अशालिन ‘हेब्दो’ आणि इस्लाम फोबिया



‘शार्ली हेब्दो’ (Charlie Hebdo) नावाच्या ‘कॉमिक विकली’वर मागील आठवड्यात (12 जानेवारी 2015) दोन सशत्र बंदुकधारीने केलेल्या हल्ल्यात 11 पत्रकारांसह संपादकाचा मृत्यू झाला.
बातमी येताच निषेधाच्या शाब्दिक पट्या ‘त्या’ वादग्रस्त पोस्टरसह फेसबुक आणि ट्विटरवर फ्लॅश व्हायला सुरुवात झाली.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पाकिस्तानातील पेशावर येथे मिल्ट्री शाळेवर दहशतवादी हल्ला करुन सुमारे दिडशेच्या जवळपास शाळकरी मुलांचा जीव गेल्याने भारतीय फेसबुक मीडिया दुखावला होता. भारतात तर पीएमच्या आदेशानंतर प्रत्येक शाळेत आदरांजली वाहण्यात आली. परंतु त्यानंतर दोन आठवड्यापूर्वी भारतात एका नक्षलवादी हल्ल्यात सुमारे 51 जणांचा अमानुष बळी गेला होता, त्यांना कसलीच आदरांजली वाहिली गेली नाही किंवा कोणताच फेसबुक्या दुखावला गेला नाही.

या बोडो हल्ल्यावर साधी दोन ओळीची सुद्धा पोस्ट न टाकणारे आता मात्र हजारो मैल दूर असलेल्या पॅरीसच्या हल्ल्याबद्दल भरभरुन लिहित आहेत. तो वादग्रस्त कार्टून परत जाणून-बुजून वायरल करत असून प्रत्येकांना त्या व्यंगचित्र साप्ताहिकाचा (त्याने केलेले गैरकृत्य वगळता) पुळका येत आहे. मूळ प्रश्नाला हात न घालता ‘फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन’ची चर्चा सुरू आहे. परंतु कोणीच त्या साप्ताहिकाने इस्लामची बेअदबी केली व जगभरातील मुसलमानांच्या धर्म भावनांची थट्टा केली, याबद्दल साधा निषेधही व्यक्त करत नाहीये.

शार्ली हेब्दोवर झालेला हल्ला भूषणावह नाही. त्याचं समर्थन कदापि होऊ शकत नाही. त्यातही पत्रकारितेवर होणाऱ्या हल्ल्याचं समर्थन तर अजिबात नाही. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड इस्लाम धर्माचा व त्याला मानणाऱ्या अनुयायांचा द्वेश केला जात असेल तर त्यावर नक्कीच बोललं पाहिजे.


इस्लाम फोबिया

9 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या वर्ल्ड ट्रैड सेंटरच्या दहशतवादी हल्यानंतर जगभरात मुस्लिमविरोधाची लाट आली. काही विखारी व हिंसक दहशतवादी टोळक्यामुळे सबंध जगभरातील शांततावादी इस्लाम व त्याचे अनुयायी द्वेश व तिरस्काराच्या भयग्रस्त छायेत लोटले गेले.

यूरोपीयन मीडियाने ही संधी म्हणत मुस्लिम द्वेश व पर्यायाने इस्लामचं राक्षसी चित्रण उभं करण्याची स्पर्धा सुरू केली. मुसलमानांसहित कुरआन आणि इस्लामी तत्त्वज्ञानावर हल्ले सुरू झाले. यूरोपीयन मीडियाने विद्वेशाचे पीक कापत जगाला आपले अनुकरण करण्यास भाग पाडले.

टीव्ही चॅनेल, सिनेमा, कार्टून, गेम्स, मैगझिन्स, वेबसाईट्स, पुस्तके इत्यादी माध्यमातून नवा इस्लामद्वेषी आशय रचण्याची स्पर्धा लागली. कुरआन त्याचे तत्त्वज्ञान न अभ्यासता जो तो इस्लामवर लिहू लागला, व्याख्याने देऊ लागला. प्रतिगामी विचारांनी टीव्हीचा मोठा स्लॉट (वेळ) भरला गेला. तीच अवस्था अन्य जनमाध्यमात (मास मीडिया) सुरू झाली. जो-तो इस्लामला विकृत पेश करू लागला.

या इस्लाम फोबियाला केवळ 9/11चा हल्ला कारणीभूत नाही तर अनेक घटनांची किनार जोडलेली आहे. प्रा. फकरुद्दीन बेन्नूर म्हणतात त्याप्रमाणे यूरोपीयन राष्ट्राचे ‘क्रूसेड’नंतर इस्लामकडे लक्ष्य गेले व तिथून इस्लामला बदनाम करण्याचं षडयंत्र आखलं गेलं. बेन्नूर यांचा आधार घेतल्यास असं दिसून येतं की यूरोपीयनांचे इस्लामशी असलेले वैर फार जुने आहे. 9/11नंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हल्ल्याचं निमित्त करून इस्लामला व जगभरातील मुस्लिमांना टारगेट करण्यात येत आहे.

सोव्हियत रशियाच्या विघटनानंतर अमेरिकेने मध्य-पूर्वेतील मुस्लिम राष्ट्रावर विविध कारणावर युद्धे लादली. दूसरीकडे पॅलेस्टाईनचा वाद वाढवला. थोडक्यात सर्वच ठिकाणी मुस्लिमांना व इस्लामला टारगेट करण्यात आलं.
जगात प्रत्येक ठिकाणी इस्लाम संदर्भात नकारात्मक प्रचार व तशा प्रकारची कृत्ये सुरू आहेत. फ्रान्सची बुरखा बंदी त्यातलाच एक प्रकार होता. 

इस्लामचे अभ्यासक व विचारवंत असगर अली इंजिनियर म्हणतात, “पाश्चात्त्य समाज इस्लाम आणि मुस्लिमांप्रती स्वस्थचित्त राहू शकत नाही. इस्लामला ते नेहमीच उपरा व शत्रुत्व असलेला धर्म म्हणून पाहतात. बुरखा घालणाऱ्या शाळकरी मुलींमुळे फ्रान्सचे शासन व राज्यकर्ते अस्वस्थ झाले. तिथल्या सरकारने हिजाब घालण्याला बंदी घातली आहे. शाळकरी मुलींनी हिजाब घातल्यामुळे फ्रान्सच्या धर्मनिरपेक्षतेला कोणत्या प्रकारे धोका संभवतो हे समजणे खरोखर कठीण आहे.”

प्रेषित मुहंमद (स) हे जगभरातील मुसलमानांचे आदर्श आहेत. त्यांनी मानवाला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करत, आर्थिक समानतेचे तत्त्व सांगत, एकसमान हक्काची वाटणी करत, जगाला शांतता पटवून देत इस्लामची प्रस्थापना केली. इस्लामने जगाला सर्वप्रथम स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची विचारप्रणाली दिली. केवळ इस्लामधर्मीयच नाही तर सबंध जाति-धर्मातील मानवाचं कल्याण कसे होईल, याचं तत्त्वज्ञान त्यांनी मांडलं.

प्रेषितांना केवळ मुस्लिमच नाही तर जगभरातील शांततावादी, समन्वयवादी लोक आदर्श मानतात. अशा आदर्शवीर महामानवांवर विकृत पद्धतीने निंदानालस्ती करणे कुठल्या तत्त्वात बसते? प्रेषितांची प्रतीकात्मक विटंबना केली की जगभरातील मुस्लिम चवताळतात आणि त्यांना उद्दिपीत करण्यासाठी म्हणून यूरोपीयन राष्ट्रे प्रेषित व इस्लामबद्दल अपसमज सतत पसरवत असतात. केवळ मुसलमानांना डिवचण्यासाठी अशा पद्धती राबविल्या जातात. अशा प्रकारच्या कुरघोड्या करण्यामागे मुसलमानांना पेटवणे, त्यांची मानहानी करणे, त्यांना हिंसक व विकृत ठरविणे, शांततेचे शत्रू ठरविणे इत्यादी बाबी अशा विखारी कृत्यातून राबविल्या जातात.



अभिव्यक्ती की द्वेश स्वातंत्र्य?

जगभरातील सोयीच्या अभिव्यक्तीचे अंधभक्त शार्ली हेब्दोच्या या विद्वेशी कृत्याचं समर्थन करत आहे. प्रत्येकजण ‘स्टिफन शार्बोनेर’च्या (संपादक) दुसर्‍याच्या धर्मभावनेची चेष्टा करण्याचा द्वेषी व इस्लामद्वेशी प्रवृत्तीचा पुरस्कार करताना दिसत आहे. मूळ प्रश्नाला बाजूला सारून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा व चर्चा सुरू आहेत. या हल्ल्यानंतर शार्लीच्या व्यवस्थापनाने लगेचच पुढचा अंक काढू असं जाहीर केलं. हा केवळ इस्लामद्वेश नाही तर विकृती आहे.

अभिव्यक्तीच्या नावाने जगभरातील इस्लाम धर्मीयांच्या भावना दुखावण्यात कसलं आलं शहाणपण व पुरोगामित्व? ही अभिव्यक्ती नाही तर इस्लामचा, तिरस्कार, द्वेश व मत्सर आहे. त्यासाठी शार्लीनं जगभरातील कथाकथित प्रोग्रेसिव्ह व अभिव्यक्तीचे पुरस्कर्ते कामाला लावले आहेत.

शांततावादी, समन्वयवादी व प्रोग्रेसिव्ह म्हणवणाऱ्या कुठल्याही इसमाने शार्बोनेरच्या त्या विकृतीचा साधा निषेधदेखील नोंदवला नाही. उलट ‘कितीही हल्ले झाले तरीही आम्ही दशतवादाविरोधात बोलूच’ अशी प्रतिक्रिया देऊन ते मोकळे झाले. त्या गलिच्छ, विद्वेशी व विकृत कार्टून प्रकाशित केल्याबद्दल साधा निषेध किंवा ‘कडी निंदा’देखील कोणी केली नाही. याचा दुसरा अर्थ असा ते शार्ली हेब्दोकडून झालेल्या इस्लामच्या बदनामीच्या निंदनीय कृत्याचं सर्मथन करत होते.

‘शार्ली हेब्दो’च्या निमित्ताने अभिव्यक्तीच्या त्या जून्या चर्चा पुढे येऊ लागल्या आहेत. या प्रकरणाची ज्याप्रमाणे चर्चा सुरू आहे. त्याला तीन प्रकारात विभागता येऊ शकते. प्रथम गट जो प्रत्येक हल्ल्याच्या विरोधात आहे आणि प्रकाशित कार्टूनसंदर्भात कोणतीच प्रतिक्रिया देत नाही, दुसरा गट म्हणजे हल्ल्याच्या विरोधात आहे. तिसरा गट कार्टूनमुळेच हल्ला झाला, असं बोलणारा आहे.

पहिल्या कप्प्यात ते सामील आहेत जे अमीर खानच्या ‘पीके’ सिनेमावर बंदी आणायच्या गप्पा करत होते. अचानक धार्मिक कूस बदलता ते शार्लीच्या अभिव्यक्तीचे समर्थक झाले. दूसर्‍या कप्प्यातील सर्वच त्या हल्ल्याला निंदनीय मानणारे आहेत. पण शार्लीनं केलेच्या अक्षम्य चुकीबद्दल इस्लामच्या राक्षसीकरणावर एक अवाक्षर ते काढत नाहीत. तिसर्‍या कप्प्यात धार्मिक विद्वेश पसरवण्यात जबाबदार गट; यावर ताशेरे ओढत आहे.

वास्तविक, प्रेषित मुहंमद (स) यांची कोणतेच चित्र, प्रतीमा, आकृती नसताना अशा प्रकारे उपहासात्मक चित्रे काढून मुस्लिमांच्या ठरवून रोष ओढवून घेतला जात आहे. अशा कृती घडल्या की मुसलमान अस्वस्थ होतात, प्रतिक्रिया देतात, हिंसा करतात आणि या कृतीमधून मुसलमानांना दोषी, असहिष्णू ठरवून त्यांना झोपडले जाते. हे प्रकार नित्याचेच झाले आहे. कुठलाही व्यक्ती हे प्रकार रोखले पाहिजे असा मताचा दिसून येत नाही.

ज्या पद्धतीने इस्लामच्या आदर्श प्रतीकांची निंदानालस्ती केली जाते त्याच पद्धतीने जगातील अन्य धर्मातील प्रतीकांची, धर्मग्रंथाची, प्रेषितांची व इश्वराची का होत नाही. अर्थातच ते कोमालाही शक्य नाही कारण त्यातून थेट कार्रवाई अपेक्षित आहे. दूसरं म्हणजे असा विचारही कोणी करू शकत नाही. कारण इस्लाम हा महात्मा गांधींसारखा झालेला आहे. कोणीही टीका करा, भलबुरं बोला, वाट्टेल ते करा त्याला कोणीही काही बोलणार नाही. या वृत्तीमुळे समाजात इस्लामविरोधात दृष्कृत्ये व विखारी प्रवृत्ती वाढली आहे.




नियोजनबद्ध कार्यक्रम

2011 साली शार्ली हेब्दोने अत्यत खालच्या पातळीवर जाऊन जगभरातील मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रेषितांनाच अतिथी संपादक करुन विशेषांक काढला होता. मास्कहेडच्या खाली उपशिर्षक देऊन ‘शरिया हेब्दो’ असे लिहिले होते. या विशेषांकाचा जगातून बराच विरोध झाला होता. तत्कालिन फ्रान्सचे राष्ट्रपती ‘यॉक शियॉक’ यांनी या साप्ताहिकास विद्वेशी म्हटले होते. तरीही दूसऱ्यांदा शार्ली हेब्दोनं ठरवून हे विद्वेशी कृत्य केलं आहे. या कृतीवरून हे स्पष्ट होते की हे इस्लामला बदनाम करण्यासाठी व जगभरातील मुस्लिमांना डिवचण्यासाठी नियोजनबद्ध केलेली कृती आहे.

शार्ली ‘लेफ्टिस्ट’ विचारसरणीचे मानलं जातं. डाव्यांचा नास्तिकपणा समजू शकतो काहीबाबतीत ते तार्किकता सांगत पुरावे देतात किंवा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. असे असले तरी इतरांच्या धर्म भावनांची थट्टा करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होत नाही. शार्ली हेब्दोनं प्रेषितांच्या नावाखाली नियोजितपणे मुस्लिम द्वेश पसरवून सांप्रदायिकता वाढवण्याचे काम केलं आहे. (या पाठीमागे कोणते छुपे युरोपियन राजकारण आहे ते अद्याप गुलदस्त्यात आहे)

शार्लीनं हे फक्त इस्लामच्या बाबतीत असं केलं असं नाही. तर कैथलिक आणि ज्यूंच्या बाबतीतही असे वारंवार नियोजितपणे वादग्रस्त ‘रिलीजियस कंटेट’ प्रसारित करण्याचे काम केलेलं आहे. फक्त धार्मिक नव्हे तर राजकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर जाऊन बरंच वादग्रस्त लिखाण या साप्ताहिकातून वारंवार प्रसारित होतं. त्यामुळेच ‘शार्ली हेब्दो’ला तद्दन फालतू, अश्लिल आणि सांप्रदायिक हिंसा उत्पन्न करण्याचा कारखाना म्हटलं जात होतं.

‘शार्ली हेब्दो’ने तर 2011 पासून अशा स्वरुपाचे बदनामीचे नियोजनबद्ध षडयंत्र चालवलेलं आहे. म्हणजे असे वाद उत्पन्न करणे म्हणजे “आ बैल मुझे मार” सारख्या सांडाला लाल रंगाचा कपडा दाखवणेच होय. शार्लीला इस्लामचा दुष्प्रचार करायचा नव्हता, असंही म्हटलं गेलं. बाकी चेष्ठा विचारात घेतल्यास एक लक्षात यईल की, केवळ प्रसिद्धीसाठी हा सगळा खटाटोप आहे.

द्वेषाणूचे रोपण

या घटनेची पाळंमुळं शोधल्यास असे लक्षात येईल की, मुस्लिमांविरोधात सातत्याने हल्ले झाल्याचे प्रकार फ्रान्समध्ये झालेले आहेत. बुरख्यावर बॅन आणणे, रस्त्यावर महिलांचे बुरखे जबरदस्तीने खेचणे, यांसारख्या घटना मागील पाच वर्षात घडल्या आहेत. यात आणखीन एक ठिणगी जोडली ‘मिशेल ह्यूलबेक’ (Michel Houellebecq) नावाच्या लेखकाने, याने काल्पनिक कादंबरी लिहून नविन वाद उत्पन्न केला.

या कादबंरीत ‘युनायटेड मुस्लिम पार्टी’ नामक एका राजकीय पक्षाच्या हाती फ्रान्सची सत्ता गेली असून राष्ट्राचं इस्लामीकरण झालं असल्याची कल्पना रंगवली आहे. या कथित इस्लामी राष्ट्रात इस्लामी कायदे लागू आहेत, अशा देशात आता जगणं दूभर झालं आहे, असं काल्पनिक कथन यात केलं आहे. या कादंबरीवर मागील बर्‍याच दिवसापासून वाद सुरू आहे. बुधवारी ही कादंबरी प्रकाशित झाली. ‘शार्ली’ने मुखपृष्ठावर या पुस्तकाचे कव्हर पेज छापले, अन् त्याच रोजी हा हल्ला झाला. अशा घटनांना थांबवणे किंवा यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. अशा घटनामुळे पूर्वग्रह आणि तुच्छतावाद जन्मास येतो आणि धार्मिक ‘कोल्ड वॉर’ सुरू होतो. अशा कोल्डवॉरच्या अनेक घटना इतिहासात आहेत.

सहनशिलता का नाही?

भारतात काही वर्षांपूर्वी प्रेषितांसंदर्भात परिक्षेत वादग्रस्त प्रश्न विचारण्यात आला होता. नंतरच्या काही दिवसात त्या पेपर सेट करणार्‍या प्राध्यापकावर जीवघेणा हल्ला झाला. 2006 मध्ये डेन्मार्क येथे असेच वादग्रस्त कार्टून प्रकाशित झाल्यामुळे जगभरातून बराच विरोध व जाळपोळ झाला होता.

शार्लीच्या घटनेनंतर भारतातील प्रमुख वृत्तपत्राच्या वेबसाईटवर सदरील वादग्रस्त चित्र प्रकाशित करुन इस्लामबद्दल विद्वेश पसरवण्यात आला. या कृतीतून मुस्लिमांच्या श्रद्धापुरुषाचा अवमान करण्यात आला. याचा अर्थ असा होतो की, प्रसारमाध्यमांना हा वाद शमावायचा नसून भडकवायचा आहे.

शार्लीच्या घटनेनंतर बसपचे माजी मंत्री याकूब कुरेशी याने हल्लेखोरांवर 51 कोटीचे ‘इनाम’ जाहीर केले. नऊ वर्षापूर्वी डेन्मार्कच्या घटनेवेळी कुरेशीने असेच इनाम जाहीर करुन आमदार झाले होते. कुरेशीला भर चौकात भारतीय मुसलमानांनी दोन-दोन फटके मारले पाहिजे. पण मुसलमान ते करणार नाहीत. कारण त्यांना हिंसक व भावनात्मक प्रतिक्रिया देणं आवडतं.

सलमान रश्दी यांनी कथितरित्या प्रेषितांचा अवमान केला होता. त्यावर डॉ. रफिक जकारिया यांनी टाइम्स ऑफ इंडियामधून लेखमाला लिहिली होती. त्याचं नंतर ‘मुहंमद अँड कुरआन’ पुस्तकात रुपांतर झालं. या तोडीचं अन्य पुस्तक अजून लिहिलं गेलं नाही. इस्लाम फोबिया व इस्लामविरोधातील विकृतीला लिखामातून मुसलमान उत्तर देत नाहीत. जकारिया सारखा एखादाच अपवाद असतो.

मुस्लीम समुदायाने सहनशीलता जोपासण्याची गरज आहे. कुठल्याही भिकार कार्टूनमुळे इस्लामचा व त्यांच्या अनुयायांचा अवमान होत नाही. इस्लामचे तत्त्वज्ञान इतक्या खालच्या थराला जाऊन प्रतिक्रिया देण्याचं कदापि समर्थन करू शकत नाही. निषेध करण्याचा सर्वांना अधिकार आहे पण तो शांततेत व्यक्त झाला पाहिजे.

अशा विखारी कृत्यावर प्रतिक्रिया देण्याआधी मुस्लिमांनी अनेकदा विचार करावा. त्याच्या परिणामकारकतेवर चिंतन करावं. मुस्लीम बुद्धिजीवी वर्ग व राजकीय मुस्लीम नेत्यांनी आपण कोणाच्या हाताचे खेळणं तर बनत नाही आहोत, याची तपासणी केली पाहिजे. अशा विद्वेशी कृत्यावर प्रत्येकवेळी हिंसकच का व्हावे? अशा घटनांना मुस्लिमांनी दुर्लक्ष व बेदखल केलं पाहिजे. इस्लाम शांतताप्रिय धर्म आहे त्यामुळे मुस्लिमांनी हिंसक होणं टाळावं.

सौम्य आणि शांततेच्या मार्गाने निदर्शने करावीत. अशी प्रतिक्रिया हिंसात्मक निदर्शनांपेक्षा अधिक परिणामकारकता दर्शवणारी असते. असगर अली म्हणतात त्याप्रमाणे “असा निषेध जर धार्मिक मुद्द्यांवर असेल तर तो धार्मिक सभ्यतेसहित आणि धार्मिक मूल्यांना सुसंगत असला पाहिजे. एकतर हिंसा समाजविघातक शक्तींना आणि सवंग लोकप्रियता मिळविण्यामागे असलेल्या राजकारण्यांचाच हेतू साध्य करते. काही राजकारण्यांना यामुळे पाश्चात्य संस्कृतीशी दोन हात करण्याची संधी मिळते. परंतु सामान्य मुसलमानाने संयमाने व सभ्यतेनं वागलं पाहिजे.”

कुरआन शार्ली हेब्दोवर झालेल्या अशा प्रकारच्या कुठल्याही हल्ल्याचं समर्थन करत नाही. शार्लीच्या हल्लेखोरांना कठोर शासन व्हावं, अशा मताचा मी आहे. कुरआनने निष्पापांची हत्या निंदनीय व कठोर गुन्हा मानला आहे. मी इस्लामला मानणारा एक सश्रद्ध मुस्लिम आहे. माझा इस्लाम हा बुद्धिप्रामाण्य आहे. इस्लाम अनुकरण व मिथकांवर आधारलेला नाही.



सामाजिक सुरक्षा धोक्यात

हिंसा घडवून युरोपीयन मुस्लिमांच्या सामाजिक व व्यक्तिगत जीवनाशी छळण्याचा अधिकार ‘त्या’ दहशतवाद्यांना कोणी दिला. अशा हिंसक प्रतिक्रियेनंतर स्थानिकांवर सामाजिक व आर्थिक संकट ओढवते. हल्ल्याच्या निमित्ताने निष्पाप मुस्लिमांना त्रास दिला जातो, हे 9/11च्या हल्ल्यनेंतर आपण सर्वांनी पाहिले आहे. धर्मआंधळेपणामुळे आजही तिथे नको-नको ते प्रकार घडत आहेत.

त्या हल्ल्यानंतर अमेरिकन मुस्लिमांना जे भोगावे लागले तीच परिस्थिती कदाचित फ्रान्समध्येसुद्धा ओढवेल. हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये काही मस्जिदीवर हल्ला झाल्याच्या बातम्या आल्या. (याच्या बातम्या देण्यात माध्यमाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मुग गिळून गप्प होते) त्यामुळे तिथले मुसलमान भयग्रस्त वातावरणात आहेत. त्यांना वाटते की, अमेरिकन मुस्लिमासारखा आमचाही छळ होईल. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील ओलिस नाट्यानंतर ट्विटरने ‘आय विल राईड विथ यू’ नावाचे कॅम्पेन चालवले. या माध्यमातून भीतीच्या सावटाखाली असलेल्या ऑस्ट्रेलियन मुस्लिमांना धीर व संरक्षण देण्याचा प्रयत्न ट्विटरने केला होता, असे प्रयत्न इथं व्हायला हवा.

दहशतवाद्यांना शांततेचं महत्त्व पटवून देता येत नाही. ते तर हिंसेचे पुरस्कर्ते असतात. त्यांना शांतता अप्रिय असते. त्यामुळे त्यांना कठोर शासन व्हावं आणि ते झालेच पाहिजे. सामान्य मुस्लिमांनी अशा विखारी व नीच प्रवृत्तीवर प्रतिक्रिया देताना हजारदा विचार करावा.

अशा हिंसक धर्मवाद्यामुळे इस्लामची नको तितकी बदनामी झालेली आहे. धर्माच्या नावाने रक्तपात घडवणार्‍यांना इस्लाम कधीच स्वीकारत नाही. ‘बोको हराम’ व ‘आयसिस’ने जो हाहाकार माजवला आहे तो निषेधार्ह आहे, इस्लामला असा रक्तपात बिलकुल मान्य नाही.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा सर्वाचेच सार्वभौमिक हक्क आहे. म्हणून कोणत्याही जाती-धर्माबद्दल आक्षेपार्ह लिहिणे, बोलणे व त्याविरोधात विखारी प्रतीमा रंगवण्याचा अधिकार कोणालाही प्राप्त होत नाही. कलेच्या नावाखाली इस्लामची बदनामी व त्याच्या मानणाऱ्याविरोधात तिरस्कार, द्वेश व गृहयुद्धे पेटवण्याचा अधिकार मिळता कामा नये.

कलीम अजीम, पुणे

(मुळ लेख दैनिक प्रजापत्रच्या रविवार पुरवणीत "सोशल कट्टा" या सदराखाली प्रकाशित)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: अशालिन ‘हेब्दो’ आणि इस्लाम फोबिया
अशालिन ‘हेब्दो’ आणि इस्लाम फोबिया
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhgiRkWJw-0jODpxqE-pVLeTpVi6v0_522y8-mm5kfeoS20jtLOXG5_552OmjUvz810K6g5rUi_llc2u6jajXePkq-Zit12TnCoSg8I4D60lZ-E9u9XpSD5wGLkeGkrTF-P2IpuSQeHmoY1/s1600/Charlie+Hebdo+attack.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhgiRkWJw-0jODpxqE-pVLeTpVi6v0_522y8-mm5kfeoS20jtLOXG5_552OmjUvz810K6g5rUi_llc2u6jajXePkq-Zit12TnCoSg8I4D60lZ-E9u9XpSD5wGLkeGkrTF-P2IpuSQeHmoY1/s72-c/Charlie+Hebdo+attack.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2015/01/blog-post_20.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2015/01/blog-post_20.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content