हिटलर : एक अटळ आत्महत्या


जर्मनीच्या अ‍ॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे दिले. अशा फॅसिस्टांमुळे जगभरातील मानवजात धोक्यात आलेली आहे. अशा हुकूमशाही प्रवृत्तीचा कशा पद्धतीने अंत होतो, हे हिटलरच्या आत्महत्येने जगाला दाखवून दिलं. या दुर्दैवी आत्महत्येला आज (30 एप्रिल) 74 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा 14 वर्षांपूर्वीचा हा लेेख पुनर्प्रकाशित करीत आहोत-संपादक
रोबर साठवर्षांपूर्वी, 30 एप्रिल 1945 रोजी, दुपारी साडेतीनच्या सुमाराला अ‍ॅडॉल्फ हिटलर याने प्रथम त्याच्या सहचारिणीला इव्हा ब्राऊनला, विषग्रहण करायला सांगितले. ती मरण पावली आहे याची खात्री केल्यावर त्याने स्वत:च्या उघड्या तोंडात पिस्तुल ठेवले आणि चाप ओढला. निमिषार्धात हिटलरचा रक्तबंबाळ देह जमिनीवर कोसळला. हिटलर तेव्हा फक्त छप्पन्न (56) वर्षांचा होता.

आत्महत्या करण्यापूर्वी हिटलरने त्याचे निकटचे सहकारी गोबेल्स, बोरमन इत्यादींना बोलावून घेतले होते. आपण मेल्यानंतर आपल्या व इव्हाच्या देहाचे दहन करण्यात यावे, दफन नव्हे, अशा सूचना हिटलरने दिल्या होत्या. त्यासाठी 200 लिटर्स पेट्रोल आणून ठेवण्याची व्यवस्था केली होती. बर्लिन येथे एका बंकरमध्ये म्हणजे शहरापासून जरा दूर एका भूमिगतसदृश जागेत त्याचे वास्तव्य होते.

दूसरे महायुद्ध अखेरच्या टप्प्यात आले होते. बर्लिनमध्ये रशियन लाल सेना घुसली होती. जर्मनीचा बहुतेक भूप्रदेश दोस्त शक्तींच्या, म्हणजे रशिया, अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सच्या संयुक्त फौजांच्या ताब्यात आला होता. जर्मनीने 1939 ते 1943 या काळात जिंकलेले सर्व देश वा भूप्रदेश दोस्त शक्तींच्या सैन्याने मुक्त केले होते. खुद्द जर्मनी व ऑस्ट्रियामध्ये नाझीविरोधी संघटनांनी दोस्त राष्ट्रांच्या मदतीने चढाई केली होती.

इटलीमध्ये दोनच दिवस अगोदर फॅसिस्टविरोधी गटांनी मुसोलिनी व त्याची पत्नी यांना पकडून गोळ्या घातल्या होत्या. मिलानो शहरातील मुख्य चौकात त्या दोघांचे मृतदेह उलटे टांगलेले होते. शहरवासी त्या देहांची विटंबना करीत हेेते. हिटलरच्या खबऱ्यांनी मुसोलिनी पती-पत्नीच्या हत्येची व जाहीर विटंबनेची बित्तंबातमी ‘फ्यूरर’ला कळविली होती.



आपली व इव्हाचीही अशीच हत्या व विटंबना केली जाईल अशी भीती हिटलरला वाटू लागली. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत शत्रूच्या हाती जिवंत सापडता कामा नये. इतकेच नव्हे, तर आपला मृतदेहही त्यांच्या हाती लागू नये अशी दक्षता हिटलर घेत होता. म्हणूनच त्याला व इव्हाला दहन करून अस्थी व रक्षाही इतस्तत: टाकल्या जाव्यात अशी त्याची इच्छा होती.

हिटलरच्या सहकाऱ्यांनी त्यांना दिल्या गेलेल्या सूचनेप्रमाणे त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढून बंकरबाहेरील अंगणात ठेवले. हिटलरचा सहकारी गुन्शे याने त्या देहांवर पेट्रोल ओतले आणि भडाग्नी दिला. ज्वाळा हवेत जाताच तेथे असलेल्या सहकाऱ्यांनी हिटलरला 'नाझी' सलाम ठोकला.

एकूण 12 वर्षे 3 महिने आपली सर्वंकष सत्ता चालविणाऱ्या, सुमारे 60 लाख ज्यूंची बेगुमान कत्तल करणाऱ्या, अवघ्या युरोपला आपल्या टाचेखाली आणू पाहणाऱ्या, रशिया आणि तेथील समाजवादी व्यवस्था यांचे निर्दालन करू पाहणाऱ्या, फ्रेंच व ब्रिटिश वसाहती जिंकून जर्मनीचे साम्राज्य प्रस्थापित करू पाहणाऱ्या, अमेरिकेला आव्हान देणाऱ्या आणि जर्मन/आर्यन वंशाचे सार्वत्रिक प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी दुसरे महायुद्ध जगावर लादणाऱ्या एका अक्राळविक्राळ क्रूरकर्म्याला त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेली ही अखेरची सलामी होती.

हिटलरच्या दहनानंतर गोेबेल्स आणि बोरमन या दोघांनी रशियनांशी वाटाघाटी करण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु ‘जर्मन फौजांनी विनाशर्त शरण आले पाहिजे’ अशा स्पष्ट सूचना रशियन सेनाधिकाऱ्यांनी दिल्या. त्याच दिवशी म्हणजे 30 एप्रिलच्या मध्यरात्रीच हिटलरच्या बंकरला वेढा पडला. हिटलरचे काही सहकारी कसेबसे पळून गेले, काहीजण निसटता निसटता ठार मारले गेले, काहीजण रशियन फौजांच्या तावडीत सापडले. बोरमन हा हिटलरचा जवळचा सहकारी बहुधा तेव्हा मारला गेला, असे बहुतेक इतिहासकार मानतात.

गोबेल्सने नौसेनाप्रमुख अ‍ॅडमिरल कार्ल डेनित्झ यांना हिटलरच्या देहांताची बातमी कळविली आणि त्यानंतर तो आपल्या कुटुंबियांकडे गेला. हिटलरने मरण्यापूर्वी सत्तेची सारी सूत्रे डेनित्झकडेच सुपूर्त केली होती. गोबेल्सला सहा मुले होती, त्याने सहाही मुलांना विषाचे इंजेक्शन दिले. ती तत्काळ गतप्राण झाली.

त्यानंतर गोबेल्सने आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना आदेश दिला की ‘मला व माझ्या पत्नीला आमच्या अंगावर पेट्रोल ओतून ताबडतोब जाळून टाका आणि आमचे मृतदेह नष्ट करा’ ते अधिकारी अगोदरच भयभीत स्थितीत होते. कारण पराभव आणि परवशता समोर उभे ठाकलेले होते. त्यांनी गोबेल्स पती-पत्नींना पेटवून दिले, परंतु त्यानंतर काही तासांतच रशियन सैन्य तेथे येऊन थडकले. त्यांचे देह विद्रूप अवस्थेत असूनही रशियन सैन्याने ओळखले व ताब्यात घेतले. हिटलरच्या ज्या प्रचारमंत्र्याने सबंध जगभर आपली कुटील व हिंस्र ‘गोबेल्स शैली’ वापरून एका नव्या प्रचारतंत्राला जन्म दिला होता, त्याचा अखेर असा देहांत झाला.



हिटलरच्या देहाचा काही भाग, किमान त्याच्या अस्थी तरी मिळतील म्हणून रशियन सैन्याने बंकरच्या परिसरात शोध घेतला. हिटलर मेल्याची सुवार्ता खात्रीपूर्वक जगाला सांगण्यासाठी त्यांना पुरावा हवा होता. 3 मे रोजी हिटलरचे दात व जबड्याचा काही भाग त्यांना सापडला. पकडलेल्या माणसांच्या सविस्तर साक्षी घेऊन, काही अस्थी व त्या दातांची ओळख पटवून नंतरच हिटलर मेल्याचे घोषित केले गेले.

त्यानंतर काही दिवसात (वा काही तासांतच) हिटलरचा वायुदलप्रमुख हर्मन गोअरिंग, त्याच्या दोन पत्नी, हिटलरच्या ‘एसएस’ या अत्यंत जुलमी पोलीस खात्याचा प्रमुख हेन्रीच हिमलर, त्याच्या लष्कराचा फील्डमार्शल विल्हेम कायटेल, नाझी परराष्ट्रमंत्री रिब्बेनट्रॉप, हिटलरचा शस्त्रास्त्रमंत्री अल्बर्ट स्पीअर, फ्रिट्झ सॉकेल, ज्याने छळछावण्या चालविल्या, अशा अनेकांना पकडण्यात आले.

याशिवाय अनेक नाझी अधिकारी सफाईने पळून गेले होते. काही नाझी शास्त्रज्ञांनी अमेरिकेकडून अभय मिळविले होते. त्यापैकी काहींनी रशियाला सर्व गुप्त माहिती देण्याचे आश्वासन देऊन जीवदान मिळविले होेते. काही तर अगदी दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत जर्मनीतच वा दक्षिण अमेरिकन देशात नावे व पासपोर्ट बदलून वास्तव्य करीत होते. पकडलेल्या नाझींवर न्यूरेन्बर्ग येथे खटला भरण्यात आला. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांबद्दल काहींना फाशीची शिक्षा सुनावली गेली. काहींना जन्मठेप आणि काहींना दीर्घ कारावास देण्यात आला.

इटलीतील फॅसिझमचा व जर्मनीतील नाझींचा, तसेच त्यांच्या अमानुष वंशवादी विचारसरणीचा पराभव झाला. हिटलरचा मृत्युदिन तर ज्यू लोक त्यांचा मुक्तिदिन मानतात. तीन महिन्यांपूर्वी नाझींच्या पोलंडमधील ऑस्वित्झ या छळछावणीच्या मुक्तीचा 60वा स्मरणदिन साजरा करण्यात आला. युरोप-अमेरिकेतील राष्ट्रप्रमुख त्या कार्यक्रमाला हजर होते. जे लोक त्या छळछावण्यांमधील अत्याचारातून वाचले आणि आजही जिवंत आहेत त्यांचा तेथे सत्कार करण्यात आला.



‘शिंडलर्स लिस्ट’ या चित्रपटात दाखविलेले हिंस्र प्रसंगही फिके वाटावेत असे अनुभव त्यांनी मुलाखतींमधून सांगितले. त्या सर्वांना मुलाखतकारांनी एकच प्रश्न विचारला, ‘‘...नाझींच्या पराभवानंतर, हिटलरच्या आत्महत्येनंतर, न्यूरेन्बर्गच्या ऐतिहासिक खटल्यानंतर त्या पाशवी प्रवृत्तींचा निर्णायक पराभव झाला आहे, असे तुम्हाला वाटते का?’’ सर्वांचे एकच उत्तर होते, ‘‘नाही! आजही जवळजवळ प्रत्येक देशात ती अमानुषता अनेक प्रकारे पुन्हा प्रकट होताना आपण पाहत आहोत. मानवी हक्कांच्या संघर्षाचा उद्घोष चालू असतानाच त्यांची बेमुवर्तपणे केली जाणारी पायमल्लीहीं आपल्याला दिसते आहे.’’

त्या मुलाखतींमधून व्यक्त झालेली वेदना खरी आहे. बरोबर दहा वर्षांपूर्वी, म्हणजे हिटलरच्या 50व्या मृत्यूदिनानिमित्त ‘टाइम’ या अमेरिकेतील साप्ताहिकाने एक विशेषांक प्रकाशित केला होता. त्याचा मथळा होता ‘द इव्हिल दॅट विल नॉट डाय’ म्हणजे ती दुष्ट, अमानुष, पाशवी, हिंस्रता अजूनही सर्वत्र आहे. याचा अर्थ एवढाच आहे की अजूनही प्रदीर्घ संघर्षयात्रा बाकी आहे.

हिटलरच्या आत्महत्येनंतर चार वर्षांनी जर्मनीचे अधिकृतपणे विभाजन केले गेले. रशिया, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यांनी संयुक्तपणे नाझी जर्मनीचा पराभव केला असला, तरी त्यांची दोस्ती टिकली ती फक्त 8 मे 1945 पर्यंत. त्या दिवशी युरोपातील नाझी सैन्याने शस्त्रे खाली ठेवली. (त्या विजय दिवसालाही 8 मे रोजी साठ वर्षे पूर्ण होतील.)

जर्मनीचे विभाजन होण्यापूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन आणि ब्रिटनच्या विजयाचे शिल्पकार विन्स्टन चर्चिल यांनी जाहीरपणे सांगायला सुरुवात केली होती की, नाझींच्या पराभवापुरतीच त्यांची कम्युनिस्ट रशियाशी दोस्ती होती.आता यापुढील संघर्ष समाजवादी विचारसरणीच्या देशांशी, म्हणजे मुख्यत: कम्युनिस्ट रशियाशी होणार आहे. तो लढा लोकशाही आणि हुकूमशाही, भांडवलशाही आणि समाजवादी,व्यक्तिस्वातंत्र्य आणि समूहवाद यांच्यातील असेल.

युरोपातील युद्ध संपल्यानंतरही म्हणजे जर्मनी शरण आल्यानंतरही नाझींचा आशियातील मित्र जपान देश शरण आला जात नव्हता. दोस्त राष्ट्रांच्या आवाहनाला जपानने झुगारून दिले होते. या जपानी अरेरावीचा बंदोबस्त करायच्या हेतूने तसेच जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या नौदलीय तळावर 1941 साली केलेल्या हल्ल्याचा सूड म्हणून हॅरी ट्रुमन यांनी हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब टाकायचा निर्णय घेतला. अमेरिकन अध्यक्षांच्या त्या निर्णयाने जगाचे सर्व संदर्भ बदलले. आपण आजही त्याच अण्वस्त्रांच्या छायेत वावरत आहोत.

हिरोशिमा -नागासाकीनंतर म्हणजे 1945 नंतर चारच वर्षांनी कम्युनिस्ट रशियाने त्यांच्या अणुबॉम्बची चाचणी केली. त्याच वर्षी जर्मनीचीही फाळणी होऊन, पूर्व आणि पश्चिम जर्मनी असे दोन स्वतंत्र देश जन्माला आले. हिटलरच्या राजकारणाचे पर्यवसान सुमारे 80 लाख जर्मन आणि 60 लाख ज्यू मृत्युमुखी पडण्यात झाले होते. अवघा जर्मनी बेचिराख झाला होता. त्यानंतर काही वर्षे ‘नाझी व जर्मनी’ हे दोन समानार्थी शब्द म्हणून वापरले जात.

पुढे 1980 साली बर्लिनची भिंत पडली. ती जगातील लोकशाहीच्या प्रचंड धक्क्याने. 1990 साली जर्मनीचे एकत्रीकरण झाले. परंतु या पंचेचाळीस वर्षांत (1945-1990) जर्मनी (मुख्यत: बर्लिन) हे शीतयुद्धाचे केंद्र मानले गेले होते.

1961 साली बर्लिनची भिंत बांधली गेल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांनी बर्लिनमध्येच उघडपणे जाहीर केले होते की, ‘या शीतयुद्धाचा केव्हाही स्फोट होऊ शकतो.’ तसा स्फोट झाला असता तर तिसरे (आणि अण्वस्त्रांचे) महायुद्ध भडकले असते. या शीतयुद्धाच्या काळात आणि शीतयुद्ध संपल्यानंतरही हिटलरी प्रवृत्ती नष्ट झाल्याचा पुरावा दिसत नाही. म्हणूनच ऑस्वित्झ या छळछावणीतील आज जिवंत असलेल्यांना दुष्टतेचे निर्दालन झाले आहे, असे वाटत नाही.



युगोस्लाव्हियातील बहुवांशिक यादवींना तोंड फुटले ते शीतयुद्ध संपता संपताच, म्हणजे 1991 साली. सर्बिया विरुद्ध क्रोएशिया, सर्बिया विरुद्ध बोस्निया, मॅसेडोनिया विरुद्ध स्लोवानिया असे युगोस्लाव्हियातील सात प्रदेश एकमेकांविरुद्ध सशस्त्रपणे उभे ठाकले. सोव्हिएत युनियनमधील काही प्रजासत्ताकांनी एकमेकांविरुद्ध आक्रमणे आरंभली.

आर्मेनिया विरुद्ध अझरबैजान, जॉर्जिया विरुद्ध रशिया आणि खुद्द रशियातही रशिया विरुद्ध चेचेन्या. या सर्व युद्धांमधूनही तसेच अत्याचार, तशाच छळछावण्या तसेच तुरुंग, तसाच अन्याय, तीच निर्घृणता दिसली. शीतयुद्ध संपल्यानंतर नवे शांततेचे युग सुरू होईल हा आशावाद खोटा ठरला.

शीतयुद्ध संपले त्याच वर्षी म्हणजे 1991 साली अमेरिकेने कुवेत-मुक्तीच्या मिषाने इराकवर आक्रमण केले. त्या आक्रमणानंतर मध्यपूर्व आशिया पेटला आणि त्या भडक्यातूनच नवा दहशतवाद जन्माला आला. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील 11 सप्टेंबर 2001च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व देश दहशतवादाच्या छायेत जगत आहेत.

अमेरिकेने ज्या बेदरकारपणे प्रथम अफगाणिस्तान आणि नंतर इराकवर हल्ला केला, त्यावरून आपण इतिहासातून काही शिकलो आहोत की नाहीत, असा प्रश्न पडतो.

अमेरिकन सैनिकांनी इराकी कैद्यांवर अबू धारीब येथील तुरूंगात जे अत्याचार केले ते नाझींच्या तोडीचेच होते. इस्रायलचे ज्यू सैनिक पॅलेस्टिनी जनतेवर जो अत्याचार करीत आहेत तो पाहता, हिटलरी छळातून हे ज्यू काही शिकले असावेत, असे दिसत नाही. आज जगात असा एकही देश नाही की जेथे नाझी प्रवृत्ती प्रकटलेली नाही. हिटलरच्या आत्महत्येला आज साठ वर्षे पूर्ण झाली. हा सर्व इतिहास पाहून निराश होणे स्वाभाविक असले, तरी आशावादालाही उदंड जागा आहे.

या दुष्ट प्रवृत्तींचे निर्दालन करणाऱ्या शक्तीही सर्व देशात आहेत. त्या अधिक धिटाईने पुढे येत आहेत. म्हणूनच मानवी हक्कांसाठी, लोकशाहीसाठी, शांततेसाठी, स्त्रीपुरुष समानतेसाठी होणारे संघर्षही तीव्र होत आहेत. ज्या शक्तींनी हिटलरशाहीचा, फॅसिझमचा पराभव केला, त्यांचाही वारसा सांगणारे गांधीजी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग याच प्रतिकूल परिस्थितीत जन्माला आले. मानवतेच्या संघर्षातील काही तेजस्वी टप्पे त्यांनी जिंकले. संघर्ष बिकट आहे खरेच आहे. पण तो संघर्ष आता थांबणार नाही. मानवी नैतिकतेचा अंतिम विजय होईपर्यंत!

(सदरील लेख 30 एप्रिल 2005च्या दैनिक लोकसत्तामध्ये होंगी शांती चारो शीर्षकाखाली प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: हिटलर : एक अटळ आत्महत्या
हिटलर : एक अटळ आत्महत्या
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhqST1Fr1rsKK_1q1xCfWiv5XqfddXn_x1xBX3paWZuxtCJw6MYOoQzB9CG8IKQ35PtPnIxnyv8AvRBip6j4t7EFq1tSiuOkEZdVXw7saLwaj6gqkr_uzfxC21akY1SjSom8cvkq1XD3zABu6Unzyfgc52Qf7zNPkxE9GAhBOiy7DH65fuzgOpRw9AqLA/w640-h442/Hitlar.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhqST1Fr1rsKK_1q1xCfWiv5XqfddXn_x1xBX3paWZuxtCJw6MYOoQzB9CG8IKQ35PtPnIxnyv8AvRBip6j4t7EFq1tSiuOkEZdVXw7saLwaj6gqkr_uzfxC21akY1SjSom8cvkq1XD3zABu6Unzyfgc52Qf7zNPkxE9GAhBOiy7DH65fuzgOpRw9AqLA/s72-w640-c-h442/Hitlar.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/04/blog-post_30.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/04/blog-post_30.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content