आमदाराच्या नियतीला लागले कुलूप


ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी लिहिलेला हा लेख १५ वर्षांपूर्वीचा आहे. आजही तो मर्मस्पर्शी जाणवतो. भांडवली जमान्यात नात्यांना लाथाडणारे अनेक प्रसंग हबीब यांनी 'नाते' या पुस्तकात रेखांकित केलेले आहेत. राजकारणी आणि सामान्य माणसे यातले नाते हे आर्थिक व केवळ मतांसाठीचे असते, असे उत्तरोत्तर अनेक प्रसंगातून दिसून आले आहे. नाते संबंधाची वाताहत लावणाऱ्या व त्याला नवे आयाम देणाऱ्या अनेक कथा या पुस्तकात वाचायला मिळतात. महाराष्ट्रात सध्या राजकारणाचा माहौल सुरू आहे. त्यानिमित्ताने आम्ही हा लेख परिसर प्रकाशनाच्या सौजन्याने 'नजरिया' वाचकांसाठी पुन्हा देत आहोत. लेखातील प्रसंग, घटना प्रतीके काल्पनिक असली तरी वास्तविक जीवनातून त्या घेतल्या आहेत. प्रासंगिकता म्हणून आम्ही लेख वाचकांसाठी खुला करत आहोत. त्याचे साधर्म्य कुणा एका व्यक्ती किंवा गटाशी जोडून निरर्थक चर्चा करू नये, ही माफक अपेक्षा
दादाजान, आपल्या जुन्या घरी चला ना.
छोट्या नातवाचा हा आग्रह ऐकून गुरूजी आतल्या आत चरफडले. त्यांनी आवंढा गिळला. तोंडातून शब्द फुटला तर रक्ताची ओकारी होईल असे त्यांना वाटले. बारक्याची पाठ थोपटून, नमाजची वेळ झाली म्हणून ते लगबगीने बाहेर पडले. घराच्या ​​बाहेर पडताच त्यांना ते घर दिसले. गुरूजींनी आशाळभूतपणे त्या घराकडे पाहिले. दारावर लटकावलेल्या नव्या कोऱ्या कुलुपावर त्यांची नजर खिळली. 
आमदाराने लावलेले हे कुलूप त्यांना एखाद्या चेटकिणीने बसविलेल्या अजगरा सारखे भासले. डोळ्याची ओल सांडू नये म्हणून त्यांनी आकाशाकडे पाहिले. आभाळ भरून आले होते. ‘हे अल्ला, त्याला सद्बुद्धी दे!’ अशी मनोमन प्रार्थना करून ते पुढे चालू लागले.
गुरूजी नित्य नेमाने दिवसातून पाच वेळा नमाज पढायचे. धर्माळू, सालस लोकात त्यांची उठ-बस असे. कधी कोणाच्या अधात-मधात नसत. कोणाशी भांडण तंटा नाही. त्यांचा स्वभाव मवाळ, अबोल वृत्ती. सज्जन गृहस्थ म्हणून गल्लीतील लोक त्यांचा आदर करायचे. कोणे एके काळी शिकले अन शिक्षकाची नोकरी पत्करली. आयुष्यभर मास्तरकी केली. त्यांच्या पत्नी देखील शिक्षिका. 
वाचा : ​'मनातील हिंदू-मुस्लिम बायसचे काय करायचे?'
वाचा : मुहर्रम आहे तरी काय?
जुन्या पिढीतील शिक्षक, आपल्या जीवनात काही आदर्श मानायचे. त्या पैकीच हे कुटुंब. कोणाचा हक्क मारून काही हडपण्याची त्यांना इच्छा झाली नाही. एक-एक काडी गोळा करून चिमणी घरटे बांधते तसे दोघांनी आडकी दिडकी मागे टाकून एक घर बांधले. मुलं झाली. शिक्षणाचा खर्च सुरू झाला. मुली मोठया झाल्या. त्यांच्या लग्नाचा विषय आला. गरजा वाढत होत्या. काटकसर करून दोघांनी दिवस काढले. बांधलेले घर भाड्याने दिले व जुन्या घरात ते राहू लागले.
तीस वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्या वेळेस आमदाराचे वडील एका खेड्यातून तालुक्याला आले होते. त्यांच्या भावा भावात भांडणे झाली होती. इतर भावांनी त्यांच्या जमिनी हडप करून हाकलून लावले होते. परिस्थिती वाईट होती. लहान लेकरांना घेऊ न राहणार कोठे? असा प्रश्न होता. कोणी तरी त्यांना गुरूजीकडे आणले. गुरूजींना दया आली. गरजही होती. वीस रूपये महिना भाडे ठरले. गुरूजींना भाडेकरू मिळाला. त्या काळात गुरूजींचा थोरला मुलगा औरंगाबादला शिकत होता. त्याला ते महिना वीस रूपये पाठवायचे. घर भाड्यातून आलेले पैसे ते मुलाला पाठवू लागले.
आमदाराच्या वडिलांनी मोंढ्यात दुकान सुरू केले. दुकानातून आमदनी सुरू झाली. चार पैसे मागे पडू लागले. याच पैश्याच्या बळावर त्यांनी आपल्या भावा विरूद्ध कोर्टात दावे ठोकले. जमीन परत मिळविली. काही दिवसात त्यांनी नवे दुकान थाटले. लोक त्यांना आता शेटजी म्हणू लागले. शेटजीकडे भरपूर पैसा आला पण त्यांनी मालकीचे घर काही विकत घेतले नाही. ते शेवटपर्यंत गुरूजींच्या घरात भाडेकरू म्हणूनच राहिले. शेटजींनी थाटामाटात एका मुलीचे लग्न याच घरातून लावून दिले. मुलं मोठी झाली. दुकानाचा कारभार बघू लागली. एके दिवशी तीर्थयात्रेला चाललो म्हणून शेटजी निघून गेले. ते परत आलेच नाही.
वाचा : मनतडपत 'रफी' गीत बिन
वाचा : लेखक व कवी होता मुघल सम्राट बाबर 
मोठ्या मुलाने सगळी सूत्रे हातात घेतली. काही दिवसातच त्याचे लग्न झाले. शिकलेली मुलगी घरात आली. आता जुन्या घरात नवा संसार सुरू झाला. गुरूजींचा नव्या पिढीशी व्यवहार सुरू झाला. काळ बदलला. महागाई वाढली. मात्र भाडे तेच राहिले. वीस रूपये. गुरूजींनी एकदा भाडे वाढीचा विषय काढला. पण पोराने त्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हापासून तो मनिऑर्डरने पैसे पाठवू लागला.
निवडणुका आल्या. खरे तर तो सत्ताधारी पक्षात होता. पण तिकिट मिळाले नाही म्हणून विरोधी पक्षाच्या नेत्याकडे गेला. विरोधी पक्षाकडे उमेदवार नव्हता. त्यांना याला होकार दिला. पूर्वीच्या आमदाराबद्दल लोकांच्या मनात बराच असंतोष होता. या परिस्थितीचा फायदा मिळाला. योगायोगाने शेटजीचा मुलगा आमदार झाला.
आमदार झाल्यानंतर त्याला पैशाची काय कमी? आकाश फुटावं तसे पैशाचे लोंढे त्याच्या पायाशी लोळण घालू लागले. सत्ता आली की संपत्ती यायला वेळ लागत नाही. त्यात हा शेटजीचा चटावलेला मुलगा. बघता-बघता गाडी आली, नोकर चाकर आले आणि आला सत्तेचा माज, संपत्तीची मस्ती. त्याची भाषा बदलली. वर्तणूक बदलली तरीही तो त्याच माळवदाच्या घरात रहात होता. वीस रूपये भाडे देऊन.
आमदारांकडे वर्दळ वाढली. घर अपुरे पडू लागले. प्रतिष्ठेच्या मानाने घर विद्रुप वाटू लागले. एकदा मुख्यमंत्री देवीचे दर्शन घेऊन परत जाताना आमदाराच्या घरी आले. घोडा वेळ थांबले. घराच्या माळवदाकडे पहात होते. तेव्हा आमदारांना ओशाळल्यासारखे झाले होते. त्या नंतर आमदारांच्या पत्नीने एकदा विषय काढला. ती म्हणाली, मी म्हणते आपण नवं घर बांधावं.’
आमदार म्हणाले, हो, मलाही तसंच वाटतंय. परवा मुख्यमंत्री आले तेव्हा मला लाजल्या सारखे वाटत होते. घर पाहून त्यांचा गैरसमज होऊ शकतो. आपल्या परिस्थिती बद्दल गैरसमज झाला तर आपले विनाकारण नुकसान व्हायचे, अशा बाबी आता सांभाळायलाच पाहिजेत.
नाचा : संभ्रमित करणारा तलाकबंदी कायदा
वाचा : इस्लाम : ज्ञात आणि अज्ञातांंचा शोध
आमदाराची बायको खूष झाली. आपल्या मनासारखे मोठे घर आपल्याला मिळणार. त्यात आपण हवं नको ते करु, असं तिला वाटलं. आमदारांनी तिच्या मनाचा अंदाज घेतला व लगेच म्हणाले, घर जरूर बांधू. पण हे घर सोडायचे नाही. वीस रूपये भाड्यात इतक्या मध्यवर्ती ठिकाणी कोठे घर मिळणार आहे?
बाईंना नवरा चांगला ठावूक होता, त्या लगेच म्हणाल्या, मी कोठे हे घर सोडा म्हणते. वीस रूपये का आपल्याला जास्त आहेत? हवं तर कमी जास्त करून हेच विकत घेऊ. जुनं पाडून नवं बांधता येईल.’
आमदारसाहेबांना पत्नीच्या हुशारीचे कौतुक वाटले. दोघांचे एकमत झाले, आता नवीन घराच्या बांधकामाला उशीर लागणार नव्हता.
नव श्रीमंतांच्या वस्तीत आमदाराने आधीच एक भलामोठा प्लॉट घेऊन ठेवलेला होता. त्यावर वास्तू बांधणे सुरू झाले. सरकारी अभियंते रात्रंदिवस तैनातीवर होते. हवं नको ते पहात होते. आमदार अधून-मधून चकर मारून प्रगतीचा आढावा घेत राहायचे. बघता-बघता बास्तू आकाराला आली. कोणी म्हणाले कमीत कमी ऐंशी लाख रूपये लागले असतील. कोणी एक कोटी म्हणाले. 
पत्र्याच्या घरात राहणाऱ्यांना एवढ्या भव्य इमारतीच्या खर्चाचा अंदाज बांधणे देखील कठीण होते. आमदार साहेबांच्या वास्तुची चर्चा गुरूजींच्या घरात अनेकदा झाली. हे घर बांधून झाले की आमदार जुने घर सोडून पतील, अशी त्यांना भाबडी आशा. गुरूजी काठी टेकीत तीन चारदा बांधकाम पाहायला त्या कॉलनीत जाऊन आले. आता पंधरा दिवसात आटोपेल असे त्यांनी तीनदा घरात सांगितले. काम बरेच दिवस चालत राहिले.
विधानसभेची निवडणूक एका वर्षावर आली होती. आमदार साहेब त्या तयारीला लागले होते. त्यांचे दौरे सुरू झाले होते. अधिकाऱ्यांना घरी बोलवून ते तासनतास खलबते करायचे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लोकांचे हात ओले करणे सोयीचे ठरेल म्हणून वास्तुशांतीचा जंगी कार्यक्रम आखण्यात आला. मुहूर्त ठरला. पत्रकं वाटल्या सारख्या निमंत्रण पत्रिका वाटल्या गेल्या. 
गाव-कारभाऱ्यांना दस्तूरखुद्द आमदारसाहेबांनी निमंत्रणे दिली. अनेकांना फोन केले. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची वार्ता गरूजींनाही कळली, आमदार आपले भाडेकरू आहेत. आपल्या डोळ्या देखत लहानाचे मोठे झाले. ते येतील. पत्रिका देतील. कार्यक्रमाला आले पाहिजे. असा आग्रह धरतील. आपण त्यांना आशीर्वाद देऊ. आमदार साहेबांनी नवे घर बांधले. आता ते आपले घर रिकामे करतील. गुरूजी कल्पनेत रमले, नमाज पठन केल्यानंतर त्यांनी मनोभावे अल्लाहला धन्यवाद दिले.
वाचा : एमआयएम-वंचित युती अन् पुरोगामित्व
वाचा : ‘धर्मनिरपेक्षतेचे कुली आम्हीच का व्हावे?’ 
दिवसा मागून दिवस गेले. आमदारांची भेट सोडाच, गावभर वाटलेली पत्रिकादेखील गुरूजींच्या वाट्याला आली नाही. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात काही गोष्टी विसरल्या जातात. असे मनाशी म्हणून त्यांनी स्वतःची समजूत काढली. आशेला फुटलेली पालवी जपण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करीत होते. आमदार आणि त्यांच्या बायकोला नव्या घराचा जेवढा आनंद झाला नसेल तेवढा गरूजींना झाला होता. 
आपलं घर मोकळं होण्याची वेळ जवळ आली आहे. असे त्यांना मनापासून वाटत होते व ही समजूत त्यांना जपायची होती. त्यांनी घरात आपल्या पत्नीकडे तसे बोलून दाखविले, माझं मन म्हणतंय की अल्लाहच्या कृपेने आज ना उद्या आमदारसाहेब आपलं घर सोडतील.’
दिवसा मागून दिवस निघून गेले. आमदारांच्या वास्तुशांतीच्या जेवणाची मतदारसंघात चर्चा झाली. आमदार नव्या घरात राहू लागले पण त्यांनी जूने घर सोडले नाही, त्यांची बैठक जुन्या घरात असायची. निवडणुकीची सर्व सूत्रे ते तेथूनच हलवीत होते. गुरूजी जाता-येता आदाब करायचे. त्यांना वाटायचे, आमदार साहेब आज ना उद्या आपल्याला बोलावतील. परंतु आमदार साहेब नमस्काराला उत्तर देऊन आपल्या कामात मग्न व्हायचे. त्यांच्या मागे लाख कामे होती.
एके दिवशी मनाचा हिय्या करून गुरूजी घरात गेले, बराच वेळ बसले, चहा आला. तेव्हा आमदार साहेब फक्त चहा घ्या गुरूजी’ एवढेच म्हणाले. बाकी काही नाही. गुरूजींनी चहा घेतला. थोडा वेळ थांबले. गुरूजी परत आले. आमदारांकडून परत येतांना त्यांच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आपण आमदारांना घर रिकामं करावं हे सांगण्यासाठी गेलो होतो. पण तोंड उघडू शकलो नाही. का? आपल्या मनावर कशाचा ताण आहे? आपण काही भीक मागत नाही. उपकार मागत नाही. आपलं स्वत:चं घर आपल्याला परत हवंय. हक्काचं मागतांनादेखील आपण का भीतो?  त्यांचे मन त्यांना खाऊ लागले. त्यांना स्वत:चीच लाज वाटू लागली. त्यामुळे आज आपण आमदार साहेबांकडे चहा पिऊन आलो, हे देखील त्यांनी घरी सांगितले नाही. त्यांनी आपल्या भित्रेपणाची सल मनात दाबून धरली.
तो शुक्रवारचा दिवस होता. गुरूजींनी स्वच्छ आणि नीट नेटके कपडे घातलेले होते. नमाजसाठी मस्जिदीकडे निघाले होते. बाजूच्या दुकानात आमदार साहेबांना बसलेले पाहून थबकले. नेहमी प्रमाणे आदाब केला, नमस्काराला तेवढ्यापुरते उत्तर देऊन आमदार बोलण्यात रमले. नमाजची वेळ झाली होती. गुरूजींना घाई होती. तरी ते थांबले. त्या दिवसाची सल बोचत होती. 
आज मात्र त्यांनी विषय काढलाच. ‘ईश्वराच्या कृपेने आपले घर बांधून झाले आहे. आपण तिकडे राहायलाही गेला आहात. आता आमचे जुने घर आपण रिकामे केले तर बडी मेहेरबानी होईल...’ गुरूजींनी आपल्या किती तरी विद्यार्थ्यांना आत्मसन्मानाचे धडे दिले असतील परंतु आज जेव्हा त्यांना आपल्या हक्काची जागा परत मागण्याची वेळ आली, तेव्हा त्यांची जीभ चाचरत होती. 
काही क्षणातच आमदाराच्या चेहऱ्यावरचे भाव कठोर झाले. ते म्हणाले, गुरूजी, आम्ही तुमचा आदर करतो. परंतु तुम्हाला सांगून ठेवतो, आपला नमस्कार चालू ठेवायचा असेल तर या पुढे घराचा विषय काढायचा नाही. मी घर सोडणार नाही..’ एका दमात आमदारांनी एक घाव दोन तुकडे करून टाकले. पुढे बोलायला काहीच शिल्लक ठेवले नाही. गुरूजी उठले. पुन्हा आदाब केला आणि नमाजला निघून गेले.
वाचा : हसरत मोहानी : संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे पहिले राष्ट्रवादी
वाचा : इस्लामी जाणिवांचा डावा अन्वयार्थ 
दुकानात झालेला हा संवाद ऐकणारे बरेच कान होते. ही वार्ता कानोकानी गावभर पसरली. गावात काय चाललंय याच्याशी गुरूजींना सोयर सूतक नव्हते. घरात जेव्हा त्यांनी हा वृत्तांत सांगितला तेव्हा त्यांच्या पत्नीचे डोळे डबडबले. आमदारांचे ते बोलणे आणि पत्नीच्या डोळ्यातील पाणी या दोन गोष्टींनी त्यांना रात्रभर झोप येऊ दिली नाही. ते या कुशीवरून त्या कुशीवर करीत राहिले. पहाटे फजरच्या नमाजनंतर पन्ना त्यांनी अल्लाहकडे धाव घेतली. एक दुबळा माणूस दुसरे काय करू शकतो!
आमदारांनी स्पष्ट शब्दात घर सोडणार नाही असे म्हटल्यावर गुरूजींचे अवसान संपले. एवढ्या मोठ्या माणसाशी टक्कर घेण्याची त्यांची औकात नव्हती. मध्यस्थी साठी चार माणसे पाठवून पाहिली परंतु कोणाचीच डाळ शिजली नाही. एका बाजला सत्ता आणि संपत्ती होती. त्याच्या सोबत धाक दडपशाही होती. गुंड-मवाली होते आणि होता बेदरकारपणा. 
दुसऱ्या बाजूला ऐंशी वर्षाचा एक अशक्त म्हातारा होता. निर्धन, शिक्षकी पेशात हयात घालवलेला. स्वभावाने सदवर्तनी. कोर्टकचेरी करण्याची हिंमत नाही. वाघाने पाडसाला जबड्यात पकडलेले पाहन हरिणीची जशी अवस्था होते तशी गुरूजींची झाली होती. त्यांना काही सुचत नव्हते, मनाची नुसती लाहीलाही! 
सगळे झोपले तरी गुरूजी जागेच राहायचे. एकटक लावून छताकडे पाहत पडून राहायचे. एका अशाच अस्वस्थ रात्री त्यांनी कागद आणि पेन हातात घेतला. दुबळ्या माणसाची ही आयुधे! त्यांनी आमदार साहेबांना पत्र लिहून काढले. आठ दहाच ओळी लिहिल्या. त्यात त्यांनी आपला आत्मा ओतला होता! 
घर सोडण्याची विनंती केली होती आणि अमुक तारखेला घर सोडले नाही तर उपोषणाला बसण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय राहणार नाही, असेही म्हटले होते. एवढं होऊनही गरूजींना एकही अपशब्द लिहिता आला नव्हता. उलट आमदार व त्यांच्या कुटुंबियांची भरभराट होवो, अशी दुआ दिली. पत्र लिहिल्यानंतर त्यांना हलके वाटले. त्यानंतर ते शांत झोपले.
सकाळी चहा घेऊन ते तडक आमदारांच्या घरी गेले. आमदार जुन्या घरी आलेले होते. बैठकीत वर्दळ सुरू झाली होती. हॉटेलवाला पोऱ्या चहाचे रिकामे ग्लास घेऊन बाहेर पडला अन् गुरूजी आत गेले. त्यांनी खिशात घडी करून आणलेले पत्र उघडून आमदारांच्या पुढे ठेवले. आमदारांनी त्याला हात न लावता पाहिले. पत्राचा चुरगळा करून फेकीत कडाडले. ‘तुमची ही मजाल! मला पत्र लिहून धमकी देता? जा तुम्हाला काय करायचे असेल ते करा.. पण लक्षात ठेवा. माझ्याशी गाठ आहे. 
गुरूजी हातातली छत्री सांभाळीत गुमान उभे राहिले. त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटला नाही. आमदारांचा रूद्रावतार पाहून सगळेच सुन्न झाले होते. गुरूजींसारख्या वयोवृद्ध माणसाचा असा अपमान व्हायला नको होता. अशी पाहणाऱ्यांची भावना झाली होती. फेकलल्या कागदाकडे गुरूजींनी पाहिले. त्या कागदाबदल त्यांना सहानुभूती वाटली.  त्यांनी तो उचलला. त्याला साफ करून घडी केली व न बोलता बाहेर पडले. 
बैठकीच्या उभे असलेले दोघे-तीघे जण गुरूजींच्या मागे धावले. त्यांनी ते पत्र पाहिले. या वाईट-साईट काही नाही.’ असा गुरूजींनी खुलासा केला व पत्र दाखविले. काहींनी त्या पत्राच्या झेरॉक्स प्रती करून घेतल्या. गुरूजी हातातली छत्री सांभाळीत घरी पोहचलेही नसतील तेवढ्यात त्या पत्राच्या प्रती गावभर वाटल्या गेल्या. गुरूजींचे पत्र पत्रकासारखे गावभर पसरले.
वाचा : ‘धार्मिक-सांस्कृतिक विविधता संपवण्याचा डाव’
वाचा : आपण सर्वच झुंडशाहीला बळी पडलोय!
आमदारांनी गुरूजींचे घर वळकावले आहे. त्याच्या विरुद्ध ते उपोषणाला बसणार आहेत, ह्या बातमीने गावात खळबळ उडवून दिली. गल्ली बोळातील म्हातारे कोतारे असोत किंवा हॉटेल टपरीवर बसलेले लोक, सगळ्यांच्या बोलण्यात हाच एक विषय होता. निवडणुका जवळ आल्या होत्या. 
आमदारांनी दौरे सुरू केले होते. ते जेधे जायचे तेथे त्यांना लोक हाच प्रश्न विचारू लागले. गुरूजींच्या पत्राची झेरॉक्स दाखवून ‘हे काय प्रकरण आहे? असे विचारायचे. आमदारांची छी-थू व्हायची, चाणाक्ष आमदाराला, हे प्रकरण महाग पडेल, हे लक्षात यायला उशीर लागला नाही. त्यांना निवडणूक जिंकायची होती. एक ही कच्चा दुवा ठेवून चालणार नव्हते. मुसलमानांची एकगठ्ठा मते पडतात हे त्यांना माहीत होते. गुरूजींच्या पत्राने ठिणगी पडली होती. ती पेट घेण्याआधी विझवून टाकली पाहिजे. त्यांनी तात्काळ एक योजना आखली.
आमदारांनी ही केस आपल्या विश्वासू सहकाऱ्यावर सोपविली. हे सहकारी राज घराण्यातले. गुरूजींचा त्यांच्यावर गाढा विश्वास, मागे नगराध्यक्षपदाला ते उभे राहिले होते. तेव्हा गुरूजींच्या संपूर्ण घराने त्यांनाच मतदान केले होते. लोक त्यांना राजासाहेब म्हणायचे. राजासाहेबांनी कधी कोणाचे वाईट केले नाही, अशी गुरूजींची ठाम खात्री होती. राजा साहेबांचा निरोप आला. गुरूजी खूष झाले. 
अल्लाहने आपली प्रार्थना ऐकली. अल्लाच्या दरबारात देर आहे पण अंधेर नाही. त्यांनी परत एकदा अल्लाचे आभार मानले. टोपी घातली. छत्री सांभाळीत ते राजासाहेबांच्या बंगल्यावर जाऊन पोहचले. राजासाहेबांनी त्यांचे उचित स्वागत केले. जवळ बसविले. चहा मागविला आणि इकडचे तिकडचे न बोलता त्यांनी त्यांच्या घराचा विषय काढला.
तुमच्या घराविषयी मी आमदार साहेबांशी बोललो आहे.’
काय महणाले ते? गुरूजी अधीर होते.
तुम्ही काढलेले पत्रक त्यांना आवडले नाही. पण त्यांची नियत खराब नाही. घर रिकामे करून द्यायला ते तयार आहेत.’अल्लाह तेरा लाख-लाख शुकर है.’ गुरूजींना कोण आनंद झाला!
त्यांनी घरात काही दुरूस्ती केली आहे. बांधकामाचा थोडा खर्च झालाय. तेवढा आपल्याला द्यावा लागेल.राजासाहेबांनी विषय पुढे नेला..
किती?
ते तुम्हीच ठरवा.’
ते म्हणतील तेवढ्याची व्यवस्था करतो.गुरूजींनी तयारी दर्शविली, आपले घर परत मिळावे यासाठी ते वाट्टेल ती किंमत द्यायला तयार होते.
राजासाहेब मुत्सद्दी होते. त्यांच्या पोटातले पाणी हलत नव्हते. ते म्हणाले, आमदार साहेब का घर सोडण्यासाठी तुमच्याकडून पैसे घेतील? तुमच्याबद्दल त्यांना फार आदर आहे. ते म्हणाले, ते सगळे पैसे निरनिराळ्या मस्जिदींना देऊन टाका.
आमदाराने एका दगडात दोन पक्ष्यांची शिकार केली. यांना घर सोडतो म्हणून शांत केले व निवडणुकीच्या तोंडावर मस्जिदींना आर्थिक मदत केली. ती ही परस्पर. गुरूजी भोळे. सरळसोट. त्यांना आचपेच कळत नव्हते. त्यांना वाटले की, आमदार फार मोठ्या मनाचा माणूस आहे. माणुसकी जपणारा आहे. आपलेच काही तरी चुकले असेल. आपल्याला माणसाची पारख करता येत नाही. हेच खरे.
राजासाहेब, तुम्ही आमच्या घरातील घटक असल्यासारखे आहात. तुम्हीच सांगा, किती पैसे लागतील?
द्या की पन्नास एक हजार, मी त्यांच्याशी बोलून घेईन.राजासाहेबांनी सुचविले. हा
पन्नास हजार?गुरूजींना आकडा जड होता. पण तक्रार केली नाही. आपले घर परत मिळण्याची ही चालून आलेली संधी आहे असे त्यांना वाटले.तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. ईश्चर तुमचे कल्याण करो.असा आशिर्वाद देऊन गुरूजी लगबगीने बाहेर पडले. पन्नास हजार रूपये कसे जमवायचे? हा प्रश्न त्यांच्या पुढे होता. त्याही पेक्षा मार्ग निघाल्याची खुषखबर घरी देण्यासाठी ते अधीर झाले होते.
पाहुण्या-रावळ्यांचे हात पाय धरून काही रक्कम जमा केली. बायकोचा एक दागिना विकला. उरलेली रक्कम व्याजी काढली. सगळा मेळ लागल्यावर ते स्वतः चार मस्जिदीत फिरले. देणगीच्या रक्कमा दिल्या. देतांना आवर्जून सांगितले की, आमदार भला माणूस आहे. त्यांच्याच सांगण्यावरून देत आहे. याचे पुण्य त्यांनाच लाभेल. मी मात्र निमित्त आहे....
वाचा : टिपू सुलतानची खरी भीती कुणाला?
वाचा : बुरखा बंदीविरोधात आंदोलन
रक्कम वाटून झाल्यानंतर त्यांनी मर्कजच्या मस्जिदीत नमाज अदा केली. अल्लाहच्या कृपेचा गुणगौरव केला. आमदाराच्या निवडणुकीतील विजयासाठी प्रार्थना केली. त्या नंतर ते सैन्यातील एखाद्या जवानाने मोहीम फत्ते केल्यानंतर आपल्या कमांडरपुढे जाऊन उभे रहावे तसे ते राजासाहेबाच्या बंगल्यासमोर जाऊन उभे राहिले. राजासाहेबांनी त्यांच्याकडे पाहिले. मासा पूर्णपणे गळाला लागला होता. 
राजासाहेबांनी केलेल्या मध्यस्थी मुळेच आपले घर मिळणार आहे या भावनेने ते दडपून जात होते. राजासाहेब म्हणाले, गुरूजी आता फक्त दोन दिवस थांबा. गावातील प्रतिष्ठित मुसलमानांच्या उपस्थितीत चावी देण्याचा कार्यक्रम करू. शाल श्रीफळ देऊन आमदार साहेबांना तुमचा सत्कार करायचा आहे. तसे त्यांनी मला सांगितलेय.. 
गुरूजींना आमदार आभाळा एवढा वाटला! धन्य धन्य झाल्यासारखे वाटले. तीस वर्षे राहिलेला एक भाडेकरू जातांना घर मालकाचा सत्कार करून, एक मिसाल कायम करणार, याचा त्यांना अभिमान वाटू लागला. मोठे लोकच असे वागू शकतात. सामान्य लोकांना हे जमणार नाही. मनाशी विचार करीत ते घरी आले.
प्रतिष्ठित मुसलमानांच्या बैठकीसाठी तारीख आणि वेळ ठरली, आमदार साहेबांच्या नव्या घरात कार्यक्रम ठरला. त्या दिवशी पावसाची रिपरिप होती. गरूजींनी रिक्षा भाड्याने केला. गल्लोगल्ली फिरून निरोप दिला. सकाळपासून त्यांची सारखी धावपळ सुरू होती. आज दुपारची औषधेही चुकली. त्यांना त्याचे भान नव्हते. ह्या वयात त्यांना कोठून बळ आले होते कोणास ठाऊक? 
आपले घर आज परत मिळणार या विचाराने ते पुलकित झाले होते. आयुष्याच्या सुरुवातीला दोघांनी मिळून केलेली कमाई आयुष्याच्या उत्तरकाळात आज परत मिळणार होती. मुलांनी तर आपले आयुष्य खुराडेवजा घरात काढले. पण जातांना नातवांना तरी बरे घर देता येईल हा विचार त्यांना प्रेरक ठरत होता. लोकांना गोळा करून ते आमदार साहेबांच्या नव्या घरी गेले.
बंगल्याच्या आत जाण्याचा हा पहिला योग. दारा समोर अनेक गाड्या उभ्या होत्या. फाटकाच्या आत सुंदर बगीचा. पायऱ्या चढून वर जायचे, तेथे मुख्य प्रवेशद्वार, समोर एक टेबल. तेथे येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद केली जाते. आतल्या दारातून प्रवेश केल्यानंतर मोठा हॉल. शे-दोनशे लोकांना बसता येईल एवढा मोठा. भव्य हॉलमधे उंची किमतीचा सोफा. हॉलमधून वर जाणाऱ्या पायऱ्या, सजावटीच्या अनेक वस्तू जागच्या जागी, लटकावलेल्या वाघाच्या कातडीवर गुरूजींचे लक्ष केंद्रित झाले. लगेच ते भानावर आले. 
एवढ्या भव्य घरात राहणारा माणूस. आपले ते बारा खणी घर, तीन खोल्या. रेल्वेच्या डव्या सारख्या. माळवद ही फक्त समोरच्या खोलीला. मागे पत्रे. संडासला जायचे तरी भिजत जावे लागायचे. तशा दरिद्री घराबद्दल आमदारांना मोह वाटण्याचे कारण नव्हते. त्यांची नजर आपल्या घरावर आहे. असा उगीच आपण समज करून घेतला होता. असे काही बाही विचार त्यांच्या मनात येत होते.
लोक जमले. दाटी बाटीने बसले. त्यात वितभर दाढी असणारे डझनभर होते. काही नगरसेवक आणि काही मोठे व्यापारी होते. राजासाहेब. समाजसेवक डॉक्टरसाहेबांशी कानगोष्टी करण्यात मश्गुल होते. त्यांच्या बाजूला गावातील एक कापड व्यापारी बसले होते. त्यांच्या कपाळावर भला मोठा टिळा होता. त्यांनी तोंडात पानाचा तोबरा भरलेला होता. त्यामुळे ते गप्प होते. येणाऱ्या लोकांना ते असे पहात होते जणू त्यांना कोणी तरी नजर ठेवायला सांगितले आहे. 
आमदारसाहेब जिना उतरून खाली आले. सगळे जण त्यांच्याकडे पाहत होते परंतु त्यांनी कोणा कडे पाहिले नाही. खाली उतरून ते राजासाहेबांच्या शेजारी जाऊन बसले. त्यांनी सगळ्यांना अभिवादन केले आणि काही लोकांना पुढे यायला खुणविले. राजासाहेबांशी काही तरी बोलले. सगळ्यांवर नजर टाकली. अंदाज घेतला. लगेच कार्यक्रम सुरू झाला.
नुकताच वकील झालेला मुस्तफा पुढे आला. तो आमदारांचा कार्यकर्ता होता. त्याने प्रास्ताविक भाषण केले. आमदार साहेबांचा गुणगौरव करतांना सांगितले की, आमदार साहेबांकडे काय नाही? देवाने त्यांना सगळे दिले आहे. संपत्ती बरोबरच त्यांना लाभलं आहे मोठं मन, कायद्याने भाडेकरूंना संरक्षण दिलं आहे. आजच्या जमान्यात कोण कोणाचे घर सोडतो? पण साहेबांनी गरूजींचे घर रिकामे केले. 
एवढेच नव्हे तर आज घर मालकाला येथे बोलावून त्यांचा सत्कार ठेवला आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी समाधानाचा आणि अभिमानाचा आहे. लोकांनी टाळ्या वाजविल्या. नंतर हार-तुऱ्याचा कार्यक्रम झाला.
आमदार साहेबांनी शाल श्रीफळ देऊन गुरूजींचा सत्कार केला अन् चक्क सर्वांसमोर गुरूजींच्या पायावर डोके ठेवले. अशा प्रसंगांना कसे सामार जावे याची अजिबात माहिती नसलेले गरूजी अवघडल्यासारखे नुसते उभे राहिले. मनातल्या मनात अल्लाह तेरा लाख-लाख शुकर हैअसे म्हणत राहिले. आमदार निर्ढावलेले होते. त्यांनी लगेच गुरूजींना आलिंगन दिले. गुरूजींना आपल्या डोळ्यातील अश्रू आवरता आले नाही. सगळे लोक भारावून गेले होते.
वाचा : प्रा. बेन्नूर : सहिष्णुतेचे महामेरू
वाचा : आम्ही भारतीय: कल्पनेचे बळी
आमदारांनी खिशातून चावी काढली. गुरूजींच्या हातात देणार एवढ्यात थांबले. न होते. ज्या क्षणाची गुरूजी तीस वर्षांपासून वाट पहात होते, तो क्षण टिपण्यासाठी अधीर होते. आमदार म्हणाले, तुमच्या घरात माझे काही सामान आहे. सध्या निवडणुका सुरू असल्यामुळे मला ते काढता येणार नाही. निवडणुका झाल्या की काढून घेईन.’
राहू द्या की. कितीही दिवस राहू द्या. आम्ही त्याला हात लावणार नाही.’ गुरूजी महणाले,
मी आज त्या घरात जाऊन नमाज अदा केली तर चालेल ना?
अहो गुरूजी, मला काय विचारता? घर तुमचेच आहे.’
आमदारांनी गुरूजींना घराची चावी दिली. गुरूजींनी चावीचे चुंबन घेतले. गुरूजी घरी आले. घरातील बायका मुलांसह ते लगेच त्या घरात गेले. डोळेभरून घर आतून पाहून घेतलं, कित्येक वर्षांनंतर आज ते आपल्या हक्काच्या घरात आले होते. आपले स्वप्न साकार झाले की आपण अजूनही स्वप्नातच आहोत, असा त्यांना संभ्रम पडत होता. सगळ्यांनी अल्लाहचे आभार मानणारी शुक्राना नमाज अदा केली. 
आमदारांचे बरेच सामान तेथे होते. पण त्यात महत्त्वाचे असे काही नव्हते. जुने बंद पडलेले पंखे, लोखंडी पलंग, भिंतीवर लावलेल्या तसबिरी, लाकडी आलमारी, स्वयंपाक घरातील भांडी उवण्याचे रैक, जुने पांघरूण, एक ताडपत्री, काही जुनी भांडी, लाकडी पेट्या इत्यादी. आवश्यक आणि महत्वाच्या वस्तूच तेवढ्या त्यांनी नव्या घरात नेल्या होत्या. सगळे भंगार इथे ठेवलेले.. गुरूजींनी कुलूप घातले आणि ते परत आले.
एक दिवशी आमदारांचा ड्रायव्हर गुरूजींकडे आला. तो आमदारांच्या खास विश्वासातला. काही कामाची कागदे हवीत म्हणून त्याने गुरूजीकडून चावी मागून नेली. तासाभरानंतर आणून दिली. दुसऱ्या दिवशी परत आला. काही तरी निमित्त सांगितले आणि दोन तासांनी चावी परत करून गेला. नंतर एके दिवशी दोघे-तिघे आले. ड्रायव्हरने पुढे होऊन चावी घेतली. गुरूजी सोबत यायला उठले तर त्याने काही तरी बहाणा करून गुरूजींना टाळले. ते दोघे-तीघेच आमदारांच्या घरात गेले. रात्री उशीरा परतले. दुसऱ्या दिवशी चावी दिली. त्या नंतर ड्रायव्हर आला नाही. कुणी चावी मागितली नाही. गुरूजींचा जाण्याचा प्रश्नच नव्हता.
आमदार साहेबांनी गुरूजींचे घर सन्मानपूर्वक परत केले, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याचा अनुकूल परिणाम झाला. मुसलमानांची बिधरणारी मते थांबली. बळकावलेल्या घराची चर्चा थांबली. वातावरण अनुकूल झाले. तरी आमदारांना गाफील राहायचे नव्हते. ते रात्रीचा दिवस करून फिरत होते. 
गुरूजीदेखील बाहेर पडले. आमदार साहेबांनाच मतदान करावे असे त्यांनी आपल्या सर्व नातेवाईकांना घरोघरी जाऊन सांगितले. आजुबाजूच्या गावांना जाऊन त्यांनी निरोप दिला. एरवी कधीच मतदानाला न जाणारे गुरूजी रांगेत उभे राहिले. मतदान केले. आणि आमदारांच्या विजयासाठी अल्लाहकडे प्रार्थनाही केली.
मतदान झाले. मतमोजणी झाली. आमदार प्रचंड मतांनी निवडून आले. सगळीकडे जल्लोष झाला.. आमदारांच्या नव्या घरासमोर आतषबाजी करण्यात आली. गुरूजीही आमदाराच्या घरापर्यंत जाऊन आले. आमदार साहेबांकडे बरीच गर्दी होती म्हणून न भेटताच परतले.
एके दिवशी सकाळीच आमदार गुरूजींच्या दारावर. सोबत तो विश्वास ड्रायव्हर. त्याचे ते दोन सहकारी
कुठाय तो मास्तरडा....आमदारांचा करारी आवाज कडाडला.
आमदार अनपेक्षितरित्या दारावर आलेले पाहून गुरूजींची धांदल उडाली. हुजूर आप.. अंदर आइये ना...अत्यंत विनम्रपणे गुरूजींनी त्यांना विनवणी केली.
कशाला येऊ चोराच्या घरात?आमदारांनी जणू चाबूक फटकारला.
हरमखोरा, चोरी करायला लाज नाही बाटत तुला? माझं सगळं घर धुवून काढलस. धोकेबाज, बेईमान....
आमदारांचा आरडा ओरड ऐकून अख्खी गल्ली गोळा झाली. घरातील बायका दाराच्या मागे आडोसा घेऊन उभ्या राहिल्या. आमदारांचा तोंडाचा पट्टा सुटला होता, ज्या गुरूजींना कोणी अरे-तुरे देखील म्हणत नव्हते. त्या गरूजींना आमदार हरामखार, बेईमान अशा शिव्यांची लाखोली वहात होते. गलीतील तमाम लोक ते मुकाट्याने एकत होते.
ड्रायव्हर आणि त्याचे दोन साथीदार आमदारांकडे मोठ्या आदराने पाहत होते. आमदार किती हुशार आहेत, आपणच सामान मागवून घेतले आणि आज बरोब्बर डाव टाकला. या विचाराने त्यांचा आमदारांबद्दलचा भक्तिभाव दुणावत होता. आमदारांनी  घराची चावी गुरूजींना दिली होती. त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला व घरातील सामान चोरले, असा आमदारांचा आरोप होता. अशा आरोपाबद्दल गुरूजी बिचारे काय खुलासा गुरुजींना आमदारांचे हे रूप पाहून घृणा वाटली! त्यांच्या तोंडातून शब्द ने काही बोलले नाही. त्यांना मेल्याहून मेल्या सारखे झाले.
आमदार तयारीने आले होते. ड्रायव्हरने खिशातून एक मोठे कुलूप काढून दिले. दारांनी गुरूजींना शिव्या घालीत घराला नवे कुलूप ठोकले. बरीच आरडा-ओरड केली. थेरडा माझ्याशी खेटत होता. मला निवडणुकीच्या काळात आडवा येत होता. चोर कुठला..असे म्हणून पुन्हा शिव्या घातल्या.
गुरूजींनी खाली घातलेली मान वर केली नाही. आतमधून ऐकणाऱ्या बायांनी डोळ्याला पदर लावला. गुरूजींना वाटले अल्लाह आपल्या संयमाची परीक्षा पाहत आहे. दुबळा माणूस. प्रतिकार करू शकत नव्हता. तेव्हा त्याला असेच काही समर्धन शोधणे भाग पडते. आपल्याच रक्ताचा घोट, आपल्यालाच गिळावा लागतो आहे असे गुरूजींना वाटले. ते भिंतीच्या आधाराने खाली बसले. आमदाराने लावलेले नवे कुलूप एक टक पाहत.
बरेच दिवस निघून गेले. आमदाराने गुरूजींना दिलेले घर परत घेतल्याची वार्ता पुन्हा संपूर्ण मतदारसंघात पसरली. पण आता आमदारांना भिती नव्हती. किमान पाच वर्ष तरी ते बिनधास्त होते. हळहळू लोकांचे विषय बदलत गेले. जुन्या घराच्या कवाडाला चलल्या कुलूपाकडे पहायचे गुरूजी टाळू लागले. नशीबाला दोष देण्यापलीकडे त्यांना पर्याय नव्हता. गुरूजींच्या बायकोने चुकूनही हा विषय पुन्हा काढला नाही.
आज जेव्हा नातवाने, त्या घरात चला असा आग्रह धरला, तेव्हा त्यांची जखम पुन्हा ओरडल्यासारखी झाली. आज त्यांच्या मनात काहीसा नवा विचार आला. आपण आपल्या मुला-नातवाला घर द्यायला निघालो. कदाचित ते त्यांना मिळेलही काळात आमदाराने आपला जो अपमान केला त्याची भरपाई कोण करणार! आपण भिऊन वागलो तर घरही मिळणार नाही आणि मुलांना आत्मसन्मानही मिळणार जर आणि भ्याड निघतील! 
आपल्या सारखेच, भ्याडपणाला चांगुलपणाचे आवरण घालून आयुष्यभर खोटं-खोटं जगतील. आज ना उद्या आपण मरणार. काय देऊन जाणार आहोत या मुला-नातवांना? घर देण्यापेक्षा, आत्मसम्मान देणे महत्त्वाचे आहे.! गुरुजींच्या मनात हा विचार येताच त्यांचे डोळे चमकू लागले.
ते उठले. थेट कुलूप लावलेल्या कवाडासमोर जावून उभे राहिले. कवाड जुने होते. त्यांनी भला मोठा दगड हातात घेतला. अल्लाहचे नाव घेवून त्यानी तो दगड कुलूपावर घातला. कवाड तुटून पडले. आत जायला वाट झाली. ते आत गेले. त्यांनी आमदारांचे सर्व सामान अंगणात आणले. पेटवून दिले. होणाऱ्या ज्वाला आणि निघणारा धूर पाहत एकटेच उभे राहिले.
ह्या प्रकाराची वर्दी देण्यासाठी ड्रायव्हर धावत आमदारांकडे गेला. गुरूजींनी कुलूप तोडले. आणि आत जाऊन तुमचे सर्व सामान जाळन टाकीत आहे.घाई घाईत त्याने सांगितले. आमदारांनी शांतपणे ऐकून घेतले. ते एवढेच म्हणाले, तू तुझे काम कर. मी पाहून घेतो.आमदारांच्या त्या उच्चारावरून हे स्पष्ट दिसत होते की, जो पर्यंत गुरूजींनी कुलूपाला हात लावला नव्हता, तो पर्यंत त्यांना आवाक्यात ठेवणे शक्य होते. त्यांनी आज कुलूप तोडले. आता त्यांना आवरणे शक्य नाही.... ! ! !

पुस्तकाचे नाव-नाते
लेखक- अमर हबीब
परिसर प्रकाशन, अंबाजोगाई
प्रथम आवृत्ती-२००३
पान-४७-६०

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: आमदाराच्या नियतीला लागले कुलूप
आमदाराच्या नियतीला लागले कुलूप
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjGQQSqFgyoect_ZjSiQoGpaaw-yFE1g5Qovpm0Ee2yBjOP2haNc9annec6tvG95lY8ixeXIL4gRjwJpupN0ZteXeSD_HQoGxBWiwyIyIUqSOGtR0zQQRIF2h7ruG_kdDrYZLaOGBc8bArA/s640/Lock+.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjGQQSqFgyoect_ZjSiQoGpaaw-yFE1g5Qovpm0Ee2yBjOP2haNc9annec6tvG95lY8ixeXIL4gRjwJpupN0ZteXeSD_HQoGxBWiwyIyIUqSOGtR0zQQRIF2h7ruG_kdDrYZLaOGBc8bArA/s72-c/Lock+.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/10/blog-post_4.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/10/blog-post_4.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content