मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे तीन दशकं


थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते. इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो. तो आपल्या जातीचीच बंधने पाळत जगत राहतो. बहुधा जातीचाच व्यवसाय करीत राहतो. तो जातीतच लग्न करून जातीतच मरत असतो. जातीला व्यवसाय आणि व्यवसायाला जात चिकटलेली असते. अतिशय पारंपारिक आणि कर्मठ असलेल्या जातिव्यवस्थेवर इस्लामने अत्यंत निकराचा हल्ला केला. पण जातिव्यवस्था एवढी चिवट आहे की, ती हरळी गवतासारखी उन्हाळ्यात वाळून कोळ झाली तरी पाऊस पडताच हिरवी होऊन पसरत जाते.
जातच दुसरी जात घडवते. जातीतच लग्न केल्याने आणि जातीबाहेर लग्न करताच शिक्षा मिळत असल्याने जाती बंदिस्त झालेल्या आहेत. अशा बंदिस्त जातिव्यवस्थेत इथे आलेल्या सुफींच्या प्रेम, समता, बंधुभाव समन्वय आणि सेवा या आचरण तत्त्वांच्या प्रभावाने सर्वच जातीवर्णातील लोकांनी आपले जातीवर्ण सोबत घेऊनच धर्मांतर केले. उच्च जातवर्णाचे नव-मुस्लिम धर्मांतर केल्यानंतरही उच्चच राहिले. कनिष्ठ जातवर्णातील नवमुस्लिम धर्मांतरानंतरदेखील कनिष्ठ राहिले. एवढेच नव्हे तर इस्लाममध्ये मुळात नसलेली पुरोहितशाही मात्र भारतीय मुस्लिम समाजात आलेली आहे. इथल्या सगळ्याच धर्मांतरांचे, नवसंप्रदायांचे जातिव्यवस्थेने असेच खोबरे केलेले आहे.
वाचा : संमेलन संपले, अखिल भारतीयच, पण मुस्लीम मराठी!
हिंदुत्ववाद्यांचा द्वेषभाव 
इस्लाममध्ये आधीच विविध पंथ आहेत त्यात इथल्या जातीवर्णांची भर पडलेली आहे . इथल्या मुस्लिम समाजाच्या वरीलप्रमाणे असलेल्या स्थितीगतीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचा लेखाजोखा ताळेबंद मांडता येतो. मुस्लिम मराठी साहित्याची चळवळ ख्रिस्ती मराठी साहित्य चळवळीसारखी चर्चप्रणित म्हणजेच धर्मप्रणित चळवळ नाही. तर ती मुस्लिम समाजातील उच्च जातवर्गाच्या विरोधातील चळवळ आहे. ही चळवळ मुळी मुस्लिम-बहुजन लेखकांची चळवळ आहे. एकीकडे प्रस्थापित उच्च मुस्लिमांचा तुच्छताभाव आणि दुसरीकडे प्रस्थापित हिंदुत्ववाद्यांचा द्वेषभाव मुस्लिम-बहुजनांना सारखा छळतो आहे. या छळातून मुस्लिम मराठी साहित्य निर्माण होत आहे. हे साहित्य क्रांती करू शकणार नसेल पण बदल होण्यास साहाय्य करू शकते.
जर मूलभूत इस्लामी तत्त्वज्ञान स्वीकारले तर संपूर्ण इस्लाम हा खरेच एकजिनसी वाटतो. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. म्हणून या चळवळीचे अधिष्ठान धार्मिक नसून जातिविहीन समाज हे तिचे अधिष्ठान आहे. त्यामुळे या चळवळीने सुफींच्या वैचारिक गाभ्यासह फुले-शाहू-आंबेडकर यांचा वैचारिक दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. जर मुस्लिम मराठी साहित्य चळवळीने धार्मिक अधिष्ठान स्वीकारले तर ही चळवळ ब्राह्मणी साहित्याच्या मुख्य प्रवाहात गडप व्हायला वेळ लागणार नाही. मुस्लिम भटक्या जाती जमाती शरियत परंपरेच्या बाहेर आहेत. कारण त्यांच्या जात पंचायती भरतात. मदारीसारख्या जमातीत तोंडी तलाक दिला जात नाही तर जातपंचायत भरवून घटस्फोट दिला जातो. मुलाणी, फुलारी, आत्तारसारख्या जाती आजही बलुते-भिकने गोळा करतात. कोणालाही हा धर्म स्वीकारायला सोपा असल्याने बहुतेक सर्व जातींनी इस्लाम धर्म स्वीकारलेला आहे. तात्त्विकदृष्ट्या हे धर्मांतर तंतोतंत झालेले नाही. धर्मांतरानंतर मूळची जात, मूळचा व्यवसाय त्याच्या गुणवैशिष्टयांसह तसाच राहिलेला आहे.
ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य-अस्पृश्य या सारखीच श्रेणी मुस्लिम समाजातही अश्रफ-अजलफ-अरजल-कमीने या रूपात अस्तित्वात आहे. ही विखारी श्रेष्ठ-कनिष्ठतेची श्रेणी आज सगळेच मुसलमान दलित पातळीवर आल्याने, त्यातली तीव्रता काहीशी कमी झालेली आहे. कारण हिंदुत्ववादी रूपाखाली दडलेल्या ब्राह्मणशाहीशी लढण्यासाठी अश्रफ मुस्लिम अजलफ मुस्लिमांशी सांधेजोड करीत आहेत. ही चळवळीची कमाई आहे.
वाचा : मुस्लिमांची निर्भयतेकडे वाटचाल 
मुळ्या शोधण्यातून आत्मशोध
जगभरातील मुस्लिम आणि भारतीय मुस्लिम हे केवळ प्रार्थनेच्या बाबतीत एकसारखे आहेत. त्यांच्या धार्मिक संकल्पनाही सारख्या आहेत. पण भारतीय मुस्लिम परंपरा मात्र अरबकेंद्री नाहीत. येथील मुस्लिम परंपरांनी भारतीय परंपराशी हातमिळवणी केलेली आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील ग्रामीण परंपरा, रूढी, संस्कृती, भाषा यांच्या जिवंत वास्तवावर मुस्लिम परंपरांना उभे राहावे लागलेले आहे. त्यातून मुस्लिम मराठी साहित्याला जिवंत प्रेरणा मिळालेली आहे. मुस्लिमांची एकच एक अशी अस्मिता नाही. कारण हा समाज एकजिनसी मुळीच नाही. जे तसे मानतात त्यांची चिरफाड या साहित्याने केलेली आहे. स्वतःच्या मुळ्या शोधण्यातून आत्मशोध आणि काळानुरुप बदलासाठी आत्मप्रबोधन करणे हे मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे महत्वपूर्ण कार्य आहे.
मुस्लिम मराठी साहित्याची चळवळ हिंदुत्ववाद्यांच्या जनजागरण मोहिमेच्या काळात जन्माला यायला हवी होती. पण तसे झाले नाही. फाळणी, पोलीस ॅक्शन, दंगली यांच्यामुळे मुस्लिम समाज निःशब्द, मूक होत गेलेला आहे. सतत तो कोमात जात राहिला आहे. औद्योगिकरणाच्या वाढीमुळे त्याचे जातिव्यवसाय उद्ध्वस्त होत गेल्याने हा समाज दलिताहून अधिक दलित होत गेलेला आहे. त्याच्या आशा, आकांक्षा, त्याचे प्रत्यक्षातील जगणे, त्याची प्रादेशिक संस्कृती, मराठी साहित्यातून चुकूनही प्रतिबिंबित होत नव्हती. उलट मराठी साहित्यातून हिंदुत्ववादी लेखकांकडून या समाजाचे ठरवून केल्यासारखे राक्षसीकरण करण्यात आलेले आहे. तसेच या समाजाचे दुखणेखुपणे, वास्तवजीवन प्रतिबिंबित व्हायला या समाजाच्या हाती कोणत्याही स्वरुपातील माध्यम नव्हते. या समाजातील शिक्षित मध्यमवर्ग विखुरलेला होता. तसेच संख्येनेही तो फारच लहान होता.
उर्दू माध्यमे प्रस्थापित मुस्लिम समाजाला सांभाळणारी होती. बहुजन-मुस्लिमांना उर्दू येत नव्हती आणि येत नाही. अशा काळात समाज सुधारणा करण्यासाठी दलवाईंचा उदय झालेला आहे. त्यांनी कथा, कादंबरी आणि वैचारिक लेखन केलेले आहे. पण त्यांच्या कथा-कादंबरीसारख्या ललित लेखनातील मुस्लिम माणूस जसा त्याच्या जातीय, आर्थिक वास्तवावर उभा आहे तसा त्यांच्या वैचारिक लेखनातील मुस्लिम माणूस जातीय, आर्थिक वास्तवावर उभा नाही. कारण हमीद दलवाई यांनी आपल्या वैचारिक लेखनात मुस्लिम माणसाला त्याच्या जातीय, आर्थिक वर्गवर्णीय प्रश्नांपासून तोडून केवळ त्याच्या जमातवादी अंगावर एकांगी हल्ला चढवला. त्यांच्या अशा लेखनाचा हिंदुत्ववाद्यांनी मुस्लिम समाजाच्या चुकीच्या मानसप्रतिमांना बळकट करण्यासाठी केला.
मुस्लिम म्हणजे धर्मवेडे, मुस्लिम म्हणजे कर्मठ आणि मुस्लिम म्हणजे पोथिनिष्ठ अशा मानसप्रतिमा हिंदू समाजात रूढ होऊन त्यांच्या गैरसमजामध्ये वाढ झाली अन् मुस्लिम समाजाविषयीचा द्वेषभाव वाढला. इथे गमतीची गोष्ट नमूद करावीशी वाटते की हमीद दलवाईंनी हिंदुत्ववाद्यांची केलेली तेवढीच प्रखर टीका मात्र दुर्लक्षित राहिली. मुस्लिम समाजाच्या जमातवादाला हिंदुत्ववाद्यांचा जमातवाद जसे उत्तर होऊ शकत नाही तसे हिंदुत्ववादाला मुस्लिम जमातवाद उत्तर हेाऊ शकत नाही. सुफी-भक्तीवादाच्या प्रेमळ समन्वयातून काही एक मार्ग निघेल याची मला खात्री वाटते.
दलवाई हे मुस्लिम समाजाच्या जगण्या मरणाच्या प्रश्नांना भिडू शकले नाहीत. त्यांच्या तीव्रतर झालेल्या आर्थिक प्रश्नांना उचलले नाही. इस्लामचा सुफीवाद त्यांना दिसला नाही की इस्लामचा चांगुलपणा विवेकानंदाना जेवढा दिसला तेवढाही दिसला नाही. उलट त्यांनी मी धर्म मानीत नाही-कुरआन मानत नाही अशी पाखंडी भूमिका व्यक्तिगत पातळीवर घेतली. पण सुधारकाला अशी व्यक्तिगत पातळीवर भूमिका असू शकते काय?
सुधारकाची भूमिका तर अंतर्बाह्य एकच एक निर्मळ असावी लागते. म्हणून हमीद दलवाई यांचे त्यांनी केलेले इस्लामचे मूल्यमापन नकारात्मक ठरले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने हाती घेतलेले तलाक, समान नागरी कायद्यासारखे प्रश्न, समस्या म्हणून महत्त्वाच्या असल्या तरी ते जगण्या-मरण्याचे प्रश्न निश्चितच नव्हते. आपल्या पुरूषसत्ताक व्यवस्थेत आजही स्त्रीकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जात असताना तलाकच्या प्रश्नावर जीवाचे रान करीत राहिल्याने, मंडळ जिवंत असल्याचे जाणवत राहते. म्हणून सामान्य मुस्लिम समाजही मंडळापासून दुरावत राहिला. तात्पर्य, मुस्लिम समाजाने सत्यशोधक मंडळपासून तलाक घेतला. काडीमोड घेतला पण मंडळाने मुस्लिम समाजाला विचार करायला भाग पाडले आणि मराठीतून लिहिणे-बोलणे-शिकणे याची जोरकस अशी सुरुवात करुन दिली, हे नाकारता येत नाही.
घुसमट आणि दमकोंडी
मराठी सारस्वतांच्या आत्मकेंद्री वृत्तीने मुस्लिम मराठी साहित्य प्रवाहाला इतर प्रवाहांसारखी बगल दिली. त्यांनी कधी मुस्लिम जाणिवेचा, वेदनेचा प्रश्न महत्त्वाचा मानला नाही. मुस्लिम अक्रोश, अवहेलना, गुदमर, घुसमट, ताणतणाव मराठी सारस्वतांना कधी कळलेच नाहीत. म्हणून मुस्लिम मराठी सुफी कवितेसह मध्ययुगीन वाङ्मयेतिहासाचे पुनर्लेखन केल्याशिवाय मराठी वाङ्मयेतिहासाला पूर्णत्व येणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील प्रा. कुन्ता जगदाळे यांच्या मुस्लिम-मराठी ओव्या या ग्रंथाचा अपवाद वगळला तर मुस्लिम मराठी लोकवाङ्मयाच्या संकलन-संशोधनाला दुसरा संकलक, संशोधक अजून तरी गवसलेला नाही.
कथा-कादंबरी-वैचारिक लेखन करणाऱ्या हमीद दलवाईंच्या आधी चरित्रवाङ्मयासह अबलाकादंबरी लिहिणारे सय्यद अमीन, रझिया सुलतानाया कादंबरी बरोबरच कौटुंबिक कथा लिहिणारे कॅप्टन . रझ्झाक, शाहीर रमजान बागणीकर, अमर शेख यांच्यासारखे लेखक कलावंत होते. या काळात संशोधक, कथाकार डॉ. यू.. पठाण, हिदायत खानही लिहीत होते. सय्यद अमीन यांनी तर मुस्लिम मराठी साहित्य परिषद स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात त्यांना यश आले नाही. नाही तर मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचा प्रारंभ सय्यद अमीन यांच्यापासून म्हणजे दलवाईंच्या आधीच झाला असता. पण तसे झाले नाही. ही साहित्य चळवळ सुरू व्हायला .. 1990 हे साल उजाडावे लागले.
मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची सुरुवातच मुळी उत्स्फूर्तपणे झालेली आहे. आधुनिक शिक्षण घेतलेल्या मुस्लिम-बहुजनांची १९८०च्या दशकापासून मानसिक कोंडीतून मोठी घुसमट होत होती; दमकोंडी होत होती. मुस्लिम-बहुजनसमाज घरीदारी दखनी आणि घराबाहेर मराठी भाषेतून व्यवहार करीत होता. ठिकठिकाणी काही मुस्लिम-बहुजन लेखक मराठी वाङ्मयाची निर्मिती करीत होते. त्यांचाही भवतालच्या मुस्लिमविरोधी विद्वेषी वातावरणाने गुदमर होत होता. अशा तगमगीतून सोलापूर येथील प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, प्रा. अजीज नदाफ, पत्रकार नल्लामंदू, कवी मुबारक शेख यांच्या मनात संमेलन घेण्याचे आले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीवर मार्च महिन्यात संमेलन घेण्याचे जाहीर करून टाकले. असाच विचार डॉ. इकबाल मिन्ने, कवी .के.शेख आणि प्रा.फातिमा मुजावर यांच्या मनातही आला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. तेही सोलापूरकरांशी जोडले गेले. संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातील शे-दीडशे लेखक एकत्र आले. मनात साचलेला, तुंबून राहिलेला जो भावकल्लोळ होता तो संमेलनाच्या माध्यमातून व्यक्त झाला.
वाचा : आपण सर्वच झुंडशाहीला बळी पडलोय!
तीन दशकांची वाटचाल
मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची रीतसर स्थापना होऊन पहिले ऐतिहासिक असे साहित्य संमेलन संपन्न होऊन संमेलन घेण्याची सुरुवात तर झाली. संमेलन घेणे हीच या चळवळीची विशेष आणि एकमेव कृती आहे. राजकीय चळवळी नंतर दलित लेखकांची चळवळ झालेली आहे आणि नंतर दलित साहित्य संमेलन झालेले आहे. तसे मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे झालेले नाही. ही साहित्य चळवळच मुळी उत्स्फूर्तपणे सुरू झालेली चळवळ आहे. मुस्लिम मनाचा आक्रोश, वेदना, गुदमर, तगमग, ताणतणाव आणि पोटाची खळगी भरणे यांना शब्द माध्यमातून मोकळी वाट करुन देण्याच्या भूमिकेतून ही चळवळ सुरू झालेली आहे. मीही महाराष्ट्रीयन आहे. माझा वंश भारतीय आहे. माझे होणारे सर्वंकष शोषणही बहुजनासारखेच भारतीय आहे. फाळणी नंतरही माझे अस्तित्व इथे आहे. पण फाळणी नंतरचे माझे अस्तित्वहीन होणे मला मान्य नाही.
वो मुसलमान जो चले गये सो मुहाजिर हो गये
जो यहाँ रह गये वो हाजिर होके भी गैरहाजिर हो गये
मीही इथे हजर आहे. जे झाले ते झाले. त्यात माझा काय दोष ? आता तरी माझ्याही विकासाचे, माझ्या सुरक्षितेतचे जरा काही तरी बघा, हे सांगण्यासाठी या चळवळीचा जन्म झाला आहे. आज आम्ही निदा फाजली यांच्या खालील दोन ओळीतल्या आशयानुसार जगत आहोत.
जो मरा क्यों मरा, जो जला क्यों जला, जो लुटा क्यों लुटा
मुद्दतोसे हैं गुम इन सवालों के हल, जो हुआ सो हुआ
मुस्लिम समाजाची जी मानस प्रतिमा इथे घडवण्यात आली आहे ती निव्वळ भ्रामक आहे. या समाजाची वास्तव प्रतिमा शब्दबद्ध करून त्याची भ्रामक प्रतिमा पुसून टाकण्यासाठी या चळवळीचा जन्म झालेला आहे. हे कार्य ही चळवळ निष्ठेने करीत आहे. लिहिणे आणि लिहीत राहणे हा या चळवळीचा जीव की प्राण आहे. जो जो लेखक लिहीत आहे तो तो लेखक ही चळवळ करतो आहे. जो कसदार लिहितो आहे तो या चळवळीचा सच्चा कार्यकर्ता आहे. असे लेखक घडविण्यासाठी या चळवळीचा जन्म झालेला आहे.
भारतातील मुस्लिम माणसाकडे पाहण्याची दृष्टी इथे बदलत-बदलत गेलेली आहे. त्यामुळे भारतीयांच्या मनातील मुस्लिम माणसाविषयीची मानस प्रतिमा देखील बदलत गेलेली आहे. 1947च्या काळात काही मुसलमान आश्रयार्थी ठरवण्यात येऊन सगळ्या मुस्लिम समाजाकडे आश्रयार्थी म्हणूनच पाहिले जाऊ लागले. मग या नंतर 1960च्या काळात काही मुसलमानाना निर्वासित ठरण्यात येऊन सगळ्या मुस्लिम समाजाकडे निवासित म्हणून पाहण्यात येऊ लागले. 1970च्या काळात तर काही मुसलमानांना हद्दपार केलेले ठरवून सगळ्या मुस्लिमांकडे पाहण्याचा रोख हद्दपार केलेल्यांकडे जसा असायचा तसा होत गेला.
मुस्लिम सुफींचे संतकाव्य
1980च्या काळात मात्र काही मुसलमानांना घुसखोर ठरवून सगळ्या मुस्लिमांकडे शंकेने पाहण्यात येऊ लागले. 2000 साली तर काही मुसलमानाना दहशतवादी ठरवून बाकीच्या सगळ्याच मुस्लिमांकडे दहशतवादी म्हणून पाहण्यात येऊ लागले. म्हणजे केवळ संशय आणि अफवांच्या बळावर इथला मुस्लिम नागरीक आश्रयार्थी झाला. मग आश्रयार्थीचा निर्वासित आणि निर्वासिताचा हद्दपार केलेला झाला. मग नंतर हद्दपार केलेला घुसखोर ठरून आज तो घुसखोराचा दहशतवादी झालेला आहे. मूठभर लोकांचे खापर सध्या सर्रासपणे सर्वच्या सर्व मुसलमानांनावर फोडले जात आहे. मुस्लिम -बहुजनांच्या दातात अडकलेली भाजी त्यांना काढता येत नसली तरी ते आज संशयाच्या बळावर दहशतवादी ठरू लागलेले आहेत. एवढेच नव्हे तर दहशतवादी नसलेल्या आप्तांना दहशतवादी म्हणण्याची आज मुसलमानांवर पाळी आलेली आहे. या म्हणण्यावर शायर मुनव्वर राणा यांच्या खालील चार ओळी अधिक प्रकाश टाकू शकतात.
मैं दहशतगर्द हूँ मरनेपर बेटा बोल सकता है
हुकूमत के इशारेपर तो मुर्दा बोल सकता है
बहुतसी कुर्सियाँ इस मुल्क में लाशोंपर रखी हैं
ये वो सच है जिसे झूठे से झूठा बोल सकता है
मुस्लिम मराठी साहित्य चळवळीत आरंभापासूनच कॉ. विलास सोनवणे आहेत. या चळवळीतून कॉ. सोनवणे, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, शब्बीर अन्सारी, प्रा. अजीज नदाफ, प्रा. जावेद कुरेशी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मुस्लिम ओबीसी संघटनेचा जन्म झालेला आहे. त्यानंतर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. मुस्लिम समाजाच्या स्थितीगतीचा वस्तुनिष्ठ अहवाल सच्चर समितीने सादर केल्यानंतर आमदार पाशा पटेल आणि प्रा.जावेद पाशा कुरेशी यांनी महाराष्ट्रभर सच्चर अहवाल लागू करण्याविषयी रान उठविले. आज शिक्षण, संरक्षण आणि आरक्षण यासाठी ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येनी मूक मोर्चे निघत आहेत. महाराष्ट्रातील या घटितांचा संदर्भ मुस्लिम मराठी साहित्य चळवळीशी आहे, हे नाकारता येणार नाही.
संमेलनाचे एक माध्यम मिळाले म्हणून लिहिणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन मिळाले, एक वाङ्मयीन ऊर्जा मिळाली. या साहित्य चळवळीच्या प्रेरणेतून नवनवे लेखक लिहिते झालेले आहेत. त्यातूनच मुस्लिम सुफींचे संतकाव्य, शाहिरी काव्य आणि अनुवादित साहित्याचा धांडोळा घेणे सुरू झाले. मुस्लिम लोकवाङ्मयाचाही शोध घेणे सुरू झाले. इतर मराठी साहित्य प्रवाहांबरोबर मुस्लिम मराठी साहित्य प्रवाहाचाही विचार केला जाऊ लागला. अगदी परवा परवा पर्यंतच्या हिंदुत्ववादी मराठी लेखकांनी मुस्लिम समाजाचे जे विकृत, अवास्तव चित्रण मराठी साहित्यात केले होते ते या चळवळीतल्या लेखकांनी उजेडात आणलेले आहे.
वेगळी चूल कदापि नाही
मराठी साहित्यात ख्यातकीर्त असलेले लेखक . ना. आपटे, सावरकर, श्री.ना. पेंडसे, पु.भा. भावे, बी. रघुनाथ, गो.नी. दांडेकर, सेतू माधव पगडी, विद्याधर गोरवले इत्यादींनी मुस्लिम पात्रांचे कसकसे विकृत, एकांगी, अवास्तव चित्रण केलेले आहे, त्याची सोदाहरण मीमांसा प्रा. महेबूब सय्यद (मुस्लिम मराठी साहित्य: एक आकलन) श्रीमती रजिया पटेल (लोकप्रिय साहित्यातील जमातवादाचे आकलन: अल्पसंख्यांक समूहाचे प्रतिनिधीत्व) प्रा.नसीम देशमुख (मुस्लिम मराठी साहित्य: स्वरूप आणि समीक्षा) यांनी कंसात निर्देशिलेल्या ग्रंथातून केलेली आहे. या ग्रंथकारांनी आपल्या लेखनातून एक निरीक्षण असे नोंदवलेले आहे की या अशा विकृत चित्रणाला सावरकरांनी एक तात्त्विक बैठक मिळवून दिलेली आहे. तसेच आज शेषराव मोरे हे मुस्लिम समाजाच्या विकृत प्रतिमेला तात्विक बैठक मिळवून देत आहेत, असे पत्रकार प्रकाश बाळ यांचे मत आहे.
या आत्मकेंद्री मराठी सारस्वतांनी मुस्लिम मराठी साहित्यालाजातीवादीअसे संबोधून आणि वेगळी चूलम्हणत बगल दिलेली आहे. मुस्लिम समाजाच्या वेदनेचा प्रश्न त्यांनी कधी महत्वाचा मानला नाही. उलट इतिहासात कधीच जन्माला न आलेल्या पद्मिनीवर, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेवर या मराठी सारस्वतांनी आपली लेखणी झिजवलेली आहे. हिंदुत्ववादी इतिहासकारांनी मध्ययुगीन राजकीय संघर्षाला धार्मिक संघर्षाचे रूप देऊन वस्तुनिष्ठ इतिहासाचे विकृतीकरण केलेले आहे. इतिहासाच्या या विकृतीकरणाला मराठा सेवा संघाच्या चंद्रशेखर शिखरे यांनीप्रतिइतिहासया ग्रंथातून तर सरफराज अहमद यांनीसल्तनत--खुदादादनावाच्या ग्रंथातून चोख उत्तर दिलेले आहे. मार्क्सवादी इतिहासकारांसह मराठी सेवा संघ आपला चुकीचा विकृत इतिहास खोडून वास्तव इतिहासाची वस्तुनिष्ठ पातळीवर पुराव्यासह मांडणी करीत आहे.
मार्च १९९० साली संपन्न झालेल्या पहिल्या संमेलनानंतर संमेलने भरू लागली. महाराष्ट्रभर विखुरलेल्या लेखकांच्या संपर्कासाठी लेखकांच्या संपर्कासाठी लेखक सूचीची गरज निर्माण झाली. या गरजेतून मुस्लिम मराठी साहित्य: परंपरा, स्वरूप आणि लेखकसूचीया संपादित ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आणि मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या आर्थिक साहाय्याने त्याचे प्रकाशनही झाले. औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या मुस्लिमांच्या एकूण योगदानावरील चर्चासत्रात साहित्याच्या प्रेरणा, प्रवाह आणि स्वरूप या संबंधी स्वतंत्र्य ग्रंथाचा प्रश्न निर्माण झाला. म्हणून लातूर येथे मुस्लिम लेखकांचे दोन दिवसीय चर्चासत्र घेऊन प्रा.फारुक तांबोळी यांच्या मदतीने मीमुस्लिम मराठी साहित्य : प्रेरणा आणि स्वरूपया शीर्षकाचा ग्रंथ संपादित केला.
गेल्या पंचवीस वर्षात कधी संमेलन झाले तर कधी संमेलने झाले नाही. तरीही मुस्लिम मराठी लेखक लिहीत लिहीतच इतरांच्याही लेखनाचा अभ्यास करीत होता. मुस्लिम मराठी साहित्याच्या संशोधनाला सुरुवात झालेली होती. या काळात प्रसिद्ध झालेल्या संपूर्ण मुस्लिम मराठी साहित्याचा आढावा घेण्याची आवश्यकता होती. नागपूरचे प्रा. डॉ. अक्रम पठाण यांनीमुस्लिम मराठी साहित्यतर जळगावच्या प्रा. नसीम देशमुख यांनी मुस्लिम मराठी साहित्य: स्वरूप आणि समीक्षाप्रसिद्ध करुन वाङ्मय प्रकारांचाही अभ्यास केलेला आहे, संशोधन केलेले आहे. कोल्हापूरच्या प्रा. राजेखान शानेदिवाण यांनी कादंबरी आणि आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारांचा अभ्यास करून त्यावर स्वतंत्र ग्रंथनिर्मिती केलेली आहे. प्रा. शकील शेख यांनी स्वतःच्या कादंबरी लेखना बरोबरच आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराचे संशोधन करून प्रबंध लेखन केलेले आहे. आत्मचरित्रावरील हा प्रबंध आता प्रसिद्धही झालेला आहे. कवी मुबारक शेख यांनी मुस्लिम मराठी कथेचे तर डॉ. रफिक सूरज यांनी मुस्लिम मराठी कवितेचे प्रातिनिधीक संपादन करून ते प्रसिद्ध केले आहे. या संपादनांची शीर्षकेअगाजआणिदस्तकअशी आहेत.
या 28 वर्षाच्या काळात स्वतंत्रपणे मुस्लिम मराठी लेखकाच्या संपूर्ण लेखनाच्या अभ्यासपूर्ण संशोधनालाही सुरुवात झालेली आहे. प्रा. डॉ. अजीज नदाफ आणि प्रा. डॉ. अक्रम पठाण यांनी शाहीर अमर शेख यांच्या लेखनावर संग्रामकवी शाहीर अमर शेखसारखी स्वतंत्र ग्रंथनिर्मिती केलेली आहे. तसेच प्रा. सुरेखा देशमुख, प्रा. चंद्रकांत बिरादार आणि प्रा. डिगोळे यांनी .. शहाजिंदे यांच्या साहित्यावर वेगवेगळ्या विद्यापीठांतर्गत प्रबंधलेखन करून डॉक्टरेट पदवी मिळवलेली आहे. प्र
वाचा : मारो-काटोसंस्कृतीचे समर्थन धोकादायक
नव्या साहित्य प्रवाहांचा विचार 
बंधलेखनाचा संबंध सध्या पोटापाण्याशी जोडला गेल्याने मराठीत विपुल असे प्रबंध लेखन होत आहे, हे जरी खरे असले तरी, त्यातही काही चांगले लेखन होत आहे, हेही विसरता येणार नाही. प्रा.डॉ. किशोर कांबळे यांनी मुस्लिम मराठी कवितेचे, प्रा.डॉ. पांडुरंग कंद यांनी मुस्लिम मराठी कथेचे आणि प्रा. डॉ.फारुक तांबोळी यांनी मुस्लिम मराठी साहित्याचे संशोधन करून डॉक्टरेट मिळवलेली आहे. तसेच आज प्रा. भामरे, प्रा. नाझ मिर्झा आणि प्रा. आरिफ शेख यांच्या सारखे अनेक संशोधक संशोधन करीत आहेत.
१९९० साली रांगणारे मुस्लिम मराठी साहित्य आता समर्थपणे उभे राहिलेले आहे. या उभे राहण्यात वरील लेखकांचा जसा सहभाग आहे तसा माझ्या माहितीत नसलेल्या लेखकांचाही सहभाग आहे, याची मला दिलगिरीसह जाणीव आहे. तसेच या चळवळीशी कोणत्या ना कोणत्या कारणाने दूर झालेल्या किंवा दूर राहणाऱ्या लेखकांच्या लेखनाचाही सहभाग आहे, याची मला नम्र जाणीव आहे. या सर्वांच्याच लेखनावर ही चळवळ उभी आहे.
मराठी सहित्यातील नव्या साहित्य प्रवाहांचा विचार करताना आता मुस्लिम मराठी साहित्य प्रवाहाचाही विचार केला जात आहे. शब्दालय प्रकाशनाच्या सुमतीताई लांडे यांनीशब्दालयच्या दिवाळी अंकात, डॉ.शरणकुमार लिंबाळे यांनी संपादित केलेल्यासाहित्यातील नवे प्रवाहया ग्रंथात आणि प्रा. प्रल्हाद लुलेकर यांनी संपादित केलेल्यामराठवाड्यातील साहित्यया ग्रंथात मुस्लिम मराठी साहित्याची दखल घेतलेली आहे. मराठी भाषेचे थोर प्राध्यापक आणि प्रसिद्ध लेखक प्रा.डॉ. निर्मलकुमार फडकुले, प्रा.डॉ. दत्ता भगत, प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि प्रा. डॉ. जे.एम. वाघमारे यांच्या गौरवग्रंथात मुस्लिम मराठी साहित्यालाही गौरवाचे स्थान देण्यात आलेले आहे.
या गेल्या पंचवीस वर्षात मुस्लिम मराठी साहित्यावर ठिकठिकाणी राज्यस्तरीय चर्चासत्रे घेण्यात आलेली आहेत. बिडकीन महाविद्यालयाच्या वतीने प्रा. ताहेर पठाण यांनी औरंगाबाद येथेमुस्लिम मराठी साहित्यासह मुस्लिम समाजाचे एकूण योगदान या विषयावर चर्चासत्र घेतले आहे. गोंदियाच्या प्रा.डॉ. कविता राजभोज यांनी एस.एस. गर्ल्स कॉलेजच्या वतीनेमुस्लिम मराठी कवितेची भूमिकाया विषयावर राज्यस्तरीय एकदिवसीय चर्चासत्र घेतलेले आहे. तसेच बेळगावी येथील राणी चिन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभागाच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य: स्वरूप आणि दिशाया विषयावर राष्ट्रीय पातळीवरील एकदिवसीय चर्चासत्र घेण्यात आलेले आहे. तसेच थोर नाटककार शफाअत खान यांच्या प्रयत्नांमुळे मुंबई विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने रूईया महाविद्यालय, माटुंगा येथेमुस्लिम मराठी कविता, कथा आणि कादंबरीया विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न झालेले आहे.
आत्मचरित्रे
मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे प्रा. शमशोद्दीन तांबोळी यांनी पुणे येथे मराठी साहित्यातील मुस्लिम समाजाचे चित्रणया विषयावर एक चर्चासत्र घेतलेले आहे. याचप्रमाणे जमाते इस्लामीतर्फे पुणे येथेच ईदमिलनच्या निमित्तानेमुस्लिम समाजासमोरील समस्या या विषयावर मुस्लिम मराठी लेखकांचे एक चर्चासत्र घेण्यात आलेले आहे. लातूरकर मंडळीनी डॉ. असगरअली इंजिनिअर यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्ताने त्यांच्या लिव्हिंग फेथया अनुवादित आत्मचरित्रावर आणि प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या मुस्लिम समाजरचना आणि मानसिकता या ग्रंथावर एकदिवसीय चर्चासत्र घेतलेले आहे. या शिवाय भूमी प्रकाशन लातूरच्या वतीने लातूर येथेच प्रा.डॉ. तसनीम पटेल यांच्या भाळआभाळया आत्मचरित्रावर परिचर्चा घेण्यात आलेली आहे. असे प्रयत्न महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेले आहेत आणि आजही होत आहेत. मुस्लिम मराठी साहित्याचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या संशोधक-अभ्यासकांची सोय व्हावी म्हणून कोल्हापूर येथे मुस्लिम बोर्डिंगमध्ये मुस्लिम मराठी साहित्य ग्रंथालय सुरू करण्यात आलेले आहे.
या पंचवीस वर्षात आता आता कुठे डॉ. सूर्यनारायण रणसुभे, डॉ.श्रीपाल सबनीस आणि डॉ. गिरीश मोरे यांच्यासारखे मराठी समीक्षक मुस्लिम मराठी साहित्याविषयी मनःपूर्वक लिहीत आहेत. डॉ. श्रीपाल सबनीस यांनीख्रिस्ती-मुस्लिम-आदिवासी: साहित्य मीमांसाहा ग्रंथ लिहून ठळक अशी दखल घेतलेली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी 89व्या .भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून इतर प्रवाहाबरोबरच मुस्लिम मराठी साहित्य प्रवाहाची जोरकस अशी सविस्तर दखल घेतलेली आहे. म्हणून या प्रवाहातील प्रत्येक लेखकाने हे अध्यक्षीय भाषण मिळवून अभ्यासायला हवे.
या गेल्या अठ्ठावीस वर्षांच्या काळात रांगणारे मुस्लिम मराठी साहित्य नुसतेच उभे राहिले नाही तर कसदार लेखन करून या साहित्याने अनेक सन्मानाचे पुरस्कार प्राप्त केलेले आहेत, मुस्लिम माणसाला कुठे मराठी भाषा येते का? जरी समजा आली तरी त्यांचे ललित लेखन हे लेखन असते
काय? अशा हेटाळणीच्या स्वरात प्रश्न विचारणाऱ्यांच्या डोळ्यासमोरच मुस्लिम मराठी लेखकांनी महाराष्ट्र शासनाचे साहित्य पुरस्कार-दमाणी पुरस्कार, महाराष्ट्र फाऊन्डेशनचा पुरस्कार-विखे पाटील पुरस्कार, लोकमत पुरस्कार यासारखे सन्मानाचे पुरस्कार मिळवलेले आहेत. त्यांच्या कथा-कवितांचा धीम्या गतीने का होईना अभ्यासक्रमात समावेश होत आहे. ही या चळवळीची गेल्या पंचवीस वर्षांची कमाई आहे.
आजपर्यंत एकूण अकरा संमेलने झालेली आहेत. सोलापूर येथील मुस्लिम मराठी साहित्य परिषदेने ओळीने पहिली सात संमेलने घेतली. मग औरंगाबाद येथील मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाने त्या नंतरची तीन संमेलने घेतली. गतवर्षी परिषदेला आणि मंडळाला टाळून कोल्हापूरच्या मुस्लिम बोर्डिंगने अकरावे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन नाटककार शफाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली घेतले. गेल्या वर्षी पनवेल येथे 3, 4, 5 नोव्हेंबरला प्रा. फातिमा मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली बारावे संमेलन भरले.
कोणतेही साहित्य संमेलन असले की उद्या पुन्हा हाच खेळच्या धर्तीवर काही वादविवाद, मतमतांतरे होत असतात पण मुस्लिम मराठी संमेलने मात्र अंतर्गत-चुळबुळीसह बिनबोभाट पार पडलेली आहेत. कारण ही संमेलने घ्यायला फारसे कुणी उत्सुक नसते आणि तसे मध्यमवर्गीय मुस्लिम-बहुजनाकडे फारसे पैसेही नसतात. कसेबसे संमेलन होत असते. ही सगळी संमेलने मी अनुभवलेली आहेत. या बहुतेक प्रत्येक संमेलनाच्या पाठीमागे प्रा. फकरूद्दीन बेन्नूर आणि कॉ. सोनवणे किंवा डॉ. इकबाल मिन्ने आणि कॉ. सोनवणे यांची वैचारिक शक्ती कार्यरत राहिलेली आहे.
वाचा : धर्मनिरपेक्षतेचे कुली आम्हीच का व्हावे?’ 
लिहिते लोक वाढले
या संमेलनातील विविध विषयावरील परिसंवादातील वैचारिक शिदोरीमुळे काही नवे लेखक लिहू लागले, तर लिहिणारे अधिक जोमदारपणे लिहू लागलेले आहेत. हे संमेलन त्यांच्या अभिव्यक्तीचे माध्यम बनले. अभावग्रस्त मुस्लिम समाजाच्या मानसिकतेला दडपणातून मुक्त होता येऊ लागले. बुडत्याला जसा काडीचा आधार वाटतो तसा संवेदनशील मनाना या संमेलनाचा आधार वाटू लागला. घुसमटलेल्या, गुदमरलेल्या मनाला, जीवंत असल्याची अनुभूती मिळू लागली. संमेलनाला आलेल्यांना नवनिर्मिती करण्याची ऊर्जा मिळत राहिलेली आहे. प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, कॉ. विलास सोनवणे, प्रा. अजीज नदाफ, डॉ. इकबाल मिन्ने, प्रा. महेबूब सय्यद, प्रा. सलीम पिंजारी, प्रा. राजेखान शानेदिवाण, प्रा. रफिक सूरज, प्रा. अलीम वकील, शफाअत खान, जावेद पाशा, अमर हबीब आणि डॉ. अक्रम पठाण यासारखे अनेक लेखक आपल्या लेखनातून दिशा देण्याचे कार्य करीत आहेत. या चळवळीची वाटचाल धीम्या गतीने असली तरी आज यवतमाळचे गझलकार आबिद शेख, कुरुंदवाडचे साहिल कबीर, नागपूरचे सय्यद पतीपत्नी आणि सांगलीचे रमजान मुल्ला, पुण्याचे कलीम अजीम अत्यंत जोमदारपणे लिहीत आहेत. असे नवनवे तरुण जो पर्यंत लिहीत राहतील तो पर्यंत ही चळवळ जिवंत राहणार आहे.
या अठ्ठावीस वर्षांत मुस्लिम मराठी साहित्य चळवळीने केलेल्या वाटचालीत माझ्या निदर्शानास असे आले आहे की, संमेलन घेण्यातच खूप शक्ती खर्च होत आहे. तरीही संमेलन घेणे आवश्यकच नव्हे तर अनिवार्य आहे. पण संमेलनात झालेल्या गंभीर अशा चर्चांना लिपीबद्ध करायचे राहून जात आहे. हा वैचारिक ठेवा पुढील पिढीस आणि पुढील वाटचालीस आवश्यक आहे. एखादे वाङ्मयीन त्रैमासिक सुरू करण्याचे अनेकांचे मनसुबे प्रयत्न करुनही यशस्वी झालेले नाहीत. प्रत्येक लेखकाने सदस्यत्वाची वार्षिक अथवा आजीव वर्गणी भरून लेखन सहकार्य केले तर हे त्रैमासिक सुरळीतपणे चालू शकेल. मग त्यातूनच एखादी प्रकाशन संस्थाही निश्चितच उभी राहू शकेल. संपर्क आणि संवाद चालू राहण्यासाठी याची नितांत गरज आहे. आधुनिक मुस्लिम मराठी साहित्याचे प्रणेते सय्यद अमीन यांच्यावर प्रा. राजेखान खानेदिवाण संशोधन करीत आहेत तसे संशोधन मुस्लिम लोकवाङ्मयातील रिवायतींवर, कर्बला गीतांवर आणि ढोलकगीतांवर होण्याची गरज आहे. कवी शफी बोल्डेकर असे संशोधन करतो करतो म्हणत अजूनही करीतच आहेत.
डॉ. यू.. पठाण, डॉ. अलीम वकील, डॉ. मुहंमद आझम, डॉ. असगरअली इंजिनिअर, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर आणि डॉ. जुल्फी शेख यांनी सुफी तत्त्वज्ञानावर आणि त्यांच्या मराठी काव्यावर लिहून ठेवलेले आहे. सुफी हीच आपली परंपरा आहे. कुरआनवर डॉ. असगरअली यांनी इंग्रजीतून आधुनिक काळानुरूप भाष्य केलेले आहे ते मराठीत अनुवादीत होणे निकडीचे आहे. त्यामुळे आपल्याला दीन आणि दुनियात समतोल साधणे सोपे जाईल. तसेच आपल्या धर्मांतरावर प्रा.जावेद पाशा यांना सोडले तर फारसे कुणी लिहिलेले नाही. आपल्या मुळ्या आपल्याला गवसल्या तरच आपल्याला आपले खरे लेखन करता येईल.
आपल्या अस्तित्वाचे, पोटापाण्याचे आणि संरक्षणाचे प्रश्न इतके जीवघेणे आहेत की समाज, साहित्य आणि आपल्या संस्कृतीचे प्रश्न महत्वहीन होऊन बसतात. अशा अभावग्रस्त स्थितीतही मुस्लिम-बहुजन समाज, साहित्य आणि संस्कृती यांचा विचार करून संमेलन भरवत आहे. उणिवा, त्रूटी, कमतरता आणि हेवेदावे राहणारच, त्यांच्याकडे कानाडोळा करून वाटचाल करायला हवी. कवी लेखक-कलावंताचा अहंकार फार मोठा असतो असे म्हणतात. त्याचा अडथळा आहे. पण चळवळीपासून दूर झालेल्यांनी आणि राहिलेल्यांनी आपली कलानिर्मिती थांबवलेली नाही आतापर्यंत झालेल्या अकरा संमेलनाध्यक्षानी आपले लेखन थांबवलेले नाही. डॉ. जुल्फी शेख यांनी लेखन करून डि. लीट पदवी मिळवलेली आहे. साहित्य अकादमीने प्रातिनिधीक गझल संग्रहासाठी कवी .के. शेख यांच्या गझलांचा स्वीकार केलेला आहे .प्रा. नसीम देशमुख सारखे लेखक साहित्यासारख्या कल्पनाविश्वाकडे, कल्पकसृष्टीकडे धार्मिकदृष्टीतून पाहून, साहित्य लेखनाला धार्मिक कायदेकानून लावून नको ते आरोप करीत सुटतात. अशा लेखकांचा थोडाफार अडथळा होणार आहे.
खरे तर अशा लेखकांनी सवड काढून इथल्या मुस्लिम संस्कृतीने भारतीय प्रादेशिक संस्कृतीचा जो पेहराव परिधान केला आहे त्याचा अभ्यास करुन एखादा ग्रंथ लिहावा. अशा ग्रंथाचा या साहित्य चळवळीस नक्कीच उपयोग होईल.

(फ. म. शहाजिंदे यांनी पनवेलच्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात  केलेली मांडणी)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे तीन दशकं
मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे तीन दशकं
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg4BttMdERbaXlaAI63YjxY_ovHGOVc8YxoI7yKAKmcm64Iq49TGZHrMFoPfaikH6UaUlcjU-Ucn4GoILskyFQnB2XlNMku8dxlxTvwSyIfV7ybm8Dc-r_utfPOFfzqhCBDcBXfUPBJRn-n/s640/Alim+Wakil.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg4BttMdERbaXlaAI63YjxY_ovHGOVc8YxoI7yKAKmcm64Iq49TGZHrMFoPfaikH6UaUlcjU-Ucn4GoILskyFQnB2XlNMku8dxlxTvwSyIfV7ybm8Dc-r_utfPOFfzqhCBDcBXfUPBJRn-n/s72-c/Alim+Wakil.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/01/blog-post_48.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/01/blog-post_48.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content