'साहित्यिकांनी भूमिका घेतली पाहिजे' (१)

उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रानकवी ना. धों. महानोर लाभले आहेत. संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. १०, ११ आणि १२ जानेवारीला होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षीय भाषण आम्ही नजरिया वाचकांसाठी संपूर्ण स्वरूपात दोन भागामध्ये प्रसिद्ध करत आहोत.त्याचा हा पहिला भाग.

नमस्कार!
९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. श्री. नितीन तावडे, उद्घाटक ज्येष्ठ कविवर्य ना. धों. महानोर, ९२व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा ढेरे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठालेपाटील, साहित्य महामंडळाचे कार्यवाह श्री. दादासाहेब गोरे, अन्य मान्यवर आणि माझ्या प्रिय रसिक मित्रांनो, साहित्य महामंडळ गेल्या वर्षापासून अनेक धाडसी आणि स्वागतार्ह निर्णय घेत आहे.

उदा. अध्यक्षांची निवड महामंडळ सर्व घटक साहित्य संस्थाच्या अनुमतीने करत आहे. त्याच्या पहिल्या मानकरी होत्या श्रीमती अरुणा ढेरे. नव्या पद्धतीने झालेल्या निवडीचे सर्वत्र स्वागत झाले. माझ्या ध्यानीमनी आणि स्वप्नीदेखील नसताना ह्यावर्षी तो मान माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाला मिळालेला आहे. त्याचाप्रथमत: आनंद झाला, परंतु जबाबदारीचे भान येताच मनावर दडपण आले. अ. भा. म. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे पवित्र आहे. ह्या व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची पात्रता माझ्यामध्ये आहे का? असा

प्रश्न मी स्वत:ला विचारीत राहिलो. निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातूनआणि महाराष्ट्राबाहेरूनही मला अभिनंदनाचे फोन आले, पत्रे आली आणि अजूनही येत आहेत. ‘राकट देशा, दगडांच्या देशा’ असे

महाराष्ट्राबद्दल बोलले जाते. मला मात्र आता वेगळाच अनुभव आला; ‘प्रेमळ देशा, साहित्यप्रेमी देशा, माझ्या महाराष्ट्र देशा.’ मी खरोखर भारावून गेलो आहे. हे माझ्याकरता आयुष्यभर पुरेल इतके पाथेय आहे.

माझी निवड झालेल्या दिवसापासून तालुक्याच्या सर्व घटकांमधून रसिक आणि सामान्यजन अभिनंदनासाठी धावले. शाली आणि पुष्पगुच्छ ह्यांचा खच पडला.

उस्मानाबाद हा दुष्काळी जिल्हा आहे, याची माहिती मला आहे. पुष्पगुच्छ आणि शाली ह्यांच्याऐवजी उस्मानाबाद येथील पीडित कुटुंबासाठीनिधी गोळा केला, तर अधिक उचित होईल, असे मी सुचवले.

वसईतील ‘प्रबोधन प्रतिष्ठान’ने ती कल्पना उचलून धरली. तालुक्यातीलअनेक संस्थांनी आणि सामान्य नागरिकांनी ‘वेदना जाणवाया, जागवूसंवेदना’, ह्या भावनेने प्रेरित होऊन आमच्या आवाहनाला उत्स्फूर्त

प्रतिसाद दिला. त्यापैकी काहीजण शेतकरी आहेत. त्यांच्यापैकी अनेकजणह्या संमेलनासाठीही हजर आहेत.

प्रिय उस्मानाबादकरांनो, ‘उस्मान’ ह्या अरेबिक शब्दाचा एक अर्थ आहे – ‘लार्क पक्षाचे पिल्लू’, दुसरा अर्थ ‘खास निवड झालेला’ असा आहे. यावर्षी तुम्हा उस्मानाबादकरांची महामंडळाने खास निवड केली आहे. तुमची मने आकाशाएवढी मोठी अन् पक्ष्यासारखी निरागस आहेत. शासनाचे अनुदान पुरेसे नाही, ह्याची तुम्हांला जाणीव होती; तरी तुम्ही महामंंडळाच्या निर्णयााचे आनदांने स्वागत केले आणि गावागावांतून निधी गोळा केला.

अजूनही आपल्याला काही अपुरे पडत असेल तर, तुमची गरज भागवण्यास महाराष्ट्र सरकार पुढे येईल, याची मला खात्री आहे. गरिबीमुळे किंवा कर्जाच्या ओझ्यामुळे येथील काही शेतकऱ्यांना दुर्दैवी निर्णय घ्यावे लागले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खामध्ये मी सहभागी आहे. फडणवीस सरकारने २०१५ साली नेमलेल्या समितीने ह्या जिल्ह्याला ४५० एमएलडी पाणी पुरवण्याची शिफारस केलेली आहे. माझी नव्या सरकारला खास विनंती आहे, आपण अग्रक्रमाने उस्मानाबादची गरज लवकरात लवकर पुरी करावी.

मराठवाडा ही संतांची भूमी. इथल्या मातीचा प्रत्येक कण आणि कण संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेला आहे. उस्मानाबाद हा जिल्हा कृष्णा आणि गोदावरी ह्या दोन्ही नद्यांनी सुपीक बनवला आहे. जिल्ह्याचा इतिहास सातव्या शतकापर्यंत मागे जातो. ह्या जिल्ह्याचा भाग असलेले शहर ‘लातूर’ हे राष्ट्रकूट राजांची जन्मभूमी!

ऐतिहासिक आणि ज्ञात कालखंडाचा विचार करता मौर्य काळात उस्मानाबाद जिल्ह्याचा परिसर सम्राट अशोकांच्या आधिपत्याखाली होता. सातवाहन राजांनी इ.स.पूर्व २४० ते इ.स.२६० अशी जवळपास साडेचारशे ते पाचशे वर्ष येथे प्रदीर्घ राज्य केले. १९०५ सालीलोकमान्य टिळकांनी शहराला भेट देऊन इथे वाचनालयाची स्थापना केली आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन दिले. १९४१ साली भारतरत्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी जिल्ह्याला भेट देऊन शिकण्याचा आणि संघर्ष करण्याचा संदेश दिला. उस्मानाबादच्या पदरी असे कितीतरी पुण्य आहे.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्रातील जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. महाराष्ट्र ही ‘संतांची भूमी.’ संत गोरा कुंभार ह्यांच्या वास्तव्याने मराठवाड्याची ही भूमी पावन झाली आहे. समाजातल्या सर्व स्तरांतील संतांनी महाराष्ट्रात आध्यात्मिक लोकशाहीचा पाया घातलेला आहे. जीवनमुक्त होणे । हे त्यांचे जीवितध्येय होते. ‘म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे जग हे करणे शहाणे बापा’।। आपणा सर्वांना साहित्याच्या मार्गाने शहाणे करण्याची प्रतिज्ञा गोरोबांनी केलेली आहे. त्यांच्या

कृपाछायेखाली हा तीन दिवसांचा ज्ञानसोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्व संतांकडून आपण ९३व्या अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलनासाठी आशीर्वाद मागू या.

वसईतील एका अशिक्षित, परंतु सुसंस्कृत शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. मराठी माध्यमाच्या शाळेत माझे शिक्षण झाले. फादर थॉमस स्टीफन्स ह्यांनी ‘खिस्तपुराण’ ह्या महाकाव्यात म्हटलेले आहे.

‘‘म्हणोनि आमीं तुमी सर्व जनीं ।

बंदुवर्ग ऐसे मानावे मनीं ।

फ्रिंग्री हिंदु आदीं करुनि ।

येकमेकांचे बंदु ।’’ (भाग १-३ ओवी ६४)

अशा प्रकारे सर्वधर्म मैत्रीच्या वातावरणात मी मोठा झालो. पुढे रेव्हरंड नारायण वामन टिळक हे तुका नामक सेतूवरुनी खिस्तचरणी आले आणि महाराष्ट्रातील खिस्ती समाजाला त्यांनी भजने आणि भक्तिगीते शिकवली. त्यांचे एक भजन मला आठवते. खिस्त गुरुमाऊली गं माय माझी खिस्त गुरु माऊली । टिळकांनी आम्हांला परमेश्वराला ‘गुरु माऊली’ म्हणायला शिकवले. लक्ष्मीबाई टिळकांनी त्यांच्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्राद्वारे प्रभू खिस्ताचे कसे अभ्यासपूर्ण अनुकरण करावे, हे आम्हांला दाखवून दिले. त्यांचा खिस्ताकडचा प्रवास पाहून माझी श्रद्धा दृढ झाली. कॅथॉलिक परंपरेतील रेव्हरंड फादर जे. एस. मिरांडा, बिशप डॉमनिक डिआब्रियो ह्यांनी

आम्हांला कॅथॉलिक नियतकालिकांद्वारे मराठी भाषेची गोडी लावली. खिस्ती साहित्याचा हा चार दशकांचा वारसा आमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. त्या सर्वांचे ऋण शब्दांच्या पलीकडचे आहे. पुढे मला माझ्या अभ्यासात संत साहित्याची ओळख झाली. माझा आध्यात्मिक पिंड घडवण्यात संत साहित्याचे आणि सर्व धर्मग्रंथांचे फार मोठे योगदान आहे. माझे एक बोट प्रभू येशूच्या हातात असले, तरी दुसरे बोट आपल्या संतांच्या हातात आहे.

साहित्याचे प्रयोजन

‘सह नेते ते साहित्य’, अशी साहित्याची एक व्याख्या केली जाते.समाजाला सत्याचे भान देऊन भविष्याचे वेध घेण्याची दृष्टी देणारा एक संस्कार म्हणजे सााहf त्य. आज येथे संपूर्ण महाराष्ट्रातून आणि बृहन्महाराष्ट्रातून आपण सर्व हजारोंच्या संख्येने एकत्र जमलो आहोत. साहित्यावरील प्रेमाने आपणा सर्व साहित्यभक्तांना आपल्याला इथे एकत्र आणले आहे. हीसाहित्यनिष्ठांची मांदियाळी आहे. या तीन दिवसांत विचारांचे आदान-प्रदानहोईल; आपल्या एकमेकांच्या गाठी-भेठी होतील, ग्रंथांचा सहवास विचारांचेधन लाभेल ही फार मोठी कमाई आहे.

मित्रांनो, मानवी जीवन हे गूढ आणि रहस्यमय आहे. आपल्याजीवनाला अनेक पदर आहेत. त्यांपैकी साहित्य हा एक पदर आहे. मानवी जीवनातील गूढ जाणून घेण्याची माणसाला सतत उत्सुकता लागलेली असते. माणसाच्या मनात विचारांचे आणि भावनांचे सतत कल्लोळ उठत असतात. आपल्या विचारांना आणि भावनांना एखादा साहित्यिक शब्दरूप कसे देतो? कवयित्री संजीवनी मराठे आपल्या एका कवितेत म्हणतात, ‘मी न सांगायची कुणाला, कविता स्फुरते कशी?’ कवीला कविता, लेखकाला कथा, कादंबरी, निसर्गलेखन कसे

काय साधते? त्याच्या मनात विचारांची घुसळण सतत चालत असते आणि कळीला जसे उमलून यावेसे वाटते, तसे एक दिवस लेखकाला लिहावेसे वाटते. कळीला जसे उमलण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही, तसेच लेखकाला व्यक्त होण्यास कुणी प्रतिबंध करू शकत नाही. ही चिंतनशीलता अबोध मनाचा ताबा घेते आणि एक दिवस ती शब्दांच्या रूपाने प्रकट होते. ह्या लेखनप्रक्रियेची तुलना एखाद्या गर्भवती स्त्रीबरोबर करता येईल. जेव्हा तिला जाणवते की, तिच्या उदरात अंकुर फुलतो आहे, तेव्हा तीही फुलते आणि तो आनंद व्यक्त केल्याशिवाय तिला राहावत नाही. चंद्र जसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला पूर्णबिंब साकारते, त्याचप्रमाणे ती नऊ महिन्यांच्या खडतर प्रवासात अनेक अनुभवांच्या दिव्यातून जाते.

तिचे लक्ष ‘त्या’ दिवसाकडे लागलेले असते. जेव्हा बाळ आतून ढुशा मारू लागते,तेव्हा बाळ सांगते की, ‘माझी यायची वेळ जवळ आली आहे’ आणि एकदिवस दिव्य घडते, त्यासाठी तिला जीवघेण्या वेणांची किंमत मोजावीलागते. बाळ जन्मल्यावर मात्र सृजनाचा तो चमत्कार पाहून ती प्रसूतीचे दु:ख हरवून बसते. ती त्याच्यामध्ये गुंतत जाते. लेखनाचा प्रवासही काहीसा असाच असतो. विचाराचे एखादे बीज कवी-लेखकाच्या अंतर्मनात पडते. कधी ते त्याच्या अबोध मनात जाते. दरम्यान लेखक अनेक प्रकारच्या अनुभवातून जात असतो. ते बीज मात्र आतून काहीतरी सांगत असते. काही प्रकारांचे बी मातीत पेरले की, दिवसा-दोन दिवसांत सशाच्या डोळ्यांनी लुकलुक पाहू लागते. पहिल्या

पावसामध्ये हा अनुभव येतो. चैत्रामध्ये भाजून निघालेली भूमी पहिल्यापावसानंतर अचानक बिजांकुरित होते. आफ्रिकेमध्ये मात्र काही वृक्ष असेआहेत की, त्यांची बीजे मातीत पडल्यानंतर खूप वर्षांनंतर त्यांना कोंब

फुटतात. लेखकाचे असेच असते. कधी त्याची चिंतनशीलता मनाच्यागाभाऱ्यामध्ये काही दिवस, काही महिने, कधीकधी काही वर्षेही दडून बसतेआणि मगच ती शब्दरूप घेते.

साहिात्यिकाच्या ह्या सृजनशीलतेला आपण ‘प्रतिभा’ म्हणता.े प्रतिभा,प्रतिभा म्हणजे काय? एका थेंबातून निर्झराचा प्रवास सुरू होऊन पुढे अनेकनिर्झर त्याला मिळत जातात, तो विस्तारत जातो. झाडाझुडपांतून,

खाचखळग्यांतून, कधी उंचावरून, कधी सपाटीवरून तो बहरतच जातो आणि मग एक दिवस हा महाप्रपात एखाद्या कड्यावरून उसळतो, कोसळतो आणि साऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. त्याला आपण धबधबा म्हणतो. प्रतिभेचा खडतर प्रवास असाच काहीसा असतो. लेखक जेव्हा लिहायला बसतो, तेव्हा त्याची अंतर्दृष्टी जागृत होते आणि मनाच्या कोषात साठवलेले सगळे अनुभव कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललित लेख ह्यांच्या रूपाने कागदावर उतरतात. साहित्यिकाचे अनुभवविश्व जितके व्यापक, त्याची चिंतनशीलता जितकी सखोल, त्याची कल्पनाशक्ती जितकी प्रत्ययकारी आणि त्याची अंतर्दृष्टी जितकी जागृत, त्या प्रमाणात त्याच्या साहित्याची गुणवत्ता ठरत असते आणि ते अभिजात पदाला पोहोचते.

उदा. जॉन स्टाइनबर्ग ह्यांची ‘द ग्रेप्स् ऑफ रॉथ’ ही कादंबरी. तीसच्या दशकातील मंदीच्या काळामध्ये अमेरिकेत अनेकांची अन्नान्न दशा झाली. काम मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरे होऊ लागली. ओक्लोहोमा ह्या विभागातून बेकारांचे तांडेच्या तांडे कॅलिफोर्नियाच्या दिशेने निघाले. अनेकांनी हे तांडे जाताना पाहिले, मात्र जॉन स्टाइनबर्ग ह्यांना त्यांची होणारी होरपळ, त्यांना होत असलेल्या यातना, ते उपसत असलेले कष्ट, त्यांची चाललेली धडपड आणि जगण्याची जिद्दही जाणवली. त्यांच्यातला संवेदनशील लेखक जागृत झाला आणि ‘द ग्रेप्स् ऑफ रॉथ’ ह्या अजरामर ग्रंथाची निर्मिती झाली.

हे अंतदृष्र्ट ीचे किंवा प्रतिभेचे वरदान वैज्ञानिकाला किंवा आध्यात्मिकव्यक्तीला देखील लाभलेले असते. वैज्ञानिक त्यामुळे शोध लावतात. उदा.गॅलिलिओला लागलेला सूर्य स्थिर असल्याचा शोध आणि आध्यात्मिक

क्षेत्रात मदर तेरेजा ह्यांना लाभलेली अंतर्दृष्टी. त्यामुळे जे रंजले-गांजलेआहेत, त्यांच्यात त्यांना देव दिसू लागला. थोडक्यात आपण पाहतो, पणआपल्याला दिसत नाही. प्रतिभावंतांना मात्र ते दिसते. हाच त्यांच्यामधील व आपल्यामधील फरक आहे. उत्तम साहित्याच्या वाचनामुळे आपल्याला पराकोटीचा विविधांगी

अनुभव येतो. कधी आपण आनंदाच्या लाटेवर लहरतो, तर कधी दु:खाने गहिरवतो. कधी आपल्याला जीवनाच्या अर्थाच्या प्रश्नांविषयी उत्तरे मिळतात, तर कधी व्यसनांच्या किंवा वासनांच्या गर्तेतून बाहेर पडण्यास मदत होते. कधी आपल्याला विश्वाच्या अनंततेचे भान येते, कधी विश्वाचे आर्त हृदयाला भिडते; तर कधी मानवी आत्म्याच्या महत्ततेचे दर्शन घडते. अशा प्रकारे आपले जीवन सुंदर व संपन्न होऊन आपल्या जीवनाला दिशा मिळू शकते.

मराठी साहित्य – मुमुर्षू ?

अलीकडे मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जाते. ती मुमुर्षू, म्हणजे मरणपंथाला लागली आहे, असे सांगितले जाते. जे जे जिवंत असते, त्यांच्यापुढे जगण्याची आव्हाने असतात. त्यावर मात करून ते टिकाव धरते. त्याचप्रमाणे मराठी भाषेपुढे आव्हाने आहेत. उदा. आजची सर्वव्यापी डिजिटल साधने, लोकव्यवहारातील हिंदीचे वाढते प्रस्थ, परदेशी भाषांचे वाढते महत्त्व आणि विशेष म्हणजे मराठी माणसाचा जन्मजात

न्यूनगंड, इ… परंतु तसे जर असेल, तर आजघडीला शेकडो दिवाळीअंकप्रसिद्ध होतात, लक्षवेधी मराठी साहित्य निर्माण होते, मराठी वृत्तपत्रांत दोन-दोन पानांच्या मराठी नाटकांच्या जाहिराती येतात, गाजलेल्या मराठीपुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध होतात. या सर्वांचा आस्वाद मराठीमाणूसच घेतो आहे ना? तसेच आज ह्या संमेलनस्थळी लागलेले पुस्तकांचेअसंख्य स्टॉल्स व त्यात गर्दी करीत असलेले दर्दी वाचक हे सुचिन्ह आहे.एका मराठी वृत्तपत्राची दिल्ली आवृत्ती प्रसिद्ध होते. म्हणन्ू ाच मराठी माणसाला विचारावेसे वाटते, ‘भ्रांत तुम्हां का पडे? मायबोलीचे दूध प्याला आहात ना?’

आता गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मराठी बाळे इंग्रजी माध्यमातशिकून वाघिणीचे दूध पिऊ लागली आहेत, हे खरे; परंतु आजही महाराष्ट्रातील ऐंशी टक्के शाळा मराठी माध्यमांच्याच आहेत ना? ‘पूर्व दिव्य ज्यांचे, त्याना रम्य भावी काळ’ असे कवी विनायक सांगून गेले. आपले पूर्वदिव्य काय, ते संतसाहित्याने सिद्ध केलेले आहे. आज चार मराठी लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत. (अर्थात हिंदीला अकरा व कन्नडला आठ पुरस्कार मिळालेले आहेत. आपल्याला

खूप पल्ला गाठायचा आहे.) काही मोजक्या मराठी पुस्तकांची अन्य भारतीयआणि परदेशी भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत आणि होत आहेत. हे सर्वआश्वासक आहे. किती भारतीय भाषांमध्ये नेमाने अखिल भारतीय साहित्य संमेलने साजरी होतात? पहिले मराठी साहित्य संमेलन ११ मे १८७८ रोजीन्यायमूर्ती माधवराव गाोविंद रानडे आाणि गोपाळराव देशमुख (लोकहितवादी) ह्यांच्या प्रेरणेने पुणे येथे भरले होते. त्यांनी लावलेला साहित्य संमेलनाचा वेलू आता गगनावरी जातो आह.े त्या संमेलना साहित्याची,साहित्याविषयक प्रश्नांची आणि विशेष म्हणजे तत्कालीन परिस्थितीची नोंद घेतलेली आढळते.

१९०५ सालच्या तिसऱ्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष पांडरु ंग तथा दादासाहेब करंदीकर ह्यांनी साहित्य आणि सामाजिक सुखदु:खे ह्यांचे नाते जुळले पाहिजे, देशाला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांवरही चर्चा-चिंतन झाले पाहिजे, असे आग्रहाने म्हटले होते. आज स्वातंत्र्योत्तर काळातही जेव्हा जेव्हालोकशाहीचा गळा घोटला जातो, मानवी हक्क किंवा मानवी प्रतिष्ठा ह्यांनाधोका पोहोचतो, तेव्हा तेव्हा साहित्य संमेलनाने भूमिका घेतलीच पाहिजे,याबाबत दुमत होण्याचा प्रश्नच नाही.

चौथे साहित्य संमेलन १९०६ रोजी पुणे येथे वासुदेव गोविंद कानिटकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठात मॅट्रिकच्या अभ्यासक्रमात मराठीचा विषय ऐच्छिक न ठेवता अनिवार्य ठेवला याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले होते. सुमारे ११४ वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारला स्थानिक भाषेचे महत्त्व कळून आले व त्यांनी त्याप्रमाणे पावले उचलली ह्याचा आपल्याला अभिमान वाटतो. त्यांनी दूरदृष्टी ठेवून मराठीच्या अध्ययनाला चालना द्यावी हे विशेष.

१९०७ साली विष्णु मोरेश्वर महाजनी ह्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पाचव्या साहित्य संमेलनात मराठीप्रमाणेच इंग्रजी साहित्याचे अध्ययन करणे हे कसे आवश्यक आहे, ह्याचे प्रतिपादन केले. किती द्रष्टे होते आपले पूर्वाध्यक्ष! व्यक्तीच्या जीवनाबरोबर साहित्याच्या जीवनातही चढउतार असतात.

रविकिरण मडं ळाच्या अस्तानंतर मराठी कविता जवळजवळअज्ञातवासात गेली असे वि. स. खांडेकर ह्यांनी २५व्या साहित्यसंमेलनातम्हटले आहे. असे साठोत्तरी कवितेबद्दल म्हणता येणार नाही. मराठीचा प्रवाह वेगवेगळ्या वाटा-वळणाने पसरत आहे. साहित्य हे जीवनावर केलेले भाष्य आहे. कवी, लेखक हे समाजाचे अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे समाजाची सुखदु:खे, आशा-आकांक्षा, वेदना-व्यथा आणि जे-जे मानवी आहे, मानवाच्या इतिहासाशी आणि वर्तमानाशी निगडित आहे, त्या सर्वांचे प्रतिबिंब साहित्यिकाच्या हृदयात उमटते व ते त्याच्या लेखनातून व्यक्त होते.

वेदना-साहित्याची जननी

वेदना हा एक मूलभूत मानवी अनुभव आहे. वेदनेतून प्रेरणा घेऊन अनेक साहित्यिकांनी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली आहे. साहित्यिकाच्या, अस्तित्वाच्या अंतरात्म्यापर्यंत ती पोहोचलेली असते म्हणून वेदना ही साहित्याची जननी ठरलेली आहे. वेदना ह्या मनुष्यमात्रांच्या असोत, पशु-पक्ष्यांच्या असोत किंवा वृक्षवेलींच्या असोत, त्या माणसाला, त्याच्या आत्म्याला गदगदून हलवतातच. वाल्मिकी ऋषींनी स्नान करून परतत असताना शिकाऱ्याने मारलेल्या बाणामुळे जखमी झालेली क्रौंच पक्ष्याची मादी पाहिली, तिच्याभोवती

आक्रोश करणारा व्यथित नर पाहिला आणि ते विव्हळ झाले. त्या पक्ष्याच्यावेदनेशी ते ऋषी तादात्म्य पावले व उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून निघालेलामहानिषाद श्र्लोक अजरामर झाला.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम:

शाश्वती: समा: ।

यत्क्रौंच मिथुनादेकमवधी

काममोहित्म ।।

ज्यांची शंभरावी पुण्यतिथी यावर्षी साजरी होत आहे, त्या रेव्हरंड नारायण वामन टिळक ह्यांनी लिहिलेली ‘केवढे हे क्रौर्य’ ही कविता आपणपाठ्यपुस्तकात शिकलो. जखमी झालेली पक्षिणी आपल्या चोचीत घास

घेऊन कशीबशी घरट्याकडे परतत असताना, तिची धडपड कवीने पाहिलीआणि ‘क्षणोक्षणी पडे, उठे परि बळे,’ ही कविता जन्माला आली. तिचे वाचन करताना पाषाणहृदयी माणसालाही पाझर फुटतो. एकोणिसाव्या शतकात विकसित झालेल्या ‘ब्लॅक लिटरेचर’मध्ये तत्कालीन गुलामगिरीत खितपत पडलेल्या कृष्णवर्णीयांच्या नरकयातनांचे दर्शन घडते. साहित्याला दिलेले ते वेगळे वळण होते आणि जगाचे त्या साहित्याकडे लक्ष वेधले गेले,े कारण वेदनेबरोबर त्या साहित्यात अभिजातताही होती. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी साहित्याच्या वृक्षाला दलित साहित्याच्या रूपाने रसरशीत धुमारे फुटले आणि कवितांच्या व आत्मचरित्रांच्या रूपात ते व्यक्त होऊ लागले. वंचित व शोषितांची दखल घेण्यात आणि त्यांच्या साहित्याचे योग्य मूल्यमापन करण्यात प्रस्थापित समीक्षक कमी पडले.

वेदना ही सर्वव्यापी आहे. त्याचे उदाहरण म्हणजे पॅलेस्टिनी लोक कसे इस्रायलपुरस्कृत अत्याचाराला अलिकडे (१९४८नंतर) तोंड देत आहेत, हे मी पॅलेस्टिनमधल्या माझ्या वास्तव्यात डोळ्यांनी पाहिले आणि तेथल्या अभ्याससत्रावेळी त्याविषयी ऐकलेसुद्धा. मनुष्य जेव्हा वेदनेत असतो आणि त्याचे तोंड बंद केले जाते, तेव्हा त्याचे हृदय बोलू लागते. काही पॅलेस्टिनी कवितांचा अनुवाद माझ्या वाचनात आला. रक्तात बुडवलेल्या लेखणीने केलेले ते काव्यलेखन आहे. तेथील कवी गसान झक्तान म्हणतात,

सामूहिक मृत्यू

अंधाराशिवाय एकही गोष्ट मिळाली नाही,

झोपलो आम्ही छपराशिवाय,

पण घेऊन पांघरूण अंगावर

आणि वाचलेला जीव.

कुणीही आला नाही त्या रात्री

सांगायला आम्हांला इतरांच्या मृत्यूबद्दल.

रस्ते वाजवत राहिले शिट्ट्या

आणि रस्ते खून झालेल्यांनी खच्चून भरलेले,

आले होते ते शेजारच्या प्रदेशातून

ज्यांच्या किंकाळ्या

सुटून आल्यागत आमच्याकडे,

आम्ही पाहिलंय आणि ऐकलंयही

मेलेला माणूस हवेतून चालताना,

त्यांच्या बसलेल्या

धडकीच्या दोरीनं बांधलेला

खळखळाट खेचून घेतोय

चमकणाऱ्या गवताच्या पात्यांतून

धगधगत्या गवताच्या चटयांवरून

पडत राहिलंय सारं रस्त्यांवर,

स्त्रियांनी दिलाय जन्म

फक्त या जगाचा निरोप घेतलेल्यांना

आणि त्यानंतर आता

स्त्रिया देणार नाहीत जन्म.

(‘पॅलेस्टिनी काविता’, अनुवाद रमेशचंद्र पाटकर. लोकवाङ्मयगृह प्रकाशन २०१८)

जे काळजातून निघते, ते काळजाला भिडतेच आणि वाचकाला अंतर्मुख करते. साहित्य हा सत्याचा आविष्कार आहे. लेखक आपल्यासाहित्यकृतीतून माणसाचा शोध घेत असतो आणि विशेषत: स्खलनशीलमाणसामध्ये असा शोध लवकर लागतो. कारण माणसाचे हृदय हे कुरूक्षेत्रआहे. तिथे बऱ्यावाईटांचा संघर्ष होत असतो. त्या संघर्षाला भिडता भिडतामाणूस थकून जातो. परंतु संघर्ष जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

नजरेसमोर मोठमोठे आदर्श ठेवून एक अतिशय देखणा तरणाबांड तरुण ‘फादर’ हीउपाधी मिळवतो. तो अतिशय बुद्धिमान असतो. त्याचे भवितव्यही उज्ज्वलअसते. तो स्वत:ला खूप सांभाळतो. आपल्या ब्रह्मचर्य व्रताची त्याला जाणीव होती. त्यामुळे लोकांमध्ये मिसळताना तो स्त्रिया आणि मुली ह्यांच्यामध्ये अंतर ठेवत असे. एक वयस्क स्त्री त्याला नादी लावण्याचा प्रयत्न करते. परंतु तो ताकास तूर लावत नाही. त्याचे फार मोठे नाव होते. त्याच्या प्रवचनाला लोक मोठ्या संख्येने गर्दी करीत. सर्व धार्मिक विधी तो चित्त लावून साजरे करीत असे.

काही वर्षे जातात. कार्य करीत असताना त्याची नजर एका निळ्या डोळ्यांच्या आणि परीसारखी दिसणाऱ्या एका मुलीकडे जाते आणि मुलीचीहीत्याच्याकडे. दोन्ही गोष्टी नकळत घडतात. कुठेतरी एक सुप्त भावना जन्माला येते आणि दोघांनाही सर्व जाणवते. कुणाच्याही ध्यानात येणार नाही अशाप्रकारे त्यांचे प्रेमसंबंध रंगत जातात, परंतु ते लपून राहत नाहीत आणि त्याचा बभ्रा होतो. त्या दोघांना प्रचंड यातनेमधून जावे लागते.

त्याचे भवितव्य धोक्यात येते. त्या दोघांच्या मनांची झालेली होरपळ,उलाघाल अतिशय धारदारपणे ऑस्ट्रेलियन लेखिका मेरी मॅक्लो ह्यांनीआपल्या ‘द थॉर्नबर्ड्स’ ह्या कादंबरीत वर्णिलेली आहे. कंटकपक्षी

(थॉर्नबर्ड) नावाचा एक जगावेगळा पक्षी असतो. तो आयुष्यात फक्त एकदाच गातो. त्याची सूर आळवायची वेळ जवळ आली की तो काटेरी वृक्षाचा माग काढतो. अतिशय तीक्ष्ण आणि अणुकुचीदार अशा काट्यावर तो स्वत:ला झोकून देतो. काटा त्याच्या हृदयातून आरपार गेला म्हणजे त्याच्या कंठातून एक सुरेल गीत बाहेर पडते. ते ऐकून सारं जग स्तिमित होते आणि जीवाचे कान करून त्या गाण्याचा आस्वाद घेते त्यावेळी

स्वर्गातून देव मंद स्मित करतो… ज्याच्या काळजातून काटा आरपार जातो आणि त्या काट्याची

लेखणी करून जो लिहितो, अशी साहित्यकृती अभिजात पदाला पोहोचते.कलात्मकरितीने वर्णन केलेली वेदना रसिकाला एक प्रकारचा इंद्रियातीतआनंद देत असते. ह्यालाच समीक्षक ब्रह्मानंदाच्या जातीचा आनंद समजतात.

साहित्याचे व्यासपीठ

प्रत्येक क्षेत्राचे स्वतंत्र व्यासपीठ असते. त्यांचे व्यासपीठ त्या त्या क्षेत्रापुरते मर्यादित असते आणि असले पाहिजे. आपण कधी कधी राजकीय व्यक्तींना अनेक प्रकारच्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावर बसवत असतो. उस्मानाबादच्या संमेलनाचे व्यासपीठावर स्थानापन्न न होण्याचा निर्णय राजकारणी मंडळीने मोठ्या मनाने घेतलेला आहे. एक नवीन पायंडा उस्मानाबादच्या संमेलनातून सुरू होत आहे. त्याबद्दल पुढाऱ्यांचे आणि उस्मानाबादकरांचे अभिनंदन! 
साहित्य संमेलने हे साहित्यिकांचे व्यासपीठआहे आणि तिथे अग्रपूजेचा मान साहित्यिकांचाच असतो. एक साहित्यप्रेमी म्हणून राजकीय व्यक्तींनी अवश्य संमेलनाला हजर राहावे. सरकारने आपल्या सांस्कृतिक धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पुतळे उभारण्याऐवजी साहित्य संमेलनाला पुरेसे अनुदान द्यावे. दुष्काळग्रस्त भागात आणि श्रीमंत भागात जेव्हा संमेलने होतात, तेव्हा शासनाने अनुदान देताना त्याचा विचार करावा. राजकारण ही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया आहे.

एखाद्या देशाचे भवितव्य त्या देशाच्या भल्या-बुऱ्या राजकारणावर अवलंबून असते. निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपले नागरी जीवन राजकारण्यांच्या हवाली करीत असतो. म्हणून साहित्यिक ह्या प्रक्रियेपासून अलिप्त राहू शकत नाही. जेव्हा लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही प्रवृत्ती अवतरते, तेव्हा साहित्यिकांनी स्पष्ट बोलले पाहिजे आणि लिहिले पाहिजे. अशा वेळी मौन राखणे हा भेकडपणा आहे. समर्थ रामदास ह्यांनी आपल्या‘दासबोध’ ह्या ग्रंथात म्हटले आहे,

मुख्य ते हरिकथा निरूपण

दुसरे ते राजकारण

तिसरे ते सावधपण सर्व विषयी ।

राजकारण का करावे आणि कसे करावे, ह्याचा वस्तुपाठ समर्थांनी घालून दिलेला आहे. पोप अकरावे पायस (१८५७-१९३९) ह्यांनी आपल्या एका लेखात म्हटले होते, ‘ज्यांना राजकारणात रस आहे, जे राजकारणात सक्रिय भाग घेतात, त्यांनी अतिशय अवघड परंतु अतिशय सन्माननीय अशा राजकारणाच्या कलेत पारंगत झाले पाहिजे.’ पोप पायस ह्यांच्या ह्याविधानाला हिटलर आणि मुसोलिनी ह्यांची पार्श्वभूमी होती. ज्यूंचा संहार होत असताना पोप पायस बारावे ह्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल संदिग्धता व्यक्त के ली जाते. सध्याचे पोप फ्रान्सिस ह्यांनी त्याकाळचे सगळे दस्तऐवज आता खुले केले आहेत. योग्य वेळी सत्य बाहेर येईलच.

जेव्हा समाजात असाधारण परिस्थिती निर्माण होते, जेव्हा हुकूमशहा आणि लष्करशहा ह्यांचा उदय होतो, जेव्हा मानवी हक्क, प्रतिष्ठा आणि जीवन पायदळी तुडवले जाते, तेव्हा साहित्यिक, विचारवंत, धर्माचार्य ह्या सर्वांनी एखाद्या द्रष्ट्याप्रमाणे स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. आपल्याकडचे उदाहरण म्हणजे स्वामी अग्निवेश . ते एका धर्मसंघटनेचे अध्यक्ष आहेत. तरीही मानवी हक्कांची पायमल्ली होताच त्यांनी लोकशाही मार्गाने आपला विरोध दर्शविला. 
त्यांच्यावर तथाकथित धर्मवाद्यांनी हल्ले केले. पोलंडमध्ये जेव्हा एकाधिकारशाहीचा कहर झाला तेव्हा पोप दुसरे जॉन पॉल ह्यांनी; जेव्हा फिलिपाइन्समध्ये मार्कोस आणि त्याची पत्नी इमेल्डा ह्यांनी आपली हुकूमशाहीची वाघनखे बाहेर काढली तेव्हा कार्डिनल सिन ह्यांनी आणि एल्-साल्वादोरमध्ये हुकूमशाहीने उग्र रूप धारण केले, तेव्हा आर्चबिशप रोमेरो ह्यांनी ठाम भूमिका घेतली आणि लोकशाहीचा पुरस्कार केला.

१९८१मध्ये पोप दुसरे जॉन पॉल ह्यांच्यावर प्राणांतिक हल्ला झाला आणि आर्चबिशप रोमेरो ह्यांची निर्घृण हत्या झाली; कारण त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती. ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेतादेवी ह्या बंगाली लेखिका होत्या. बंगाली साहित्यामध्ये त्यांनी मोलाची भर घातली आहे. मात्र स्वत:ला अभ्यासिकेत कोंडून न घेता, त्यांनी रस्त्यावर उतरून गोरगरिबांसाठी संघर्ष केला. नयनतारा सहगल ह्या गाजलेल्या लेखिका आहेत. भारतात अलिकडे अनेक प्रकार घडत आहेत, ज्यांमुळे कायद्याची पायमल्ली होते, लेखनस्वातंत्र्य मर्यादित केले जाते त्याबद्दल त्या आपले मत स्पष्टपणे मांडतात. 

त्यामुळे अनेकांना त्यांना कार्यक्रमांना बोलावण्याची भीती वाटते. ज्यांच्या लेखणीत नैतिकता ठासून भरलेली असते आणि वृत्तीमध्ये एकप्रकारचा बेडरपणा असतो, त्यांचा समाजमनाला धाक वाटतो. ज्यांच्याविषयी धाक वाटावा असे किती साहित्यिक आपल्या आजुबाजूला आहेत? आपल्या महाराष्ट्रात आपण नेहमी दुर्गाबार्इंची आठवण काढतो. दुर्गा भागवत ह्यांना साहित्यातील ‘रणरागिणी’ असे म्हटले जाते. कारण त्या भूमिका घेत आल्या अन् भूमिका लढवत आल्या.

जेव्हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच होतो, तेव्हा समाजामध्ये धर्माच्या नावाने भेदाभेद केला जातो आणि समाजाचे वांशिक शुद्धिकरण करण्याचा निर्णय घेतला जातो. जेव्हा एखाद्या प्रदेशाला नजरकैदेचे स्वरूप येते, जेव्हा दोष नसताना अश्राप नागरिकांची उपासमार होते, त्यांचे उपजिविकेचे साधनहिरावून घेतले जाते तेव्हा विचारवंतांनी आणि साहित्यिकांनी गर्जना केलीपाहिजे. ‘राजा कठोर आत्मपरीक्षणाची वेळ जवळ आली आहे.’

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

मानवाचा इतिहास हा अन्यायाचा, गुलामगिरीचा, विषमतेचा आणिभेदभावाचा आहे. लिंग, वंश, जात, धर्म आणि जन्मस्थान या कारणांवरूनमाणसाने माणसावर, सबलांनी दुर्बळांवर, उच्च वर्णीयांनी कनिष्ठांवर,पुरुषांनी स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले आहेत आणि अन्यायाची हीमालिका अजूनही खंडित झालेली नाही. माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आपलेसुरूच आहे. मात्र शत्रू खूप प्रबळ आहे. त्याला सात जीव आहेत.

प्रतिगामीशक्तींचा सहज पराभव होत नाही. वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या रितीने हाअन्याय सुरू असतो. त्याची कारणमीमांसा बदलत जाते, परिस्थिती बदलतजाते, परंतु अन्याय बदलत नाही. उदा. आधुनिक काळामध्ये इलेक्टा्र ॅनिक्स साधनांद्वारे होणारे शोषण. १४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री आपण नियतीबरोबर ऐतिहासिक करार केला. त्यावेळी अवघे जग झोपी गेले असता, भारत देश मात्र जागा

होता. – आपल्या स्वातंत्र्याच्या जन्मघटिकेची प्रतीक्षा करीत होता. तो क्षणआला आणि स्वातंत्र्याचा आनंद आपण उपभोगला. भारतीय घटना जे स्वातंत्र्य आपण अनुभवले, ते आपल्या भावी पिढ्यांनाही उपभोगता यावे, त्यासाठी आपल्या घटनाकारांनी अथक कष्ट करून २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधानाची निर्मिती पूर्ण केली व २६ जानेवारी १९५० रोजी संविधानाची कार्यवाही सुरू झाली. आपल्या संविधानातील उद्देशिका (प्रीअँबल) म्हणजे एक महाकाव्यच आहे.

भारतीय घटनेने स्वीकारलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुत्व या मूल्यांच्या प्रकाशात आपल्याला नव्या संस्कृतीच्या मंदिराची उभारणी करायची आहे. या चार महान मूल्यांबरोबर भारतीय संविधानाने आपल्याला समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाच्या विरोधाचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक संरक्षणाचा हक्क असे सहा मूलभूत हक्क बहाल केले आहेत. वास्तविक, कोणतीही राज्यसंस्था ा किंवा व्यक्ती, कितीही शक्तिशाली असो, एक मानव म्हणून आपण आईच्या उदरातून हे हक्क घेऊन जन्माला आलेलो आहोत. या हक्कांमुळे प्रत्येक भारतीयाला प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. भारत हे बहुवांशिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक, बहुभाषिक राष्ट्र आहे.

गेली हजारो वर्षे भारताने ही विविधतेतील एकता जपली आहे,जोपासली आहे व भारतीय घटनेनेही ती मान्य केली आहे. विविधतेतीलएकता हीच भारताची जगाला ओळख आहे, तीच आपली अस्मिता आहे.भारतीय संविधानाला एका रथाची उपमा दिली, तर स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व सामाजिक न्याय ही चार मूल्ये त्या रथाची चार चाके आहेत, सहा मूलभूत हक्क त्या रथाचे सहा अश्व आहेत, ‘सेक्युलर’ ह्या इंग्रजी शब्दाला काही जण आक्षेप घेतात. या इंग्रजी शब्दाचा उगम युरोपमध्ये झालेला आहे. तिथे सेक्युलर म्हणजे केवळ इहवाद किं वा धर्मविहीनता असा केला जातो.

आपली सेक्युलर ही कल्पना त्याहून खूप भिन्न आहे. तिचा अर्थ सर्वसमावेशकता म्हणजे सर्वांना समान वागणूक आणि कुठलाही एक धर्म राष्ट्रधर्म नाही, असा आहे. पंडित नेहरूंनी सेक्युलॅरिझमची ही भारतीय संकल्पना जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा स्पष्ट केली आहे.त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सेक्युलॅरिझम (धर्मनिरपेक्षता,सर्वसमावेशकता) हा भारतीय घटनेचा आत्मा आहे. तो रथाचा सारथी आहे. जोपर्यंत सारथी सुरक्षित आहे, तोपर्यंत आपल्या देशाच्या अखंडतेलाकुठलाही धोका नाही, असे मला वाटते. म्हणूनच आपल्या एका हातातआपापल्या धर्माचा धर्मग्रंथ असला, तर दुसऱ्या हातात भारतीय संविधानाचीप्रत असली पाहिजे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली

सर्जनशील व्यक्ती अनेकदा द्रष्टी असते. जे सर्वसामान्यांना दिसत नाही, ते त्यांना दिसत असते. आपले द्रष्टेपण ते कलात्मकरीत्या व्यक्त करीत असतात. त्यांचा लेखन किंवा कलाविष्कार प्रक्षोभक असू शकतो. हे सर्व स्वीकारणे आणि पचविणे परंपरावाद्यांना आणि संस्कृती-संरक्षकांना प्रसंगी अवघड जाते. लोकशाही एक जिवंत वस्तुस्थिती आहे. जिवंत व्यक्तीला आजार होतात, कधी ते प्राणांतिकही ठरतात, त्याचप्रमाणे लोकशाहीलाही आजार होऊ शकतो.

२५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली आणि ती १८ महिने पुरली. उत्तर प्रदेश सरकार विरुद्ध राजनारायण हाखटला अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये चालवला जाऊन १२ जून १९७५रोजी निर्णय दिला गेला. त्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीह्यांच्यावर मतदानामध्ये गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवला गेला आणि सत्तासोडावी लागण्याची शक्यता दिसू लागताच त्यांनी आणीबाणी जाहीर केली. त्याआधी चालवलल्े या भष्ट्राचारविरोधी चळवळीमध्ये लोकनेते जयप्रकाश नारायण ह्यांनी लष्कराला कायदेभंग करण्याचा सल्ला दिला होता. तोही घातक होता.

मूठभर स्वातंत्र्यप्रिय कार्यकर्त्यांनी ‘आणीबाणी’ला निकराने विरोध केला. त्यांना गजांआड जावे लागले. तरीही तुरुंगांच्या भिंतीच्या उंचीपेक्षा त्यांची लोकशाही मूल्यांवरील निष्ठा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह अधिक उंच होता. त्या अठरा महिन्यांच्या कालावधीत अनेक लोकशाहीप्रेमी नागरिकही गजांआड केले गेले होते. त्या कालावधीत त्यांनी लिहिलेले साहित्य नंतर प्रकाशित झाले आणि ते लोकप्रियही झाले.

आणीबाणीच्या कालावधीत माझे वास्तव्य पुण्याला ‘स्नेहसदन’ येथे होते आणि मी ‘साप्ताहिक साधना’मध्ये माझ्या नावाानिशी आणीबाणीविरोधी उपरोधिक पत्रे लिहीत होतो. ‘इंदिराजी, सिंपली ग्रेट!’ ह्या नावाने मी‘साप्तााहि क साधना’कडे एक पत्र पाठवल.े २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. तरी अजूनही पोलिसराज सुरूच होते. ‘साधना’ने २७ मार्चच्या अंकात माझे पत्र प्रसिद्ध केले. त्यानंतर माझ्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागला. (ते पत्र मी माझ्या ‘नाही मी एकला…’ ह्या आत्मचरित्रात (पृष्ठ क्र.११०) प्रसिद्ध केले आहे.)

तेव्हा माझे नाव पुण्यात झाले नव्हते. आणीबाणी उठवण्याच्या जवळपास शेवटच्या काळात पोलिसांना माझा थांग लागला व ‘साधना’मध्ये लिहिणारी ती व्यक्ती मीच आहे का, असे त्यांनी मला विचारले. मी त्यांना सांगितले, ‘‘मी कुठल्याही एका पक्षाचा सदस्य नाही. मी नैतिक मूल्ये मानणारा एक भारतीय आहे. त्या भूमिकेतून मी ते लिहिले आहे. त्याची जी काही शिक्षा असेल, ती भोगण्यास मी तयार आहे…’’ ते मुकाट्याने परत गेले आणि पुन्हा फिरकले नाहीत.

लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो, हादेखील लोकशाहीला फार मोठा धोका आहे. असे जेव्हा जेव्हा घडते, तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रियनागरिकांनी व विशेषत: साहित्यिकांनी व विचारवंतांनी सजग राहून स्पष्टभूमिका घेतली पाहिजे, असे मला वाटते.

२६ नोव्हेंबर १९४९ ला संविधानसभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे समारोपाचे भाषण होऊन त्यादिवशी आपले संविधान संमत झाले. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे २५ नोव्हेंबर १९४९ ला भारतीय संविधानाचे शिल्पकार या शब्दांनी ज्यांचा सार्थ गौरव होतो, त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानसभेत शेवटचे भाषण झाले. त्या भाषणात त्यांनी देशाला सावध केले होते. ते संपूर्ण भाषण अभ्यासनीय आहे. त्याची एक प्रत प्रत्येक स्वातंत्र्यप्रेमीने आपल्या घरी फ्रेम करून लावावी, असे मला वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते. त्यांच्या त्या भाषणातले विचार मी येथे उद््घृत करीत आहे.

‘‘लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, लोकांनी आपले स्वातंत्र्य, कितीही मोठा माणूस असला, तरी त्याच्या

चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की, जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद््ध्वस्तकरण्यासाठी उपयोग करील… विभूतिपूजा ही जगातील इतर कोणत्याहीराजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणातदिसते. राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत:हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरते.’’

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार आपण नेहमीच लक्षात ठेवणे गरजचे आहे. आपण भारतीय स्वभावाने भाबडे आणि भावनाशीलआहोत. राजकीय नेत्यांनी केलेल्या घोषणाबाजीचा आपण डोळे बंद करूनस्वीकार करतो. त्यांचे स्तोम माजवतो. ‘उक्ती आणि कृती’ ह्याच्यात मेळआहे की नाही, हे आपण तपासून पाहिले पाहिजे. म्हणून तर संतांनीआपल्याला सांगितले आहे ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.’

प्रसार-साधनांचा लोकांच्या मनांवर व मतांवर खूप प्रभाव पडत असतो. प्रसिद्ध झालेली प्रत्येक बातमी ही काही लोकांना धर्मवचनाप्रमाणे वाटते, परंतु आज ‘पेड न्यूज’ आणि ‘फेक न्यूज’ असे प्रकार चालू झाले आहेत. कधी-कधी राजकीय पक्षांची भूमिका बातम्यांच्या स्वरूपात अगदी पहिल्या पानावर झळकत असते. हादेखील लोकशाहीवर केलेला एक छुपा हल्ला आहे. तोसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे.

उलटी गंगा

आपल्याकडे संविधानासारखे धन आहे. त्यानुसार आपण आभिाव्यक्तीस्वातंत्र्य अनुभवत आहोत. ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही’ अशा शब्दांतआपण आपलीच पाठ थोपटून घेत आहोत. हे सगळे खरे आहे, परंतु दुर्दैवाने अधूनमधून आपल्याकडे विचारांची गंगा उलट्या दिशेने वाहू लागते.

आपला प्रवास सहिष्णुतेतून असहिष्णुतेकडे, विशालतेकडूनसंकुचितपणाकडे आणि अहिंसेकडून हिंसेकडे होऊ लागतो. काहींच्या भावना अतिशय हळव्या असतात. त्या पटकन दुखावल्या जातात. धर्म, जात, भाषा, प्रांत, ऐतिहासिक व्यक्ती ह्यांच्याविषयी चिकित्सक भाष्य केले की, संबंधित गट उसळून उठतात. कायदा हाती घेतात, प्रसंगी हिस्ं ााचाराचा अवलंब करतात. अहिंसेकडून हिंसेकडे चाललेल्या अशा प्रवासाची अलीकडची उदाहरणे म्हणजे नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरीलंकेश यांच्या झालेल्या भेकड हत्या.

कुणाच्या ताटात काय आहे? कुणाच्या वाटीत काय आहे? ह्यावर एखाद्याचे जगणे किंवा मरणे अवलंबून असावे ही अतिशय दु:खद बाब आहे. काही ठिकाणी जमावाकडून गायीच्या नावाने विशिष्ट समाजातील व्यक्तींच्या हत्या करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर ह्यांनी गायीविषयीची केलेली चिकित्सा अतिशय पुरोगामी आहे. गाय जगली पाहिजे, तसा माणूसही जगला पाहिजे. म्हणून गायीच्या नावाने केलेल्या हत्या हा सावरकरांच्या विचारांचा केलेला पराभव आहे. देशभरात झालेल्या इतर २०८ पत्रकारांच्या हत्यासुद्धा तशा निषेधार्ह आहेत.

तसेच विभूतिपूजा, कर्मठपणा, पोथिनिष्ठा वाढत आहे. त्यामुळे हाडाच्या संशोधकांची कुचंबणा होते. विचारवंतांचा कोंडमारा होतो. विविध प्रकारच्या दडपणांमुळे शास्रशुद्ध संशोधन आणि धर्मचिकित्सा करणे अवघड होते. ही देशाची सांस्कृतिक हानी आहे. निखळ व शास्रशुद्ध संशोधन करण्यासाठी निर्मळ वातावरणाची गरज असते. आपल्याकडे मुळात संशोधक वृत्तीचा हवा तितका विकास

झालेला नाही. संशोधनामुळे नवी आणि निराळी माहिती उपलब्ध होते.त्यामुळे धर्मग्रंथांचे, ऐतिहासिक गोष्टींचे, व्यक्तींचे वस्तुनिष्ठ पुनर्मूल्यांकनकरता येते. याचे उदाहरण म्हणजे प्रभू येशू खिस्त. ते ज्यू धर्मात वाढले. ‘जुना करार’ हा त्याकाळच्या ज्यू लोकांचा धर्मग्रंथ. त्यात अनेक परमसत्ये आहेत. त्याचबरोबर काही आक्षेपार्ह विधानेसुद्धा आहेत. प्रभू येशूंनी त्या विधानांची चिकित्सा केली अन् तिथे जे जे मानवताविरोधी होते, त्यात

बदल के ला आणि तसे शिकवले. जुन्या करारात मोझेसने ‘डोळ्यासाठी डोळा’ अशी शिकवण दिली होती. त्याची पाश्र्वभूमी अशी होती, प्राचीनकाळी एखाद्याच्या अपराधाबद्दल संपूर्ण गावाला सामुदायिक शिक्षा केली जात असे. मोझेसने त्यात बदल केला व ‘एकासाठी एक’ हा नियम केला. प्रभू येशूंनी आणखी एक पाऊल पुढे टाकून शत्रूला क्षमा करून त्याच्यावर प्रेम करण्याचा आदेश दिला.

मोझेसने सांगितले होती की, ‘व्यभिचार करू नये,’ परंतु माणूस हा केवळशरीराने नव्हे तर मनानेदेखील इजा करू शकतो. म्हणून प्रभू येशू म्हणाले,‘जो कोणी एखाद्या स्रीकडे कामूक नजरेने पाहतो, त्याने तिच्याशी आपल्यामनात व्यभिचार केला आहे.’

प्रभू येशूंनी धर्मग्रंथांची प्रतिष्ठापना माणसाच्याअंत:करणात केली. मासिक धर्मासंबंधी ज्यू समाजात प्रचंड सोवळेओवळेहोते. त्याकाळात स्रीला अशुद्ध समजले जात होते. तिला घराबाहेर पडण्याचीमुभा नव्हती. मासिक धर्माने पीडित एक स्री येशूंकडे आली. प्रभू येशूंनी तिला स्पर्श केला आणि साव्े ाळ्या-आव्े ाळ्याचे सर्व नियम धाब्यावर बसवले. त्यामुळे तत्कालीन धर्ममातर्डं ांचा रोष झाला. प्रभू येशूना सुळावर चढवण्यामागे तेही एक कारण होते. थोडक्यात धर्मचिकित्सा करणाऱ्यांना प्रसंगी आपल्या प्राणांचेही मोल मोजावे लागते.

आपला देश बहुधार्मिक आहे. प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ आहेत. त्या धर्मग्रंथांना काळाचा आणि तत्कालीन संस्कृतीचा संदर्भ आहे. धर्मग्रंथांतील काही वचने कालबाह्य होऊ शकतात. त्या वचनामुळे मानवी स्वातंत्र्याचे, प्रतिष्ठेचे आणि हक्कांचे उल्लंघन होऊ शकते. धर्मग्रंथातील अशा वचनांची शास्रशुद्ध चिकित्सा झाली पाहिजे आणि ती चिकित्सा त्या त्या धर्मातील धर्मपंडितानी केलेली उत्तम. दुसऱ्याचे मत विरोधी असले, तरी ते मांडण्याचा त्याचा हक्ककुणी हिरावून घेऊ शकत नाही.

या संदर्भात फ्रेंच विचारवंत व्हॉल्टेअरचे एक वचन उद््बोधक आहे. ते वचन असे आहे की, ‘तू जे बोलतोस, ते मला मान्य नाही, तथापि तुला तुझी भूमिका मांडता यावी म्हणून मी माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत लढत राहीन.’ (I do not agree with what you say. Sir, But I shall guard your right to express your opinion till the last drop of my blood)

स्वत:ची भूमिका पक्की व ठाम असली की, आपल्याला निराळ्या विरोधी मताची भीती वाटत नाही. उलट निराळ्या विचारांचे स्वागत केले जाते. अशा प्रकारचा उदारमतवाद हे प्रगल्भतेचे लक्षण असते. अशा वातावरणातच लोकशाही मूल्यांचे संवर्धन होत असते.

मूलतत्त्ववाद आणि देशाचे खरे प्रश्न

भारतीय घटनेने आपल्याला मूलभूत स्वातंत्र्य बहाल केले आहे. ‘तुम्हांला सत्य कळेल आणि सत्य तुम्हांला बंधमुक्त करील,’ याऐवजी ‘सत्य तुम्हांला कळणार नाही, सत्य तुम्हांला अंधारात ठेवील,’ अशी काही

उद्योगपतींची भूमिका आहे. त्या भूमिकेमुळे प्रसारमाध्यमे आपल्या कह्यातठेवता येतात. सत्य सांगण्याचा, गैरकृत्ये उघड करणाऱ्या वाहिन्यांच्यापत्रकारांचा आवाज दडपला जातो. त्या वाहिन्या त्यांना सोडाव्या लागतातकिंवा अशा निर्भिड पत्रकारांना साम, दाम, दंड, भेद वापरून बोलायला बंद केले जाते. कधी आपल्याला प्रश्न पडतो, आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत का? आत्माविष्कार करण्यासाठी कलाकार, पत्रकार व साहित्यिक मुक्त आहेत का? एक प्रकारच्या अदृश्य दडपणाखाली तर आपण वावरत नाही ना? त्यावेळेस जर्मन कवी मार्टिन न्यूमायर ह्यांनी लिहिलेली कविता तत्कालीन परिस्थितीवर विदारक प्रकाश टाकते.

जर्मनीमध्ये नाझी पहिल्यांदा कम्युनिस्टांवर येऊन थडकल,े धडकले

मी कम्युनिस्ट नव्हतो म्हणून गप्प बसलो.

त्यानंतर ते ज्यू लोकांवर येऊन घसरले

साहजिकच, ज्यू नव्हतो ना मी मग गप्पच बसलो.

नंतर कर्मचारी संघटनांवर ते अगदी तुटून पडले

आपण म्हणजे, मी ‘ब्र’सुद्धा काढला नाही.

आपला कर्मचारी संघटनाशी काय संबंध?

ते मग कॅथोलिकांच्या पाठीस हात धुवून लागले

अगदी… तरीपण मी काहीच म्हटलं नाही

मी प्रोटेस्टंट होतो

अखेरीस…

म्हणजे आता ते माझ्या मागे लागले आहेत

आणि काय

ह्यावेळेस अवाज उठविण्यासाठी

हाळी देण्यासाठी माझ्यासाठी काय

पण अगदी कुणासाठी कुणीच उरलं नाही…?

मूलतत्त्ववादाने जगभर आपले विद्रूप डोके वर काढले आहे आणि आपल्या ऑक्टोपसी पंजात सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा संकोच केला जात आहे. समाजात पद्धतशीरपणे उन्माद निर्माण केला जातो. भावना भडकावल्याजातात. हिंसाचाराची प्रकरणे घडतात आणि ‘क्रिया-प्रतिक्रिया’ हा न्यायलावून हिंसेचे समर्थन केले जाते. हे सर्व आपण प्रत्यक्ष पाहात आहोत.‘अहिंसा परमो धर्म:’ ही आपल्या देशाची शिकवण आहे. संत तुकारामम्हणतात, ‘कुणाही जिवाचा न घडो मत्सर.’ नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत प्रत्येकाला जगण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे.

‘वाऱ्याची पेरणी करा आणि झंझावाताची कापणी करा’ (Saw the wind & reap the Whirlwind) अशी ‘बायबल’मध्ये एक म्हण आहे. म्हणून प्रभू येशूने क्षमाधर्माचा पुरस्कारकेला. हिटलरने द्वेषाच्या विखाराची पेरणी केली आणि त्याने हिंसेचे उदंडपीक घेतले. ‘आर्य वंश सर्वश्रेष्ठ’ हा विचार त्याने मांडला. तो विचारतत्कालीन जर्मन तरुणांना भावला. हिटलरने जर्मनी आणि युरोपच्या इतरदेशांमध्ये मिळूनमध्ये सुमारे साठ लाख ज्यूंचा संहार केला.

एली वायझेलआणि व्हिक्टर फ्रँकेल यांच्यासारख्या काही विचारवंतांनी त्या नरकवासातूनबाहेर पडल्यावर छळछावण्यांतील क्रौर्याची वर्णने आपापल्या ग्रंथात केलीआहेत. ती वाचून आपल्या अंगावर शहारे येतात. हिटलरच्या काळी बहुसंख्य जर्मन विचारवंत गप्प बसले, परंतु डिआट्रिच बॉनहॉफर, जेम्स डेल्प आणि इतर काहीजण मात्र हिटलरच्या विरोधात उभे राहिले. त्याबद्दल त्यांना आपल्या प्राणांची किंमत मोजावी लागली… प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या कुणीही हिटलरच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करू शकत नाही. तो राक्षसीपणा होईल. ज्यांना हिटलरचे तत्वज्ञान मान्य आहे, ते माणुसकीचे मारेकरी असतात. विचारवंतांची निष्क्रियता हा विसाव्या शतकावरीलएक लााजिरवाणा कलंक आहे.

रोगाचे अचूक निदान झाले की, त्यावर जालीम इलाज करता येतात. आजच्या घडीला आपल्या देशाचे खरे शत्रू दुसरा धर्म, दुसरी जात, दुसरा देश नाही तर बेकारी, बरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अतिवृष्टी,अनावृष्टी आणि दुष्काळ, ग्रामीण-शहरी ह्यांच्यातील वाढलेली दरी, धर्मांधताव त्यामुळे होणारे उत्पात इ. आहेत. आर्थिक क्षेत्रातील घसरण, बंद होतचाललेले उद्योगधंदे, लघुउद्योगांवर आलेली संक्रांत, त्यामुळे निर्माण झालेलेबेकारांचे तांडे व त्यांचे उद्ध्वस्त होत चाललेले संसार ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे समाजाच्या सहनशीलतेची हद्द होत आहे.

कवी गिरिजाकुमार माथुर म्हणतात,

सब्र करने की हद भी

एक दिन टूट जाती है

जब कुछ नहीं होता

तब क्रांति हो जाती है

आपले राज्यकर्ते त्याची वाट पाहात आहेत काय? सैतानाप्रमाणे क्रांती आपल्याच लेकरांचा घास घेत असते, हे आपण लक्षात ठेवू या. सत्य म्हणजे जणू एक तळपती तलवार असते. ते पवित्र असते. सत्य हीच महान साहित्यिकांची जीवनप्रेरणा असते. त्यामुळे अनेकांना विशेषत: लोकशाहीच्या विरोधकांना सत्य मानवत नाही आणि पचतही नाही.

साहित्याच्या निर्मितीसाठी लेखकावर कुठल्याही प्रकारची बंधने नकोत. जेव्हा त्याच्यावर बंधने येतात, तेव्हा त्याचे लेखन पोपटपंची ठरण्याची शक्यता जास्त असते. लेखकाला हुजऱ्याची भूमिका पार पाडायची नसते; तर त्याला द्रष्ट्याच्या भूमिकेत जावे लागते. त्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नितांत आवश्यकता आहे. मातृभाषा हे आपल्यासाठी सहजसोपे असे अभिव्यक्तीचे साधन आहे.
(क्रमश:)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: 'साहित्यिकांनी भूमिका घेतली पाहिजे' (१)
'साहित्यिकांनी भूमिका घेतली पाहिजे' (१)
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQAZGPBCTBK3cv-x1P35rOdGPZKaeiPdXXB4mNZTuIoAIEQVf66WSlEitoETFIj37iiQU3cYha9i7hkKdgapDIUU66rdHm6Lr-7MYiyoTl7mQSfdYFx1t8thAU9O0JO75khi4x1DogSnNF/s640/81874671_161325705207525_8982760590179041280_o.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQAZGPBCTBK3cv-x1P35rOdGPZKaeiPdXXB4mNZTuIoAIEQVf66WSlEitoETFIj37iiQU3cYha9i7hkKdgapDIUU66rdHm6Lr-7MYiyoTl7mQSfdYFx1t8thAU9O0JO75khi4x1DogSnNF/s72-c/81874671_161325705207525_8982760590179041280_o.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/01/blog-post_11.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/01/blog-post_11.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content