‘मनमोहन पर्व’ : शांत, संयमी तरीही ‘सिंग इज किंग’

नमोहन सिंह यांच्या पंतप्रधान कार्यकालाचं पहिलंच वर्ष होतं. ऑगस्ट महिना होता. एके संध्याकाळी दूरदर्शनवर ‘डीडी उर्दू’ या नव्या चॅनेलचा लोकार्पण सोहळा सुरू होता. मी घरात नव्यानेच आलेल्या टीव्हीवरून हे दृश्य पाहत होतो. पंतप्रधान मनमोहन सिंग धाड-धाड अस्सख्लित उर्द भाषेत बोलत होते. उर्दू भाषा, शायरी, साहित्य, कला, संस्कृतीविषयी त्यांनी केलेलं भाष्य आजही आठवतं.

मनमोहन सिंग यांची मातृभाषा पंजाबी असली तरी ते अस्खलित उर्दू जाणत होते. त्यांचा जन्म अविभाजित पंजाब प्रांतातील चकवाल जिह्यातील ‘गाह’ गावी झाला होता. फाळणीनतंर हे गाव पाकिस्तानमध्ये गेलं. पाकिस्तान सरकारने सिंग यांना पंतप्रधान असताना त्यांच्या जन्मगावी बोलावून प्रचंड मोठा सत्कार सोहळा घडवून आणला. त्यांच्या जन्म गावाचं नाव मनमोहन सिंग यांच्यावरून करण्याचा प्रस्तावही पाक सरकारने मांडला होता.

त्या काळात बातमी आली होती की “भारताचे पंतप्रधान पाकिस्तानमध्ये राहतात व पाकिस्तानचे पंतप्रधान दिल्लीत राहतात..” अर्थातच सिंग यांचं जन्मगाव पाकिस्तानमध्ये तर त्यावेळेसचे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांची कोठी दिल्लीत होती. नव्यानेच सुरू झालेल्या न्यूज चॅनेल्सकडून ही बातमी खूपच रंजक पद्धतीने लावली गेली.

मनमोहन सिंग तब्बल ३३ वर्षे संसदेत खासदार होते. त्यांनी कधीही लोकसभेची निवडणूक लढवली नाही. राज्यसभेतून ते खासदार होत गेले. तीन दशकांच्या त्यांच्या या कारकिर्दीत राज्यसभेचं विरोधी पक्षनेते, अर्थमंत्री ते पंतप्रधान अशी पदं त्यांनी भूषवली.

वाचा : मानवतेची संरक्षणकर्ता पंजाबी चौकडी

वाचा : महात्मा फुले आणि सर सय्यद अहमद खान

मनमोहन सिंग २००६ साली पंतप्रधान झाले. त्यावेळी हे कोण? कुठले? असं सामान्य लोकांना वाटत होतं. कारण सिंग मुरलेले राजकारणी नव्हते. मुख्य प्रवाही राजकारणात त्यांचा वावरही नव्हता. मुळात ते त्यावेळी संसदेच्या सभागृहाचे सदस्य नव्हते. परंतु अटल बिहारी वाजपेयींना प्रचंड मत्ताधिक्क्याने पराभूत केल्यानंतर काँग्रेसला देशाला मार्गदर्शक ठरेल असा विद्वान आणि दूरदृष्टी वाला पंतप्रधान हवा होता. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानाची खुर्ची सांभाळावी यासाठी लोकसभेत दीर्घकाळ चर्चा झाली. पण त्यांनी नकार दिला. अखेरीस काँग्रेसने आपले ‘ठेवणीतलं नाणं’ बाहेर काढलं व मनमोहन सिंग यांना पंतप्रधान घोषित केलं.

सत्तेवर आल्यानंतर डॉ. सिंग यांनी देशाला एक सामर्थ्यवान महासत्ता होण्याचे वचन दिलं. त्यांच्या या वचनाची चर्चा दीर्घकाळ सुरू होती. त्याला जोडूनच तत्कालीन राषट्रपती अपीजे अहब्दुल कलाम यांनी २०२५ पर्यंत भारत आर्थिक महासत्ता होईल, असं स्वप्न भारताला दिलं होतं. डॉ. सिंग यांनी एक अब्ज लोकसंख्येला आपण महासत्ता होऊ शकतो, असा आत्मविश्वास निर्माण केला.

२००८ साली भारताने अमेरिकेशी अणू करार करण्याचा निर्णय घेतला. या करार संदर्भात सिंग यांच्यावर प्रचंड टीका झाली. सरकारचा घटक दल असलेले डावे त्यांच्या विरोधात गेले. कम्युनिस्ट नेते सोमनाथ चटर्जी त्यावेळी लोकसभा अध्यक्ष होते, त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली व पंतप्रधान सिंग यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला. भाजप-आरएसएसने अणू करारावर प्रचंड टीका केली. प्रसार माध्यम संघाची री ओढत होते.

त्यांनी खूप वर्षांनी याविषयी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं होतं, “…हा माझ्यासाठी नक्कीच सर्वोत्तम क्षण होता जेव्हा आम्ही सामाजिक आणि आर्थिक बदलाच्या प्रक्रियेत अडथळा आणू पाहणाऱ्या आण्विक वर्णभेदाचा अंत करण्यासाठी अमेरिकेशी अणु करार करू शकलो, आणि अनेक मार्गांनी आपल्या देशाची तांत्रिक प्रगती घडवून आणू शकलो.”

डॉ. मनमोहन सिंग सत्तेत असताना त्यांचे खूप विरोधक होते. सत्ता पक्ष काँग्रेस व सत्तेतील घटक पक्ष सोडले तर सर्वच नागरी संघटना, राजकीय पक्ष, व्यक्ती त्यांच्यावर तुटून पडत. त्यांचा अबोल स्वभाव याला कारणीभूत असावा.‌ कारण ते विरोधकांच्या कुठल्याच आरोपांना दात देत नव्हते. त्यामुळे कदाचित विरोधक चिडलेले असावेत.

अण्णा आंदोलनानंतर डॉ. सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. सर्व विरोधकांनाही ठाऊक होतं की, सिंग भ्रष्टाचार करणार नाहीत. पण त्यांच्या राजकारणाची ती गरज होती. परिणामी सिंग यांच्या अनेक हल्ले झाले. कॉमनवेल्थ, टू स्पेक्ट्रम व कोळसा घोटाळा मीडियाने उचलून धरला. विरोधी पक्षाने त्यात तेल ओतण्याचं कार्य केलं. सरकार व त्यांच्या मंत्र्यावर चिखलफेक झाली.

आरएसएस-भाजपने अण्णा हजारेना हाताशी घेऊन दिल्लीत लोकपाल आंदोलन छेडले. जनसमर्थनाचा रेटा वाढवून सत्तांतर घडवून आणण्याचा भाजप-संघाचा डाव होता. पण डॉ. सिंग संघाला बधले नाही. त्यांनी लोकपाल आणण्याची प्रक्रिया सुरू केली.

आंदोलनकाळात डॉ. सिंग सरकारवर प्रचंड टीका झाली. अनेक राजकीय विश्लषकांचं म्हणणं होतं की, सिंग या आंदोलनाला योग्य पद्धतीने हाताळण्यास असमर्थ ठरले. हे आंदोलन सत्ताबदलचे संकेत ठरले. पुढे निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात विरोधकांना आयती संधी चालून आली. पुन्हा आरएसएसने मीडियाला हाताशी धरून सत्तांतर घडवून आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी सिंगसाठी असंविधानिक शब्द वापरली होती. राज ठाकरे देखील पातळी सोडत बरळत होते. भाजपने मनमोहन सिंग यांच्यावर तुटून पडण्याचा एककलमी कार्यक्रम घोषित केला होता.

विरोधकांच्या सततच्या राजीनाम्याच्या मागणीला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. म्हणाले, “मला कधीही राजीनामा द्यावासा वाटला नाही. मला माझे काम करताना आनंद झाला आहे. मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणाने, सर्व भावनेने, कोणतीही पर्वा न करता, भीती किंवा पक्षपात करण्याचा प्रयत्न केला आहे.”

अण्णा आंदोलनानंतर मात्र ते थोडेसे विचलित वाटू लागले. काँग्रेस नेतृत्व आणि सिंग यांच्यात बेबनाव मीडियातून दिसून येत होता. मनमोहन सरकारने काढलेला एक अध्यादेश राहुल गांधी यांनी निरर्थक ठरवून फाडून टाकला होता. त्यावरून देखील मीडियाने मनमोहन सिंग यांना प्रचंड ट्रोल केलं होतं. पुढे मीडियाने मनमोहन सिंग व राहुल गांधी यांच्या प्रतिमा म्हणून करण्याचं कंत्राटच घेतलं.

वाचा : काश्मिरची राजकीय कहाणी : ‘आतिश ए चिनार’

वाचा: ‘स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान’ बेदखल का झाले?

निर्भया आंदोलनानंतर भाजप-संघाने त्यांना ‘मौनमोहन’ अशी पदवी बहाल केली. संघाच्या प्रचारी मीडियानेदेखील हीच बिरुदावली पुढची दोन-एक वर्ष लावून धरली. कार्यकाळातील शेवटच्या सत्रात भाजप-आरएसएसने बराच गदारोळ घडवून आणला.

२०१४च्या निवडणूक प्रचारात मनमोहन सिंग विरुद्ध भाजप असा प्रयोग राबविला गेला. कर्मठ हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होऊन मोदी प्रचार मैदानात होते.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने मनमोहन यांच्या अश्लाघ्य भाषेत टीका-टिप्पणी केली. उद्धव ठाकरे यांनी तर सिंग यांच्यावर व्यक्तिगत हल्ला केला. त्यांच्या पौरुषत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अखेरीस आरएसएच्या वाट्याला सत्तांतर आलं व धर्मांध हिंदुत्वाचा जहाल चेहरा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.

वास्तविक, मनमोहन सिंग यांचा मितभाषी व अबोलपणा यांच्यावर सतत हल्ले करून नरेंद्र मोदी ‘मीडिया मॅन’ झाले होते. प्रचारी मीडियाने त्यांना डोक्यावर घेऊन मिरवणं सुरू केलं. मनमोहन सिंग यांचा अबोलपणा मोदींना सत्तेत आणण्यासाठी कारणीभूत ठरला, असेही काहीजण नंतर म्हणत होती. मनमोहन सिंग व काँग्रेस आलेल्या परिस्थिती ढकलत राहिले. वेळ मारून नेऊ लागले. परिणामी जनतेच्या मनात अकार्यक्षम पंतप्रधान अशी प्रतिमा ठसवण्यास भाजपला यश आलं.

जानेवारी २०१४ पर्यंत मीडिया पूर्णत: संघ-भाजपच्या पे-रोलवर आलेला होता. टीव्ही न्यूज मीडियाने पंतप्रधान व काँग्रेसेचे नेते राहूल गांधी यांची प्रचडं खिल्ली उडवणं सुरू केलं होतं. सोशल मीडियामार्फत इतके अश्लील व हिंस्र हल्ले चढवले जाऊ लागले. अवास्तव वा खोटी आकडेवारी प्रचारित करून डॉ. सिंग यांनी देश कसा खड्ड्यात घातला, असे गोबेल्स शैलीत सांगितलं जाऊ लागलं.

निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी डॉ. सिंग यांनी पंतप्रधान म्हणून आपली शेवटची पत्रकार परिषद घेतली. ३ जानेवारी २०१४ला झालेल्या या पत्र परिषदेला शंभरहून अधिक पत्रकार हजर होते. या वेळी डॉ. सिंग यांनी ६२ पेक्षा अधिक प्रश्नांना उत्तरं दिली. मीडियाने डॉ. सिंग यांना अडचणीत आणण्याचा पूरपूर प्रयत्न केला. प्रश्न विचारताना वेळोवेळी त्यांचा अवमान केला. तरीही सिंग यांचा तोल ढळला नाही आणि त्यांनी शिष्टता सोडली नाही.

डॉ. सिंग यांना विचारलेले काही प्रश्न अश्लाघ्य आणि असभ्यही होते. जसं, तुम्ही राजकारणात गती नसलेले पंतप्रधान आणि निष्कारण अवास्तव महत्त्व दिले गेलेले अर्थतज्ज्ञ आहात, असं म्हटलं जातं; त्यावर काय प्रतिक्रिया आहे?”

एका पत्रकाराने त्यांना विचारलं की, भाजप आणि नरेंद्र मोदी तुम्ही दुबळा पंतप्रधान असल्याचा आरोप करतात. तुमच्याच पक्षाने तुम्हाला कमकुवत केलं आहे का? या प्रश्नावर सिंग यांनी काही क्षण गप्प राहिले. मग ते अगदी शांत स्वरात म्हणाले, मी कमकुवत होतो की नाही हे इतिहासच ठरवेल.”

पुढे त्यांनी म्हटलं, भाजप आणि त्याच्या सहकाऱ्यांना जे बोलायचं आहे त्यांना ते बोलू द्या. जर मजबूत पंतप्रधानाची तुमची व्याख्या अहमदाबादच्या रस्त्यावर निर्दोष नागरिकांची हत्या आहे, तर मी स्वीकार करतो की देशाला अशा मजबूत पंतप्रधानाची गरज असावी.” पुढे त्यांनी म्हटलं, “नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर देशासाठी ते घातक ठरेल.”

या पत्र परिषदेत त्यांनी आपल्या १० वर्षीय कारकीर्दीत लोकांचे व्यक्तिगत व कौटुंबिक उत्पन्न किती वाढले, जीवनशैली व राहणीमान चलनवाढीपेक्षाही अधिक सुस्थित कसे झाले, हे त्यांनी स्पष्ट व थेट सांगितली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करत मीडियाने पंतप्रधानांची पत्रकार परिषद ‘कुचकामी’, ‘प्रभावहीन’ आणि ‘गद्य’ झाल्याचा निर्वाळा देऊन टाकला.

वाचा : जनकार्याला श्रद्धा मानणारे कर्पूरी ठाकूर

वाचा : आरएसएसप्रणीत वर्तमान राजकारणाचा इतिहास : 'मनुचा मासा'

सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने ग्रामीण भागातील लोकांना, विशेषतः गरीब, स्त्रिया आणि मुलांसाठी परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली. त्यासाठी एप्रिल, २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) सुरू केले. खाद्य सुरक्षा विधेयक आणून गरीबांना मोफत अन्नधान्य वाटर धोरण आणलं. सर्व भारतीयांसाठी UID क्रमांक म्हणजे आधार नंबर दिला. मोठ्या बँकिंग व्यवहारासाठी पॅन कार्ड सक्तीचं केलं.

पंतप्रधान कार्यकाळात एका पत्र परिषेदेला संबोधित करताना त्यांनी म्हटलं होतं, आम्ही आणखी काही करू शकलो असतो हे कबूल करणारा मी पहिला व्यक्ती आहे.”

डॉ. सिंग यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेनंतर ‘दिव्य मराठी’ने संपादकीय लिहित १० वर्षाच्या कारकीर्दीचा समर्पक शब्दात आढावा घेतला होता. पत्र म्हणते,

२००४मध्ये सत्तेत आल्यापासून डॉ. मनमोहन सिंग यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सोयींचा विस्तार, मनरेगा, कर्जपुरवठा, कृषिमालाला रास्त दर, आरोग्य, शिक्षण यावर लक्ष केंद्रित केल्याने देशाचा आर्थिक विकास वेगाने होऊ लागला. याच ग्रामीण विकासामुळे भारत अन्नधान्य, साखर, फळे, भाज्या, दूध व पोल्ट्री उत्पादनांची जगाला निर्यात करू लागला.

पंतप्रधानपदी आल्यानंतर त्यांनी ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात केली. आज जीवनशैलीचा विचार करता ग्रामीण व शहरी भारत यांच्यातील अंतर फार कमी राहिलेले आहे. ज्या वस्तू शहरात मिळतात, त्या ग्रामीण भागात मिळण्याची शक्यताही वाढली आहे. त्यातच गेल्या दहा वर्षांत संपर्क क्रांतीमुळे भारतातील सर्व शहरे ग्रामीण भागाला जोडली गेली आहेत. ग्रामीण भारताचा हा बदलता आर्थिक चेहरा ही डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणाची मोठी कमाई आहे.

यूपीए-१ सरकारच्या कारकीर्दीच्या अखेरीस शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना त्यांनी छोट्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा होईल, याकडे लक्ष दिले. त्यामुळे यूपीए-२ सरकार सत्तेवर आले. विकास हा केवळ मोटारगाड्या, मोबाइल किंवा फ्लॅट घेण्याइतपत मर्यादित नसतो, तर अर्थव्यवस्थेत विविध आर्थिक संधी उपलब्ध व्हाव्या लागतात. डॉ. मनमोहन सिंग यांच्या साडेनऊ वर्षांच्या कारकीर्दीत गरिबी झपाट्याने खाली येऊन ती १३ टक्क्यांपर्यंत आली.

एवढ्या झपाट्याने गरिबीची टक्केवारी खाली झाल्याचे श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांना खासगीत व सार्वजनिक पातळीवर उदारपणेही कोणी देत नाही. केवळ टूजी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळ्यांची ढाल पुढे करत डॉ. सिंग यांच्या कार्याचे मूल्यमापन केले जात आहे. हेच विरोधक २००४-०९ या वर्षांतल्या भारताच्या आर्थिक विकासाबद्दल जाणूनबुजून मौन बाळगतात. २००८-१०मध्ये जग आर्थिक मंदीतून जात असताना भारतामध्ये मात्र उद्योगधंद्यांना किंवा सामान्यांना त्याची झळ बसली नाही. याची कारणे काय असावीत, याबाबतही इलेक्ट्रॉनिक माध्यमे खल करताना दिसत नाहीत.”

श्रीयुत सिंग प्रथितयश अर्थशास्त्रज्ञ होते. अर्थशास्त्राचे विद्यापीठीय प्राध्यापक होते. रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर होते. केंद्रीय अर्थमंत्री होते. पंतप्रधान काळात संसदेत त्यांनी केलेल्या भाषणांचे १० खंड प्रकाशित झालेले आहेत.. ते पाहून त्यांची विद्वत्ता व दूरदृष्टी लक्षात येते.

मीडियाची सततची टीका पाहून श्री. सिंग यांनी प्रत्युत्तर देताना हसतमुखाने म्हणाले, “माझा प्रामाणिकपणे विश्वास आहे की, समकालीन माध्यमांपेक्षा किंवा संसदेतील विरोधी पक्षांपेक्षा इतिहास माझ्यासाठी अधिक दयाळू असेल.” आज त्यांच्या निधनानंतर वृत्तपत्रातील अनेक बातम्या वाचून याची खात्री पटते.

२००६ ते २०१४ या दहा वर्षाच्या काळात ते पंतप्रधान होते. या काळात देशासमोर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले. विरोधकांनी सरकारला नाकी नऊ आणले.. भाजप-संघाने मोर्चे, आंदोलने व निदर्शने करून त्यांना वारंवार छळलं. अनेक वेळा स्थिती अशी होती की सभागृहाचं कामकाजच होऊ दिलं जात नव्हतं. संसदेतील विरोधी पक्षनेते असो किंवा वेगवेगळ्या भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री सिंग यांच्यावर सतत टीका करायचे. मनमोहन ‘सिंग इज किंग’ ठरले... प्रत्येकांना पुरून उरले. उगाच प्रतिक्रिया देत न बसणे त्यांचं खरं सामर्थ्य होतं. कुठल्याही अटीतटीच्या प्रसंगात शांततेने मार्ग काढावा या वृत्तीचे होते.

२०१४च्या पराभवानंतर डॉ. सिंग दीर्घकाळ संसदेत होते. परंतु सत्तापक्षाच्या धोरणांचा विरोध करताना त्यांनी आपली पातळी कधी सोडली नाही. डॉ. सिंग त्यांच्या संयमित भाषणांसाठी ओळखले जातात. ते शांत, संयमी व मितभाषी होते. नेहमी वादापासून दूर राहिले. टीकाकारांनाही त्यांनी मृदू भाषेतच उत्तरं दिली. इशारा द्यायचा किंवा एखाद्यावर टीका करायची असेल तरी ती अगदी सौम्य भाषेत करत.

मार्च, २०११ला लोकसभेत संसदेच्या कामकाजादरम्यान भाजपच्या वतीने विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी

तू इधर-उधर की ना बात कर

ये बता कि काफिला क्यों लुटा,

हमें रहजनों से गिला नहीं, तेरी रहबरी का सवाल है.”

या शायरीचा संदर्भ देत जोरदार हल्ला केला. या टीकेला मनमोहन सिंग यांनीही खास शैलीत उत्तर दिलं. त्यांनी पुढील शेर म्हटला,

माना कि तेरे दीद के काबिल नहीं हूं मैं,

तू मेरा शौक देख, मेरा इंतजार देख.”

डॉक्टर साहेबांच्या या उत्तराने अवघं सभागृह खळखळून हसलं होतं. त्याचप्रमाणे विरोधकही आपलं हसू रोखू शकले नाहीत. डॉय सिंग संवेदनशील वृत्तीचे पंतप्रधान होते. देश व प्रत्येक नागरिकांचं सर्वहित पाहणारे दूरदृष्टीचे प्रधान होते.

मोदी सरकारच्या सांप्रदायिक धोरणावर त्यांनी सातत्याने प्रहार केला. नोटबदलीला त्यांनी संघटित लूट म्हटलं होतं. त्यावेळी सत्तापक्ष असो की विरोधी पक्षातील बहुतांश नेत्यांना नोटबंदीचे नेमकं प्रकरण कळत नव्हतं. पण मनमोहन सिंग यांनी आपल्या पहिल्याच भाषणात मोदी सरकारचा डाव ओळखला. शिवाय अनेक बाबतीतही त्यांनी मोदींवर समर्पक शब्दात शाब्दिक प्रहार केला.

डॉ. सिंग यांनी पंतप्रधान असताना दीडशेच्या वर पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. परंतु मोदींनी अद्याप एकही पत्र परिषद घेतलेली नाही. यावरून आजही डॉ. सिंग यांचं कौतुक तर मोदींवर सतत टीका होत राहते. याविषयी २०१८ साली डॉ. सिंग यांनी लिहिलेल्या ‘चेंजिंग इंडिया’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान समर्पक टिप्पणी केली होती.

त्यांनी म्हटलं होतं, "लोक मला सायलेंट पंतप्रधान म्हणायचे. पण मला वाटतं, पत्रकार परिषदांना घाबरणारा पंतप्रधान मी नव्हतो. मी मीडियाला नियमितपणे सामोरं जायचो आणि विदेश दौऱ्याहून आल्यानंतर पत्रकार परिषद घ्यायचो.”

कोराना काळात त्यांनी ‘दि हिंदू’ वृत्तपत्रात मोदी सरकारवर टीका करणारा एक लेख लिहिला होता.  त्यात त्यांनी म्हटलं होतं, “सामाजिक तनाव आणि आर्थिक उद्ध्वस्तीकरण स्व-प्रेरित आहे. कोरोना वायरसमुळे सुरू असलेली कोविड-१९ रोगराई बाह्य झटका आहे. मला खूप चिंता वाटते की, हे संकट केवळ भारताच्या आत्माची चाळणी करणार नाही तर जगात आमच्या आर्थिक आणि लोकशाही शक्ती तथा जागतिक कीर्तीदेखील नष्ट करू शकते.”

याच लेखात त्यांनी सीएए-एनआरसीच्या सत्याग्रही आंदोलनाला मोडून काढण्यासाठी दिल्लीत घडलेल्या दंगलीवरही भाष्य केलं होतं. म्हणतात,गेल्या काही आठवड्यापासून दिल्लीत भीषण हिंसा सुरू आहे. आम्ही अकारण आमच्या जवळपास ५० भारतीयांना गमावलं आहे. शेकडो लोक जखमी झाले. विद्यापीठ परिसर, सार्वजनिक स्थळे आणि नागरिकांच्या घरांना सांप्रदायिक हिंसेची झळ बसली आहे. ही घटना भारताच्या इतिहासातील काळ्या पानांची स्मृती ठळक करत आहे.”

भाजपच्या समर्थक गटांनी निर्माण केलेला सांप्रदायिक कलह व विभाजनवादी प्रवृत्तीवर त्यांनी लिहिलं की, “कुठल्याही नियंत्रणाशिवाय सामाजिक विभाजनाची आग देशात पसरत आहे आणि आमच्या देशाच्या आत्म्याला संकटात टाकत आहे. या आगीला तेच लोक विझवू शकतात ज्यांनी ही आग पेटवली आहे. सांप्रदायिक हिंसेची प्रत्येक घटना गांधींच्या भारतावर एक डाग आहे.” त्यांचा हा लेख सत्तापक्षाला बराच झोंबला होता.

मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान असताना नेहमी लोककल्याणाचा उद्दात्त हेतू बाळगला. आर्थिक विकास हा सर्वसमावेशक असावा वा त्याचे लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत, अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी डॉ. सिंग अनेक वर्षे काम करीत होते. त्यामुळे देशातील नागरिकांचं जीवनमान कसं उंचावता येईल, यासाठी ते सतत प्रयत्नशील होते.

डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून केलेल्या कार्याची दखल जगानेही घेतली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आर्थिक संकटाच्या काळात मनमोहन सिंग यांचा सल्ला घेत असल्याचं म्हटलं होतं. जगावर मंदीचं सावट असतानाही भारताची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्याची जादू मनमोहन सिंग घडडवून आणू शकले. जागतिक मंदीची झळ भारतीय अर्थव्यवस्थेला किंचितही बसली नव्हती.

विरोधकही त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेची दाद देत होते. मोदींच्या सत्ताकाळात भाजपचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीदेखील मनमोहन सिंग यांचं कौतुक केलं होतं. नोव्हेंबर, २०२२ला एका कार्यक्रमात त्यांनी म्हटलं होतं, लिबरल इकोनॉमी (उदार अर्थव्यवस्था)मुळे देशाला एक नवी दिशा लाभली, त्यासाठी देश मनमोहन सिंह यांचा ऋणी असेन.”

शेवटी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनादेखील मनमोहन सिंग यांचं कर्तृव मान्य करावं लागलं. डॉ. सिंग यांच्या निधनानंतर मोदींनी श्रद्धांजली देत म्हटलं, सामान्य पार्श्वभूमी असलेले डॉ. मनमोहन सिंग एक विख्यात अर्थतज्ज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्री आणि इतरही अनेक पदांवर काम करत अनेक वर्ष आपल्या आर्थिक धोरणांवर छाप सोडली. संसदेत त्यांनी मांडलेले मुद्देही व्यावहारिक असत. पंतप्रधान म्हणून काम करत असताना त्यांनी जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी अथक प्रयत्न केले.”

डॉ. सिंग मुळातच खूप कमी बोलत. हिंदोस्तानी भाषा त्यांना फारशी अवगत नव्हती. अधून-मधून बोलताना चार-दोन तुटक शब्द वापरायचे. त्यामुळेदेखील ते जास्त बोलत नसावेत. किंबहुना त्यांचा स्वभाव वाचाळ नव्हता. निरर्थक बडबड ते कधीच करीत नव्हते. मोजकं व प्रभावी बोलत. सार्वजनिक कार्यक्रमातही पाल्हाळीक बोलणं टाळत.

डॉ. सिंग शांत, संयत, मितभाषी व सहिष्णू स्वभावाचे होते. सभ्यता, सुसंस्कृतपणा, नेमस्तपणा व संसदीय लोकशाही मूल्यांची पाठराखण हे सद्गुण त्यांच्याकडे होते. त्यांनी कधीही अशिष्ट आणि अभद्र राजकारण केलं नाही. श्री. मनमोहन ज्या पिढीचे राजकीय नेतृत्व करत ती पिढी सभ्य व सुसंस्कृत होती. राजकीय शिष्टाचार व सभ्यता जाणणारी होती. विरोधकाच्या आक्षेपांना उत्तर देणारी होती. विरोधकांना मानसन्मान देणारी होती. युट्युबवर त्यावेळेसचे मनमोहन सिंग व विरोधी पक्षातील संभाषण ऐकलं की सुसंस्कृतपणाचे अनेक दाखले दिसू लागतील.

डॉ. सिंग यांच्या निधनानंतर भाजपमधील त्यांचे विरोधकही मनमोहन सिंग यांच्यासाठी कौतुकाचे उद्गार काढत आहेत. त्यांनी जगाचा निरोप घेतला म्हणून नव्हे तर त्यांच्या कर्तुत्वाची खरी जाण त्यांच्या विरोधकांनाही होती.

असा सुसभ्य, सुसंस्कृत व मितभाषी नेता आज भारताने गमावला आहे. सरत्या वर्षातील ही खूप मोठी क्षती आहे...

मनमोहन सिंग यांना ‘खिराज ए अकिदत…’

कलीम अज़ीम, पुणे

२७ डिसेंबर २०२४

मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ‘मनमोहन पर्व’ : शांत, संयमी तरीही ‘सिंग इज किंग’
‘मनमोहन पर्व’ : शांत, संयमी तरीही ‘सिंग इज किंग’
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-0D-hLPjVqH1r3eLQTx2Q2xvCKCpjolw6T-qtUqVbeTp2h0pXYh2ED4DSOgBcOFlwkWIFAE1HqeZDg1EP1KRDLHAaidQ9VEdLFbtULrxyfsc5nqYtQ1Vsv2NKaBSvPZrGAt-LKQBs2nYVJc93tXyxxjQhCQKnDaiIvpzIqDajeLWtXvgzOaZalsJk2niw/w640-h332/471202326_9120253931373449_755907505104371061_n.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-0D-hLPjVqH1r3eLQTx2Q2xvCKCpjolw6T-qtUqVbeTp2h0pXYh2ED4DSOgBcOFlwkWIFAE1HqeZDg1EP1KRDLHAaidQ9VEdLFbtULrxyfsc5nqYtQ1Vsv2NKaBSvPZrGAt-LKQBs2nYVJc93tXyxxjQhCQKnDaiIvpzIqDajeLWtXvgzOaZalsJk2niw/s72-w640-c-h332/471202326_9120253931373449_755907505104371061_n.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2024/12/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2024/12/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content