काफ़िराना : सांप्रदायिक व धर्मांधतेला नेमस्त उत्तर

‘काफ़िराना’ नामक कादंबरी आजच्या धर्मांध राजकारणाचे प्रतिनिधित्व करते. सांप्रदायिकता, हिंदुत्ववादी राजकीय विचार आणि जातीय संघर्ष कादंबरीचं मध्यवर्ती सूत्र आहे.

१९९३ साली झालेल्या मुंबई दंगलीपासून कादंबरी सुरू होते आणि २०१४च्या हिंदुत्वप्रणित राजकीय वादळानंतर संपते. सबंध तीन दशकांचा सामाजिक, राजकीय आणि सांप्रदायिक पट लेखकाने एकुण १५५ पानात रेखाटला आहे.

लेखक गफ़्फार अत्तार वयाने तरुण आहेत, त्यामुळे साहजिक त्यांनी समकाल रेखाटताना आपलं अनुभवविश्व व निरिक्षणाची मांडणी एक विचारसूत्र म्हणून कादंबरीमध्ये समायोजित केलेली आढळते. कादंबरीचा नायक ‘हमीद तांबे’ तरुण असून कोकणी मुस्लिम आहे. त्याचा जन्म मुंबईत झाला.  त्यावेळी बाबरी विध्वंसानंतरची दंगल मुंबईत पेटली होती. नातवाला पाहण्यासाठी जात असताना  हिंदुत्ववादी धर्मांध गुंडांच्या जमावाने आजोबाला लक्ष्य केलं, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

'जन्मताच आजोबाला खाल्लस', हा जीवघेणा टोमणा तो सतत ऐकत असतो. त्याच टोमण्यात तो मोठा होतो. खाता-झोपता प्रत्येक वेळी दादी सुलताना बेगम त्याला माझ्या खाविंदला तूच मारलं म्हणत सतत दूषणे देत असते. त्यातून नायक आत्मग्लानीने भरलेला, नैराश्यवादी, हिंसक, उद्दाम युवक होण्याऐवजी नेमस्त व मवाळ होत जातो. अर्थात आसपासची परिस्थितीत तो आपला संयम न ढळू देता शांत राहतो. हेच शांत व संयमी असणं नायकाचं वैशिष्ट्य आहे.



वाचा : मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे तीन दशकं

हमीद तसा सामजिकदृष्या बंडखोर वृत्तीचा नायक आहे. कादंबरीत अनेक प्रसंगी त्याची विद्रोह पुढे येते. त्याचे अब्बू डॉ. रशीद व अम्मी डॉ. सलमा रत्नागिरीतील प्रतिष्ठित डॉक्टर आहेत. त्यांना वाटतं की एकुलत्या एक मुलाने आपला व्यवसाय पुढे नेऊन त्यात नेत्रदिपक प्रगती करावी. परंतु हमीद मात्र आई-वडिलांच्या इच्छेला नुसता लाथाडतच नाही तर लोककल्याणाची भूमिका घेऊन वेगळा मार्ग स्वीकारतो.

कादंबरी उत्तरोत्तर मराठी मुस्लिमांच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनव्यवहाराची मांडणी करत पुढे सरकते. शिवाय भांडवली, सांप्रदायिक, धर्मांध व हिंदुवादी राजकीय रेट्यात मुसलमानांचा राजकीय व सामाजिक मानस घडवण्याच्या प्रक्रियेचीदेखील दखल घेत राहते. मुस्लिम समुदाय, त्यांची प्रथा, परंपरा, मुस्लिम संस्कृती, आध्यात्म, इस्लाम धर्म, धार्मिक तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, प्रत्यक्ष व्यवहार, पंथीय भेदाभेद इत्यादीची समर्पक चर्चा लेखक ठिकठिकाणी करतात.

नायक यूपीएससीचा स्पर्धक असून विचाराने बराचसा लिबरल आहे. फारसा धार्मिक नसला तरी इस्लामच्या मूल्यनिष्ठांची तो व्यवस्थित जपवणूक करतो. शिवाय आपली धार्मिकता व धर्मविचारांचं प्रदर्शन करणे त्याला आवडत नाही.

राष्ट्रसेवा दलाच्या शाखेत त्याचं वैचारिक संगोपन झालं आहे. स्वतंत्र अशी एक विचारसरणी त्याने स्वीकारली आहे. भूमिकेत स्पष्टता आहे. मुस्लिमांना समजून घेण्याच्या बाबतीत तो इतरांचा टीकात्मक दृष्टिकोन स्वीकारत नाही. मुस्लिम जगणे त्याला माहित असल्याने तो प्रत्येकवेळी राजकीय मतांना सामाजिकतेच्या तुलनेत तपासतो. त्यामुळेच त्याची राजकीय व सामाजिक दृष्टी तत्कालीन समाजवाद्यांपेक्षा असंख्य पटीने प्रगल्भ आहे. 

भारतीय आणि मुसलमानांचे मराठी आकलन राजकीय व धार्मिकदृष्ट्या न करता सांस्कृतिक व सामाजिकदृष्ट्या करतो. आपल्या मित्रमंडळींनादेखील हेच आकलन पटवून देत असतो. त्याचे अनेक गैरमुस्लिम मित्रांशी सलोख्याचे संबंध आहेत. ते त्याच्या घरी ये-जा करीत असतात. त्याची ही दोस्तमंडळी जवळपासच्या हिंदूंना मुसलमानांना समाज म्हणून समजून घेण्याची दृष्टी देतात.

प्रशासकीय सेवेतून मिळालेली अधिकार व बळातून सामान्य जनतेची सेवा होऊ शकते, असा आदर्शवाद तो आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. त्यासाठी वाट्टेल तेवढा संघर्ष करण्याची त्याची तयारी आहे. त्यामुळे तो वडिलांनी केलेल्या एमबीबीएसच्या अॅडमिशनला लाथाडून आपली कामना पूर्ण करण्याच्या प्रवासाच्या दिशेने मुंबईत दाखल होतो. प्रतिष्ठित संस्थेमधून उच्चशिक्षण घेतो व पुढे दिल्लीला जाऊन स्वतःला स्पर्धा परीक्षांच्या कमोडिटी बाजारात दाखल करतो.

वाचा : आयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल!

वाचा : ‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीला मुस्लिमद्वेषी विरोध

वाचा : लव्ह जिहाद : हिंदुत्ववाद्यांची नसती उठाठेव !


दिल्लीतील स्पर्धा परीक्षांचं मार्केट असलेल्या मुखर्जी नगर परिसराचं उत्तम रेखाटन लेखक करतात. विविध परीक्षांचे विद्यार्थी, त्यांच्यातील स्पर्धा, खोड, सवय, दैनंदिन चर्चाविश्व, लोकशाहीकडे बघण्याची दृष्टी, खासगीपण, मित्र-मंडळी, टीकात्मक दृष्टिकोन, अवांतर वाचन, राजकीय चर्चा, सामाजिक व वैचारिक जडणघडण इत्यादींचा विस्तृत व वैचारिक परामर्श लेखक कादंबरीत मांडतात.

ज्यावेळी तो दिल्लीत दाखल होतो, त्यावेळी योगायोगाने रामलीला मैदानावर रामदेव बाबाचं आंदोलन सुरू असतं. लेखक तटस्थ राहून ह्या आंदोलनाचं रेखाटन करतात. आंदोलनाचं सूक्ष्म निरीक्षण लेखक आपल्या अमोघ भाषेत मांडत जातात. अन्ना, रामदेव, केजरीवाल, किरण बेदी, इत्यादी आंदोलकांची बलस्थाने तथा व्यक्तिगत दोषांचे मूल्यमापनदेखील लेखक करतो. त्यातील लक्ष्यकेंद्र, प्रचार, मीडियाचा प्रपोगंडा, छुप्या शक्ती, जनसमर्थन, सामील होत असलेल्या तरुणांची मानसिकता, प्रोटेस्ट टूरिज्म यांचं सूक्ष्म निरीक्षण लेखक मांडतात. वेळप्रसंगी उहासात्मक शैलीत सामाजिक व राजकीय परिप्रेक्ष्यात टरदेखील उडवतात.

सामाजिक आंदोलनं जिगरी दोस्त मंडळी व हक्काचं प्रेम मिळण्याची महत्त्वाची केंद्रे असतात, असं लेखक अप्रत्यक्षपणे सांगून जातात. इथंच नायकाला आपली प्रेयसी सकिना मिळते. पुढे कांदबरी प्रेम व त्यातील आत्मीय नाते खुलवत पुढे सरकते. लग्नासाठी नायक वैचारिकतेशी तडजोड स्वीकारून परिस्थितीला शरण जाण्याची तयारी दर्शवतो. परंतु पुढे काही अहसनीय घटक येतात. ज्यामुळे त्याचं लग्न होऊ शकत नाही. 

कादंबरीच्या मधल्या टप्प्यात अनेक नाटकीय प्रसंग नायकाच्या आयुष्यात घडतात. ज्यात मैत्री, वैरभाव, स्वहित, वैचारिक घुसळण, आत्ममंथन, अस्तित्वाचा संघर्ष, अस्मितेचे विषय, समाजिक हिनता इत्यादी घटक प्रसंगानुसार घडत जातात. शेवटच्या टप्प्यात प्रेम मिळवण्याासठी नायकाची धडपड लेखक टिपतात. स्वाभाविक ह्या मार्गातील असंख्य अडथडे येतात. सर्वांना पार करून तो उभा राहतो. परंतु समाज व त्याची कथित नैतिकतेचं भय त्यात सांप्रदायिक शक्तींचा शिरकाव करतात. त्यातून नायकाचं सगळंच आयुष्य उद्ध्वस्त होते.

परंतु नायक निराश, हताश व हतबल न होता आत्ममंथन करतो. स्वत:ला उद्ध्वस्त करून घेणे किंवा आत्महत्या सारखा पर्याय तो स्वीकारत नाही तर स्वप्नांना पाठबळ देण्याचा निर्धार करतो. यूपीएससी क्रॅक करून प्रतिष्ठित अधिकारी होण्यापेक्षा समाजसेवा करण्याचं व्रत स्वीकारतो.

लेखक कादंबरीत टप्याटप्याने आपल्या जवळपासचा समकाल रेखाटत जातात. अर्थातच नायकाचा संघर्ष त्यात अभिप्रेत आहेच. परंपरावाद, ब्राह्मण्यवाद, हिंदुत्व, बजरंग दल, भगव्या गुंडांची बदमाशी, तथाकथित संस्कृतीरक्षकांची दादागिरी इत्यादी घटक वेळोवेळी कादंबरीत नैसर्गिकरीत्या येत राहते.

नायकाचं स्वप्न आहे की धर्म विरहित समाज निर्माण व्हावा. त्यात जात, पंथ, वर्ण, वंश, धर्माचा दखल व्यक्तिगत व खासगी पातळीवर असावा. किंबहुना त्यापलीकडे सर्वांची ओळख देश, राष्ट्र व केवळ नागरिक म्हणून असावी.




नायकाचं स्वप्न आहे की जातीय-धर्मीय संघर्षविरहित समाजाची निर्मिती करावी. ज्यात जात-पात, वर्ण नसतील. शिवाय धर्मीय आधारावर भेदाभेदाचे अस्तित्वही असणार नही. हिंदू-मुस्लिम दंगली किंवा अन्य धार्मिक संघर्ष असता कामा नये. शिवाय प्रत्येकांना आपले मानवी हक्कांचं संरक्षण, जतन व संवर्धन करता येईल, अशी सार्वभौमिक भौगोलिक क्षेत्र असावं, ह्या धोरणासाठी हमीद तांबे कार्यतत्पर होतो.

यूपीएससीत यश प्राप्त केल्यानंतर नायक प्रशासकीय नोकरी स्वीकारण्याऐवजी जात-धर्म विरहित समाजाची संकल्पना प्रत्यक्षात राबवण्याची कार्यप्रणाली अंमलात आणतो. त्या परिसरात धर्म बाजूला ठेवलेला प्रत्येक व्यक्ती केवळ ‘मनुष्य’ म्हणून प्रवेश करू शकतो. सुजलाम-सुफलाम असा समाज तो निर्माण करण्यात यशस्वीदेखील होतो. परंतु पुन्हा एकदा धर्मांध-जातीय शक्ती त्यात खोडा घालतात; असा हा एकूण ‘काफ़िराना’ कादंबरीचा पट आहे.

गफ़्फार आतार पुण्यातील जीएसटी भवनमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेले गफ़्फार यूपीएससीचे काही काळ स्पर्धकदेखील होते. त्यामुळे त्या क्षेत्रातील अनेक बारकावे व निरिक्षणे त्यांनी उत्तमरित्या नोंदविले आहेत.

कादंबरीला सद्यस्थितीतील हिंदुवादी राजकीय धर्मांधतेचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून पाहता येऊ शकेल. अर्थातच काफ़िराना कादंबरी समकालाच्या भीषण वास्तवाशी दोन हात करणारी एक प्रगल्भ कलाकृती आहे. संबंधित कांदबरी केवळ प्रश्न मांडत नाही तर त्यातून उत्तरे शोधण्याचा स्वतंत्र विचारदेखील वाचकांसमोर ठेवते. शिवाय सकारात्मक उर्जा व संघर्ष करण्याची तथा सांप्रदायिक वातवरणाशी तोंड देण्याची जिद्द कादंबरीत अंतर्भूत आहे.

हिंदीतील मान्यवर प्रकाशन संस्था हिंदी युग्मने त्याचे प्रकाशन केलं आहे. अल्पावधीत ॲमेझॉनच्या बेस्ट सेलर सूचीत ‘काफ़िराना’ समाविष्ट झालेली आहे. सांप्रदायिक वातावरणातून सकारात्मक दिशेने पाऊल टाकण्याच्या दृष्टीने कांदबरी उत्तम मार्गदर्शक ठरू शकते.


###

पुस्तकाचे नाव : काफ़िराना
प्रकार : कादंबरी
भाषा : हिंदोसितानी (हिंदी)
पाने : १५५
किंमत : १९९
प्रकाशक : हिंदी युग्म

(पूर्वप्रकाशन: साप्ताहिक साधना, २३ ते २८ मे २०२२)
-----
कलीम अजीम, पुणे
मेल- kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,43,इस्लाम,38,किताब,18,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,276,व्यक्ती,7,संकलन,62,समाज,234,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: काफ़िराना : सांप्रदायिक व धर्मांधतेला नेमस्त उत्तर
काफ़िराना : सांप्रदायिक व धर्मांधतेला नेमस्त उत्तर
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgSZaGEk9xx3oZfqJE6FUHs__vjtha0iU5TqEaCrcF-ngoWedPs0EWYC-pjtNtzPlJBaVxsUvZZJM0ZX-bDAWiedCex9VHVqJPK6pfIAdoeXJ1xtTzrQoib7LIp-CXeQfwyv8ADd3UoAPY_H54wOB67aidUmZPAKJMyShllGZLQf0a0GhrtLVWG8aJ5jA/w640-h400/IMG_20220203_191236.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgSZaGEk9xx3oZfqJE6FUHs__vjtha0iU5TqEaCrcF-ngoWedPs0EWYC-pjtNtzPlJBaVxsUvZZJM0ZX-bDAWiedCex9VHVqJPK6pfIAdoeXJ1xtTzrQoib7LIp-CXeQfwyv8ADd3UoAPY_H54wOB67aidUmZPAKJMyShllGZLQf0a0GhrtLVWG8aJ5jA/s72-w640-c-h400/IMG_20220203_191236.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2022/04/blog-post_19.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2022/04/blog-post_19.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content