लॉकडाऊन डायरी : भग्न मनाचे अस्वस्थ अवशेष



हमिना दुर्रानी यांच्या ब्लास्फेमीची शेवटची काही पानं राहिलीय. क्लायमॅक्सच्या अगदी जवळ आहे. पण हातानं बंद केलेलं पुस्तक पुन्हा उघडू वाटत नाहीये. तसंच स्टॉपर म्हणून ठेवलेलं बोटही बाहेर निघत नाही. कनिका कपूर हुई कोरोना की शिकारदोन-तीन तासांपूर्वी वाचलेली बातमी धडधडत्या मनात घर करून बसलीय. एनडीटीव्हीनं तिच्या हवालदिल झालेल्या कुटुंबाची बातमी दिलीय. ती वाचून मनाची धडकन जरा जास्तच तेज झालीय.
सर्वसामान्यापेक्षा आम्हा जर्नालिझमवाल्यांची जाणीव अधिक तीव्र. वास्तविक घटनांची जाण व त्याच्या गतीची सर्वश्रूत कल्पना आधीच मिळते. त्यामुळे इटली व स्पेनमध्ये नेमकं काय घडतंय याची दाहकता कळून चुकली आहे. प्रेतांचे सडे वायरल मेसेजमधून बघितली आहेत. कोरोना अधिक हॉस्पिटल वजा मृत्यू असं न सुटणारं गणित आहे. ही लागण लाइलाज असून हा विषाणू जीव घशातून काढणारा आहे.
कनिकानं जवळपास चाळीस जणांना संक्रमित केलंय. दोन-तीन तासांपूर्वी लिहिलेल्या एफबी पोस्टमुळे संक्रमणाची चेन किती क्रूर आहे हे कळलं. तिच्या पार्टीत केंद्रीय मंत्री व खासदार सुद्धा होते. त्या खासदारांनी राष्ट्रपतींची भेट घेतलीय. काहीजण संसदेच्या कामकाजात सहभागी होते. हे वृत्त कळताच टीएमसीचे डेरेक ओब्रायन, आम आदमी पक्षाचे संजय सिंह क्वारंण्टाइन झाली आहेत. पुढे ही साखळी किती वाढेल यांची कल्पना करून मन आतून पोखरून निघालंय.   
हातातल्या पुस्तकासमवेत सोफ्यातच सामावून जावसं वाटतं. किल्लारीच्या भूकंपासारखं एका अंधारात सगळं काही गडप व्हावं वाटतं. तसलीम खाला व तिचं दोन वर्षाचं बाळ एका क्षणात छप्पर व भिंती कोसळून नेहमीसाठी शांत झालं होतं. ती ३० वर्षापूर्वी सुटली जगण्याच्या संघर्षातून सुटली होती. तिच्या मृत्युची बातमी ऐकून अम्मीची झालेली मानसिक अवस्था आजही आठवते.
मृत्युचं भय कदापि नाही. हदीसमध्ये लिहिलंय; हर जिन्दा को मौत का मजा चखना है. बालपणात अरबी मकतबमध्ये ऐकलेली ही वाक्ये कानात घर करून आहेत. अधून-मधून मस्जिदीतल्या बयानमध्ये मौत आने से पहले उसकी तयारी कर लिया करो.’ अशी वाक्ये कानावर आदळतात. पण कोरोनासारखी दुर्दैवी मौत कुणालाही नको आहे. यूरोपच्या बातम्या वाचून वायरसचं व मृत्युचं भय आणखीच वाढलंय.
अम्मीचा पोटाचा विकार बळावला आहे. महिनाभरापूर्वी अंबाजोगाईहून आलेल्या अम्मी फुटकळ आजार व कोरोनातून आलेल्या नैराश्यानं ग्रासल्या आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईच्या केईएमची अपाईन्टमेंट होती. मुंबईतचा उकाळा सहन होईना म्हणून पुण्यात मुक्कामी आल्या. पुण्यातल्या आमच्या वनबीएचकेमध्ये खुर्चीवर बसून त्या पुरत्या कंटाळल्या. इथं ऐसपैस नाहीये. गप्पांच्या बैठका नाहीये. राहून-राहून त्यांना घरपण आठवत राहतं. कोरोनामुळे कुणाशी बोलायचं नाही, त्या खूपच अस्वस्थ आहेत.
तीन आठवड्याअदोगरची दिलेली अपॉइन्टमेंट कोरोनामुळे जवळपास कॅन्सल झाल्यात जमा आहे. भय्या अम्मीला घेऊन जाण्यासाठी मुंबईहून येणार होते. आता ते मुलांबाळासमवेत Stay home म्हणून घरातच बंदीस्त आहेत. एका अर्थानं बरं झालं. प्रधानसेवकाच्या लहरी घोषणेमुळे ते इथंच अकडून पडले असते.
अब्बू अम्मीला पुण्यात सोडून अंबाजोगाईला निघून गेले. नसता ते ही अडकले असते या अनिश्चित लॉकडाऊनमध्ये. ते एक क्षणही थांबू शकत नाहीत पुण्यात. अम्मीनं दोन-तीनदा ही आठवण काढली. तेव्हा वाटलं बरं झालं, अब्बूला थांबण्य़ाची गळ घातली नाही म्हणून.
जनता कर्फ्यूतून आलेलं देशव्यापी लॉकडाऊन व स्टे होमचं पुढचं भविष्य कुणालाच माहीत नाहीये. बेगमची उम्मीद सहाव्या महिन्यात पदार्पण करत आहे. सबीन फातेमाला नर्सरी स्कूलमध्ये पाठवायचं आहे. विमा पॉलिसीचा वार्षिक हफ्ता भरायचा आहे. कुरिअरनं आलेला चेक वटवायला बँकेत टाकायचा होता. मुंबईच्या रस्त्यात आढळलेलं पाकिट त्या बिचाऱ्याच्या पत्त्यावर पाठवलं आहे. तो त्याला मिळाला का नाही माहिती नाही. त्यात तीन-चार एटीएम, आधार, पॅन व इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे होती. आईच्या आजाराचं चुकवलेलं भलं मोठं बिल होतं.
बीबीसी सांगतेय अवघं जग कोरोना संकटानं घेरलं गेलंय. चीनचा हा वायरस हळूहळू जगभरात पसरून मृत्युचं तांडव माजवत आहे. सतत आदळणाऱ्या बातम्या वाचून अन अधीर झालं आहे. मन सर्वकाही आलबेल व्हावं अशी इच्छा बाळगून आहे. सेव्हिंगनं थोडासा दिलासा दिलाय. पण पुढचा बजेट कोलमडणार!
खोलीतला अंधार, अम्मीचा खोकला, बेगमची कूस बदलणे, सबीनचं अंथरुणावर पसरणे, बाहेरच्या प्रकाशानं उजळणारे खिडकीचे काच आणि मनातली अस्थिरता बैचेन करतेय. या सगळ्यात ब्लास्फेमीचं दुख: कृत्रिम व काल्पनिक वाटतंय. 
उठून किचनमध्ये गेलो. हातात ग्लास घेत माठाचा नळ सुरू केला. उभ्यानंच तो घशात उलटा केला. थंड पाण्याची चव जिभेवर नव्हती. का कोण जाने करबलाच्या मैदानातले हजरत हुसैन आठवले. जेव्हा कधी थंड पाणी पितो, त्यावेळी युद्धाच्या मैदानात पाण्याविना तडफडणारे हुसैन आठवून जातात. 
त्यांचा इमान, धाडस, औदार्य व आप्तामुळे लादलेलं युद्ध, दगा, फटका, लाचारी, भूक, व्याकूळता डोळ्य़ासमोर येते. त्यांचा त्याग व बलिदान जगण्याची जिद्द अंगी बाणते. संघर्षात जगण्याची उर्मी देते.
तोटी ऑन करून पातेल्यात थोडसं पाणी घेत ते गॅसवर ठेवलं. साखर, चहापत्ती टाकली. हाती मोबाईल घेऊन बोटानं न्यूज फीड स्क्रोल केलं. मीडिया कनिका.. कनिका करत बोंबलत होता. नेटकरींचा अल्गोरिदम अजून झोपला नव्हता. ब्लॅक टी कपात घेऊन पुन्हा सोप्यावर जाऊन आडवा झालो. ब्लास्फेमी हातात घेतली.
माँ कमरे से चली गई. बेवा मेरे पैरों के पास बैठ गई. चारो ओर नजर डालते हुए उसने कहां, यतीमडी कह रही है कि अपनी मौत की सुबह वाले दिन पीर साई उससे शादी करने जा रहा था. वह हवेली कि मालकिन बन रही थी. इसलिए वह इतनी गमजदा थी. मुझे झटका लगा. मैंने लडकी को बुला भेजा और अपने शौहर कि तरह सोफे पर बैठ गई. मैं उसे उसकी तरह पिटना चाहती थी. लेकिन उसकी (शौहर के) मौत के दो दिन बाद ही यह करना माकूल नही लगा. यह ऐब को हवा देगा. या कुछ बदतर बात में बदल जाएगा.
मला वाचनात गती नाहीये. पंधरा-वीस पानं वाचायला तास लागतो. निवांत वाचायची सवय आहे. शांतपणे व हळूहळू वाचलं की डोक्यात भिनतं. वैचारिक वाचनाला ही गती आणखीन मंदावते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ब्लास्फेमी वाचतोय. कादंबरीची नायिका हिरनं आपल्या क्रूर, हिंसक, अन्यायी व लिंगपिसाट पती पीर साईची हत्या केलीय. तो पाकिस्तानमधील एका निमशहरी भागातल्या दरगाहचा दांभिक प्रमुख (पीर) होता. त्यानं भाबड्या लोकांच्या श्रद्धांचा बाजार मांडून बक्कळ पैसा जमवला. त्यातून राजकारणी लोकांच्या मनोरंजनाचं साधन झालाय. तो नेत्यांना व उद्योगपतींना तशा सुविधा पुरवतो.
त्याची क्रूरता इतकी वाढली की त्यानं आपल्या पत्नीला अशा लोकांकडे पाठवणं सुरू केलं. बायकोला बाहेर पाठवून घरात कोवळ्या मुलींची तो शिकार करतोय. त्याच्या या दृष्कृत्याला घरातल्या लोकांची मूकसंमती आहे. या अन्यायातून मुक्तीसाठी लैंगिक विकृत असलेल्या पती पीर साईचा हिरनं उशीनं नाक दाबून खून केलाय. रात्रभर त्याच्या मृतदेहाशेजारी बसून राहिली.
पतीच्या मृत्युनंतरही तिचा छळ कमी झाला नाही. मुलगा राजाजीनं पुरुषी बळ, शक्ती व अधिकाराच्या जोरावर आईला व्यभिचारी ठरवलं आहे. छळ करून तिला घरात कोंडून ठेवलंय. एका मुरलेल्या वाचकाला आता पुढे काय होईल, त्यासाठी पुढे वाचनाची गरज राहात नाही. पण मला पुढचं वाचायचं होतं.
पण तुर्त एवढं पुरे म्हणत पुस्तक बंद केलं. रात्रीचे बारा वाजले असतील. अंथरुणावर जाणं गरजेचं होतं. डोळे बंद करून झोपेला ब्लँकेटखाली घेतलं.
#
पावणेसहाचा अलार्म वाजला तसा तो बंद करण्यासाठी जागा झालो. अंगातला क्षीण झटकून उभा राहिलो. वुजू करून जानिमाज अंथरली. फजर अदा केली. जगशांती व रोगराईपासून मुक्तीसाठी अल्लाहकडे दुवा मागितली. तोपर्यंत अंधारानं कूस बदलत पांढरी आणली होती. खिडकीसमोर जाऊन उभा राहिलो. 
पाडून टाकलेल्या इमारतीच्या भग्न अवशेषावर नजर खिळली. कामगाराविना तो मलबा बेवारस पडला होता. बिचाऱ्या मालकाला वाटलं असावं, सहाएक महिन्यात चार-पाच मजली अपार्टमेंट उभं राहिल. त्यातले फ्लॅट विकून भरमसाठ पैसा येईल. पण आता बांधकाम अनिश्चित काळासाठी स्थगित झालं होतं.
गेली चार-पाच दिवस खिडकीत येऊन या अवशेषाकडे नुसतं पाहत राहतोय. कोरोना वायरसचं अंत कसा होईल, याचा विचार करत राहतो. परवा गार्डियनचा लेख होता, अफ्टर कोरोना जग बदलेल.’ बेडरुम, किचन आणि बाथरुमची खिडकी बाहेरचं एकच दृष्य दाखवते. पण प्रत्येक खिडकी व्यू पाईंट बदलेल असं वाटते. थोडा-थोडा वेळ तिन्ही खिडक्यांना देतो. नजर बदलते पण दृष्य नाही. खिडकी सोडताना अस्वस्थता तिथंच खिळून राहते.
जवळपासच्या नव्या बिल्डिगच्या रंगरंगोटी सुरू होत्या. काहींत फरशी, प्लॅस्टर, प्लम्बिंगसारखे किरकोळ काम लॉकडाऊनमुळे रखडली. किती जणांची इन्वहेंस्टमेंट, कामगराचे हप्ते, कंत्राटदाराचं बील, पाणी देणाऱ्यांचा पगार व सर्वांच्या आशा त्या भग्नावशेषात गाडल्या गेल्या.
बिचाऱ्या मालकाला विनापरवाना बांधकाम सुरू करायला महापालिकेच्या किती खेटा माराव्या लागल्या असतील, याचं गणित जळवून त्याच्या अवैध कामाबद्दल कौतुक वाटून जाते. अशा अन-लीगल बिल्डिंगा आमच्या कोंढवा (गावठाण) परिसरात लक्षणीयरीत्या वाढल्या आहे. गेल्या पावसाळ्यात जूलै-आगस्टमध्ये कंपाऊंड भिंत कोसळून १५ मजूराचा मृत्यु कुटुंबासहित जमीनीत गाडला गेला होता.
लॉकडाऊनला आठवडा झालाय. किराना संपलाय तो आणायचाय. बेगमनं रात्रीच सामानाची यादी तयार करून ठेवली होती. सूचना देत म्हणाली, जितना मिला, ला लो. ज्यादा दूर और भीड में ना जाओ. 
तिलाही भविष्याचं भय सतावतंय. मी घरी असल्यानं तिचं काम वाढलंय. २३ मार्च चे आमच्याकडे अंबाजोगाईला जायची कन्फर्म तिकिटे होती. परीक्षेसाठी तिला गावी जायचं होतं. सबीनला आठवडाभरापासून अंबाजोगाईच्या घराचे वेध लोगले होते. लॉकडाऊनमुले अम्मीची ही इच्छाही आता खुर्चीत चिकटून राहिली.  
बाजारात जाऊ का, नको? असं झालंय. पण जावं लागेल. टाळाटाळ न करता किराना भरून ठेवला असता तर बरं झालं असतं, असं वाटून गेलं. दुसऱ्याच क्षणी वाटलं. असं होईल कुणाला माहिती होतं. डोळ्यासमोर अनिश्चितता व मृत्युचं भय दिसतंय. 
सात वाजले असावेत. वाटलं ही घालमेल लिहून काढावी.. इतिहास प्रसंगाच्या पाऊलखुणा मागे सोडत असतो. हा माझ्या पिढीचा काळाकुट्ट इतिहास आहे. त्याला संरक्षित करावं म्हणून पीसी ऑन केलाय. तासभरात इतकं लिहून झालंय. बघुया पुढे मानतील घालमेल, अस्वस्थतेला किती शब्दरुप देणं होतेय.

कलीम अजीम, पुणे
Twitter@kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: लॉकडाऊन डायरी : भग्न मनाचे अस्वस्थ अवशेष
लॉकडाऊन डायरी : भग्न मनाचे अस्वस्थ अवशेष
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjZaqWHtOxSMNePw_-Qg_5t2yHp3FfMDKghijt8E5aK_oH_Y67qu3zdg1nzpXoVSn5smP5km-Eh-Z8e-9Uoa33Ztmrwcr0LQlDCqEEDa0DzpybimKdafr3P82xo-Dwx9utkcQel_R0aABNj/s1600/Kondhawa+Kalim+house.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjZaqWHtOxSMNePw_-Qg_5t2yHp3FfMDKghijt8E5aK_oH_Y67qu3zdg1nzpXoVSn5smP5km-Eh-Z8e-9Uoa33Ztmrwcr0LQlDCqEEDa0DzpybimKdafr3P82xo-Dwx9utkcQel_R0aABNj/s72-c/Kondhawa+Kalim+house.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/03/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/03/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content