मुहर्रम आहे तरी काय?

मुस्लिमेतर बांधवांना मुहर्रमबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. नक्की आहे तरी काय मुहर्रम? यामागची पार्श्वभूमी काय? या महिन्यात मुस्लिम बांधव जे काही करतात ते योग्य की अयोग्य? मुहर्रमच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा द्यायच्या का?  हे आणि असे बरेच प्रश्न मुस्लिमेतर बांधवांच्या मनात असतात. या तर माहिती घेऊ यात या मुहर्रमची ज्याचा संबंध आहे. अंदाजे २५००-३००० वर्षापूर्वी होऊन गेलेल्या पैगंबर मुसा (अल) (मोजेस) यांच्या संघर्ष आणि अल्लाहप्रती कृतज्ञतेशी.

अंतिम ईश्वरीय ग्रंथ दिव्य कुरआन आणि हदीस इस्लामचा मूळ आधार :-

इस्लामची व्यवस्था दोन आधारांवर उभी आहे. पहिला आहे अंतिम ईशग्रंथ दिव्य कुरआन तर दुसरा आधार आहे हदीस. कुरआन अपौरुषेय अर्थात अल्लाहतर्फे अखिल मानवजातीला मिळालेला शेवटचा मार्गदर्शनपर ग्रंथ आहे. तर त्या मार्गदर्शनाचे प्रेषित मुहंमद सल्लल्लाहु अलैही व सल्लम यांनी केलेले विवेचन, प्रेषितांच्या जीवनातील काही प्रसंग, तसेच प्रेषितांचे धर्मासंदर्भात असलेले उपदेश म्हणजे हदीस. इस्लामचा अभ्यास करताना या दोन्ही आधारांना समोर ठेवूनच इस्लाम समजून घ्यावा लागतो. या दोन आधारांवर जी काही व्यवस्था उभी आहे; ती म्हणेज इस्लाम. मुस्लिमांच्या कोणत्याही कृतीला या दोन्ही स्त्रोतांचा संदर्भ नसेल तर त्या गोष्टीचा इस्लामशी काहीच संबंध नाही असे गृहीत धरले जाते.
वाचा : रमज़ान ईद आणि आईची लगबग
वाचा : रमजान : आधात्म, श्रद्धा आणि खाद्य पदार्थाची रेलचेल
इस्लामी कॅलेंडर वर्ष
मानवजातीला दिनदर्शिका, कॅलेंडर उपलब्ध करून द्यावे हा इस्लामचा उद्देश अजिबात नाही. परंतु ज्या काळात  ईश्वरीय संदेश दिले जात असतात, त्या काळात जर एखादा प्रश्न मानवी जीवनाला प्रभावित करून टाकीत असेल तर धर्म त्याबद्दल भाष्य जरूर करतो. प्रेषितांच्या काळी वर्षाचे निर्धारण टोळीप्रमुखांच्या सोयीनुसार केले जायचे. ते वर्षाला हवे तसे फिरवायचे. एखाद्या वेळेस वर्ष १३ महिन्यांचा करायचे तर कधी वर्षाला ११ महिन्यांचा मानायचे. वर्षातील महिन्यांच्या संदर्भात कुरआन फर्मावितो:
आकाश आणि पृथ्वीची निर्मिती केल्यापासून अल्लाहच्या लेखी महिने बाराच आहेत, त्यापैकी चार निषिद्ध आहेत.
(दिव्य कुरआन ९:३६)
कुरआनने या प्रसंगी बजावून सांगितले की वर्षाचे महिने बाराच आहेत. या संख्येत कधीच बदल होऊ शकत नाही. यामुळे कॅलेंडरला स्थिरता प्राप्त झाली. इस्लामने या १२ महिन्यांपैकी ४ महिने विविध कारणांनी निषिद्ध ठरविले. निषिद्ध या अर्थाने की या महिन्यात युद्धबंदी लागू करण्यात आली. अरबमधील टोळी जीवनपद्धतीला युद्ध हे रोजचेच असायचे यामुळे टोळ्यांचा विकास होणे शक्यच नव्हते. तेव्हा विविध ऐतिहासिक कारणांनी वर्षातील ४ महिने निषिद्ध करण्यात आले. जेणेकरून निदान चार महिने तरी या टोळ्यांना शांतीचे आणि आनंदाचे जीवन जगता यावे.
या ४ महिन्यांचे निर्धारण प्रेषित मुहंमद (स) यांनी केले नव्हते. तर ते महिने सृष्टीच्या निर्मात्या अल्लाहने निर्धारित केलेले होते. जिलकदाआणि जिलहज्जपैगंबर इब्राहीम अलैहिस्सलाम यांच्या काळात हज यात्रेचे महिने म्हणून निर्धारित केले गेले. तर मुहर्रमहा महिना प्रेषित मुसा (मोजेस) यांच्या काळात निषिद्ध गेला गेला. अशाच प्रकारे रजबहा महिनादेखील निषिद्ध करण्यात आला. म्हणजेच या चार महिन्यांचे निर्धारण प्रेषित मुहंमद (स) यांच्या फार पूर्वीच करण्यात आले होते. म्हणून या चार महिन्यांच्या निषिद्ध असण्याचा प्रेषित मुहंमद (स) यांच्या काळाशी देखील काहीही संबंध नाही.
इस्लामी वर्षाचा पहिला महिना असणाऱ्या मुहर्रमच्या १० तारेखेला आशुरा म्हणतात. प्रेषित मुहंमद (स) यांनी मक्केहून मदिनेला हिजरत (स्थलांतर) केले असता तेथे त्यांना यहुदी समुदायाच्या लोकांशी जवळीक साधण्याची संधी मिळाली. यहुदी हे प्रेषित मुसा (मोजेस) यांचे अनुयायी म्हणजे पूर्वाश्रमीचे मुस्लिम. प्रेषित मुहंमद (स) यांच्या सहकाऱ्यांनी पाहिले की यहुदी लोक १० मुहर्रमला रोजा ठेवतात. तेव्हा त्यांना प्रश्न पडला की हा रोजा कशामुळे ठेवतात? हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे रमजानचे अनिवार्य रोजे, सोमवार आणि गुरुवारी प्रोत्साहित रोजे आणि मुहर्रमचे अतिरिक्त रोजे प्रेषित मुहंमद (स) आणि त्यांचे सोबती नेहमी ठेवत असत. (प्रेषित हदीस संग्रह)
सहाबांनी (प्रेषितांचे सहकारी) मुहर्रमच्या १० तारखेच्या विशेष रोज्याचे औचित्य काय याची यहुदींकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, या दिवशी अल्लाहने आम्हाला फिरऔनच्या अन्याय आणि अत्याचारावर उभ्या जुलुमी राजवटीतुन मुक्त केले होते. म्हणून आम्ही अल्लाहप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा रोजा ठेवतो. तेव्हा प्रेषित मुहंमद (स) यांनी आपल्या सोबत्यांना आदेश दिला की अल्लाहच्या कृतज्ञतेसाठी तुम्हीही या दिवशी रोजा ठेवा, कारण आम्ही यहुदींपेक्षा प्रेषित मुसा अलैहिस्सलाम यांच्या (मूळ शिकवणींचे आचरणकर्ते या दृष्टीने) अधिक जवळ आहोत. (प्रेषित हदीस संग्रह)
काय आहे फिरऔनची घटना?
मिस्र (इजिप्त)मध्ये राजाला फिरऔन म्हटले जायचे. प्रेषित मुसा अलैहिस्सलाम यांच्या काळात एक जुलुमी राजा होता, जो बनी इस्राईल या लोकसमुदायावर अत्याचार करायचा. त्यांच्या मुलांना ठार करायचा आणि मुलींना मात्र जिवंत ठेवायचा.
"आम्ही मूसा अलैहिस्सलाम आणि फिरऔनचा काही वृत्तांत खरा खरा तुम्हाला ऐकवितो. अशा लोकांच्या लाभासाठी जे ईमान धारण करतील. हकीकत अशी आहे की फिरऔनने भूतलावर दुर्वर्तन केले आणि तिच्या निवासींयांना गटागटांत विभागले. त्यांच्यापैकी एका गटाला तो अपमानित करीत असे, त्यांच्या मुलांना ठार करीत असे व त्यांच्या मुलींना जिवंत ठेवीत असे. खरोखरच तो हिंसाचारी लोकांपैकी होता. आणि आम्ही असा इरादा बाळगत होतो की मेहेरबानी करावी त्या लोकांवर, ज्यांना भूतलावर दुर्बल बनवून ठेवले गेले होते आणि त्यांना नेते बनवावे आणि त्यांनाच वारस बनवावे." (दिव्य कुरआन २८:३-५)
कुरआन आणि प्रेषित मुसा अलैहिस्सलाम नंतर तर प्रेषित मुहंमद (स) यांच्या जवळपास ६०० वर्षे आधी प्रेषित ईसा अलैहिस्सलाम यांच्यावर अवतरीत ग्रंथ इंजिल (बायबल)मध्येदेखील हा वृत्तांत नमूद आहे. संदर्भ : Exodus ८:१-३२, ४:२१, ९:३५, ९:७, ८:१५, ७:८-१३, Deuteronomy १३:३, Luke १:१५१, Genesis १७:१-२२, १२:१,२९:३, १०:१-३२, ४१:१, १:५७, Act १३:४६, Matthew १३:१५, Daniel २:१-४९, Isaiah १०:२३. 

जुलुमी राजवट संपविण्यासाठी आणि तुला ही शेवटची संधी आहे, अशी चेतावणी देण्याच्या उद्देशाने प्रेषित मुसा अलैहिस्सलाम यांना फिरऔन आणि त्यांच्या दरबारींकडे पाठविण्यात आले.
"आपला हात छातीजवळ ने, चकाकत निघेल कोणत्याही अडचणीशिवाय आणि भीतीपासून वाचण्यासाठी आपले बाहू आवळून घे दोन उज्ज्वल संकेत आहेत तुझ्या पालनकर्त्याकडून फिरऔन आणि त्याच्या दरबारी लोकांच्यासमोर प्रस्तुत करण्यासाठी. ते मोठे अवज्ञाकारी लोक आहेत." (कुरआन २८:३२)
फिरऔनने प्रेषित मुसा अलैहिस्सलाम यांच्या चेतावणीला धुडकावून लावले. त्यानंतर अल्लाहच्या आज्ञेने प्रेषित मुसा अलैहिस्सलाम फिरऔनच्या अन्याय व अत्याचाराचे बळी ठरत असलेल्या बनी इस्राईलच्या समुदायाला घेऊन राज्याबाहेर निघाले. फिरऔन आणि त्याच्या लष्कराने त्यांचा पाठलाग केला. समुद्रकाठी दोघांचा आमना सामना झाल्याचा,  मुसा अलैहिस्सलाम आणि त्यांच्या अनुयायांना अल्लाहची मदत प्राप्त झाल्याचा आणि अल्लाहने फिरऔन आणि त्याच्या लष्कराला समुद्रात बुडविल्याचा वृत्तांत कुरआनने नमूद करताना म्हटले :-
"सकाळ होताच हे लोक त्यांच्या पाठलागासाठी निघाले, जेव्हा दोन्ही जमातीचा आमना सामना झाला तेव्हा मूसा अलैहिस्सलामचे सोबती ओरडले,  ’’आम्ही तर धरले गेलो.’’ मूसा अलैहिस्सलामने सांगितले, ’’कदापि नाही, माझ्याबरोबर माझा पालनकर्ता आहे. तो निश्चितच मला मार्गदर्शन करील.’’ आम्ही मूसा अलैहिस्सलामला दिव्य बोधाद्वारे आज्ञा दिली,  ’’मार आपली काठी समुद्रावर.’’ अकस्मात समुद्र दुभंगला आणि त्याचा प्रत्येक भाग एक भव्य पर्वताप्रमाणे झाला. त्याच जागी आम्ही दुसर्‍या जमातीलादेखील जवळ घेऊन आलो. मूसा अलैहिस्सलाम आणि त्या सर्व लोकांना जे बरोबर होते, आम्ही वाचविले, आणि दुसर्‍यांना बुडविले. या घटनेत एक संकेत आहे परंतु या लोकांपैकी बहुतेकजण मानणारे नाहीत. (कुरआन २६:६२-६७)
प्रेषित मुहंमद (स) सल्लल्लाहु अलैहि व सल्लम यांच्या कित्येक वर्षे आधी १० मुहर्रम या दिवशी घडलेला हाच तो प्रसंग आहे ज्यामुळे अल्लाहच्या या उपकाराचे आभार प्रकट करण्यासाठी प्रेषित मुसा अलैहिस्सलाम यांनी रोजा ठेवला होता. प्रेषित मुसा अलैहिस्सलाम यांच्या याच गोष्टीची आठवण म्हणून प्रेषित मुहंमद (स) यांनी स्वतः रोजा ठेवला व मुस्लिमांनादेखील ठेवण्याची आज्ञा दिली. ज्याची पुनरावृत्ती आजही १० मुहर्रम दिवशी रोजा ठेऊन मुस्लिम बांधव करीत असतात.
वाचा : इस्लामी जाणिवांचा डावा अन्वयार्थ
वाचा : आधुनिक मदरसे... एक नवी पहाट!
ऐतिहासिक सत्याविषयी विज्ञानाची साक्ष
२१व्या शतकाच्या या वैज्ञानिक युगात लोक विज्ञानाच्या साक्षीशिवाय कोणत्याही घटनेवर विश्वास बाळगणार नाहीत. हे माहीत नसेल तर मग तो ईश्वर कसा. हेच कारण आहे की तमाम सृष्टीचा निर्माता आणि मानवाची घाणेरड्या व तुच्छ पाण्यापासून निर्मिती केली. अल्लाहने मानवजातीसाठी प्रलयापूर्वीचे कुरआनमध्ये अंतिम मार्गदर्शन ६ हजारपेक्षा जास्त आयतींपैकी १ हजार पेक्षा जास्त त्या आयती अवतरीत केल्या आहेत. ज्या निव्वळ आधुनिक विज्ञानावर आधारित आहेत.
हे एक ऐतिहासिक तथ्य आहे की, प्रेषित मुहंमद (स) यांच्या कित्येकशे वर्ष आधी प्रेषित मुसा अलैहिस्सलाम आणि फिरऔनबाबत घडलेल्या या सत्य घचनेचा उल्लेख ईश्वरीय ग्रंथ इंजिल (ज्याला आज आपण बायबल म्हणतो) मध्ये आलेला आहे. ही घटना ईश्वराच्या उपकाराची जाणीव विसरलेल्या बनी इस्राईलच्या लोकसमुदायाला ऐकविली होती. आजही त्यात नमूद आहे, की आम्ही फिरऔनला समुद्रात बुडविले आणि तुम्हाला त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले. मात्र कुरआनने प्रेषित ईसा (येशू) अलैहिस्सलाम यांच्या जवळपास ६०० वर्षानंतर हा वृत्तांत ऐकविण्याबरोबरच ही भविष्यवाणीदेखील केली की आम्ही लोकांसाठी संकेतचिन्ह म्हणून फिरऔनच्या शरीराला सुरक्षित ठेऊ, नष्ट होऊ देणार नाही. जेणेकरून लोकांनी प्रेषित मुहंमद (स) आणि कुरआनवर ईमान बाळगावे.
"आणि आम्ही बनी इस्राईलना समुद्रपार नेले. मग फिरऔन व त्याचे सैन्य जुलूम व अत्याचाराच्या हेतूने त्यांच्या मागे निघाले येथपावेतो की जेव्हा फिरऔन बुडू लागला तेव्हा उद्गारला, ’’मी मान्य केले की खरा ईश्वर त्याच्याशिवाय कोणीही नाही ज्यावर बनीइस्राईलनी श्रद्धा ठेवली आणि मी देखील आज्ञाधारकांपैकीच आहे.’’ (उत्तर दिले गेले) ’’आता श्रद्धा ठेवतोस? एरव्ही या आगोदरपर्यंत तर अवज्ञा करीत राहिलास आणि उपद्रव माजविणार्‍यांपैकी होतास. आता तर आम्ही तुझ्या केवळ प्रेतासच वाचवू जेणेकरून तू नंतरच्या पिढ्यांकरिता उद्बोध-चिन्ह ठरावे. जरी बरीचशी माणसे अशी आहेत जे आमच्या संकेताकडे दुर्लक्ष करीत आहेत." (कुरआन १०:९०-९२)
या ऐतिहासिक घटनेच्या दिव्य कुरआनने भविष्यवाणी केलेली होती. पण त्यानंतर तब्बल १३०० वर्षानंतर १८९८मध्ये जीवविशेषज्ञ डॉ. मॉरिस बुकेल यांनी दुजोरा दिला. इजिप्तमधील लाल सागराच्या (Red Sea) किनाऱ्यावर सापडलेल्या हे मानवी शरीर सापडल्याचे ठिकाण (Location) निदिरेशित केले. त्यांनी चिकित्सेनंतर हे सिद्ध केले की  तब्बल ३००० वर्ष पाण्यात राहूनदेखील आश्चर्यकारकरित्या हे मृत शरीर सहीसलामत राहिले. ज्याबद्दल मुस्लिम परिक्षणाआधीच दावा करीत होते ते ज्याच्याबद्दल कुरआनमध्ये ईश्वरीय घोषणा केली गेली होती की "आम्ही त्याच्या शरीराला सहीसलामत ठेऊ" त्या जुलुमी राजा फिरऔनचेच आहे. ज्याचा मृत्यू समुद्रात बुडाल्याने झाला होता. यानंतर डॉ. मॉरिस बुकेल यांनी दिव्य कुरआनचे अधिक अध्ययन करून त्यामधील अनेक वैज्ञानिक तथ्यांवर प्रकाश टाकणारे "बायबल कुरआन आणि विज्ञान" हे पुस्तक लिहिले आणि इस्लामदेखील स्वीकारला.
मुहर्रम आणि हुसैन यांची शहादत
प्रेषित मुहंमद (स) यांचे नातू हजरत हुसैन (ज्यांच्या विषयी महात्मा गांधी यांनी त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना म्हटले की, इस्लामचा प्रसार तलवारीच्या जोरावर नव्हे तर हुसैनच्या बलिदानावर आधारलेला आहे.) यांना इराकमध्ये असणाऱ्या करबला या ठिकाणी शहीद केले गेले. ही दु:खद आणि हृदयद्रावक घटना मुहर्रम महिन्याच्या १० तारखेला घडली. असे असले तरी मुहर्रमच्या निषिद्ध असण्याचा करबलाच्या घटनेशी काहीच संबंध नाही.
इस्लाम व्यक्तीनिष्ठ नव्हे तर तत्वनिष्ठ धर्म आहे. जेथे व्यक्तींना नव्हे तर तत्वांना केंद्रीय स्थान प्राप्त आहे.  एकेश्वरत्व हा पाया असल्याने इस्लाम आपल्या अनुयायींची जी मानसिकता बनवितो. त्यामध्ये व्यक्तीनिष्ठेला, व्यक्तिपूजेला कसलेही स्थान देत नाही. व्यक्ती कितीही मोठी असो, थोर असो इस्लाम त्याची जन्मतिथी अथवा पुण्यतिथी साजरी करण्याची परवानगी देत नाही. व्यक्तीच्या कर्तत्वाचा उल्लेख केला जातो, कार्याचा गौरवही केला जातो, त्याच्यासाठी प्रार्थना केली जाते. मात्र व्यक्तिपूजेला आणि कोणत्याही घटनेचे अंधानुकरण करण्याला येथे कसलाच वाव नाही.
इतिहास साक्षी आहे की लोकांनी महान आणि थोर व्यक्तींच्या शिकवणींवर आचरण करण्याऐवजी त्यांचा आदर व गौरव करण्याच्या नावाखाली त्यांना ईश्वराचा दर्जा दिला, त्यांच्याविषयी चमत्कार गढले व त्यांना ईश्वरीय गुणांमध्ये सामील करून टाकले. त्यांच्या मुर्त्या बनविल्या, प्रार्थना स्थळे बनविली आणि निराकार ईश्वराऐवजी त्यांचीच पूजा अर्चना सुरू केली. याचाच परिणाम आहे की एक एव नमस्य: म्हणजे एका ईश्वराशिवाय कोणीही नतमस्तक होण्यास पात्र नाही. हा एकेश्वरत्वाचा मूळ सिद्धान्त प्रत्येक धर्माचा पाया असतानाही आज त्याची जागा अनेकेश्वरवादाने घेतली आहे.
प्रेषित मुहंमद (स) म्हणायचे अल्लाहखेरीज अन्य कोणासमोरही नतमस्तक होऊ नका, अगदी मलादेखील. हेच कारण आहे की १४४० वर्षानंतरही इस्लाममध्ये व्यक्तिपूजा, मूर्तिपूजा कोणत्याच स्वरुपात दाखल होऊ शकली नाही, मुहंमद (स) पैगंबरांचा अथवा त्यांच्या सहकाऱ्याचा (सहाबा), अन्य मोठ्या थोर लोकांचा फोटो, ना मूर्ती, ना मस्जिदीत ना चौकात, ना घरात. मुस्लिम हे थोर व्यक्तींचा गौरव त्यांच्याविषयी ईश्वराजवळ प्रार्थना करून, त्यांचे विचार आत्मसात करून त्यावर आचरण करून करतात. प्रेषित मुहंमद (स) यांच्या नावापुढे सल्लल्लाहु अलैहि व सल्लम (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो), अन्य प्रेषितांच्या नावासमोर अलैहिस्सलाम (त्यांच्यावर अल्लाहची कृपा असो), तर सहाबांच्या नावापुढे रजिअल्लाहु अन्हु (अल्लाह त्यांच्या प्रत्येक कृत्यावर खुश झाला) ह्या त्याच प्रार्थनांपैकी काही प्रार्थना आहेत.
वाचा : इस्लाम : ज्ञात आणि अज्ञातांचा शोध
वाचा : ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी
मुहर्रम आणि मुस्लिम समाजातील कुप्रथा
१० मुहर्रम अर्थात आशुराच्या दिवशी मुस्लिमांनी रोजा ठेवणे अभिप्रेत आहे. प्रेषित मुहंमद (स) यांनी तशी सूचना देखील केली आहे. १० मुहर्रम अल्लाहप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चिन्हात्मकदृष्ट्या निर्धारित करण्यात आलेला दिवस आहे. मात्र यादिवशीचे भारतीय मुस्लिमांचे आचरण अगदी विपरीत आहे. अल्लाहप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दिवशी मातम करणे प्रेषित मुहंमद (स) यांच्या शिकवणींच्या विरुद्ध आहे. हे जीवन परीक्षा मात्र आहे तर सुख व दुःख हे आजमावण्यासाठी दिलेल्या जीवनातील दोन महत्वाचे टप्पे आहेत.
सुखात हुरळून न जाता ईश्वराचे स्तवन, त्याचे आभार तर दुःखात संयम बाळगून ईश्वरापाशी याबदल्यात उत्तम मोबदल्याची अपेक्षा आणि प्रार्थना करणे, ही प्रेषितांची शिकवण कयामत नंतरच्या शाश्वत जीवनातील यशाचे दुहेरी सूत्र देखील आहेत. एखाद्या महान व्यक्तीच्या मृत्यूचे दुःख होणे स्वाभाविक आहे. परंतु याचा कालावधी काही मोजके दिवस असणे गरजेचे आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही किती दिवस दुःख करत राहणार किती दिवस रडत बसणार? परिपूर्ण जीवनव्यवस्था असलेल्या इस्लामने हा कालावधी जास्तीत जास्त ३ दिवस तर विधवा झालेल्या महिलेला ४ महिने १० दिवस निर्धारित करतानाच दुःखाचे जाहीर प्रकटन करताना मोठ्याने आरडाओरडा करून रडणे, आपल्या गालावर मारून घेणे, केस ओढूणे, कपडे फाडणे यासारख्या अनेक कुरापती करण्यास मनाई केली. त्यामुळे शहीद हजरत हुसैन रजिअल्लाहु अन्हु यांच्या शहीद होण्याचे दुःख म्हणून मोठमोठ्याने रडणे, अंगाखांद्यावर धारदार हत्यारांचे वार झेलणे, रक्त सांडणे, त्यांच्या कबरींच्या काल्पनिक प्रतिकृती बनविणे, त्याला रोशनाई करणे, ढोल ताशे वाजवणे मिरवणूक काढणे, नाचणे ह्या आणि अशा घटनांचा इस्लामशी काहीही संबंध नाही. अशा व्यक्तीसाठी प्रेषित मुहंमद (स) यांनी तो आमच्यातला नाही, असे उद्गार काढले.
प्रेषित अनेक त्यांची शिकवण मात्र एक
एकेश्वरत्वाचे संस्थापक समस्त मानवजातीचे बाप प्रथम मानव अर्थातच हजरत आदम (ज्यांचा उल्लेख हिंदू ग्रंथांमध्ये आदिम, बायबलमध्ये adam म्हणून आढळतो.) यांना सृष्टीच्या एकमात्र निर्मात्याने एकेश्वरी शिकवण देऊन या पृथ्वीतलावर पाठविले. मात्र कालांतराने मानवांकडून त्यांच्या शुद्ध शिकवणुकीत हस्तक्षेप करून ती अशुद्ध करून अनेक फेरबदल करण्यात आले. एकमेव ईश्वराची भक्ती आणि आज्ञापालन या प्रेषित आदम अलैहिस्सलाम यांच्या मूळ शिकवणुकींना पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने या पृथ्वीतलावर प्रत्येक देश व प्रत्येक जनसमुदायामध्ये अनेक पैगंबर पाठविण्यात आले. जेणेकरून लोकांनी प्रेषित आदम यांच्या मूळ शिकवणींवर आधारित मानवाच्या नैसर्गिक धर्माकडे वळावे. अंतिम ईशग्रंथ कुरआनमध्ये प्रेषित नुह, इब्राहिम, इस्माईल, इसहाक, याकूब, मुसा, दाऊद, सुलैमान व ईसा अलैहिस्सलाम असे एकूण २५, तर हदीसमध्ये १ लाख २४ हजार पैगंबर पाठविण्यात आल्याचा उल्लेख आढळतो.
"(हे मुहंमद (स)) आम्ही तुम्हाला सत्यानिशी पाठविले आहे. शुभवार्ता देणारा व सावधान करणारा बनवून. आणि कोणताही लोकसमुदाय असा होऊन गेला नाही ज्यात कोणी सावध करणारा आला नाही." (कुरआन ३५:२४)
या सर्व प्रेषितांवर अवतरीत ग्रंथांच्या शिकवणींमध्ये आढळणारे कमालीचे साम्य हे सिद्ध करण्यास पुरेसे आहे की प्रेषितांचा काळ, कार्यक्षेत्र आणि भाषा वेगळी असली तरी त्यांचे ध्येय, धर्म आणि शिकवण मात्र एकच होती. दुःखद बाब आहे की, यांना लोकांनी वेगवेगळे समजून प्रेषित आदम आणि हव्वा या एकाच जोडप्याची लेकरे असलेल्या समस्त मानवजातीला हजारो वेगवेगळ्या धर्मात, गटांत, समुदायांत विभागून टाकले.
विभागलेल्या या गटांना प्रलयापूर्वी एकत्र येण्याचे आवाहन प्रेषित आदमपासून ते प्रेषित ईसा यांच्या प्रेषित शृंखलेतील अंतिम प्रेषित मुहंमद (स) यांच्या मार्फत केले गेले, एक अशी शिकवण, एक असा धर्म देऊन जो जगामध्ये एकच मात्र विभागले गेलेल्या सर्व धर्मांचे आणि प्रेषित शिकवणींचे संघटित स्वरूप आहे, एक असा ग्रंथ देऊन जो ईश्वरीय ग्रंथ असल्याचा दावा करणाऱ्या समस्त ग्रंथांचे एकत्रित संकलन आहे. त्यामुळेच मुस्लिमांची सलाम करण्याची मूळ पद्धत प्रथम मानव आणि अल्लाहचे पहिले प्रेषित आदम यांची, हजयात्रा ही प्रेषित इब्राहिम यांची, १० मुहर्रमचा रोजा ही पैगंबर मुसा यांची.
डुकराचे मांस वर्जित करण्याची व दारू न पिण्याची शिकवण प्रेषित ईसा यांची, तर आदरणीय मदर मेरी यांची बुरखा ही पद्धत, व्याज न खाण्याची, जुगार न खेळण्याची आदीग्रंथ वेदांची तर श्रीरामचंद्रजींची आई-वडिलांचे आज्ञापालन करण्याची शिकवण या आणि अशा हजारो शिकवणींवर मुस्लिम बांधव मागील १४४० वर्षांपासून इस्लामच्या शिकवणी म्हणून आचरण करीत आहेत.
सर्व प्रेषित हे मुस्लिम होते
मुस्लिम ही एक विशेषणात्मक आणि गुणात्मक संज्ञा आहे. मुस्लिम म्हणजे ईश्वराचा आज्ञाधारक. ईश्वराने पृथ्वीतलावर पाठविलेले समस्त प्रेषित हे ईश्वराचे आज्ञाधारक असतात आणि त्यांच्या शिकवणींवर अर्थातच प्रथम मानव आदम अलैहिस्सलाम यांच्या मूळ आणि मानवाच्या नैसर्गिक धर्मावर ईमान बाळगणाऱ्या लोकांना अरबी भाषेत मुस्लिम म्हटले जाते. भाषा बदलली की शब्द बदलतात मात्र गुण तेच राहतात. यामुळे अशा व्यक्तींना मुस्लिम म्हणा, यवन म्हणा किंवा हरिभक्त म्हणा व्यक्ती आणि त्याचे गुण एकच असतील. याच कारणाने प्रेषित मुसा अलैहिस्सलाम यांच्या मूळ शिकवणींवर ईमान बाळगणाऱ्या अनुयायांना दिव्य कुरआनने मुस्लिम म्हणून संबोधले.
 "आम्ही (मुसा अलैहिस्सलाम यांच्यावर) तौरात हा ग्रंथ अवतरला ज्यात मार्गदर्शन व प्रकाश होता. सर्व प्रेषित जे मुस्लिम (आज्ञाधारक) होते त्याला अनुसरून या यहुदी लोकांच्या सर्व बाबींचा निर्णय देत असत. (कुरआन ५:४४)

समिऊल्लाह सय्यद, इंदापुर
(सदरील लेख हा व्हॉट्सअपवर व्हायरल झालेला असून मुहर्रमची पार्श्वभूमी समजण्यासाठी आम्ही देत आहोत. संपादक या मताशी सहमत असतील असे नाही.)
Twiter@kalimajeem

FB/Kalim Ajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: मुहर्रम आहे तरी काय?
मुहर्रम आहे तरी काय?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEit4zYJZQK1ozFBVTVb4meZs68Xbns9_Vgy9nXZSywolmHW8NvAcNS0OK7lM2Pzv-VTXwcRAQmbNr2kUcSYFVLzMxq2GyXI6zg4shFf8NiiR4Us48Ymwj-Ly4YHLImxRmCoGw7Cx2Eav_Fm/s640/Muharram-Bihar.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEit4zYJZQK1ozFBVTVb4meZs68Xbns9_Vgy9nXZSywolmHW8NvAcNS0OK7lM2Pzv-VTXwcRAQmbNr2kUcSYFVLzMxq2GyXI6zg4shFf8NiiR4Us48Ymwj-Ly4YHLImxRmCoGw7Cx2Eav_Fm/s72-c/Muharram-Bihar.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/09/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/09/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content