समर्थन व विरोध करणाऱ्यांनी ‘दि केरव्हान’ मासिकात जानेवारी २०२०ला धीरेंद्र के. झा लिखित ‘TheApostle of Hate’ स्टोरी जरूर वाचावी. संबंधित मासिकाच्या वेबसाइटवर तो लेख आहे. दीर्घ असला
तरी वेळ काढून त्याचं पारायण करणे गरजेचं आहे. किंबहुना अशा पद्धतीने अनेक स्टोरी
व रिर्पोताज इंग्रजी व हिंदी मीडियाने केलेले आहेत.
मराठी मीडियातील मंडळी, अभ्यासक, लेखक, संवादक, विचारवंत अजूनही ‘स्वातंत्र्यवीर’ या कथित मिथकांभोवती अडकलेले आढळून येतात. त्यांना ‘केरव्हान’ची उपरोक्त स्टोरी नक्कीच वेगळा दृष्टिकोन (जर पूर्वग्रह
बाजुला ठेवून वाचलं तर!) देऊ शकेल.
गेल्या दशकात सावकर नावाच्या व्यक्तिपूजेच्या मिथकांना तोडणारी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इंग्रजीत असं महत्त्वाचं पुस्तक डॉ. शम्सुल इस्लाम यांचं ‘सावकर : मिथ अँड फॅक्ट्स’ फार चर्चेत आहे. शिवाय मराठीत मदन पाटील यांचं ‘अकथित सावरकर’ हेदेखील महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं. याशिवाय हिंदी-इंग्रजीत अनेक चंगले रिपोर्ट प्रकाशित झालेले आहेत. बीबीसी हिंदीवर रेहान फ़जल यांनी सावरकरांवर काही रिपोर्ट केलेले आहेत. त्यातूनही वेगळी बाजू वाचकांसमोर येते.
‘दि वीक’चे तत्कालीन प्रतिनिधी श्रीयुत निरंजन टकले यांनी २४ जानेवारी, २०१६ रोजी विनायक
सावरकर यांच्यावर महत्त्वाचा लेख लिहिला होता. त्यासाठी तब्बल १० हजार
कागदपत्रांचा आधार घेतल्याचं त्यांनी खासगी चर्चेत सांगितलं होतं. त्या लेखाचं
शीर्षक होतं ‘लॅम्ब लायोनाइज्ड’ (Lamb Lionised) म्हणजे भित्रा कोकरू!
संबंधित लेखात टकलेंनी सावरकरांना ‘हिरो टू जीरो’ पेश केलेलं आहे. ही अफाट स्टोरी मूळातून वाचण्यासारखी आहे. नंतर लेखक, संपादक, प्रकाशकाविरोधात ‘प्रेस काउंसिल ऑफ इंडिया’त तक्रार केली गेली. परिणामी त्यांच्यावर खटलादेखील भरण्यात आला. पाच वर्षे हा खटला सुरू होता. अखेर झुंडीच्या धमक्यांना बळी पडून १४ मे २०२१ रोजी ‘दि वीक’ने माफी मागत माघार घेतली.
परंतु निरंजन टकले कायदेशीर प्रक्रियेला सामोरे गेले.
प्रस्तृत लेखकाशी झालेल्या एका खासगी चर्चेत टकलेंनी कोर्टात संबंधित प्रकरणी
झालेल्या युक्तिवादाचे मजेदार अनुभव शेअर केले. रणजित सावरकरांशी झालेल्या
आरोप-प्रत्यारोपावरही त्यांनी बरंच काही सांगितलं. म्हणजे टकले अप्रत्यक्षपणे सुचित
करीत होते की, रणजित सावरकर
यांनीदेखील विनायक सावरकर यांची माफीची परंपरा पुढे चालवली. असो..
वास्तविक, राहुल गांधींनी भिवंडी येथे केलेल्या भाषण
वादात निरंजन टकलेंनी लिहिलेल्या लेखाचा आधार घेतला गेला. टकलेंनी सांगितलं की, हा खटला त्यांनी जिंकला आहे. विशेष
म्हणजे त्यांनी तक्रारदाराकडून अशा कुरघोड्या परत होणार नाही, अशी लिखित स्वरूपात
माफी लिहून घेतली.
विशेष बाब म्हणून नोंदवता येईल की, मराठी वृत्त वाहिनी ‘एबीपी माझा’नेदेखील एका प्राइमटाइम शोमध्ये चुकीचा मथळा वापरल्याने माफी
मागितली. चॅनेलने २८ मे २०१९ रोजी ‘सावकर : नायक की खलनायक’ अशी पॅनल चर्चा घेतली होती.
या कार्यक्रमामुळे सावरकरांची बदनामी झाली, असा आरोप केला
गेला. परिणामी एबीपी माझाच्या जाहिरातदारांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात केलं
गेलं. झुंडशाहीपुढे चॅनेलने शरणागती पत्करत दिलगिरी व्यक्त केली. अर्थात चॅनलने भूमिका म्हणून हा शो केला नव्हता, तर नियोजितपणे
केवळ आकर्षक हेडर वापरलं होतं.
मुद्दा असा की सावरकर गुंगी सारखं गारूड आहे, जे वस्तुनिष्ठ वाचन जोपर्यंत
करत नाही; तोपर्यंत टिकून राहतं. एकदा की ब्रिटिशांच्या
समर्थनाची कारणे, भारतद्रोहाची भूमिका, माफीनामे, इंग्रजांकडून घेतलेली दरमहा ६० रुपयांची पेंशन, मुस्लिम लिगचं समर्थन,
गांधी हत्येचं पाप, दलितांविषयीची भूमिका, हिंदूराष्ट्र स्थापनेची कारणे,
इत्यादीबाबत अतिरिक्त माहिती, भूमिका व तपशील हाती लागले की, तो (वाचक) कथित अॅण्टिनेशनल होतो.
सावरकरांबद्दल ऐकून माहीत असलेल्या समर्थकांना अशा
प्रकारची माहिती नवीन व परिणामी असह्य असते. त्यामुळे त्याला स्वीकारण्यास त्यांचे
मन धजत नाही. संबंधित खुलाशे ऐकिव माहितीशी विसंगत असल्याने अर्थात ते
त्यांच्यासाठी अडचणीची ठरतात. परिणामी त्यांच्या धारणा व मनोभावनांचा विच्छेद होतो
व आत्मा दुखावला जातो. स्वाभाविक मग ते प्रतिक्रियात्मक आणि हल्लेखोर होतात. नवीन संशोधन,
संदर्भ, पुस्तकं, ग्रंथालये, लिंक व रिपोर्टकडे ठरवून दुर्लक्ष
करतात. म्हणजे अजान राहण्यातच भलं मानतात. त्यामुळे ते माहिती आणि ज्ञानापासून
ठरवून वंचित राहतात. परिणामी वैचारिक भूमिकेशी सुसंगत वास्तवाकडे डोळेझाक करू
लागतात. मग खोटी विधाने, एकांगी घटना, व दिशाभूल आणि बुद्धिभेद करणारी माहिती वापरून खुलाश्यांना
उत्तरे दिली जातात.
एका अर्थाने दोन्ही गट चुकीचे नसतात. सावरकरभक्त किंवा हिंदुत्ववाद्यांना ‘१८५७चा उठाव’ लिहिणारे विनायक सावरकर स्वातंत्र्य सैनिक तर गाईला पशू मानणारे विज्ञानवादी (काही प्रमाणात पुरोगाम्यांनाही (!)) वाटतात. उलट विरोधकांना अंदमान जेलमधून सुटल्यानंतर बदलेले सावकर, इंग्रजांच्या विस्तारवादी धोरणाला पोषण देणारे सावकर, चातुवर्ण्य व्यवस्थेचं समर्थन करणारे भारतद्रोही वि.दा. स्मरतात. म्हणजे ज्याने जसा चष्मा वापरला, त्यांना ते तसे सावरकर दिसू लागतात.
निमित्त कुठलेही असो, सावरकर नावाला जोडून नेहमी
चर्चा रंगवली जाते व ती अधिक विस्तारित कशी होईल, याचं नियोजन व आखणी केली जाते.
त्यासाठी निरर्थक मुद्दे, विषय पुढे करून वाद उकरून काढले जातात. गांधी, नेहरू,
हिंदुत्व, भाषा शुद्धिकरण, उपयुक्त पशू, अभिनव भारत, उर्दू गज़ल, थोर व्यक्ती,
क्रांतिकारी, स्वातंत्र्य सैनिक इत्यादी घटक पुढे करून कल्पित कथांचे चर्चामंथन रंगवले जाते.
संबंधित वादाला किंवा आरोपाला नाकारून व बढाईकरण करून चर्चेचा फड तयार केला जातो. त्यांचा हेतू सावरकरांची वकिली करणे, उदात्तीकरण करणे किंवा बढाई करणे हा तर असतोच, पण त्याहीपेक्षा सावरकरांचे ब्राह्मणी उदात्तीकरण करून सतत कसं चर्चेत ठेवता येईल, याचं प्रयोजन अधिक असतं. त्यासाठी ते चलाखीने गैरब्राह्मणी सोल्जरचा वापर करतात. त्यांचा हेतू विनायक सावकरना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणून नव्हे तर थोर व्यक्ती म्हणून त्यांना ‘भारतरत्न’ मिळवून घेता येईल, यासाठी वातावरणनिर्मिती, समाजमान्यता आणि मतप्रवाह तयार करणे इत्यादी छुपी उदिष्ट्य साध्य करण्याचं हे षडयंत्र आहे.
वाचा : ‘सिनेअभिरुची’ की ‘ब्राह्मणी’ जाणिवांचा सांस्कृतिक वर्चस्ववाद !
गेली अनेक वर्षे सावरकर आणि गोडसे हे महाराष्ट्रातील कडव्या राजकारणाचं प्रतीकं
म्हणून वापरली गेली आहेत. दुसरीकडे त्याच तीव्रतेने टोकाचा विरोध करत त्यांना
नाकारणारा एक वर्ग सक्रिय झालेला आहे. माझ्या मते सावरकर-गोडसे केवळ हिंदुवादी
राजकारणाचं प्रतीक नसून महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक राजकारणाचे प्यादे आहेत. आणि
त्यांचं लादणं व नाकारणं हे देखील एका प्रकारचं सांस्कृतिक राजकारणच आहे.
समर्थक हिंदूधर्मभिमानी, शिवरायांचं स्वराज्य व
मराठाद्वेष, महिलांचा अवमान
व पेशवा शासकांच्या बढाईकरणासाठी त्यांचा वापर करतात. आपलं वर्णवादी राजकारण बलशाली
करून त्यातून मुस्लिमद्वेष साध्य होईल, असंही प्रयोजन योजलं
जातं. ही कृती काहीवेळा थेटपणे, तर अनेकदा सुप्त व अप्रत्यक्षपणे राबवली जाते. जशी कोरोना
प्रादूर्भावाला जबाबदार ठरवून मुस्लिमांचे आर्थिक बहिष्करण करणे किंवा मुस्लिमांबद्दल
घृणात्मक वातावरण तयार करून त्यांच्याविरोधात हेत्वारोपाच्या प्रक्रियेला सुरुवात
करणे.
मुस्लिमांच्या राष्ट्रनिष्ठेवर शंका उपस्थित करणे, बहुसंख्य
समुदायाच्या तिरस्कृत धारणांना बळकटी प्रदान करण्यासाठी कानगोष्टी मोहिमा राबविणे.
मुस्लिम व इस्लाम फोबियाचे बिजारोपण करून त्यास खतपाणी घालणे इत्यादी विकृत प्रकार
आखले जातात. त्यासाठी सावरकरप्रणित ‘राजकीय हिंदुत्व’ भूमिकेचा आधार
घेतला जातो.
सावरकरांच्या कथित जाज्वल्याची मांडणी करणारे
लेखनप्रेमी त्या सांस्कृतिक विकृतीकरणाचे खरे नायक असतात. सावरकरांच्या मूळ लिखाणासह
त्यांच्या समर्थक लेखकांची साहित्य प्रागतिक विचारांचे वाहक आजही संदर्भ ग्रंथ
म्हणून वापरतात. त्या कथित संदर्भ साधनांची उलटतपासणी तटस्थ, धर्मनिरपेक्ष असलेली लेखकीय
जमातसुद्धा करत नाही. किंवा त्यांच्या पुस्तकात न आढळलेल्या संदर्भ साधनाची उलटतपासणी,
चौकशी, विचारपूस, उत्खनन केलं जात नाही.
भारतात एक म्हण प्रचलित आहे, लिहिणारा इतिहासाचा मालक असतो;
त्याप्रमाणे लेखक किंवा इतिहासकार म्हणवणारा एकांगी, पूर्वग्रह बाळगून व धर्मीय/पंथीय अस्मिता जोपासून जे काही लिहितो, त्यालाच सत्य मानून प्रत्येकजण आपापले मते व आडाखे बांधायला लागतो. स्मरण
असावे की, सावरकर इतिहास लिहिताना प्रखर व जाज्वल्य हिंदुत्वाचे प्रवक्ते आहेत. ‘पुण्यभू’ व ‘पितृभ्रू’चू व्याख्या करीत त्यांनी जाती व वर्णावर आधारित त्यांनी इतिहासाची आखणी
केलेली आढळते.
प्रस्तृत लेखकाला सावरकर ‘वीर’ होते का नाही, यात काडीचा रस नाही. किंबहुना आचार्य अत्रे यांनी विनायक सावरकरांना त्यांच्या हयातीत राष्ट्राचे शत्रू घोषित केलं होतं. साप्ताहिक नवयुगच्या १४ सप्टेंबर १९४१च्या अंकात अत्रे म्हणतात, “सरकारशी सहकार्य करण्याची भाषा आज ते उघड-उघड बोलतात, आणि सरकार देशात अनंतकाळ राहील असले राजकारण लढविण्यात आज ते गुंतले आहेत. म्हणून आम्हाला ते आज ‘स्वातंत्र्यवीर’ वाटत नाहीत, किंबहुना आमच्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे शत्रू आहेत तसेच मोठ्या दुःखाने आम्हांला म्हणावे लागते.” पण त्यामागील घडणाऱ्या सांस्कृतिक राजकारण व त्यातून निर्माण होणाऱ्या विकृती व सामाजिक तंटे, बखेडे, कलहाची चिंता वाटते. या कथित मांडणीचे ज्यावेळी ‘पुरोगामी’ म्हणवणारे वाहक होतात; त्यावेळी ही चिंता अधिक प्रबळ होत जाते.
दुर्दैवाने आजही सुधारक व अब्राह्मणी चळवळी, त्यांचे प्रमुख आणि वाहक सनातनी,
ब्राह्मणी हिंदुत्ववाद्यांच्या सांस्कृतिक राजकारणाला ओळखू शकले
नाहीत. (किंवा ते दुर्लक्ष करत असावेत) ज्यावेळी शरद पवार उघड भूमिका घेऊन सांगतात
की, “रामदास शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते” त्यावेळी इथली ब्राह्मणी/सनातनी मंडळी अंतर्गत कुरघोड्या करते. इतकंच नाही
तर त्याचवेळी अधिक प्रकर्षाने पुरदरेंना इतिहासकार म्हणून प्रचारित करते. वास्तविक, त्यांच्याकडे युक्तिवाद
करण्यासारखं फारसं काही नसतं. म्हणून ते बुद्धिभेद करून सांस्कृतिक अधिक्षेप घडवून
आणतात. इतकंच नाही तर विरोधकांना हिंदूंचे शत्रू ठरवतात. रामदास नको म्हणणाऱ्या शरद
पवारांना ‘अहिंदू’ म्हणून प्रचारित केलं जाते.
कारण थेटपणे ते पवार व त्याआड मराठ्यांचा विरोध करू
शकत नाहीत. त्यासाठी ते खोट्या मिथकांचा सहारा घेतात. त्याचवेळी ते इंदोरीकरांवर
तोंडसुख घेतात. (कारण त्यांचं प्रबोधन वास्तविक हेतूसाठी असतं. या क्रोनोलॉजीचा
बारकाईने अभ्यास केला तर तुकोबाचा बळी कोणी व का घेतला, याचा अंदाज लागतो.) त्याचवेळी ते
बलात्कारी आसारामचे भक्त असतात व संस्कृतीरक्षक म्हणून १४ फेब्रुवारीच्या
व्हॅलेंटाइनला मातृ-पितृ दिन साजरा करण्यास भाग पाडतात.
तरुण मुलींनी बापाला मिठी मारू नये, याचं उदात्तीकरण करतात.
(दुसऱ्यांच्या) मुलींनी जास्त शिकू नये, चूल-मूल सांभाळावं,
घरात राहावं, डोईवर पदर घ्यावा, जीन्स व तत्सम आधुनिक कपडे, मोबाईल वापरू नये असे
उपदेशही करतात. त्याचवेळी ‘कल्चरल कॅपिटल’च्या जोरावर आपले शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक
उत्थान घडवून आणतात. एकीकडे ब्राह्मण म्हणून आरक्षण देण्याची मागणी करतात, तर
त्याचवेळी गुणवत्तेला पुढे करीत दलित, मागासांचं आरक्षण संपवलं पाहिजे, अशी भूमिका
घेतात. याच्याही पुढे जाऊन सार्वजनिक क्षेत्रांचे खासगीकरण करतात, सार्वजनिक मालमत्ता
विक्रीस काढतात. उलट युक्तिवाद केला जातो की, (भाजप) सरकारे व्यापार करत नाहीत. अर्थात जनमानस
घडविण्यासाठी प्रचारी मोहिम सुरू केली जाते. अशा रीतीने स्पर्धा बाजारात सामाजिक
समता व आरक्षणाची वासलात लावली जाते. म्हणजे पब्लिक सेक्टरच राहिलं नाही, तर दलित,
मागास अर्थात शुद्रांना आरक्षण कुठून मिळणार? म्हणजे एकाच वेळी आर्थिक
केंद्रीकरण केलं जाते तर दुसरीकडे वर्गीय चौकट अधिक मजबूत केली जाते.
वाचा : प्रज्ञा सिंह उमेदवारीचा घातक पायंडा
जातिव्यवस्था आता कुठे अस्तित्वात राहिली, असं चलाखीने सांगत त्याचे निवडक दाखले देत सुटतात. तेच सावरकर शुद्रातिशुद्रांना प्रस्थापितांच्या मंदिरापासून दूर ठेवण्यासाठी स्वतंत्र मंदिराची उभारणी करतात. याचाच आधार घेऊन वर्णद्वेष्टी जमात म्हणू लागते, १२ प्रतिज्ञांचे वाहक असलेल्या दलितांनी मंदिरात का जावं मग? या वर्णीय जात-परंपरेत भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपतीही सुटू शकत नाही, कारण तो जातीने दलित असतो.
मार्च २०१८ साली पुरीच्या जगन्नाथ मंदिराबाहेर
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रोखलं गेलं. त्यांना व त्यांच्या सुविद्य
पत्नीला गर्भगृहात प्रवेश वर्जित करण्यात आला, त्यांच्याशी धक्काबुक्की केली गेली.
प्रत्येक क्षुल्लक घटनेवर ट्वीट करणारे राष्ट्रपती आपल्या अवमानाविरुद्ध उघडपणे
बोलूदेखील शकले नाहीत. कारण ते ब्राह्मणी हिंदुत्वप्रणित राजकीय सत्तेचे लाभदायक
घटक होते. स्मरण असावे की, या हिंदुत्ववादी विचारांच्या (योगी) सत्तेने ऑक्टोबर २०१७
साली राष्ट्रपतींना आभासी देवासमोर नमन करायला झुकवलं होतं. त्या पौराणिक दिवाळी
फेस्टिव्हलमध्ये लोककलावंतांना राम-सीतेच्या रुपाने कार्यक्रमात आणलं गेलं.
त्यांच्यासमोर घटनात्मक पद बहाल असलेले राष्ट्रपती मुख्यमंत्री आदित्यनाथांसोबत
वाकून अभिवादन करत होते. ही ब्राह्मणी वर्णीय व वर्गीय परंपरा बहुसंख्य व प्रागतिक
तसंच विवेकवादी गट सहज स्वीकारतो. याविषयी कोणाला काहीच वाटत नाही.
महात्मा गांधींच्या हत्येनंतर भारतात सांस्कृतिक राजकारणाचं छुपं नग्न नृत्य सुरू केलं गेलं. तिरस्कार, द्वेष, हत्यांना राजकीय अर्थ देऊन त्याचं सरसटीकरण करून टाकण्यात आलं. संमिश्र राष्ट्रवादाचे शत्रुकरण करून सांस्कृतिक अधिक्षेप करण्यात आला. मुस्लिमांना देशातून काढून टाकणे, त्यासाठी त्यांचं राक्षसी चित्र उभं करून त्यांना समाजात अपवित्र घोषित करणे, त्यांच्याविरोधात द्वेष व घृणेचीमोहिम राबवणे आदी दुष्कृत्य राबवली गेली व आजही राबवली जात आहेत.
गांधीहत्येनंतर पुढची २०-२५ वर्षे छुप्या व उघडपणे गांधी हत्येचं समर्थन केलं गेले. त्यातून ब्राह्मणी हिंदू विरुद्ध गैरब्राह्मणी हिंदू अशी वर्गवारी करण्यात आली. ब्राह्मणांनी उघडपणे गांधी हत्येला कारक मानलं. इतकचे नाही तर मारेकरी नथुराम व त्याच्या साथिदारांची बाजू घेतली गेली. अग्रलेख लिहिले गेले. पुस्तिका लिहिल्या गेल्या. गांधी हत्येनंतर राषट्रीय स्वयसेवक संघाने नथुरामशी राजकीय नातं तोडलं, तो आमचा नव्हे अशी भूमिका घेतली. परंतु त्याचवेळी अनेक संघभक्त नथुरामच्या समर्थनार्थ उघडपणे बाहेर आली. त्यात बहुतांश सावरकरभक्तही होते.
१९६४ साली गांधी हत्येतून जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या गोपाळ गोडसे व विष्णू करकरे यांचा पुण्यात जाहिर सत्कार करण्यात आला. १२ नोव्हेंबर १९६४ रोजी पुण्यातील उद्यान कार्यालयात सत्यनारायणाचा कार्यक्रम योजिला गेला. त्यात गांधी हत्येचे उदात्तीकरण करून पुणेरी ब्राह्मणांनी नथुरामला नायकत्व प्रदान केलं. २१ नोव्हेंबर १९६४च्या साधना साप्ताहिकाने लिहिले, “तीनशे स्त्री-पुरुषांच्या या मेळाव्यात ग.वि. केतकर, न.गो. अभ्यंकर, विसुभाऊ बापट इत्यादी लोकांनी मुक्ताफळे उधळली. नथुराम गोडसे याचे मृत्यूपत्र वाचून दाखवण्यात आले. आपटे व गोडसे यांचा हुतात्मा म्हणून गौरव करण्यात आला. गोडसे शिवाजीचा बच्चा होता असे म्हणून शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आली.”
राष्ट्रपित्याच्या हत्येचं समर्थन करणे हा विकृती व विक्षिप्तपणा आहे. हा विक्षिप्तपणा पुणेरी ब्राह्मण उघडपणे करण्याचे धाडस करू शकतात, याचे आश्चर्य वाटते.
या मेळाव्यात अभ्यंकराने “मला गोडसे खून करणार आहेत” हे माहीत होते असं उघडपणे कबूल केलं होतं. वास्तविक, ग.वि. केतकर हे बाळ गंगाधर टिळकांचे (मुलगी पार्वतीबाई केतकरचा मुलगा) नातू होते. त्यावेळी तरुण भारतचे संपादक होते. आणि सावरकरप्रेमी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदू महासभेत सक्रिय होते. विनायक सावरकरांशी त्यांचे निकटचे संबंध होते. गांधीहत्येच्या केतकर केसरीचे संपादक होते व उघडपणे गांधी हत्या व नथुरामची पाठराखण करत होते.
वास्तविक, गांधी हत्या खटल्यातून सावरकर बचावले असले तरी न्या. कपूर आयोगाने ‘या सर्व गोष्टींचा विचार केल्यास गांधींच्या खुनाचे कारस्थान सावरकर आणि त्यांच्या गटाने केले होते’ असे विधान केलेलं आहे. (न्या. कपूर आयोगाचा अहवाल, पा. क्र. ३०३ परिच्छेद क्र.२५. १०६)
मुळात ते फक्त नथुरामची पाठराखण करीत नव्हते तर सावरकरांच्या दृष्कृत्यावरही पडदा टाकत होते. उपलब्ध संदर्भ पाहाता असं दिसते की, गांधी हत्या प्रकरणात सावरकरांची चौकशी व तपासात गलथानपणा केला गेला. अनेक अभ्यासकांचे मत आहे की, हे जाणूबुजून केलं गेलं. गांधीजींचे वंशज व नातू तुषार गांधी यांनी याबाबत उघडपणे लिहिले आहे. लिहितात, “सावरकरांना शिक्षा झाली असती तर कट्टर हिंदुत्ववाद्यांकडून उग्र प्रतिक्रिया उमटली असती असे (सरदार) पटेलांचे मत होते आणि काँग्रेसला या असंतोषाची पुरती धास्ती होती. सावरकरांचा गांधी हत्येशी काही संबंध नाही, हे स्वीकारण्यास चौकशी अधिकारी नागरवाला यांनी साफ नकार दिला होता. हे मात्र विसरता येणार नाही.”
तत्पूर्वी तुषार गांधीनी लिहिलं आहे की, सावरकरांना दोषी ठरवलं असतं तर मुसलमानांसाठी ती अडचण ठरली असती आणि हिंदूंच्या रोषाला सांभाळणे अशक्य झाले असते, असं पटेल यांना वाटत असावे. हल्ली यापेक्षा वेगळं काही घडत नाही. जाणूनबुजून दोषींचा तपास करायचा नाही, उणिवा व त्रुटीवर लक्ष द्यायचे आहेव निर्दोषांना शिक्षा करायची, असं धोरण आहे.
गैरसीयीचे झाकून ठेवायचं व सोयीचं पुढे करत कल्पनारंजन करण्याचा इतिहास फार जुना आहे. सावरकरांच्या बाबतीत हे नेहमी घडते. गौरवीकरण करणारे इथपर्यंत थांबत नाहीत तर प्रत्येकवेळी जाज्वल्य हिंदुत्वाची उपमा सावरकरांना चिकटवालयला ते अग्रेसर असतात. त्यातून ते ब्राह्मणेतर मंडळीचं हिंदुत्वाच्या नावाने ध्रुवीकरण करतात. अर्थात सावरकरप्रेमींची ही सांस्कृतिक कुरघोडी असते.
ब्राह्मणवादाचे राजकीय व सांस्कृतिकरित्या बीजारोपण करण्याची प्रक्रिया फार जुनी आहे. समाजावर ब्राह्मणी वर्चस्व स्थापण्यासाठी अनेक कुरघोड्या राबलवल्या गेल्या. इतिहासकार शेजवलकर यांनी या ब्राह्मणी कुटनितीचा उघड समाचार त्यांच्या ‘महाराष्ट्राच्या इतिहासाची आबाळ आणि तिचे दुष्परिणाम’ या लेखात घेतला होता. संबंधीत लेखात त्यांनी ब्राह्मणी इतिहास कथन पद्धती, इतिहास लेखन व आत्मस्तुतीपर मांडणीचा चांगला समाचार घेतला होता.
लेखातील एक उतारा, “महाराष्ट्र इतिहासाबद्दल निश्चित मते उघडपणे सांगण्यात आजवर ब्राह्मणांकडून अक्षम्य टाळाटाळ झालेली आहे. संशोधक ब्राह्मण, इतिहास लेखक व विवेचक ब्राह्मण, विषय ब्राह्मणांच्या अभिमानाच्या राज्याचा, संपादक ब्राह्मण, शिक्षक ब्राह्मण, व्याख्याते ब्राह्मण, चळवळी त्यांनीच काढलेल्या आणि या सर्वांचे श्रोते, वाचक व अनुयायी तेही ब्राह्मण, यात क्वचित कोट अपवादात्मक ब्राह्मणेतर, या सर्व बनावाचा दुष्परिणाम असा की ब्राह्मणांची कर्तबगारी अगदी गागा भट्ट रामदासांपासून आरंभ करून तो 'अप्रबुद्ध' गोळवलकरांपर्यंत अशा तऱ्हेने फुगविण्यात, सोज्वळ करण्यात, चुकीची व म्हणूनच खोटी करून सांगण्यात शक्य तेवढी जास्त कोशिश करण्यात आली आहे.” (निवडक साधना, खंड-६, पान-९९)
असं असलं तरी शेजवलकर देखील या बहुचर्चित आरोपातून सुटू शकले नाहीत. त्यांच्यावर देखील ब्राह्मण्यप्रणित इतिहासाचा ठपका लावला गेला.. गेल्या ३०-४० वर्षात अनेक लेखक, विचारवंत व अभ्यासकांनी ब्राह्मणी इतिहास लेखन पद्धतीवर सडेतोड टीका करणारे लिखाण प्रसिद्ध केलं आहे.
वर्तमान राजकीय संस्कृतीत ब्राह्मणी वर्चस्ववादाचे सांस्कृतिक प्राबल्य व कुरघोड्या कळत-नकळत वाढत आहे. २०१४ नंतर यात झपाट्याने बदल झालेला दिसून येतो. दैवतीकरणाची प्रक्रिया शासन स्तरावर निर्धास्तपणे राबवली जात आहे. सरकारची ध्येय-धोरणे हिंदू (ब्राह्मणी) धर्मकेंद्री होऊ लागली आहे. राम मंदिर मोहिमेत घटनात्मक पद बहाल असलेले पंतप्रधान मोठा इव्हेंट घडवून पूजा-अर्चा करतात. हिंदूधर्माच्या (रामाच्या) नावाने लोकनिधी संकलित केला जातो. त्यात कोट्वधींचा भ्रष्टाचार रामाच्या नावाने खपवला जातो. म्हणजे धर्माच्या नावाने हजारो कोटी लुबाडले जातात. हा निधी देणाऱ्या सामान्य जनांना त्याचं काहीच वाटत नाही, गपप बसून राहतात. अर्थात सांस्कृतिक व धार्मिक वर्चस्ववाद सुप्तपणे काम करतो तो असा!
राम मंदिर मोहिमेतून बहुजनांचे राजकीय केंद्रीकरण
केलं गेलं. विशेष म्हणजे ही मोहिम मंडल आयोगाने मागास समुदायांना दिलेल्या सामाजिक
व आर्थिक सवलतींना विरोध करून ही मोहीम राबवली गेली. म्हणजे शैक्षणिक व आर्थिक
विकासाकडे चलाखीने डोळेझाक करायला लावून धर्माच्या नावाने, त्याच मागास समुदायाचे
राजकीय संघटिकरण केलं गेलं. मागास समुदायानेही शैक्षणिक व आर्थिक विकास साध्य
करण्याचे सोडून भाजपच्या ब्राह्मणी हिंदू धर्मीय राजकीय हित साधण्यासाठी कंबर
कसली.
बाबरी उद्ध्वस्तीकरणानंतर थेटपणे ‘हिंदू खतरे में’ आल्याची बतावणी करत बहुसंख्य गैरब्राह्णणांना भगव्या
झेंड्याखाली संघटित केलं गेलं. विशेष म्हणजे ज्या वैदिक परंपरेने आणि हिंदू धर्माने
चातुवर्ण्य अबाधित राखण्यासाठी बहुसंख्य समाजाला मंदिरात येऊ दिलं नाही, त्याच गटाला ‘मंदिर वहीं बनाऐगे’ मोहिमेसाठी
चलाखीने वापरले. ज्या वर्गाच्या विकृत मेंदूतून ही मोहिम बाहेर आली, तो सिलिकॉन
वॅलीमध्ये ग्रीन कार्ड होल्डर झाला. राजकीय भगवा धारण केलेला व मंदिर मोहिमेत अडकून
(ब्राह्मणी परंपरेच्या सांस्कृतिक राजकारणाचं खेळणं झालेल्यांनी) असणाऱ्यांनी
धर्माच्या नावाने आपल्याच जवळच्या लोकांचे तुझा धर्म व संस्कृती वेगळी म्हणत गळे
चिरले. वर्ग व जात वेगळी म्हणत आया-बहिणींवर हात घातला. बहुजनांची औकात काढत
त्यांची ऑनर किलिंग घडवली.
मंदिर मोहिमेसाठी राबविल्या गेलेल्या विनाशक हल्ल्यात मुस्लिमांसह सर्वच गैरब्राह्मण जात-समुदाय भरडले गेले. अर्थातच ब्राह्मणी विचारांचा वाहक अब्राह्मणी समाजच झाला. त्यातच कुणीतरी सावरकर-हिंदुत्वभक्त मनसेवाला (ब्राह्मणी राजकीय हित घेऊन) जागा होतो आणि बहुजन मुलांना हाती दगड व तलवारी घेण्याची भाषा करतो. अर्थातच राजकीय संधिसाधू आणि अतिसामान्य असलेल्या बहुजन मुलं बिनडोकपणे मेंदूत धर्मांधता संचारून मुस्लिमद्वेष कवटाळतात.
सावरकरांनी भारतीय समाजातील सहिष्णू व गंगा-जमुनी संस्कृतीला खिंडारे पाडण्यासाठी शिवाजी महाराजांचा वापर केला. त्यांनी (शत्रू पक्षातील) महिलांशी कसं वागू नये याचे ‘उपदेश’ शिवरायांना दिले. वास्तविक सावरकरांनी इथं बलात्काराला एक राजकीय शस्त्र घोषित केलं आहे. पुढे हिंदू राष्ट्रवादी व ब्राह्म्ण्यवादी राजकीय संघटनांना याला प्रत्यक्षात उतरवलं. गुजरात दंगलीचे बीभत्स रूप इतिहासात नोंद झालेलं आहे. किंबहुना त्यानंतर अनेक विकृत पद्धतीने या शस्त्राचा वापर करण्यात आलेला दिसतो. याच मोहिमेचा भाग म्हणून आसिफा सारख्या चिमुरडीच्या बलात्कारीची तिंरगा यात्रा काढून समर्थन मिरवणूक काढली जाते. जघन्य कृत्य करणाऱ्याविरोधात वकिल संघ समर्थन मार्च करतात. कारण पीडित मुस्लिम धर्मीय असते आणि सावकरांच्या ‘पितृभू’ या व्याख्येत बसत नाही. त्यामुळे विवेक विसरून बलात्कार सारख्या विकृत गुन्ह्याचं समर्थन करू लागतात. इतकंच नाही तर मुस्लिम महिला पत्रकार, सोशल अक्टिव्हिस्ट इत्यादींची आभासी शरीरविक्रय बाजारात बोली लावली जाते. त्यांच्याविरोधात लैंगिक गुन्हे केले जातात. ही जमात इथंपर्यत थांबत नाही तर आसाराम व चिन्मयानंद सारख्या बलात्काराच्या गुन्ह्याचं हिंदू धर्माच्या नावाने उदात्तीकरण करू लागतात. कारण इथंही पीडित तरुणी/महिला ब्राह्मणी जातीय/वर्णीय वर्चस्ववादाच्या उतरंडीतील अशुद्ध असतात. म्हणजे गैरब्राह्मण समुदायांना पायाखाली चिरडण्याच्या भूमिकेचा ते पुरस्कार करू लागतात. बहुसंख्य समुदाय, सिविल सोसायटी या प्रकरणावर गप्प राहते, म्हणजे मूठभरांचे ब्राह्मणी सांस्कृतिक राजकारण यशस्वी होऊ लागते.
ब्राह्मण्याने ग्रासलेल्या सावरकरांच्या जाज्वल्य विचारांचे
रसग्रहण करणाऱ्यांमध्ये बहुजनातील गैरब्राह्मण असणारे सर्व लोक होतेच की! हिच
मंडळी वर्ण, वंश व जातव्यवस्था आणि चातुवर्ण्याकडे दुर्लक्ष करून ते सावकरांच्या ब्राह्मण्यप्रणित
हिंदुत्वाचे वाहक होतात. हिंदुत्व व कथित हिंदूराष्ट्राच्या व्याख्येत दलित,
ख्रिश्चन, मुस्लिमांना स्थानच देत नाहीत. दुर्दैवाने अशा व्यक्तीला ‘भारतरत्न’ मिळवून
देण्याच्या योजनेसाठी बहुजन लोकंच वापरली जातात. बहुजन मंडळीसुद्धा निर्बुद्ध होत
ब्राह्मणी सांस्कृतिक वर्चस्वाकडे डोळेझाक करत ट्रोलरची भूमिका पार पाडते.
वास्तविक, तथाकथित सेक्युलर व प्रागतिक विचारसणीला आजही ब्राह्मणी
संस्कृतीच्या नावाने होणारी ‘मोरल पोलिसिंग’ व ‘सांस्कृतिक चौकीदारी’ कळली नाही. त्यामुळे ते जाणता-अजाणता पद्धतीने त्याचे वाहक
झाले. आजही होतच आहेत. वर्चस्ववादी राजकारणाला प्रतिक्रियात्मक उत्तरे न देता
त्याला शरण जातात.
‘खरा शिवाजी’ लेखनद्वेशी परंपरेतून बाहेर येण्यास ‘मराठा
सेवा संघ’सारखी
संघटना निपजावी लागली. पुढे ‘शिवाजी अंडरग्राऊड इन भीमनगर मोहल्ला’चं सांस्कृतिक
राजकारण करावं लागलं. ह्या नाटकाला काही समीक्षक नावाच्या बनचुके मंडळींनी
नाट्यअभिव्यक्तीच्या पारंपरिक चौकटीत बसत नसल्याचा शेरा मारला. पण बावळ्यांन्नो, ती परंपरा मोडण्यासाठीच तर तो सांस्कृतिक विद्रोह होता. सफदर असो वा
शाहिद त्यासाठीच मारले गेले, हेदेखील विसरता कामा नये.
शेवटी, असं म्हणता येईल, ह्या वर्णवादी सांस्कृतिक
राजकारणाला जो पर्यंत बहुजन समुदाय समजून घेत नाही, त्याची परिणामकारकता उमजून घेत नाही, त्याला
उत्तर देण्यासाठी सांस्कृतिक कुरघोडी करत नाही, तोपर्यंत अशा
प्रकारचं राजकारण करणाऱ्या आणि वंश, वर्ण, कूळ आणि धर्मभिमानी रुढी-परंपरेची आणि विकृत विचारांची वासलात लावता येणार
नाही.
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com