आंबेडकरांना ‘फॅशन’ म्हणणारे अमित शाह, कोणाच्या मनाचं बोलले?


राज्यघटनेवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. आंबेडकरांना घेऊन एक वादग्रस्त विधान केलं. १८ डिसेंबर २०२४ रोजी राज्यसभेत भाषण करताना विरोधकांना उद्देशून शहा म्हणाले, “आजकाल आंबेडकरांचं नाव सारखं सारखं घेणं ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचं नाव घेतलं तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल.” या विधानाआधी अमित शाह म्हणाले होते की, “आंबेडकरांचे नाव तुम्ही १०० वेळा जरी घेतले, तरी तुम्हाला आंबेडकरांविषयी काय वाटते, हे मी सांगतो.

श्री. शहा यांचं हे विधान सहज नव्हतं. त्यांच्या देहबोलीतून हेतू दिसून येत होता. शहा म्हणाले, काँग्रेसच्या काळात आंबेडकरांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला. काँग्रेसने आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध केला. आम्ही त्यांचे पुतळे उभे केले. काँग्रेसच्या कलम ३७० बाबतच्या धोरमामुळे त्यांनी राजीनामा दिला.... इत्यादी..

वस्तुत: आंबेडकरांना हा राजीनामा हिंदुवाद्यांच्या सततच्या हल्ल्यामुळे तयार झालेल्या स्थितीमुळे द्यावा लागला होता. हिंदू कोड बिल लागू होऊ नये म्हणून आरएसएस व अन्य हिंदुवाद्यांनी आंबेडकारांना विरोध केला होता. त्यांना धर्मद्रोही म्हटलं होतं. म्हणजेच शहा यांनी अर्धसत्य कथन केलेलं आहे. खरी वस्तुस्थिती त्यांनी लपवून ठेवली. वास्तविक आंबेडकरांचे हे राजीनामा पत्र भाजप सरकारच्या काळात २०२३ला केंद्रीय रेकॉर्डमधून गहाळ झालेलं आहे. मूळ पत्र उपलब्ध नसल्याने शहा यांच्या कथनाच्या सत्यतेवर संदेह निर्माण होतो.

डॉ. आंबेडकर स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात कायदामंत्री होते. कायदामंत्री म्हणून त्यांनी तयार केलेलं हिंदू कोड बील हे हिंदू धर्माअंतर्गत जाचक रुढी परंपरावर प्रहार होता. स्त्री-पुरुष असामनतेवर मजबूत तोडगा होता. या विधेयकद्वारे भारतीय स्त्रियांना जाचक रुढी आणि परंपारमधून मुक्त करावं, त्यांना कायदा व दर्जा प्राप्त देण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न होता. हिंदू धर्मात स्त्रियांना संपत्तीचा अधिकार नव्हता, त्याचप्रमाणे स्वत:हून स्त्री घटस्फोटही घेऊ शकत नव्हती. हिंदू विधवा कायदेशीररित्या पुनर्विवाह करू शकत नव्हत्या, त्यांना पती किंवा वडिलांच्या मालमत्तेवर दावा करता येत नव्हते. अशा हिंदू स्त्रियांना या विधेयकातून समान अधिकार मिळणार होते.

विधेयकातील द्विभार्या, घटस्फोट, संपत्ती व वारसा या कलमांना हिंदुत्ववादी मनोवृत्तीच्या प्रवृत्तींनी प्रचंड विरोध केला. बिलाविरोधात देशभर निदर्शने, धरणे आंदोलने सुरू झाली. देशभरातील हिंदुवादी नेते आणि पुराणमतवादी संघटना एकत्र आल्या. त्यांनी या विधेयकाला हिंदू धर्माविरुद्ध षडयंत्र घोषित केलं. डॉ. आंबेडकर हिंदू धर्माला भ्रष्ट करत आहे, असा आरोप केला गेला.

सत्तापक्षातील अनेक सदस्य होते. खुद्द राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद, गृहमंत्री सरदार पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी देखील कर्मठ विरोध दर्शवला. राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांनी नेहरूंनी तिखट भाषेत पत्र पाठवली. त्यांनी नेहरूंच्या निर्णयाला कठोर म्हटलं. सातत्याने वाढणारा वाद नेहरूंच्या लक्षात आला पण त्यांनी निर्धार केला. सगळा दोष आपल्यावर घ्यावा लागला आणि आजूबाजूच्या आक्षेपांना तोंड द्यावे लागले तरी ते विधेयक मंजूर करून घेण्यावर ते ठाम होते.




श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित मालवीय हे सनातनी हिंदुवाद्यांचे अग्रणी पुढारी होते. संसदेबाहेरही आंदोलन चिघळले. आरएसएस व हिंदू महासभा तथा तत्सम हिंदुवाद्यांनी हा विरोध देशभरात नेला. स्वामी करपात्री महाराज देशभर फिरून हिंदू कोड बिलाच्या विरोधात भाषणे देत सुटले. त्यासाठी त्यांनी ‘अखिल भारतीय राम राज्य परिषद’ नावाची संघटना स्थापन केली. करपात्रींनी आगपाखड करत म्हटलं, हिंदू कोड बिल हिंदू प्रथा, परंपरा आणि धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. तमाम हिंदू संघटनांनी नेहरू आणि आंबेडकर यांच्या निषेध रॅली काढल्या.

जनसंघ (आताचा भाजप), आरएसएस, हिंदू महासभा व अन्य हिंदूवाद्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात निदर्शने केली. त्यात वरासा हक्काचा दावा करणाऱ्या व पतीच्या मालमत्तेशिवाय घटस्फोट घेण्याऱ्या महिलांच्या अधिकाराला हिंदूविरोधी म्हटलं गेलं. हिंदुवाद्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांना हिंदू धर्मद्रोही घोषित केलं. हिंदुवाद्यांनी प्रचारित केलं की, आंबेडकर पूर्वाश्रमीच्या अस्पृष्य वागणुकीचा आमच्याकडून बदला घेत आहे.

आंबेडकरांना देशद्रोही व हिंदू धर्माचे शत्रू ठरविण्यात तमाम हिंदुत्ववादी संघटना, व्यक्ती आघाडीवर होते. सत्ताधारी काँग्रेसचे धर्मनिरपेक्ष पुढारी असो वा प्रतिगामी सनातनी सर्वांनी एकजात या बिलाच्या विरोधात होते. बाबासाहेबांनी भावनिक अपील केली की, हे विधेयक पारीत होण्यास सर्वांनी सहकार्य करावं. सुधारणेच्या युगात स्त्रियांना समान हक्क द्यायला तुम्ही विरोध का करत आहेत. परंतु विरोध कायम राहिला. बाबासाहेब एकटे पडले. ते संबंधित बिल संमत व्हावं म्हणून ते एकटेच लढले. पण दुर्दैवाने सत्र संपताना या विधेयकाची फक्त ४ कलमेच मंजूर होऊ शकली. पंतप्रधान नेहरूंनी निवडणुकांपर्यंत विधेयकाला स्थगिती दिली. परिणामी अत्यंत दु:खी होऊन डॉ. आंबेडकरांनी २७ सप्टेंबर १९५१ला कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.

आंबेडकरांच्या राजीनाम्याने पंतप्रधान नेहरू व्यथित झाले. हे बिल पारीत व्हावं यासाठी त्यांनीही खूप प्रयत्न केले होते. नेहरू आधुनिक विचारांचे होते परंतु आपल्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांना ते संमत करू शकले नाहीत.

भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका १९५१ मध्ये होणार होत्या. नेहरूंनी देशाची ही पहिली निवडणूक हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर लढली. नेहरूंच्या नेतृत्वात काँग्रेसने बहुमताने विजय मिळवला. आंबेडकरांनी ‘शेड्युल कास्ट फेडरेशन’ या पक्षाकडून निवडणूक लढविली. ते उत्तर मुंबई या राखीव मतदारसंघातून रिंगणात होते. परंतु आंबेडकरांचा १४ हजार मतांनी पराभव झाला. काँग्रेसचे नारायणराव काजरोळकर विजयी झाले. काँग्रेसने ठरवून आंबेडकरांचा पराभव केला, असंही म्हटलं गेलं.

सत्तेत आल्यावर नेहरूंनी हिंदू कोड बिलातील अनेक तरतुदी शिथिल केल्या काही काढून टाकल्या. त्यांनी या बिलाचे अनेक भाग केले व वेगवेगळ्या वेळी मंजूर करून घेतले. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले हे चार हिंदू कायदे म्हणजे, (१) हिंदू विवाह कायदा, (२) हिंदू वारसाहक्क कायदा, (३) हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा आणि (४) हिंदू दत्तक व पोटगी कायदा होय.

आंबेडकरांच्या राजीनाम्याला एकमेव मोठे कारण हिंदू कोड बील पारीत करण्यात सनातनी काँग्रेसचे पुढारी यांनी माजवलेली अशांतता व सनातनी हिंदुवाद्यांचा आक्रोश होता. परंतु अमित शहा आंबेडकरांची बाजू उचलून घतना अत्यंत धुर्तता व चलाखीने सर्व आरोप काँग्रेसवर करून मोकळे होतात.

सनातनी हिंदू आजही आंबेडकरांना हिंदू धर्माचा शत्रू म्हणतात. अमित शहा यांचे राज्यसभेतील विधान या क्रमातील होते. ते सहज बोलून गेले नाहीत, तर आंबेडकरांविषयी असलेला सनातनी आकस व द्वेशबुद्धी त्यांनी जाहीरपणे मांडलेली दिसून येते. अमित शहा आरएसएस व भाजपच्या मनातलं बोलले. संघ शाखेतील बौद्धिकात, संघवादी मंडळीच्या माजघरात, खोलीत गुप्तचर्चा व कान गोष्टींमध्ये आंबेडकरांविषयी जी चर्चा होते तीच अमित शहा बोलत आहेत.

वाचा : सावरकरांच्या बढाईकरणाचं सांस्कृतिक षड्यंत्र !

वाचा : सावरकर स्वातंत्र्यवीर कसे?


शहा यांच्या विधानाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आंबेडकरांचा महात्म्य नाकारू शकत नाही, यामुळे सनातनी हिंदू व त्यांच्या संघटनांनी नाइलाजाने आंबेडकरांना जवळ केलं आहे. कारण त्यामागे राखीव जागांच्या मतपेढीचं गणित आहे. त्यामुळे ओढून-ताणून आंबेडकरांना हिंदू धार्जिणे ठरविण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने होते आहे. भाजप-आरएसएस केवळ राजकीय अडचण (शहांच्या भाषेत फॅशन) म्हणून आंबेडकरांचं नाव घेत आहे.

संघ-भाजपचे आंबेडकर प्रेम बेगडी आहे. ते राजकीय आहे. ते आत्मीय नसून व्यावहारिक आहे. भाजप-संघाची आंबेडकरांविषयी जाहिर व छुपी भूमिका वेगवेगळी आहे. त्याचे असंख्य पुरावे दिसून येतील. आंबेडकरांशी सहसंबंध जोडण्याकरिता जाहिर भूमिका घेणारा संघ आणि संघाच्या बौद्धिकात, शाखेत सांगितले जाणारे आंबेडकर दोन्ही वेगवेगळे आहे. हे वगेळेपण अनेक घटना-कृतीतून दिसून येते.

संघ-भाजप एकीकडे मनुस्मृतीला जवळ करते तर दुसरीकडे राज्यघटनेचे गोडवे गाते. हे कसं शक्य आहे? बाबासाहेबांनी मनुस्मृतीला मानवतेविरोधी म्हणून सार्वजनिक दहन केलं होतं. परंतु आज भाजप-संघाचे अनेक पुढारी मनुस्मृतीला संविधान म्हणून त्याचं गौरवीकरण करतात. परंतु आजही आरएसएस व ब्राह्मण्यवादी मंडळी मनुस्मृतीचा धिक्कार करताना दिसत नाहीत. त्यातील काही जण मनुस्मृतीला धर्मशास्त्र मानतात. त्याच्या आधारे जात व्यवस्था व चातुवर्ण्य संस्थेचं निलाजरे समर्थन करतात. बाबासाहेबांना हिंदुत्व समर्थक सिद्ध करताना आंबेडकरांचे हिंदू राष्ट्राविषयी मत दडवलं जातं.

सुधारणावादाला विरोध करणाऱ्या हिंदुवादी संघात सर्वच ‘सुधारकांना’ना आपले म्हणण्याची जणू ‘फॅशन’च आलेली आहे. फुले आपलेच, शाहू आपलेच (पण महायुती सरकारच्या शपथविधीची जाहिरात छापताना महामानवाच्या फोटोयादीतून छत्रपती शाहूंना वगळलं होतं.) फुलेंनी टीका केलेल्या सनातनी, मानवताविरोधी धर्माला व ब्राह्मणी संदर्भाला नाकारायचं आणि फुलेंना स्वीकारायचं, हे कुठलं धोरण?

तेच स्वातंत्र्य चळवळीच्या बाबतीत आहे. भगत सिंग, सुभाष बाबू, सरदार पटेल आपलेच! आणि आता आंबेडकरांना आपले म्हणजेच ‘हिंदुत्ववादी’ म्हटलं जात आहे. हे करताना बीजेपी-आरएसएस ठरवून सामान्य जणांची दिशाभूल करण्यासाठी आंबेडकरांची हिंदुत्वविषयी मतं बाजुला सारतात.

वास्तविक, बाबासाहेबांनी हिंदुराष्ट्राविषयी स्पष्टपणे म्हटलं होतं की, “If Hindu Raj becomes a reality, it will undoubtedly be the greatest misfortune of this country. Whatever Hindus may say, Hinduism is a threat to liberty, equality and fraternity. This is incompatible with democracy. Hindu Raj should be prevented from being established at any cost.” (Dr. B.R. Ambedkar, Thoughts on Pakistan, Writings and Speeches, Volume-8, page-358)

म्हणजेच, “हिंदू राष्ट्राची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती महाभयानक आपत्ती असेल. हिंदुत्वाचे समर्थक हिंदू त्याबद्दल काहीही म्हणोत, पण हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे शत्रू आहे. हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे. म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदुराष्ट्र घडू देता कामा नये.”

किंबहुना बाबासाहेबांनी त्यांच्या ‘ॲनिहिलेशन ऑफ कास्ट’ पुस्तकात म्हटलं आहे: “मी हिंदू धर्माचा तिरस्कार करतो कारण तो चुकीच्या आदर्शांना खतपाणी घालतो. चुकीचे सामाजिक जीवन जगते. माझा निषेध हिंदू धर्माच्या तत्त्वांबद्दल आहे.” आंबेडकर पुढे लिहितात, “हिंदूंनी संपूर्ण वातावरण दूषित केलं आहे. शीख, मुस्लिम आणि ख्रिश्चन सर्वांना त्याचा त्रास होत आहे.” त्यांची सर्वपरिचित घोषणा तर सर्वांना ज्ञात असेलच, “हिंदू धर्मात जन्म घेणे माझ्या अखत्यारीत नाही पण मी हिंदू धर्मात मरणार नाही.”

त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी १९२८ साली सायमन कमिशनपुढे साक्ष नोंदवताना म्हटलं होतं,

“अस्पृश्यांना हिंदुत्व हा शाप आहे. तो काही वर नव्हे. हिंदुत्वाचा शाप अस्पृश्य लोक भोगीत आहेत त्या अस्पृश्य लोकांनी हिंदू लोक मरतील का तरतील याची चिंता करण्याचे काही कारण नाही. खरे म्हटले असता हिंदू म्हणजे जगातले मोठ्यातले मोठे पाप आहे. ज्या हिंदू जातीने अनेक प्रकारचे कठोर निर्बंध घालून माणसांच्या माणुसकिची अहर्निश विटंबना चालविली आहे ती जात जगातून नाहीशी झाली तर तिच्यासाठी कोण अश्रु गाळील?”
वाचा : महात्मा फुले आणि सर सय्यद अहमद खान

वाचा : महात्मा गांधींविरोधी दुष्टप्रचार आणि वस्तुस्थिती

१९३५ला येवला परिषदेत आंबेडकरांनी काय म्हटलं होतं? ‘‘हिंदू धर्म ज्यांस अस्पृश्य मानतो त्या समाजात माझा जन्म झाला, हे माझे दुर्दैव. पण ते माझ्या हाती नव्हते. तथापि मी हिंदू म्हणून जन्मास आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हे निश्चित!’’ याचा विसर कोणासही पडणं शक्य नाही.

भगवदगितेविषयी २४ सप्टेंबर १९४४ रोजी मद्रास येथे भाषण देताना आंबेडकर म्हणतात, “पुष्कळ लोकांना भगवद्गीता फार मोठा धार्मिक ग्रंथ वाटतो. मोठ्या खेदाने मला म्हणावे लागते की, तसे वाटण्यासारखे मला तरी या पुस्तकात काही आढळले नाही. उलट या ग्रंथाने बराच अनर्थ केला आहे. बुद्धीच्या कसोटीला उतरू शकणार नाहीत अशा अनेक गोष्टींना तात्त्विक आधार देण्याचा प्रयत्न त्यात केला आहे.”

इथं एक बाब सांगाविशी वाटते की, हिंदू धर्माविषयीचे त्यांनी आपलं मत कधीही बदललं नाही. त्याचप्रमाणे हिंदुत्वाविषयीही त्यांना आपलं मत बदलू वाटलं नाही. परंतु ही मतं बाहेर येऊ नये, याची संघ-भाजप-हिंदुत्वावादी पुरेपूर काळजी घेतात. अमित शहांनीदेखील राज्यसेभत फॅशन कथन करताना आंबेडकराच्या राजीनाम्याचे खापर काँग्रेसवर फोडले. मूळ चर्चा इतर विषयावर वळविली.

हिंदू धर्म संस्थेने आपल्या धर्मतत्त्वज्ञानात वर्णश्रेष्ठता व जातिव्यवस्थेला धार्मिक अधिष्ठान म्हणून मान्यता दिली आहे. भाजप-संघाचे बडे पुढारी उडपणे जाति-वर्णव्यवस्थेचं समर्थन करतात. संघ-भाजपचे समर्थक जातिव्यवस्था कुठे आहे? म्हणतात, आरक्षणाला विरोध करतात.

संघ-भाजपचे समर्थक ट्रोलर होऊन दलित समाजाला ‘भीमटे’ म्हणतात व त्यांची नालस्ती करतात. जाती हिंदू धर्माला संकटात टाकणाऱ्या आहेत असं सांगत आरक्षण विरोधी मोहीम राबवली जाते. जातिसंस्थेपेक्षा धर्माला प्राधान्य दिली जातं. पण ही सर्व मांडणी वरवरची असते. कारण रोटी-बेटी व्यवहार करण्यासाठी ते धजावत नाही. चातुर्वर्ण्यावर आधारित धर्म-संस्था मजबूत करण्यासाठीच ते आरक्षण संपवण्याची संस्थात्मक कुरघोडी करताना दिसतात.

वाड्या-वस्त्यावर किंवा गल्ली-बोळात आंबेडकर आणि ज्योतिबा फुले यांच्या बद्दल किती कुत्सित पद्धतीने संघवादी मंडळी बोलतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आंबेडकर जयंती निमित्त भाजप-आरएसएसच्या होणाऱ्या कार्यक्रमांची हेरगिरी केली तर त्यातला विखार दिसून येईल.. ते निष्कर्ष आधीच ठरवतात व त्यावर आधारित बुद्धिभेद घडवून आणणारी व समाजात फूट पाडणारी मांडणी करत असतात. हे करताना आपण कसं सर्वहितवादी आहोत, हे ठसविण्याचा आटापिटा सुरू असतो.

भगव्या शक्तींनी दलित राजकारणाची दैना घडवून आणली आहे. हे करताना आरक्षित जागांवर डोळा ठेवून आंबेडकरी राजकारणाचा देखावा ते मांडतात. त्यात ते यशस्वी झाले हे दिसतात. २०१४च्या तुलनेत २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आरक्षित जागांवर सर्वाधिक उमेदवार भाजपचे मिळून आले. राजकीय विश्लेषकांच्या मते हा आकडा एकूण दलित राजकीय पक्षाने दिलेल्या उमेदवारीपेक्षा टक्क्याने अधिक होता. थोडक्यात, राखीव जागा घशात उतरवण्यासाठी ते सर्वहितवादी राजकारणाचा देखावा करतात. अमित शहांच्या भाषेत ‘फॅशन’ म्हणून आंबेडकरांना हाताळतात.

आंबेडकरांच्या नामजपाच्या जंजाळात आंबेडकरी राजकारण पुरतं अडकलेलं दिसतं. विखारी शक्तींना आंबेडकरांशी काहीच कर्तव्य नाही. हिंदुवादी राजकारण व समाजकारणात दलित समुदायांची जागा काय आहे, हे अमित शहा यांच्या विधानावरून दिसून येते.

लोकसभा निवडणुकीत ‘राज्यघटना बदलाच्या’ घोषणेचा फटका बसल्यापासून भाजपने राज्यघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. संसदेत किंवा जाहिर भाषणात संघ-भाजपचा प्रत्येक नेता, पुढारी, सदस्य स्वत:ला राज्यघटनेचा वाहक ठरवित असतो. हे करताना विरोधी पक्षनेत्यांवर आरोप-प्रत्यारोपांची फैरी सुरू होती.

संसदेत अमित शहा धडधडीत बोलले.. ते प्रत्येक टीव्ही चॅनल व इतर दृकश्राव्य माध्यमांनी कव्हर केलेलं आहे.. तरीही ते म्हणतात, विरोधकांनी एआयमार्फत त्याचा गैर अर्थ काढून फेक नैरिटिव्ह पसरवलं.

मागे म्हटल्याप्रमाणे अमित शहा सहज बोलून गेले नाहीत, तर संघाच्या बौद्धिकात आंबेडकर यांचा विषयी असलेला आकस व द्वेशबुद्धी त्यांनी जाहीरपणे मांडलेली आहे, हे त्यांचं वक्तव्य व त्याच्या सारवासारवमधून दिसून येतं.

कलीम अज़ीम, पुणे
१९ डिसेंबर ‌२०२४
मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: आंबेडकरांना ‘फॅशन’ म्हणणारे अमित शाह, कोणाच्या मनाचं बोलले?
आंबेडकरांना ‘फॅशन’ म्हणणारे अमित शाह, कोणाच्या मनाचं बोलले?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgJzCwb1hanMQttqJ6ITnVJwfZ9PHIvbsndD0qbReIr1ZrJ79N6MGlWZm7D_2V0dpx4TbgEelLSYvXnZIZzc0iy_nKqqsOEOf10RRk1CRSqESHceIpLPTfUQMX92B29N_5WbwGqDz9YAQ_4dSCysZcp-9TXJybI47mexUOmqA_L5Lf4sLnrtwyPcVhvTFvt/w640-h382/Ambedkar%20Amit%20shah.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgJzCwb1hanMQttqJ6ITnVJwfZ9PHIvbsndD0qbReIr1ZrJ79N6MGlWZm7D_2V0dpx4TbgEelLSYvXnZIZzc0iy_nKqqsOEOf10RRk1CRSqESHceIpLPTfUQMX92B29N_5WbwGqDz9YAQ_4dSCysZcp-9TXJybI47mexUOmqA_L5Lf4sLnrtwyPcVhvTFvt/s72-w640-c-h382/Ambedkar%20Amit%20shah.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2024/12/blog-post_19.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2024/12/blog-post_19.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content