे हिन्द
ये हिन्दियों के फिक्रे-फ़लक उसका है असर,
रिफ़अत में आस्माँ से भी ऊँचा है बामे-हिन्द
इस देश में हुए हैं हज़ारों मलक सरिश्त,
मशहूर जिसके दम से है दुनिया में नामे-हिन्द
है राम के वजूद पे हिन्दोस्ताँ को नाज़,
अहले-नज़र समझते हैं उसको इमामे-हिन्द
एजाज़ इस चिराग़े-हिदायत का है,
यही रोशन तिराज़ सहर ज़माने में शामे-हिन्द
तलवार का धनी था, शुजाअत में फ़र्द था, पाकीज़गी में, जोशे-मुहब्बत में फ़र्द था
संघ परिवाराकडून याच भगवान रामाला नव्या आक्रमक रुपात पुढे आणून धर्माच्या नावाने राजकीय ध्रुवीकरण घडवून आणले जात आहेत. हिंदू धर्म हा बहुदेववादी धर्म आहे. अनेक लोक रामाची मर्यादा पुरुषोत्तम म्हणून देवरुपात भक्ती करतात. याच रामाच्या भक्तीचा देखावा उभा करून संघ परिवार स्वत:च्या राजकीय अजेंड्याकरिता खुद्द रामाला राबूवन घेत आहे. त्यांनी राज्यसंस्थेला हाताशी धरून लोकशाही संस्थांचा खात्मा करायला सुरुवात केली आहे. हे सर्वकाही रामाच्या नावाने सुरू आहे. 



हिंसा आणि धार्मिक द्वेषाच्या पायावर आणि बहुसंख्यकाच्या दडपशाहीच्या बळावर राममंदिर उभारले जात आहे हे एक उघड सत्य आहे. राम मंदिराच्या नावाने घडवून आणलेल्या दंगलीत हजारोच्या संख्येत निष्पाप लोक मारले गेले, देशाला अराजकात लोटणाऱ्या झुंडींनी बाबरी उद्ध्वस्त केली हा काळा इतिहास कधीही पुसला जाणार नाही.

अयोध्येत भगवान रामाच्या भूमीपूजनाखाली निष्पाप मानवी मुडद्यांचा काळाकुट्ट इतिहास दडला आहे. हजारोंच्या थडग्यावर भगवान रामाच्या भव्य मंदिराची कल्पना रंगवली गेली व त्याला प्रत्यक्षात आणले गेले. भव्य मुर्तीची प्रतिष्ठापना होईल, पण देशाला त्या प्रेतांच्या सांगाड्याचा विसर पडणार नाही. येणारी हजारो वर्षे हे सांगाडे भगवान रामाला साद घालतील व आपल्या उद्ध्वस्तीकरणाचा जाब विचारत राहतील.

भाजपाई हिंदू धर्मसत्तेत प्रादूर्भाव झालेल्या या ‘कम्युनल वायरस’ला रोखण्यासाठी समस्त भारतीयांचे प्रयत्न गरजेचे आहेत. विरोधी पक्षांनी सरकारवर वचक बसविण्यासाठी आपली आयुधे बदलण्याची गरज आहे. ज्या मागास, शोषित व वंचित गटांचे संघटिकरण करून भाजपने राज्य मिळवले, विरोधी पक्षाला त्या समूहापर्यत पोहोचावे लागेल.

घरोघरी जाऊन त्यांना लोकशाहीप्रणित समाजवादाचा राष्ट्रवाद पटवून दिला पाहिजे. आणीबाणीनंतरचे पराभव पचवून इंदिरा गांधींनी देश पिंजून काढला. झालेल्या चुका दुरुस्त करण्याची हमी त्यांनी देशाला दिली. त्यांचाच हा पक्ष सहा वर्षानंतरही अपयश स्वीकारू शकलेला नाही. सामान्य लोकांशी नाते पुनप्रस्थापित करू शकला नाही. अस्थिर व हवालदिल झालेल्या लोकांना नेतृत्वाची गरज आहे. अशावेळी त्यांना भाजपशी मुकाबला करण्यासठी एकट्याने सोडून देणे शहाणपणाचे नाही.

सत्तापक्षालादेखील ‘सबका साथ..’चा वायदा पूर्ण करावा लागेल. त्यांच्या चळवळीचे, विरोधाचे आणि सत्तेचे फलित आयोध्या त्यांनी मिळवून घेतली. मागील सरकारच्या उद्घाटनाचे फित कापण्यापेक्षा त्यांनी आता शाश्वत विकासाची धोरणे प्रत्यक्षात आखली पाहिजे. जगभर मलीन झालेली देशाची प्रतीमा पुन्हा उजळ करावी लागेल. त्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणाला आळा घातला पाहिजे.

प्रचारी विकासातून बाहेर येऊन प्रत्यक्षात तो घडविला पाहिजे. आपल्या टोळधारी संघटकांना आवरायला हवे, व्यक्तिस्वातंत्र्यावर होत असलेले हल्ले थांबवले पाहिजे. त्याचवेळी सिविल सोसायटी व मानवी समाजाला भारताची प्राचीन सभ्यता, सहजीवन, सौहार्द, सद्भावनेच्या संस्कृतीचे बीजारोपण नव्याने करावे लागेल. त्यासाठी संताच्या लोककल्याण आणि सहजीवनावर आधारित आधात्माचा आधार मोलाचा ठरू शकतो.

भाजप व संघप्रणित संस्था-संघटनांनी ‘काशी मथुरे’चा हट्ट सोडला पाहिजे. त्यातून मानवी हानीशिवाय हाती काहीच येणार नाही. सरसंघचालक बाबरी निकालानंतर या विषयावर विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना म्हणाले, “संघ कुठलीही चळवळ राबत नाही, संघ मनुष्य निर्माणाचे काम करतो. एक संघटना म्हणून संघ या (रामजन्मभूमी) आंदोलनात उतरला, हा अपवाद होता. आंदोलने आमचा विषय नाही, पुढे आम्ही मनुष्य निर्माणाचे काम करत राहू.” या विधानाचा अर्थ स्पष्ट करून सांगायची गरज नाही, संघाला यातून काय अभिप्रेत आहे, हे त्यातून समजते. 



भाजपाई हिंदू धर्म धारणा केलेल्यांना रोखणे अशक्य झाले आहे. तिरस्कार, द्वेष सुडाची भावना त्यांच्यामध्ये पेरण्यात आलेली आहे. या विध्वंसी प्रवृत्तीला रोखणे सर्वसामान्याच्या हातात आहे. द्वेशधारी संघटक व संघटनांना मनुष्यबळाच्या रुपाने होणाऱ्या इंधनाचा पुरवठा रोखता येऊ शकतो. ज्या बहुजन समाजातील युवकांनी रामजन्मभूमी आंदोलन राबविले, त्यांच्या आताच्या प्रतिक्रिया सामान्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. त्यांनी आपल्या दृष्कृत्याची माफी मागितली आहे. आज ते अहिंसेची मोहीम राबवत आहेत.

आंतरधर्मीय संवाद साधून दुभंगलेली मने पुन्हा जुळवून घेण्याची गरज आहे. भारताची बहुसांस्कृतिकता, वैविध्यता, सहिष्णुता आणि सद्भावनेची परंपरा अबाधित ठेवण्याची आज पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी आपापसातील संघर्ष बाजूला करून संवाद साधला पाहिजे. 

भयग्रस्त झालेल्या अल्पसंख्य समुदायाला पाठीवर हात ठेवून धीर देण्याची गरज आहे. त्याच्या मनात कोंडलेल्या असंख्य व निरुत्तर भावनांची साद ऐकली पाहिजे. द्वेशावर आधारित राजकीय परिभाषा बदलण्याची व सहजीवनाचे नवे व्याकरण मांडण्याची हीच ती वेळ आहे.

(15-31 ऑगस्ट 2020च्या ‘परिवर्तनाचा वाटसरू’ अंकासाठी लिहिलेले संपादकीय. जागेअभावी तिथे संपादित करून टाकावे लागले होते. इथे ते पूर्ण स्वरूपात देत आहे.)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,43,इस्लाम,38,किताब,18,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,276,व्यक्ती,7,संकलन,62,समाज,234,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: आयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल!
आयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgAKyK2Ey_jQ-D35Q6QnhyphenhyphenmP22Mcyv-awQVhH4X1abZPwZ50iNGI4xpXMsIlgWYKS3crz6nl5nZQ36tUZG1UI_u49WBVvFdqLPdatASX_GCp1K1AZevOEvsykiGvJ8AMm8fBWTimqSYqg4C/s640/Ram+Bhakt.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgAKyK2Ey_jQ-D35Q6QnhyphenhyphenmP22Mcyv-awQVhH4X1abZPwZ50iNGI4xpXMsIlgWYKS3crz6nl5nZQ36tUZG1UI_u49WBVvFdqLPdatASX_GCp1K1AZevOEvsykiGvJ8AMm8fBWTimqSYqg4C/s72-c/Ram+Bhakt.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/08/blog-post_26.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/08/blog-post_26.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content