ऑक्टोबर 2018ला वंचित बहजन आघाडी व एमआयएममध्ये राजकीय युती झाली. या युतीनंतर प्रस्थापित राजकीय पक्षाचे डोळे विस्फारले. एमआयएमला आत्तापर्यंत असंविधानिक, रझाकाराचा पक्ष, सांप्रदायिक शक्ती म्हणून या युतीला बदनामी केले, आता याही पुढे जाऊन भाजपची बी टीम, मतांची विभागणी, कट्टरवादी,अलगतावादी, फुटीरवादी म्हणण्यापर्यंत मजल मारली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सेक्युलर राजकारणाचा शत्रू म्हणून एमआयएमची प्रतिमा मलीन केली जात आहे. एमआयएमवर टीका करताना हे राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडीवरही घसरत आहेत. या वंचित बहुजन आघाडी व एमआयएम युतीच्या पार्श्वभूमीवर आम्ही एमआयएमची अधिकृत भूमिका वाचकांसाठी देत आहोत. नुकतेच वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे चंद्रकांत खौरंना पराभूत करून निवडून आले आहेत. त्या निमित्ताने ही मुलाखत देत आहोत.प्रश्न:- वंचित बहुजन आघाडीला घेऊन महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षाकडून अप्रचार केला जात आहे. जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम सुरू आहे, एमआयएमवर वेगवेगळे आरोप होताहेत, या बदनामीला तुम्ही कसं बघता?
उत्तर:- आमच्यावर
अशा प्रकारचे आरोप होणे हे काही आता नवीन राहिलं नाही, आताही
असे आरोप होताहेत तेही स्वाभाविक आहे. कारण दलित-मुसलमानांना घेऊन अशा प्रकारचा
प्रयोग राजकारणात पहिल्यांदा होत आहे. त्यांची पारंपरिक मते आमच्याकडे येणार या
भीतीतून ही प्रतिक्रिया आहे. असा प्रयोग होऊ शकतो याबद्दल कोणीही विचार केला नसेल.
काही लोकांना असं वाटत आलं आहे की, दलित, मुसलमान आणि ओबीसी हे फक्त मतदान करण्यासाठीच असतात. त्यांचं काम फक्त
निमूटपणे मतं देणं हेच आहे. त्यांना आमदार किंवा खासदार करायची गरज नाही. हा वर्ग
फक्त मतं देत राहील आणि आम्ही सत्तेत जाऊन बसतील, अशी
धारणा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. पण हा पायंडा आम्ही बदलू पाहतोय.
महाराष्ट्रात
असा एखादा दलित नेता मला दाखवा ज्याला या ‘सो कॉल्ड सेक्युलर’ म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांनी
घडविलं असावं. मुसलमानांच्या बाबतीतही हेच लागू होतं. मुस्लिमांत असा एखादा
व्यक्ती दाखवा जो सांगू शकेन की ‘होय मी महाराष्ट्रातील
मराठी मुसलमानांचा नेता आहे.’ काँग्रेस-राष्ट्रवादी या
राजकीय पक्षांना असं कधीच वाटलं नाही की, राज्यात दलित
आणि मुसलमानांतील नेता ग्रासरुटमधून तयार व्हावा. या पक्षांनी नेहमी हाच प्रयत्न
केला आहे की कुणाला तरी उचलायचं आणि विधान परिषद आणि राज्यसभेवर पाठवायचं. पण
जनतेमधून त्यांनी एकही असा नेता निवडला नाही जो सामान्य माणसांचे प्रश्न मांडतो.
जो कामगार, मजूर व गरीब-वंचिताच्या हक्कांबद्दल बोलतो.
सामान्यांना संधी देण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत एकत्र आलो आहोत.
आमच्याबद्दल त्यांच्या मनात भीती आहे. आम्ही जर जनमान्य व प्रभावशाली नसतो तर
त्यांनी आम्हाला दुर्लक्ष केलं असतं. पण त्यांनी आमची दखल घेतली आहे, याचा अर्थ आमचे समाजातील स्थान व उपद्रव मूल्य त्यांना कळून चुकलं आहे.
त्यामुळेच ते आमच्याबद्दल प्रत्येक जाहीर सभेत विरोधाभासी बोलतात. भाजपच काय तर
बाकीचे पक्षदेखील आमच्याविरोधात बदनामीकारक गरळ ओकत असतात. यातून असा संकेत मिळतो
की, आगामी काळात वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात उल्लेखनीय
बदल घडू शकतो.
प्रश्न:- भारिप-एमआयएम युतीवर रामदास आठवले म्हणाले होते की, सर्वच दलित आंबेडकरांसोबत नाहीत. तसेच सर्व मुस्लिमही एमआयएमसोबत नाहीत. तर काहीजण असाही आरोप करत आहेत की, दलित मतांमध्ये विभागणीचे हे षडयंत्र आहे.
उत्तर:- रामदास
आठवलेंबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी आपल्या समाजासाठी काय केलं आहे, असा प्रश्न माझ्यासहीत अनेकांना पडला आहे. त्यांनी
जर आपल्या समाज बांधवासाठी काही केलं असतं तर माझ्या मते समाजात त्यांचा आदर व
सन्मान झाला असता, पण तसं होत नाही. या उलट आज आठवलेंना समाजातून शिव्या व अवहेलनेचा सामना करावा लागत आहे.
याचा अर्थ असा की त्यांनी आधी शिवसेना व नंतर भाजपशी संधान बांधून मंत्रिपद
मिळवलं. पद मिळताच त्यांनी समाजाला वाऱ्यावर सोडलं. आठवलेंनी नेहमी फक्त आपला
स्वार्थ बघितलेला आहे.
सरकार कुणाचंही असो त्यांच्यासोबत आपण जोडून घेऊ, आपलं मंत्रिपद पक्कं करू हेच त्यांनी पाहिलंय. केंद्रीय मंत्री असूनदेखील
लोकसभा-राज्यसभेत आपल्या समाजाचे मुद्द्यावर बोलत नाहीयेत. भाजपच्या सत्ताकाळात
मुसलमानांसह दलितांचे देखील मॉब लिचिंग झाले. भीमा कोरगाव दंगल, भारत बंदवर ते गप्प होते. ज्या मुद्द्यांवर दलित समाजाचे प्रतिनिधी म्हणून
तुम्हाला बोलायचे होते. ते मुद्दे असददुद्दीन ओवैसी पार्लमेंटमध्ये उचलत आहेत. या
उलट आठवले तिथं मुशायरे गात बसले आहेत. संसद काही मुशायरा व कविता सादर करण्याचे
व्यासपीठ आहे का? राहिला प्रश्न कोण कोणासोबत आहे, ते येणारा काळ महाराष्ट्राला सांगेन.
प्रश्न:- युतीच्या
घोषणेनंतर प्रकाश आंबेडकरांबद्दलही अप्रचार सुरू आहे. त्यांच्या मतदारसंघावरून
अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. जागा वाटपांचा तिढा भारिप-एमआयएम युतीमध्ये
जागांचा निर्माण झाला आहे का?
उत्तर:- गैरसमज
निर्माण करणारे खूप आहेत. त्यांना त्यांचे काम करू द्या. आम्ही म्हणतो की
काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकरांना बिनविरोध संसदेत पाठवावं. आर. आर.
पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला विधानसभेत पाठवलं गेलं. पतंगराव कदम
यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव विश्वजीतना बिनविरोध निवडून देण्यात आलं.
दोन्ही उमेदवारी देताना जनतेला हात जोडून विनंती केली गेली की,कोणीही निवडणुका लढवू नये.
मतदारांना व विरोधी पक्षाला भावनिक आवाहन करून
त्यांना निवडून देण्याची विनंत्या करण्यात आल्या. या पक्षांना जर दलित समाजाबद्दल
एवढी आपुलकी असेल तर त्यांनी असं घोषित करावं की प्रकाश आंबेडकरांविरोधात आम्ही
कुठलाही उमेदवार देणार नाही.
प्रकाश
आंबेडकर तर बाबासाहेब आंबेडकरांचे रक्त आहेत. प्रकाशजी अनेक दिवस वाट पाहात होते
की कुणीतरी त्यांच्याशी चर्चा करेल. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष मागे वळून पाहतील
म्हणून प्रकाश आंबेडकर ४ महिने वाट पाहात होते. पण त्या पक्षानं कुठलीच हालचाल
केली नाही. आम्ही जशी भारिप-एमआयएम युतीची घोषणा केली की ते लागलीच बुके घेऊन
आंबेडकरांच्या घरी गेले. मग ४ महिने दुर्लक्ष करण्याचं कारण काय होतं. खरं
सांगायचं झाल्यास त्यांनी आत्ता भारिप-एमआयएम युतीची धास्ती घेतली आहे. त्यामुळे
आमच्याविरोधात अप्रचार केला जात आहे. त्यांनी आमच्याबद्दल खुशाल दुष्प्रचार करावा.
आम्ही फक्त त्यांना हिशोब मागत आहोत की, त्यांनी आत्तापर्यंत
किती वंचित समुदायातील लोकांना राजकारणात समान संधी देऊन निवडून आणलं आहे.
अशोक
चव्हाण आणि शरद पवार यांना आम्ही प्रश्न विचारतोय की, राज्यात
तुम्ही एखादा मुस्लिम खासदार निवडून आणू शकत नाही का? महाराष्ट्रातील
लोकसभेच्या ४८ जागांपैकी असा एकही मतदारसंघ नाही का जिथे ते आमची लोकं जाऊन निवडून
येऊ शकतील. मराठा, दलित आणि मुसलमानांतील सेक्युलर
लोकांना एका जागी एकत्र आणून त्यांना हे का पटवून दिलं जात नाही की आम्हाला
मुसलमानांतील एक-दोन खासदार निवडून आणायचे आहेत.
आम्ही काय फक्त तुम्हाला मतदान
करण्याचं गुत्तं घेतलं आहे? आम्ही यासाठी बहुजन
वंचित आघाडीचा प्रयोग करतोय, आता तर आम्ही शून्य आहोत.
याच शून्यात आम्ही हा प्रयोग करत आहोत. पराभव झाल्यास आम्हाला कुठलं असं मोठं
नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही राज्यात अनेक जागांवर निवडणुका लढवणार आहोत.
प्रश्न:- काँग्रेस
राष्ट्रवादी कुरापती व शाह-कटशाहीचे राजकारण करते, असा
आपला आरोप आहे का?
उत्तर:- ठिकंय
असं ग्राह्य धरुया की, या पक्षांना मुस्लिमांशी वैर व
भेदभाव आहे. मग ते दलितांना का निवडून देत नाही. आठवले का गेले सोडून? प्रकाश आंबेडकर तर बाबासाहेबांचं वारसदार आहेत, मग त्यांना का निवडून आणले जात नाहीत. राष्ट्रवादीला आंबेडकरविरोधात
कोणताच उमेदवार उभा करायचं नव्हतं ना, मग २०१४ला
अकोलामधून आंबेडकरविरोधात शरद पवारांनी मुस्लिम उमेदवाराला का उभं केलं?
पवारांना ठाऊक होतं की आंबेडकर मुस्लिमांच्या मताशिवाय जिंकून येऊच शकत
नाही, त्यामुळे त्यांनी ही खेळी केली. मुस्लिम उमेदवारादेखील पराभव होईल आणि प्रकाश आंबेडकरदेखील. पण बाहेर काय संदेश जाणार की, राष्ट्रवादीने
मुसलमानांना उमेदवारी दिली होती. हे कटशाही राजकारण प्रस्थापित पक्षांकडून किती
दिवस चालणार.
प्रश्न:-भारिपशिवाय अन्य प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचा एमआयएम कुठला प्रयोग राबवणार आहे का?
उत्तर:- सध्या
तरी आम्ही फक्त असा निर्णय घेतला आहे की, वंचित बहुजन
आघाडीसोबत राहायचं आहे. पुढचा निर्णय आम्ही प्रकाश आंबेडकरांवर सोपवला आहे. आमचा
प्रयत्न असा आहे की, ज्या खालच्या थरातील समाजाला गेल्या
७० वर्षांपासून मतदान करण्याचं काम देण्यात आलं होतं, त्या
लोकांना आता राजकारणात समान वाटा हवा आहे. हा वाटा मिळवून देण्यासाठी आम्ही
प्रयत्न करत आहोत. यश-अपयश हा आमच्यासाठी मोठा प्रश्न नाही, प्रत्येकांना समान संधी देऊन आम्ही लोकशाही मार्गानं निवडणुकींना सामोरं
जाणार.
प्रश्न:- एमआयएम
असं सांगत आहे की, पक्ष मराठी मुसलमानांचे नेतृत्व उभे
करू पाहात आहे. तुमच्या मते इतर पक्षांत मुसलमानांमध्ये नेतृत्व नाही का?
उत्तर:- गेल्या
७० वर्षांतली आकडेवारी बोलकी आहे, ती आधी तपासावी, तुमच्या प्रश्नांचे उत्तर आपोआप मिळेल. महाराष्ट्रात मराठी मुसलमानांचे
नेतृत्व विकसितच होऊ नये अशी मोर्चेबांधणी केली जाते. वेळोवेळी त्याला संपवण्याचं
काम केलं गेलं. एमआयएमला भाजपचे दलाल म्हटले जाते. भाजपला आमचा छुपा पाठिंबा आहे, असाही आरोप आमच्यावर वारंवार केला जातो. औरंगाबादला जिल्हा परिषदेत
काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितरित्या सत्तेत आहेत. राज्यात अशी कितीतरी ठिकाणे आहेत
जिथे काँग्रेसनं भाजप व शिवसेनेसोबत सत्तेसाठी छुपी युती केली आहे. मग आम्हाला बी
टीम म्हणून शिरजोरी का केली जाते. ते एकत्र येऊ शकतात मग आम्हालाच का दलाल म्हणतात,
खरे दलाल तर हेच पक्ष आहेत. मी जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीला उभा होतो
त्यावेळीदेखील आम्हाला बी टीम म्हटलं जात होतं. जनता त्यांच्या भुलथापांना बळी
पडली असती तर आम्ही जिंकू शकलो नसतो. उलट जनतेनं त्यांना जोड्यानं मारलं, त्यांचे औरंगाबादमध्ये डिपॉझीटसुद्धा जप्त झाले.
प्रश्न:- मध्यंतरी
तुमचा, खाद्य व पुरवठामंत्री गिरीष बापटसोबतच फोटो
फिरवून असा प्रचार केला जात होता की, बघा आम्ही सांगत
होतो ना ते बी टीमचे सदस्य आहेत. आता आमदार इम्तियाज जलीलही सामील झाले
संघवाल्यांना?
उत्तर:- राज्यात
व देशात सरकार भाजपचेच आहे. मला राज्यात कुठलंही काम करून घ्यायचे असेल तर
भाजपच्या मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटावं लागणार. पक्षीय मतभेदाशिवाय
आमच्यामध्ये मैत्री असते. विधानसभेत त्यांच्या सोबत बसावं-उठावं लागतं. राजकारणात
आमचे मतभेद असतील पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीयेत. मी २४ वर्षे पत्रकारिता
केलेली आहे. एकेकाळी मी पश्चिम महाराष्ट्राचा ब्युरो चिफ होतो. सर्व राजकीय व्यक्तींसोबत माझे चांगले व व्यक्तिगत संबध आहेत. आम्ही आजही
भेटत असतो. बोलत असतो, एकत्र चहापान घेत असतो. याचा
अर्थ आम्ही त्यांच्यात जाऊन बसलो, असं होत नाही.
मी तर
म्हणेल की देशात सर्वांत जास्त जर धोका कुठल्या संघटना
व पक्षाकडून असेल तर तो भाजप व संघाकडून आहे. अशा घटनाविरोधी संघटनेच्या लोकांना
आमचा पाठिंबा कसा असेल. भाजप हा मुस्लिमांसाठी हितकारी आहे का? याचं उत्तर साधं आहे. मगील १० वर्षांत जेवढ्या दंगली भारतात झाल्या त्याचा ‘मास्टर माईंड’ कोण आहे? आणि त्या मास्टरमाईंडला शह देण्याचं काम कुणी केलं? देशात गेल्या साडे चार वर्षांतही भयान दंगली घडलेल्या आहेत. त्यात
मुस्लिमांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि सामाजिक नुकसान झालं. याला कोणता पक्ष
जबाबदार याचं उत्तर कोणीही देऊ शकेन. भाजपच काय तर कुठल्याही पक्षाच्या भूमिका
स्पष्ट आहेत. त्यांना कोणालाच मुस्लिम प्रश्नांबद्दल काही देणं-घेणं नाही.
प्रश्न:- विधानसभेसाठी
भारिप-एमआयएम युतीचा प्रयोग झाला, तसाच प्रयत्न
लोकसभेसाठी राज्याबाहेरही सुरू आहे का?
उत्तर:- थोडसं धीर
धरा, याचं उत्तर तुम्हाला मिळेल. तुम्ही बघत राहा
आम्ही पुढे काय-काय करतो. येणारे बदल काळ ठरवेल.
प्रश्न:- लोकसभा
निवडणुकीपूर्वी देशात तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी होत आहे. यात तुम्ही कुठल्या
पक्षांसोबत असणार, कांग्रेससोबत असणार की स्वतंत्र
निवडणुकांना सामोरे जाणार?
उत्तर:- आमच्यासाठी
भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि
राष्ट्रवादी सर्व पक्ष एकसारखे आहेत. एमआयएमसाठी ही सर्व पक्ष व त्यांची प्रमुख
लोकं एकाच माळेचे मणी आहेत. यापैकी कुठल्याच पक्षाने मुस्लिमांना समान राजकीय
प्रतिनिधीत्व दिलेलं नाही. दुसरं असं की, काँग्रेसनं
भारिपला आधी विचारलं असतं तर त्यांना एमआयएमसोबत युती करायची गरज पडली नसती.
मतदारांनी त्याचवेळी म्हटलं असतं की बाबा.. रे.. काँग्रेस
आता दलितांना व मुस्लिमांना निवडून आणणार आहे, त्यांना
आमचं नेतृत्व मान्य आहे. पण या पक्षांनी आम्हाला दुर्लक्ष केलं त्यामुळेच आम्ही
एकत्र येण्याचा नवा प्रयोग केला. तुम्ही आमच्यासोबत न्याय केला असता तर आम्हालाही
बरं वाटलं असतं. पण तुम्ही अन्याय केला म्हणूनच जनतेनं आम्हाला स्वीकारलं आहे.
वाचा : सत्तेचे सेक्युलर गणित
वाचा : आधुनिक मदरसे... एक नवी पहाट!
प्रश्न:- दलित
आणि मुस्लिमांनी राजकारणात एकत्र यावं असं आपणास का वाटते?
उत्तर:- हे
दोन समाज असे आहेत ज्यांना कुठल्याही राजकीय पक्षानं फक्त वापरून घेतलं आहे.
गेल्या ७० वर्षांचा कालावधी पाहिला तर त्यांचे आर्थिक, सामाजिक, राजकीय परिवर्तन झालेलं नाही. आज भारतातील झोपडपट्ट्यात कोणता वर्ग
सर्वाधिक असतो, हे प्रत्येकांनाच माहीत आहे. अशा गलिच्छ
वस्त्यामध्ये फक्त दलित आणि मुस्लिम लोकं राहतात. त्या भागात रस्ते, पाणी गटारी आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांचा वानवा असतो. पण देशी
दारू, चरस-गांजासारखी दुकानं तिथे थाटलेली असतात.
सरकारला हे माहीत असते की, ही दारू, चरस, गांजा शरीराला अपायकारक आहेत, तरीही सरकार त्याची परवानगी देते. म्हणजे हे स्पष्ट आहे की, कुठल्याही सरकारला या वंचित समाजाची सामाजिक आणि आर्थिक प्रगती घडू
द्यायची नाही.
दिवसा
दोनशे कमवणार्या व्यक्तीला तुम्ही दारू पाजता तो आपल्या मुलांना काय खाऊ घालणार? नशेत तो आपल्या पत्नीला मारहाण करतो एकूण त्या दारूचा परिणाम संपूर्ण
कुटुंबावर होतो. सरकारला हेच हव असतं. दलित आणि मुस्लिम समाजात वंचित व शोषित गटात
मोडतो. त्याच्या वस्त्याही मिश्र स्वरुपाच्या असतात. शोषित, पीडित असल्यानं दोन्ही समाजात आपुलकीची व सदभावनेचं एक नातं तयार झालेलं
असतं. दोन्ही समाजात गरीबी व दारिद्र्य आहे. अशा समाजानं राजकारणाच्या माध्यमातून
एकत्र आले तर लोकशाही मार्गाने त्यांचे प्रश्न सोडवता येऊ शकतात.
प्रश्न:- हिंदु-मुस्लिम
कास्ट पॉलिटिक्सबद्दल आपल्या पक्षाची कोणती
भूमिका आहे.
उत्तर:- भारतात
जात आणि धर्माच्या नावाने राजकारण खेळलं जाणं काही नवीन नाही. याच आधारावर देशात
कुठलीही उमेदवारी जाहीर होते, ही वस्तुस्थिती आहे.
शिपायापासून ते पंतप्रधानांपर्यंत जातीला महत्व दिलं
जातं. अशात एक मुस्लिम मुसलमानांची भाषा बोलत असेल तर
त्यात आम्ही कसलाच गुन्हा करत नाही. यादव यादवांची भाषा बोलतात, ब्राह्मण ब्राह्मणांबद्दल सहानूभूती दाखवतो. संघवाले संघीना संधी देतात.
मराठे मराठ्यांना उमेदवारी देतात. राष्ट्रपतीची निवडणुकीवेळी असंच झालं. त्यावेळी
दलित कार्ड वापरून मते गोळा करण्यात आली. आम्ही उच्च पदावरील नियुक्त्या व
निवडणुकीबद्दल बोलत आहोत, नगरसेवक आणि आमदार तर खूप
लांबची गोष्ट राहिली.
२०१४
साली जवखेड्यातील दलित अत्याचार प्रकरणात आम्ही सर्वप्रथम तिथे गेलो. पीडित
कुटुंबाला भेटून त्यांचे सात्वंन केलं. पण सुरुवातीचे बरेच दिवस अन्य पक्ष तिथे
फिरकलेसुद्धा नाही. जिथं दलितांची हत्या होते, तिथं रिप्रेंझीटिटीव्ह पॉलिटिक्स खेळलं जातं. पण आम्ही राजकारण न करता
पीडितांच्या बाजूने बोललो. घटनेला महिना उलटला तरी कुठलीच कारवाई झालेली नव्हती.
आम्ही स्थानिक पोलिसांवर कारवाई करण्यासाठी दबाव आणला. इतकंच नाही तर खासदार
अससुद्दीन ओवैसींनी सर्वप्रथम हा प्रश्न लोकसभेत लावून धरला. आमचा पक्ष पीडित
शोषितांच्या बाजूने नेहमीच लढा देईल. कास्ट पॉलिटिक्सला आमच्याकडे थारा नाही.
प्रश्न:- पत्रकारितेत उत्तुंग यश प्राप्त असताना या नव्या इनिंगमध्ये साडे चार
वर्षांनतर आपण स्वत:ला कुठे पाहता?
उत्तर:- माझ्यासाठी
राजकारणात येणं म्हणजे एक मोठा जुगार होता. मला
हे माहीत होते की, जी ज्या एमआयएम पक्षाकडून होतो, त्या पक्षाची प्रतिमा माध्यमात नकारात्मक पद्धतीने रंगवली गेली होती. असं
असताना पराभवानंतर कोणत्याच राष्ट्रीय वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलनं मला उभंदेखील
केलं नसतं. कारण मला एमआयएमचा टॅग लागलेला होता. तरीही मी राजकारणात येण्याचं आव्हान
पेललं. परतीचा कोणताच मार्ग माझ्याकडे नव्हता, मी सो
कॉल्ड सेक्युलर पक्षाकडून निवडणूक लढवली असती तर पराभवानंतर मला त्यांनी कोठेतरी
सामावून घेतलं असतं किंवा मला काम भेटलं असतं. परंतु मी त्याच शिक्क्याखाली लढायचा
विचार केला पूर्ण ताकदनिशी लढलो आणि जिंकलो.
गेल्या
साडे चार वर्षांत विविध मोर्चांवर आम्ही आमजी बाजू मांडलेली आहे. मुस्लिम
आरक्षणाच्या प्रश्नांपासून ते निर्दोष अटक केलेल्या तरुणांची
बाजू मांडली. भाजपच्या कथित राष्ट्रद्रोहाविरोधात आंदोलनं केली. मॉब लिचिंग, त्यांच्या धर्मवादावर त्यांना घेरलं. विधानसभेत मराठवाड्याचा अनुषेश असो
वा दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, शेतकरी आंदोलनांवर सातत्यानं प्रदेशाची बांजू मांडली. औरंगाबादच्या बाह्य
नियोजनासंबधी विषय असो की शहरातील समांतर पाइपलाईनसारख्या अंतर्गत मुद्द्यावर
आम्ही जनतेच्या वतीनं भांडत राहिलो.
शहरातील दारुबंदी, रस्ते
विकासात योगदान दिलं. शिवसेनेनं घडवून आणलेल्या दंगलीत लोकांची अश्रू पुसली. सेना
खासदारांनी घोषित केलेलं केवळ हिंदूंचे नेतृत्व आम्ही नाकारलं. त्यांना सबंध
अठरापगड जाती-जमातींचे प्रतिनिधी असल्याची आठवण आम्ही काढून दिली. शहरात वाढत
असलेल्या शिवसेनेच्या मुस्लिमद्वेषाला संवादानं उत्तर दिलं. मुस्लिम समाजाच्या
प्रत्येक प्रश्नांसोबत मराठी माणसांच्या समस्या व अडचणीसंदर्भात वेळोवेळी
विधिमंडळात बाजू मांडली.
वाचा : 'मोदी 0.2' अगतिकतेचा विजय
वाचा : शपथविधी झाला अन् रोजगार घटले
प्रश्न:- एमआयएमवर
कट्टरता आणि अलगतावादाशी का जोडले जाते?
उत्तर:- महाराष्ट्रात
स्वतंत्र असं मराठी मुसलमानांचे राजकारण विकसित झालेलं नाहीये. राज्यातील मुस्लिम
युवकांमध्ये प्रचंड एनर्जी आहे. त्यांच्यात नेतृत्वक्षमता आहेत. त्यांना नेहमी
वाटते की आपला कोणी प्रतिनिधी नाहीये. त्यांच्या प्रश्नांना घेऊन कुणाही बोलत नाही
ही खंत आज राज्यातील मुसलमानांमध्ये आहे. मला वाटलं मी त्यांचा रिप्रेझेंटीटिव्ह
होऊ शकतो. अकबर ओवैसींच्या रॅलीत हजारोंचा मोठा क्राऊड असतो. आमच्या प्रत्येक
रॅलीत मोठा जनसुदाय असतो.
मध्यंतरी आमच्या एका रॅलीमध्ये काहींनी चुकीच्या
पद्धतीने घोषणा केल्या होत्या. दुसर्याच दिवशी औरंगाबादला माझी रॅली होती. त्यात
आठ ते दहा हजार लोकं होती, त्यात पुन्हा त्याच
प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. मी लगेच रॅली थांबवली. त्यांना म्हणालो माझ्या
पक्षात व रॅलीत अशा घोषणा चालणार नाही. मी कडक वार्निंग दिली. दुसर्या रॅलीत
घोषणा कमी झाल्या.
काही लोकांनी परत त्या स्वरुपाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
मी लगेच त्यांना थांबवलं म्हणालो घोषणा जर थांबल्या नाहीत तर मी पदयात्रा पुढे घेऊन जाणार नाही, इथंच
पदयात्रा बंद करेल. कार्यकर्ते नाराज झाले व घोषणा देणार्याला दमदाटी केली. मग त्यांनी अशा घोषणा देणाऱ्यांना थांबवलं. अशाप्रकारे तिसर्या दिवशी
एकही घोषणा झाली नाही, मी त्यांचे एकांगी विचार
बदलण्यास त्यांना भाग पाडलं.
आज
एमआयएमचे कार्यकर्ते सामान्य़ माणसांच्या समस्यांवर बोलतात. इतरांच्या धार्मिक
भावना दुखवणाऱ्या घोषणा किंवा विधाने आम्ही करत नाही. इतरांना शिव्या देऊन आम्हाला
सांप्रदायिक राजकारण करायचं नाही. चुकीच्या घोषणांवरून आमची मीडिया ट्रायल होते हे
आमच्या कार्यकर्त्यांना कळलं आहे. काही लोकांमुळे तुम्ही पक्षाला बदनाम करू शकत
नाही. आम्ही नेहमी म्हणत आलोय की मुसलमानांनी मुस्लिम लोकांच्या प्रश्नांना घेऊन
लढा देत असतील तर तो कसा काय अलगतावाद होऊ शकतो. आमच्या प्रश्नांवर कुठलाही
सेक्युलर म्हणवणारा पक्षा लढा देत नाही मग आम्हीच अमच्या प्रश्नांवर बोललो तर
बिघडले कुठे?
वाचा : असदसेनेचं राजकारण
२०१४च्या निवडणुकीवेळी अनेक प्रशासकीय अधिकारी भाजपमध्ये सहभागी होत होती. प्रशासनातील काही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी थेट राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील झाले. याचा अर्थ ते प्रशासनात असताना मुस्लिवद्वेषी व सांप्रदायिक होते असंच म्हणावं लागेल. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग, सत्यपाल सिंह,मेजर राज्यवर्धन राठोड, अचानक भाजपमध्ये कसं काय सामील होऊ शकतात. अलीकडे तर प्रशासनातील वरीष्ठ अधिकारीसुद्धा उघडपणे मुस्लिमविरोधी भूमिका घेत आहेत. इतकच काय तर मुस्लिमविरोधातील दंगलीतही सामील झाल्याचे अनेक बातम्या आम्ही पाहिल्या आहेत. कोण कट्टर आणि अलगतवादी कोण आहे हे या उदाहरणावरून स्पष्ट होते.
प्रश्न:- काँग्रेस
भाजपची भिती मुस्लिमांना दाखवते, तीच भिती भाजप
काँग्रेसबद्दल दाखवते. आपला पक्ष या दोघांची भिती दाखवून मुस्लिमांचा वापर करत आहे, अशी प्रत्यक्षदर्शी स्थिती दिसते, म्हणजे मुस्लिमांना आपण सतत वापरले जात आहोत अशी भावना निर्माण होतेय?
उत्तर:- आम्ही
भिती दाखवत नाहीये, तर आम्ही त्यांना उघडं पाडतो आहोत, आम्हाला तर महाराष्ट्रात येऊन साडे चार वर्षे झालेत, आमचे केवळ दोनच आमदार आहेत. आम्ही मराठी मुसलमानांना त्यांचा राजकीय वाटा
देतो आहोत. त्यांच्यातील नेतृत्वक्षमता बघून त्यांना तशी संधी देत आहोत. आमच्याकडे
आहे काय जे आम्ही मुस्लिम तरुणांना गंडवणार आहोत. जे काही आहे ते लोकांच्या
भरवशावर, लोकांनी उभं केलेला हा पक्ष आहे.
मुस्लिमांना
वाटते का एमआयएम हा आमचा पक्ष आहे. ही भावना आमच्यासाठी फार मोलाची आहे. याउलट
काँग्रेस-राष्ट्रवादी सेक्युलर असण्याचा आव आणते. त्यांचा
चेहरा सर्वांनाच माहीत आहे. मग आम्ही काय फक्त २
आमदारावर धर्मनिरपेक्षतेचं गुत्तं घेतलं आहे का? मागील
काही वर्षांपासून मुस्लिमात असुरक्षिततेचं वातावरण आहे. दहशतवादाच्या खोट्या
आरोपाखाली उच्चशिक्षित मुस्लिम युवकांना तुरुंगात डांबण्यात येत होते. मुस्लिमावर
हल्ले केले जात होते. यावर त्यावेळचा सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी गप्प होता.
गेल्या
साडे चार वर्षांत तर भारतात मुस्लिम प्रचंड असुरक्षित झालेला आहे. या सर्वाचा
परिणाम मुस्लिम मानसिकतेवर झाला आहे. देशात मुस्लिमांविरोधात तुच्छतावादाची भावना
बळकट झाली आहे. मुस्लिमांविरोधात क्षुल्लक कारणावरून हल्ले वाढले आहे. मुस्लिम
फोबिया मोठ्या प्रमाणात वाढून हेटक्राईम बळावला आहे. या संबधी आमच्या पक्षांने
लोकसभेत भूमिका घेऊन वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले. अशा असुरक्षित वातावरणात
काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका काय होती हे सर्वांनाच माहिती आहे.
भाजप
मुस्लिमांचे चेहरे वापरून त्यांना प्रलोभनं देऊन आपल्यात सामील करुन घेत आहे.
त्यामुळे विवेकी मुस्लिम तरुणात चलबिचल होऊन मुस्लिम नेतृत्व इतर ठिकाणी विभागत आहे.
देशात सक्षम मुस्लिम नेतृत्व नाही. अशावेळी एमआयएम पक्ष
मुस्लिमांचे प्रतिनिधीत्व करू शकतो. आम्ही समाजाचे प्रतिनिधी म्हणून पुढे येत
आहोत. भीतीचं राजकारण तर इतर पक्षांनी निर्माण केलं आहे. आम्ही तर मुस्लिमांना
दिशा वा दृष्टी दिली आहे. आता विचार युवकानींच करायचा आहे कोणासोबत व का जायचे.
प्रश्न:- राज्याच्या
राजकारणातील घसरत्या मुस्लिम प्रतिनिधित्वाला कोण जबाबदार आहे?
उत्तर:- राज्य
विधानसभेत मुस्लिमांचे कधी १४ आमदार होते, १४
वरून आम्ही कधी १२वर घसरलो आणि नंतर ११ वर आलो. आता फक्त ९ आहोत. विचार करा
मुस्लिम लोकसंख्या वाढत आहे परंतु मुस्लिम प्रतिनीधींचा ग्राफ खाली घसरत आहे. ही
चिंताजनक बाब नाही का? शरद पवार यांनी तर स्पष्ट
म्हटले होते की, हिंदू
मुस्लिमांना मत देण्यास तयार नाही, तर मग आम्ही काय
तुम्हाला मतं देण्याचा गुत्ता घेतलाय? पुण्यात कोंढवासारख्या भागात प्रत्येक नॉन मुस्लिम जिंकून येऊ शकतो, परंतु मुस्लिमाचा मात्र पराभव होतो. कारण नॉन मुस्लिम त्यांना मत देण्यास
तयार नाही. त्यामुळे मुस्लिम उमेदवारांचा पराभव होतो.
आम्ही शिवसेना, मनसे, काँग्रेस राष्ट्रवादी यांना मतं द्यावीत,परंतु तुम्ही आम्हाला मतं देऊ शकत नाही. ही चुकीची पद्धत येऊ घातली आहे.
मी औरंगाबादमध्ये बघितले आहे की, माझ्या सोबत ५० हजार
मुस्लिम होते तर फक्त ५०० गैरमुस्लिम होते. माझ्यासाठी ते ५०० जास्त महत्वाचे
आहेत. कारण त्यांनी मला मते दिली आहेत. त्यांनी मुस्लिमद्वेषी विचार केला नाही.
कलीम अजीम, पुणे
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com