आपण सर्वच झुंडशाहीला बळी पडलोय!

र्व प्रथम मी विदर्भ आणि यवतमाळच्या पवित्र भूमीस वंदन करतो. या भागाचे समाजसुधारक संत गाडगेबाबा, ज्यांनी कीर्तनातून समाज प्रबोधन केले त्यांना आणि ज्यांनी ग्रामगीतेच्या द्वारे ग्रामीण विकास आणि समाज जीवनाचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले त्या संत तुकडोजी महाराजांना वंदन करतो. वणीचे थोर स्वातंत्र्य सेनानी बापूजी अणे यांनाही मी नमन करतो. मुख्यमंत्री असले तरी खरेखुरे शेतकरी नेते असलेले कै. वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक यांना वंदन करतो. जवाहरलाल दर्डा यांचे स्मरण करतो. 
यापूर्वी यवतमाळ येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग. दि. माडगूळकर होते. त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो तसेच यवतमाळचे सुपुत्र डॉ. वि.भि. कोलते जे भोपाळ संमेलनाचे अध्यक्ष होते त्यांचेही मी स्मरण करतो आणि अभिवादन करतो.
आणि सर्वांत महत्त्वाचे नयनतारा सहगल ज्या या संमेलनाचे उद्घाटन करणार होत्या त्यांच्या साहित्य कर्तृत्वास आणि निर्भीड विचारास सलाम करतो. आणि मा‍झ्या भाषणास सुरवात करतो.
रसिकहो
आज यवतमाळ जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या १५१ तालुक्यांत दुष्काळाचे फार मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. काळ्या मातीवर प्रेम करणारा आणि निसर्गाशी एकरूप होऊन समाधानाने जगणारा शेतकरी लहरी हवामान, वाढते जागतिक तपमान, सरकारी धोरणे यामुळे हतबल झाला आहे. जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न, शेतमालाला उचित भाव मिळत नसल्यामुळे तो आत्महत्या करायला मजबूर होत आहे. हे आपल्या शेतकरी विरोधी कुरूप धोरणाचे उदाहरण आहे. 
यावर मात करायची असेल आणि शेतकर्‍यांना सावरायचे असेल तर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे एमएसपीच्या दीडपट भाव दिला पाहिजे, या मागणीसाठी शेतकरी वर्ग संप करत आहे, मोर्चे काढत आहे. या मागणीला मी एक शेती प्रश्नाचा छोटा अभ्यासक आणि लेखक म्हणून पाठिंबा देतो. `शेती प्रश्न : काल, आज आणि उद्या` या विषयावर मी या वर्षी अनेक ठिकाणी बोललो आहे आणि शेती प्रश्नाची गुंतागुंत उलगडून दाखवली आहे.
पण शेतकरी वर्गानं हे लक्षात ठेवलं पाहिजे की जरी अंधार असला, तरी सकाळ होत असतेच. महात्मा फुले ते डॉ. पंजाबराव देशमुखांनी ज्यासाठी काम केलं ते कुळवाड्याचं, रयतेचं राज्य एक दिवस जरूर येणार आहे. निसर्गकवी ना. धों. महानोर म्हणतात, त्याप्रमाणे आत्महत्या हा त्यावरचा मार्ग नाही आणि उत्तरही नाही. महानोर `कुणब्याच्या सुंदर शेतीवाडीसाठी` या कवितेतून जोगवा मागत आहेत आणि शेतकरी बांधवांना सांगत आहेत,
माणसानं माणसाला पारखं व्हावं
असे बेचिराख दुष्काळ आले वारंवार
दुष्काळ नवा नाही या भारत वर्षात
कधीच कोणी गेले नाही
त्या काळोखी रस्त्यांनी.
काळोखी रस्त्याचा मार्ग
बाबांनो, कधीच आपला नाही
आज आपण या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दुष्काळाशी सामना करणार्‍या शेतकरी बांधव आणि भगिनींना हेच सांगू या की तुम्ही आत्महत्येच्या काळोख्या अंधारलेल्या मार्गाने जाऊ नका. तुम्ही लढा, संघर्ष करा, सत्ताधार्‍यांना जाब विचारा आणि आपलं हक्काचं मागणं; आज एकच आहे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी. त्या प्राप्त करून घ्या. तुमच्या या लढ्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्या दु:खाना, वेदनेला शब्दरूप देऊ. तुमचा आवाज होऊन.
आता मी काही वेळातच साहित्य संमेलनाची सूत्रं नूतन अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्याकडे हे समारोपाचं भाषण संपताच सुपूर्द करणार आहे. त्या मा‍झ्या समकालीन लेखिका आहेत,  म्हणून मोठ्या आनंदाने अध्यक्षपदाची सूत्रं त्यांच्या हाती सुपूर्द करीत आहे. त्यांना अध्यक्षपदाच्या कारकि‍र्दीसाठी सुयश चिंततो
आज या संमेलनावर जे बहिष्काराचे सावट आहे, त्याची गडद छाया मी यवतमाळला काल आल्यापासून अनुभवत आहे. त्याची क्षणोक्षणी जाणीव होत आहे. त्यामुळे मी उदास आहे, चिंतित आहे आणि प्रक्षुब्धही आहे.
कारण उघड आहे. यवतमाळच्या आयोजक संस्थेने आणि महामंडळ, जे सध्या नागपूरला आहे, त्यांचे अध्यक्ष त्यांनी उद्घाटक म्हणून भारताच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखिका आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निर्भीड पुरस्कार करणार्‍या कार्यकर्त्या नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून आधी निमंत्रण देऊन मग ते मागे घेतल्याचा जो अगोचरपणा तसेच झुंडशाहीपुढे आणि दबावापुढे लोटांगण घालण्याचा जो भिरूपणा दाखवला त्यामुळे मी उदास आहे, चिंतित आहे आणि त्याहून जास्त प्रक्षुब्ध आहे.
मी उदास यासाठी आहे की या प्रकरणात महाराष्ट्राच्या उदारमतवादी, सुसंस्कृत आणि सहिष्णू परंपरेचा अपमान झाला. त्याचा एक वेगळा, वाईट, अनुदार संदेश देशभर गेला. त्यामुळे या महाराष्ट्राचा अभिमान असणारा आणि पुरोगामी, उदारमतवादी साहित्य परंपरेचा पाईक, भोई असणारा एक लेखक, कलावंत म्हणून मी उदास आहे. देशभर माझे मित्र पसरले आहेत. ते मला लेखक म्हणून मानतात, ओळखतात. त्यांच्यापुढे मी कोणत्या मुखाने जाऊ? `अरे भाई, ये महाराष्ट्र में क्या हो रहा है?’ असं मला विचारलं, तर त्यांना काय सांगावं, या प्रश्नाने मी संत्रस्त आणि उदास आहे.
मी चिंतित आहे ते यासाठी की मराठी साहित्य संमेलनांची शतकाहून जास्त असलेली देदीप्यमान आणि इतर भाषिकांना हेवा वाटावी, अशी परंपरा. १९९५ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक हिंदीचे प्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी होते. संमेलन पाहून, मराठी रसिकांचा प्रतिसाद पाहून ते भारावून गेले होते. नंतर सातत्याने वेळोवेळी अनेक कार्यक्रमात ते साहित्य संमेलनाचा गौरवाने उल्लेख करायचे. त्या वेळी तेथे आमच्या निमंत्रणावरून आलेले पंजाबी कवी सुरजित सिंग माथुर आणि उर्दू कवी, समीक्षक साहित्यिक आजही परभणीच्या साहित्य संमेलनाच्या आठवणी काढतात.
उद्घाटक म्हणून भारतातील नामवंत साहित्यिक बोलावून त्याचे विचार ऐकण्याची एक दीर्घ परंपरा महामंडळाने विकसित केली आहे.
त्याला परभणी संमेलनाचा आयोजक म्हणून माझाही हातभार लागला आहे. हीच परंपरा यवतमाळने नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून निमंत्रित केले. तेव्हा मला ही परंपरा चालू राहिल्याचा आनंद वाटला. पुन्हा नयनतारा सहगल यांची काही इंग्रजी पुस्तके वाचल्यामुळे त्यांची साहित्यिक उंची आणि महती मला माहीत आहे. गतवर्षी बडोद्याच्या संमेलनात मी जो साहित्यिक, कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार स्पष्ट शब्दांत केला होता, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी गेली पन्नास वर्षे नयनतारा लढत आहेत.

वाचा :  धार्मिक-सांस्कृतिकविविधता संपवण्याचा डाव

१९७५ची आणीबाणी, १९८४चे दिल्लीतील शिखांचे हत्याकांड यावर त्यांनी धीटपणे आवाज उठवलेला होता. अलीकडे २०१६ मधे विचारवंत सर्वश्री डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्त्येचा, खुनाचा निषेध म्हणून आणि घरी गोमांस ठेवले म्हणून दादरी उत्तर प्रदेशचा मोहम्मद अखलाख यांचा जमावानं झुंडीचं रूप धारण करून ठेचून केलेल्या हत्त्येने व्यथित आणि क्षोभित होऊन केलेल्या हत्त्येचा निषेध म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार त्यांनी सर्वप्रथम केला होता. त्या कलावंत, लेखकाचा धीरोदत्त असा तेजस्वी आणि नैतिक आवाज आहेत. 
त्या बाणेदारपणे कराडच्या साहित्य संमेलनात आणीबाणीबाबत भाष्य करणार्‍या आपल्या दुर्गाबाई भागवत यांच्या सहोदर भगिनी शोभतात. नयनतारा सहगल यवतमाळला आल्या असत्या, तर मी त्यांच्या चेहर्‍यात आणि आवाजाच्या कणखरपणात दुर्गाबाई भागवतांना हुडकलं असतं. त्यांना त्या संमेलनात कल्पनेने का होईना पण मी अनुभवलं असतं. पण आपण करंटेपणा केला. नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण मागे घेतले. त्यांचे चिंतनशील पण परखड विचार मराठी रसिकांना ऐकता आले असते. पण त्याला ते संयोजन समिती आणि महामंडळाच्या करंटेपणामुळे, अवसानघातकीपणामुळे मुकलो. म्हणून मी चिंतित आहे.
चिंता आहे ती या देशाची आणि महाराष्ट्र राज्याची सहिष्णु परंपरा कुठे लोप पावली याची. सहगल यांचे भाषण आता सोशल मीडियावर वायरल झाले आहे. त्यात त्यांनी देशातील सध्याचा नूर आणि हिंसेच्या वातावरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असेही म्हणले आहे की
"चिंता आहे ती या देशाची व महाराष्ट्र राज्याची सहिष्णुपरंपरा कुठे लोप पावली याची. सहगल यांचे भाषण आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यात त्यांनी देशातील सध्याचा नूर व हिंसेच्या वातावरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की -सर्वसमावेशकता हा आपल्या जीवनाचा एक भाग राहिलेला आहे आणि ही प्राचीन बहुसांस्कृतिक सामाजिक व्यवस्था, जिचे नाव भारत आहे, ती म्हणजे आपले सर्वांत मोठे यश आहे. आज मात्र धार्मिक विविधता निपटून टाकून आपल्याला एकाच धार्मिक व सांस्कृतिक ओळखीमध्ये कोंबू पाहणाऱ्या धोरणामुळे आपली हीच एकता धोक्यात आली आहे. हिंदू नसलेल्या आपल्या कोट्यवधी देशबंधूंचे आणि स्त्रियांचे घटनात्मक अधिकार काढून घेऊन त्यांना आक्रमक, बाहेरचे आणि शत्रू ठरवू पाहत आहे.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची जडणघडण करणाऱ्या आपल्या पूर्वसूरींनी देशाकरता धार्मिक ओळख नाकारली होती आणि भारताला एक निधर्मी लोकशाही प्रजासत्ताक देश घोषित करण्याचा सुज्ञपणा दाखवला होता. याचा अर्थ ते धर्मविरोधी होते असे नव्हे, तर आपल्यासारख्या विविध धर्म असलेल्या आणि धार्मिक प्रवृत्तीच्या देशाला केवळ निधर्मी राज्यव्यवस्थाच एक सर्वसमावेशक तटस्थ छत्रछाया देऊ शकेल आणि तिच्यात प्रत्येक भारतीयाला त्याच्या व तिच्या श्रद्धेनुसार जगण्याचा व ईश्वरभक्ती करण्याचा अधिकार असेल, हे त्यांनी जाणले होते.हा निर्णय ज्यात घेतला गेला- त्या संविधान सभेत बहुसंख्य सदस्य हिंदू होते व तरीही त्यांनी अशी एक राज्यघटना तयार केली, जिच्या प्रस्तावनेत सर्व भारतीयांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावयुक्त जीवनाची हमी देण्यात आली होती. हा उच्च आदर्श घटनेचे शिल्पकार आणि ज्याच्या आग्रहातून जातिव्यवस्थेविरुद्ध एक क्रांती सुरू झाली, ती थोर मराठी विभूती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रेरणेतून निर्माण झाला होता. आज तोच उच्च आदेश बाजूला सारण्यात आला आहे. अल्पसंख्याक आणि हिंदू राष्ट्राच्या उद्दिष्टांना पाठिंबा न देणारे लोक रस्त्यावरून मोकाट फिरणाऱ्या दुराग्रही लोकांचे लक्ष ठरत आहेत...

रसिक मित्रहो
मी मुद्दामच नयनतारा सहगल यांच्या, त्यांनी तयार केलेल्या उद्घाटकीय भाषणाचा काही भाग वाचून दाखवला. त्यांची ही मते नवीन नाहीत, त्यांनी ती अनेक संमेलनातून वेळोवेळी मांडली आहेत. ती समजा, यवतमाळला मांडली असती तर काही आभाळ कोसळणार नव्हते की राजकीय भूकंप होणार नव्हता. पण त्यांचे हे लिखित भाषण यवतमाळला आले, त्याचा मराठी अनुवाद झाला आणि आयोजकांना ते पटले नसावे किंवा राजकीय दृष्टीने अडचणीचे वाटले असावे, म्हणून माझे निमंत्रण कदाचित मागे घेतले असावे, अशी शंका नयनतारा सहगल यांनी मुलाखत देताना चॅनल्सवर उपस्थित केली आहे. ती आपण निराधार मानायची का? का त्यांनी संमेलन उधळले जाऊ नये, म्हणून निमंत्रण मागे घेतले, असा जो खुलासा केला आहे तो मान्य करायचा
आज संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि महामंडळाचे अध्यक्ष एकमेकांकडे बोट करीत आहेत. निमंत्रण मागे घेण्यात मी नाही तर ते आहेत, असा परस्परांना बोल लावत आहेत. हा सारा पोरखेळ आहे  त्यामुळे रसिकजन ते मान्य करतील, असं त्यांना जे वाटतंय, तो भ्रम आहे. येथे जमलेला रसिक वर्ग सुजाण आहे, तो सारं जाणतो. त्याला तुम्ही दोन्ही संस्था बालबुद्धीचे समजून जे विचित्र आणि अतर्क्य खुलासे करत आहात, त्याची शिसारी येते. 
काही क्षणानंतर माझे अध्यक्षपद नूतन अध्यक्षांना सुत्रे दिल्यानंतर संपणार आहे, तरी या क्षणी मी बडोद्याच्या संमेलनाध्यक्ष म्हणून या वर्षीचा अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचा पदसिद्ध सदस्य आहेत्यामुळे माझी मान शरमेने खाली गेली आहे. महामंडळाची आणि साहित्य संमेलनाची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचे अपकृत्य आपणाकडून घडले आहे, त्याचा भाग म्हणून त्या पापाची धनी मी झालो आहे, त्यामुळे सचिंत आहे.
नयनतारा सहगल यांच्या उद्घाटक पदावरून काही वाद निर्माण झाले. प्रथम हक्क समितीचा त्यांना त्या इंग्रजीत लिहिणार्‍या लेखिका आहेत, म्हणून विरोध झाला. मग मनसेमार्फत स्थानिक पातळीवर विरोध झाला. संमेलन उधळून लावण्याची भाषा केली गेली. पण पक्ष प्रवक्ते अनिल शिदोरे आणि मग मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रक काढून नयनतारा सहगल यांना विरोध नसल्याचे जाहीर केले. तरीही हे निमित्त पुढे करून सहगल यांचे निमंत्रण का आणि कशामुळे मागे घेतले, या प्रश्‍नाचे उत्तर मिळालेले नाही. 
कदाचित आयोजक आणि महामंडळाचे अध्यक्ष ते कधीच उघड करणार नाहीत त्यामुळे नयनतारा सहगल यांची राजकीय दडपणाची शंका साधार आहे, असं म्हणायला जागा आहे. पण त्याचे पडद्यामागचे सूत्रधार कोण आहेत, कोणत्या पक्ष वा प्रवाहाचे आहेत, हे मला माहीत नाही. कारण असहिष्णुता ही काही एका पक्षाची मिरासदारी नाही, सर्वच पक्ष कमी-जास्त प्रमाणात असहिष्णू आणि टीका न सहन करणारे झाले आहेत. विशेषत: कलावंत आणि बुद्धिमंतांची प्रामाणिक आणि परखड टीका सहन होत नाही. नयनतारा सहगल यांची टीकाही कदाचित काही जणांना सहन होणारी नसावी, असा अर्थ काढला तर मी चुकतोय काय?
लोकशाहीचा चर्चा आणि मतभेद विरोधी मत हा तर आत्मा आहे. वॉल्टेअरनं लोकशाहीची जी व्याख्या केली आहे, त्यानुसार जरी मला तुमचे / इतरांचे मत मान्य नसले तरी ते तुम्ही / इतरांनी मांडण्याचे तुमचे स्वातंत्र्य आणि अधिकार मला मान्य असला पाहिजे. प्रसंगी तुम्ही ते मांडावे म्हणून मला माझे प्राण पणाला लावावे लागले, तरी मी ते लावले पाहिजेत.’ 
ही वॉल्टेअरची लोकशाहीची उच्चतम कल्पना आजच्या विपरीत असहिष्णू आणि राजापेक्षा अधिक राजनिष्ठ असणार्‍या पक्ष कार्यकर्त्यांच्या झुंडीत परावर्तित झाली. त्या जमा‍न्यात अव्यवहारी आणि हास्यास्पद ठरली आहे. पण भारत हा संवैधानिक लोकशाही असणारा देश आहे. इथे संविधानाने आपणा सर्वांना हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्‍चन धर्मियांना, स्त्री-पुरुषांना, अनुसूचित जातीजमाती आणि बहुजनांना विचार, भाषण आणि एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूलभूत, अपरिवर्तनीय अधिकार दिले आहेत.
पण महामंडळ आणि आयोजक संस्थेने नयनतारा सहगल या थोर विदुषीचा हा अधिकार नाकारून घटनेच्या तत्त्वज्ञानाशी विसंगत व्यवहार केला आहे. त्यामुळे यजमानावर टीका करायची नसते, हा शिष्टाचार बाजूस ठेवत मी माझ्याकडे जितकी शब्दप्रभुता आहे, ती वापरून त्याच्या निषेध करीत आहे. कारण तुम्ही त्यांना बोलवून परत येऊ नका, म्हणून कुठे सभ्यतेचा शिष्टाचार पाळला आहे?
आणि मी प्रक्षुब्ध पण आहे, कारण या निमित्ताने साहित्य व्यवहाराची नैतिकता आणि लेखक-कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व्यापक प्रश्‍न उपस्थित होतात. त्याचा संकोच आणि अधिक्षेप होत आहे, म्हणून मी प्रक्षुब्ध आहे.
प्रथम साहित्य व्यवहाराची नैतिकता. न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केलेले आणि अनेक थोर माणसांमुळे लेखक, प्रकाशक आणि रसिकांचे सर्वमान्य असे साहित्य महामंडळ बनले. त्याचा वार्षिक स्वरुपाचा शारदोत्सव म्हणजे वार्षिक साहित्य संमेलन होय! येथे साहित्य चर्चा होते, अध्यक्षीय भाषणातून  साहित्य आणि समाज चिंतन होते वेळप्रसंगी ठाम भूमिका घेऊन उद्बोधन केलं जातं. त्यासाठी वैचारिक मोकळेपणा लागतो, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य लागते. जे आजवर काही दोन-चार अपवाद वगळता महामंडळाने आणि साहित्य संमेलनाने दिले आहे. त्या महत्त्वाच्या साहित्य व्यवहाराची नैतिकतेला आज काळिमा फासला गेला आहे, असे मला स्पष्टपणे निक्षून सांगायचे आहे.
दुसरा प्रश्‍न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. इथे नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करून त्यांना बोलू दिले जाणार नाही, अशी व्यवस्था झाली. मागच्या आठवड्यात मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात बशारत अहमद यांना ते अहमदीया या इस्लामने काफीर ठरवलेल्या पंथाचे आहेत म्हणून बोलू दिलं नाही. हिंदी कलावंत नसीरुद्दीन शहा यांनाही अजमेर लिटरेचर फेस्टिवलला त्यांनी देशात असहिष्णुता वाढतेय म्हणून जे विधान केले होते, त्याला तीव्र विरोध झाला, म्हणून जाता आले नाही. 
या तीनही घटना असहिष्णुता दाखवतात. आणि कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संकोच करतात. इतर संमेलने जाऊ द्यात, पण मराठी साहित्य संमेलनाला न्यायमूर्ती रानडे यांनी जी उदारमतवादाची परंपरा बहाल केली आहे, ती विसरून नयनतारा सहगल यांनी यवतमाळला न येऊ देणे महामंडळाला शोभणारे नाही. इथे महामंडळ आणि आयोजक संस्था चुकल्या वा दडपणाला बळी पडून भिरूता दाखवली.
आता या प्रकाराने हानी तर झाली आहे, ती या संमेलनात भरून येणार नाही. मात्र या प्रकाराने मराठी साहित्य जगताने एक धडा शिकला पाहिजे तो हा की साहित्य संमेलन भरवण्यासाठी स्थानिक धनिकांचा, ते त्यांचा आर्थिक मिंधेपणा यापुढे कोणत्याही परिस्थितीत पत्करायचा नाही. त्यासाठी स्मृतिशेष गंगाधर पानतावणे अस्मितादर्शमेळावेवजा संमेलने भरवायची, त्याचा आदर्श घेतला पाहिजे. संमेलनात सर्वांनी स्वखर्चाने आणि मानधनाविना यावे असा पायंडा पाडून एक संमेलन पुढील काही महिन्यात घेऊन प्रयोग करून पाहावा. आणि पुढील संमेलन हे असेच भरवावे. स्थानिक पातळीवर फक्त आयोजन करावे, बाकी खर्च टाळावा, किंवा महामंडळाचा कोष संपन्न करून करावा. यामुळे या वेळी जो प्रकार घडला तो महामंडळास यापुढे टाळता येईल.
शेवटी मला हे सांगायचे आहे की साहित्य आणि कला यांना सकस निर्मितीसाठी वैचारिक मोकळेपणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे निर्भेळ, निरंकुश वातावरण लागते. ते आज भारतात दुर्दैवाने पुरेशा प्रमाणात नाही. ते देण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे, तशीच ती नागरी संस्थांची, सिविल सोसायटीची पण आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळ ही अशीच एक स्वायत्त नागरी संस्था आहे. तिच्या चारही घटक संस्था लोकचळवळ आणि सहभागातून मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या संवधर्नासाठी निर्माण झालेल्या आहेत. 
त्यांना देदिप्यमान असा इतिहास आहे, त्याचा आपण विसर पडू देता कामा नये. त्यासाठी अखंड सावधानता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारी घटना महाराष्ट्रात कुठेही घडली तरी धावून जाणे आणि प्रभावी आवाज उठवणे महामंडळाने सातत्याने केले पाहिजे. अलीकडे कवी दिनकर मनवर यांच्या कवितेबद्दलच्या वादाबाबत महामंडळ मूक राहिले. वशारत अहमद, ज्यांनी मुस्लिम मराठी साहित्य चळवळ उभी केली, त्यांना पुण्यात बोलू दिले नाही, तेव्हा मराठी साहित्य परिषद चूप राहिली. हे असे होता कामा नये. 
म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये, या तत्त्वाने आज जे घडले ते का घडले याचे सखोल आत्मचिंतन करून पुन्हा असा लाजिरवाणा प्रकार होणार नाही, याची दक्षता आपण सार्‍यांनी घेतली पाहिजे. मी आयोजक संस्था आणि महामंडळाचे अध्यक्ष यांना हे प्रांजळपणे सांगतो की आपले हे वर्तन योग्य नव्हते. आपण अशा प्रसंगी धैर्य दाखवायला हवे होते. असो. यापुढे महामंडळ कमी पडणार नाही, अशी मी अपेक्षा करतो.
मी शेवटी पुन्हा एकदा नूतन अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांचे अभिनंदन करतो आणि आनंदाने त्यांना अध्यक्षपदाची सुत्रे देतो. या अभिवचनासाठी, तुम्ही जी काही कामे मराठीसाठी हाती घ्याल त्यात मी आपणासोबत असेन. माझी अपूर्ण कामे तुम्ही पूर्ण कराल अशी अपेक्षा बाळगतो.
धन्यवाद.

(९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील भाषणाचा संपादित अंश)


मावळते अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन


वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: आपण सर्वच झुंडशाहीला बळी पडलोय!
आपण सर्वच झुंडशाहीला बळी पडलोय!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEisy3H6pjypIZPhOAJ0aVzplSkIu8htjnQxKlLndHkv5VVvJisxl0yKCgoeVOUSy0ZjPIeVT0UhPxyyTjHq7IxAWM9yPckIkK7ooSM2UKZFIrs7zBzGQsNB17eQr7QmznM2mxR4qfsbRL-p/s640/_99148019_deshmukh.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEisy3H6pjypIZPhOAJ0aVzplSkIu8htjnQxKlLndHkv5VVvJisxl0yKCgoeVOUSy0ZjPIeVT0UhPxyyTjHq7IxAWM9yPckIkK7ooSM2UKZFIrs7zBzGQsNB17eQr7QmznM2mxR4qfsbRL-p/s72-c/_99148019_deshmukh.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/01/blog-post_9.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/01/blog-post_9.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content