औरंगाबादला असताना २००९ साली ‘मनुचा मासा’ पुस्तक वाचलं होतं. २०१५-१६ साली ‘परिवर्तनाचा वाटसरू’मध्ये याच शीर्षकाची एक लेखमाला गुरुवर्य जयदेव डोळे यांनी लिहिली होती.. या लेखमालेचे नंतर ‘आरेसस’ नावाचं पुस्तक बाजारात आलं..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याचं संघठन, कुरघोड्या, सांस्कृतिक हस्तक्षेप, राजकारण, सामाजिक विद्वेश इत्यादी घटक पुस्तकाचा मध्यवर्ती गाभा आहे.. त्याचा संजय मेणसेकृत परामर्श वाचल्याने पुन्हा सर्वकाही रिकॉल झालं.
१९८७ साली प्रा. कु.ल. महाले यांनी ‘मनुचा मासा’ लिहिलं होतं. त्यावेळी नुकतीच नवहिंदुत्वादाची रुजवणूक भारतात सुरू झाली होती.. आणीबाणी, त्याविरोधात लढा, समाजवादी-जनसंघाची युती, इंदिरा गांधींचा पराभव, जनता पक्षाचं सरकार, इंदिरा गांधींच्या मुस्लिम विरोधी कुरघोड्या, हिंदू मुस्लिम दंगली, इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधींचा उदय, राम जन्मभूमी आंदोलन, बाबरीचं उद्ध्वस्तीकरण इत्यादी घटनांची मीमांसा सदरील पुस्तकात आहे.
गेली अनेक वर्ष पुस्तक आऊट ऑफ प्रिंट होतं.या पुस्तिकेच्या घोषणेनंतर लोकवाङ्मय गृहाने सदरील पुस्तक रिप्रिंट करून बाजारात आणलं आहे. ही मेणसे यांच्या लेखनाची तात्कालिक दखलम्हणता येईल.
सदरील पुस्तकाचा सारांशरुपी परामर्श घेण्याचा प्रयत्न संजय मेणसे यांनी केला आहे.. त्यांचा हा दीर्घ लेख त्यांनी सोशल मीडियावर वाचकांसाठी उपलब्ध करून दिला होता.. या दीर्घ लेखाचं पुस्तिका रुपी संकलन हरिती प्रकाशनाने नुकतंच बाजारात आणलं आहे..
८० पानाच्या या पुस्तिकेत लेखक संजय मेणसे यांनी मनूचा मासा पुस्तकातील वैशिष्ट्यपूर्ण घटकांची विस्ताराने मीमांसा केलेली आहे.. हे करत असताना वर्तमानकालीन मोदीप्रणित हिंदुत्ववादी सत्ताकारणाचे व संघाच्या सांस्कृतिक हस्तक्षेपाचे नवीन दाखले व संदर्भ देखील टिपणरुपाने जोडलेली आहेत..
तसं पाहिलं तर सदरील पुस्तिका एका बैठकीत वाचून होते.. परंतु घाई गडबडीत वाचून संपवण्यासारखा पुस्तिकेचा आशय नाही.. मजकूर धीरगंभीर असल्याने ते थांबून व मनन करून वाचावं लागतं.. त्याशिवाय त्याचे भूतकालीन व वर्तमानकालीन संदर्भ जोडता येत नाहीत..
पुस्तिकेत लेखकाने (किंवा मूळ लेखकाने)
“...मुस्लिम जातियतेमुळे हिंदू जातियता वाढते. हिंदू जातीयतेचा प्रभाव वाढला म्हणून मुस्लिम जातियतेला निमित्त मिळतं...” असं विधान केलेलं आहे.
वाचा : आरएसएस आणि वर्तमान राजकारण
७०-८०च्या दशकात हे संभ्रमित विधान खूप लोकप्रिय करण्यात आलं होतं.. अर्थातच प्रचारक शाखांनी त्याचा उद्व्याप हिंदू मुस्लिम दंगलीतून घडवून आणला होता.. या विधानाची वस्तुस्थिती तपासली तर वेगळे संदर्भ दिसतात, त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही..
मस्जिदी समोरून जोरजोरात वाद्य वाजवत पुढे जाणे किंवा तिथंच रेंगाळणे, गुलाल उधळणे, मस्जिद, दर्गा परिसरात अशांतता निर्माण करणे, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी पहिला वार पलीकडच्या गटाकडून होईल अशी स्थिती निर्माण करून संधीची वाट पाहणे, मुस्लिम मोहल्यात जाऊन धर्मांध घोषणा देणे, मुस्लिम धर्मियांना चिथावणी देणे, त्यांच्या धर्माला भलं-बुरं बोलणं, महापुरुषाला शिवीगाळ करणेइत्यादी कृती बहुसंख्यांकाच्या जमातवादी व विखारी प्रवृत्तीचं एक लक्षण आहे.. गेली ४० वर्ष असे वेगवेगळे प्रयोग देशाने पाहिलेले आहेत.. दंगलीचे अनेक सत्यशोधन अहवाल निमशासकीय संस्थांचे रिपोर्ट याचे असंख्य दाखले देतात.. त्यामुळे मुस्लिम जातियतेमुळे हिंदू जातियता वाढते हे विधान बुद्धिभेद घडविणारे ठरते..
मेणसे यांनी पुस्तिकेत जोडलेल्या टिपणांचा वर्तमानकालीन संदर्भ आपण पाहतोच आहोत.. त्यामुळे गेल्या १० वर्षातील अशा प्रकारच्या घटनाक्रमावर स्वतंत्र भाष्य करण्याची गरज नाही..
मेणसे यांनी महाले यांच्या पुस्तकाची केवळ ओळख करून दिली नाही तर ते वाचण्यास प्रवृत्तदेखील केलं आहे.. अनेक ठिकाणी ते धक्कादायक खुलासे करत जातात, त्यामुळे मूळ संदर्भ त्वरित तपासण्यासाठी वाचक अस्वस्थ होऊन जातो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व कांग्रेसचे राजकीय हितसंबंध महाले यांनी पुस्तकात अनेक ठिकाणी उघड केले आहेत.. नेहरूंवर टीका करणारे भाजप व आरएसएससमर्थक प्रचारक, टोळधारी इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्यावर का टीका करत नाही? असा प्रश्न देखील ते उपस्थित करतात..
इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया म्हणणारे काहीजण होते, तेच दुर्गाची उपाधी देणारेही होते. लेखक म्हणतात, ‘इंदिरा गांधी यांच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पसारा अजस्त्र स्वरूपात वाढला. लोकन्यायालय संघाच्या खटल्यासंदर्भात संघाच्या बाजूने निकाल देऊ लागले.. संघ शाखा राजकीय व्यक्ती, संघटनांचा पुरवठा केंद्र म्हणून रूपांतरित झाल्या..’
आणीबाणीनंतरच्या इंदिरा सरकारची परिस्थिती कथन करताना महाले म्हणतात, ‘संजय युथमध्ये संघाचे बरेच स्वयंसेवक शिरले. संजय गांधी कम्युनिस्टांचा शत्रू होता म्हणून तो देवरसांना आवडत असे. संजय गांधी आणि संघ यांची युती होती. संजयमुळे इंदिरा गांधी संघाशी अनुकूल वागू लागल्या होत्या..’
जनता पक्ष काळात काँग्रेसमध्ये संघ कार्यकर्त्यांनी शिरकाव केला होता.. याच दरम्यान संघ आणि इंदिरा गांधी यांच्यात गुप्त सहकार्याचा करार झाला. त्यानुसार संघाने १९८०च्या निवडणुकीत इंदिरा गांधींना मदत केली, असं लेखक म्हणतात.
मनूचा मासा पुस्तकात महाले यांनी जमाते इस्लामी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या अघोषित युतीचे अनेक पुरावे दिले आहेत.. जमाते इस्लामी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील सख्य जनता पक्ष काळात वाढले व पुढे ते वाजपेयी पर्यंत चालू राहिले....
वाचा : महात्मा फुले आणि सर सय्यद अहमद खान
एक विधान नोंदवतो, ‘जमातने मुस्लिमांना सांगितलं, इस्लामला संघापासून नाही तर कम्युनिस्टापासून धोका आहे. संघाला मदत करा धर्मनिरपेक्षतेला विरोध करा.’
मूळ लेखकाचं म्हणणं आहे की राजीव गांधी व इंदिरा गांधी यांना संघाने उघडपणे समर्थन दिलं होतं. त्यामुळे ते त्यांच्यावर टीका करीत नाही.
मूळ लेखकाने लाल बहादूर शास्त्री व आरएसएसचे हितसंबंध उघड करत धक्कादायक खुलासे केले आहेत. एके ठिकाणी लेखक म्हणतात, ‘...प्रजासत्ताक दिनी गृहमंत्री शास्त्री यांनी संघाला कवायतीत भाग घेऊ दिला.’
संजय मेणसे यांनी सदरील पुस्तिकेत असे अनेक धक्कादायक खुलासे अधोरेखित केलेले आहेत.. वर्तमान संघप्रणित उद्ध्वस्तीकरणाच्या राजकारणात मूळ पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही पुस्तिका आहे..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विखार, विद्वेष, भेदनीती, विकृती आणि दहशतीची केवळ माहिती असून उपयोग नाही तर त्याचं पुढं करायचं काय? असा एक उघड संदेशही सदरील पुस्तिका देते...
##
नाव : ‘मनुचा मासा’ परिचय आणि परामर्श
लेखक : संजय मेणसे
पाने : ८०
किंमत : १२० रुपये
प्रकाशक : हरिती प्रकाशन, पुणे
......
कलीम अज़ीम, पुणे
२२ मे २०२४
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com