इस्लाम : ज्ञात आणि अज्ञातांंचा शोध

स्लाम हा विषय असा आहे, ज्यावर सर्वांत जास्त विकृत आणि त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगलं लिहिलं गेलं आहे. इस्लामच्या स्थापनेपासून त्याविरोधात वाईट, असत्य, गैरलागू, एकांगी बोलण्या-लिहिण्याची प्रथा सुरू आहे. असं असलं तरी आजही सर्वांत जास्त चर्चिला, लिहिला, बोलला व संशोधन केला जाणारा विषय हाच आहे.
2001च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्लाम समजून घेण्याकडे अनेकांचा कल दिसून आला. पण त्यावेळी इस्लामवर सर्वसमावेशक दृष्टिकोन विकसित करणारी फारशी ग्रंथे उपलब्ध नव्हती. संबंधित विषयावर अस्तिवात असलेली बरेचशी पुस्तके धार्मिक संघटना, चळवळी आणि संस्थानी निर्माण केलेली होती. त्यात इस्लामच्या विकासाची अकादमिक मांडणी करण्याऐवजी गौरवीकरण, स्तृतिकरण व सौंदर्यकरणाचा भरणा अधिक होता. त्यामुळे इस्लामवर नव्याने लिहिण्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर जणू स्पर्धा लागली.
केवळ लेखनकला अवगत असलेल्या अनेकांनी इस्लामवर एक मागून एक पुस्तके लिहिली. त्यासाठी शास्त्रशुद्ध अभ्यास, संशोधन, संदर्भ साधने वापरली गेली असेल; याबद्दल सांशकता होती. अल्पावधीत इस्लामवर हजारोच्या संख्येने पुस्तके रचली गेली. 
मूळ साधनांना (कुरआन आणि हदीस) दुर्लक्षित करून दुय्यम संदर्भाचा आधार घेत या ग्रंथाची रचना करण्यात आली. त्यातून इस्लाम पर्यायाने मुसलमानांबद्दल अपसमज, विकृत मांडणी, धर्मश्रद्धांबद्दल अतिशोयक्तपणा, ठोकळेबाज गृहितके, परंपरावाद, मूलतत्त्ववाद, सनातनी दृष्टिकोन, एकांगी मते, पूर्वग्रहावर आधारलेली विधाने आदींचा भडिमार होता. जगभरात अशाच प्रकारची मांडणी सुरू होती. यात युरोपीय राष्ट्रे अग्रेसर होती. बरेचसे ग्रंथ ज्यू वंशीय व ख्रिश्चन लेखकांचीच होती व आहेत.
याच कालखंडात इस्लामवर दर्जेदार पुस्तकेही लिहिली गेली, त्यांची संख्या नगण्य होती. पण बहुसंख्येने लिहिल्या गेलेल्या एकांगी पुस्तकातून जगभरात भय व दहशत माजविण्यात आली. इस्लामला राक्षस म्हणून प्रचारित करण्यात आलं. त्याच्या तत्त्वज्ञानात्मक मांडणीकडे दुर्लक्ष व डोळेझाक करण्यात आली. परिणामी एकांगी व पूर्वग्रहावर आधारित पुस्तकांच्या रद्दीमुळे इस्लामफोबियामध्ये वृद्धी होत जगभरातील मुसलमान शत्रुस्थानी आला.
वाचा : इस्लामी जाणिवांचा डावा अन्वयार्थ 
इस्लामफोबियाची निर्मिती
गेल्या काही दशकांपासून इस्लामफोबियाचा प्रचार-प्रसार करून जगभरात मुस्लिम समुदायाला बदनाम करण्यात येत आहे. वर्ल्ड ट्रैड सेंटरच्या हल्ल्यानंतर या प्रक्रियेत गती आली. परिणामी अतिरेकी संघटना, जिहाद यापुरतीच इस्लामची चर्चा मर्यादित झाली. प्रसारमाध्यमांनी तर कहरच केला. जागतिक पातळीवरील बहुतेक मीडिया संस्था ख्रिस्ती व ज्यू वंशीयाच्या ताब्यात असल्याने त्यांनी आपल्याा जन्मजात प्रथेप्रमाणे इस्लामला मानव जातीचा शत्रू म्हणून प्रचारित केलं. 
इतकेच नाही तर इस्लामच्या नकारात्मक प्रचार-प्रसारातून बक्कळ पैसादेखील या संस्थांनी कमाविला. नकारात्मक प्रचार वाढीस लागल्याने इस्लामचा मानवतावादी दृष्टिकोन, विश्वशांतीचा विचार, समता, न्याय आणि बंधुता आदी मूल्ये पडद्याआड गेली. 
भारतातील प्रसारमाध्यमांनी तर अभ्यासक, लेखक, विचारवंत व प्रवक्त्यांची नवी जमात जन्मास घातली. त्यांनी यथोचितपणे इस्लामचे विकृतीकरण करताना भारतातील मुस्लिमांचे राक्षसीकरण केलं. त्यासाठी मध्ययुगीन इतिहासाच्या पुरवण्या जोडल्या गेल्या. 
भारतीय मुस्लिमांच्या जगण्या-बोलण्यावर निर्बंध आले. त्यांच्या घटनादत्त अधिकारांवर गदा आणली गेली. गेली दशकभर मुस्लिम समाज त्याचे भोग भोगत आहेत. भाजपशासित सत्ताकाळात इस्लाम तिहेरी तलाक, हलाला, समान नागरी कायदा इत्यादीपुरताच बंदिस्त झाला. परिणामी इस्लामच्या अभ्यासकांनी, धर्मपंडितांनी उत्तरादाखल भावनेच्या भरात अनेक चुका केल्या. त्यातून त्यांनी आपल्या धर्मावलंबीना अधिक धार्मिक व परंपरावादाकडे झुकवले. त्यांनी तबलीग चळवळीसह अन्य धार्मिक गटांच्या धर्म मजबुतीकरणाच्या संघटना अस्तित्वात आल्या. 
आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्लामवर आणली गेलेली गदा ही राजकीय कृती होती. पण त्याला उत्तर देताना मुस्लिमांनी धर्मावर संकट म्हणून त्याला घेतलं. जगभरात इस्लामवर सुरू झालेल्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी मुसलमानांना धर्माच्या आश्रयाला जाणे अधिक सुरक्षित वाटू लागले. धर्मसाधनेत त्यांनी स्वत:ला कैद केलं. अन्य बाबींवर डोळेझाक करून किंवा दुर्लक्षित करून त्यांनी वेळ मारून नेली. 
दुसरीकडे प्रतिगामी संघटनांनी मुसलमानांच्या या सुरक्षित धोरणांना धर्मांध (?) (धोकादायक) म्हणून धर्मवाद्यांमध्ये प्रचारित केलं. यातून केवळ त्यांनी इस्लामलाच बदनाम केलं नाही तर मुसलमानांनादेखील शत्रुपक्षी उभं केलं. प्रतिगामी विचारांचा भरणा असलेल्या प्रसारमाध्यमांनी इस्लामच्या नावाने भयाचे उद्योग उभे केले. दरम्यानच्या काळात अमेरिकापुरस्कृत दहशतवादाने थैमान घातले. अफगाण-इराकवरील अमेरिकेचा हल्ल्याने कथित दहशतवादी संघटनांना खतपाणी घातलं. मूठभर लोकांनी दहशतवादी कारवायातून  जगभरातील मुसलमानांना संशयाच्या भोवऱ्यात आणले.
ज्या दहशतवादाचा इस्लामचा काडीमात्र संबंध नाही, पण दुर्दैव असे की इस्लाम धर्माच्याच नावाने हे हल्ले केले जात होते. इस्लाम अशा दुहेरी अडचणीत सापडला होता. इस्लामच्या राक्षसीकरणामुळे त्याची कल्याणकारी धोरणे, मानवी अधिकारांचे लढे व मुक्तिदायी प्रेरणा बाजूला फेकल्या गेल्या. इस्लामसाठी हा अत्यंत क्लेषकारक व गुंतागुंतीचा काळ होता. गेली 2 दशके इस्लाम या संक्रमण अवस्थेतून जात आहे.

वाचा : इस्लामचा अवास्तव संदर्भ जिथेतिथे कशासाठी?

वाचा : मुस्लिम समाज पुन्हा ज्ञान-विज्ञानाची वाट धरू शकेल?

नवी मांडणी
गेल्या दशकभरापासून इस्लामच्या या एकांगी मांडणीला उत्तरे देणारी प्रसारमाध्यमे उदयास आलेली आहेत. केवळ ग्रंथच नाही तर वेबसाईट, टीव्ही, सोशल मीडिया, पत्रके, साहित्य, कार्यशाळा, परिसंवाद इत्यादीमधून उपरोक्त गृहितके व मिथकांवर आधारित एकांगी मांडणीला तर्कबुद्धीने युक्तिवाद केला जाऊ लागला. शत्रुकरणाला उत्तर देण्यासाठी नवीन मांडणी करणारे विचारवंत, अभ्यासक व भाष्यकार पुढे आले. त्यांनी उदारमतवादी (लिबरल) इस्लामला सामान्य लोकांमध्ये घेऊन जाण्याचं काम केलं.
आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलिव्हर रॉय, कॉरेन ऑर्मस्ट्राँग, जॉन इप्सोसिटी, महमूद ममदानी, वैलफर्ड स्मिथ, मार्क कर्टिस, डेव्हिज पेज, एल्बर्ट हुरानी तर भारतात बरकत अली, हमीद  इनायत, इम्तियाज अहमद, ताहिर महमूद, रोमिला थापर आदी. तर महाराष्ट्रात ए. जी नूराणी, रफिक झकेरिया, असगरअली इंजिनिअर, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर आदी विचारवंत, अभ्यासक व लेखक उदारमतवादी इस्लामची मांडणी करण्यात अग्रेसर होते. 
त्यात अजून एक नाव होते, ते म्हणजे अब्दुल कादर मुकादम यांचे. मुकादम गेल्या 50 वर्षांपासून इस्लामवर सातत्याने लिहित आहेत. नुकतेच त्यांचे इस्लामवरील इस्लाम-ज्ञातआणि अज्ञात' प्रकाशित झाले आहे. मराठी भाषकांसाठी मराठीत लिहिलेले हे पहिलेच पुस्तक असावे. यापूर्वी मुस्लिम लेखकाचे इस्लामवर लिहिलेले मराठीतले कुठलेच पुस्तक नव्हते. प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचे इस्लावरील एक लेखसंग्रह (मी संपादित केलेला) शब्दकडून प्रकाशित होत आहे. या उलट अनुवादित पुस्तकांची संख्यो हजारोंवर जाईल.
प्रास्ताविक दीर्घ स्वरूपात मांडण्याचे कारण म्हणजे सदरील पुस्तक कुठल्या पार्श्वभूमीवर आले आहे, याचा वाचकांना अंदाज यावा हा उद्देश आहे. मुकादम यांच्या या पुस्तकाला अल्पावधित चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. इस्लाम-ज्ञात आणि अज्ञात' मुंबईच्या अक्षर प्रकाशनने प्रकाशित केलेलं आहे. यापूर्वी अक्षरने असगरअलींचे इस्लामवरील आधुनिक भारताचा इस्लाम हे अनुवादित पुस्तक प्रकाशित केलेले आहे.

वाचा : इस्लामशिवाय जग कसे असते?

काय आहे पुस्तकात?
पुस्तकाच्या सुरुवातीलाच अरबस्तानातील इस्लामपूर्वकाळ म्हणजे जाहिलियाँ (अज्ञानयुग)मधील लोकसंस्कृती व समाजजिवनाचे सविस्तर विवेचन आलेलं आहे. वाळवंटी प्रदेशात अन्नासाठी वणवण भटकणे तिथल्या सामाजिक जीवनाचे स्वरूप होते. अरब टोळी स्वरूपात फिरत असल्यामुळे त्यांना स्थिर असे जीवन प्राप्त झाले नाही. पक्की घरे बांधून त्यात राहणे त्यांना अशक्य होते. त्यामुळे तंबू करून त्यात राहणे. विश्रांतीकाळ संपला की पुन्हा तंबू गुंडाळून पुढच्या प्रवासाला निघणे, हाच जीवन जगण्याचा त्यांच्या दृष्टीने सोयीस्कर मार्ग होता. निसर्गाने लादलेल्या या भटक्‍या जीवनशैलीमुळे तंबूत राहणारे लोक हीच त्यांची ओळखअस्मिता होती.  इस्लामपूर्व काळात अरबस्थानातील हे जनजाति समुदाय मूर्तिपूजक होते.
इसवीसन 610मध्ये रमजानच्या एका पवित्र रात्री मक्केजवळच्या हिरा नावाच्या गुहेत मुहंमद (स) पैगंबरांना ईश्वरी साक्षात्कार झाला. हा क्षण इस्लामचा जन्माचा व कुरआनच्या प्रकटीकरणाचा मानला होता. परंतु याआधी हजारो वर्षांपूर्वी हजरत आदम, हजरत मुसा, हजरत इब्राहिम यांच्या काळापासून इस्लामचा प्रसार-प्रचार सुरू होता. या पैगंबरांच्या (संदेशवाहक) प्रबोधनातून ज्यू आणि ख्रिश्चन धर्माचा उदय झाला. 
या धर्मांचे मूळ इस्लामच आहे. आजही इस्लामच्या उपशाखा म्हणून ओळखल्या जातात. सहाव्या शतकात अब्दुल्ला मुहंमद यांचा जन्म झाला. नंतर ते इस्लामचे पैगंबर म्हणून परिचित झाले. मुहंमद (स) हे अल्लाहचे शेवटचे प्रेषित होते. इस्लामच्या विस्ताराला पैगंबर मुहंमद (स) यांच्या कारकीर्दीत गती आली त्यामुळे इस्लामचा हा सुवर्णकाळ मानला जातो. 
पैगंबरांना जेव्हा साक्षात्कारी समाधी अवस्था प्राप्त होत, तेव्हा त्यांच्या मुखातून जनकल्याणासाठी संदेश, आदेश किंवा उपदेश प्रकट होत. या सर्व प्रक्रियेला वही म्हटलं जात. इस्लामसारख्या धर्माचा उदय ही जगभरातील क्रांतिकारी घटना होती. इस्लामने नैतिकता व मानवी मूल्यांचं आरोपण जगात प्रथमच केलं होतं. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही तत्त्वेदेखील इस्लामने प्रथमच आणली होती.
वास्तविक, इस्लामची दोन वैशिष्ट्ये होती. मूर्तिपूजेवर आधारित असलेल्या पारंपरिक धर्माचा अंत करून त्याजागी एकेश्वरी निराकार अल्लाहची आराधना करण्याची दीक्षा देणे, तर अनेक टोळ्यामध्ये विखुरलेल्या आणि प्रत्येक टोळीची स्वतंत्र अस्मिता व स्वातंत्र्य नष्ट करून समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारित नवसमाजाची उभारणी करणे. 
वाचा : बुरखा बंदीविरोधात आंदोलन
दांभिकासाठी नवं आव्हान
या प्रक्रियेमुळे सहाजिकच मक्केतील श्रीमंत गर्भश्रीमंत व्यापाऱ्यांच्या परंपरागत आर्थिक हितसंबंधांना आव्हान उभे राहिले. मक्केतील व्यापाऱ्यांचा इस्लामला विरोध नव्हता. तर आपली व्यवस्था व हितसंबंधाला धोका निर्माण होत आहे त्यामुळे बदलाला व परिवर्तनाला त्यांचा कठोर विरोध होता.
कालांतराने पैगंबरांनी अरबस्थानात आध्यात्मिक आणि सामाजिक क्रांती घडवून आणली. प्रेषितांनी एकेश्वरत्वाची दीक्षा देऊन तिथल्या स्थानिकांना मानवतावादी धर्मात सामावून घेतले. गुलाम, कष्टकरी, शेतमजूर, गरीब, निराश्रितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. विविध टोळ्यात विखुरलेल्या विविध जनजातीत समता व न्याय या मुल्यांवर आधारित एकसंध समाज निर्माण केला. त्याचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी आदर्श अचारसंहिता (शरीयत) निर्माण केली. 
संबंधित पुस्तकातून मुकादम यांनी इस्लामची पार्श्वभूमी, मुहंमद (स) पैगंबर यांचा जन्म, हिजरत, इस्लामी न्याय​​शास्त्र, त्याकाळची आदर्श राजकीय व्यवस्थेची प्रस्थापना असे विविध विषय मराठी भाषकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. या व्यतिरिक्त इस्लाममधील नेहमी चर्चेत असणाऱ्या कथित वादग्रस्त घटकांचा उहापोहदेखील त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. तसेच शरीयत, बुरखा पद्धती, तलाक, महिलांचे स्थान, कुटुंब नियोजन, इस्लामिक बँकिंग, युद्ध परंपरा आणि जिहाद आदी घटकांचा समावेश यात आहे. 
संबंधित पुस्तकातील इस्लामचा अर्थ विचार या प्रकरणात इस्लामच्या उदयानंतर आदर्श राजकीय व्यवस्थेच्या प्रस्थापनेशी संबंधित सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच इस्लामिक बँकिंगची तर्कसंगत मांडणीदेखील या प्रकरणातली वाचनीय असा भाग आहे. वाचकांनी हे प्रकरण प्रामुख्याने वाचायला हवे. 
संबंधित पुस्तकात मुकादम यांनी इस्लामच्या चार नीतीसूत्रांची सविस्तर चर्चा केलेली आहे. इतकेच नव्हे तर त्याचे तर्कसंगत निष्कर्षही त्यांनी आपल्या लेखनातून काढले आहेत. न्याय शास्त्राच्या विकासात मानवी बुद्धीला असलेले स्थान त्यांनी आपल्या अभ्यासातून अधोरेखित केले आहे. 
इस्लामविषयीची भारतीय मिथकांची चर्चादेखील सदरील पुस्तकात मुकादम यांनी केलेली आहे. लेखकाने नुसते इस्लामचे गौरवीकरण केले नाही तर इस्लामची तर्कसंगत मांडणी व तत्त्वज्ञानाची सविस्तर मीमांसा केली आहे. मराठीमध्ये इस्लामी तत्त्वज्ञानाची चर्चा फारशी कोणी केलेली आढळत नाही. पण सदरील लेखकाने संबंधित पुस्तकात समता, स्वातंत्र्य, बंधुता व मानवी मूल्यांवर आधारित नव समाज निर्मितीच्या पायाभरणीची चर्चा करताना निसर्गाचे मानवाशी असलेले नाते, नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग, धनसंचय, न्यायशास्त्र इत्यादी संदर्भात इस्लामिक तत्त्वज्ञानाची चर्चा लेखकाने केलेली आहे. 
पाश्चात्त्य विचारवंतांनी इस्लामची मांडणी करताना केलेल्या चुकादेखील लेखकाने दाखवून दिलेल्या आहेत. शिवाय अनेक पाश्चात्य विचारवंतांनी इस्लामबद्दल मत व्यक्त केलेली मते व इस्लामच्या गौरवाची परंपरा उल्लेखित केलेली आहे.
युद्ध आणि जिहाद संदर्भात अनेक लेखकांनी धर्मवादी व पूर्वग्रहदूषित मांडणी केलेली आहे, हे करताना त्यांनी इतर धर्म समुदायांमध्ये झाली धर्मयुद्धे यांना सपेशल दुर्लक्षित केली आहेत. ख्रिश्चन, ज्यू धर्मांमध्ये झालेल्या धर्मयुद्धाने (क्रुसेड) लाखो निष्पाप माणसे मारली गेली. 
शिवाय हिंदूधर्म पद्धतीत झालेल्या धर्मयुद्धामुळेदेखील अशाच प्रकारची निष्पाप लोक मारली गेली आहे; या संदर्भातले विवेचन, विश्लेषण तत्कालीन परिस्थितीची कारणमीमांसा मराठी लेखकांनी कुठेही केलेली आढळत नाही. पण इस्लामचा युद्धाशी व दहशतवादाची संबंध जोडून त्याला बदनाम करण्याचे कारस्थान याच लेखक मंडळींना केले आहे, याची अनेक उदाहरणे अब्दुल कादर मुकादम यांनी संबंधित पुस्तकात दिलेली आहेत.
###
लेखक- अब्दुल कादर मुकादम, मुंबई
किंमत- 300
पाने- 215
प्रकाशक- अक्षर प्रकाशन, मुंबई
संपर्क- ९३२२३९१७२०

कलीम अजीम, पुणे
Twitter@kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: इस्लाम : ज्ञात आणि अज्ञातांंचा शोध
इस्लाम : ज्ञात आणि अज्ञातांंचा शोध
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEguoEgZpO-DQTWoilrj7G4Mex0G_RtSmRE_qBWUXymVF1fY3zTOw-OUROlAMAGq42jsLeTkhwpd4Q6JRBqv759X1Cx48toaPizUdYwp9KpiupohVdRJg4dkLAg1ADqimhwSkpvX94T6HHuA/s640/Mukadam.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEguoEgZpO-DQTWoilrj7G4Mex0G_RtSmRE_qBWUXymVF1fY3zTOw-OUROlAMAGq42jsLeTkhwpd4Q6JRBqv759X1Cx48toaPizUdYwp9KpiupohVdRJg4dkLAg1ADqimhwSkpvX94T6HHuA/s72-c/Mukadam.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/07/blog-post_28.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/07/blog-post_28.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content