गोवंश हत्याबंदी नव्हे ? ‘गो’पाल हत्या - शरद जोशी

महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने २६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोवंश हत्याबंदी कायदा संमत केला. या कायद्याच्या विरुद्ध राज्यभर पडसाद उमटत आहेत. कायद्याअतंर्गत आता गाय, बैल आणि वळू यांची कत्तल करण्यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. या कायद्याच्या कार्यवाहीमुळे राज्यात गोवंश हत्या आणि त्यांच्या मांसाची विक्री करणे प्रतिबंधित झाले आहे. महात्मा गांधी व पंडित नेहरुंनीही अशा प्रकारच्या कायद्याचा विरोध दर्शवला होता. अशा कायद्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होईल, अशी त्यांची ठाम भूमिका होती. १९९५च्या याच सरकारने गोहत्या बंदी कायदा अधिक मजबूत केला होता. त्यावेळी शेतकरी नेते शरद जोशी यांनी त्याला विरोध करणारा एक लेख शेतकरी संघटक या पाक्षिकात २१ ऑगस्ट १९९५ रोजी लिहिला होता. तो लेख आम्ही पुन्हा इथं देत आहोत.

गोवंश हत्याबंदी कायद्यासंबंधीचे बिल विधानसभेत मांडण्यात आले. त्याला काही विरोधकांनी काही दुरुस्त्या सुचविल्या, बिल मागे घेण्यात आले; पण बहात्तर तासांच्या आत सर्व नियमांचा अपवाद करून ते पुन्हा विधानसभेसमोर ठेवण्यात आले. एवढेच नव्हे तर द्विभार्या प्रतिबंधक कायद्याबरोबर घाईघाईने संमतही करण्यात आले.

बहुपत्निकत्वाची चाल किंवा समान नागरी कायदा हे विशेषतः स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय; पण गाय, बैल, गोऱ्हे यांच्या हत्येला बंदी करणारा कायदा हा केवळ शेतकऱ्यांच्याच नव्हे तर सर्व देशाच्याच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. म्हणून त्याविषयी थोडे तपशिलात जाऊन विचार करणे आवश्यक आहे.
तथाकथित ‘हिंदू’ वादळामुळे शिवसेना-भाजपा युती सरकारच्या विरोधकांची मोठी त्रेधा उडाली आहे. ‘हिंदू’ मनाला गुदगुल्या करून झुणका-भाकर आणि स्वस्त घरे असला धर्मादाय आर्थिक कार्यक्रम. यामुळे, विरोधकांना काय युक्तिवाद करावा तेच समजेनासे झाले आहे. जनावरांच्या संरक्षणाकरिता मांडलेल्या विधेयकाच्या सर्व विरोधकांनी मिळून दुरुस्ती सुचविली. विरोधकांच्या सूचनेनुसार, एखादी गाय-बैल दुधासाठी, पैदाशीसाठी, ओझ्यासाठी किंवा शेतीमालासाठी उपयोगी राहली नाही तर मालकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे ते जनावर बाजारभावाने विकत घेण्यासाठी अर्ज करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत मोबदला द्यावा अशी त्यांची अजागळ सूचना होती. म्हणजे, थोड्याच दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमुख काम भाकड गायी-बैल विकत घेणे आणि त्यांना सांभाळत बसणे हे झाले असते. या असल्या कार्यक्रमात पैसे खाण्याची प्रचंड संधी जिल्हाधिकारी व्यवस्थापनास मिळाली असती. भाकड जनावरे सांभाळण्याचे एक प्रचंड खातेच तयार झाले असते; पण असा विचार करण्याची विरोधकांना ना कुवत, ना फुरसत!

दलित चळवळीतील एक कार्यकर्ते माझ्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. या विधेयकाला विरोध करण्यासाठी मुस्लिम-दलित संयुक्त आघाडी उभी करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि गायींचे संरक्षण हा सरसकट सगळ्या हिंदू समाजाचा कळकळीचा विषय नाही हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न होणार आहे. राम आणि शंबूकाची आणखी एक लढाई या विषयावर होऊ शकते.

शिवसेना-भाजपाच्या कायद्याला विरोध करायचा हे ठरले; पण त्यासाठी युक्तिवाद काय करावा? याबाबत मात्र सन्माननीय दलित कार्यकर्त्यांच्या मनात मोठा गोंधळ दिसला. एरवी मांग, महार, ढोर चांभार इत्यादी जातींना गाववहिवाटीने त्यांच्यावर लादलेली बलुतेदारीची कामे नाकारण्याचे आवाहन करणारी दलित नेते मंडळी आता एकदम तोंड फिरवून उलटे बोलू लागली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कायद्यामुळे दलितांच्या वंशपरंपरेने चालत आलेल्या पोटापाण्याच्या व्यवसायावर गदा येईल व भारतीय संविधानात दिलेल्या मूलभूत हक्कांच्या हे विरोधात आहे अशी काहीशी वेडगळ मांडणी नेते करीत होते. व्यवसाय-स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क हा निखळ विनापवाद नाही. घटनेने याविषयी काही अपवादही ठरवले आहेत याची त्यांना माहिती दिसली नाही. आदिवासींच्या मागासलेपणाविषयी अश्रू ढाळावेत आणि एखाद्या प्रकल्पात त्यांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता पडली तर आदिवासींच्या ‘निसर्गरम्य’ जीवनाचा अंत होत असल्याबद्दलदेखील नक्राश्रू ढाळावेत, तसाच हा प्रकार.



दलित नेत्यांनी आणखी एक अजब युक्तिवाद मांडला. गोमांस भक्षण फक्त मुसलमानच करतात असे नव्हे, मागासलेल्या जमातीतील अनेक गोमांस भक्षण करतात. त्यांच्या परंपरागत जेवणाच्या सवयीवर या कायद्याने आघात होत आहे असाही आक्रोश नेत्यांनी केला. या कायद्याने गोवंशाच्या मांसाच्या भक्षणावर बंदी घातलेली नाही. ज्यांचे त्याखेरीज चालूच शकत नसेल त्या लोकांना गोमांसाची आयात शेजारच्या राज्यातून करण्यास आजतरी कोणतीही बंदी नाही. भारतात आज गोमांसाचा भाव सगळ्यात स्वस्त आहे, ते एकदम महाग होईल हे खरे; पण भोजनस्वातंत्र्यावर निर्बंध आले असा घटनात्मक मुद्दा काढणे हास्यास्पद आहे.
गोवधबंदीसाठी अनेक वर्षे अनेकांचे प्रयत्न चालू आहेत. गायीच्या वधावर यापूर्वीही बंदी होती. आता वळू, बैल, गोऱ्हे यांच्या वधावरही बंदी येत आहे एवढाच काय तो फरक. पूर्वी जनसंघाने या विषयावर दिल्ली राजधानीत मोठा धुमाकूळ घातला होता. बजाज परिवाराच्या आग्रहापोटी पूज्य विनोबाजींनीही गोवधबंदीसाठी प्राणांतिक उपोषण मांडले होते. गोवधासंबंधी बोलताना बंदी कायद्याच्या पुरस्कर्त्यांच्या मनात प्रामुख्याने देवनारसारख्या कत्तलखान्यात किंवा इतरत्र कसायाच्या सुरीने होणाऱ्या कत्तलीचेच चित्र असते. कत्तलखान्यातील कसायाच्या सुरीपासून गोवंश वाचवला की जिंकलो असा त्यांचा विचार असतो.

गायीचे रक्षण म्हटले की त्यांच्या नजरेसमोर एक वशिंडाची ‘धेनू’ किंवा ‘नंदी’गायच असते. युरोपमध्ये, भारतीयांना परिचित व पूज्य असलेल्या एक वशिंडाच्या या गाईला ‘झेबू’ किंवा ‘ब्राह्मण गाय’ असे म्हणतात. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात आता संकरित गायींचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. गोवंशाचे संरक्षण करण्यासाठी सरसावलेल्यांच्या मनात सपाट पाठीची, बिनवशिंडाची होल्स्टीन फ्रिझन किंवा जर्सी संकरित गाय त्या वंशात मोडते किंवा नाही कोणास ठाऊक! पण गाय माता मानली तर संकरित गाय निदान मावशी मानणे योग्य होईल. महाराष्ट्र शासनाच्या कायद्यात नुसते गाय किंवा बैल म्हटले आहे; संकरित गायींचा काही अपवाद केलेला नाही. गोरक्षकांची इच्छा नंदी गायींचे आणि त्याबरोबरच संकरित गायींचेही संरक्षण करण्याची असावी.

व्यवहारात परिस्थिती अशी आहे की कत्तलखान्यांपेक्षा शेतकऱ्यांच्याच घरी अधिक गोवंशाचा उच्छेद होतो. एका यशस्वी दूध व्यावसायिकाने मला स्पष्ट सांगितले की, दुधाचा धंदा फायद्याचा व्हायचा असेल तर संकरित गोऱ्ह्याला एक दिवसही दूध पाजणे परवडणार नाही. एवढेच नव्हे तर संकरित गाय तीन दिवस कोण्या आजाराने बसून राहिली तर त्यानंतर तिला गोठ्यात ठेवणे परवडणारे नसते.

आणीबाणीच्या काळात गायींसाठी कर्जे देण्याची टूम निघाली होती. पहिल्या वितीनंतर दूध थांबले आणि गर्भधारणा लांबली की तिला खाऊ घालणे परवडत नाही आणि पोराबाळांच्या तोंडचा घास काढून गाय जोपासणे कठीण जाते. या कारणास्तव गायीला जाणूनबुजून संपवण्यात येत होते. विमा कंपन्यांकडून भरपाईची रक्कम घेण्यासाठी गायीची शिंगे मृत्यूचा पुरावा म्हणून दाखवावी लागत. एकट्या धुळे जिल्ह्यात एक पुरे गोदाम शेतकऱ्याच्या घरी मेलेल्या (!) गायीच्या शिंगांनी भरलेले, विमा कंपनीच्या निरीक्षकाच्या फुरसतीची वाट पाहत पडलेले होते.

वाचा : इंडियन मुझाहीदीन सिर्फ आय. बी. की कल्पना है - सीमा मुस्तफा

वाचा : केवळ एकच बाब परदेशी आहे, आणि ती म्हणजे इस्लाम धर्म

गोवंशाचे संरक्षण म्हटले की केवळ कसाई-कत्तलीवर बंदी नाही. कसाईबंदीचा उपयोग कोणा जमातीला खिजवण्यासाठी होत असेल; पण त्यामुळे गायींना मारण्याचे थांबणार नाही. कायद्याने बंदी घालून आजपर्यंत कोणतीच सुधारणा झाल्याचा दाखला नाही. १८ वर्षांखालील मुलींची लग्ने सर्रास होतात. नवविधवा सती जात असल्याच्या बातम्या अजूनही येतात. दारूबंदी पोलिस खात्यालाच संपवून गेली आणि अफू-गांजावरील बंदीतून बाबा-महाराजांचे आश्रम आणि खलिस्तानसारख्या विभाजनवादी चळवळी निघाल्या. नवीन कायद्याने गोवंशाचे संरक्षण होणार अशी कायदा करणाऱ्यांचीही कल्पना नसावी. मुसलमानांच्या नाकावर टिच्चून कायदा केला एवढेच समाधान त्यांना पाहिजे असेल तर त्यांना ते नाकारता येणार नाही.

गोसंरक्षकांची विचारपद्धती किंवा निदान प्रचारप्रणाली काहीशी विचित्र आहे. गायीचा विषय निघाला की ते काव्यमय भाषेत बोलू लागतात. गाय माता आहे, गोवंशाच्या अध:पतनामुळे देशाचा अध:पात झाला, ‘गाय मरी तो बचा कौन?’ असे मोठ्या निष्ठेने ते मांडतात. भारतीय गायीत काही अद्भुत गुण आहेत. तिच्या श्वासोच्छ्वासातून प्राणवायू बाहेर पडतो. तिच्या शेणात आणि मुतात काही विलक्षण पोषक, कीटकनाशक, आरोग्यदायक, आत्मसंवर्धक गुण आहेत असे ते विज्ञानातील अर्धेकच्चे संदर्भ देऊन सांगू पाहतात. खत म्हणूनसुद्धा गायीच्या शेणमुताची मातबरी इतर कोणत्याही जनावराच्या उत्सर्जनापेक्षा जास्त आहे असे आग्रहाने सांगतात. गाय आणि बैल यांचे शेतीला महत्त्व किती प्रचंड आहे आणि गोरक्षण व गोसंवर्धन एवढ्या एकच कलमी कार्यक्रमाने देश सुखी आणि समृद्ध होणाची ते खात्री सांगतात.

बऱ्याच वर्षांपूर्वी राधाकृष्णजी बजाज या विषयावर चर्चेसाठी मला भेटले होते. त्यांचे सगळे वैज्ञानिक-अर्थशास्त्रीय विवेचन ऐकल्यानंतर मी त्यांना प्रश्न केला, ‘राधाकृष्णजी, तुम्ही हिंदू म्हणून जन्मला नसता तर या कामाचा प्रचार इतक्या हिरीरीने केला असतो का?’ बाकी काही असो, माणूस प्रामाणिक. त्यांनी कबूल केले की जन्माने मिळालेल्या सवर्ण सांस्कृतिक वारशाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे.

पाँडिचरी येथील अरविंद आश्रमामध्ये नैसर्गिक शेतीचा मोठा व्यापक प्रयोग चालला आहे. त्याची पाहणी करत असताना तेथील प्रमुखांच्या तोंडी गायीचे शेण, गायीचे मूत हे शब्द वारंवार येऊ लागले; तेव्हा त्यांनाही मी प्रश्न केला आणि बरेचसे आढेवेढे घेऊन का होईना त्यांनी सांस्कृतिक वारशापोटी गायीची भलावण करत असल्याची कबुली दिली.

सर्वच जनावरे उपयुक्त पशू असतात; गाय हा विशेष उपयुक्त पशू. गाईच्या चेहऱ्यावरील अभिव्यक्ती आणि पाणीदार डोळ्यांतील भावना मानवी अभिव्यक्तीशी अधिक जुळणाऱ्या. तिचे दूध मनुष्यप्राण्याच्या बाळांना सहज मानवते. हे सगळे खरे असले तरी जगातील सर्व देशांत गायीविषयी भावनिक जवळीक फारशी नाही. फ्रेंच भाषेत कोण्या स्त्रीला गायीची उपमा देणे हेटाळणीदाखलच होते.

सहृदयतेच्या कारणाने किंवा अगदी अर्थशास्त्राच्या आधाराने कोणत्याही प्राण्याचा वध करू नये असे मांडता येईल; पण व्यवहारी हिशेबापोटी असावे, अगदी गांधीवादीसुद्धा अहिंसेचा आग्रह धरताना सर्व पशुंच्या कत्तलीवर बंदी घालावी अशी मागणी करण्याचे धाष्टर्य करीत नाहीत. त्यांची करुणा गायीपुरतीच मर्यादित राहते!

विज्ञानाचा किंवा अर्थशास्त्राचा आधार गोवंश रक्षणासाठी आवश्यक आहे असे मला वाटत नाही. मनुष्य, व्यक्ती काय किंवा समाज काय, सर्वच काही शुद्ध तर्काने चालत नाहीत. विज्ञानाच्या शिखरावर पोहोचलेली राष्ट्रे पंख असलेले घोडे आणि शिंग असलेले सिंह आपल्या राजमुद्रांवर मिरवतात. गायीविषयीचा पूज्यभाव सर्वसाधारण समाजात आहे, एवढे पुरे आहे. कोणतीच पूज्य भावना विचक्षणेस उतरू शकत नाही. गायीच्याच बाबतीत अशी विचक्षणा का करा ? सर्वसामान्य समाजाला गाय मारली जाऊ नये असे वाटत असेल तर तसा कायदा करण्याचा त्यांना अधिकार आहे, गायीच्या श्वासात प्राणवायू आहे आणि प्रत्येक गाय ‘कामधेनू’च असते असला अवास्तव कांगावा करण्याची काहीच आवश्यकता नाही.

गायीविषयी प्रेम, आदर आणि करुणा भारतीय साहित्यात पूर्वापार आढळते. याउलट, बैल यज्ञयागात बळी देण्याची प्रथा वेदकालीन आहे आणि बळी दिलेल्या बैलांचे मांस हे ऋत्विजांचे शास्त्रोक्त खाद्य आहे. गोरक्षणाची परंपरा आहे तशी बैल आणि वळू यांच्या रक्षणाची परंपरा भारतीय इतिहासात नाही; पण आधुनिक हिंदुत्वावाद्यांना त्यासाठी आवश्यक ते जनसमर्थन आहे असं वाटत असल्यास त्यांना कोण आणि कसे थांबवणार?

गायींचे संवर्धन आणि त्यांचे रक्षण यावर पुष्कळसे काव्य मी ऐकले होते. मध्य प्रदेशातील छत्तरपूर मुक्कामी गांधी स्मारक आश्रमात मुक्कामास असताना एका सर्वोदयी नेत्याने या विषयावर चांगले तास दोन तासांचे प्रवचन ऐकवले होते. ते गेल्यानंतर शेतकरी संघटनेच्या बैठकीस सुरुवात झाली. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसमोर मी शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित रास्त भावाचे विस्तृत निरूपण केले. शेतीच्या आणि गरिबीच्या सर्व समस्यांचे एक सूत्र रास्त भाव आहे आणि सर्व प्रश्न सोडवण्याची गुरुकिल्ली रास्त भाव आहे हे सांगितले. त्यानंतर एका शेतकरी कार्यकर्त्याने उठून म्हटले, ‘शरदजी, तुमचा मुद्दा आम्हाला पटला. तुमच्या आंदोलनात आम्ही जरूर सामील होऊ; पण येथे मध्य प्रदेशात आमच्यापुढे त्याहीपेक्षा एक मोठी समस्या आहे. गावोगावी भाकड गायींचे कळप संख्येने वाढत चालले आहेत. त्यांना पोसण्याची जबाबदारी साऱ्या गावाची. त्यांनी कोठे तोंड लावले तर त्यांना हुसकतासुद्धा येत नाही; लाठी चालवणे दूरच राहिले. कुंपण नसले तर कळपच्या कळप शेतात घुसून पिकाची धूळधाण करतात. ‘शरदजी, हमे गाय से बचाओ, वाजिब दाम का मामला हम निबट लेंगे ।’ शेतकऱ्यांच्या मनातील भावना आणि शेतकऱ्यांचे नाव पुढे करून बोलणाऱ्यांचे युक्तिवाद यातील तफावतीने मला मोठा धक्का बसला.

वाचा : जबारदार कोण राज्यकर्ते की, भौगोलिक परिस्थिती?

वाचा : सांप्रदयिक हिंसा विधेयक और राजनिती

महाराष्ट्रात काही जिल्हे सोडल्यास असे मोकाट जनावरांचे कळप नाहीत; पण तरीदेखील दावणीला असलेल्या जनावरांची संख्या सारखी घटत असते हे रहस्य समजून घेण्यासाठी सोळा-सतरा वर्षांपूर्वी आम्ही बैलाचा उत्पादनखर्च काढण्याचा उपद्व्याप केला होता. जन्मल्यापासून अडीचतीन वर्षे गोऱ्ह्याला चांगले पोसावे तेव्हा तो कामास येतो आणि वय झाल्यानंतर जुवाखालून निघाल्यानंतर चारपाच वर्षे तरी बैलाला तसेच पोसावे लागते. मधल्या सात-आठ वर्षांच्या काळात तर त्यांच्या पोषणाचा खर्च खूपच वाढतो. पेंड, वैरण, हिरवा चारा काहीच तोडता येत नाही; नाहीतर शेतीची कामे होतच नाहीत. सतरा वर्षांपूर्वी बैलाच्या आयुष्यात दर दिवशी त्याच्या खाण्याचा खर्च २८ रुपये येतो, असा निष्कर्ष निघाला. शेतातले गवत असले तरी ते काही फुकट नाही, तेही विकतच घेतले आहे असे गृहीत धरून हा हिशेब काढला होता. आयुष्यभर, वर्षभर दरदिवशी २८ रुपये खर्चुन पोसलेल्या बैलाचा उपयोग त्याच्या उमेदीच्या वर्षात दरवर्षी जास्तीत जास्त ४० दिवस असतो. त्याकाळी भाड्याने बैलजोडी ३०रु. ने मिळत असे. बैल ठेवणारा शेतकरी शेतीतून सहीसलामत जगण्यावाचण्याची शक्यता शून्य. त्याच्या शेणामुतामुळे होणारा फायदा लक्षात घेऊनही बैल ही न परवडणारी गोष्ट आहे असा निष्कर्ष निघाला. तात्पर्य, बैल शेतकऱ्याला खातो!

भारतात पवित्र मानली जाणारी एक वशिंडाची नंदी गाय. हिच्यात काही विशेष गुण आहेत यात काही शंका नाही. ती बिचारी काहीच मागत नाही. अगदी दुष्काळाच्या काळातही जमिनीवर आलेले पेरभर वाळकेसाळके गवत खाऊन ती स्वत: गुजराण करते आणि जमेल तसे म्हणजे अर्धा लिटर, लिटर दूध कसोशीने देते. भारतातील शेतकरी Servival technology (जगून वाचून राहण्याचे तंत्रज्ञान) वापरतो. ही भारतीय शेतकऱ्याची श्रेष्ठता, तसेच त्याची गाय दुष्काळात, इतर कोणत्याही बिकट परिस्थितीत ती टिकून राहते हा तिचा मोठा गुण! नंदी गायीची बहीण संकरित गाय. तिच्या खाण्यापिण्यात आठवडाभर हयगय झाली तर ती कायमची खराब होते. नंदीगायीच्या असल्या मिजाशी नाही. हे तिचे कौतुक.

पण, ‘ब्राह्मण गायी’च्या या विशेष गुणाचा एक मोठा विपरीत परिणाम दिसून येतो. गायीची ही झेबू जात जगाच्या पाठीवर प्रामुख्याने भारतीय उपखंड आणि एका काळी त्याला संलग्न असणारा आफ्रिकेचा पूर्व किनारा येथेच सापडते. म्हणजे, या गायीचा राहण्याचा प्रदेश बांगला देश, भारत, पाकिस्तान, इथिओपिआ, टांझानिया आणि केनिया. आश्चर्याची गोष्ट अशी की नेमके हेच देश जगात सर्वांत दरिद्री राहिले आहेत. सपाट पाठीच्या गायींचे देश वैभवाच्या शिखरावर आहेत. म्हशी बाळगणारे थायलंड, कंबोडिया, मलेशियासारखे देश खाऊन पिऊन सुखी आहेत. वशिंडाची ब्राह्मण गाय साऱ्या देशाची लक्ष्मी फस्त करून टाकते याचा हा सज्जड पुरावा आहे.

याचा अर्थ गोवंशाच्या कत्तलीस बंदी करू नये असा नाही. अशा बंदीमुळे देशात चैतन्य पसरणार असेल, लोकांना काही आत्मिक समाधान लाभणार असेल तर असे अवश्य केले पाहिजे. फक्त, वाचलेल्या गायींचे सड एकाकडे आणि खायचे तोंड दुसऱ्याकडे अशी विभागणी करून चालणार नाही. गाय आमची आई आहे, ती भली तोट्याची असो तिला शेवटपर्यंत सुखाने पोसण्याचा आमचा निर्धार आहे. त्यासाठी काहीही किमत द्यावी लागली तरी चालेल असा जेथील आम जनतेचा निर्धार आहे, तेथे कत्तलीस बंदी जरूर झाली पाहिजे; पण बंदीमागोमाग इतरही काही पावले घेतली पाहिजेत. गायीची उत्पादकता सात-आठ वर्षे आणि आयुष्यमान बारातेरा वर्षे अशी परिस्थिती या कायद्याने तयार होईल. भाकड काळात गायीला पोसायचे कोणी? शहरी धर्ममार्तंडांनी गोपूजनाच्या गोलमाल गोष्टी सांगायच्या आणि तिला पोसायचे ओझे मात्र शेतकऱ्याने घ्यायचे अशी व्यवस्था टिकू शकणार नाही. कत्तलखान्यातील कत्तली थांबतील, पण शेतकऱ्याच्या घरची हेळसांड थोडीच थांबणार आहे? कत्तलीवर बंदी घातली तर मेलेल्या जनावरांचा उपयोग करण्यात आला असे नाटक सहज वठवता येईल. मग, गाय-बैल खरोखरच नैसर्गिकरीत्या मेले की खाण्यापिण्याची हेळसांड झाल्यामुळे मेले की औषध घालून मारले गेले याची प्रत्येक वेळी चौकशी करावी लागेल. प्रत्येक गाय-बैलाचे शवविच्छेदन करावे लागेल. शेतकऱ्यांना कचाट्यात पकडून त्यांच्याकडून आणखी दक्षिणा उकळू पाहणाऱ्या नोकरशहांची आणखीच चंगळ होईल.



गोवंश हत्याबंदी पशुपालनाच्या सर्व सिद्धांताविरुद्ध आहे. गायीचा गोठा किफायतशीर व्हायचा असेल तर पुऱ्या कळपातील गायींची दररोजच्या दुधाची सरासरी ८ लिटर तरी असली पाहिजे. म्हणजे, वीतानंतर वीस-बावीस लिटरपेक्षा कमी दूध देणारी गाय आर्थिकदृष्ट्या निव्वळ बोजा आहे. चांगल्या चांगल्या गायींचे संवर्धन आणि कमअस्सल गायींना गोठ्यातून काढणे ही दूधउत्पादनातील आणि यशस्वी पशुसंवर्धनातील गुरुकिल्ली आहे. त्यांचा मान राखला नाही तर काय होईल ? गायींची पूजा करणाऱ्या भारतातील गायी सर्वात कमअस्सल आणि जेथे गाय खाल्ली जाते तेथे गायीच्या सर्वोत्कृष्ट जातींचे संवर्धन असे विचित्र दृश्य चालूच राहील.

पण हे सर्व बाजूला ठेवून, भावनेपोटी, गायीची कत्तल होता कामा नये असा आग्रह धरण्यात चूक काही नाही. तसे करायचे ठरले तर येथील दुधाची किंमत जगातील इतर देशांच्या तुलनेने निदान दुप्पट राहील. ती देण्याची तयारी, गायीविषयी पूज्य भावना बाळगणाऱ्यांनी ठेवली पाहिजे. ‘तुम्ही गायी सांभाळा आम्ही वसूबारसेला हळद कुंकू वाहू’ असली दांभिकता काय कामाची?
पुस्तकाचं नाव : बळीचे राज्य येणार आहे!

लेखक : शरद जोशी

पान : ११५-१२१

प्रकाशक : जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

ऑक्टोबर २०१०

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,50,इस्लाम,41,किताब,26,जगभर,131,पत्रव्यवहार,4,राजनीति,307,व्यक्ती,25,संकलन,65,समाज,267,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,55,
ltr
item
नजरिया: गोवंश हत्याबंदी नव्हे ? ‘गो’पाल हत्या - शरद जोशी
गोवंश हत्याबंदी नव्हे ? ‘गो’पाल हत्या - शरद जोशी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj7Ij-aJ-YY6rcPD0iTyYAmr7tDQI8gR0uWiqvCRvN19JspxGzDc35h0_f2vVkCQHBf1qAEoLZVy_Mqk1dfnr1PZV3wXmdMZTFLuLLtV-qu4xhzoWyIfI4UuOu7S4cTebAMfG6tOhyphenhypheneD8tr51GKmzxYvJHius6jxQ2DM7UUjTmsJOt7lq6eMiRh88cukF5s/w640-h404/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%A7.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj7Ij-aJ-YY6rcPD0iTyYAmr7tDQI8gR0uWiqvCRvN19JspxGzDc35h0_f2vVkCQHBf1qAEoLZVy_Mqk1dfnr1PZV3wXmdMZTFLuLLtV-qu4xhzoWyIfI4UuOu7S4cTebAMfG6tOhyphenhypheneD8tr51GKmzxYvJHius6jxQ2DM7UUjTmsJOt7lq6eMiRh88cukF5s/s72-w640-c-h404/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%A7.png
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2015/03/blog-post_11.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2015/03/blog-post_11.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content