मक्केचा चक्रावणारा व रक्तरंजित इतिहास


समर खडस यांचा नजरिया :

मुसलमान ही एक अखंड जमात नसून तीत वैविध्य आहे आणि मुसलमानच नव्हे तर अरब मुसलमानांमधील अनेक पंथोपपंथांतील रक्तरंजित लढायांमुळे इस्लाममधील सर्वात पवित्र स्थळाचेही अनेकदा नुकसान झाले आहे, असे डोळे उघडायला लावणारे अनेक ऐतिहासिक दाखले देणारे झियाउद्दीन सरदार (Ziauddin Sardar) यांचे मक्का द सेक्रेड सिटी’ (Mecca: The Sacred City) हे पुस्तक महत्त्वाचे आहे.

मक्काहा शब्द इंग्रजीत एखाद्या जागेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी वापरला जातो. मात्र, मुस्लिमांचे सर्वात पवित्र ठिकाण असलेल्या मक्काया शहराचे ऐतिहासिक महत्त्व इस्लामच्या कितीतरी शतके आधीपासून अरबस्तानात मान्य केले गेले होते.

पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश लेखक झियाउद्दीन सरदार यांनी आपल्या मक्का द सेक्रेड सिटीया पुस्तकाद्वारे मक्केचा ख्रिस्तपूर्व १६०० पासून ते आजपर्यंतचा इतिहास सांगितला आहे. हा इतिहास सांगताना सरदार यांनी इस्लाममधील गेल्या जवळपास १५०० वर्षांमधील अनेक महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडी व जडणघडणीची विस्तृत चर्चा केली आहे.

सौद या वहाबी पंथीय राज घराण्याच्या हातात मक्का व मुस्लिमांसाठी पवित्र असणाऱ्या काबा या आयताकृती ढाच्याचा ताबा आल्यानंतर काबा ही एकमेव इमारत सोडल्यास सौदी सरकारने सर्व ऐतिहासिक इमारती जमिनदोस्त केल्या.

वाचा : इस्लामशिवाय जग कसे असते ?

वाचा : मदीनेतील ज्यू धर्मीयांचा अरबांशी संघर्ष

सौद घराण्याच्या म्हणण्यानुसार मुहंमद (स) पैगंबरांच्या आधी किंवा त्यांच्यानंतर इतिहासाचे अस्तित्त्वच नाही. मुळात इस्लामच्या पाच मूलतत्त्वांमधील हज या मूलतत्त्वाचे पालन करण्यासाठी जगभरातून येणाऱ्या मुस्लिमांनी अल्लाऐवजी मुहंमद किंवा तत्कालीन व्यक्तींची पूजा करू नये म्हणून ऐतिहासिक वास्तू नष्ट करणे वा पुरावे संपवून टाकणे हा मार्ग त्यांनी आवलंबला. त्यामुळेच आधुनिक भूमिकेतून इस्लामी इतिहासाच्या अभ्यासात किंवा मांडणीत अनेक अडथळे येत राहतात.

इस्लामी इतिहासाच्या आधुनिक पद्धतीच्या अभ्यासाची व्यापक सुरुवात खरेतर ९-११च्या हल्ल्यानंतरच झाली. तो करणाऱ्या रेझा असलान, इरशाद मांजी, हुसेन नासर या अभ्यासकांच्या मांदियाळीतले झियाउद्दीन सरदार हे तितकेच महत्त्वाचे विचारवंत आहेत.

१९७५ साली स्वतःच्या आईबरोबर पहिल्यांदा हज करण्यासाठी मक्केला गेलेल्या सरदार यांच्या नेणिवेत मक्केइतके पवित्र जगात काहीच नाही, हे लहानपणी बिंबविण्यात आले होते. घरातील ज्येष्ठांकडून व नंतर मदरशात मारून मुटकून घोटवून घेण्यात आलेल्या इस्लामी इतिहासातून ही नेणीव तयार झाली होती. मात्र सरदार यांच्या मनातील मक्केबद्दलचे आकर्षण हे पुढे केवळ पवित्रतेपुरतेच राहिले नाही.

जगावर प्रभाव टाकणाऱ्या धर्माचे उगमस्थान असलेल्या या शहराचा सामाजिक, राजकीय, आर्थिक इतिहास कसा असेल, या सातत्याने मनात घोंघवणाऱ्या प्रश्नांची उकल करण्याच्या तीव्र इच्छेतूनच मक्का द सेक्रेड सिटीहे पुस्तक लिहिले गेले.

मक्का म्हणजे अनेक धर्म, पंथ, रूढी, परंपरा, लढाया आणि समज यांच्या मिश्रणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले ठिकाण आहे. आदम किंवा अॅडम या पहिल्या मानवाचे घर असल्याचा समज असलेल्या शहरातील काबा ही पवित्र वास्तू इब्राहिम (अब्राहम) आणि त्यांचा मुलगा इस्माईल (एश्माईल) यांनी ख्रिस्तपूर्व १८१२ ते १६३७च्या दरम्यान बांधली.

पहिल्यांदा काबाचा लेखी उल्लेख ख्रिस्तपूर्व १०० मधील बिब्लिओका हिस्टॉरिकाया सिक्युलसच्या ग्रंथात सापडतो. पुढे टोलेमीच्या जॉग्रफीया ग्रंथातही याचा उल्लेख आहे.

इ. स. ५७०मध्ये पैगंबरांचा जन्म होण्याआधीपासून आणि त्यांच्यानंतरही काबाचे महत्त्व कायम राहिले आणि त्याच्यावरील हक्कासाठी अनंत लढाया झाल्या. इस्लामच्या स्थापनेनंतरही मुस्लिमांमध्ये त्याच्यावरील हक्कांसाठी झालेल्या अनेक लढायांमध्ये काब्याचे प्रचंड नुकसानही झाले.

वाचा : इस्लामचा अवास्तव संदर्भ जिथेतिथे कशासाठी?

वाचा : मुस्लिम समाज पुन्हा ज्ञान-विज्ञानाची वाट धरू शकेल?

सन ६०५ मध्ये काबाच्या पुनर्बांधणीत स्वतः पैगंबर यांनी भाग घेतला होता. त्यांच्या मृत्यूनंतर अब्दुल्ला जुबैर याने सन ६३८ मध्ये मक्का हे स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केले. त्यानंतरच काब्याला मध्यभागी ठेवून भव्य मस्जिदीच्या निर्माणाची सुरुवात झाली.

काबाच्या भिंती चमकवण्यात आल्या, इजिप्तहून आणलेल्या मखमली कापडाचे त्यावर आवरण घालण्यात आले. पुढे सन ७५० पर्यंत मक्का या शहराची एक कॉस्मोपॉलिटन श्रीमंत शहर म्हणून जगाला ओळख होऊ लागली. जगभरातील मुस्लिम राजांकडून या शहराला महागड्या देणग्या देण्यात येऊ लागल्या.

काबूलच्या राजाने रत्नजडित सिंहासन भेट दिले तसेच खलिफा अल् महदी याने तीन कोटी दिऱ्हाम मक्केत वाटले, असे अगणित दाखले आहेत. मात्र भारतातील मोगल सम्राटांकडून मक्केला कधीच फारशा महागड्या भेटवस्तू दिल्या गेल्या नाहीत.

अब्बासीद खलिफा किंवा ऑटोमान सुलतानांकडूनही पंधराव्या-सोळाव्या शतकात मक्केला अगणित संपत्ती दिली जात असे. मोगल बादशहा मात्र स्वतः लिहिलेली कुरआनची प्रत वगैरेच पाठवत असत. बाबरने अशी पहिली स्वतःच्या हस्ताक्षरातील कुरआनची प्रत मक्केला भेट दिली होती. मात्र मक्का ज्या शरिफांच्या ताब्यात असे त्यांची इच्छा रोकड मिळावी ही असे. त्यामुळे मोगलांविषयी आणि एकूणच भारतातील मुस्लिमांविषयी मक्केतील शासन, प्रशासन व जनतेत फारशी चांगली मते नव्हती.

१६५९मध्ये औरंगजेबने ६,६०,००० रुपये मक्केतील शरिफाला पाठविले होते. मात्र मक्केतील शरिफाच्या दृष्टीने अत्यंत तुटपुंजी असलेली ही रक्कम त्याने परत केली होती व औरंगजेबला ओळखत नाही, असा निरोपही धाडला होता.

वाचा : अशालिन ‘हेब्दो’ आणि इस्लाम फोबिया

मोगलांचेही मक्केतील शरिफाविषयी फारसे चांगले मत नव्हते. धर्माच्या नावाखाली मक्केत केवळ लूट चालते असेच सर्वसाधारण सर्व मोगल बादशहांचे म्हणणे होते. किंबहुना राज्य कारभारात कारणाशिवाय ढवळाढवळ करणारे दरबारी, मौलवी, किंवा नातेवाईक यांना एक प्रकारची सजा म्हणूनच मक्केला धाडण्याचा फतवा मोगल बादशहा जारी करत असत.

मक्केला जाऊन परत आलेले बहुतांश लोक हे मक्केतील लोकांकडून वाईट वागणूक मिळाल्याच्या आठवणींसह तरी परत येत किंवा अट्टल गुन्हेगार म्हणून तरी परत येत, अशी मोगलांची समजूत होती. त्यामुळे त्यांनी हज यात्रेत फारसा रस कधीच दाखवला नाही, असे सरदार म्हणतात.

भोपाळच्या राणी सिकंदर बेगम यांना ब्रिटिश दरबारी मोठा मान होता. ब्रिटिशांकडून नाइट्स ऑफ द स्टार ऑफ इंडियाहा खिताब मिळालेल्या त्या एकमेव राणी होत्या. त्यांनी १८६४ साली हज यात्रा केली. त्या यात्रेत त्यांना तेथील शरिफ व प्रशासनाकडून आलेले भयंकर वाईट अनुभव सरदार यांनी दिले आहेत.

बेगम यांनी मक्केत दान करण्यासाठी आणलेल्या भेटवस्तू, रुपये आदी अनेक गोष्टी त्यांची बोट जेद्दा या मक्केजवळच्या बंदराला लागल्या लागल्याच लुटले गेले. त्यांना राणीप्रमाणे वागवले गेले नाही. त्यांच्या नोकरांना झालेली प्रचंड मारहाण, तसेच त्यांनाही मक्केच्या शरिफकडून येणाऱ्या अप्रत्यक्ष धमक्या यामुळे बाई पार वैतागून त्यांनी मक्का या शहराविषयी अत्यंत वाईट मत व्यक्त केले होते.

मक्का व व्हॅटिकन यांच्यातील मुख्य फरक असा की, मक्केतून जगभरातील मुस्लिम राज्यकर्त्यांना वा राष्ट्रप्रमुखांना कधीच राजकीय सल्ला दिला गेला नाही. त्यामुळेच मक्केची दमास्कस, कैरो, किंवा बगदादसारखी वाताहत कधीच झाली नाही.

सुमारे १५०० वर्षे ही यात्रा आपल्या पद्धतीने व परंपरांसह अबाधित राहिली. हे जरी खरे असले तरी, इस्लामच्या पाच तत्त्वांपैकी एक असलेल्या हजयात्रेपोटी मिळणाऱ्या प्रचंड पैशांवर व जगभरातील मुस्लिमांच्या मनात या शहराविषयी असलेल्या पवित्रतेच्या भावनेपोटी अनेकांनी या शहरावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यात अनेकदा मक्का शहराचे व काबा या पवित्र वास्तूचे अपरिमित नुकसान झाले.

वाचा : मुहमंद पैगंबरांचे आर्थिक तत्त्वज्ञान

वाचा : दहशतवाद आणि मुस्लिम प्रबोधनाची दिशा

६९२मध्ये उमय्याद घराण्याचा सरदार हजाज बिन युसूफ याने मक्केवर ताबा मिळविण्यासाठी केलेल्या युद्धात काब्याचे प्रचंड नुकसान झाले. मक्का यात्रेकरूंची कर्माती टोळ्यांकडून होणारी सततची लूट व त्यांनी सन ९३०मध्ये मक्का शहर जिंकून केलेली मक्का शहरातील हजारो रहिवाशी व यात्रेकरूंची कत्तल आणि काब्याची लूट, असा मुस्लिमांतर्गत लढायांचा इतिहास सरदार यांनी या पुस्तकात मांडला आहे.

कर्माती हे शिया इस्माईली पंथाचे सुधारणावादी होते. त्यांनी हजयात्रेकरूंना लुटण्याचा राजकीय निर्णयच घेतला व मक्केवर ताबा मिळविण्यासाठी वारंवार हिंसक संघर्ष केला. आदमला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा झाली तेव्हा सुरुवातीला पांढरा असलेला काळ दगडही पृथ्वीवर आणण्यात आला, असा मुस्लिमांमध्ये समज आहे.

काब्यावर लावलेल्या या काळ्या दगडाला स्पर्श करणे अत्यंत पवित्र समजले जाते. कर्माती टोळ्यांनी हा दगडही पळवला होता. पुढे तो त्यांनी परत केला. मात्र त्याचे सात तुकडे केले गेले. मक्केतील पवित्र झरा असलेल्या झमझम या विहिरीचीही नासधूस कर्माती टोळ्यांनी केली होती.

मुहंमद इब्न अब्दल वहाब या धर्मअभ्यासकाने अठराव्या शतकात इस्लामच्या पुनरुज्जीवनाची चळवळ सुरू केली. इस्लाममधील विविध परंपरांना नाकारून त्याने पैगंबरांच्या काळातील धर्माच्या विरोधात जाणाऱ्याला धर्मविरोधक म्हटले. वहाबला अरबस्तानात प्रचंड विरोध झाला. मात्र सौद घराण्याने त्याचे शिष्यत्व स्वीकारले.

१८९१मध्ये वहाबचा मृत्यू झाला तेव्हा अनेक आक्रमक तरुणांनी त्याचे शिष्यत्व स्वीकारले होते. या वहाबी पंथीयांनी मक्केचा ताबा मिळविण्यासाठी युद्ध सुरू केले. त्यात त्यांना अनेकदा मात खावी लागली. मात्र १८०६मध्ये मक्का शहर त्यांच्या ताब्यात आले. पुढे १९२६मध्ये अब्दुल अजिज बिन सौद याने स्वतःला हिजाज म्हणजे मक्का, जेद्दा व भोवतालच्या प्रदेशाचा राजा घोषित केले.

तेलाचा शोध लागला होता. औद्योगिक क्रांतीनंतर तेलाचे महत्त्व सगळ्या जगाने ओळखले होते. आधीच जगभरातून हज यात्रेसाठी येणाऱ्यांकडून मिळणाऱ्या पैशाबरोबरच आता काळे सोने वहाबी सौद घराण्याच्या हातात आले. त्यातून एकीकडे मक्का शहाराला न्यूयॉर्क किंवा लंडनसारखा पाश्चिमात्य चेहरा देण्याचा प्रयत्न झाला, तर दुसरीकडे विविधतेने नटलेल्या इस्लामी परंपरांच्या विरोधात वहाबी पंथाचा पुनरुज्जीवनवाद उभा करण्यासाठी पेट्रो डॉलर्सची मदत सुरू झाली.

मक्का या शहराच्या निमित्ताने अरबस्तानातील इस्लामी इतिहासाचे अत्यंत उत्कृष्ट विवेचन सरदार यांचे पुस्तक करते. द नो नॉनसेन्स गाईड टू इस्लामपासून पोस्टमॉडर्निजम अँड अदरपर्यंत विविध विषयांवर पुस्तकं लिहिणारे सरदार यांचे हे पुस्तक केवळ त्यांच्या ओघवत्या शैलीमुळे किंवा वाचनीयतेमुळे चांगले झाले आहे, असे नाही. तर, मुसलमान ही एक अखंड जमात नसून तीत वैविध्य आहे.

केवळ मुसलमानच नव्हे तर अरब मुसलमानांमध्येही अनेक, पंथ होते व आहेत. त्यांच्या आपापसातील रक्तरंजित लढायांमुळे इस्लाममधील सर्वात पवित्र स्थळाचेही अनेकदा नुकसान झाले आहे, असे डोळे उघडायला लावणारे अनेक ऐतिहासिक दाखले वाचकांच्या ज्ञानात भर घालतात म्हणून हे पुस्तक महत्त्वाचे आहे.

पुस्तकाचे नाव - Mecca: The Sacred City

लेखक - Ziauddin Sardar

पाने - 448

भाषा - इंग्रजी

(Bloomsbury) ब्लूम्सबरी, इंडिया पब्लिकेशन

(समर खडस यांचे हे टिपण २३ मे २०१५च्या महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झालेले आहे.)

जाता जाता :

* इस्लामी जाणिवांचा डावा अन्वयार्थ

‘अया सोफिया’ सांस्कृतिक वर्चस्ववादाचा बळी

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: मक्केचा चक्रावणारा व रक्तरंजित इतिहास
मक्केचा चक्रावणारा व रक्तरंजित इतिहास
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgq0_fkuZFTd2qkyoBpTJRaRB7tY94-46PiCxsM91B5IC6WuDM26FE2YTC9tGRduObRwxr8LWgh8jfOE4K-PhbhwCff2q_bfJguqzITO6P7noYHWo_y5zRZpVSQV7Nao0gG3Kxzop6wBOOy/w640-h400/Hajj+2020.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgq0_fkuZFTd2qkyoBpTJRaRB7tY94-46PiCxsM91B5IC6WuDM26FE2YTC9tGRduObRwxr8LWgh8jfOE4K-PhbhwCff2q_bfJguqzITO6P7noYHWo_y5zRZpVSQV7Nao0gG3Kxzop6wBOOy/s72-w640-c-h400/Hajj+2020.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2015/05/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2015/05/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content