आठवणींचं फास्ट फॉरवर्डिंग होईल का?

गा सोडून एक दशकाचा इतिहास लोटला. हा काळ आठवून फास्ट फॉरवर्डिंग करून क्षणात मागं जाता येईल, असं राहून-राहून वाटतं. पण ते शक्य नाही. जगणं सिनेमा नसतं हे अनुरागनं शिकवलंय. वर्षातून दोन-तीनदा घराकडे जाणं होतं. गावाकडे जायचं या कल्पनेनेच दोन दिवस शरीरात रोमांच भरतो. जायचा दिवस जवळ येतो तसा सुखावतो. नऊ तासाचा प्रवास करून अंबाजोगाईत दाखल झालो की, मनी एक आत्मिक समाधान लाभते. शहरात शिरलो की एक क्षणही स्वस्थ बसवत नाही. कधी एकदाचं बस स्टॅन्ड येईल खाली उतरतो आणि घराकडे निघतो, असं व्हायला लागतं.
बस स्टॅन्ड ते घर हा दहा मिनिटांचा प्रवास जीवघेणा असतो. रस्त्यातच कोणीतरी ओळखीचा भेटतो तो गाडीने घरी सोडतो. दरम्यान, कधी आलात? काय करतो? कुठे असतात? तमका लेख छान लिहिला, तुम्हाला नियमित वाचतो; अशा गप्पा त्या ओळखीवाल्यासोबत होतात. पण नंतर त्याला कधी भेटणं होत नाही.
घरी पहिल्या दिवशी खूप निवांत वाटतं. जगातल्या सर्व सुख-सुविधा मिळाल्याचं भास होऊन रूह का परिंदा शांत होतो. अम्मीचा साद घालणारा आवाज, घराच्या भिंती, गैलरी, छत सगळं काही कवटाळू वाटतं. अब्बूची विचारपूस सारं काही सुखावणारं असतं. बिल्डिंगच्या छतावर जाऊन जवळपासची घरे न्याहाळत असतो. कुठे काही बदल जाणवतो का ते डोळ्यांनी टिपायची तयारी असते
काय होतंय आपलं? कुठे आहोत? आपण का स्थलांतर स्वीकारले? घरात का राहू शकत नाही? जगण्याच्या इच्छेने घरदार शहर सोडून विस्थापन का स्वीकारलं? असे प्रश्न दोन-तीन दिवसाच्या मुक्कामात वारंवार छळत असतात. अम्मी-अब्बूच्या ढासळत्या तब्येतीकडे पाहून डोळे पानावतात. मुलगा आलाय म्हणून अब्बू मटन, चिकन आणतात. अम्मी-अब्बू कौतुकानं खा म्हणतात. अन्नाचा कोर हातात घेतला की हात थरथरतो. गप गुमान समोरचं गिळतो.
संध्या समयी उगाच गच्चीवर जावसं वाटतं. मोकळा श्वास आणि कदाचित उंचीवर मोहल्ला न्याहाळासा वाटत असावं. हातात पुस्तक घेऊन जिना चढतो. गार वारा उगाच रोमानी करतो. वाटतं मोबाईल आणला असता तर बरं झालं असतं; बोटं चालवून स्क्रीनवर काहीतरी शब्द टाइपले असते. विचारांचा कल्लोळ बाजूला ठेवून न्याहाळत बसतो. गल्लीतले लहान बच्चे, कट्टावर बसून मोबाईलमध्ये डोकावून उगाच हसणारी पोगंड मुलं, बायांची गडबड, सासवांची नातवं साभाळतानाची कसरत.. बरीच काही दृष्ये डोळ्यात साठतात.
मग उगाच डोळे थकून पुस्तकावर खिळतात. पानांची विभागणी करणारं बोट बाहेर येते. संध्या समयी पुस्तक आणि चहा; ग्रंथाचा विषय नावडता असला तरी तो डोक्यात जागा करतोच. गावाकडे आल्यावर नसत्या उठाठेवीत क्वचितच असा एखादा क्षण वाट्याला येतो. गच्चीवर गेल्यास इंटरनेट सर्फिंग सोशल राहण्याच्या भानगडीत आपण आपल्याच पाऊलखुणा विसरत चाललोय, असं उगाच वाटून जातं. अशात पुस्तक बोटात घट्ट होतं.
गच्चीवरून पलीकडच्या पत्र्याच्या घरांवर एकाएकी स्लैब दिसतो, झोपड्या विटांच्या पक्क्या बांधकामात विरतात. या बदलत्या खूणा ग्लोबल वाटतात. मग आपलं घर सर्वांपेक्षा उंचावर असल्याचा नकळत माजही येतो. संधी पैशाचा माग काढत शहरात गेलेल्या स्थलांतरितांना हा बदल टिपणारा काळ कसा कळणार? वर्षांतून दोन-एकदा गावी बळच चक्कर. रोज फोनवरून अम्मीचा दबका आवाज ऐकला तरी मन घट्ट करून राहतोच ना शहरात! मग एकाएकी भावनांना अशा का उमाळ्या फुटाव्यात बरं.!
गावाकडच्या एखाद्या खेपेस गप्पा वादांतून मन भावनांच्या अमाप डुलक्या घेतो. डोकं गर्र झाल्यावर वरची गच्चीच हमसफर बनून सहारा देऊ लागते. छतावर अंधाऱ्या रात्री आभाळ न्याहाळताना सर्वच इजम झ्याटमारी होतात. जीएफ, लफडी, मित्र, कॉम्पिटिशन सब झूठ वाटून जातात. गच्चीवरून खाली पाहताना चलचित्र करणारी लोकं महत्त्वाची वाटतात.
एखाद्या बच्चूची रडकी किंकाळी त्याच्या बापाचा शोध घेऊ लागते. मिसुरडे फुटलेले पोट्टे ओठांची गटर करून शिव्या हासडतात, तेव्हा आपण प्रौढ झाल्याचा भास होतो. लागलीच डोक्यात उमगलेल्या सफेदीवर लक्ष जातं. अनिवासी अंबाजोगाईकर झालोय. गावात अनेकांची नावसुद्धा आता विस्मृतीत गेलीय. चौका, गल्ल्या, लँड मार्क, सार्वजनिक स्थळांची नावे विसरल्यासारखी वाटतात. मित्रांची, संपर्कात असलेल्या ओळखीतल्या लोकांची चेहरे अंधुकसे आठवतात. ते समोर आले की दोन सेकंद काहीच सुचत नाही. मेंदूवर खूप ताण दिला तर नावं आठवतात.
सहकाऱ्यांचे मिसरूड, डोक्यावरच्या केसात चांदी आली. गाल खंगलेत. डोळे आत गेलीत. काही जण ढेरपोट्या झालेत; तर काहीजण कृश. बाजारात फिरायला गेलो की, बरंच बदलल्याचं जाणवतं. तर काही उगाच बदललंय असं वाटायला लागतं. मुळात काहीच बदललेले नसतं. गाव तसे शांत एकाच जागी स्थीर असतं. बदललेलं असतं तर फक्त आपलं मन.. कारण ते इकडून तिकडे संधीच्या, आकांक्षेच्या स्वप्नांच्या शोधात भिरभिरत असतं. महानगरातल्या या भेदक वातावरणात स्वतःला का कोंडून ठेवलंय? असं राहून राहून वाटतं.
स्थलांतरिताचं वय लोकलचे रेटे, पीएमटीचे धक्के, ट्रैफिकवाल्याच्या पावत्या भरण्यात गेले. करिअरच्या बिरूदात वन आरके (1RK) बंदिस्त झालो. प्रमोशनचं सेलिब्रेशन वन बीएचकेचं भाडं भरण्यात गेलं. पन्नाशीत घोडबंदर, खारघर, बदलापूर, ताथवडे, कोंढवा, चाकण, उंड्रीत घराची बुकिंग शोधू लागतं. नोकरीचा पैसा इएमआयत आणि अमूल्य वेळ उपनगर टू शहर प्रवासात खर्ची होतो.
साल्या तूला शहरानं वेशीबाहेर ढकललं, हे सांगणारं कुणी नसतं. मल्टीनैशनल कंपनीत चार आकडी सैलरी कमावूनही तू अछुतच झाला रे..! पोरानं शहरात फ्लैट घेतल्याचा अभिमान मळकी पँण्ट घातलेला बाबा मित्रांत मिरवतो. आईचं दुख वेगळच, ‘सुनेनं काळजाचा तुकडा गावाबाहेर नेला!’ पण हा द्विधा मनस्थिती अखेरपर्यंत अस्तित्वाचा शोधत घेतच राहतो.
गावात आल्यास अम्मीचं नेहमीचंच गाऱ्हाणं
तब्ब्येत भौतंच खराब कर्र्या र्रे..
खाते जा जान कू कुचतो’.
बेगम आपली परतीचे दिवस मोजण्यात दंग. बाबा हळूच विचारतात, ‘कब जारैंय, वापीस..’ उत्तर मिळालं की ते पानाडे डोळे लपवायला मान खाली घालून गप बाहेर निघून जातात. निघण्याच्या आदल्या दिवशी, बिर्याणी, पुरणसारखे गोडधोड जिन्नस. सामूहिक जेवताना बाबा बळच प्लेटमध्ये अन्न टाकतात. अन् आई भला मोठा टिफीन बांधून पिशवीत कोंबते. ही मदर इंडिया पाहून उगाच निदा आठवतो.
बेसन की सौंधी रोटी पर खट्टी चटनी जैसी माँ 
याद आती है! चौका बासन चिमटा फुकनी जैसी माँ 
दिन भर इक रस्सी के ऊपर चलती नटनी जैसी माँ 
बाँट के अपना चेहरा माथा आँखें जाने कहाँ गई 
फटे पुराने इक एल्बम में चंचल लड़की जैसी माँ
शेवटचं न्याहाळावं म्हणत हा पुन्हा तो गच्चीवर बराच वेळ रंगाळतो. बसायचं तर खूप असतं वरती न्याहाळत, पण बेभान मन सैरावरा पळू लागतं. पत्रे, डिश छत्र्या, उंची टावर, झाडं, घराचे रंग एक-एक करून मनातच मोजतो, पुढच्या खेपेला जुळवाजुळव करता यावी म्हणून.. गप रे मन अब तू काहे धीर धरे... 
दोन, तीन, चार दिवस संपल्यावर जाण्याचा दिवस जवळ येतो तशी मनात धास्ती भरते. छाती धडधडायला लागते. आज जाऊ का नको? असं वारंवार व्हायला लागतं. एक-दोन दिवस ढकलत स्वतःला राजी करतो. पण तो दिवस उजाडतोच ज्या दिवशी गाव, घर, गल्लीतला चौक सोडावा लागतो.
जड अंतकरणाने घर सोडतो. घराची इमारत मागे वळूनही पाहूशी वाटत नाही. कारण, तिथं अब्बू कोपऱ्यावर बसलेले असतात. त्यांची व माझी नजरानजर होईल या भीतीने मुकाट पुढे चालायला लागतो. अम्मी तर आतच बसलेले असतात. मन भरून येते व मुनव्वर राणा आठवून जातात..
नई दुनिया बसा लेने की इक कमज़ोर चाहत में,
पुराने घर की दहलीज़ों को सूना छोड़ आए हैं।
पकाकर रोटियाँ रखती थी माँ जिसमें सलीक़े से,
निकलते वक़्त वो रोटी की डलिया छोड़ आए हैं।
यक़ीं आता नहीं, लगता है कच्ची नींद में शायद,
हम अपना घर गली अपना मोहल्ला छोड़ आए हैं।
हमारे लौट आने की दुआएँ करता रहता है,
हम अपनी छत पे जो चिड़ियों का जत्था छोड़ आए हैं।
ये हिजरत तो नहीं थी बुजदिली शायद हमारी थी,
के हम बिस्तर में एक हड्डी का ढाचा छोड़ आए हैं।

####

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: आठवणींचं फास्ट फॉरवर्डिंग होईल का?
आठवणींचं फास्ट फॉरवर्डिंग होईल का?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhqkkoMYAGPXVxE3i4fmnLNTEjirymiaWRpLwnTi1DKhEL-2_S5rJegTniEEjXnnmfnYGDmUderpSEevDE-57n7nSTFS-hItCWUZXNywpmlCYhx6cBxdG7FMBgMdUFg8zZf8uyDoH6pvw1S/s640/Books++Kalim+Ajeem.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhqkkoMYAGPXVxE3i4fmnLNTEjirymiaWRpLwnTi1DKhEL-2_S5rJegTniEEjXnnmfnYGDmUderpSEevDE-57n7nSTFS-hItCWUZXNywpmlCYhx6cBxdG7FMBgMdUFg8zZf8uyDoH6pvw1S/s72-c/Books++Kalim+Ajeem.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/09/blog-post_1.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/09/blog-post_1.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content