श्रद्धा आणि ज्ञान-विज्ञानाची हास्यास्पद तुलना

दिल्लीत प्रसिद्ध सिने गीतकार जावेद अख्तर आणि मुफ्ती शमाइली नदवी यांच्यामध्ये २० डिसेंबर २०२५ला एक मुक्त चर्चा घडली. त्याचा विषय ‘परमेश्वराचे आहे का?’ असा होता. संबंधित चर्चेत तांत्रिकदृष्ट्या जावेद अख्तर यांचा पराभव झाला असं सांगण्यात येत आहे. तर मुफ्ती शमाइली नदवी विजयी घोषित झाले. या अनुषंगाने बरीच चर्चा सोशल मीडिया व मीडियावर सुरू आहे. बहुतांश चर्चा इस्लाम विज्ञानाला नाकारतो, अशा स्वरूपाची दिसते. या निमित्ताने इस्लामची धर्म समीक्षेवर थोरांनी केलेली मांडणी व त्याचा सारांश इथं देत आहोत.
‘श्रद्धा’ आणि ‘विज्ञान’ यांच्या तुलनेसंबंधी अत्यंत समर्पक चर्चा मौलाना आज़ाद यांनी ‘गुबार ए खतीर’ या पुस्तकात केली आहे. त्यांनी हे पुस्तक १९४२ साली अहमदनगरच्या तुरुंगात लिहिलं होतं. त्यातील एका निबंधात त्यांनी धर्म, श्रद्धा, विश्वास आणि तर्क तथा विवेक इत्यादींवर भाष्य केलेलं आहे. ढोबळ अर्थाने धर्माची चिकित्सक मांडणी म्हणूनही या चर्चेकडे पाहता येईल. वयाच्या २७व्या वर्षी त्यांना स्वत:ला झालेला धर्माचा साक्षात्कार या निबंधात कथन केलेला आहे.

पुढील दोन ओळीत त्याचं बीजरोपण आलेलं आहे. म्हणतात,
“By Faith and faith alone embrace.

Believing, where we cannot prove.”
‘अक्ल’ (विवेक) आणि ‘इमान’ (श्रद्धा) या संदर्भात आज़ाद यांनी केलेली मांडणी बुद्धिप्रामाण्याच्या कसोटीवर टिकणारी आहे. श्रद्धा आणि विज्ञानाचं वेगळे महत्त्व व स्वतंत्र अस्तित्व त्यांनी पटवून दिलेलं आहे. त्याचा थोडक्यात सारांश सांगायचा झाल्यास श्रद्धा आणि विज्ञानाची तुलना कदापी होऊ शकत नाही, अशा स्वरूपाचा आहे. म्हणजे त्यांनी अशा प्रकारच्या तुलनेला सारासार बुद्धीतून विरोध प्रकट केला आहे.

मौलाना आज़ाद यांनी संबंधित निबंधात ‘विवेक’ (Reason) आणि ‘तर्क’ (Logic) याची चर्चा देखील घडवून आणली आहे. मौलाना आज़ाद सारखा आधुनिकतावादी धार्मिक विद्वान व प्रकांड पंडित त्याकाळी नव्हता. त्यांच्या धर्मविषयक मांडणीला अखिल इस्लामी जगतात अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं होतं. त्यांचा तर्जुमान अल कुरआन हा भाष्य ग्रंथ जगभरात पोहोचला होता. त्यात त्यांनी धर्माची आधुनिक तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून मांडणी केलेली होती.

आज़ाद यांनी इस्लाम धर्माविषयी बिजरोपण स्वरूपात तात्विक मांडणी करून ठेवली आहे. त्यांच्या या तत्त्वज्ञानाची दखल महात्मा गांधी, सर्वपल्ली राधाकृष्णन, जवाहरलाल नेहरू आणि ज़ाकीर हुसैन यांच्या सारख्या थोर तत्त्वज्ञांनी घेतलेली होती. त्यांनी कुरआन भाष्य ग्रंथाच्या पहिल्या भागात विवेक आणि श्रद्धा यांचं तारतम्य घडवून बुद्धिप्रामाण्याची विस्तृत चर्चा केली आहे. त्यांच्या ‘अल हिलाल’ व ‘अल बलाग़’मधील एकूण संपादकीय लेखनातही याविषयी विज्ञाननिष्ठ मांडणी दिसून येते.



आज़ादप्रणित मीमांसा

राष्ट्रवाद व मुस्लिम विद्यापीठात संदर्भातील त्यांच्या ‘अल् हिलाल’च्या संपादकीय लेखनातून ज्ञान व्यवहार आणि ज्ञानसंचिताविषयी वेगवेगळे पाश्चात्त्य आयाम व रूपक (मेटाफर) वापरून त्यांनी श्रद्धेपेक्षा ज्ञानसाधनेला अधिक झुकतं माप दिलं आहे. त्यांच्या मते श्रद्धा व विज्ञान हे स्वतंत्र घटक आहेत. त्यामुळे या दोघांची परस्पर तुलना शक्य नाही. वस्तुत: या चर्चेतून ते विज्ञानाला अधिक महत्त्व देतात. त्यांनी आपल्या विचार व लेखनातून पोथिनिष्ठतेला वारंवार नाकारलं आहे.

एके ठिकाणी आज़ाद म्हणतात, “विज्ञान आम्हाला चराचर विश्वाच्या वास्तविकतेशी परिचित करतो. त्याचप्रमाणे भौतिक जीवनातील निर्दयी श्रद्धेची खबरबात देतो. त्यामुळे श्रद्धेचा दिलासा त्याच्या बाजारातही उपलब्ध होऊ शकत नाही. तो विश्वास आणि उमेदाची मागील सर्व दिवे विझवून टाकतो पण एखादा नवीन दिवादेखील प्रकाशमान करत नाही.”

प्रत्यक्ष जगण्यात धर्माची काय भूमिका असते व त्याची गरज का आहे, याविषयी त्यांनी केलेली टिप्पणी मार्मिक आहे. म्हणतात, “मग जर आम्हाला जीवनातील कष्टमय काळात आधार शोधायचा असेल तर त्यावेळी कोणाकडे पहावं? (त्यावेळी) आम्हाला धर्माकडे पाहवं लागतं. ही तीच भिंत आहे ज्याच्या आधारे दुखणाऱ्या पाठीला टेकू लावता येतो.” (पान-५० ते ५३)

इथं बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मविषयक विचार देण्याचा मोह आवरत नाही. त्यांनी धर्माला गरीब, निराश्रितांचा आधार म्हटलं होतं. त्यांच्या मते, धनाड्यांना धर्माची तेवढी गरज भासत नाही, जेवढी निर्धन व निराश्रितांना असते.

बौद्ध धम्माची दिक्षा घेताना डॉ. आंबेडकर म्हणतात, “धर्माची आवश्यकता गरीबांना आहे. पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. Hope! जीवनाचे मूळ आशेत आहे. आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल? धर्म आशादायी बनवितो व पीडितांना, गरिबांना संदेश देतो, ‘काही घाबरू नकोस, होईल, जीवन आशादायी होईल.’ म्हणून गरीब व पीडित मनुष्यमात्र धर्माला चिकटून राहतो.” (प्रबुद्ध भारत, पान-५, १५ ऑक्टोबर २०२५)

तत्वज्ञान हा मौलाना आज़ाद यांचा आवडता विषय होता. शिक्षण काळात त्यांना या विषयाची गोडी लागली होती. वयाच्या पंधराव्या वर्षी लिहिलेल्या असंख्य संपादकीय लेखनातून त्यांनी यावर विस्तृत चर्चा घडवून आणली आहे. त्यांनी श्रद्धा व तर्क यांचा परस्परविच्छेद घडवून आणला. तर्क आणि इमान या दोन स्वतंत्र बाबी असल्या तरी त्या परस्पर छेद देणाऱ्या आहेत, असं त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं.

त्या संदर्भात आज़ाद म्हणतात, “तर्क संशयाचे जे दरवाजे उघडतो, मग पुन्हा त्याला बंद करता येत नाही. विज्ञान आम्हाला प्रमाण देईल, पण तो श्रद्धा देऊ शकत नाही. पण धर्म आम्हाला श्रद्धा देतो, परंतु प्रमाण देऊ शकत नाही.” म्हणजेच श्रद्धा व तर्काला त्यांनी दोन स्वतंत्र घटक मानलं आहे. त्यामुळे या दोन घटकांची तुलना व्यर्थ असल्याचं ते नमूद करतात.

जीवन जगण्यासाठी धर्माची गरज अपरिहार्यपणे का असते, याची त्यांनी साधार मांडणी केलेली आहे. म्हणतात, “जीवन व्यतीत करण्यासाठी केवळ तथ्य आणि वास्तविकतेची गरज नाही तर श्रद्धेचीही गरज असते. आम्ही फक्त त्याच बाबींवर समाधान व्यक्त करू शकत नाही, ज्यांना सिद्ध करू शकतो; त्यामुळे त्याचा स्वीकार करतो. आम्हाला काही अशा गोष्टी हव्या असतात ज्यांना सिद्ध करू शकत नाही, पण त्या मान्य कराव्या लागतात.”

कुरआन का अवतरले, याविषयी त्यांनी ‘तर्जुमान अल कुरआन’च्या प्रस्तावनेत केलेली मांडणी मर्मिक आहे. म्हणतात, “कुरआन केवळ यासाठी अवतरलेले आहे की कोपर्निकस, न्यूटन, डार्विन किंवा एच.जी. वेल्स यांनी कोणत्याही दैवी ग्रंथाविना विश्वाचं जे रहस्य जाणून घेतलं, तीच रहस्ये काही शतके आधी कोड्यांच्या रूपाने जगाच्या कानावर टाकावीत आणि मग ती कोडी शतकानुशतके जगाच्या आकलनातही न यावीत; इतकंच नव्हे तर आधुनिक युगातील भाष्यकारांचा जन्म व्हावा आणि तेच तेरा शतके पूर्वीच्या त्या कोड्यांचा अर्थ उलगडावा. निःसंशय, हेही मतांवर आधारित भाष्य आहे.”

मौलाना आज़ाद यांनी ‘इज्तिहाद’ची प्रणाली अधिक सोपी करून सांगितली आहे. त्यांचे इस्लाम धर्मावरील समिक्षात्मक विचार कुरआनच्या उदार आणि तर्कसंगत व्याख्येवर आधारित आहेत. त्यात ते पारंपरिक ‘तक्लीद’ला (अंधानुकरण) नाकारून ‘इज्तिहाद’ची वकिली करतात. ते इस्लामला आधुनिक काळाशी जुळवून घेण्यावर भर देतात. आज़ाद इस्लामला सार्वभौमिक मानवाधिकारांची घोषणा म्हणून पाहतात, जी फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वीची आहे. ही विचारप्रणाली व्यक्तिमहात्म्य किंवा नोकरशाहीवर आधारित राजवटींना अमान्य ठरवते. ते कुरआनच्या रहमत (दया) या मूलभूत तत्त्वावर भर देतात आणि धार्मिक असहिष्णुतेला इस्लामी भावनेच्या विरुद्ध मानतात.


वाचा : हसरत मोहानी : संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे पहिले राष्ट्रवादी

डॉ. इकबाल यांचे धार्मिक पुनर्विचार

डॉ. मुहंमद इकबाल यांनी देखील श्रद्धा आणि विज्ञानात; विज्ञान सर्वश्रेष्ठ मानलं आहे. त्यांचं ‘द रिकन्स्ट्रक्शन ऑफ रिलिजस थॉट इन इस्लाम’ हा निबंधसंग्रह (१९३०) या चर्चेला चिकित्सक दृष्टिकोन प्रदान करून देतो. त्यांनी धर्माला वैयक्तिक अनुभव आणि सामाजिक संघटनेचे माध्यम म्हणून पाहिलं, जे मानवी विकासाला चालना देते. त्यांच्या विचारांमध्ये इस्लाम हा केवळ वैयक्तिक नसून सामूहिक शक्ती आहे जी आधुनिकता आणि एकेश्वरू तत्त्व यांचा समन्वय साधते.

कुरआनप्रणित ज्ञानाविषयी इकबाल म्हणतात, “यात काहीही संदेह नाही की दैवी ज्ञानाचा स्रोत म्हणून धार्मिक अनुभूतीचं स्पष्टीकरण हे इतिहासात त्या हेतूसाठी मांडल्या गेलेल्या मानवी अनुभूतीच्या इतर क्षेत्रांच्या स्पष्टीकरणांपेक्षा आधीचं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे की अनुभूतीवर आधारित मनोवृत्ती ही आध्यात्मिक जीवनातील एक अपरिहार्य अवस्था आहे. कुरआन मानवी अनुभूतीच्या सर्वच क्षेत्रांना समान महत्त्व देते, कारण ही सर्व क्षेत्रे चराचर वास्तविकतेचं ज्ञान देणारी आहेत. अशी वास्तविकता जी आपले चिन्हे अंतर्मनात आणि बाह्य विश्वात दोन्हीकडे प्रकट करते.”

याच चर्चा उत्तरार्ध सांगताना इकबाल यांनी एक महत्वाची टिप्पणी केली आहे. म्हणतात, “कुरआनचा प्रकृतिवाद हा केवळ या तथ्याची स्वीकारोक्ती आहे की मनुष्याचा निसर्गाशी घनिष्ट संबंध आहे. निसर्गातील शक्तींवर नियंत्रण मिळवण्याच्या साधनरूप शक्यतेचा विचार करता, या संबंधाचा उपयोग वर्चस्वाच्या अनैतिक इच्छेसाठी नव्हे, तर आध्यात्मिक जीवनाच्या उत्क्रांतीकडे झुकणाऱ्या परमोच्च उद्दिष्टासाठी केला पाहिजे. त्यामुळे, यथार्थतेची एक समग्र दृष्टी प्राप्त करण्यासाठी इंद्रियज्ञानाची पूर्तता त्या ज्ञानाने व्हावी, ज्याचे वर्णन कुरआन ‘फुआद’ किंवा ‘कल्ब’ म्हणजेच ‘हृदय’ या रूपात करते.” (पान-६६)

डॉ. इकबाल धर्म संकल्पनेच्या पारंपरिक विचारप्रवाहांना आव्हान देतात. त्यांची मांडणी आधुनिक विज्ञान, तत्त्वज्ञान आणि धार्मिक अनुभव यांच्याशी साधर्म्य साधण्यावर केंद्रित आहे. ते इस्लामची गतिमान, विकासशील आणि काळानुसार पुनर्रचना करण्याची गरज अधोरेखित करतात. ते पारंपरिक इस्लामी विचारसरणीतील स्थिरता आणि ग्रीक तत्त्वज्ञानाच्या प्रभावावर टीका करतात.

डॉ. इकबाल म्हणतात की इस्लाममध्ये ‘इज्तिहाद’ (धर्माची कालसुगंत व्याख्या) ही मूलभूत गतिशील तत्त्व आहे. त्यानुसार कुरआनची व्याख्या काळानुसार बदलू शकते आणि हुदुदसारख्या कायद्यांना संदर्भानुसार पुनर्विचार करता येतो. ते ग्रीक तत्त्वज्ञानाच्या प्रभावामुळे मुस्लिम विचारसरणी ‘स्थिरतावादी’ झाल्याची टीका करतात. त्यामुळे कुरआनची ‘अँटी-क्लासिकल’ भावना दुर्लक्षित झाली, असंही त्यांना वाटतं. कुरआन विश्वाला गतिमान आणि विस्तारशील म्हणून चित्रित करतो, जसं “ईश्वर त्याच्या सृष्टीत जे हवे ते वाढवतो.” (३५:१) (पान-१११)

वास्तविक, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर इस्लामी विचारविश्वाला ग्रीक प्रभावातून मुक्त ठेवतात. त्यांच्या मते, “इस्लामी विचारवंतात निर्माण झालेली बुद्धिवादाची चळवळ ही केवळ ग्रीकांच्या प्रभावाने निर्माण झाली, असे म्हणणे अपुरे ठरेल.” प्रा. बेन्नूर यांनी पुढे जाऊन म्हटलं आहे की, “ग्रीकांच्या प्रभावापासून दूर असलेल्यांनादेखील बुद्धिवादाचं मुळ हे कुरआनच्या वैचारिक गाभ्यातच दिसते.” (बेन्नूर, कुरआनची बुद्धिप्रमाण्यता)

डॉ. इकबाल यंच्या संबंधित पुस्तकात धार्मिक अनुभवाला वैज्ञानिक पद्धतीने चाचणी घेण्याची वकिली केली आहे. विचार आणि अंतर्ज्ञान एकमेकांना पूरक आहेत, असं इकबाल यांचं मत आहे. ‘मुताझिला’ आणि ‘अशारिते’ यांसारख्या संप्रदायांवर त्यांनी टीका केली आहे. इकबाल यांना वाटतं की, या धर्म परंपरांनी धर्माला केवळ तर्कशास्त्रापुरतं मर्यादित केलं परिणामी अनुभवाकडे दुर्लक्ष झालं. ते म्हणतात, “धर्माचं तर्कवादीकरण म्हणजे तत्त्वज्ञानाला श्रेष्ठ मानणे नव्हे; धर्म स्वतःच्या अटींवरच तर्काला मान्य करतो.”

इकबाल पारंपरिक इस्लामी विचारसरणीला ग्रीक प्रभावामुळे ‘फॉसिलायझ्ड’ (खडकासारखी स्थिर) झाल्याचं सांगतात आणि इज्तिहादाद्वारे पुनर्रचना आवश्यक असल्याचं मत अधोरेखित करतात. इकबाल पैगंबरांच्या काळातील इस्लामला गतिमान मानतात. परंतु नंतरच्या शतकात तो स्थिर झाल्यामुळे पुनर्विचाराची गरज आहे, असं ठाम प्रतिपादन ते करतात. या पुनर्विचारामुळे इस्लाम विज्ञान आणि आइनस्टाइनसारख्या आधुनिक विचारांशी जुळवून घेऊ शकतो, असं त्यांना वाटतं.

वाचा : तत्त्वज्ञानाच्या प्रदेशात इकबालीज्म

वाचा : इस्लामी जाणिवांचा डावा अन्वयार्थ

धर्ममार्तंडाचा हटवाद

सिबते हसन यांनी ‘मुसा से मार्क्स तक’ या पुस्तकात विज्ञान, तर्क, विवेक तथा ज्ञान-व्यवहारावर विपुल चर्चा केली आहे. ते धर्ममार्तंडाच्या (उलेमा) राज्य-धर्म विभाजनाच्या विरोधाला राज्याचे हितसंबंधांसाठी वापरले जाणारे साधन म्हणून उघड करतात. श्री. हसन यासाटी सर सय्यद अहमद खान आणि इकबाल यांच्या तर्कसंगत व्याख्येचं समर्थन करतात. ते मुल्लावादाला ‘अत्यंत हानिकारक’ मानून नाकारतात.

इस्लाममध्ये ईश्वराचं वचन आणि सृष्टी यांच्यात परस्पर विरोध नाही, असा श्री. हसन यांचा युक्तिवाद आहे. त्यांच्या मते, कुरआनची आधुनिक व्याख्या आवश्यक आहे आणि धार्मिक संकुचिततेमुळे साम्राज्यवादाला शह मिळतो, असं त्यांना वाटते. धार्मिक फतव्यांना इस्लामविरोधी म्हणून फेटाळत. त्याचप्रमाणे ते धर्माला विकासात मोठा अडथळा मानतात.

अलीकडे अशाच प्रकारची चर्चा मौलाना वहीदुद्दीन खान, असगर अली इंजिनियर आणि प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांनी देखील त्यांच्या वेगवेगळ्या लेखन सामग्रीतून केलेली आहे. खान पारंपरिक उलेमांना आधुनिक काळात मागासलेले मानतात. कारण ते मध्ययुगीन न्यायशास्त्राला (फिकह) कुरआन-हदीसपेक्षा अधिक प्राधान्य देतात आणि स्त्रियांच्या संदर्भात चुकीची मांडणी करतात. खान पारंपरिक फिकह अपूर्ण असल्याचं मानतात. कारण ती तिसऱ्या शतकातील विधी प्रक्रिया आहे, त्यामुळे ती आधुनिक आव्हानांचा सामना करू शकत नाही.

तर असगर अली इंजिनियर यांची इस्लाम धर्मावरील समिक्षात्मक मांडणी मुक्तीच्या धर्मशास्त्रावर (liberation theology) आधारित आहे. त्यात ते इस्लामला सामाजिक न्याय, समानता आणि शोषित-पीड़ितांच्या बाजूने उभे करतात. त्यांनी पारंपरिक व्याख्यांना (जसे तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व) सांस्कृतिक विकृती म्हणून फेटाळलं होतं. ते कुरआनच्या सार्वभौमिक मूल्यांना (तौहीद, न्याय) आधुनिक आव्हानांशी जोडतात. धर्ममार्तडांना (उलेमा) सामाजिक अन्यायाचं कारण मानतात.

प्रा. बेन्नूर यांनी इस्लामची ज्ञान परंपरा व विवेकवादाची स्वतंत्र व नेत्रदिपक मांडणी केलेली आहे. या संदर्भात त्यांनी बरेच लेख लिहिले आहेत. कुरआनची बुद्धिप्रामाण्यता या लेखात त्यांनी म्हटलं आहे, “कुरआनमध्ये ‘इल्म’ आणि ‘हिक्म’ (नॉलेज आणि विजडम) हे शब्द वारंवार येतात. इस्लामच्या सिद्धान्तानुसार ‘इल्म’ आणि ‘हिक्म’ हे ‘अक्ल’ (रिझन) आणि ‘फिक्र’ (थॉट) यांच्या साहाय्याने प्राप्त करावयाचे असतात. परिणामी ‘अक्ल-फिक्र-इल्म-हिक्म’ अशी साखळी तयार होते.”

प्रा. बेन्नूर यांच्या मते हिक्म (मानवी जीवन, निसर्ग आणि सृष्टीचे ज्ञान) सर्वोच्च आहे. म्हणतात, “अशा प्रकारे ‘अक्ल’ सर्वात शेवटी असून ‘हिक्म’ सर्वोच्च आहे. म्हणजे बुद्धी किंवा विवेक (अक्ल) हे साधन असून त्याच्या मदतीने ज्ञान प्राप्त करून द्यायचे असते.”

किबहुना प्रा. बेन्नूर यांनी कुरआन हा बुद्धिप्रामाण्य ग्रंथ असल्याचं ठाम प्रतिपादन करतात. त्यांच्या मते, “इस्लामने कुरआनमधून श्रद्धेचा (फेथ) सिद्धान्तही मांडला आहे. परंतु आंधळ्या श्रद्धेचे समर्थन केलेले नाही. उलट, कुरआन श्रद्धेच्या बाबतीत देखील निरीक्षण करण्याचा विचार करून कृती करण्याचा आदेश देतो. कुरआनचा व बुद्धिवाद आणि वैज्ञानिक पद्धतीचा अंत:प्रवाह विलक्षण आधुनिक असून कुरआनची विज्ञानलालसा व्यक्त करणारा आहे.”

वाचा : इस्लामशिवाय जग कसे असते ?


ऐतिहासिक परंपरा

‘अक्ल’ आणि ‘इमान’ याची चिंतन प्रक्रिया अखिल मुस्लिम जगत व चर्चाविश्वामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अल किंदी, इमाम गज़ाली, इब्न सिना, अव्हरोज इत्यादी विद्वानांची या संदर्भातील मतप्रणाली सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध आहे. प्रेषितांनंतरच्या काळात इस्लामी ज्ञान परंपरेला मुल्लावादप्रणित सत्तेशाहीचे सर्वांत मोठे आव्हान होते. तरीही त्याच अवस्थेत इस्लामची बुद्धिप्रामाण्यतेची मोठी परंपरा विकसित झाली. याच काळाने अनेक दिग्गज विचारवंत जगाला दिले.

परंतु दुर्दैवाने सरबारी भाट विद्वान व स्वतंत्र प्रज्ञेचे विद्वान अशी फळीदेखील याच काळात अस्तित्वात आली. सुलतानांच्या पदरी असलेल्या दरबारी भाटांना वाटत होतं की, आधुनिक ज्ञान-विज्ञानाला कवेत घेणारे ज्ञान अधर्माकडे नेऊ शकते. त्यामुळे त्यांनी ज्ञान-विज्ञान विरुद्ध धर्म असा संघर्ष उभा केला. परिणामी बाराव्या-तेराव्या शतकात झालेल्या या चर्चेचा अंतिम निष्कर्ष हा श्रद्धा प्राबल्य असाच राहिला आहे. तत्कालीन दरबारी विचारवंतांनी अक्ल (बुद्धिप्रामाण्य) व इमान (श्रद्धा) यातील चर्चेत श्रद्धेला वरचढ ठरवलं. असा विचार तथाकथित दरबारी इस्लामिक विद्वान शासकांच्या अधिक जवळ नेणारा ठरला. त्यामुळे त्यांनी दरबारी निष्ठा सिद्ध करताना आधुनिक ज्ञान-विज्ञान मांडणाऱ्या उदारमतवादी विद्वानांना दूर लोटले. वस्तुत: या आधुनिक विचारवंताची प्रेरणा कुरआनच होती. गैबी (दडलेले) ज्ञानसंचित शोधण्यासाठी त्यांनी आधुनिक ज्ञान-विज्ञानाची साधना केली. परंतु धर्मसत्तेच्या प्राबल्याने त्यांच्या विचारांचा गळा घोटला. परिणामी दरबारी भाटांनी बुद्धिप्रमाण्याला बेदखल ठरवत दराबारात पर्यायाने जनमाणसावर श्रद्धेचं महात्म्य वाढवित नेलं.

परिणामी पुढच्या काळात इस्लामचा गोल्डन एरा मातीमोल झाला. श्रद्धा श्रेष्ठत्वासमोर बुद्धिप्रामाण्याने अंतिम घटका मोजली. नंतरच्या काळात मुस्लिम जगताची झालेली हानी समोर आहे. याविषयी इंग्रजी व अरबी भाषेत विपुल लेखन उपलब्ध आहे.

युरोपमध्ये अशा प्रकारची चर्चा पूर्वी होऊन गेली होती. त्यातही चर्च म्हणजेच धर्म सत्तेचं महत्त्व वाढवून ज्ञानविज्ञानाला बगल दिली गेली. म्हणून ज्ञानसाधनेचं मोठ्या प्रमाणात पतन झालं होतं. धार्मिक ज्ञानाशिवाय इतर कुठलेही ज्ञान वर्ज्य ठरवलं गेलं. परिणामी इसवी सन ३९८ मध्ये अलेक्झांड्रियातील प्रचंड मोठं ग्रंथालय जाळण्यात आलं. या प्रक्रियेत धर्म सत्तेच्या प्रभावातून ज्ञान सत्तेला पराभूत करण्यासाठी ज्ञान-विज्ञानाला गाडून टाकण्यात आलं होतं. एरिस्टॉटलची अवस्था जगाने पाहिली. हे जमीनीत गाडलं गेलेलं ज्ञानसंचित अकराव्या-बाराव्या अब्बासी व फातिमी खलिफा काळात अरबांनी ग्रीकवर विजय मिळवून बाहेर काढलं होतं. या ग्रीक तत्वज्ञानाच्या आधारे अरबांनी आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली. त्यातून इस्लामचा ‘गोल्डन एरा’ जगापुढे आला. परंतु नंतरच्या काळात पुन्हा युरोपसारखी परिस्थिती इस्लामी जगतात अवतरली. मग काय पुन्हा धर्मसत्ता व ज्ञानसत्तेतील संघर्षात धर्मसत्तेने प्राबल्य वाढलं.

‘क्रूसेड’ काळात युरोपमध्ये सर्वच क्षेत्रात प्रचंड हाहाकार माजला. मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. त्यातून धडा घेऊन युरोपमध्ये प्रतिक्रांती म्हणजेच प्रबोधनवादाची मोठी प्रक्रिया सुरू झाली. त्याचं पर्यवसान ‘रेनसां’मध्ये घडलं. अतिशय अल्पकाळात त्याचा सकारात्मक परिणाम सबंध जगावर झाला.

परंतु या प्रबोधन चळवळीतून अखिल मुस्लिम जगताने कुठलाही धडा घेतला नसल्याचं दिसून येतं. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या मते इस्लामी विचारविश्वाची प्रतिमा मलीन करण्यात शासक झालेल्या इस्लामच्या आक्रमक, युद्धखोर अशा धर्मांतरित जाति-जमातींनी हातभार लावला. अशीच मांडणी साने गुरुजी (इस्लामी संस्कृती), एम.जे. अकबर (दि स्वार्ड ऑफ शेड्स), डॉ. ताज हाशमी (ग्लोबल जिहाद) इत्यादी विचारवंतानी केलेली आहे. त्यांच्या हाती सत्ता असल्याने या युद्धखोर जमातींनी श्रद्धेला ज्ञान-विज्ञानाच्या मानगुटीवर बसवून ज्ञान व्यवहाराचा खात्मा केला.

या चर्चेत प्रसिद्ध साम्यवादी विचारवंत सिबते हसन यांचं ‘मुसा से मार्क्स तक’ हे पुस्तक विशेष उल्लेखनीय आहे. त्यात विज्ञान, तर्क, विवेक तथा ज्ञान-व्यवहारावर विपुल चर्चा करण्यात आलेली आहे. त्यांच्या उपरोक्त पुस्तकात ते धर्ममार्तंडाच्या (उलेमा) राज्य-धर्म विभाजनाच्या विरोधाला राज्याचे हितसंबंधांसाठी वापरले जाणारे साधन म्हणून उघड करतात. श्री. हसन यासाटी सर सय्यद अहमद खान आणि इकबाल यांच्या तर्कसंगत व्याख्येचं समर्थन करतात. ते मुल्लावादाला ‘अत्यंत हानिकारक’ मानून नाकारतात.

इस्लाममध्ये ईश्वराचं वचन आणि सृष्टी यांच्यात परस्पर विरोध नाही, असा श्री. हसन यांचा युक्तिवाद आहे. त्यांच्या मते, कुरआनची आधुनिक व्याख्या आवश्यक आहे आणि धार्मिक संकुचिततेमुळे साम्राज्यवादाला शह मिळतो, असं त्यांना वाटते. धार्मिक फतव्यांना इस्लामविरोधी म्हणून फेटाळत. त्याचप्रमाणे ते धर्माला विकासात मोठा अडथळा मानतात.


वाचा : मुस्लिम समाज पुन्हा ज्ञान-विज्ञानाची वाट धरू शकेल?

*

थोडक्यात, विज्ञान आणि श्रद्धा याची तुलना करणे हास्यास्पद आहे असं अनेक विद्वानांचं ठाम प्रतिपादन आहे. त्यामुळे जावेद अख्तर व मुफ्ती शमाइली नदवी यांच्या निमित्ताने श्रद्धा व विज्ञानाचत्या तुलनेविषयी सुरू असलेली चर्चा निरर्थक आहे. त्या दोन स्वतंत्र बाबी आहेत. त्यांना परस्परात मिसळून पाहता येत नाही. धर्म ही मानवी समूहाच्य. अध्यात्मिक प्रगतीसाठी जसा गरजेचा असतो, अगदी तसाच मानवी विकास व आधुनिक विचारप्रवाहांच्या उउन्नतीसाठी ज्ञान-विज्ञान हे घटकही महत्वाचे आहेत. विशेष म्हणजे धर्म हा नितिमत्ता व नैतिक व्यवहारासाठी म्हणजेच वैयक्तिक बाबींपुरता मर्यादित राहतो. तर ज्ञान-विज्ञान वैश्विक पातळीवर समुच्च मानवी समाजाच्या उन्नतीसाठी कारक घटक म्हणून पुढे येतो. त्यामुळे दोघांचे स्वतंत्र अस्तित्व असते.

वास्तविक, श्री. जावेद अख्तर यांनी अशा प्रकारची चर्चा जग्गी वासुदेव यांच्यासोबतही घडवून आणली आहे. ही चर्चा सनातनी हिंदूंना अमान्य आहे. असं असलं तरी ते सध्याच्या चर्चेत मुसलमान व त्यांच्या धर्मावर शिंतोडे उडवताना दिसतात.

जावेद अख्तर हे निरीश्वरवादी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते कोणाचा मुलाहिजा न ठेवता निर्भिडपणे आपली मते मांडत असतात. इस्लामची संस्कृती किंवा प्रतिकं ते नाकारतात. पण त्याचवेळी ते महाभारताला व त्यातील पात्रांना भारतीय संस्कृतीचा अभिन्न अंग मानतात. त्याची ही भूमिका पोलिटिकल करेक्टनेस या सूत्रातून विकसित झालेली आहे.

म्हणजेच ते निरीश्वर असले तरी घरात गणपती बसवू शकतात, अशी त्यांच्यावर टीका होत राहते. तरीही ते मनोभावी गणेश मूर्तीची प्रस्थापना करतात. होळी खेळतात. बॉलीवूडमध्ये मोठे स्टार्स गणपती का बसवतात किंवा होळी का खेळतात, यात वेगळं आर्थिक गणित दडलेलं आहे. नट-नट्या व सिनेमाशी संबंधित इतर सेलिब्रिटींच्या दृष्टीने होळी किंवा गणपतीची प्रस्थापना करणे व त्याचा उत्सव साजरा करणे, याला भांडवली मूल्य आहे. वैश्विक ग्राहकवादाची किनार त्याला जोडली आहे. असं असलं तरी श्रीयुत अख्तर गणपतीची मनोभावे आराधना करतात. आरत्या करतात व अशा प्रकारचे फोटो आपल्या पीआर एजन्सी मार्फत सार्वत्रिक करतात.

वास्तविक, त्यांचा निधर्मीवाद लपून नाही. स्वाभाविक त्यांची धर्मविरोधी मते मुसलमानांना पटत नाहीत. तरीही ते आपले विचार खुलेपणाने मांडतात. देशभर निधर्मीवादाचा प्रचार करतात. विवेकी चळवळीला हातभार लावतात. असं असलं तरी वर्तमान मुस्लिमद्वेषी व हिंदू राष्ट्रवादी राजकारणात मुसलमानांच्या परमेश्वराच्या अस्तित्वावर म्हणजेच इस्लामच्या अस्तित्वावर चर्चा घडवून (झुंज) आणणे व्यापक मुस्लिम द्वेषी मोहिमेचा भाग वाटतो. या चर्चेचा संयोजक गोदी मीडियाचा सौरभ द्विवेदी नावाचा एंकर होता. आज तक या ब्रँडच्या अंतर्गत ही चर्चा घडवून आणली गेली. त्यामुले हिंदुत्वप्रणित गोदी मीडिया या चर्चेच्या मुळाशी आहे, हे समजून येते. या मुक्त चर्चेचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ मुसलमानांच्या अ-मानवीकरण करण्याच्या प्रक्रियेला होत आहे.

संबंधित चर्चा सुरू होण्यापूर्वी तिचं प्रचंड मार्केटिंग करण्यात आलं. अपेक्षेप्रमाणे या झुंजीला प्रचंड टीआरपी लाभला. दोन मुसलमान नाव असलेली व्यक्ती ‘खुदा’च्या अस्तित्वावर भांडत आहेत हे गणित अर्थशास्त्राच्या नियमात फायदेशीर ठरणारे होते व आहे. कारण या चर्चेसंबंधीच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो, मिलिअन्स व्ह्यूज दिसतात. म्हणजे संबंधित चर्चेतून भांडवलशाहीने आपला उपक्रम पूर्ण केला आहे.

वास्तविक, ग्राहकवाद म्हणजे टीआरपीसाठी अशा प्रकारची चर्चा घडवून आणली गेली. अशा चर्चेतून कुठलाच निष्कर्ष हाती येत नाही. कारण दोन्ही पक्ष आपापले मुद्दे तेवढ्यात ‘श्रद्धेने’ मांडत राहतात. शेवटी एका अर्धवट बिंदूवर चर्चा संपते. मौलाना आज़ाद म्हणतात त्याप्रमाणे हा मार्ग नेहमी संशयाने सुरू होतो आणि नकारावर त्याचा शेवट होतो. जर पावले तिथेच थांबली तर निराशेशिवाय अन्य काहीही हाती लागत नाही. संबंधित चर्चेचाही शेवटही असाच झालेला आहे. तरीही मुस्लिम पक्ष स्वतःला विजयी घोषित करत आहे.

या चर्चेच्या निमित्ताने अजून एक मौलवी भारताच्या जनमानसावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे लादला गेला आहे. तत्पूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं. आता या चर्चेच्या निमित्ताने त्यांचं जागतिक मार्केटिंग सुरू झालेलं आहे. परिणामी अखिल इस्लामी जगतात त्यांचा भाव वधारू शकतो. त्याच परभावातून त्यांना मोठमोठी पदे मिळतील.

दुसरीकडे हिंदू राष्ट्रवादी शक्ती या चर्चेला इस्लामविरोधाचं एक शस्त्र म्हणून वापर करत आहेत. याउलट मुसलमानातील धर्मवादी उच्चशिक्षित तरुणांना अधिकाधिक कवेत घेण्यासाठी या कथित विजयी चर्चेचा आधार घेतील. या निमित्ताने ते तरुणांना अधिकाधिक धर्माकडे आकृष्ठ करण्याचा प्रयत्न चालवतील.

कलीम अज़ीम, पुणे
२३ डिसेंबर २०२५
मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,53,इस्लाम,43,किताब,26,जगभर,132,पत्रव्यवहार,4,राजनीति,309,व्यक्ती,26,संकलन,65,समाज,271,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,55,
ltr
item
नजरिया: श्रद्धा आणि ज्ञान-विज्ञानाची हास्यास्पद तुलना
श्रद्धा आणि ज्ञान-विज्ञानाची हास्यास्पद तुलना
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgPp4LN_xSaOI6a35dDae0erYkJRERC0712T9NW7op9wBPxhaE4jdCxGn5bxUIhPk3SO1LdVpSnlO1OZvbOUsiNlNgfXNMSJZJLiFuFEaacFPdgLnBeNcuqHbbGCMUpWQ19Z9jqIi3LxpAllx21AHme9m7ntBAhApaq-Qm9Z_AiSoLuPum5W65EerMht004/w640-h360/605632505_10214783800786739_2889894413242382716_n.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgPp4LN_xSaOI6a35dDae0erYkJRERC0712T9NW7op9wBPxhaE4jdCxGn5bxUIhPk3SO1LdVpSnlO1OZvbOUsiNlNgfXNMSJZJLiFuFEaacFPdgLnBeNcuqHbbGCMUpWQ19Z9jqIi3LxpAllx21AHme9m7ntBAhApaq-Qm9Z_AiSoLuPum5W65EerMht004/s72-w640-c-h360/605632505_10214783800786739_2889894413242382716_n.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2025/12/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2025/12/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content