गोवंश हत्याबंदी कायदा कशासाठी?

गोवंश हत्याबंदी कायद्याला मंजुरी मिळाली असून यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र बीफ खाण्यास सरकाने बंदी घातलेली नसल्याने कायद्याचा संबंध धर्माशी जोडला जाऊ लागला आहे. साहजिकच त्यावर आता वादविवाद झडू लागले आहेत. भाकड जनावरांसाठी निवारा, चारा याबरोबरच अनेकांना रोजगारही गमवावा लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर या गंभीर विषयाचा घेतलेला हा वेध.. सोबत ‘लोकसत्ता’चीही भूमिका.
राज्यात भाजपचे सरकार आले आणि गोवंश हत्याबंदी कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. हा योगायोग घडून नव्हे तर घडवून आणलेला आहे. साहजिकच त्यावरून आता वादविवाद झडू लागले आहेत. या कायद्याचा संबंध धर्माशी जोडला जाऊ लागला आहे. त्यात अजिबात तथ्य नाही असे नाही. मात्र या कायद्याचे सारे श्रेय घेण्याचा आणि त्यातून भविष्यात मतांची बेगमी करण्याचा भाजपचा जो प्रयत्न आहे, तो खरा नाही. जीवसृष्टीवर माणूस आणि प्राणी यांचे एक अतूट आणि भावनिक नाते आहे. 

ज्या प्राण्याची उपयुक्तता अधिक त्यावर माणूस अधिक प्रेम करतो. ग्रामीण भागात कोणत्या ना कोणत्या प्राण्याच्या अस्तित्वाशिवाय कुटुंब संस्थाच अपुरी वाटते. कुत्रा, मांजर, हे काही तसे आर्थिक फायदा करून देणारे प्राणी नाहीत. कुत्रा त्या कुटुंबाचा रक्षक आणि सोबती असतो. मोती हे त्याचे परवलीचे नाव असते. मांजर तसा खोडय़ा करणारा प्राणी. परंतु म्यॉव म्यॉवकरीत घरभर िहडणाऱ्या मांजरीचा कुणाला लळा लागणार नाही? एखाद्या मुलाला हाक मारावी तशी मनी या नावाची हाक घरादारातून ऐकायला येते. गाय, बैल, म्हैस, शेळी, मेंढी हे प्राणी तर कुटुंबव्यवस्थेला जगण्यासाठी आर्थिक हातभार लावणारे पाळीव प्राणी आहेत. त्यांना उपयुक्त प्राणी म्हटले जाते. 

गाईचे देखणेपण काही वेगळेच असते. बैल एके काळी व आजही काही प्रमाणात शेतीसाठी उपयुक्त व महत्त्वाचा प्राणी मानला जातो. दारात गाय, म्हैस किंवा अगदी शेळी तरी असणे हे त्या कुटुंबाच्या भरलेपणाचे लक्षण मानले जाते. बैलजोडी दारात असणे म्हणजे समृद्धीचे लक्षण मानले जाते. शेतकरी पोटच्या मुलाइतकेच गोठय़ातल्या जनावरांना जपतो. ही भारतीय समाजाची प्राण्यांवर प्रेम करण्याची मानसिकता आहे, परंपरा आहे. मग गोवंश हत्याबंदीने एवढा गहजब का व्हावा?



गाय, बैल, म्हैस यांसारख्या दुभत्या व शेतीच्या कामासाठी उपयुक्त असणाऱ्या प्राण्यांचे रक्षण केले पाहिजे, इतकेच नव्हे तर पर्यावरण, जंगल व वन्यजीवांचेही संरक्षण केले पाहिजे, अशी तरतूद संविधानाच्या कलम ४८ व ४८ (अ) मध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आता अस्तित्वात आलेला कायदा काही तरी वेगळा आहे, नवा आहे, असे काही नाही. या कायद्याचे मूळ १९४८ च्या बॉम्बे प्राणी रक्षण कायद्यात आहे. त्यानंतर १९५४ मध्ये द्विभाषिक राज्यांपैकी एक राज्य गुजरातमध्ये हा कायदा लागू करण्यात आला. 

त्यात गाईच्या हत्येला प्रतिबंध करण्यात आला होता. पुढे त्याच कायद्याचा आधार घेऊन महाराष्ट्रात १९७६ मध्ये प्राणी रक्षण कायदा करण्यात आला. त्या वेळी राज्यात भाजप सरकार नव्हते. त्या कायद्यात गाईच्या हत्येला प्रतिबंध करण्यात आला होता. गाईची हत्या करणे दखलपात्र गुन्हा मानला होता आणि त्याबद्दल सहा महिन्यांच्या शिक्षेची व एक हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली होती. त्या कायद्याची अंमलबजावणी झाली की नाही, हा वेगळा मुद्दा आहे. असे अनेक कायदे धूळ खात पडले आहेत, त्यांपैकी प्राणिरक्षण एक कायदा म्हणता येईल.

हिंदुत्वाची गर्जना करीत भाजप-शिवसेनेने जेव्हा पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली आणि सत्ता मिळवली, त्या वेळी प्राणिरक्षण कायद्यात दुरुस्ती करण्याचे ठरविण्यात आले. हा कायदा घटनेतील तरतुदींना धरूनच करण्यात आला तरी त्याला धार्मिक व पावित्र्याचा मुलामा देण्यात आला, हाच पुढे व्यक्त-अव्यक्त वादाचा मुद्दा ठरत गेला. १९९५ मध्ये युती सरकारने विधिमंडळात प्राणिरक्षण सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले. १९९६ मध्ये ते राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले. पुढे राज्यात सत्ताबदल झाला, केंद्रातही राजकीय परिवर्तन झाले आणि हा कायदा काहीसा विस्मृतीच्या पडद्याआड गेला. परंतु २०१४ मध्ये पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार आले आणि केंद्राकडे पडून असलेल्या कायद्याचा पाठपुरावा सुरू झाला. अखेर तब्बल १९ वर्षांनी राष्ट्रपतींनी त्या कायद्यावर मान्यतेची मोहोर उमटवली.

१९७६ च्या व आता अस्तित्वात आलेल्या कायद्यामध्ये काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत. आधीच्या कायद्यात गाईच्या हत्येला प्रतिबंध करण्यात आला होता. या कायद्यात गाईबरोबर बैलाचा व वळूचा समावेश करण्यात आला. म्हणजे गोवंश हत्याबंदी करण्यात आली. हा कायदा एवढय़ावरच थांबत नाही, तर आणखी काही कडक व कठोर र्निबध लादले आहेत. गाय, बैल, वळू यांची कत्तल करता येणार नाही, त्या हेतूने त्यांची खरेदी, विक्री करता येणार नाही, विल्हेवाट लावता येणार नाही. गाय, बैल, वळू यांचे मांस स्वत:च्या ताब्यात ठेवता येणार नाही. बाहेरील राज्यात कत्तल केलेली गाय, बैल, वळू यांचे मांस स्वत:च्या ताब्यात ठेवता येणार नाही. म्हणजे एक प्रकारे गाय, बैल, वळू यांचे मांस सेवन करण्यासच प्रतिबंध करण्यात आला आहे. यापैकी कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र ठरविण्यात आला आहे. गाईसकट कोणत्याही प्राण्याची हत्या करू नये, हा भूतदयावाद झाला. 

एखाद्या प्राण्याची उपयुक्तता असेल तर त्याचे रक्षण केले पाहिजे, हा व्यवहारवाद झाला; परंतु असे र्निबध घालत असताना किंवा कायदे करीत असताना, त्याला धर्म व पावित्र्याची जोड तर देऊच नये, शिवाय त्याचा अतिरेक तर होणार नाही ना, याचीही राज्यकर्त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. कोणत्याही क्षेत्रातला, कोणत्याही प्रकारचा आणि कोणत्याही स्वरूपातील अतिरेक हा घातकच असतो. एका लहरी राजाची गोष्ट आहे. राजदरबारात गवयाचे गाणे ऐकून राजा खूश होतो आणि काय मागायचे ते माग असे त्या गायकाला फर्मावतो. 

वाचा : सावरकर स्वातंत्र्यवीर कसे?

वाचा : गांधी हटवण्याची ‘लिटमस’ टेस्ट

राज्याला वाटते, हा काही तरी जमीनजुमला, नोकरीचाकरी, पैसाअडका मागेल; परंतु गायकाने मागणी केली, गायनकलेच्या संवर्धनाची. त्यावर राजाने विचारले, यासाठी काय करायला पाहिजे? गायक म्हणाला, महाराज राज्याचा कारभार गाण्यातून झाला पाहिजे, म्हणजे सर्वानी पद्यात बोलले पाहिजे. राजाने हुकूम काढला, नगरीतील सर्वानी यापुढे गाण्यातच बोलायचे, जो कोणी गद्यात बोलेल, त्याला जबर शिक्षा भोगावी लागेल. प्रत्येक जण अगदी सुख-दु:खाच्या गोष्टीही गाण्यातच बोलायला लागला. एके दिवशी एक शिपाई धावत धावत राजवाडय़ात आला आणि महाराजांपुढे त्याने आपला राजवाडा.. असा बराच वेळ सूर धरला. कारण जे काही सांगायचे ते गाऊन सांगायचे होते. 

शिपायाने एकच पालुपद लावल्याने राजा जरा चिडला आणि गात-गातच म्हणाला काय झाले आपल्या राजवाडय़ाला? शिपाई म्हणाला, महाराज आपला राजवाडा.. जळून खाक झाला.. हे पद पूर्ण होईपर्यंत बराच उशीर झाला होता. राजवाडा खरोखरच जळला होता. गाण्यात बोलण्याची सक्ती केली नसती तर राजवाडय़ाला आग लागल्याची माहिती लगेच मिळाली असती, राजवाडा वाचवता आला असता. राज्यकर्त्यांनी सारासार भान ठेवूनच कोणताही निर्णय घ्यावा, हा या गोष्टीचा मथितार्थ होय!

गायीचे पालन, पोषण, संवर्धन व्हावे ही सर्वाचीच भूमिका आहे व असावी. त्यात काहीही गर नाही. गर आहे ते या भूमिकेला धार्मिक रंग देणे. तो जसा हिंदूंकडून दिला जात आहे, तसाच अिहदूंकडूनही दिला जात असून, त्यातून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे. म्हणूनच या प्रश्नाच्या भिन्न बाजू लोकांसमोर येणे गरजेचे आहे. वस्तुत: राज्यात गायीच्या हत्येवरील बंदी काही आजची नाही. ती १९७६ पासूनच लागू आहे. 

ताज्या ‘महाराष्ट्र प्राणी संवर्धन (सुधारित) – १९९५’ या कायद्याने बल, वळू, वासरे आदी गोवंशाच्या हत्येवरही बंदी घातली आहे. तसे पाहता म्हैस हा प्राणीही तेवढाच दुधाळ असून रेडेही उपयुक्त असतात. त्यांना कापण्यास मात्र या कायद्याने मोकळीक दिली आहे. हा पक्षपात झाला. तो हा कायदा धार्मिक नसल्याचे सांगणाऱ्या राज्य सरकारकडून नजरचुकीने झाला असेल, असे मानून चालण्याशिवाय गत्यंतर नाही.

*
गोहत्येचा प्रश्न हा या देशात नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे िहदू धर्मामध्ये गाईला माता मानले आहे. प्रस्तुत कायद्याने राज्यातील गोवंशाचे किती कल्याण होते, भाकड गायी, बलांसाठी राज्य सरकार आणि गोपूजक किती पांजरपोळ उभे करतात आणि तेथे त्यांची किती ठेप ठेवली जाते हे दिसेलच. राज्याच्या अर्थव्यवस्थेवर हा नाहक बोजा येणार यात मात्र शंका नाही. भाकड गाय, निकामी बल विकून चार पसे कमावून शेतकरी एखादी नवी कालवड घेतो. या कायद्याने त्याचा तो हक्क तर संपुष्टात आला आहेच, पण उलट त्याच्यावर ते पोसण्याचे ओझे आले आहे. हा एक भाग झाला. त्याचबरोबर या कायद्यानुसार ‘बीफ’ विकणे, बाळगणे आणि खाणे यांवरही बंदी घालण्यात आली आहे. यापुढे कोणी बीफ खाताना आढळल्यास त्याला पाच वष्रे तुरुंगाची हवा खावी लागेल. 

वाचा : ‘सिनेअभिरुची’ की ‘ब्राह्मणी’ जाणिवांचा सांस्कृतिक वर्चस्ववाद !


दहा हजार रुपये दंड भरावा लागेल ते वेगळेच. या कलमाचा साधा सरळ अर्थ म्हणजे राज्य सरकार आता थेट नागरिकांचे जेवणाचे ताट नियंत्रित करू पाहात आहे. वस्तुत: कोणी काय जेवावे हे ठरविणे हे सरकारचे काम नाही. नागरिकांच्या सेवनात प्राणघातक, आरोग्यास हानिकारक असे पदार्थ जात नाहीत हे सरकारने पाहावे, हे ठीक. बीफ हे आरोग्यास हानिकारक आहे, असे सरकारचे म्हणणे आहे काय? तसे असेल तर मग म्हशीचे मांस खाण्यास परवानगी आहे हे कसे? बीफ हे गरिबांना परवडणारे मटण आहे. त्यावर बंदी घालून सरकारने त्यांच्या पोटावर पाय तर दिला आहेच, पण व्यक्तीच्या खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यावरही गदा आणली आहे.
**
गाय : एक उपयुक्त पशू, माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे!

वि.दा. सावरकर यांनी ‘महाराष्ट्र शारदा’च्या एप्रिल, १९३५च्या अंकामध्ये लिहिलेल्या वैचारिक निबंधातील काही निवडक मुद्दे..

*
काही झाले तरी मनुष्याने ज्याची देवता म्हणून पूजा करायची ते सत्त्व, ते प्रतीक, मनुष्याहून मानवी गुणांत तरी सर्वतोपरी श्रेष्ठ असावयास पाहिजे. मनुष्याचा देव हा मनुष्याहूनही हीनतर असेल तर त्या देवानेच त्या भक्ताची पूजा करणे उचित ठरेल!

*
धर्माचे अत्यंत सात्त्विक नि तात्त्विक असे परमोच्च स्वरूप उपदेशिणाऱ्या वेदान्ताच्या अनुयायांनी, आम्ही हिंदूंनी अजूनही या अपकृष्ट, तामस नि माणुसकीस लाज आणणाऱ्या पशुपूजेस चिकटून राहावे हा रूढीचा केवढा प्रताप! उभ्या राष्ट्राचा बुद्धिभ्रंश धर्माचा छाप बसलेली रूढी कशी करू शकते, त्याचे हे एक चटकदार प्रत्यंतर आहे.

*
सुबुद्ध, दयाशील नि प्रामाणिक मनुष्यांचीही बुद्धी धर्माची झापड डोळ्यांवर पडली की कशी भ्रंशते पाहा! किंबहुना गोरक्षण न करता गोभक्षण का करू नये? ब्रह्मवादाने दोन्ही लटकी किंवा दोन्हीही खरी आहेत, स्वीकार्य आहेत. भक्षण नि रक्षण हा भेदच ब्रह्मसृष्टीत नाही. ‘नासतो विद्यते भाव: नाभावो विद्यते सत:’ ही ब्रह्मसृष्टी! मग गोभक्षण का करू नये?

*
एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तर चालेल; पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. यास्तव गाय वा बैल हे पशू आपल्या देशात तर मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतकेच सिद्ध करून आणि त्या पशूंचा उपयोग आपल्या राष्ट्रास ज्या प्रमाणात नि ज्या प्रकारे होईल त्या प्रमाणात नि त्या प्रकारेच त्या पशूंची पशू म्हणूनच जोपासना करू म्हणाल तरच ते गोरक्षण राष्ट्राच्या निर्भेळ हिताचे होईल.

*
हिंदुत्वाची व्याख्या एका गोभक्ताने अशी केली : ‘धेनुर्यस्य महामाता’. हिंदू कोण? तर ज्याची महामाता धेनू आहे तो! हे हिंदुत्वाचे एक मुख्य लक्षण? भाबडेपणाच्या लहरीत ह्य़ा ‘भाला’कारांसारख्या देशभक्ताच्या ध्यानात आले नाही की, धेनू जर कोणाची खरोखरच महामाता असेल तर बैलाची होय! हिंदूंची नव्हे!!

*
थोडक्यात, म्हणजे गाय हा पशू उपयुक्त आहे म्हणून रक्षणीय आहे. असा धोरणाने गोरक्षणाचे धार्मिक स्वरूप सोडून त्यास आर्थिक स्वरूप दिले की झाले. त्यायोगे गोरक्षण हवे त्याच प्रमाणात नि प्रकाराने होईल. धार्मिक स्वरूपाने आजच्या युगात काही लाभ नसून उलट भाबडी प्रवृत्ती पसरविण्याची हानी मात्र आहे.
*
गोरक्षणास हिंदूंनी दिलेले धार्मिक स्वरूप कितीही भाबडेपणाचे असले तरी दुष्टपणाचे नाही. कारण मनुष्यास अत्युपयोगी अशा गायीबैलांसारख्या पशूंचे रक्षण करण्याचाच, म्हणजे मानव हिताचाच, त्यात हेतू असतो. पण ज्या कित्येक अहिंदूंचा ‘धर्मच मुळी गोघ्न’ आहे, त्यांचे ते धार्मिक वेडेपण नुसते भाबडेच नसून दुष्टही आहे त्यांना हिंदूंस हसण्याचा लवलेश अधिकार नाही.

(लोकसत्ता, First published on: 15-03-2015 at 01:35 IST)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,50,इस्लाम,41,किताब,26,जगभर,131,पत्रव्यवहार,4,राजनीति,307,व्यक्ती,25,संकलन,65,समाज,267,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,55,
ltr
item
नजरिया: गोवंश हत्याबंदी कायदा कशासाठी?
गोवंश हत्याबंदी कायदा कशासाठी?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhv0Q5PFT3VpoGRNLRg_3SI2HccodqpHJrD7VURkB4SMRZoORQSrScxnj2f6ifmU29sdMiEH9Va1N6AYuU6DF1sJcoNg5AIchawd77-t0G3YrH2HYzG358N9bOw7Vd_kiBnLefs_6FezV9f9Z24N6K_xI-l2SQFhDjCWyEo_PQTvi5heS20Moh5W7A5yKKX/w640-h380/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhv0Q5PFT3VpoGRNLRg_3SI2HccodqpHJrD7VURkB4SMRZoORQSrScxnj2f6ifmU29sdMiEH9Va1N6AYuU6DF1sJcoNg5AIchawd77-t0G3YrH2HYzG358N9bOw7Vd_kiBnLefs_6FezV9f9Z24N6K_xI-l2SQFhDjCWyEo_PQTvi5heS20Moh5W7A5yKKX/s72-w640-c-h380/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6.png
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2015/03/blog-post_15.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2015/03/blog-post_15.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content