स्थलांतर : जगणे समृद्ध करणारा अनुभव

र्वप्रथम, अंबाजोगाईच्या दहाव्या बहुभाषिक साहित्य संमेलनात उपस्थित मान्यवर मंडळी, श्रोते व सहभागी वक्त्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

आयोजकांनी मला इथं बोलावून विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल, सर्वांचे आभार.. गावचं साहित्य संमेलन, त्यात स्थलांतरहा विषय म्हणजे मला जरासं नॉस्टेल्जिक होतंय.

अंबाजोगाई टू व्हाया औरंगाबाद पुणे, मग पुणे टू मुंबई आणि आता पुन्हा पुण्याचं अस्थायी नागरिकत्व!असा सबंध १० ते १२ वर्षांचा हा प्रवास आहे. या यात्रेत अनेक नवीन घटकांचा सहप्रवासी झालो. भाषा, संस्कृती, बोली, खाद्य, वस्त्रे, राहणीमान इत्यादी दृष्यमय आव्हाने पुढ्यात होती. तर अदृष्ट्य स्वरूपातील तर अनंत होती व आहेत. ज्यात स्पर्धा, संघर्ष, न्यूनगंड, डावलणे, सांस्कृतिक वर्चस्ववाद, वृत्ती-प्रवृत्ती शिवाय बरच काही..

प्रारंभी मी अस्थायी नागरिकत्वअसा शब्दप्रयोग केला. त्या मागचं माझं निरिक्षण असं की, स्थलांतरितांना शहरे स्वीकारत नाहीत किंवा स्थलांतरित शहरांना कधीच स्वीकारत नाही. इथं महात्मा गांधींचं एक वाक्य आठवतं, खेड्याकडे चला! तर आंबेडकर म्हणायचे शहराकडे कूच करा.. दोन्ही वाक्यातलं मर्म एकच आहे. गांधीचं वाक्य सर्वसामावेशक विकास या अनुषंगाने आहे तर आंबेडकरही त्याच अंगाने बोलतात. पण मला त्यात आंबेडकरांचं वाक्य अधिक प्रभावी व दूरदृष्टीचं वाटतं. आंबेडकरांनी व्यक्तिगत, सामूहिक, कौटुंबिक विकासाबरोबर सांस्कृतिक विकासही महत्त्वाचा मानला. आंबेडकरांच्या वाक्यातील मथितार्थ मी सांस्कृतिक अंगाने घेतो. त्यांच्या काळातील गावे आणि आजची गावं भौगोलिक व मानसिकतेच्या बाबतीत फारच बदलेली जाणवतात. पण आंबेडकरांनी व्यक्त केलेली भिती मात्र आजही कायम आहे.

या दोन्ही महामानवाची वाक्ये मी वेगळ्या अर्थाने अंगिकारली आहेत. मेट्रो शहरात स्थायिक राहून मूळाशी नाळ जोडून राहतेवेळी मला गांधी जवळचे वाटतात. तर सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उत्थानासाठी मला आंबेडकर भावतात. जेव्हा तुम्ही स्थलांतरित असता त्यातही शोषित, वंचित कॅटेगरीतील असता, (जात अर्थाने नव्हे!) त्यावेळी तुमचा आनंद, वेदना व संवेदना या सारख्याच असतात, मग तो व्यक्ती कुठल्याही, धर्म-जाती समुदायातील असो. त्याच्या वेदना या अबोल व तेवढ्याच बंडखोर असतात.

वाचा : मंटो आणि अब्बास यांच्या उर्दू कथांमध्ये वृद्धांचे चित्रण

वाचा : कौतुक सोहळा मुंबई व्हाया अंबाजोगाई

वाचा : बालपणीचे मामाचे गाव कुठे हरवले?

मी ऑगस्ट २००९ साली आंबाजोगाई सोडून शिक्षणासाठी औरंगाबादला स्थलांतरित झालो. त्यावेळी भविष्यातील काहीच रेखीव मांडणी करून ठेवलेली नव्हती. इथं व्यवस्थित व्यवसाय होता, कामधंदा व पैसा-पानी सांभाळून होतो. पण नवीन आव्हाने पेलण्याची किंवा त्याच्याशी दोन होत करण्याची एक सुप्त इच्छा डोक्यात घर करून असायची. जेव्हा मंडी बाजारातील साहित्य निकेतन किंवा नगर परिषदेच्या ग्रंथालयात बसून वृत्तपत्रे, साप्ताहिके वाचत त्यावेळी विशिष्ट मजकूरही वाचून सुप्त भावना उचंबळून येत. त्यावेळी बड्या शहराची नावे, तिथले रस्ते, इंन्स्टिट्यूशन्स, कॉलेज, विद्यापीठे, व्यक्ती मला खुणावत. रात्री जोपताना किंवा रस्त्यावरून पायी घरी जाताना मी विचार करू लागायचो, आपणही गाव सोडून शहरात गेलं पाहिजे. भरपूर पैसा कमावला पाहिजे, मान-सन्मान मिळवला पाहिजे, ऐटित राहिलं पाहिजे. अर्थात त्यावेळी येणारे विचार चंगळवादी दृष्टिकानातून होते. पण आज जेव्हा मी जेव्हा बड्या शहराकडे चला हा विचार करतो, त्यावेळी आर्थिक विकास हा दूय्यम तर सांस्कृतिक विकास हा अधिक महत्त्वाचा वाटतो.

इथं अमर हबीब यांचं एक विधान मला आठवते. त्यांचा हा कोट मी नेहमी स्मरणात ठेवतो. एकदा ते म्हणाले होते, “गावाला मोठं करणारी माणसे असतात. त्या माणसांमुळे गाव मोठं होत जाते, त्याची ओळख बनत राहते, अशाच माणसामुळे गाव ओळखलं जातं. त्यामुळे माणसं घडवली पाहिजे.

खरंच अंबाजोगाईने व्यक्तींची अनेक इन्स्टिट्यूटशन्स निर्माण केली आहेत. गेल्या सात-आठ दशकात गावात अनेक मोठी माणसंहोऊन गेली. त्यांच्यामुळे गावाची ओळख महाराष्ट्राला झाली. या साहित्य संमेलनाची थीम अनिवासी अंबाजोगाईकर अशी आहे. त्यात जोडलेली मंडळी राज्य व देशभरात अनेक महत्त्वाच्या पदावर विराजमान आहेत. ज्यात न्यायाधीश, विधीज्ञ, विविध प्रशासकीय हुद्यावर, अभियंता, ब्युरोक्रट्स, चित्रपट अभिनेते, चित्रकार, कलावंत, कथाकार, तंत्रज्ञ, संपादक, पत्रकार, लेखक, विचारवंत, भाष्यकार, राजकीय नेतृत्व, शिक्षण संम्राट, संस्थाचालक, स्वयंसेवी संस्थाचं जाळं विणणारे आदींचा गोतावळा जमला आहे. शिवाय गावात अनेक व्यक्ती स्वतः संस्थाने म्हणून उभी आहेत. त्यांच्या रचनात्मक कार्यामुळे अंबाजोगाईची ओळख मनोहर अंबानगरी अशी झालेली आहे.

दासोपंत, आद्यकवी मुकुंदराज, स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, बेथुजी गुरुजी, आरडी देशपांडे, राम मुकादम, गंगाधरअप्पा बुरांडे... तर आमच्या या समकाळात द्वारकादास लोहिया, सुरेश खुरसाळे, नानासाहेब गाठाड, रंगनाथ तिवारी, चित्रकार पोखरकर, बालाजी सुतार, अमर हबीब इत्यादी व्यक्ती-संस्थांने अंबाजोगाईची सांस्कृतिक ओळख टिकवून आहेत. अशा या मनोहर अंबा नगरीत आम्ही पिढीजात आहोत. त्यामुळे कुटुंब, आई-वडिल आणि गावाला घेऊन ज्यावेळी मी अति भावनिक होत, त्यावेळी वाटत सगळं काही सोडावं आणि पुन्हा स्थायी अंबाजोगाईकर व्हावं. दिल और दिमाग की लडाई मेंमेंदू माझा भावनिक पराभव घडवतो. अर्थात मन म्हणतं की, आपला गाव बरा.. पण मेंदू शातीर होतो..

पुण्यात अंबाजोगाईकर अशी ओळख सांगताच समोरचा माणूस पटकन म्हणतो, म्हणजे तुम्ही प्रमोद महाजन, विमल मुंदडा, अमर हबीब, बालाजी सुतार, दगडू लोमटे यांच्या गावचे का? प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी ही नावे कदाचित वेगळी असू शकतात. पण त्या-त्या समकाळात जी माणसे सांस्कृतिक अर्थाने मोठी होत जातात, त्यांच्या नावाने गावाची ओळख बनत जाते, हे मात्र खरं!

पत्रकारितेची पदवी धारण करून शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास साधावा, अशी माझी धारणा होती. त्यामुळे अंबाजोगाई सोडून औरंगाबादला गेलो. शिक्षणासाठी विद्यापीठात पोहोचणारा खानदानातला एकमेव माणूस झालो. स्वाभाविक तोही मराठवाड्याचाच भाग आहे. जन्मगाव सोडलं की, तुमच्यासाठी सगळं काही नवीन असते. बामू विद्यापीठ मेट्रोपॉलिटीन आहे. तिथं अनेक परदेशातील, राज्यातील व देशातील विद्यार्थ्यांची मला सांथसंगत लाभली.

माझं मराठी तसं चांगलं, म्हणजे मुसलमान मोहल्ल्याच्या तुलनेत. पण त्यावेळी व आताही माझ्या मोठ्या ताईसारखं मराठी मला बोलता येत नाही. कौतुक असं की, आमच्या पत्रकारितेच्या विभागात विदर्भ, खानदेशची विद्यार्थी होतं, पहिल्याच दिवशी त्यांनी मला म्हटलं, किती छान बोलतो रे मराठी! म्हणजे मुस्लिम असूनही! असं त्यांना म्हणायचं नव्हतं. पुढे एकजण म्हणाला, आम्ही वऱ्हाडी जास्त बोलतो, छान छान मराठी आम्हाला येत नाही, तू फर्राटेदारपणे बोलतो.. असंच काही..

मराठी भाषकांचा सहवासात मी सराईत झालो. त्यात अवांतर वाचनाने बऱ्यापैकी मराठीला कवेत घेतलं. तीन वर्षे सरली.. पुढे २०१२ साली पुणे विद्यापीठात गेलो, तसं पुन्हा एकदा प्रमाण मराठीने मनस्ताप घडवला. म्हणजे इथं सांस्कृतिक वर्चस्ववाद मानगुटीवर बसला. पुणेरी मराठी म्हणजे सदाशिव पेठी कौतुके.. त्यातही आमच्या विभागप्रमुख बर्वे बाई.. त्यात त्या मीडिया लँग्वेज शिकवत.. त्यातही शुद्ध व अशुद्ध, प्रमाणभाषा-बोलीभाषा इत्यादींविषयी अधिक आग्रही... म्हणजे आमच्यासाठी ठणठण गोपाळ..

वाचा : आठवणींचं फास्ट फॉरवर्डिंग होईल का?


पहिल्याच आठवड्यात आमच्या प्रादेशिक अस्मितांचा चर्चांचं फड रंगलं. आम्ही भाषिक विद्रोह केला, प्रमाण भाषा का स्वीकारावी, आमची बोली आम्हाला प्यारी, शुद्धलेखन आम्ही फाट्यावर मारतो. बरंच काही घडलं. पण खासगी बैठकीत. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बर्वे बाईंच्या तासाला बसून भाषिक अवगुंठन सहन करत होतो.

मीडियाची भाषा म्हणजे प्रमाण असावी, कारण ती प्रत्येकांसाठी युनिफॉर्म म्हणजे सारखीच असली पाहिजे. कारण त्याचं वैशिष्ट्य आहे, आणि जपलं पाहिजे... बरंच काही प्राध्यापक सांगायचे...  कधी वाटायचं, सर बरोबर बोलत आहेत.. बातमी कळली पाहिजे.. न! त्यामुळे एकसारखी भाषा असावी... असो. म्हणजे भाषिक मला न्यूनगंड आला.... त्यामुळे आधीच अबोल होतो, आता तर तोंड बंदच झालं.

पुणे विद्यापीठात नॉन पुणेसाठी पाच टक्क्यांचा कोटा.. उर्विरत पाच टक्के नॅशनल कोटा.. आणि उरलेले सगळे बाकी होम यूनिव्हर्सिटी... आमची चाळीस जणांची बॅच.. त्यात होम युनिव्हर्सिटी वाले स्थानिक गोखले, कुलकर्णी, देशपांडे, देशमुखांचा भरणा.. म्हणजे त्यातले बऱ्यापैकी कॉन्व्हेंट वाले.. त्यांच्या भाषिक रुबाब तर होताच पण सांस्कृतिक माजही होता. तू असा कसा बोलतो रे, नाकातून आवाज काढत, शेलक्या स्वरात बोलणारे होते. अशांसमोर आपली मराठवाडी ग्रामीण बोली कुठे, कशाला फजिती म्हणून मी गप्प... माझ्यासारखे गप्प राहणारे बरेच होते. पण हळूहळू आम्ही सरावलो. नंतर सराईत झालो. पुढे सांस्कृतिक कुरघोड्यांना फाट्यावर मारलं... शुद्धी-अशुद्धीवर वाद-विवाद घडविला... कारण आमच्याकडे बुद्धिमत्ता, कौशल्य, अभ्यासाची बैठक इत्यादी बरंच काही काही होतं.. सो कॉल्ड प्रमाण भाषा येत नाही म्हणून सुरुवातीचे तीन-चार महिने इन्फॅरिटी कॉम्प्लेक्स आला.. पण नंतर सगळं काही अंगावर घेऊ लागलो. भाषेच्या शुद्धीकरणाचा घाट आम्हीही हाणून पाडला..

विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मुंबई, ठाणे आदी भागातील काहीजण जरा शातीरच होतं. त्यांच्या बंडखोरी स्वभावामुळे मलाही हुरुप आला. मग आमची विभागाच्या प्रीमाईसमध्ये बसून रात्री आठ-नऊ-दहा पर्यंत अभ्यासाची, चर्चांची, विश्लेषणांची बैठक व्हायची... वर्गातही प्रश्न विचारून प्राध्यपकांना भांडावून सोडत होता. गेस्ट लेक्चरमध्ये पाहुण्याला आडवे-तिडवे प्रश्न विचारून जेरीस आणत.. अशा रीतीने आमच्या खबरा विभागप्रमुख व प्राध्यापकांच्या केबीनमध्ये, गोखले-देशपांडे गटामध्ये गेल्या. त्यानंतर आम्हाला सगळेच दचकून राहू लागले. म्हणजे अभ्यासू म्हणून ओळख वाढली. त्यामुळे हुषार व अभ्यासू सहकारी व विद्यार्थ्यांची गरज कोणालाही हवीहवीशी असते. मग आमच्याविषयी होणारी प्रादेशिक अर्थाने शेरेबाजी, टोमणेबाजी थांबली. कालांतराने आम्ही सुंबराननावाचं विद्यार्थी मासिक काढलं. त्यातून वैचारिक लेखन सुरू झालं.. त्यामुळे आमची ओळख व रुबाब वाढला.. सांगायचा उद्देश असा की, भाषिक न्यूनगंड बाळगून उपयोग नसतो, त्यावर मात करायची असते. अभ्यासू वृत्तीने आम्ही त्यात मीही सराइत झालो. आमची बॅच तशी सोनेरी म्हणजे रानडे इंन्स्टिट्यूटची आमची ५०वी बॅच होती. त्यामुळे सोनेरी बॅच म्हणून आम्हाला ओळख मिळाली..

दैनिक सकाळमध्ये विद्यार्थी बातमीदार म्हणून काम करताना पुन्हा एकदा भाषिक संघर्ष पुढ्यात येऊन बसला. त्यावेळी वाटलं आपण मराठी पत्रकारिता सोडून द्यावी व हिंदी, इंग्रजीच्या नादी लागावं.. बर्वे बाईंना व्यथा सांगितली, त्यांनी उर्जा भरली, अरे अभ्यासू मुलांनी भाषेला घेऊन निराश व्हायचा असते का.. जमतं सगळं हळूहळू... मग जमवलं.... कृषि पणन महामंडळाच्या मासिकात बरेच महिने काम केलं. तिथून मी मराठीनावाच्या वृत्तपत्रात महापालिका बिट सांभाळलं.. वृत्तपत्राचा पुण्यात राजकीय प्रतिनिधी झालो.. हे पत्र पुण्यात अजून आलं नव्हतं, लाँचिगची तयारी सुरू होती.. तिथं काम करताना बरंच काही शिकता, शिकवता, अचिव्ह करता आलं...

प्रमाण भाषेचा न्यूनगंड तिसऱ्यांदा आला तो न्यूज चॅनेलमध्ये काम करताना. निखिल वागळे यांनी आमच्या सुंबरानच्या टीमला महाराष्ट्र-१ न्यूज चॅनेलमध्ये इनवाइट केलं. मी मराठीचा राजीनामा दिला आणि मुंबईत गेलो. मराठी न्यूज चॅनेलविषयी तत्पूर्वी माझं विचार चांगले नव्हते आणि आत्ताही नाही... पण वेगळा अनुभव घेऊया म्हणून सप्टेंबर २०१५ साली आम्ही तीन-चार मित्र चॅनेलमध्ये रूजू झालो. पण तिथं वेगळेच प्रश्न आ वासून उभे होते.

कॅमेरा, स्टुडिओ, अँकर, जर्नालिस्ट, पीटूसी, वाकथ्रू, टिकटॅक, वन टू वन, पीसीआर, ओबी व्हॅन, रणडाऊन, एव्ही, पॅकेज असं बरच काही... होतं. तीन महिने आमची ट्रेनिंग झाली. कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं इथून टिव्हीची बातमी कशी लिहायची, ती मांडायची कशी, बरंच काही शिकवण्यात आलं. दरम्यान भाषिक आत्मग्लानीने भरून गेलो. कारण कॅमेऱ्यासमोर उगाच बडबड करतानाही त्याची एक टेकनिक लागते. आवाजाचा चढ-उतार, पीच, टेम्पो, आवाजाचा शास्त्रीय सराव.. छान दिसणं, कॅमेरा प्रेझेन्स. असं बरंच काही... भाषा येऊनही टिव्ही समोर सादर करण्याचा न्यूनगंडाचं ओझं मानगुटीवर आलं...

पण कॅमेऱ्यापलीकडे चॅनेलमध्ये बरच काही असते. अभ्यासूपणा इथं कामी आला.. बुलेटिन प्रोड्यूसर म्हणून आऊटपूटची महत्त्वाची जबाबदारी निखिल सरांनी मला व कुणालला दिली... आम्ही तिथं उत्तम काम केलं. चॅनेलमध्ये मुंबईचे सहकारी होते. कॉर्पोरेट कंपन्यात काम कसं करायचं  त्यांना चांगलच पचनी पडलेलं होतं. शून्य गुणवत्ता असलेलेही बिनधास्त भिडायचे.. इंटर्नही स्टुडियोचं, अँकर होण्याचं, बूम माइक हाती धरून फिल्डवर जायचं स्वप्न पाहायचा.. अर्थात त्यात गैर नव्हते.. पण हे मराठवाड्याचा नवखा माणूस इतकं सराईतपणे व निर्धास्तपणे प्रारंभी तरी करू शकत नाही... हळहळू सराईत होतात. असं अनेकजण मराठवाड्याचे चॅनेलमध्ये चांगल्या हुद्द्यावर आहेत. म्हणजे त्यांना ते सहजासहजी मिळालेलं नाही. त्यासाठी बराच संघर्ष करावा लागला.

वाचा : स्पर्धा परिक्षांच्या स्वप्नांचा पोपट !

वाचा : आदिवासी मुलांचे शिक्षण आणि मेस

वाचा : आम्ही हॉस्टेलवासी - दर्दवाले मरहम

२०१७मध्ये चॅनलचा राजीनामा दिला व पुण्यात परतलो. सत्याग्रही विचारधारामासिकाचा सहसंपादक झालो. एका ब्राह्मणी मासिकाचा मुस्लिम संपादक होतो. इथं प्रमाण त्यातही लिखित अकादमिक भाषेशी सामना झाला... पण सात-आठ वर्षांत चपळ, चलाख, व शातीर तसंच स्कीलफुल झालो होतो, त्यामुळे तीन वर्षे संपादक म्हणून उत्तम कामगिरी केली. लॉकडाऊनमध्ये मासिक सुटलं... पण हळूहळू करत प्रमाण भाषा, व्याकरण, मुद्रित शोधन, संपादन कौशल्य व तत्सम कार्यात तरबेज झालो... संघर्ष करून, मेहनत घेऊन कौशल्य प्राप्त केलं.. शिकण्याचा हा प्रवास आजही सुरूच आहे... असो..

कदाचित पत्रकारिता व्यवसाय निवडल्याने मला भाषिक अवगुंठन आलं असावं.. पण समान्य लोकांसाठी भाषा मॅटर करत नसते. मला वाटतं त्यांच्यासाठी स्पर्धा हा मुद्दा महत्त्वाचा असेल.. आपण इथं सुस्त असतो. म्हणजे सिक्युरिटी झोनमध्ये असतो. सर्वकाही आपल्याला म्हणजे मराठी माणसाला जवळ लागतं. गैरसोय जमत नाही.. किंवा अतिरिक्त कष्ट नको असतात. हा निवांतपणा स्थलांतर केल्यास वर्ज्य करावा लागतो. कारण बाहेर प्रचंड स्पर्धेसाठी तुम्हाला स्वतला तयार ठेवावं लागतं.

मराठवाडा व विदर्भाच्या तुलनेत पुणे-मुंबई जरासं अॅडवान्सचं आहे. म्हणजे तुमचा सामना सधन-सुखवस्तू घरातील, सहकारी, रूममेट, कलीग, सहपाठी इत्यादींशी होतो. अनुकूल परिस्थितीत त्यांची जडण-घडण, शिक्षण व पालणपोषण झालेलं असते. त्या तुलनेत मराठवाडा व विदर्भ कष्टकऱ्यांची भूमी आहे. शिक्षण व रोजगारासाठी इथला तरुण शहरात स्थलांतरित होतो. आयुष्यभर प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत, कष्ट उपसत भाकरीसाठी संघर्ष करत असतो. वडिलधाऱ्यांना कामात मदत करून, आर्थिक पाठबळ देत, घरदार, पाहुणे-राउळे सर्वकाही सांभाळून उरलेल्या वेळेत तो अभ्यास करतो. पण तुमचा प्रतिस्पर्थी सधन व सुखवस्तू तसंच अनुकूल परिस्थितीत घडलेला असतो. त्याला वेळेवर वह्या-पुस्तके मिळतात, अभ्यासाला स्वतंत्र खोली असते, शिकवण्या, ना ना क्लासेस, मार्गदर्शन वर्ग, कौशल्य-विकासाला पुरेसी संधी, उत्तम आहार, मागे कुठली कटकट नसते, घरात सधनता व समाधान इत्यादी.. प्रत्येक बाबतीत तो तुमच्यापेक्षी कितीतरी पटीने उजवा असतो.  त्याच्यासोबत तुमचा कुठल्याच पातळीवर टिकाव लागू शकत नाही. त्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी तुम्हाला अक्षऱश: पळावे लागते. 

ही स्पर्धा कधीकधी जीवघेणी असते. तुमच्यासोबत एकत्रच इंटरव्यू दिलेला तुमचा जवळचा मित्र सिलेक्ट होतो, तुम्हा मात्र तसेच राहता. तो स्टेज मिळवतो, तुम्ही खाली बसून त्याच्यासाठी टाळ्या वाजवता... त्याला मोठा हुद्दा मिळतो, परंतु प्रमोशन मागणं, तुमच्या गावीही नसते. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी डावलले जाता. त्यामुळे हळूहळू या अघोरी स्पर्धेत टिकण्यासाठी तुम्ही चलाख, धुर्त, शातीर होत राहता.

कसेबसे नोकरीला लागला तर तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरचं गुलाम होऊन जाता. भल्या सकाळी उठून टिफीन घेता अन् ऑफीसला जाता.. सूर्य मावळला की एक्झिट नोंद करून घराकडे निघता. घऱी पोहचेपर्यत रात्र झालेली असते. जेवण करून झोपा व झोपेतून उठून परत ऑफिसला जा.. ते रहाटगाडं सुरू होतं. शहरासाठी तुम्ही मनुष्यबळ होता. शहरं तुमच्या जवानीचा किस काढतात. आपली पोटं भरतात. पण तुम्हाला पोरका करतात. शहरे जालीम असतात. एकाच बिल्डिंगमध्ये राहून तुम्हाला तुमचा शेजारी माहीत नसतो. तिथं गप्पा मारण्या ओटा, पार किंवा मित्रांची बैठक नसते. हक्काचा मित्र नसतो. बिल्डिंगमालक तुम्हाला भाड्यासाठी ओळख दाखवतो. गल्लीत, कॉलनीत, अपार्टमेंटमध्ये फारसं तुम्हाला किंवा तुम्ही कुणाला ओळखत नसता.

कोणी पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे धाव घेतो, तर कोणी सुरक्षा म्हणून शहरे गाठतो. काहीजण रोजगारासाठी शहरांना कवेत घेता.. दुष्काळात जीव वाचवण्यासाठी शहरांना गजबज करता.. पण शहरे क्रूर असतात. त्यांना वस्त्या करून राहणारे स्थलांतरित गलिच्छपणा वाटतो.

२०१५च्या दुष्काळात चॅनेलमध्ये काम करत होतो. त्यावेळी मराठवाड्यात दुष्काळ पडला होता. लातूरला मिरजेहून पाणी आणलं जात होतं. बीड, जालना, परभणी, लातूरची शेतमजूर लोक, मुंबई-पुण्याच्या फुटपाथवर कोप्या टाकून पोट भरत होती. एका मैत्रिणीने या कोप्यांचे व्हिज्युअल आणले, ते पाहताच डोळ्यात पाणी भरून आलं. नवी मुंबईमधील तीन-चार ओव्हरब्रिजखाली अशा अनेक कोप्या होत्या.

एकेदिवशी कॅमेऱ्यासोबत गेलो, आणि मन भरून गप्पा मारल्या, त्या आया-बहिणीशी.. त्यादिवशी खूप बरं वाटलं. कारण मीही त्यांचा समदुखी होतो, मी स्थलातरित होतो, मीही त्यांच्याच भागातील होतो. पुण्यात गावाकडची अशी मंडळी भेटली की, मन हलकं होतं. स्थलांतर मनुष्यबळ निर्माण करते. लघुउद्योग, बांधकाम आणि जोडउद्योगात आर्थिक योगदान देतो. देशाच्या सकल उत्पन्नात भर घालतो. त्यावर शहरे, शहरांचे मालक, उद्योजक, राजकारणी गर्भश्रीमंत होतात. पण तुच्छतावादी दृष्टिकोन ठेवून या मनुष्यबळांना शहरांचा गलिच्छपणा समजला जातो.

पुण्यात मेसचा व्यवसाय वार्षिक शंभर-दीडशे कोटीचा आहे. भाड्याचा व्यवसाय महिनागणिक हजारएक कोटीचा असावा.. विस्थापित विद्यार्थी वार्षिक पाच-सहाशे कोटी खर्च करतात. म्हणजे हा हजारो कोटींचा पैशाने शहरे गब्बर होतात. त्या बदल्यात काय मिळते..

वाचा : लिहिता नवलेखक आणि त्याचे प्रश्न

वाचा : लॉकडाऊन डायरी : भग्न मनाचे अस्वस्थ अवशेष

पुण्यातील विविध पेठांमध्ये लाखोगणिक स्पर्धा परीक्षांची मुले राहतात. तिथला घरमालक त्या मुलांशी निट बोलतही नाही. म्हणजे तो या मुलांच्या जीवावर दरमहा लाखों रुपये कमवतो, त्याच्या मुलांना परदेशात पाठवतो, सिंहगड रोड, कोथरुड, प्रभात रोडला लॅविश प्लॅट घेतो, भाडेकरूंच्या पैशावर ऐशआरोप करतो, पण भाडकरुंना आत्मियतेची शब्दही बोलू नये! त्यामुळे कधीकधी शहराचा तिरस्कार वाटतो, तो याचसाठी! शहरे प्रचंड क्रूर, रानटी, बेदर्द, अमानूष असतात. शेकड्यात एखाद्यालाच शहरे स्वीकारतात. तेही त्यांच्या अटीवर... पण बहुतेक स्थलांतरित शहरांना अखेरपर्यत स्वीकारत नाही. आयुष्यभर शहरात राहतात. पण अखेरच्या वळी मात्र त्यांना आपलं गाव, घर, अंगण, कुटुंब आठवते. प्रारंभी म्हटलेलं अस्थायी नागरिकत्व स्वीकारून शहरात दिवस काढत राहतात.

प्रत्येक स्थलांतरित मनुष्याला अखेरची माती गावाची लागते. राही मासूम रज़ा रोजगारासाठी मुंबईत स्थलांतरित झाले. त्यांनी जीवनाचा मोठा कालावधी मुंबईत काढला, दरम्यान राही एकदाही जन्मगावी गेले नाही. पण अखेरच्या वळी मात्र गंगेकिनारी म्हणजे जन्मगावी दफन होण्याची इच्छा व्यक्त केली. राही प्रातिनिधिक आहेत. शहरात राहणारा प्रत्येकजण आयुष्याच्या रियाटरमेंटला जन्मगाव कवटाळतो. प्रत्येकांना आपलं जन्मगाव प्रिय असते. तसं मलाही खूप प्रिय आहे.

कुठलेही निमित्त करून वर्षांतून चार-पाचदा आंबाजोगाईला चक्कर असते. घरी आलो की, संध्या समयी पुस्तक आणि चहा; घेऊन गच्चीवर जातो. इथं निदान शुद्ध, स्वच्छ, मोकळी हवा मिळण्याची तरी सोय आहे. पण शहरात निसर्गाने सहज उपलब्ध करून ठेवलेल्या शुद्ध हवेलाही पारखा असतो. अशावेळी मग ग्रंथाचा विषय नावडता असला तरी तो डोक्यात जागा करतोच. गावाकडे आल्यावर नसत्या उठाठेवीत क्वचितच असा क्षण वाट्याला येतो. गच्चीवर गेल्यास इंटरनेट सर्फिंग व सोशल राहण्याच्या भानगडीत आपण आपल्याच पाऊलखुणा विसरत चाललोय, असं उगाच वाटून जातं. अशात पुस्तक बोटात घट्ट होतं. गच्चीवर जाताच पत्र्याच्या घरांवर एकाएकी स्लॅब दिसतो, झोपड्या विटांच्या पक्क्या बांधकामात विरतात. या बदलत्या खूणा ग्लोबल वाटतात. मग आपलं घर सर्वांपेक्षा उंचावर असल्याचा नकळत माजही येतो. संधी व पैशाचा माग काढत शहरात गेलेल्या आम्हा विस्थापितांना हा बदल टिपणारा काळ कसा कळणार? रोज फोनवरून अम्मीचा दाबका आवाज ऐकला तरी मन घट्ट करून राहतोच शहरात! मग घरी आलो की, एकाएकी भावनांना उमाळ्या फुटतात..!

छतावर अंधाऱ्या रात्री आभाळ न्याहाळताना सर्वच इजम क्षुल्लक वाटतात. जीएफ, मित्र, ऑफीसचा लोड, कॉम्पिटिशन सब झूठ वाटून जातात. गच्चीवरून खालून जाणारे लोकं महत्त्वाची वाटतात. एखाद्या बालकांची रडकी किंकाळी त्याच्या बापाचा शोध घेऊ लागते. मिसुरडे फुटलेले पोट्टे शिव्या हासडतात, तेव्हा आपण प्रौढ झाल्याचा भास होतो. लागलीच डोक्यात उमगलेल्या सफेदीवर लक्ष जातं. स्थलांतरिताचे वय लोकलचे रेटे, पीएमटीचे धक्के, ट्रॅफिकवाल्याच्या पावत्या भरण्यात गेले. करिअरच्या बिरूदात वन आरकेत बंदिस्त झालो, प्रमोशनचं सेलिब्रेशन वन बीएचकेचं भाडं भरण्यात गेलं. पन्नाशीत घोडबंदर, खारघर, बदलापूर, ताथवडे, कोंढवा, चाकण, आळंदी, उंड्रीत वन बीचके बुकिंग शोधू लागतं. नोकरीचा पैसा इएमआयत आणि अमूल्य वेळ उपनगर टू शहर प्रवासात खर्ची होतो.

बेटा, तुला शहरानं वेशीबाहेर ढकललं, हे सांगणारं कुणी नसतं. मल्टीनॅशनल कंपनीत चार आकडी सॅलरी कमावूनही तुम्ही अछुतच होता..! पोराने शहरात फ्लॅट घेतल्याचा अभिमान मळकी पँण्ट घातलेला बाबा मित्रांत मिरवतो. आईचं दुख वेगळच, ‘सुनेनं काळजाचा तुकडा गावाबाहेर नेला!पण याची द्विधा मनस्थिती अखेरपर्यंत प्रश्नच शोधत राहते.

गावात आल्यास अम्मीचं नेहमीचंच गाऱ्हाणं तब्ब्येत भौतंच खराब कर्र्या र्रे.. खाते जा जान कू कुचतो’. बेगम आपली परतीचे दिवस मोजण्यात दंग. बाबा हळूच विचारतात, ‘कब जारैंय, वापीस..उत्तर मिळालं की ते जातात बाहेर निघून, पानाडे डोळे लपवायला. निघण्याच्या आदल्या दिवशी, बिर्याणी, पुरणसारखे गोडधोड जिन्नस. सामूहिक जेवताना अब्बू बळच प्लेटमध्ये अन्न टाकतात. अन् आई भला मोठा टिफीन बांधून पिशवीत कोंबते. ही मदर इंडिया पाहून उगाच निदा आठवतो,

बेसन की सौंधी रोटी पर खट्टी चटनी जैसी माँ

याद आती है! चौका बासन चिमटा फुकनी जैसी माँ

शेवटचं न्याहाळावं म्हणत पुन्हा गच्चीवर जातो. बसायचं तर खूप असतं वरती न्याहाळत, पण बेभान मन सैरावरा पळू लागतं. पत्रे, डिश छत्र्या, उंची टावर, झाडं, पाण्याच्या मनातच मोजतो, पुढच्या खेपेला जुळवाजुळव करता यावी म्हणून.. अंबाजोगाईचं घर सोडून तब्बल १३ वर्ष होताहेत. या काळात तीन महानगरात स्थलांतरित म्हणून जगले, भोगले, सोसले आणि मिळवले. मायग्रेशन जगणं सुसंस्कृत करत असताना दुसरीकडे तुमची संपन्नता वाढवते. मायग्रेशन पॉझिटीव्हिटीमध्ये या दोन गोष्टी प्रामुख्याने नोंद करण्यासारख्या आहेत. संपन्नता कॅटेगरीत मित्रांचा गोतावळा आणि वैचारिक प्रगल्भता मी जास्त मिळवली.

स्थलांतराला हिंदीत पलायनअसा शब्द आहे. मला हा शब्द नाकारार्थी वाटतो. पोट भरण्यासाठी रोजगार शोधत शहरात आलेला माणूस पळपुटा नसतो. त्यामुळे पलायन हा शब्द मला खपत नाही. विस्थापन हा शब्द तिथं वापरला पाहिजे. विस्थापनात उपेक्षित जगण्याचं तत्त्वज्ञान सामावलेलं आहे.. त्यामुळे प्रत्येक काळातील विस्थापनाचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवे. समकाळाच्या प्रवास हा दिवस सरला की, इतिहास होतो, तो राखून व जपून ठेवायला हवा..

चालू वर्षे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे, तसा तो फाळणीचाही अमृतमहोत्सव आहे. फाळणीचं दुखं आमच्या पिढीला ऐकून माहिती आहे. पण अजूनही इथं बरीच मंडळी आहे, ज्यांनी ती पाहिली आहे. ते दुख सोसलं आहे. फाळणीतले स्थलांतर दुखद होतं, ते ऐच्छिक नव्हते. स्वातंत्र्याने ४०-५० लाख कुटुंबाना उद्ध्वस्तीकरण दिलं. दोन्हीकडची मिळून २० लाखापेक्षा जास्त लोकं मारली गेली. त्यांच्या आर्त किंकाळ्या दस्तऐवज स्वरूपात संग्रहित आहेत. मंटो, कमलेश्वर, खुशवंत सिंह, कुलदिप नैय्यर, राही मासूम रजा, इस्मत चुगताई, अनिसा किडवई अशा कितीतरी लेखकांनी फाळणी व स्थलांतराच्या व्यथांना शब्दबद्ध केलं आहे. कादंबऱ्या, कथा, सिनेमा तयार केले, हे सर्व वाचून-पाहून विस्थापितांचं दुख समजू शकते.

वाचा : सोशल मीडिया आणि नवलेखन

वाचा : आम्ही भारतीय : कल्पनेचे बळी

त्याचकाळात हैदराबाद संस्थान त्यात मराठवाड्यालाही अशाच दुखद प्रसंगाला सामोरं जावं लागलं. पोलीस अॅक्शनच्या रुपाने अनेक मोठ्या संख्येने कुटुंबाचे उद्ध्वस्तीकरण झालं. लाखो लोक बेघर झाले, दोन-अडीच निरपराध लाख मारले गेले. पाच-सात लाख विस्थापित झाले. काहींना देशांतर करावं लागलं. पण त्याचे फारसे दस्तऐवज नाहीत. उत्तरेकडची फाळण्याचं दुख दस्तऐवजीकरणामुळे किमान कळते तर. पण मराठवाड्याच्या वाट्याला दस्तऐवजीकरण आलं नाही. मराठवाडा ऑपरेशन पोलो किंवा मुक्ती संग्रामवर जितकं लिहिलं गेलं, तितकं पोलीस अॅक्शनवर लिहिलं गेलं नाही. मला वाटतं, त्यांचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं. त्याशिवाय येणाऱ्या पिढीला विलीणीकरणाचा इतिहास कळू शकणार नाही. स्थलांतरावर बोलताना फाळणी आणि विलीनीकरणाचं स्मरण होणे स्वाभाविक आहे.

त्यामुळे पदोपदी वाटतं की, स्थलांतर प्रचंड क्रूर असते. त्याच्या यातना विस्थापित जीवाच्या वाट्याला येतात. त्यामुळेच तो अधिक मजबूत, सुरक्षित, निडर व धाडसी होतो. संघर्ष व आव्हाने त्याला बरच काही शिकवून जातात. त्यामुळे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास साधण्यासाठी मनुष्याने स्थलांतर स्वीकारले पाहिजे. जगाचा इतिहास पाहिला तर दिसून येईल की, स्थलांतरित व्यक्तींनीच अभूतपूर्व क्रांति घडवून आणली आहे. स्थलांतरित व्यक्तीला संघर्ष अटळ असतो. किंबहुना संघर्ष केल्याशिवाय आणि पुढे आव्हाने पेलल्याशिवाय काहीही मिळत नाही. माझा व्यक्तिगत अनुभव आहे की, स्थलांतरित मनुष्य प्रचंड आशावादी व सकारात्मक विचारांचा असतो. तो अनुभवशील असतो. त्याच्या पायात बळ, शरीरात उर्मी, मेंदूत गती, हृदयात कळकळ आणि मनगटात जोर असतो.

पदोपदी येणाऱ्या संकटामुळे त्याचं व्यक्तित्व अधिक सक्षम व मजबूत होत राहते, बऱ्यावाइट अनुभवातून तो स्वतला घडवत राहतो, संधीची व आव्हानाच्या अवकाशाचे नवे भान तो आत्मसात करतो. समाजमूल्ये, सांस्कृतिक जाणिवेने तो सधन होतो. अर्थात प्रतिकूल परिस्थितीच माणसाला घडवते. माणूस अनिश्तितेच्या सान्निध्यातच खऱ्या अर्थाने जगण्याचं बळ आणतो. न्यूनंगड झुगारून स्वअनुभवातून आपल्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक अस्तित्वाचा शोध घेतो. किंबहुना अंगी पॉझिटीव्हीटी असेल तरच त्यात मूल्यभान येते, नसता स्थलांतरिताचा पांडुरंग सांगवीकर व्हायला वेळ लागत नाही. नियती क्रूर असते, नैराश्य भले-बुरे, कटु-कोमल, पाहात नाही ती बिनदिक्कतपणे प्रकट होत राहते. त्यामुळे संवेदनाविश्व जागृत ठेवलं तर नवा अवकाश कवेत घेणे सोपं होतं. त्यातून नव्या उर्मीचा आणि नव्या उत्साह उदय होतो आणि रचनात्मकता वाढीस लागते.

(२० ऑगस्ट २०२२ रोजी दहाव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनात स्थलांतरया विषयावर केलेली मांडणी.. संपूर्ण भाषण...)

कलीम अजीम, अंबाजोगाई

मेल: kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: स्थलांतर : जगणे समृद्ध करणारा अनुभव
स्थलांतर : जगणे समृद्ध करणारा अनुभव
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhH4S9qv8rcdXHwnHmLglBEBVFsLU9Isxica9tMTqyv5WMFPIgaIRBkiD7UI4RiSskFd5SHeK8WbFTj-lqrK3mxKOjWxeWhhdqxqsQovmoR_OIzx-q2QU3VIuR66kBr-Xt6mR316g8zT4heHI-kGows0QreuscP1YUSIOq9aRlymMqv1NmlXtsQo8F6Ew/w640-h380/Kalim%20Ajeem.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhH4S9qv8rcdXHwnHmLglBEBVFsLU9Isxica9tMTqyv5WMFPIgaIRBkiD7UI4RiSskFd5SHeK8WbFTj-lqrK3mxKOjWxeWhhdqxqsQovmoR_OIzx-q2QU3VIuR66kBr-Xt6mR316g8zT4heHI-kGows0QreuscP1YUSIOq9aRlymMqv1NmlXtsQo8F6Ew/s72-w640-c-h380/Kalim%20Ajeem.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2022/08/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2022/08/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content