‘आनंदवनातील बाबाशाही’ : बाबा आमटेंचा अमानवी चेहरा

फार पूर्वी ‘साप्ताहिक साधने’त एक टिपण वाचलं होतं. १९६८सालचा तो अंक होता. त्यात ‘सर्वोदयी’ म्हणवणारे महाराष्ट्रातील महत्त्वाचे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते बाबुराव चंदावार आणि बाबा आमटे यांच्या संघर्षाचं वृत्त होतं. चंदावार यांचा आरोप होता की, बाबा आमटेंनी सोमनाथ प्रकल्पाच्या नावाने मोठ्या प्रमाणात सरकारी व शेतकऱ्यांची जमीन लाटली आहे. ती शेतकऱ्यांना परत द्यावी. 

तीन-चार वर्षे हे प्रकरण सुरू होतं. त्यावेळी त्याची फारशी चर्चा होऊ दिली नव्हती. पण चंदावार यांनी मोठा लढा दिला होता. १९६८ साली बाबुराव चंदावार यांनी सोमनाथ प्रकल्प, तेथील बेसुमार जंगलतोडीबाबत विशेष मोहिम राबवून बाबा आमटेंनी सरकारची दिशाभूल व विश्वासघात व दगाफटका करून भोळ्या शेतकऱ्यांच्या जमीनी लाटल्या आहेत, त्या जमीनी परत घ्यावी म्हणत त्याविषयी जनजागरण सुरू केलं. 

वास्तविक, बाबांनी श्रमिक कार्यकर्ता विद्यापाठाच्या नावाने तब्बल २००० एकर जमीन सरकारकडून घेतली होती. त्याविरोधात हा संघर्ष होता. शेतकरी, जमीनमालक चंदावार यांना येऊन भेटले होते. त्यांनी चंदावारांना मागणी केली की, त्यांच्या जमीनी मिळवून देऊन न्याय करावा. बाबुरावांनी हा प्रश्न बारकाईने समजून घेतला.

पुढे अनेक मान्यवरांशी त्यांनी याविषयी बोलायचा प्रयत्न केला. समाजवादी व सर्वोदयी कार्यकर्त्यांच्या कानावर ही बाब घातली. परंतु बाबांविरोधात भूमिका घेण्यास कोणीही धजावत नव्हतं. अखेर त्यांनी सर्वोदय मंडळाचा राजीनामा दिला व शेतकरी व मजूरांना घेऊन सत्याग्रह सुरू केला. 

१९६८ साली बाबा आमटे यांनी पहिले श्रमसंस्कार शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी अनेक नावाजलेले समाजवादी येणार होते. बाबुरावांनी शिबिराच्या आदल्या दिवशी सत्याग्रह करण्याचे ठरविले. सत्याग्रहाचा कार्यक्रम जाहीर होताच बाबांचे धाबे दणाणले. त्यांनी पोलिसांचा धावा सुरू केला.

बाबांच्या समर्थकांनी बाबुरावांवर हल्लाही केला. खुद्द बाबा आमटेंनी बाबुरावांना नक्षलवादी घोषित केलं. दुर्दैवाची बाब म्हणजे अनेक समाजवादी, गांधीवादी व बाबाप्रेमी मंडळींनी या लोकलढ्याला व चंदावारांना लक्ष्य केलं होतं. या समाजवाद्यांच्या आरोपांना उत्तर देणारे एक टिपण बााबुरावांनी साधनेत प्रकाशित केलं होतं.



त्या लेखनाचा आशय असा की, आनंदवनातील एका जाहिर कार्यक्रमात तत्कालीन अॅडव्होकेट (नंतर न्यायमूर्ती झालेले प्रखर गांधीवादी) चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी चंदावार यांच्या या भूमिकेचा समाचार घेतला होता. त्यांनी कठोर भाषेत चंदावार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देणारं एक टिपण चंदावार यांनी साधनेत लिहिलं होतं. त्यात त्यांनी धर्माधिकारींना बरेच काही सुनावलं होतं. गांधीमार्गाचा अवलंब करून सत्य बोललो, हा मी काय गुन्हा केला का? असा प्रश्न त्यांनी धर्माधिकाऱ्यांना विचारला होता. दीड पानाचे ते पत्र साधनेच्या अर्काइव्ह संकेतस्थळावर असण्याची (किंवा ते नसेलही) शक्यता आहे.

त्या पत्रसंवादातून स्पष्टपणे दिसत आहे की, बाबा आमटेंच्या आनंदवनात काहीतरी विपरित घडत आहे, याविषयी ते जनसाक्षर मोहिम राबवत होते. बाबा आमटेंना शासन देत असलेल्या १८००-१९०० एकर जमीनवर चंदावारांचा आक्षेप होता. त्यांनी या जमीन वाटपाला विरोध दर्शवला होता. त्यांनी एके ठिकाणी बाबांवर हिंसेचा आरोप केलेला होता. विशेष म्हणजे चंदावार यांचे तोंड बंद करणारे, त्यांच्यावर नाहक आरोप करणारे अनेक परिवर्तनवादी होते. त्यात समाजवादी, गांधीवाद्यांचाही समावेश होता.

‘साधना’कारांनी चंदावार यांचे टीकात्मक पत्र प्रकाशित करण्यापूर्वी त्याचे प्रतिउत्तर लिहून घेतले व एकाच दिवशी दोन्ही पत्रे प्रकाशित केली. त्यात त्या पत्रलेखकाने चंदावार यांच्याविरोधात व्यक्तिगत टीका करून त्यांनी भूदानाची जमीन हडपल्याचाही आरोप केला होता. म्हणजे पत्रलेखकाने अप्रत्यक्षरित्या विनोबांना या प्रकरणात खेचलं होतं. हा वाद बराच चिघळला. दोन-तीन वर्षे वाद चालू होता.

प्रकरण वाढू लागलं तसं विनोबांनी त्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आमटेंना आश्रमात बोलावून सांगितलं की, “तुम्ही दोघेही सज्जन. समाजाच्या भल्याचा ध्यास घेतलेले. आपसात प्रश्न मिटवून टाका.” या संबंधीची अधिक माहिती खुद्द साधनेचे संपादक यदुनाथ थत्ते यांनी एप्रिल, १९७०च्या अंकात मांडली होती.

थत्ते लिहितात की, बाबा आमटेंनी विनोबांच्या शब्दाला आडकाठी आणली. त्यांनी विनोबांना म्हटलं, “तुम्ही सांगितलेत म्हणून मी जमीन सोडली तर ती सरकारकडे जाईल. चंदावारांच्या इच्छेनुसार तिची विल्हेवाट होईल असे नव्हे.”

हे टिपण वाचल्यानंतर माझ्यातील वाचक भूक आणखीन चाळवली होती. बाबा आमटे व त्यांच्या कथित जमीन अपहारप्रकरणी विचार करू लागलो. त्याकाळात सोमनाथच्या श्रमसंस्कार छावणीत नियमित जाणारे अनेकजण संपर्कात होते. अशाच एका व्यक्तीने सांगितलं होतं की, आनंदवनाच्या अशा कृष्णकृत्यावर विशेष पुस्तक लिहिलं गेलं आहे... लेखकाचं नाव सांगितलं, ते होते, मनोहर पाटील...

पुस्तकाचा शोध सुरू होता. ते आऊट ऑफ प्रिंट असल्याने शोधमोहिम जरा गैरसोयीचा होत गेली. पण सात-आठ वर्षानंतर हे पुस्तक एकाएकी नव्या रूपात समोर आलं. मूळ पुस्तक ११२ पानी आहे. त्याचे प्रकाशत खुद्द लेखक मनोहर पाटील आहेत.

‘आनंदवनची बाबाशाही’ नावाने प्रकाशित पुस्तक थोर समाजसेवक म्हणवणाऱ्या बाबा आमटे यांची काळी बाजू दाखवते. लेखक मनोहर पाटील व्यवासायाने वकील होते. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोराचे ते निवासी! ते बाबा आमटेंच्या विविध प्रकल्पाचा भाग व त्यात दीर्घकाळ काम करणारे असल्याने पुस्तकातील तथ्यांशाविषयी शंका घेण्याचं कारण नाही.

वास्तविक लेखकाने पुस्तकातील अनेक प्रकरणं नवशक्ती वृत्तपत्रातून प्रकाशित केलेली होती. नंतर त्यात भर टाकून स्वतंत्र पुस्तक केलं. पुस्तकाच्या प्रस्तावनेत जयवंत काकडे लेखकाच्या लेखन प्रामाणिकतेविषयी लिहितात, “मनोहर पाटीलांनी बाबा आमटे ह्यांची विचारसरणी, आनंदवनातील कुष्ठरोग्यांचे जीवन आणि आनंदवनाच्या संदर्भात घडलेल्या घटनांवर त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे लिखाण केले आहे. त्यांच्या लिखाणात परखडपणा तर आहेच; लिखाणाला तीक्ष्ण अशी धारही आहे.”

संबंधित पुस्तकात बाबा आमटे यांचे दोन चेहरे वाचकांच्या भेटीला येतात. एक - अमाप प्रसिद्धी, पैसा, गुणगौरव, वाहवाही तर दुसरा - जातभिमान, क्रूरता, शोषण, अमानवीयता व दडपशाही वृत्ती अशा बाबांच्या दोन व्यक्तिमत्वाचं दर्शन संबंधित पुस्तक घडवतं. पुस्तकातील असंख्य उतारे हादरवून टाकणारे आहेत.

बाबांच्या वेगवेगळ्या प्रकल्पात राबणारे शेतमजूर, कामगार, सेवक असो वा कृष्ठरोगी इत्यादींचं कसं मानसिक, शारीरिक व इत्यादी प्रकारचं कसं शोषण होतं आहे, याची मांडणी पानोपानी आलेली आहे. शेतमजूर, कामगार, सेवक व त्यांच्या कुटुंबीयांची हतबलता, निराशा, उपासमारी व दारिद्र्याच्या असंख्य विदारक कहाण्या त्यात आहेत.

त्याचप्रमाणे सामान्य जनतेला बाबाशाहीचे (लेखकांच्या मांडणीचा रोख बुवाबाजीने जसे भक्त गंडतात, तसं बाबाशाहीने गंडत गेले असा आहे) अंध मुलामा चढवून मूर्ख बनवल्याचे असंख्य उदाहरणे त्यात दिलेली आहेत.

बाबा आमटेंनी वारंवार सरकारला अंधारात ठेवून किंवा सरकारी दरबारात पेरलेल्या आपल्या हस्तकाकरवी हजारो एकर मोक्याच्या शेतजमीनी, वनजमीनी लाटल्या. आदिवासी, घरमालक, शेतमालक व मजूरांचा विरोध पोलिसामार्फत मोडून काढला. व्यक्तिगत लालसेवर (लुटीला) झालेले आरोप मानवताविरोधी, विकासविरोधी व महाराष्ट्रविरोधी ठरवले. प्रकल्पग्रस्त, शेतकरी व आदिवासींचे लढे कुष्ठरोग्याविरोधी ठरवले. लेखक धन, पैसा, प्रसिद्धी, हुकूमशाही अशी क्रमाक्रमाने मांडणी करत जातात. लेखकाने केलेले दावे, खुलासे व दिलेली माहिती धक्कादायक आहे.

लेखकाच्या मते, वेगवेगळ्या प्रकल्पात निवासी पद्धतीने राहणारे शेतमजूर, सेवक, कामगार हे नुसते मदतनीस नसून बाबांची खाजगी मालमत्ता आहेत.. ते वेठबिगार आहेत.. खुल्या जेलमध्ये राहतात... इच्छा असूनही बाहेर जाऊ शकत नाही, स्वातंत्र्य अनुभवू शकत नाही, आनंद साजरा करू शकत नाहीत. 

लिहितात, “येथे कामाचे तास निश्चित नाहीत. संधीनिकेतनमध्ये काम करणाऱ्यांना मात्र सुट्टीची वेळ ठरवून दिलेली आहे. परंतु याची अंमलबजावणी होत नाही. शेतीवर राबणाऱ्यांना तर अशा निश्चित वेळा नाहीत. सांगितले ते काम आणि सांगितले त्यावेळी हे करावेच लागते. नाही म्हणण्याची येथे सोय नाही. कां कू करणाऱ्याला सरळ हाकलून दिले जाते. कुष्ठश्रमिकांकडून येथे सैनिकाच्या शिस्तीप्रमाणे काम करवून घेतले जाते. त्यांच्याकडून काम करवून घेणारे अनेक मुकदम कुष्ठश्रमिकांमधूनच तयार करण्यात आलेले आहेत. आमटे बाबा त्यांना ‘कार्यकर्ते’ म्हणतात. त्यांच्या हुकुमतीखाली या कुष्ठ- श्रमिकांना राबावे लागते.”

लेखकाने असे अनेक विदारक उदाहरणे दिलेली आहेत. शोषित, पीडितांच्या अनेक व्यथा शब्दबद्ध केलेल्या आहेत. लेखक पुढे लिहितात, “आनंदवनात प्रवेश देताना कुष्ठांच्या हातांना बोटे आहेत की नाही, ते पाहिले जाते. बोटे नसतील तर काम करणार कसे? आनंदवनात आढळणारी बोटे तुटलेली माणसे काबाडकष्ट करताना पंगू झालेली आहेत.”

पोटाची भूक भागवली जाईल, एवढं अन्नही त्यांना मिळत नाही, फक्त मरणपंथाला लागणार नाही, तर जीवंत राहू शकतील एवढं मोजकं अन्न त्यांना दिलं जातं. प्रत्येकांना अमानूषपणे राबवून त्यांच्याकडून कठोर श्रम करून घेतलं जातं... सुख-दुखात ते एकटे असतात. त्यांना आरोग्यसुविधा मिळत नाही, चांगलं शिक्षण मिळत नाही... सकस अन्न मिळत नाही... इत्यादी दिलेली माहिती शोचनीय आहे.

वेठबिगारीवर लेखक लिहितात, “आनंदवनातील श्रमिकांना दोन वेळच्या जेवणाव्यतिरिक्त थोडीशी मजुरी दिली जाते. या मजुरीचा दर दरमहा ५ रुपयापासून तर ४० रुपयापर्यंत असतो. दोन वर्षापूर्वी तो दर यापेक्षाही कमी होता. पण मध्यंतरी वृत्तपत्रातून याविरुद्ध ओरड होऊ लागल्याने आता ते दर वाढवून दिलेले आहेत. संधीनिकेतनमध्ये काम करणाऱ्या मजुरांना हल्ली ४० रुपये दरमहा दिले जातात. तर शेतीवर राबणाऱ्या कुष्ठांना ५ ते २० रुपये महिन्याकाठी मिळतात. आनंदवनातील काही निगेटीव्ह पेशंट्स आनंदनिकेतन महाविद्यालयात चपराशी म्हणून किंवा इतर लहान-सहान कामे करतात. त्यांना मिळणाऱ्या पूर्ण पगारापैकी त्यांच्या हाती फक्त २०-२५ रुपये ठेवून बाकी सारा पगार वसूल केला जातो.”

लेखकाने लिहिले आहे की, प्रत्येकांवर पाळत ठेवलेली असते. बाबांनी अनेक हेर पेरलेले आहेत. कोण काय करतं? विरोधी भूमका घेणारे, बोलणारे, धान्य लपवणारे, चोरी करणारे व अपहार करणारे बाबांना लगेच कळतात. असा व्यक्तीची जाहिर शिक्षा दिली जाते, बदनामी केली जाते. बाबांची हुकूमशाही अनेक पातळ्यावर काम करते. कोणी एकमेकाला या विषयी बोलत नाही. बोलले तर लगेच चौकशी होते. हाकलून दिलं जातं, पगार रोखण्याच्या धमक्या दिल्या जातात.

बाबांच्या हुकमशाही प्रवृत्तीबद्दल लेखक एके ठिकाणी लिहितात, “१९७१ साली झालेला उठाव हा कुष्ठश्रमिकांचा पहिला आणि शेवटवा उठाव होता. हा उठाव अत्यंत निर्दयपणे चिरडल्यानंतर कुष्ठांनी पुन्हा बंड करण्याची हिंमत केली नाही. दडपशाहीचे स्वरूप कायमच आहे. जंगली कायदे त्यांच्याः नरडीला नख लावूनच आहेत.”

बाबा परदेशी पाहुण्यांना आनंदवनात आणतात. त्यांच्यासमोर कृष्ठरोग्याच्या सेवेचा देखावा करतात. खास सोय करून ते सगळा देखावा त्यांच्यासमोर मांडला जातो व त्यांच्याकडून भरपूर सहाय्यता निधी लाटला जातो. त्यासाठी परदेशी पाहुण्यावर वारेमाप खर्च केला जातो, त्यांच्या सर्व सुविधांवर ‘विशेष लक्ष’ ठेवलं जातं. त्यांना खुष ठेवलं जातं. त्यांच्याकडून इतर देणगीदाराचे संपर्क मिळवले जातात, त्या अनोळखी परदेशी लोकांना आपल्या लोककल्याणकारी कामाविषयी पत्रव्यवहार करायचा, माहिती द्यायची, वृत्तपत्रीय लेख, कात्रणं पाठवायची.. त्यांना आनंदवनात बोलवायचे व त्यांचा जंगी पाहुणचार करायचा. मंत्र्या-संत्र्यांना बोलावून विशेष सत्कार सोहळे घ्यायचे. मग त्या परदेशी पाहुण्याकडून मोठा निधी लाटायचा, भरपूर देणग्या मिळवायच्या असा एकूण प्रकार कशा रीतीने चालतो, त्याविषयी अनेक खुलासे लेखकाने केलेले आहेत.

बाबांच्या देणगीदाराविषयी लेखक लिहितात, “आमटे बाबांचे भांडवलदार, जमीनदार व हिंदुत्ववादी या सर्वांशी अतूट नाते आहे. त्यांच्या भक्तसमूहामधील अधिकांश लोक या वर्गामधीलच आहेत. या भक्तांनी आमटे बाबांवर आपली मर्जी बहाल केली आहे. ते आमटे बाबांना ओंजळी भरभरून पैसे देत असतात. इतकेच नव्हे तर त्यांनी ‘बजाज पारितोषिक’, ‘इंडियन मर्चेंट चेंबर’ पारितोषिक देऊन त्यांना गौरविले आहे.”

एकुण गैरव्यवहाराला कायदेशीर किंवा कल्याणकारी ठरविण्यामागे काही ब्राह्मण संपादक मित्रांचे कशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत बाबांनी घेतली, याचे सविस्तर उतारे लेखक देतात. संपादकाचा खास पाहुणचार केला, आहे नाही बघितलं तर संपादक त्यांच्या कार्याचे कौतुक करणारे अग्रेलख, लेख, वृत्तांत, बातम्या रंगवतात. आपले प्रतिनिधी पाठवतात. नित्य कौतुक सोहळ्याच्या बातम्यांचे फोटो प्रकाशित करतात. त्यातून बाबांच्या कथित सामाजिक कार्याची मार्केटिंग, जाहिरात होते... या कार्यात लेखकाने साप्ताहिक साधना व त्याचे तत्कालीन संपादक तथा साधना परिवारातील मंडळीची कशी मदत झाली, याचा विस्ताराने उल्लेख आवार्जून केला आहे.

अनेक वर्षापासून हजारो एकरात विस्तारलेल्या आनंदवनच्या मालकीहक्कावरून आमटे कुटुंबात वाद सुरू आहे. त्याचा विदारक प्रकार नोव्हेबर, २०२० मध्ये दिसून आला. या वादातून डॉ. शीतल आमटे-करजगी (बाबांची नात) यांनी आत्महत्या केली. 

आनंदवनातील अशा आत्महत्याविषयी लेखक लिहितात, “ही अपंग माणसे सारे मुकाटपणे सहन करीत आहेत. अगदीच असह्य झाले तर ही माणसे आवाज उठविण्याऐवजी आत्महत्या करतात. आनंदवनात आत्महत्येचे बरेच प्रमाप आहे. कुणी जहर पिऊत तर कुणी विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवितो. धास्तावलेल्या मानसिकतेचा हा परिपाक असतो.”

शीतल प्रकल्पातील एका घटकाच्या सीईओ होत्या. या घटनेनंतर महाराष्ट्रात बराच गदारोळ झाला. आनंदवनातील ‘बाबाशाही’वर कठोर शब्दात टीका करणारे अनेकजण पुढे आले, त्याही वेळी त्यांना गप्प करणारे किंवा महाराष्ट्रद्रोही म्हणणारे ‘संपादक, पत्रकार, भाष्यकार, सामाजिक कार्यकर्ते’ होते.

काही टीकाकारांनी मनोहर पाटील यांच्या सदरील पुस्तकाचा उल्लेख कला होता. त्यावेळी हे पुस्तक खूप चर्चेत आलं होतं. कदाचित याच घटनेनंतर पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाचे प्रयत्न सुरू झाले असावेत.

मूळ पुस्तक १९८५ला प्रकाशित झालेलं आहे. म्हणजे बाबांच्या हयातीत. तरीही त्यावर फार चर्चा, वाद होऊ शकला नाही. बाबांचे संपादक-पत्रकार मित्रांनी पुस्तक प्रकाशात येऊ दिले नाही, असे अनेकांचे म्हणणं आहे. पुस्तकाच्या लेखकांवर हल्ले केले गेले. त्यांची बदनामी केली गेली.

पुस्तकाच्या मलपुष्ठावर लिहिलेली पुढील माहिती रोचक आहे.

“कुष्ठरोगाचा प्रश्न हा आर्थिक विषमतेशी निगडित असलेला प्रश्न आहे. दारिद्र्यात जन्माला आलेल्या आणि कुपोषणाला बळी पडलेल्या माणसांनाच बहुतांशी कुष्ठरोग होतो. याचा अर्थ हा आहे की, कुष्ठरोगाविरुद्धचा लढा हा मूलतः आर्थिक विषमतेविरुद्धचा लढा आहे. पण आमटे बाबा असा कोणताही लढा लढले नाहीत किंवा त्यांनी असा लढा लढणाऱ्यांना प्रोत्साहनही दिले नाही. त्यांनी भोपालपट्टणम् - इंचमपल्ली धरणाविरुद्ध आवाज उठविला. नर्मदा बचाव आंदोलनात उडी घेतली. ‘भारत जोडो’ आंदोलन करून पृथ्वी प्रदक्षिणा घातली. पण आर्थिक विषमतेविरुद्धचे कोणतेही आंदोलन केले नाही. विचार करू शकणाऱ्या लोकांना ही गोष्ट अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाही...”

पुस्तकातील सर्वच तपशील, माहिती, खुलासे, घटना, प्रसंग फारच विचारप्रवर्तक आहेत. पुस्तकाचे एक-एक पान बाबांच्या सामाजिक लूटीचं, कृष्ठरोग्याच्या शोषणाचं, क्रूरतेचं, समाजसेवेच्या बाजारीकरणाचं वस्तुनिष्ठ चित्रण करते.

इतकंच नाही तर लेखकाने बाबांच्या चिंतनावर वाङ्मय चौर्याचा आरोप केलेला आहे. पुढे त्यांनी बाबांच्या कवितासंग्रह ‘ज्वाला आणि फुले’ची चिरफाडही केलेली आहे.

विशेष म्हणजे साप्ताहिक साधना, समाजवादी संपादक-पत्रकार, साधनेचे संपादक यदूनाथ थत्ते इत्यादी मंडळींनी बाबांना थोर समाजसेवक म्हणून ब्रँडिग केली, असं लेखक सांगतात. वास्तविक, साधनेत बाबा आमटे व त्याच्या विविध प्रकल्पांना मोठी प्रसिद्धी मिळत होती. साधनेचे जुने अंक चाळले किंवा तिची वेबसाईट पाहिली तर कौतुकाचे असंख्य लेख, रिपोर्ट, अहवाल, वृत्तांत, व्यक्तिलेख, माहिती, मान्यवरांची विधाने, अहवाल व भाषणे सापडतील. अनेकांचा असा आरोप आहे की, साधनेची साथ मिळाली नसती तर बाबा आमटेंच्या कामाला जनप्रियता (?) लाभली नसती... असो...

बाकी तपशीलासाठी पुस्तक जरूर वाचावं... ते केवळ वाचनीयच नाही तर धक्कादायक व चिकित्सक विचार करण्यास प्रवृत्त करतं. वाचकांच्या मनात प्रश्न निर्माण करते.

अजून एक विचारोत्तेजत उतारा पुढे देत आहे...

[....आनंदवनात आत्महत्येचे बरेच प्रमाण आहे. कुणी जहर पिऊन तर कुणी विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवितो. धास्तावलेल्या मानसिकतेचा हा परिपाक असतो.

आनंदवनात अगदी पहिली आत्महत्या आमटे बाबांच्या भावाने केली. त्याची अनेक दिवस चर्चा होती. वेगवेगळे तर्कवितर्क केले जात होते. पुढे हे प्रकरण कायमचे दबून गेले. त्यानंतर खळबळ उडाली ती बाबा जोशी यांच्या आत्महत्येने. या दरम्यान कैक आत्महत्या झालेल्या... पण हा नित्याचाच प्रकार असल्यामुळे त्यांची विशेष चर्चा झाली नाही. पण बाबा जोशींच्या आत्महत्येने मात्र सर्वांना हळहळ लावली.

खरे तर बाबा जोशीचे नाव बाबा नव्हते. पण सर्व कुष्ठरोगी त्यांना प्रेमाने बाबा म्हणत. सर्वांमध्ये ते प्रिय होते. बाबा जोशी व त्यांची पत्नी दोघांनाही कुष्ठरोग झाला. ते वैतागून गेले होते. जीवनाला कंटाळले होते. शेवटी एके दिवशी नदीच्या डोहामध्ये आत्महत्या करण्यासाठी ते निघाले होते. तर रस्त्यात कुणीतरी त्यांना अडविले व आनंदवनात जाण्याचा सल्ला दिला.

नंतर हे जोशी दांपत्य आनंदवनात आले. त्यांनी औषधोपचार घेतला. त्यांचा रोग बरा झाला. बाबा जोशींची मुळातच सेवाभावी वृत्ती होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी वेचण्याचे ठरविले आणि आनंदवनात त्यांनी पाय रोवला. ते आनंदवनातील सगळी शेती सांभाळीत.

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी शेतीच्या पद्धतीत बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या. तरीही आपल्या देशातील शेती निसर्गाच्या मर्जीवर. आनंदवनही अपवाद नाही. तर एका हंगामात पिकावर परिणाम झाला. धान्य उत्पादनात घट झाली.

आमटे बाबांनी विचार आचार न करता बाबा जोशींना शिवीगाळ केली. जोशींना फार वाईट वाटले. शेवटी त्यांनी आत्महत्या केली. बाबा जोशींची पत्नी अजूनही आनंदवनातच राहते.

कदाचित या प्रकरणाला वाचा फुटू नये म्हणून तिला सांभाळण्यात आले असावे. पण बाबा जोशींच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला. आनंदवनात आणि वरोडा शहरात बाबा जोशींचा मृत्यू हा अनेक दिवस चर्चेचा विषय होता.

आनंदवनात कुणी आत्महत्या केली की रोगाला कंटाळून त्याने असे केले, असे सोयीस्करपणे सांगण्यात येते. पण ही शुद्ध बनवाबनवी असते. आज निरनिराळ्या शहरांतून व खेड्यापाड्यातून कितीतरी कुष्ठरोगी वावरताना दिसतात. ते श्रम करतात. वा ते शक्य नसले तर भीक मागून पोट भरतात; पण आत्महत्या करताना कोणी आढळत नाही. आणि आनंदवनात तर कुष्ठरोग्यांसाठी औषधोपचाराची व्यवस्था आहे.

मग असे असताना रोगी कुष्ठरोगाला कसे कंटाळतात? रोगाला कंटाळून आत्महत्या केली जाते, असे कारण सांगून काही काळ अब्रू झाकता येईल, पण तो दिवस दूर नाही की वास्तवता स्वतः डोके वर काढील व आमटे बाबा अपंगशाहीचे पंतप्रधान नसून सुलतान आहेत, हे जगजाहीर करील.]

पुस्तकातील अनुक्रमावरून वाचकांना अधिकची माहिती मिळू शकेल...

(१) भ्रमाची मीमांसा, (२) आनंदवनातील उत्पादनाची साधने, (३) आनंदवनातील वेट बिगारी, (४) आनंदवनातील शेतीची परवड, (५) जात आणि धर्माची रखवालदारी, (६) हम करे सो कायदा, (७) कृष्ठरोग्यांच्या चिरडलेल्या बंडांच्या कथा, (८) वृक्षाचा सर्वात मोठा कत्तलखोर, (९) सोमनाथाचा सत्याग्रह, (१०) पारधी लोकांचा आक्रोश, (११) भोपाल पट्टणम इंचमपल्ली आणि भारत जोडो, (१२) जोड जा सिम सिऽऽम, (१३) आमटे बाबांची मतलबी विज्ञाननिष्ठा!, (१४) आमटे बाबा आणि राष्ट्रीय-स्वयंसेवक संघ, (१५) मतलबी आवाहन, (१६) संस्थानिर्मितीचे भांडवलदारी शास्त्र, (१७) चिंतनामधील चलाखी, (१८) नव्या वेष्टणातील जुनी तबकडी, (१९) आमटे बाबांचे राजकारण, (२०) आमटे बाबांचे प्रसिद्धीपुराण, (२१) बुरख्याआडचे आमटे बाबा...

लेखकाने पुस्तकात उत्तरोत्तर वाचकांना सचेत केलं आहे. सूचना दिलेल्या आहेत. लेखकाने बाबा आमटेविरोधात झालेल्या लोकलढ्याचीही माहिती दिली आहे. बाबुराव चंदावार यांच्याशी झालेोला संघर्ष विस्ताराने कथन केलेला आहे. अण्णासाहेब सहस्रबुद्धे सारखे समाजवादी मंडळी बाबुरावांना कशी बदनाम करत होती, इत्यादीवरही भाष्य केलं आहे. 

आनंदवनाविरोधात सूरू केलेला लढा हा ब्राह्मणविरोधात होता असाही भ्रम बाबा आमटेंनी पसरवण्याचा प्रयत्न केला होता. वा्स्तविक बाबुराव चंदावार यांनी सुरू केलेल्या चळवळीत अनेक जातिजमातीचे लोक होते. त्यात ब्राह्मणही होते. कदाचित या आरोपाला उत्तर देण्यासाठीच ब्राह्मणी व गैरब्राह्मणी दृष्टिकोनातून सदरील पुस्तक लिहिलं गेलं असावं. त्यामुळे निश्चितच वेगळी बाजू समोर येते. सहजच म्हणून हे पुस्तक वाचण्यास हरकत नाही. मूळ पुस्तक पुढील गुगल ड्राइव्ह लिंकवर उपलब्ध आहे... डाऊनलोड करून ते वाचता येईल..

##
पुस्तकाचे नाव : आनंदवनातील बाबाशाही
लेखक : मनोहर पाटील
पाने : १२८
किंमत:- १३० रूपये
प्रकाशक : सनय प्रकाशन, नारायणगाव
दुसरी आवृत्ती जानेवारी २०२१

...
कलीम अज़ीम, पुणे
मेल: kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,43,इस्लाम,38,किताब,18,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,276,व्यक्ती,7,संकलन,62,समाज,234,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ‘आनंदवनातील बाबाशाही’ : बाबा आमटेंचा अमानवी चेहरा
‘आनंदवनातील बाबाशाही’ : बाबा आमटेंचा अमानवी चेहरा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgYL9rTPir3m0zj1QPv6JDTGCkz_37x33iHDlJawaNGwPKTdGY-eSAt0YxETWqAgwgudcPbneJ2q4Lb1aVzuUXwdLPS8_9zO4V8xbofV8RKvv5PllPQmYJzHId_lxK7gazamBYli7g6Mt5wBwLrF6FjLH1wCZJ5vZDEaXXxL6FAhK-FglSXE54eyV-0BzYA/w640-h360/271739755_4859706224094929_301911523297701886_n.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgYL9rTPir3m0zj1QPv6JDTGCkz_37x33iHDlJawaNGwPKTdGY-eSAt0YxETWqAgwgudcPbneJ2q4Lb1aVzuUXwdLPS8_9zO4V8xbofV8RKvv5PllPQmYJzHId_lxK7gazamBYli7g6Mt5wBwLrF6FjLH1wCZJ5vZDEaXXxL6FAhK-FglSXE54eyV-0BzYA/s72-w640-c-h360/271739755_4859706224094929_301911523297701886_n.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2022/01/blog-post_17.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2022/01/blog-post_17.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content