२८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवाजीपार्क येथे झालेल्या समारंभात
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीच्या
निकालाच्या तब्बल ३६ दिवसानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. यावेळी
त्यांनी भगवा सदरा परिधान केला तसंच कपाळावर भगवा टिळा लावला होता. शपथविधीनंतर उद्धव
ठाकरे जनतेसमोर नतमस्तक झाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शपथविधीला हजर होते. उद्योगपती
मुकेश अंबानीसह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, तामीळनाडूनचे
विरोधी पक्षनेते एम.के. स्टॅलिन, ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद
पटेल, अभिषेक मनू सिंघवी, मल्लिकार्जून
खर्गे यांच्याशिवाय अन्य काँग्रेस नेते उपस्थित होते. शपथविधीनंतर उद्धव ठाकरेंना ‘मवाळ’ शिवसैनिक सिद्ध करण्याचा आटापिटा सुरू झाला.
शिवसेनेतील समर्थकांची प्रतिक्रिया अधिकृतपणे घोषित झाली नसली तरी या सरकारला
पाठिंबा देणाऱ्या समर्थक गटांचे अशा प्रकारचे प्रयत्न सुरू होते.
वास्तविक, ही
मोहीम सत्तास्थापनेच्या चर्चेपासूनच सुरू झालेली होती. पण मध्येच अजित पवार यांनी
फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करत भाजपला जवळ केलं. भल्या पहाटेच ‘देवेंद्राभिषेक’ घडवून आणत स्वत: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा चार-पाच दिवसांचा
कालावधी काँग्रेस-राष्ट्रवादी-सेनेसाठी संक्रमणाचा होता.
राष्ट्रवादीच्या समर्थकात दोन गट पडले, एकाने भाजपचे गुणगान केलं तर दूसरा अजित
पवार यांना विश्वासघातकी, शत्रू, लंका जाळणारा रावण, राक्षस दगाबाज अशा विविध बिरुदावली देत होता. हा काळ महाविकास आघाडीच्या
सत्ताकारणी धर्मनिरपेक्षतेची कसोटी पाहणारा होता. पण ही संक्रातही निघून गेली.
सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घोषित करताना तिन्ही पक्षांनी
मिळून ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’बद्दल माहिती दिली. ‘भाषा, जात,
धर्म यावरून आम्ही भेदभाव करणार नाही, राज्यघटनेची तत्त्व आणि
मुल्यांना आधारित ठेवून सरकार चालवणार’, अशी घोषणा केली. काँग्रेसची
धर्मनिरपेक्ष मूल्यं आणि शिवसेनेचं हिंदुत्व एकत्र कसं येणार, असे प्रश्न पडणे
स्वाभाविक होतं. पण किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्याच्या मराठी-इंग्रजी
प्रतीमध्ये शब्दखेळ करण्यात आला. इंग्रजी मसुद्यात ‘The alliance partners
commit to uphold the secular values enshrined in the Constitution,’ असं वाक्य आहे. या वाक्याचं मराठीकरण ‘आघाडीतील
सहकारी पक्ष हे घटनेमध्ये नमूद केलेल्या धर्मनिरपेक्ष मूल्यांशी एकनिष्ठ राहतील.’, असं केलं आहे. महणजेच मराठी
मसुद्यामध्ये थेटपणे धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरण्याचं टाळलं.
तथापि, शपथविधी
सोहळ्यानंतर सेनेला धर्मनिरपेक्ष दल सिद्ध करण्याच्या प्रक्रियेला गती लाभली.
सेक्युलर म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांची त्यासाठीची केलेली धडपड डोळ्यात भरणारी होती.
इतकेच नाही तर सुधारणावादी किंवा प्रागतिक संघटकांनीदेखील त्यासाठी मोर्चेबांधणी
सुरू केल्याचं दिसून आलं.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याचा व सत्ता संपादनाच्या
हर्षोल्हासात शिवसेनेच्या हिंदुत्ववादाच्या कट्टरतेला डोळ्याआड केलं जात आहे.
परिणामी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडी सरकारची समीक्षा फारशी
होताना दिसत नाही. तटस्थ म्हणवणारे पत्रकार व समीक्षक आणि विश्लेषकही भाजपला
सत्तेसापासून दूर ठेवल्याचा आनंद साजरा करत होते. त्यामुळे या ‘अभद्र युती’ची समीक्षा करणे गरजेचं होऊन जातं.
ज्या पद्धतीने आणीबाणीनंतर जनता दलप्रणित गैरकाँग्रेसी
राजकीय पक्षांनी जनसंघाशी युती करून हिदुत्ववाद्यांना (आरएसएस) समाजमान्यता मिळवून
दिली, अगदी त्याच पद्धतीने सध्या शिवसेनेला
सामाजिक मान्यता मिळवून देण्याचा हा प्रकार आहे.
या प्रक्रियेत सोशल मीडिया सेलिब्रेटी व अन्य सेक्युलर
पक्षाच्या लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे
इतकाच अजेंडा त्यात आहे. पण ते करताना ५२ वर्षांपासून आक्रमक हिंदुत्वाचा झेंडा
मिरवणाऱ्या फॅसिस्ट पक्षाला आपण कुठल्या अर्थाने जवळ करतोय, हे अजूनही कुणी ठामपणे सांगू शकलेलं नाही.
नवी आघाडी म्हणजे ‘दगडापेक्षा विट मऊ’ असा काहीसा प्रकार आहे. पण याचे
दूरगामी परिणाम भारताच्या राजकीय संस्कृतीवर पडणार हे नक्की. त्यातही सामाजिक
स्थित्यंतर व सांस्कृतिक चळवळीच्या अभिसरणावर त्याचा लक्षणीय परिणाम दिसून येईल.
वाचा : ‘मोदी 0.2’ अगतिकतेचा विजय
बहुसंख्यवादाचा अतिरेक
२०१४ पासून केंद्रीय सत्तेच्या वतीने भाजप मुस्लिम द्वेषावर
आधारित राजकीय हिंदुत्वाचं द्वेषकारण राबवित आहे, त्याला जन मान्यतादेखील मिळत आहे. भाजपचा हा हिंदू राष्ट्रवाद
मुस्लिमांच्या मुळावर उठलेला दिसून येतो. ‘लव्ह जिहाद’, ‘जय श्रीराम’ची घोषणा करत हल्ले, एनआरसी आणि नागरिकता संशोधन विधेयकातून हे दिसून आले. पण कुठल्याही
सेक्युलर म्हणवणाऱ्या राजकीय पक्षाला यात गैर वाटलं नाही. दुसरीकडे सामान्य
जनतादेखील मूलभूत व आर्थिक प्रश्न विसरून भाजपच्या फसव्या राष्ट्रभक्तीला शरण
गेल्याचे दिसते.
भाजपच्या प्रचारी मोहिमेचे फलित पाच दशकांपासून देशाने
जवळून पाहिले आहे. मुस्लिम समुदाय हिंसक असतो, तो चार-चार शादियाँ करतो, डझनभर मुलं जन्माला घालतो,
त्यांच्या मुली सुंदर असतात; त्या पळविल्या
पाहिजे, मुसलमान जीवे मारण्याच्याच लायकीचा असतो, त्यांना ठोकूनच काढलं पाहिजे, त्यांनी आपल्या
लायकीतच राहावे, त्यांना दुसरा देश दिलाय, मग इथं का राहतात, त्यांनी पाकिस्तानला जावं इत्यादी
इत्यादी... असा दुष्प्रचार भाजपने राबविला. त्याला साथसंगत सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या
शिवसेनेने तर दिलीच पण सेक्युलर म्हणवणाऱ्या विरोधी गटातील राजकीय गट-संघटनांनी
गप्प राहून त्याला मूक संमती दिली. कोणीही या भाजपच्या बुद्धिभेद घडविणाऱ्या असांस्कृतिक
कृत्याविषयी उघडपणे बोलत-लिहित व कृती करताना दिसून आला नाही. बहुसंख्याकांमधील
बहुतेक गैरमुस्लिमांनी या मिथकांना मान्यता देत त्याचं ओझं वाहिलं. त्यातून
मुसलमानांविरोधात दोषारोपणाची प्रक्रिया यथोचित सुरू राहिली. हिच मानसिकता ख्रिश्चन,
आदिवासी आणि अलीकडे दलित समुदायांबद्दल विकसित झालेली दिसून येते.
हिंदुत्ववाद्यांचे वांशिक हल्ले, हिंसक कारवाया, सांस्कृतिक
हस्तक्षेप, सामाजिक भेदाभेदांना (धार्मिक) राष्ट्रवादात बसविण्यात आले. त्यांच्या
कुरघोड्या, वाचाळतेला मुत्सद्देगिरी म्हटले गेले. २०१४नंतर
या प्रक्रियेला गती आली. भाजप-संघप्रणीत धर्म-वर्ण-जात वर्चस्ववादी राजकारणाला
विकासाचे मुलामे चढविण्यात आले. संघ-हिंदुत्ववाद्याची कोणतीही मुस्लिमविरोधी कृती तथा
निर्णये देशभक्ती असते, अशा बहुसंख्याकांचा समज करण्यात प्रचारी
यंत्रणा यशस्वी झालेल्या आहेत. तरीही समाजातील एका मोठा वर्ग गट व राजकीय
संघटनांनी या द्वेशी राजाकारणाचा सतत विरोध केला.
संघ व भारतीय जनता पक्षासंदर्भात बहुसंख्याकाचं मत आजच
बदललं असं नाही, त्याला १९७७ पासून
सुरुवात झालेली होती. आज भाजप सत्तेचा गैरवापर करून ज्या पद्धतीने संसदीय लोकशाही
प्रणालीचं वस्त्रहरण व चिरफाड करत आहे, त्याला त्यावेळचे
सगळेच गैरकाँग्रेसी पक्ष विशेषत: समाजवादी-लोहियावादी जबाबदार आहेत. त्यांनी संघ-जनसंघ
(भाजप)ला भारतीय समाजात, जनमाणसात अधिमान्यता मिळवून दिली
होती. त्यामुळेच आज संघ-भाजपची कुठलीही लोकशाहीविरोधी कृती, मुस्लिमविरोध,
जातवर्चस्व, धर्मांधता व वर्णश्रेष्ठत्वाच्या राजकारणाचं दैनंदिन व्यवहार म्हणून
सामान्यीकरण झालं आहे. शिवसेनेच्या बाबतीतही भविष्यात असेच काहीतरी झालेलं दिसेल.
कारण फॅसिस्ट शिवसेनेला मान्यता मिळवून देण्याचं ‘कंत्राट’
सेक्युलर म्हणवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी या आघाडीच्या राजकीय पक्षाने घेतलं
आहे. कारण काय तर भाजपला सत्तेपासून (की सत्तेपासून दूर राहता येत नाही म्हणून)
दूर ठेवायचं.
सेनेचं आक्रमक धोरण, अस्मितावादी राजकारण, गुंडगिरीला (कथित स्टाईल), राजकीय हिंदुत्वाला, दक्षिण
भारतीय व मुस्लिमांविरोधात द्वेशाला अधिमान्यता मिळवून देण्याचा हा खरा आटापिटा
आहे. (दुसरीकडे सेक्युलर म्हणवणारे पक्ष राजकीय पटलावरून संपण्याची शक्यताही
नाकारता येत नाही). सत्ता संपादनासाठी धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांनी एकत्र
येऊन ही स्वार्थी खेळी केली आहे.
वाचा :उजव्या राजकारणात डाव्या पक्षांची अपरिहार्यता
वाचा : शपथविधी झाला अन् रोजगार घटले
सामान्यीकरणाची मोहीम
महाविकास आघाडीच्या प्रयोगाच्या निमित्ताने [भाजपविरोधी] सर्वजण शिवसेनेला
नेमस्त हिंदुत्वाच्या चौकटीत बसवित आहेत. सेनेला जहाल व आक्रमक हिंदुत्वाच्या चौकटीतून
बाहेर काढू पाहत आहेत. शिवसेनेला व पर्यायाने उद्धव ठाकरेंना मवाळ सिद्ध करण्याचे
धोरण मोठ्या पातळीवर राबविण्याची मोहीम सुरू झाली. त्याकरिता मोठ-मोठे वृत्तलेख प्रकाशित होत आहेत. शिवाय सोशल
मीडियातील न्यूज फीडवर कौतुकाचा वर्षांव चालू आहे. मुळात हे सर्व चर्चाविश्व
कृत्रिम व पूर्णत: शाब्दिक तथा कल्पनाविलासी जाणवते. कारण भाष्यकारांनाही भाजपला
सत्तेबाहेर ठेवलं हाच आनंद दिसतो.
या प्रयोगात गेल्या ५ वर्षांत मोदींच्या कर्मठ हिंदुत्वाचे
समर्थक राहिलेल्या शिवसेनेच्या आक्रमक व ब्राह्मण्यवादी राजकारणाकडे पूर्णत: दुर्लक्ष झालेले दिसते. या प्रक्रियेत
मुस्लिम समाज नगण्य किंवा बेदखल झालेला आहे. किंबहुना अबू आज़मी (सप), मुफ्ती
इस्माईल व फारुख शाह (एमआयएम) उघडपणे उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर
आनंदोत्सव साजरा कराताना दिसले. असं असलं तरी बिगरभाजप राजकारणातील तथाकथित
सेक्युलर पक्षाने मुस्लिमांना गृहितही धरलं नसावं. वास्तविक, सर्वच बिगरभाजप
पक्षाला मुसलमानांसंदर्भात काहीच पडलेलं नाही. हक्काची मते घेणाऱ्यांनीदेखील
लोकसभा निवडणुकीत मुसलमानांना खिजगणतीत काढलं. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’मध्ये शिवसेनेची
मुसलमानांसंदर्भात काय भूमिका असेल, हा प्रश्न विचारणे किवा
तसा विचार करणे कुणालाही अद्याप शक्य झालेलं नाही.
वस्तुत: उद्धव
ठाकरे खुर्चीच्या मोहापायी संयत भाषा वापरताना दिसत आहेत. पण निवडणूकपूर्वीची
त्यांची भाषणे यूट्यूब केली तर त्यांचं रौद्र व वर्णभिमानी हिंदुत्ववादी रूप समोर
येईल. त्यांनी ज्यापद्धतीने निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत ‘सेक्युलर’
म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांच्या विरोधात मोहीम सुरू केली होती,
त्यांच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांची खिल्ली उडवली. पण तुर्त
त्यासंबधी चर्चा कुणालाही करायची नाही.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात औरंगाबादच्या जाहीर सभेत
त्यांनी खासदार ओवैसींना हिरवा साप म्हणत त्यांना जमिनीत गाडण्याची भाषा करतात.
त्यापूर्वी त्यांनी मणिशंकर अय्यर यांना बुटाने मारण्याची घोषणा केली. काँग्रेसचे
तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधींना बावळट म्हणत त्यांचा बौद्धिक समतोल ढासळल्याचं
म्हटलं.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह
यांच्या विरोधात अपशब्द (ते इथे कोट करता येत नाहीत) वापरले होते. आज
काँग्रेसनेदेखील सत्तेच्या मोहापायी आपल्या ५२ वर्षांच्या राजकीय शत्रूविरोधात
झापडबंद भूमिका घेतली आहे. किंबहुना ही युतीचे प्रयोग ठरवून झालेले दिसतात. यातून शिवसेना-काँग्रेसची
जुनी मैत्री वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका येते.
वाचा : 'मनातील हिंदू-मुस्लिम बायसचे काय करायचे?'
संधी साधण्याचा इतिहास
इतिहास पाहिला तर काँग्रेसने शिवसेनेला वेळोवेळी राजकीय मदत
केल्याचं दिसतं. शिवसेनेलाही सत्तेसाठी सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षाची प्रत्यक्ष व
अप्रत्यक्ष मदत घ्यावीशी वाटली. १९६६ साली झालेल्या स्थापनेपासून काँग्रेसशी
हातमिळवणी केल्याचा इतिहास फाइलबंद आहे. १९६७च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने
काँग्रेसचा प्रचार केला. इतिहास सांगतो की, त्यावेळी आचार्य अत्रे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नांडिस, द.रा. गोखले तसंच व्ही.के. कृष्ण मेनन
मुंबईतून काँग्रेसच्या विरोधात रिंगणात होते. तेव्हा ह्या सर्वांच्या विरोधात बाळ
ठाकरेंनी ‘मार्मिक’मध्ये अग्रलेख
लिहिला होता. त्याचं शीर्षक ‘पंचमहाभूतांना गाडा!’ असं होतं.
पुढच्याच वर्षी १९६८ मध्ये मुंबई
महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यात शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरली.
त्यावेळी सेनेने काँग्रेसविरोधी मधू दंडवते यांच्या प्रजा समाजवादी पक्षाशी
हातमिळवणी केली. समाजवाद्यांनाही बाळ ठाकरे यांची मदत स्वीकार्य होती.
एकेकाळी समाजवाद्यांची एक घोषणा खूपच चर्चेत होती, ‘रात्र संपली पण उजाडलं कुठं? शिवसेना आली तर बिघडलं कुठं?’ म्हणजे फॅसिस्ट
पक्षाच्या उभारणीत समाजवाद्यांचा वाटा होता, हे यातून स्पष्ट होतं. म्हणजे या
काळातील इतर गैरकाँग्रेसी पक्षांचं मुस्लिमाविषयी आकलन, दृष्टिकोन व मांडणी लक्षात
घेतली तर आरएसएसपेक्षा ते अधिक धोकादायक वाटतात. किंबहुना हिंदुत्ववादी आणि
उपरोक्त बिगरकाँग्रेसी (आणि काँग्रेसीही) यांचं मुस्लिमांविषयीच्या पूर्वग्रहात
फारसे अंतर जाणवत नाही.
शिवसेनेला मुंबई
महापालिकेत सत्ता
स्थापनेची संधी आली त्यावेळी ‘इंडियन
युनियन मुस्लिम लिग’च्या जी.एम. बनातवालासोबत साटंलोटं केलं.
अशा पद्धतीने महापालिकेत सेनेची पहिली सत्ता स्थापन झाली. हे तेच बनातवाला होते,
ज्यांच्याविरोधात निवडणुकीत सेनेने मुंबईतील हिंदू वस्तीत जाऊन आक्रमक
शैलीत बनातवालांच्या विरोधात प्रचार केला होता.
पुढे शिवसेनेने १९७५ला इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीचं ‘शिस्तपर्व’ म्हणत स्वागत केलं व उघड समर्थन दिलं. इतकंच नाही तर १९७७ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात सेनेने उमेदवार दिले होते. परंतु पदरी निराशा आली. इंदिरा गांधीची सत्ता गेली व जनता पक्षाचे मिलीजुली सत्ता स्थापन झाली. दुर्दैवाने पुढच्या दोनच वर्षात राजकीय पटलावर सत्तासंघर्ष झाला व त्यात जनता सरकार कोसळलं. त्यानंतर झालेल्या मध्यावधी निवडणुकीत इंदिरा गांधींनी पुन्हा दिल्ली काबीज केली. तसं शिवसेनेचं धोरणही बदललं.
![]() |
(मीरा रोड भागातील एका गृहप्रकल्पाचे उद्घाटनप्रसंगी बनातवाला आणि बाळ ठाकरे) |
वाचा : एमआयएम-वंचित युती अन् (राजकीय) पुरोगामित्व
हिंसक इतिहास
शिवसेनेचं राजकारण जातीय, वांशिक, धार्मिक विशेषत्व आणि बहुंताश प्रमाणात वर्णवर्चस्ववादी राहलेले आहे. प्रा. गोपाळ गुरू म्हणतात त्याप्रमाणे, “शिवसेनेच्या विशेषतत्वाचा आधार धुरीणत्व नसून प्रभुत्व हाच होता. त्यामुळेच इतरांबद्दल तिरस्कार, घृण आणि इतरांना दुय्यमत्व देण्याची मानसिकता त्यात अनुस्यूत होती.”
१९७०च्या भिवंडी-जळगाव दंगलीनंतर शिवसेना भूमिपूत्र म्हणजे दक्षिण भारतीयांच्या विरोधाचा मुद्दा सौम्य करत मराठी मुसलमानांवर उलटली. साठच्या दशकाच्या अंतिम टप्प्यात शिवसेना सांप्रदायिक राजकारणाचा आक्रमक राजकीय पक्ष म्हणून पुढे आला. तज्ज्ञ सांगतात, सांप्रदायिकतेचा असा चेहरा देशाने यापूर्वी कधी पाहिला नव्हता.
पाच वर्षे सत्ता चालविताना शिवसेनेने हिंदुत्वाचा ‘साधन’ म्हणून वापर केला, पण त्याला ‘साध्य’ बनविले नाही. उलट सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेने पुन्हा राजकीय हिंदुत्वाची आक्रमक शाल पांघरली. नव्या काँग्रेस आघाडी सरकारविरोधात शिवसेनेने धारण केलेले हिंदुत्ववादी वर्तन अद्याप कायम होतं.
सत्तेत येताच विलासराव सरकारने १९९३च्या मुंबई दंगलीप्रकरणी सेनाप्रमुख बाळ ठाकरेंना अटक करण्याची घोषणा केली, त्यावेळी मुंबईत दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. नंतरच्या काळात या खटल्यातून ठाकरेंचे नावच वगळ्यात आलं. अशाच रितीने अनेक फौजदारी खटल्यातून त्यांचं नाव नाटकीयरित्या अदृष्य झालं. मुस्लिमविरोधाचे प्रत्येक साधन वापरत सेनेने पक्षसंघटना अधिक मजबूत केली. शिवरायांचा वापर साधन व साध्य म्हणूनच केला. यात राजकीयदृष्ट्या काही गैर नव्हते. पण ग्रामीण व शहरी भागात शिवसैनिकांनी शिवरायांच्या नावाचा वापर मुस्लिमांच्या शत्रुकरणासाठी केला. समाजात मुस्लिमाबद्दल सामाजिक द्वेश, हिणकसपणा आणि तुच्छतावाद वाढविला. याच जमीनीवर भाजपने विषपेरणी करत द्वेश व तुच्छतेला ‘साध्या’चं स्वरूप दिलं. शिवसेनेची ती राजकीय कृती आजतागायत मराठी मुसलमानांची पाठ सोडत नाही.
गेली ५० वर्षे शिवसेनेने मराठी माणूस, मराठी भाषा, परप्रांतीय, भूमिपूत्र, संस्कृती, जीवनशैली म्हणत बेजबादार वर्तन केलं. आक्रमक भाषणबाजी, झुंडशाही, दादागिरी, गुंडागर्दी केली. प्रबोधन चळवळीवर हल्ले चढवले. संस्कृतीच्या नावाने चित्रपटाचे शो बंद पाडले. व्हॅलेटाइन सारख्या उत्सवाला धार्मिक रंग दिला. दुकानाच्या अमराठी फलकावर काळे फासले, त्यांचा विध्वंस केला. संपादक, पत्रकार, मराठी नाटककारांवर गुंड सोडले.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीला विरोध केला. इथपर्यंत थांबले नाही तर दलित समाज व आंबेडकरांवर विकृत पद्धतीने घसरले. म्हणतात, ‘‘भाकरीचे पीठही ज्यांना मिळत नाही, त्यांना विद्यापीठ कशाला? …मराठवाड्याचे नाव पुसून आंबेडकरांचं नाव कशासाठी?” मराठी मुसलमानांना लांडे, पाकडे, दहशतवादी म्हणून हिणवले. त्यांच्याविरोधात अश्लिल/शिवराळ भाषेला प्रस्थापित केलं. ‘हू किल्ड करकरे’ या एम.एम. मुश्रीफलिखित पुस्तकात लिहिलं आहे की, मुसलमानांविरोधात हल्ले करण्यासाठी हिंदूंची आत्मघाती पथके स्थापन करण्याचं खुलं आवाहन शिवसेनेने केलं होतं.
प्रसिद्धी माध्यमांनीदेखील सेनेच्या दहशतीखाली लोंटगण घातलं. ‘ठाकरे/सेना स्टाइल’ म्हणत त्याच्या गुंडगिरीला अधिमान्यता मिळवून दिली. हल्ले करणे, दंगल घडविणे, तोडफोड करणे, मारझोड करणे, हाणामारी करणे, विषारी वातावरण तयार केलं. महाराष्ट्रात आपली राजकीय दहशत स्थापन करण्यासाठी जे शक्य होईल ते केलं.
ही कथित ‘ठाकरे स्टाइल’ अद्याप सुरू होती. २०१६ साली लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये एका मु्स्लिम पोलीस अधिकाऱ्याला जबर मारहाण केली. हा पोलीस अधिकारी कर्तव्यावर होता. शिवजयंतीच्या कार्यक्रमाला चौकात परवानगी दिली नसल्याने त्याला मारहाण करत गावातून धिंड काढली. हिंसा करणारे आरोपी शिवसेनेशी संबंधित होते. शिवबाच्या नावाने मुसलमानात दहशत माजवण्याचं काम सेनेनं आजतागायत केल्याचं उपरोक्त संदर्भातून दिसून येते.
बाबरी उद्ध्वस्तीकरणानंतर शिवसेना महाराष्ट्रात वाढली व विकसित झाली. शिवसेना धर्मवादी राजकारणात भाजपपेक्षा अग्रेसर राहिली. परिणामी धर्मकेंद्री राजाकारणामुळे सेना प्रथमच महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झाली. आज आयोध्या वादावर न्यायालयीन तोडगा निघाला आहे. योगायोग असा की, पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या सत्तेवर विराजमान झालेला आहे. तेही स्वत:ला सेक्युलर म्हणवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी सारख्या राजकीय पक्षाच्या पाठिब्यावर!
वाचा : लव्ह जिहाद : द्वेशवाद्यांची नसती उठाठेव !
वाचा : अभिव्यक्तीची शिवसेनाप्रणित मुस्कटदाबी
नवी आव्हाने
उपरोक्त संदर्भ पाहिल्यास आज शिवसेना बदलेल (सेक्युलर झाली) आहे जे सांगणे घाईचं ठरेल. आरएसएस बदलणार नाही हे सर्वांना ठाऊक आहे. संघ गेल्या सात-आठ दशकांपासून बदलाची भाषा करत आहे, परंतु आपलं वर्णवरच्सववादी राजकारण त्याने अद्याप सोडलं नाही. सेनाही परिवर्तनाची भाषा करत आहे, तरी ती पुन्हा त्याच वळणावर जाताना दिसेल. परंतु जर खरोखरच शिवसेना बदलत असेल तर त्याचं सर्वांकडून स्वागत होईल. सर्वप्रथम मुस्लिम समुदाय - जो गेली ५ दशके सेनेच्या जहाल हिंदुत्वाचा क्रमांक एकचा शत्रू राहिला आहे, तोसुद्धा सेनेचं ‘खुशामदिद’ करायला सर्वांत पुढं असेल.
तत्पूर्वी सेना सत्तेसाठी तात्पुरती बदलली असं सांगता येईल. जर शिवसेना बदलत असेल तर त्याचं स्वागत आहे. पण तसं करण्याची शक्यता कमी आहे. कारण सेनेने मतपेढीसाठी ज्या पद्धतीने जमातवाद पोसला, मराठी मुसलमानांचे सांस्कृतिक उद्ध्वस्तीकरण केले व त्याचे बळकटीकरण केले या सर्वांची सवय ज्या मतदार व शिवसैनिकांना झाली, ते राजकीय लाभधारक गट सेनेला बदलू देणार नाही. किंवा असंही होईल की त्यांच्यासाठी शिवसेना बदलणार नाही. पण केवळ ‘सेक्युलर’ मुद्द्यावर बदलून भागणार नाही, तर सेनेला ब्राह्मण्यवादी राजाकारणाला तिलांजली द्यावी लागेल, जात-वर्ण श्रेष्ठीचं राजकारण बाजुला टाकावं लागेल. त्याचप्रमाणे वंश सांस्कृतिकदृष्ट्या भारतीय असलेल्या मुस्लिम समाजासंदर्भातील आपली वादग्रस्त भूमिकेचं विसर्जन करण क्रमप्राप्त आहे.
संस्कृती रक्षणाच्या नावाखाली केलेल्या असांस्कृतिक कृत्याबद्दलही शिवसेनेला दिलगिरी व्यक्त करावी लागेल.
मुस्लिम आरक्षणावर सेनेने भूमिका घेतल्याचं वाचनात आलं. पुढचा टप्पा म्हणून सेने औरंगाबाद परिसरात प्रस्तावित अलीगड विद्यापीठाच्या उपकेंद्राला मान्यता द्यावी. हे विद्यापीठ केवळ मुसलमानांसाठी नाही तर मागास मराठवाडा परिसरातील सर्व जाति-समुदायाच्या विद्यार्थ्यांना लाभान्वित करणार आहे.
शिक्षणासारख्या पवित्र कार्याला शिवसेनेनं केवळ ‘मुस्लिम’ शब्दामुळे आक्षेप नोंदवत खोडा घातला, जे सयुक्तिक नव्हतं. सेनेने आपल्या बदलत्या धोरणानुसार विद्यापीठाच्या उपकेंद्राला तात्काळ मान्यता द्यावी. त्यामुळे झापडबंद होऊन शिवसेनेच्या फॅसिस्ट प्रवृत्तीला शरण जाण्यापूर्वी थोडेसे थांबून त्याची समीक्षा करावी.
शिवसेनेकडून परिवर्तनाची अपेक्षा केली जाऊ शकते. कारण शिवसेनेच्या केंद्रस्थानी मराठी मातीच्या मुद्द्यावर राजकारण (भावनिक का असेना) राहिलं आहे. या महाराष्ट्रीय संस्कृतीत सर्वांना सामावून घेणं व सर्वसमावेषी तत्त्वे भिनली आहेत. त्यामुळे शिवसेना बदलेल असा आशावाद बाळगणे वेळेची राजकीय आघाडीची गरज आहे. जर सेना बदलत असेल तर प्रागतिक महाराष्ट्र त्याचं स्वागत करेलच.
जाता जाता -
अजित पवार यांचे बंड ही बातमी वृत्तपत्राचा इतिहास बनून रद्दीत गेली. पण देशाच्या स्मरणात हे बंड आहे. सेक्युलर म्हणवणाऱ्या राजकीय पक्षाचे प्रमुख नेते एका रात्रीतून फॅसिस्ट पक्षाचं हात धरतात, त्यावर मात्र काहीच चर्चा होत नाही. कुठलाही मोठा लिडर यावर अजूनही बोलला नाही. म्हणजे झाकली मूठ सव्वा लाखाची अशी ही गत आहे.
हिंदुधर्मभिमानी, वंश-वर्णवादी, जातिव्यवस्थेचं समर्थन करणारे आणि दलित-मुस्लिमविरोधी अशी प्रतिमा असलेला भाजप एका सेक्युलर नेत्याला आपल्या इशाऱ्यावर दिशा व भूमिका बदलायला भाग पाडतो. एका निर्णयानं राष्ट्रवादीचे अनेक आमदार एकाएकी हिंदुत्ववादी होतात. सर्व पक्ष भाजपात विलीन करतात, यावर चर्चा का होत नाही. निष्पक्ष म्हणवणारे पत्रकार व राजकीय विश्लेषकही यावर गप्प आहेत, ही कोंडी कधी फुटेल का..?
(सदरील लेखाचा संपादित भाग २ डिसेंबर २०१९ला अक्षरनामा संकेतस्थळावर प्रकाशित झालेला आहे.)
कलीम अजीम, पुणे
मेल-kalimazim2@gmail.com

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com