
गेली दोन-तीन आठवडे आंबेडकरांनी १९४० साली कराडच्या संघ शाखेला भेट दिली होती, या जुन्या बातमीवरून खल सुरू आहे. या कथित संघ जवळिकीवर अनेक लेखक-अभ्यासक-भाष्यकारांनी संघाच्या हेतु-उद्दिष्टांची बऱ्यापैकी चिकित्सा व समीक्षा केली आहे. विविध मते-मतांतरे, तर्क, वस्तुस्थितीची मांडणी झाली. विपर्यस्त मांडणीचा समाचार घेतला. या संदर्भात अनेक दैनिकात पत्रव्यवहार, वृत्तलेख, टिपण, लेख व बातम्या प्रकाशित झाल्या.
वस्तुत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वरूप लोकशाहीविरोधी, धर्मनिरपेक्षताविरोधी, जाति-वर्ण व्यवस्थेचं समर्थक आणि हिंदु-मुस्लिमांच्या सामाजिक सहजीवनाविरोधात राहिलेलं दिसतं. धर्माआधारित समानता त्यास नको असते. चातुर्वर्ण्य हे त्याचं वैशिष्ट्य मानलं जातं.
आंबेडकरांशी हिंदू राष्ट्रवाद्यांच्या या सलगीकरणात राज्यघटनेने दिलेल्या आरक्षित जागांची राजकीय गणितं दडलेली आहेत. या अनुषंगाने याकडे पाहता येईल. आपली निश्चित कार्यक्रमपत्रिका राबवण्यासाठी त्याला सत्ता हवी असते. ही सत्ता निवडणुकीच्या मार्गातून मिळवता येते. लोकशाही प्रक्रिया व राज्यघटनेने घालून दिलेले मार्गदर्शक तत्त्व या प्रक्रियेतून निवडणुकीला सामोरं जावं लागतं. देशात निवडणुकीच्या मार्गाने लोकशाही प्रस्थापित केली जाते. वेगवेगळ्या जातसमुदायाचे प्रतिनिधी निवडून येतात. त्यासाठी लोकप्रतिनिधित्वासाठी ठरावीक जागा आरक्षित आहेत. या आरक्षित जागांवर डोळा ठेवून आरएसएस आपली कार्यक्रमपत्रिका (अजेंडा) राबवत असते.
गैरब्राह्मणी विशेषत: आदिवासी, दलित, मागास समुदायात राजकीय शिरकाव करायचा असेल तर त्यांच्या जाति-समुदायावर आधारित प्रतीकं स्वीकारावी लागतात. भाजप-संघाने ही कृती हेतूत: घडवून आणली आहे. याच संघटित कार्यक्रमाचा भाग म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांचं संघाने अपहरण केलेलं दिसतं. त्यात त्याला बऱ्यापैकी यशही आलेलं दिसतं.
यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर हे अधिक स्पष्ट होते. २९ पैकी १० राखीव जागांवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. त्यात एकही बौद्ध उमेदवार नाही. एकूण जागांवर २० ठिकाणी हिंदू दलित आमदार निवडून आले आहेत. बौद्ध व दलित हिंदूची राजकीय विभागणी करण्यासाठीदेखील भाजपने आंबेडकरांचा वापर केलेला दिसतो. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण हा त्यातील एक घटक आहे.
मुळात, बाबासाहेबांची एकूण मांडणी व कृती सामाजिक व आर्थिक समानतेसंदर्भात राहिलेली आहे. त्यांनी आपल्या लेखन-कृतीतून हिंदू धर्मातील जाति-वर्ण व्यवस्थेवर कठोर हल्ला चढवला. वर्णश्रेष्ठत्व व अस्पृश्यतेसंदर्भात त्यांनी केलेली चिकित्सा सार्वजनिक आहे. त्याचप्रमाणे त्यांची ‘हिंदू राज्य’ व ‘हिंदू राष्ट्र’ विषयी केलेली मांडणी सर्वज्ञात आहे. ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ या पुस्तकात त्याविषयी त्यांनी बहुचर्चित मीमांसा केलेली आढळते.
वस्तुत: संघाने आपल्या प्रत्येक राजकीय विरोधक विभूती पुरुषांना दैवत्व प्रदान करून आपला नायक, निकटवर्तीय घोषित केलं आहे. एकदा नायक किंवा दैवत्व घोषित करून टाकलं की, त्यांच्या विचारातील विरोध-कृतींकडे आपोआप दुर्लक्ष होतं, हे संघाचं धोरण राहिलेलं आहे.
उपरोक्त चर्चेत अनेक अभ्यासक-लेखकांनी बाबासाहेबांची, ‘हिंदू राज्य देशावर कोसळलेली भयानक आपत्ती असेल..’ ही मांडणी उल्लेखित केलेली आहे. याच संदर्भात १९२८ साली ‘सायमन कमिशन’समोर बाबासाहेबांनी दिलेली साक्ष उद्बोधक आहे.
त्यांनी म्हटलं होतं, “अस्पृश्यांना हिंदुत्व हा शाप आहे. तो काही वर नव्हे. हिंदुत्वाचा शाप अस्पृश्य लोक भोगीत आहेत. त्या अस्पृश्य लोकांनी हिंदू लोक मरतील का तरतील याची चिंता करण्याचे काही कारण नाही. खरे म्हटले असता हिंदू म्हणजे जगातले मोठ्यातले मोठे पाप आहे. ज्या हिंदू जातीने अनेक प्रकारचे कठोर निर्बंध घालून माणसांच्या माणुसकीची अहर्निश विटंबना चालविली आहे ती जात जगातून नाहीशी झाली तर तिच्यासाठी कोण अश्रू गाळील?” (डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-२०, पान, ३५८)
हे विचार १९२८ सालचे आहेत. किंबहुना आपल्या लेखन-विचारांपासून आंबेडकर कधी परावृत्त झाले नाही किंवा ती बदलली नाहीत. त्यामुळे संघाचे ‘बाबासाहेबांचे विचार नंतर बदलले’ असं म्हणणं अनैतिहासिक ठरते.
‘हिंदू राष्ट्र’ व ‘हिंदू राज्य’विषयी बाबासाहेबांचे विचार पुन्हा-पुन्हा वाचल्यास संघाकडून त्यांचं अपहरण होण्याची नेमकी मेख लक्षात येण्यास अवधी लागत नाही. आंबेडकरांचे ‘हिंदू राज्या’संबंधी बहुचर्चित विचार कथितरित्या बाबासाहेब संघाच्या कराड शाखेला भेट दिली होती, त्याच काळातील आहेत.
त्या मांडणीत पुढे बाबासाहेब असंही म्हणतात की, “…हिंदू त्याबद्दल काहीही म्हणोत, पण हिंदू धर्म हा स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांना उपद्रवकारक आहे. याबाबतीत तो लोकशाहीविरोधी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ‘हिंदूराज्या’ला प्रतिबंध केलाच पाहिजे.” (पाकिस्तान, पान-३५८)
‘राजकीय हिंदुत्व’ हे आरएसएसचं धोरण व कार्यक्रमपत्रिकेवरील प्रमुख विषय राहिलेला आहे. त्यात दलित, आदिवासी आणि धार्मिक अल्पसंख्याकांना स्थान नाही. हिंदू श्रेष्ठत्वाच्या अहगंडाने पछाडलेल्या संघाला सनातन धर्म सोडला तर इतर धर्मियांचं धर्म तत्त्वज्ञान व इहवाद मान्य नसतो. बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे हिंदू महासभा व संघाने राबवलेली द्वेष मोहीम सर्वज्ञात आहे. अशा स्थितीत बाबासाहेब संघ-हिंदुत्वाचे समर्थक होते, हितचिंतक होते, असं म्हणणं वस्तुस्थितीला धरून नाही.
वास्तविक, बाबासाहेबांचे विचार सर्व जात-धर्म समुदायाला उद्देशून होते. मुस्लिम, शीख आणि कनिष्ठ जाति-समुदायाने आपापले हितसंबंध ओळखून संघटित व्हावं आणि सवर्ण हिंदूंच्या विरोधात उभं राहावं, असं त्यांना अपेक्षित होतं. “हिंदू मुस्लिम एकत्र राहू इच्छित असतील तर त्यांच्यामध्ये दृढ विश्वास निर्माण करण्यासाठी पूरक परिस्थिती तयार केली पाहिजे.” असंही त्यांनी म्हटलं होतं. हिंदू व मुस्लिमांच्या मिश्र पक्षाची स्थापना हाच हिंदू राज्याचं पिशाच्य गाडून टाकण्याचा सर्वांत प्रभावी उपाय आहे, अशी त्यांची भूमिका होती.
मुस्लिम आणि दलित यांचा समिश्र राजकीय पक्ष असावा, असं त्यांना वाटत होतं. त्यांनी आपल्या बहुचर्चित ‘थॉट्स ऑफ पाकिस्तान’ पुस्तकात लिहिलं आहे, “हिंदू समाजात असे अनेक कनिष्ट स्तर आहेत की, ज्यांच्या आर्थिक, राजकीय आणि सामजिक गरजा बहुसंख्य मुस्लिमांप्रमाणे आहेत आणि जे शेकडो वर्षांपासून त्यांचे साधे मानवी हक्कही नाकारणाऱ्या व हिरावून घेणाऱ्या उच्च जातीय हिंदूंपेक्षा मुस्लिमांबरोबर समान ध्येय गाठण्यासाठी एकत्र येण्यासाठी निश्चितच तयार होतील.” (पान-३५९) आंबेडकरांची विविध भाषणे व वृत्तपत्रातील नोंदी पाहिल्या तर हा विचार अधिक स्पष्टपणे पुढे येतो.
कराड संघ शाखेच्या कथित जवळीकीचा समाचार घेताना अनेक लेखक-अभ्यासकांनी ‘केसरी दैनिका’च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. या चर्चेला दुजोरा देणारा एक शोधनिबंध १९८१ साली श्री. डॉ. यू.म. पठाण यांनी लिहिला होता. ‘केसरी’च्या शताब्दीनिमित्त संपादकाच्या विनंतीवरून त्यांनी तो लिहिला आहे. त्यात टिळकांच्या संपादक काळातील अनेक लेख, संपादकीय व बातम्यांवर श्री. पठाण यांनी संदेह व्यक्त केला आहे.
लेखकाने राज्यातील अनेक दंगलीस केसरी वृत्तपत्राला जबाबदार ठरवलं आहे. दंगलीचं वार्तांकन करताना बहुसंख्याक हिंदूना उत्तेजित करणारी विधाने व चिथावण्या देण्याची भूमिका केसरीकारांनी स्वीकारली. “..दंग्यांसबंधीच्या वृत्तांना व लेखांना केसरीने भरपूर प्रसिद्ध दिली होती” म्हणत लेखक लिहितात, “‘केसरी’ने हिंदुत्वनिष्ठांच्या व हिंदू महासभेच्या एतदविषयक पत्रकांना व सभांच्या वृत्तांतांना ठळक व विस्तृत प्रसिद्धी दिली. ही भूमिका हिंदुत्वनिष्ठ दृष्टिकोनाच्या तसेच हिंदूंच्या संरक्षणाच्या दृष्टीने सुसंगत वाटावी, अशीच होती.” (प्रा. फकरुद्दीन बेन्नूर स्मृतिग्रंथ, पान-७०-७१)
टिळकांचा गणपती उत्सव मुस्लिमांना डिवचण्यासाठी होता, असा संदर्भ पठाण देतात. १८९४ सालच्या केसरीतील लेखाचा उल्लेख करत लेखक लिहितात, “..हिंदूंनी मुसलमानांच्या ताबुतापुढे नाचू नये व मुसलमानांचे उत्सव साजरे करण्याचे बंद करून त्याऐवजी तितकेच १० दिवस चालणारा श्रीगजाननाचा उत्सव साजरा करावा अशी ती योजना होती. ...गणेशोत्सव मुसलमानांना चिडवण्याकरिता काढला, असा आरोप करण्यात येतो, पण जर मुसलमान हिंदूंच्या न्याय्य हक्कांवर उठल्या-बसल्या दंडेलीने आक्रमण करू लागले तर गणेशोत्सव निर्माण करून हिंदूंची मने मुसलमानांच्या ताबुतापासून परावृत्त करणे यात काहीएक चूक नाही.” (पान-७७)
गणपती काळातील हिंदू-मुस्लिम वादाची पार्श्वभूमी या उत्सवाच्या स्थापनेत दडलेली आहेत, हे या कथनातून दिसून येते. वास्तविक, गेल्या सात-आठ दशकात महाराष्ट्रात गणशोत्सव काळात घडलेल्या दंगलीत लाखो निष्पापांचे प्राण गेलेल आहेत, त्याचा दोष टिळक व त्यांच्या केसरीवर आहे, असं का म्हणू नये?
डॉ. पठाण यांनी केसरी वृत्तपत्राच्या अनेक वादग्रस्त व प्रक्षोभक बातम्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. किंबहुना नंतरच्या काळातही सामाजिक एकता व सलोख्याशी संबंधित कृतीची ‘केसरी’ कशी ‘दखल’ घेत होतं, हे अभ्यासकांना नव्याने सांगण्याची गरज नाही. बाबासाहेबांनी धर्मातरांची केलेली घोषणा केसरीला पटली नव्हती. १८ ऑक्टोबर १९३५च्या अग्रलेखात केसरीने आंबेडकरांच्या धर्मांतराच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
लिहिलं, “…असल्या धमकीने अस्पृश्यता निवारण्याच्या कार्याला चालना मिळेल अशी डॉ. आंबेडकरांची कल्पना असेल तर ती साफ चूक आहे.” याच वर्षी पुण्यात हिंदू महासभेचं अधिवेशन भरलं. पंडित मालवीय त्याचे अध्यक्ष होते. १९३५मध्ये पुण्यात हिंदुमहासभेचे अधिवेशन पं. मदनमोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली भरले. अधिवेशनाचे सर्व वृत्तांत केसरीने अत्यंत तपशिलवार दिले. ‘हिंदू जगणार, मरणार नाही’ असं ३१ डिसेंबर १९३५च्या अंकाच्या अग्रलेखाचं शीर्षक होतं. त्यावरून केसरीची या संदर्भात नेमकी काय भूमिका होती, हे उघड होते.
स्वतंत्र मतदरासंघ म्हणजे राखीव जागांवर देखील केसरी प्रश्न व शंका उपस्थित करते. त्यावेळी केसरीकारांनी लिहिलं, “जातीय निर्णयामुळे स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात येणार, हा निर्णय हिंदूंवर अत्यंत अन्याय करणारा, अराष्ट्रीय व हिंदुस्थानात जबाबदारीचे राज्य स्थापन होण्याच्या मार्गात विघ्ने आणणारा असल्यामुळे देशातील लोकास तो मुळीच मान्य होणार नाही.” (पान-८०)
न.चिं. केळकर संपादक असताना ‘केसरी’ने हिंदू-मुस्लिम वादात तेल ओतण्याचं काम केलेलं दिसून येईल. त्याचप्रमाणे राष्ट्र सभा व तिच्या अनेक नेत्यांवर कठोर टीका केलेली आहे. जवाहरलाल नेहरूंवर तोंडसुख घेतलं. काँग्रेसचे सदस्य असूनही ते काँग्रेसवर उघड टीका करीत. राष्ट्रीय मुसलमानांवर केसरीकार ताशेरे ओढतात. त्यांना फाळणी समर्थकांच्या यादीत मोजतात. त्यावेळी आंबेडकर राजकीय मुक्तीचा लढा लढत होते. परंतु केळकरांचं वृत्तपत्र त्यांची हवी तशी दखल घेत नाही.
केळकरांचे वृत्तपत्रातील अनेक विचार, मांडणी संघाच्या राजकीय हिंदुत्वाच्या जवळ जाणारी वाटते. श्री. पठाण यांच्या शोधनिबंधाचा सुक्ष्मरित्या आढावा घेतल्यास केसरी स्थापनेपासून हिंदुत्व विचारांचे पत्र वाटते. धनंजय कीर यांनी सावरकर चरित्रात म्हटलं आहे की, ऑगस्ट, १९२४ला नाशिकमध्ये न.चि. केळकर, बी.एस. मुंजे आणि विनायक सावरकर एकाच मंचावर बसून मुस्लिमविरोधी भाषणं देत होती. (सावरकर, पान-१६८)
हिंदू राष्ट्रवादी दृष्टिकोनाचा स्वीकार केल्याने केसरीने मुसलमानांविषयी अनेक वेळा पूर्वग्रहयुक्त लिखाण केल्याचं आढळते. पठाण लिहितात, “केसरीने घेतलेल्या या भूमिकेमुळे केसरी हे हिंदुत्वनिष्ठ वृत्तपत्र आहे, एवढेच नव्हे तर ते मुस्लिमविरोधी वृत्तपत्र आहे, अशी भावना मुस्लिम समाजात बळावली असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.”
ग.वि. केतकर सारखे संपादक केसरीला लाभले होते. गांधी हत्या काळात बहुधा ग.वि. केसरीचे संपादक असावे. ते टिळकांचे नातू होत. ते हिंदू राष्ट्रवादी तथा संघ विचारांचे होते. त्यांचं आरएसएस प्रेम लपून नव्हतं. गांधी हत्या खटल्यातील आरोपींचं त्यांनी निर्लज्ज समर्थन केलेलं होतं. खटल्यातून काही आरोपींची पुराव्याअभावी सुटका झाली त्यावेळी ग.वि. केतकरांच्या हस्ते त्यांचा सत्कार पुण्यातील एका उद्यानात करण्यात आला. यावेळी केतकरांनी महापूजा देखील घातली होती.
अशा ‘केसरी’ने बाबासाहेबांना संघाचा समर्थक घोषित करणे हास्यास्पद का ठरू नये? बाबासाहेब संघाचे समर्थक असणे म्हणजेच ते हिंदुत्वाचे समर्थक! पण बाबासाहेबांचं एकूण लेखन, भाषणं, विचार व कृती पाहिली तर ते कर्मठ हिंदुत्वविरोधी होते, हे स्पष्ट होतं. धर्मांतर, मनुस्मृतीचं दहन असो किंवा त्यांनी समुदायाला उद्देशून दिलेल्या २२ प्रतिज्ञा म्हणजे ‘संघाच्या हिंदुत्वा’वर केलेला प्रखर हल्लाच होता.
त्याचप्रमाणे ‘रिडल्स ऑफ हिंदूझम’ पुस्तकातील आंबेडकरांची मांडणी व प्रतिपादन आरएसएस-हिंदुत्वद्यांना अडचणीत टाकणारी आहे. या पुस्तकावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी, संघ छावणी आणि शिवसेनाही रस्त्यावर उतरली होती. हा तर खूप अलीकडचा इतिहास आहे. हेच ‘हिंदू कोड बिला’विषयी सांगता येईल. उपरोक्त सर्वच प्रकरणात हिंदुत्ववादी व आरएसएसला आंबेडकर नको असतात.
वास्तविक, आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयेसवक संघावर सडेतोड टीका केल्याचे संदर्भ आहेत. १४ जानेवारी १९५१ला त्यांनी संसदेत भाषण केलं होतं. त्यात त्यांनी संघाला धोकादायक संघटन म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर स्वतंत्र भारताच्या निवडणुकीसाठी ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’च्या जाहीरनाम्यात आपला पक्ष हा हिंदू महासभा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या प्रतिक्रियावादी संघटनेसोबत कदापिही युती करणार नाही असा उल्लेख त्यांनी केला होता. आंबेडकरांनी २३ ऑक्टोबर १९२८ला ‘सायमन कमिशन’पुढे केलेल्या हिंदुत्वविषयी मांडणीचा सारांश देऊन थांबू या.
त्यात बाबासाहेब म्हणतात, “हिंदू जात आपले पाप आपल्या प्रांतातच ठेवील तरी बरे. पण नाही, जिकडे जाईल तिकडे ती आपल्या पापाची पेरणी केल्याशिवाय राहणार नाही. इतकी ही हिंदू जात उपद्रवी आहे. सिंध प्रांतात जावो अथवा दक्षिण आफ्रिकेत जावो, हिंदू जात आपले पाप जिथे जाईल तिथे, पसरवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कोठेही जावो, जगाच्या स्वच्छ जीवनाच्या झऱ्यात आपले पातकी जीवन मिसळून त्यास ती अशुद्ध करणार नाही असे होणे नाही. या पतीत जातीला जगती तलावर थारा देणे ही मानव जातीच्या हिताच्या दृष्टीने मोठी आपत्ती आहे. मनुष्य मात्रास तिच्या सान्निध्यात राहावे लागणे हेच आधी मोठे दुर्भाग्य आहे. तिच्यात समावेश करून घेणे आणि तिच्या सत्तेखाली वागणे म्हणजे तर जिवंतपणी नरक यातना भोगण्यासारखे आहे.”(खंड, १९, पान-३५८)
बाबासाहेबांनी उल्लेखित केलेली ही ‘हिंदू जात’ हिंदू राष्ट्रवादी व संघाच्या हिंदुत्व विचारांचे रुपक आहे. बाबासाहेबांचे हिंदुत्व व हिंदू राज्याविषयी विचार-लेखन वाचलं की, बाबासाहेबांना संघ समर्थक किंवा हितचिंतक होते, याचा थांग आपोआप लागू शकतो. अशा स्थितीत आंबेडकरांना संघ-समर्थक ठरवणे त्यांचं समग्र व्यक्तित्व आणि विचारांशी प्रतारणा करणारे आहे.
कलीम अज़ीम, पुणे
मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com