‘इस्लाम खतरे में’लाच रस्त्यावर उतरणार का ?

गोवंश हत्येच्या संशयातून होणाऱ्या मॉब लिचिंग विरोधात देशभरात सर्वधर्मीय रस्त्यावर उतरले आहेत. ज्या मुस्लिम समाजासाठी हे आंदोलन सुरू आहे, तोच यातून अदृष्य दिसत आहे. चळवळीचे कार्यकर्ते वगळता पापभिरू मुस्लिम ‘अल्लाह मालिक’ म्हणत दैनांदिन कामात व्यस्त आहेत.

एकाएकी ‘वक्त ने करवट’ घेताच व्हर्च्युअल मंडळीसह घरात तसबिरी घेऊन बसलेले पापभिरू ‘इस्लाम खतरे में’ म्हणत बशीरहाटच्या रस्त्यावर आले/आणले गेले. कारण नेहमीसारखंच होतं. पवित्र धार्मिक स्थळाची व्हर्च्युअल बदनामी केल्याने पुन्हा एकदा हजारोच्या संख्येनं पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम रस्त्यावर आले. किंबहुना गोगुंडाकडून मुस्लिमांच्या अमानुष व नृशंस कत्तली होत असताना, हीच मंडळी ‘अपने यहाँ गांव में तो अमन हैं ना!’ म्हणत धंद्यात मग्न होती.

मोदीप्रणित हिंदुत्ववादी सत्तेत सामाजिक सुरक्षेचा प्रश्न अत्यत बिकट स्वरूपात पुडे आलेला आहे. मुस्लिमच नाही तर इतर अल्पसंख्याक समुदाय ब्राह्मण(हिंदू)श्रेष्ठत्वाच्या रेट्यात पुरता भरडला जात आहे. बीफ बंदी सामान्य माणसाच्या मुळावर उठवलेली दिसते. गोमांस बाळगल्याच्या संशयातून मानवी जीवांच्या हत्यांचं सत्र सुरू आहे. सामाजिक भान असलेल्या राजकीय व सामाजित संघटनांनी व इतर मध्यमर्गीय मुस्लिम समुदायाने या उन्मादी झुंडीविरोधात कृतीतून आवाज उठविणे अपेक्षित होतं. मात्र हा वर्ग अल्लाहकडे ‘रहमतची भीक’ मागत राहिला.

मोहसिन शेख, अखलाकपासून ते अलीमुद्दीन पर्यंत ३ वर्षांत ८६ मुस्लिमांचा शिरच्छेद झाला तर शेकडों जखमी झाले. या हिंसक आणि रानटी कृत्यांचा जाहिररित्या कृतीच्या पातळीवर कोणाही निषेधही नोंदवलेला दिसत नाही. तसंच कुणीही रस्त्यावर उतरलं नाही. अजूनही हा वर्ग कानावर हात ठेवून आणि डोळे मिटून गप्प बसला आहे. उलट झुंडशाहीविरोधात रस्त्यावर येणाऱ्या घटकांना ‘अमन को बनाए रखो’ म्हणत उपदेश करीत होते.

मात्र, प्रेषितांचा कथित व्हर्च्युअल अवमान होताच अचानक त्यांचा ‘इस्लाम खतरे में’ आला. धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवत तोडफोड सुरू झाली. ज्या धर्माने अवघ्या जगाला परोपकार, शांती, अहिंसा आणि असहिष्णुतेचा संदेश दिला, आर्थिक व सामाजिक न्यायाचा विचार दिला, त्याचेच अनुयायी प्रेषितांच्या नावाने हिंसा करत व अराजक माजवत सुटले, समर्थनीय आहे का?




जागतिक कटाचे प्यादे

वेळोवेळी दंगलीत कमी मुस्लिम मारले गेले असतील, पण त्यापेक्षा जास्त संख्येने मुस्लिमांच्या कथित जिहादी कारवाईने मारले आहेत, हे कडवं सत्य आहे. कारण ह्या अधर्मी कृत्यात इतर समुदायासोबत मुस्लिमही भरडला जात आहे. जगभरात हा उन्माद सुरू आहे. कधी आयएसचं नेतृत्व स्वीकारून तर कधी शिया-सुन्नीच्या वादातून निष्पाप लक्ष्य केले जातात. अल्लाहचं नाव घेत त्याच्याच घरात अर्थात मस्जिदीमध्ये स्फोट घडविले जात आहेत.

पाकिस्तान, बांग्लादेश, इराक, सिरीया, इराणमध्ये इस्लामचं नाव घेऊन रक्तपात सुरू आहे. शेजारी राष्ट्रांमध्ये इशनिंदेचा ठपका ठेवून लोकांना चिरडले जात आहे. किंबहुना जगभरात इस्लामच्या नावाने अशातंतेचं वातावरण तयार केलं गेलं आहे.

९/११च्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या धक्क्यातून तिथला मुस्लिम समुदाय सावरत असताना, ब्रिटन आणि युरोपमध्ये हल्ले झाले. यामुळे सामान्य शांततावादी आणि मवाळ मुस्लिम चौकशाच्या फेऱ्यात अडकला आहे. ठरावीक घटनांमुळे जगभरात मुस्लिम समुदायाविरोधात ‘हेटनेस’चं वातावरण तयार झालं आहे. या ‘हेटनेस’मधूनच जून महिन्यात ब्रिटनमध्ये मस्जिदीच्या बाहेर हल्ले झाले. जगभरात सुरू असलेल्या या हिंसेविरोधात मुस्लिम समुदायाला एकत्र येण्याची गरज आहे; असे न होता मुस्लिम समाज पंथाच्या वादात अडकला.

‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या हल्ल्यानंतर भारतात प्रचारी मीडियाने कट्टरतावादाला खतपाणी घातले. ओसामाच्या पतनानंतर जगात इस्लामचा शोध (?) घेण्याचा कल वाढला. या अभ्यासानंतर अर्थातच ‘निगेटीव्ह’ इस्लामचा प्रचार जोरकसपणे सुरू झाला. लेखक, अभ्यासक, भाष्यकार व विचारवंतानी टीकात्मक इस्लामचा स्वीकार केला. अर्थात त्यातील युद्धाच्या कहाण्या पाठ करून घेतल्या. जगातील इस्लामिस्ट अभ्यासकांना युद्धपरंपरा वगळता इस्लामच्या इतर पैलूंची मांडणी करण्याची संधी चालून आली होती. परंतु जगातील इस्लामविद् ‘अमेरिका पुरस्कृत’ दहशतवादाला दूषणे देत राहिली. दुसरीकडे झॉयोनिस्ट मीडियाने जगभरात तथाकथित जिहादचा दुष्प्रचार करत इस्लामला शत्रूस्थानी आणलं.

अफगाण, इराकच्या हल्यानंतर ‘इस्लाम खतरे में’ची जागतिक आरोळी सुरू झाली. इस्लामला वाचवण्यासाठी ‘अघोषित धर्मयुद्ध’ छेडलं गेलं. इस्लामला संरंक्षित करण्याचा प्रचार सुरू झाला. त्यातून हिंसा कमी होण्याऐवजी ती वाढीस लागली. त्याचवेळी भारतात प्रचारी मीडियाने दहशतावादाचे भय माजवून संमिश्र संस्कृती व सामाजिक शांततेला तडे दिले.

या प्रचारी हल्ल्यात ‘वांशिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या’ प्रादेशिक असलेले भारतीय मुसलमान भरडले गेले/जात आहेत. अफगाण आणि इराक युद्धाचे पडसाद भारतातही बघायला मिळाले. अमेरिकेने इराकविरोधात पुकारलेल्या युद्धाला भारताने प्रखर विरोध केला. राजनायिक पातळीवर भारत इराकसोबत राहिला. भारतात युद्धविरोधात निदर्शने झाली. मात्र, युद्धात इराकचा पाडाव होताच भारतात अचानक ‘सद्दाम निषेधा’च्या रॅली निघाल्या.

मुळात हर्षउन्माद अमेरिकेचं अभिनंदन करणारा नसून भारतातील मुस्लिम समाजाला डिवचण्यासाठी ठरावीक वर्गाने केलेली ती खेळी होती. या षड्यंत्राला न समजून घेता भारतातील बुद्धिजीवी मुस्लिमांनी अमेरिकेविरोधात निषेध सभा घेतल्या.



कोणाचे नेतृत्व खरे!

९/११ नंतर ‘पेट्रो डॉलर’पुरस्कृत इस्लामची कथित विचारसरणी भारतात शिरण्यास ‘पोषक’ ठरली. पारंपरिक धर्म व इस्लामच्या मूळ शिकवणींचा विपर्यस्त करून जो मांडला जातोय, तोच खरा इस्लाम अशी प्रतीमा जनमाणसात तयार झाली. मुस्लिमांच्या अमानूष कत्तलीचे वीडियो दाखवून संधिसाधूंनी उच्चशिक्षित तरुणांची माथी भडकवण्याचं काम केलं. एस.एम. मुश्रीफ यांच्या मते, ‘ब्राह्मण्यवाद्यांकडून हिंदूराष्ट्र स्थापनेच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी विविध प्रकारच्या कट रचले जातात. त्यात मुस्लिमांना शत्रूस्थानी आणण्याच्या उद्देश याच मोहिमेचा भाग आहे. ”

संघाच्या ‘फोडा व राज्य करा’, ह्या मोहिमेत अनेक घटक कार्यरत आहेत. अब्राह्मणी वर्गघटकांना आपल्या राजकीय हिदुत्वाचे वाहक म्हणून पेश करणेदेखील याच कटाचा भाग आहे. त्यासाठी हिंदू-मुस्लिम भेदनितीचे सांस्कृतिक राजकारण केलं जातं. कथित जिहाद आणि धर्मश्रेष्ठत्वाच्या भावनांना बळकटी प्रदान केली जाते. त्यांना धर्माच्या बंदिस्त चौकटीत लोटलं जातं

दुसरीकडे दहशतवादाचे आरोप ठेवून मुस्लिमाविरोधात द्वेश, बदनामी तसेच अविश्वासाची मोहिम राबवली जाते. एकीकडे धर्मश्रेष्ठत्वाच्या कल्पनेला बळ द्यायचे व दुसरीकडे धर्मांध म्हणून शत्रूस्थानी आणायचे, असा दुहेरी कट शिजवला जातो. ‘मुस्लिम’ (दहशतवादी) म्हणून तिरस्कार व घृणेची वागणूक देत त्यांना व्यावसायिक, शैक्षणिक तसेच राजकीय स्पर्धेतून बाद करण्याची मोहिम आखली जाते. त्यासाठी देशद्रोहाचे (दहशतवादाचे) आरोप हे नवं शस्त्र म्हणून वापरले गेलं.

देशद्रोहाचा ठपका ठेवत उच्चविद्याविभूषित तरुणांना अडकवण्याचे हे धोरण अनेकांनी उघडकीस आणले. दहशतवादाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेल्या अनेक मुस्लिमांनी ‘आप बिती’ कथन करणारी पुस्तके लिहिली आहे. त्यातून एकसमान पद्धतीने वरील षडयंत्र उघडकीस आलेलं आहे. दिल्लीच्या मुहंमद अमीर जे दहशतवादाच्या आरोपातून निर्दोष सुटले आहेत, त्यांनी लिहिलेल्या ‘Framed As a Terrorist’ ह्या पुस्तकातून ही खेळी अधिक स्पष्टपणे पुढे येते.

पोलिटिकल इस्लामपासून परावृत्त झालेला व आध्यात्मिक चौकटीत बंदिस्त झालेला हा वर्ग प्रतिक्रियावादी झाला. ह्या बलाढ्य आंतरराष्ट्रीय कटाला राजकीय, आर्थिक, आणि इतर पातळीवर उत्तरे देण्याची कुवत मुसलमानांकडे नव्हती. ज्यांच्याकडे होती, तो वर्ग ‘पेट्रो डॉलर’च्या आमिषाने हिप्नोटाइज झालेला होता.

प्रतिक्रियावादाचे ‘घेटो’ अर्थातच कंपू ठिकठिकाणी उदयास आले. या ‘कंपूशाही’मुळेच भारतीय मुस्लिम समाजात ‘सिलेक्टीव्हझम’ वाढीस लागला. हा ‘सिलेक्टीव्हझम’ अर्थातच धार्मिक प्रवृतीचा होता. दुसरीकडे तपास यंत्रणांच्या पक्षपाती कृतीमुळे समुदायात सुडाच्या भावनेला पोषक वातावरण मिळवून दिले. परिणामी प्रतिकारशक्ती गमावलेला सामान्य मध्यमवर्गीय संकटापासून बचावासाठी सुरक्षित कंपू शोधू लागला. त्यांची ती निकड आध्यात्माने पूर्ण केली. कारण धर्म मानसिक समाधान देणारी बाब असते. अशा प्रकारे इहलोकी प्राबल्याचा विचार एकाएकी बळावला. अर्थात ही कृती बलहिनतेमुळे झालेली होती.




माईंड हायजॅकीकरण

धर्माच्या चौकटीत समस्येचा गुंता शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. म्हणजे धर्म-परंपरांच्या नावाने गुंगीत राहणं पसंत केलं. एका अर्थाने ‘बुरा न देखो’ म्हणत ‘डोळे बंद’ करून घेण्याची ही प्रक्रिया होती. अशा रीतीने हा वर्ग अधिकाधिक आयसोलेट होत गेला. ह्या संकटाना तोंड देण्याची पूर्वतयारी नसल्याने अनेकजण ह्या ट्रॅपमध्ये गोवले गेले

इज्तेमा, कॉर्नर बैठका, मदरसा, मस्जिदींच्या प्रवचनातून धार्मिक शिक्षणाचा प्रसार सुरू झाला. इहलोकात शांततेसाठी धर्म आणि आचरणे महत्त्वाची असल्याची मांडणी वाढली, शिक्षण हे रोजगाराचे साधन आहे, पण जन्नतचा मार्ग कदापी नाही. रोजगार देण्याचा वायदा ईश्वराने केलेला आहे. मृत्यू अटळ आहे, त्यामुळे जीवनाचा मोह असता कामा नये. परलोकी जीवनाची तयारी करण्यासाठी इबादत आवश्यक आहे, अशा प्रकारची मांडणी सरेआम झाली. अर्थात धर्मतत्त्वज्ञानाची रुजूवात करण्याची ती वेळ नव्हती! उपरोक्त मूलतत्त्ववादी प्रचाराचा परिपाक म्हणून तरुणांमध्ये ‘रॅडिकल इस्लाम’ची रुजवणूक झाली.

दहशतवादाचे आरोप ठेवून सातत्याने होणाऱ्या धरपकडीने भारतीय मुस्लिम समुदाय हवालदिल झाला. ह्या कृतीला देशद्रोहाशी जोडल्याने कोणीही ह्या अन्यायाविरोधात जनाआंदोलन उभं राहू शकलं नाही. सततच्या होणाऱ्या अशा हल्ल्यामुळे समुदाय अगतिक झाला. तिरस्कार, घृणा, भेदनीति, हिणकस दृष्टिकोन आणि पक्षपाती कार्यवाहीतून मुस्लिम समुदायात ‘बदले की भावना’, अस्तित्वाचे संकट आणि धर्म खतरें में आल्याची धारणा वाढीस लागली. परिणामी भरकटलेल्या मार्गदर्शनामुळे भलतेच संकट उभे राहिले. परिणामी मुस्लिम समाजात अविचारी पिढी पोसली गेली.

नंतरच्या काळात घडलेल्या विविध दंगलीने ‘अस्तित्वाचे व अस्मितांचे संकट’ आणखीन बळावले. अस्तित्वाचे प्रश्न उभे करण्यास दंगे प्रमुख कारण मानले गेले. तपाय यंत्रणा व पोलिसांचा पक्षपात, न्याय न मिळणे, प्रशासनाची सांप्रदायिकता, शासनाची औदासिन्यता, मूळ प्रश्नांपासून बगल देणे असे अनेक कारणे अस्मितांच्या बळकटीकरणाला कारणीभूत ठरली. ही स्थिती अनेक तरुणांमध्ये सुडाची भावना पेटवण्यास कारणीभूत ठरली.

अविचारी झालेल्या ह्या पिढीने इस्लामचा सिलेक्टिव विचार आत्मसात केला. ज्यात इहलोकी चर्चांच्या पलीकडे फारसं काही नव्हतं. याउलट इस्लामचा इतिहास, परंपरा, सभ्यता, संस्कृती, आर्थिक विचार, समानतेचे तत्त्व, महिलांचे हक्क, ज्ञान-विज्ञान, तत्त्वज्ञान इत्यादी ज्ञानशाखेकडे दुर्लक्ष झालं व धर्मवाद्यांच्या ओंजळीने पाणी पिण्याचे धोरण तरुणांनी स्वीकारले. ह्या अविचारी कृतीने एका पिढीचे धार्मिकदृष्ट्या ‘माईंड हायजॅकीकरण’ झाले.

इस्लामद्वेशातून व मुस्लिमांना डिवचण्यासाठी विविध देशात कार्टूनमधून प्रेषितांच्या कथित अवमानाची मोहिम सुरू झाली. भारतात धार्मिक आस्थेचं बळकटीकरण झालेली ही पिढी लाखोंच्या संख्येने निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरली. दुसरीकडे अरब राष्ट्रात तरुण पिढी राजकीय हक्कांची मागणी करत हुकूमशाही राज्यकर्त्यांविरोधात रस्त्यावर होती. ‘सोशल मीडिया’च्या वापरातून इजिप्तच्या ‘तहरीर’ चौकात तिथल्या सरकारविरोधात लाखोंच्या संख्येने जमली.




राजकीय हक्काची सजगता

राजकीय प्रगल्भतेमुळे तरुणांनी २०११-१२ साली अरब राष्ट्रात ‘क्रांतिचं आंदोलन’ पेटवलं आणि सत्तांतर घडवून आणलं. त्याचवेळी भारतात मात्र ‘सोशल मीडिया’चा वापर धार्मिक प्रवचने, विचार, उपदेशांची रुजवणूक करण्यासाठी सुरू होता. आधुनिक माध्यमाचा वापर कथित धर्मश्रेष्ठत्वाची बीजे रोवण्यास झाली. परिणामी ‘इस्लाम खतरे में’ म्हणत लाखोंचा जमाव रस्त्यावर आणण्यास ह्यांचे मार्गदर्शक यशस्वी ठरले. लोकशाही हक्कांच्या मागणीसाठी सत्याग्रह, निषेध सभा, निदर्शने, प्रदर्शने, आंदोलने, मोच्या काढण्यासाठी हे कंपू रस्त्यावर आले नाही. किंवा शैक्षणिक, आर्थिक तसेच नागरी प्रश्नांसाठी धरणे दिली नाही, आंदोलने केली नाही.

२०१५मध्ये गोगुंडांनी गुजरातच्या उनामध्ये मेलेल्या जनावरांची कातडे काढणाऱ्या दलित तरुणांना मारहाण केली. याविरोधात दलितांनी देशभर निदर्शने, आंदोलने केली. राजकीय हक्कांच्या मागणीसाठी गल्ली ते दिल्ली एक केलं. परंतु मोहसीन, अखलाकनंतरही कुणी मुस्लिम संघटना, धार्मिंक मंच सुरक्षेचा घटनात्मक प्राप्त करून घेण्यासाठी रस्त्यावर आल्याचं दिसलं नाही. मात्र, तोंडी तलाक रद्दीकरणातून सरकारवर व्यक्तिगत कायद्यात हस्तक्षेपाचा आरोप करत, देशभर मुस्लिम समुदाय ‘बीवी-बच्चे’ घेऊन रस्त्यावर आला.

म्हणजे पुन्हा एकदा नागरी प्रश्नावर नव्हे तर धार्मिक प्रश्नांवर मुस्लिमांना सघंटित केलं गेलं. ‘इस्लाम खतरे में’ म्हणत दाढी-टोपी, बुरखाधारकांनी सरकारचा निषेध नोंदवला. याआधी राजकारण्यांनी फूस लावली म्हणून ‘आरक्षणा’ची अनलॉजिक मागणी रेटली. हा एक अपवाद वगळता सामाजिक सुरक्षा आणि घटनात्मक हक्कांसाठी मुस्लिम रस्त्यावर उतरल्याचे दिसले नाही.

धर्मश्रद्धा खतरे में आल्याची बतावणी करत पश्चिम बंगालमध्ये उन्माद सुरू आहे. फेसबुकवरुन प्रेषित आणि पवित्र धार्मिक स्थळांचे अवमान झाल्याने सामाजिक वातावरण अशांत झालं आहे. समाजविघातकी मंडळींनी ‘व्हर्च्युअली’ धार्मिक प्रतीकांची आक्षेपार्ह मांडणी केली म्हणून भावना दुखावले जाणे ही मुळातच हास्यास्पद बाब आहे. एका किरकोळ कृत्याने धर्म कसा संकटात येऊ शकतो किंवा प्रेषितांचा अवमान होईल?

प्रेषितांनी जगाला अहिंसेचे तत्त्व दिले, त्याचा अवलंब करुन अरबस्थानात अनेक राज्यक्रांत्या झाल्या. भारतात गांधींनी हा मार्ग स्वीकारुन स्वातंत्र्य मिळवून घेतलं. मात्र, मुस्लिमच प्रेषितांच्या मार्ग विसरले. खरंच इस्लाम इतका कमकुवत आहे का, याची पुनर्तपासणी व्हायला हवी.

वास्तविक, अशा कृतींवर हिंसक प्रतिक्रिया देण्यापूर्वी ह्या दृष्कृत्यामागचं षडयंत्र विचारात घेणे गरजेचं आहे. अशा वेळी भान ढळू न देता हिंसेला उत्तेजन देणाऱ्या घटकांचा हेतू तपासण्याची गरज असते. कार्टूनचे निमित्त करून दंगली पेटवल्या जातात, हा डावपेच समजण्याची बौद्धिक कुवत मुस्लिमांत का येऊ नये? अविवेकी पद्धतीने विचार केल्यास परिणामी ‘इस्लाम खतरे में’ येणारच की!

अखलाक आणि पहलू खानची हत्या सबंध मानवजातीला हादरवणारी होती. या घटनांचा लोकशाही मार्गाने निषेध व्हायला पाहिजे होता. सामाजिक अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे कुरआनचं एक प्रसिद्ध वचन आहे. “हे लोक काय करतील त्या दिवशी जेव्हा त्यांचा पालनकर्ता त्यांना म्हणेल की हाक मारा त्या विभूतींना ज्यांना तुम्ही माझे भागीदार समजून बसला होता. हे त्यांचा धावा करतील परंतु के त्यांच्या मदतीला येणार नाहीत आणि आम्ही त्यांच्या दरम्यान विनाशाचा एकच खड्डा समाईक करुन टाकू... सर्व अपराधी त्या दिवशी अग्नी पाहतील आणि समजून घेतील की आता त्यात त्यांचे पतन आहे आणि त्यांना त्यापासून वाचविण्यासाठी कोणतेही आश्रयस्थान मिळणार नाही..” सूरह अल् कहेफ (५२-५३)

गोवंश हत्येच्या संशायवरून देशात जे हत्यासत्र सुरू आहे, कदाचित ती एका भयाण वादळाची चाहूल असू शकते. वस्तविक अर्थाने मुस्लिमांपुढे अस्तित्वाचे संकट उभं राहिलं आहे. अशावेळी धार्मिक अस्मिता दुय्यम तर आणि अस्तित्वाचा प्रश्न प्राथमिक झाला आहे! जीवंतच राहिला नाहीत तर इस्लामचे अनुकरण कसे करणार?

जाता-जाता कुरआनमधील एका आयात उद्धुत करतो आणि थांबतो.
“प्रत्येकासाठी एक दिशा आहे जिकडे तो वळतो. तेव्हा तुम्ही सत्कर्मात एकमेकांपेक्षा अग्रेसर व्हा. जिथे कुठे तुम्ही असाल तिथे अल्लाह तुम्हाला एकत्रित करेल” सूरह बकराह (१४८)
कलीम अजीम, पुणे

Twitter @kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ‘इस्लाम खतरे में’लाच रस्त्यावर उतरणार का ?
‘इस्लाम खतरे में’लाच रस्त्यावर उतरणार का ?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgM8fuTvYSA4v9mX-xFdaGNo8HpNVBx4lPdm1afFDcOatYbJgBY5R5FLhkXGZxnYnJuuEjVJW9WtyNSSImbe4FvLSF3Ysws9PrEBP7jzUxIlGUqlDj-9Sn5cXA9f-EmYZQMQDPgyHK4sAjc/s640/ARTICLE_COVER_PIC_1499650421.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgM8fuTvYSA4v9mX-xFdaGNo8HpNVBx4lPdm1afFDcOatYbJgBY5R5FLhkXGZxnYnJuuEjVJW9WtyNSSImbe4FvLSF3Ysws9PrEBP7jzUxIlGUqlDj-9Sn5cXA9f-EmYZQMQDPgyHK4sAjc/s72-c/ARTICLE_COVER_PIC_1499650421.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2017/08/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2017/08/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content