बालपणीचे मामाचे गाव कुठे हरवले?


बालवयातील सुखद आठवणी म्हणजे मामाचं गाव. प्रत्येकाच्या आयुष्यातील अजोळ हा एक सुखद आणि हळवा कोपरा असतो. सुमारे सात वर्षानंतर मलाही दोन दिवसापूर्वी आजीला भेटायला म्हणून मामाच्या गावाला नळेगावाला धावती भेट देता आली. चाकूर तालुक्यात असलेलं मामाचं गाव नळेगाव प्रचंड बदलेलं जाणवलं. 1995-96 च्या काळात पाच हजार लोकवस्तीचं हे गाव आज वीस-पंचविशीच्या घरात गेलं आहे.

जागतिकीकरणाचं वारं सोसत याच गावात आम्ही महिनोंमहिने सुट्ट्याची मजा चाखत होतो. गावातील संथगतीने होणार्‍या भौगोलिक बदलाचे साक्षीदार होत असताना, आजोबा-आजी आणि मामाचं प्रेम आणि जिव्हाळा जपत होतो. शेत-शिवार, चिंचा, आंब्याचा उद्योग, लाकडी मशिनची कामे उत्साहाने करत होतो. किती छान होतं ना सगळं..! आम्हाला एकूण तीन मामा आणि आईसह दोन मावश्या. त्यातून दोघंजण ‘अल्लाहला प्यारे झाले’. 
असं बोललं जातं की मोठ्या मामाचा त्यांच्या व्यवसायिक प्रतिस्पर्धीने विषप्रयोग करुन जीव घेतला. ही घटना मला पुसट्शी आठवते. 1993 साली लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे आलेल्या महाभयंकर भूकंपाने लहान मावशी आपल्या दोन वर्षाच्या तानुल्ह्यासोबत भिंतीच्या आडुश्यात गडप झाली. त्यावेळी मी तिसरीत होतो. 
आई ही बातमी सांगायला आमच्या शाळेत आली होती. शाळेतून आम्हा भावंडाना घेऊन जाताना आमच्या सिरसट बाईकडे आई तिच्या बहिणीची आठ्वण काढून ओक्साबोक्सी रडत असताना मी पाहिले होते. ही रडारड सबंध दोन दिवस चालली. आमचे बाबा मावशीच्या मयतीला ‘गुस्ल द्यायला’ किल्लारीला गेले होते. असो. 

तर मी सुट्ट्याबदल बोलत होतो. आम्ही मावस व मामेभाऊ सुट्ट्या मजेत घालवायचे नवनवीन फंडे दररोज शोधत असे. निलंग्याची मावशीच्या अर्थात आमच्या मावसबहिणी आम्ही अंबेजोगाईहून येताच दुसर्‍या दिवशी बाजाराच्या टेम्पोने नळेगावला हजर असायचे. हा टेम्पो त्यांच्या गल्लीतला होता. 
नळेगावचा आठ्वडी बाजार रविवारी असायचा. त्यासाठी निलंग्याहून मावशीच्या गल्लीतून कपडा व्यवसायिकाचा मेटाडोअर टेम्पो यायचा त्यात बसून मावशीचं कुटुंब आजोळी यायचं. येताच सर्वांची मनसोक्त गट्टी जमायची. मामाचं सिजनवारी व्यवसाय. लाकडाचा तुटक व्यवसायासोबत पावसाळ्यात पोळ्याला बैलाला सजावटीसाठी लागणार्‍या मुंडावळ्या, मटाट्या, गोंडे तयार करुन विकायचे. नंतर दिवाळीत भाऊबीजेसाठी बहिणीच्या ओवाळणी सोबत हमखास असणारा ‘कडदुरा’ विक्रीचा बडा धंदा होता. 
उन्हाळ्यात चिंच, आंबे खरेदी करुन परराज्यातील मार्केटला विक्री करणे. हा व्यवसाय आम्हा बच्चेकंपनीला सर्वात जास्त आवडणारा असायचा. कारण आंबट चिंचा चाखायला मिळायच्या. झाडावरुन चिंच पाडून पोत्यात जमा करायला आम्हाला मजा यायची. त्याचप्रमाणे आंब्याच्या झाडावर खुडीमधून आंबे काढून खाली बांधलेल्या झोळीत टाकताना येणारी मजा काही औरच असे. त्यातून उतारी एखादा अर्धा पिकलेला आंबा ‘पाड’ आम्हाला द्यायचा. हा खटमीठ पाड चाखताना प्रचंड मजा यायची. एका झाडाची आंबे काढताना सुमारे पन्नास-एक पाड आम्ही जमा करायचो. ते आणून आई, मावशी, मामी मावसबहिणी यांना द्यायचो. पाड खाताना ते खूप दुआ द्यायचे. म्हणायचे “शिक को बहूत बडा हो, अवूर हमारे पांग फेड” हे ऐकून आनंद व्हायचा. 
नळेगाव त्या मानाने मोठं गाव. लातूरपासून उदगीरकडे जाताना नळेगाव लागते. निलंगा, शिरुर अनंतपाळ, चाकूर, अहमदपूर इत्यादी गावाला जोडलेलं. पूर्वी नळेगावला गावाचा रविवारचा बाजार वगळता किरकोळ खरेदीसाठी लातूरची बाजारपेठ असायची. आता गावचे चित्र खूप बदलले. 
मोबाईल रिचार्जच्या दुकानासोबत इतरही असंख्य दुकाने झालीत. ज्यात कपड्यासाठी राघवेंद्र आणि गजाजन अशी दोन मोठी दुकाने होती. आता किमान शंभरएक तरी कच्च्या कपड्याची दुकाने तेवढ्याच संख्येने तयार कपड्याची तर निम्मी टेलरिंगची दुकाने झालीत. जनरल स्टोअर, किराणा, फर्निचर, भांडी, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, अ‍ॅटोमोबाईल, कृषि सेवा केंद्र, कृषि औजार, इलेक्ट्रीक इत्यादी अशी मुलभूत वस्तुंची भरमसाठ दुकाने गावात झालीत. 
2000 साली गावात स्वतंत्र व विस्तिर्ण बसस्थानक झाले. येथून पुणे, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, लातूर, कोल्हापूर या मोठ्या शहरासह सर्व लहान शहरांकडे जाणार्‍या बसगाड्या निघतात. पूर्वी तासाला एखादी बस या मार्गावर येत असे परंतु आता दर पाच मिनिटाला बस येतात. तेवढ्याच संख्येने काळी-पिवळी गावातील रस्त्यावर धावतात.
गावाचे चित्र पूर्ण बदल्याचे जाणवले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना गावाचा चेहरा-मोहरा बदलला. याबद्दल विचारल्यास गावकरी म्हणतात “गावात पाणी असल्याने मुख्यमंत्र्याचं लक्ष गेलं, आमच्या गावातील पाणी लातूरला पळवायचं होतं म्हणून ईलासरावांनी हे समदं केलं” काही अर्थी हे खरंही आहे. गावापासून पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर ‘बोरगाव’ नावाच्या गावात या परिसरातील सर्वात मोठा साठवण तलाव आहे. (या तलावातील पाणी फक्त शेतीला फायद्याचं ठरलं मात्र पिण्याच्या पाण्याचे हाल वीस वर्षापूर्वी जसे होते त्याचस्वरुपात आजही आहे) गाव सधन व्हायचं हे देखील एक प्रमुख कारण आहे. त्याचप्रमाणे सन 2000 च्या काळात ऊस, द्राक्षे आणि आंबा या पिकाने गावाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन दिली. त्याचप्रमाणे सोयाबीन, कांदा, अदरक अशा नगदी पिकांनी घरागणिक दुचाक्या दिल्या. त्यासाठी गावभर काँक्रीटचा रस्ता झाला. 
कुडाची व छपराची घरे नष्ट होऊन काँक्रीटची पक्की टुमदार घरे झालीत. शासकीय कार्यालये, वसाहती प्रचंड विस्तारल्या आहेत. शेतशिवार बघण्यालायक बदलली. शाळा महाविद्यालयाची संख्या पूर्वीपेक्षा वाढली. गावात टेक्निकल इंन्स्टिट्यूट आलीत. व्यवसायिक कोर्स स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रे स्थापन झालीत. त्यातून गाव समृद्धीकडे वाटचाल करु लागले. त्यामुळे शेजारी गावातील बरीच कुटुंबे नळेगावला स्थायीक झाली. 
आज गाव तीन टप्प्यात विभागले आहे. दहा-एक किलोमीटरमधे गाव दिमाखात पसरत आहे. परिसरात वीस किलोमीटरपर्यंत प्लॉटींगची रेखांकने गेली आहेत. वाडे, लादण्या, पार, माळवदातून बाहेर पडून जुनं गाव नियोजित अशा प्लॉटींगमधून वेल प्लॅन अशा परिसरात समावले आहे. खाल्लाकडं आणि वरलाकडं असे दोन भाग आणि मधला मोठा परिसर गावाच्या लोकवस्तीनं खाऊन टाकला आहे.

आज सुमारे गावाची लोकसंख्या चाळीस हजाराच्या आसपास आहे अशी माहिती गावकरी देतात. पूर्वी एकमेव असलेले ‘ग्रामीण आरोग्य केंद्र’ आधुनिक झालंय, असं काहीअंशी म्हणता येईल. खाजगीमधे रामकृष्ण मिशनचे एक आणि पट्टणशेट्टी यांचा एक असे एकूण तीनच दवाखाने गावात होते. आता खाजगी डॉक्टरांची लूट इथंही वाढली असल्याचं गावकरी म्हणतात. एकीकडे महागड्या आरोग्यसेवेबद्दल तक्रार करणारे गावकरी उत्तम आरोग्यसेवा मिळावी यासाठी लातूरला प्राधान्य देतात असंही निदर्शनास आलं. 

पूर्वी गावात जिल्हा बँक वगळता एकच राष्ट्रीयिकृत हैद्राबाद बँक होती. आता इतर बँकासोबत गावातील सधनता दर्शवणारे असंख्य पतपेढ्या व खाजगी फायनान्स गावात दिसतात. स्टेट बँकेचं एटीएमदेखील गावात दिमाखाने उभं आहे. पोस्ट ऑफीस, टेलिफोन एक्सचेंज, पोलिस चौकी यांचादेखील कायापालट झाला आहे. दोन मंदीर आणि मस्जिदीसाठी वीस वर्षापूवी ओळख असलेलं गाव, आता सात दिमाखदार मस्जिदीची अजान एकून गावकरी आपला सकाळचा दिनक्रम उरकतात. तसेच तेवढ्याच संख्येने असलेली देवालये गावाची आध्यात्मिक गरज भागवतात. हे सगळं असताना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा अजूनतरी गावात आली नाही. याबाबत गावकरी राजकीय इच्छाशक्तींना दोष देवून मोकळे होतात. 

मामाच्या गावाला प्रचंड मजा असते हे आज आजोळी गावाकडे येऊनही स्मार्ट फोनमधे आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर डोळे लावून बसलेल्या भाच्यांना कसे कळणार. म्हणे ही पिढी टेक्नॉसव्ही म्हणून जन्माला आलीय. व्यवहारिक ज्ञान नसताना कसलं डोबल्याचं आलं टेक्नॉसव्हीपणा असं राहावून-राहावून वाटतं. असो. सुट्ट्या संपून शाळा सुरु होत असताना आमची सुट्ट्याची मजा ऐन रंगात यायची. 
आजोबा यावेळी म्हणायचे “बोलो खाने की क्या फर्माइश है, छुट्टीयाँ खत्म हो रही हैं, अब तुम चले जाओगे” ‘तुम्हारा नाना जिंदा है, तबतक नवासो कि हर ख्वाहीश पुरी होंगी’ बताओ..! ‘क्या खाना हैं..! या कुछ और चाहिए..?’ असं ऐकताना अंगावर मुठभर मांस चढायचं. खूपच आनंद व्ह्यायचा त्यावेळी हे ऐकताना. कपडे, खेळणी, खाऊ पुरवून आजोबा आम्हा नातवंडाचा प्रत्येक लाड पुरवायचे.
आज गावात त्या लहानपणींच्या आठवणींचा काहीच ताळमेळ जुळत नाही. ग्रामपंचायत समोर असलेली बादामाची झाडे ज्यावर रोज पहाटे आमची दगड पडायची, ती झाडे अदृष्य झालीत. चार आण्यात दोन पाव येणारी बिसमिल्लाह बेकरी जागेवरुन खूप लांब गेली, फाटकी पँट शिवणारे अहेमद काका कुठतरी वेगळ्या टपरीवर जाड चष्मा लावून थिगळे जोडण्याचा प्रयत्न करतात म्हणे, बाजाराच्या एका कोपर्‍यावर खारा विकणारा भोई अरुणकाका आता दिसत नाही. 
घराच्या मागे असणारी कुरेशींची झोपडी आता पॉश झाल्याने भाजलेली मटनाची तुकडे विकत नाहीत. आजोबाचे मित्र आणि आमच्या चपला शिवणारे साधूआजोबाच्या दुकानाच्या खानाखूणादेखील आता सापडत नाहीयेत. तळलेली मुरकुलं राघवेंद्र ट्रेडींग कंपनीचं मागमूसही देत नाहीयेत. वीस पैश्यात लाल रंगाचा गारीगारचा देणारा कारखाना आता बिसलेरी आणि सॉफ्ट ड्रिंक विकत असताना दिसत होता.
मामाच्या घरीदेखील आता लोणच्याची आंबे कापली जात नाहीत. चिंचेचा व्यवसाय तेवढा मामेभाऊंनी ठेवलाय. आंब्याची झाडं घेणं आता बंद झालीत. घरातली गुरं विकून टाकलीय. दिन्या-गुन्या बैलाची जोडीची घंटा आता ऐकू येत नाही. बैलगाडीला आजही त्या व्याकूळ नजरा शोधत असतात. कोंबड्याची खुराडे गायब झालीत. कबुतराची घरटी त्यांच्यासोबत उडून गेलीत. लाकडांच्या फळ्या ज्यातून आम्ही घरं करुन दिवसभर खेळायचो त्या शेवटच्या फळ्या बाहेर गटारीवर टाकल्याच्या दिसल्या. 
दगडी न्हानीघराची जागा टाईल्सने घेतली. नेहमी धूर ओकणारा संतल आता गिझर म्हणून ओळखला जातोय. घरातील निलगीरी, चिक्कू, लिंब, डाळीब, चिंच व आब्यांची झाडे कापून मामेभाऊंनी टोलेजंग काँक्रीटची इमारत बांधलीय. आजोबाची ‘कल्या’ नावाची प्रेमळ हाक आता ऐकू येत नाही. आता आजीची ती ‘फजर’ची जोरात होणारी दुआ आता ऐकू येत नाही. मामाचा कारभारीपणा आता खूप कमी झालाय. खूप थकलेयत दोघंही. मामीची डोस्की पांढरी झालीयेत. मामाचे नातवंड स्मार्ट फोनवर पटापट गेम्स खेळण्यात मग्न आहेत. शेतशिवार त्यांना माहितच नाही. 
आमची आजी सुगराबी वय वर्षे 94 लागेल यंदा पावसाळ्यात असं ती खोकत म्हणते. सात भावडांत ती सर्वात मोठी, सगळे भावंड वयोमानाने अल्लाहला प्यारे झालीत. एकटीच उरलीय बिचारी. आठवणी सांगताना आजही ती पहिल्यासारखं रमून जाते. बोचकं, ताट, तांब्या आणि ग्लास घेऊन पायर्‍या खाली खोकत बसलेली असते. तिला बघून खूप वाईट वाटतंय. खूप थकलीय ती. तिचा तो प्रेमळ स्पर्ष आजही खूप काही अबाधित असल्याची पक्की खात्री करुन देतं. असं असलं तरी आजी अजून मनाने खचली नाहीये. 
आजीला असं कोपरा भरताना पाहावत नाहीये. लेकीकडे चल म्हटलं की म्हणते “अशावेळी आपलं घर बरं असतं” या अशा सधनतेच्या वेळेसाठी मरमर राबणारी आजी. आज ‘त्या’ वेळेची आतुरतेनं वाट पाहत असते. हे सगळं बघून मनात कालवाकालव होतेय. क्षणात भूतकाळ समोर येतो व आजी काष्ट्यात खोरं हाती घेऊन ऊसाची सरी निट करताना दिसतीय. कमरेला कुंची बांधून पेरणीसाठी सज्ज आजी उभी दिसतीय. भूतकाळ परत येणं शक्य नाही याची जाणीव वर्तमानकाळात आणून ढकलते.
मामाच्या गावाची 'ती' मजा आता राहिली नाही. विहीरीतून पाणी शेंदतानाची आजी मला पाहायची आहे. आजोबाची दिमाखदार टोपी पुन्हा ऐटीत दिसावी असं राहावून-राहावून वाटतं. बेकरी, किराणा, कुरेशीचं घर, ग्रामपंचायतचा नळ, गारीगारचा कारखाना, खारा विकणारा गाडा पुन्हा पाहावासा वाटतो आहे. पण त्याचक्षणी किशोरचं गाणं आठवतं “कोई लौटा दो मेरे बीते हुये दिन” किती छान असतो ना आपला भूतकाळ. त्यामुळेच मला कदाचित भूतकाळात रमायला आवडत असावं. काही तासात मामाच्या गावाचा भूतकाळातील पटल आठवला म्हणून हा लिहण्याचा प्रपंच केला. आपणही तो भूतकाळ आठवावा हा सुप्त हेतू त्यामागे आहेच.

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: बालपणीचे मामाचे गाव कुठे हरवले?
बालपणीचे मामाचे गाव कुठे हरवले?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgt1sJV5L0q89Px8BWDdPJNP7Be0Ku0vhoSsBRkUltBYYT5XcuyADQr1FNhaG_1St6A11YqpkjTOXoWgDPx01D0ETw9iBMu9lN8mh_2k02v3QTbalEsgLf12d2d83Y9DHDq7huC94-Qi3fe/s1600/Nalegovn+St+Stand+Kalim+Ajeem.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgt1sJV5L0q89Px8BWDdPJNP7Be0Ku0vhoSsBRkUltBYYT5XcuyADQr1FNhaG_1St6A11YqpkjTOXoWgDPx01D0ETw9iBMu9lN8mh_2k02v3QTbalEsgLf12d2d83Y9DHDq7huC94-Qi3fe/s72-c/Nalegovn+St+Stand+Kalim+Ajeem.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2015/06/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2015/06/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content