भारत-पाक फाळणीची सर्वाधिक झळ पंजाब प्रांताला बसली. त्यात दोन्ही प्रदेशातील लाखो माणसं मारली गेली. हजारो कोटीची वित्तहानी झाली. अनेकांना आपली राहती घरं-दारं सोडावी लागली. शीख व मुस्लिम समुदायाचं सारखं नुकसान झालं. स्वार्थी राजकारणाने मानवतेचं मोठ्या प्रमाणात शिरकाण केलं.
कोट्यवधी नागरिकांना घर, संपत्ती, पैसा नातेसंबंध सर्वकाही टाकून क्षणात जीव मुठीत घेऊन पळावं लागलं. आयुष्य वाचवू पाहणाऱ्या असंख्य मंडळींना एकाएकी स्थलांतर स्वीकारलं. यात पाकिस्तानहून चार कुटुंबे भारतात आली. त्यातील चार तरुणांनी मानवतेचं रक्षण व सामाजिक सलोखा राखण्यासाठी उल्लेखनीय कार्य केलं. शिवाय देशाच्या आर्थिक प्रगती, सामाजिक न्याय व परराष्ट्र व्यवहारात उल्लेखनीय योगदान दिलं. ते तरुण म्हणजे खुशवंत सिंग, राजिंदर सच्चर, कुलदिप नय्यर आणि मनमोहन सिंग होय.
मनमोहन-खुशवंत-कुलदीप-राजिंदर; या चौघांच्या कुटुंबाने आपल्या मित्र, नातलग, व आप्तांचा रक्तपात आणि हिंसा पाहिली. आयुष्यभर पुरतील इतक्या जखमा फाळणीने या चौघांच्या कुटुंबीयांना दिलेल्या होत्या. परंतु त्यांनी कधीही पाकिस्तान किंवा इथल्या मुस्लिम समुदायाविषयी द्वेष, तिरस्कार, आकस बाळगला नाही. शत्रुत्व पत्करलं नाही तथा फाळणीचं दोषारोपण करत बसले नाही.
मानवी समुदायाचं कल्याण कशात आहे, हे त्यांना चांगलं ठाऊक होतं. त्या पद्धतीने त्यांनी पुढे जाण्याचे अथक प्रयत्न केले. सर्वांचा जन्म पंजाब प्रांतात झालेला होता. पंजाब त्यावेळी भारतीय राजकारणाचं महत्त्वाचं केंद्र होतं. स्वातंत्र्य चळवळीचं राष्ट्र सभेचं राजकारण व मुस्लिम लीगचा विभाजनवाद त्यांनी जवळून पाहिलेला होता. त्यातून झालेलं मानवी समुदायाचं उद्ध्वस्तीकरणही त्यांना ज्ञात होतं.
कुलदीप नय्यर व राजिंदर सच्चर हे आपसात नातेवाईक होते. नय्यर यांची बहिण सच्चर यांची पत्नी होती. नय्यरनी फाळणी व त्यातून वाट्याला आलेल्या जखमांविषयी विपुल लिखाण केलेलं आहे. परंतु त्यांचं पुढची सर्व आयुष्य पाकिस्तान व भारताचे आणि भारतातील हिंदू-मुस्लिमांचं सहसंबंध दुरुस्त व्हावे, परस्पर सहजीवन वृद्धिंगत व्हावं, सद्भाव राखावा व स्नेह टिकून राहावं या सत्कार्याला समर्पित केलं. हे चौघेही प्रशासकीय स्तरावर उच्चपदस्थ अधिकारी होते. त्यांच्याकडे आपल्या अखत्यारीत बरेच अधिकार होते. कार्यकर्तृत्वाने आपलं व्यक्तिमत्व घडवलं होतं.
कुलदिप नय्यर केंद्र सरकारचे माध्यम सल्लागार होते. सरकारमध्ये त्यांची मतं व शब्दांना किंमत होती. त्यांनी त्याचा पुरेपूर वापर केला. केवळ लेखनच करत बसले नाही तर वेळोवेळी प्रशासकीय स्तरावर पत्र व्यवहार करून भारत-पाक राजनायिक संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले. आपल्या मैत्रीचा डिप्लोमॅट वापर करून शेजारी राष्ट्राशी सांस्कृतिक संबंध टिकवून ठेवले.
सरदार पटेल यांच्या निधनानंतर पंत गृहमंत्री झाले होते. नय्यर त्यांचे सल्लागार झाले. पंत कर्मठ विचारांचे होते. परंतु नय्यर यांनी परिणाम पुढे ठेवत त्यांना अनेक बाबतीत योग्य सल्ला दिला. भाषावार प्रांत रचनेत भारतभरात भाषिक आधारावर फूट पडलेली होती. कुठल्याही क्षणी रक्तपात घडेल, हिंसा माजेल अशी स्थिती होती. त्यात नय्यरनी पंत यांना योग्य मार्गदर्शन करून प्रकरण शांततेने तडीस नेलं. भारत-चीन युद्धात मुत्सद्दी भूमिका घेत आतंराष्ट्रीय पातळीवर देशाची पत राखण्याचं काम केलं.
खुशवंत सिंग यांचं सबंध लेखन हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोखा व मैत्रीवर आधारित आहे. फाळणीमुळं त्यांच्या कुटुंबाची कशी वाताहत झाली याविषयी त्यांनी असंख्य लेखात लिहिलेलं आहे. परंतु त्यात ते अडकून पडले नाही. दोन समुदायातील वितुष्ट संपुष्टात यावं यासाठी ते सर्व हयातभर झटत राहिले. नेहरू ते राहुल गांधी असे गांधी घराण्याशी त्यांचे थेट व निकटचे संबंध होते.
खुशवंत सिंग यांनी पंतप्रधान नेहरूंसोबत काम केलेलं होतं. त्यांच्या लग्नात बॅ. जिना प्रमुख पाहुणे होते. अर्थात बॅ. जिना खुशवंत सिंग यांच्या वडिलांचे जवळचे मित्र होते. त्यांच्याशी कौटुंबिक संबधाने बांधलेले होते. बॅ. जिना यांच्याशी खुशवंत सिंग यांचा स्नेह होता. पुढे पाकिस्तानचे सर्व प्रशासक त्यांचे निकटवर्तीय मित्र झाले. अनेक बाबतीत ते खुशवंत सिंग यांचा सल्ला घेत होते.
बहुतांश वेळा भारत-पाक परराष्ट्र संबंध व परराष्ट्र व्यवहारात खुशवंत सिंग यांनी भारत सरकारला तर दुसरीकडे पाक सरकारला सहकार्य केलेलं होतं. अय्यूब खान ते परवेज मुशर्रफ अशा सर्व राष्ट्राध्यक्षांशी त्यांचं डिप्लोमॅटिक नातं होतं. भारत-पाकिस्तान राजनायिक संबंध विकसित करण्यासाठी त्यांनी आपल्या मैत्रीचा आधार घेतला.
मनमोहन सिंग यांच्या बद्दल तर काय बोलावं? त्यांच्या निधनानंतर गेली दोन दिवस त्यांच्याविषयी चर्चा सुरू आहे. अर्थमंत्री म्हणून सामान्य माणसाचे जीवनमान कसं उंचावेल यासाठी त्यांनी आपलं ज्ञान, कौशल्य, अनुभव व प्रतिभा वापरली. पंतप्रधान व्हीपी सिंह यांच्यानंतर मनमोहन सिंग यांनी मागास घटकातील नागरिकांचं कल्याण व हीत चिंतिलं.
काका कालेलकरप्रणित मागासवर्गीय आयोगाने भारतात मागास मुस्लिमांची सर्वप्रथम दखल घेतली होती. पुढे व्हीपी सिंह यांनी मुस्लिमांना आरक्षणाच्या सकारात्मक प्रक्रियेत आणलं. मनमोहन सिंग यांनी तर त्याला सैद्धान्तिक आधार देण्याचं महत्कार्य केलं. त्यांना मुस्लिम समाजाविषयी अनुकंपा होती. त्यामुळे सच्चर आयोग अस्तित्वात आलेला होता. या मार्फत भारतीय मुस्लिमांचं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक सर्वेक्षण करून प्रचंड मोठा ‘अनुभवजन्य डेटा’ जमा केला.
न्या. सच्चर यांनी मुस्लिमांना घटनात्मक हक्काच्या सकारात्मक प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. प्रशासकीय पातळीवर या माहितीचं संस्थीकरण करण्याचं काम केलं. त्यांनी अल्पसंख्यांक समाजाची आर्थिक दुर्बलता सर्वप्रथम प्रकाशात आणली. सरकारला राजकीय व आर्थिक हस्तक्षेप करण्यास बाध्य केलं. सच्चर रिपोर्ट स्वीकारताना मनमोहन सिंग प्रचंड व्यथित झालेले होते.
न्या. राजिंदर सच्चर यांनीही कामाशी निष्ठा राखत प्रामाणिक वृत्तीने आपली जबाबदारी पार पाडली. हा सर्वेक्षण अहवाल जगभरात चर्चेला आला. मुस्लिम समुदायाची स्थिती भारतात राहणाऱ्या दलितांपेक्षा निम्नस्तराची आहे ही धक्कादायक मांडणी त्यांनीच सर्वप्रथम बाहेर काढली. जागतिकीकरणाचा सर्वांत मोठा बळी मुस्लिम समुदाय आहे, असं त्यांनी ठासून सांगितलं.
न्या. सच्चर यांचा रिपोर्ट पाहून मनमोहन कर्तव्यनिष्ठ झाले. परंतु भाजपने हा रिपोर्ट लागू होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले. आरएसएसने मोठी मोहिम उघडली. मनमोहन सरकारवर ‘मुस्लिम अनुनया’चा आरोप करून सबंध समुदायाचा मीडिया ट्रायल घेण्यात आला. सत्ता पक्षातील घटक दलानेदेखील रिपोर्टविषयी अनास्था दाखवली.
रिपोर्टमधील तरतुदी पूर्णपणे लागू होणार नाहीत, अशी चिन्हे दिसताच पंतप्रधान सिंग यांनी मुस्लिमांच्या कल्याणासाठी १५ कलमी योजना जाहीर केली. त्या योजनेतून मिळालेल्या लाभांमुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच सर्वसामान्याची एक मोठी फळी शिक्षणाच्या प्रक्रियेत पुढे आली. आर्थिक प्रगती व सामाजिक विकास साधू शकली.
न्या. सच्चर यांनी जमा केलेला डेटा सात दशकातील मुस्लिम समुदायाचं मागासलेपण अधोरेखित करण्यास महत्त्वाचा आधार ठरला. त्यांनी संकलित केलेला अनुभवजन्य डेटा व निरीक्षणं अनेक अर्थाने महत्त्वाची होती. या अहवालानंतर मुस्लिम समाजाविषयीचा सामाजिक व सांस्कृतिक चर्चाविश्वाचा परीघच बदलून गेला. या रिपोर्टचा आधार घेत मुस्लिमांच्या असंख्य सांस्कृतिक, सामाजिक संघटना उभ्या राहिल्या.
एकीकडे मुसलमानांत अंतर्गत आत्मचिंतनाची प्रक्रिया सुरू झाली तर दुसरीकडे हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा फॅसिस्ट राजकारणाचा उपद्रव माजला. मुस्लिमद्वेषी शक्तींनी ‘हिंदू खतरे में’ आल्याची बतावणी करत बहुसंख्यांक समाजाच्या मानसिकतेवर प्रहार केले. हिंदू-मुस्लिमात सामाजिक विभागणी घडवून आणली.
आज सबंध भारतावर लादल्या गेलेल्या हिंदू राष्ट्रवादाची बीजे सच्चर आयोगाने तयार केलेल्या अहवालात सापडतात. या अहवाल-डेटाकडे लक्ष जाऊ नये म्हणून गुजरातची वांशिक दंगल घडवली गेली. त्यानंतर कल्पित दहशतवादाचा बागुलबुवा उभा झाला. परिणामी हजारो सुशिक्षित तरुणांची धरपकड झाली. त्यांना देशद्रोही सिद्ध करण्याचे प्रयत्न झाले. मुस्लिम समुदायाविषयी शंका व संदेहाचं वातावरण तयार करण्यात आलं. बहुसंख्याक समाजात मुस्लिमांविषयी द्वेश, तिरस्कार व अविश्वास पेरण्यात आला.
दरगाह, मस्जिदी व कब्रस्तानात बॉम्बस्फोट घडविण्यात आले. पुन्हा त्यातही हजारो मुस्लिम तरुणांना गोवण्यात आलं. समाजाविषयी गैरसमज पसरवून मुजफ्फरनगरची हिंसा व रक्तपात घडविण्यात आला. कर्मठ मुस्लिमद्वेषातून प्रखर हिंदुत्वाचा विखारी चेहरा प्रोजेक्ट झाला. यातूनच ‘मोदीपर्व’ अस्तित्वात आलं. मनमोहन सिंग यांच्या भाषेत बोलायचं झालं तर मोदींच्या सत्ताकारणाने भारताचं उद्ध्वस्तीकरण घडवून आणलेलं आहे.
आज खुशवंत सिंग, कुलदिप नय्यर, राजिंदर सच्चर आणि मनमोहन सिंग चौघेही हयात नाहीत. पण त्यांचं कार्य व घडवून आणलेला शाश्वत सामाजिक विकास सर्वांसमोर आहे. त्यामुळे लाखो दुर्बल, मागास घटकांनी प्रगती झाली.
हे चौघेही आपलं कार्य आणि वृत्तीने थोर होती. त्यांची दूरदृष्टी व धोरणामुळे आज ते इतिहासात अजरामर झालेले आहेत. वर्तमानकाळाने त्यांच्या कार्याचं सुयोग्य मूल्यांकन केलं. या सर्वांनी केवळ भारतीय नागरिकांचा वर्तमान सुकर केला नाही तर भविष्यैचा दिशाही आखून दिली. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल भारतातील प्रत्येक नागरिक कृतज्ञता बाळगतो.
२१व्या शतकाचा भारतीय इतिहास लिहिताना या चौघांनी केलेलं कार्य दुर्लक्षून पुढे जाता येणार नाही.
या चौघांना पुन्हा एकदा अभिवादन...
कलीम अज़ीम, पुणे
२८ डिसेंबर २०२४
मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com