‘इस्लामने मूळ संदेशाकडे वळावे!’ या शीर्षकाचा लेख
(रविवार विशेष, ८ नोव्हेंबर २०२०) वाचला. इस्लामविषयी जगात- विशेषत:
अमेरिकेत- अनेकानेक समज- गैरसमज आहेत हे माहीत असल्यामुळे आणि लेखक अमेरिकास्थित असल्यामुळे
काहीशा उत्सुकतेने लेख वाचण्यास सुरुवात केली, पण पहिल्याच परिच्छेदापासून विषयातील मुद्दय़ांच्या मांडणीची शिस्त आणि
सातत्य यांचा अभाव आढळतो.
धर्माची चिकित्सा ही
सर्व चिकित्सेची सुरुवात असते, हे सत्य मार्क्सने सांगून ठेवले आहे. त्यामुळे देशपांडे यांनी
इस्लामची चिकित्सा करण्याची भूमिका आपल्या लेखात घेतली असली, तर त्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही. मात्र
या चिकित्सेत तर्कशुद्धता असल्याचे आढळत नाही.
लेखाचे पहिलेच वाक्य
‘अलीकडे इस्लामच्या
बाबतीत अगदी विरुद्ध टोकांचा उलटसुलट युक्तिवाद केला जातो’ असे आहे. त्यानंतर पुढल्याच वाक्यात, ‘आयसिससाठी इस्लाम हा धर्म आहे’ असे देशपांडे यांनी म्हटले आहे आणि त्याच
वाक्याचा पुढला अंश ‘- जो मध्ययुगीन
बहुपत्नीत्व तसेच शिरच्छेद करणे आणि दगडांनी ठेचून मारणे यांसारख्या क्रूर रानटी
शिक्षांचा उपयोग करण्याची परवानगी देतो’ असा आहे. मग ‘सुसंस्कृत जगातील बहुतेक मुसलमान असा युक्तिवाद करतात की, इस्लाम हा शांततेचा धर्म आहे’ अशी शब्दयोजना लेखकाने केली आहे.
धर्माची अशी
चिकित्सक समीक्षा करताना ‘क्रूर, रानटी’, ‘सुसंस्कृत जग’, ‘बहुतेक’, ‘युक्तिवाद’ आदी शब्दांच्या वापरातून तर्कशुद्धता दिसते काय
हा प्रश्न आहे. विशेषत: जे ‘संदर्भीकरणा’चा आग्रह धरतात, त्यांनी अशी तर्कदुष्टता का दाखवावी? इस्लाममध्ये हिंसाचार नाही, असे मी म्हणणार नाही. तो आहेच; पण त्याबाबत चर्चा करायची असल्यास इस्लामी
परंपरेत हिंसाचार सुरुवातीपासूनच होता की काळाच्या ओघात कधीतरी आला? त्या वेळची परिस्थिती काय होती? अशा अनेक अंगांनी ही चर्चा व्हावयास हवी होती. पण
तशीही ती झालेली नाही.
वाचा : मुस्लिम समाज पुन्हा ज्ञान-विज्ञानाची वाट धरू शकेल?
वाचा : इस्लामशिवाय जग कसे असते ?
वाचा : फ्रांसचा सेक्युलर इस्लामफोबिया
इस्लामचा सुवर्णकाळ
इस्लामचा १४०० हून
अधिक वर्षांचा इतिहास चाळून पाहिला तर इसवीसन ६१० ते चौदाव्या शतकाच्या
अखेपर्यंतचा कालखंड हा इस्लामचा सुवर्णकाळ होता. या काळात विविध ज्ञानशाखांत अरब
विचारवंत, संशोधकांनी फार मोठी
परंपरा निर्माण केली. त्याच काळात अनेक अरब विद्वान भारतात आले होते. त्यांनी
संस्कृत भाषा शिकून रामायण, महाभारतासारख्या महाकाव्यांपासून पंचतंत्र, संगीत-पारिजातक यांसारख्या अनेक विषयांवरील
संस्कृत ग्रंथांचे अरबी भाषेत अनुवाद केले.
ग्रीक भाषेतील
ज्ञानभांडाराची हस्तलिखिते तेथील मठांमध्ये धूळ खात पडली होती, ती अब्बासी खलिफांच्या अधिकाऱ्यांनी सोबत आणली.
खलिफांच्या दरबारात त्यासाठी वेगळा विभाग विद्वान संशोधकांच्या देखरेखीखाली सुरू
करण्यात आला व त्याचे व्यवस्थापन आणि अनुवाद असे काम सुरू झाले. तज्ज्ञांनी
केलेल्या अर्थवाही अनुवादांच्या द्वारेच हे ज्ञानभांडार युरोपात गेले.
दहाव्या शतकात
अल्-बेरूनी हा अरब प्रवासी भारतात आला होता. भारतातील दहा वर्षांच्या वास्तव्यात
त्याने उत्तर भारतात सगळीकडे प्रवास केला. त्याच्या प्रवास वर्णनाचा इंग्रजी
अनुवाद ‘अल-बेरूनीज इंडिया’
या नावाने आपल्याकडे उपलब्ध आहे
(अल-बेरूनीचा भारत हा त्याचा मराठी अनुवादही संतसाहित्याचे अभ्यासक यू. म. पठाण
यांनी केला होता, पण मुद्दा तो नाही).
या इंग्रजी ग्रंथाची
अनुक्रमणिका पाहिली तरी अल्-बेरूनीला किती विविध विषयांत रस होता याची कुणालाही
कल्पना येऊ शकेल. आपल्या या ज्ञानसाधनांच्या संदर्भात त्याने विषयांची किंवा
धर्मनिष्ठा वगैरे कसलीही मर्यादा घातली नव्हती, हे त्यातून दिसेल. ज्ञान मिळवणे आणि आपल्या
मातृभाषेत अनुवाद करणे हेच त्याचे ध्येय होते. याच काळात, किंबहुना तेव्हापासून आजपर्यंत किती हिंदू
संशोधकांनी/अभ्यासकांनी पूर्वग्रहविरहित दृष्टिकोनाविना ‘इस्लामच्या मूळ संदेशा’चा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे, हाही निराळा संशोधनाचा विषय आहे.
लेखाच्या पुढल्या
परिच्छेदात ख्रिस्ती आणि इस्लाम या दोन्ही धर्माबाबत तौलनिक टीकाटिप्पणी करताना
लेखक असा प्रश्न उपस्थित करतात की, हे दोन्ही धर्म समाजाच्या भौतिक प्रगतीच्या दृष्टीने आणि एकाच भौगोलिक
प्रदेशात, साधारण सारख्याच
काळात जन्माला आले तरी दोन्ही धर्माचे मार्ग अगदी वेगळे का दिसतात. हा प्रश्न
मार्मिक आहे यात शंका नाही. पण ‘संदर्भीकरण’ हे त्याचे एकच उत्तर आहे, असे सुचवणे तर्कशुद्ध नाही.
मुळात इस्लाम आणि
ख्रिस्ती धर्माच्या प्रारंभिक प्रगतीचा आलेख निरनिराळा आहे आणि भूगोलही. अरबी
वाळवंटात उंट, शेळय़ा आणि खजूर हीच
उदरभरणाची साधने होती आणि उंटाच्या काफिल्याद्वारे व्यापार-वाहतूक हाच एकमेव व्यवसाय
होता. येमेन, मक्का, सीरियामार्गे चीनपर्यंत हा व्यापार होत असे. या
व्यापारामुळे श्रीमंत झालेला व्यापारी
वर्ग आणि त्यांची सेवा करणारा गरीब कष्टकरी वर्ग असा त्या काळातील अरबी समाज होता
आणि या गरीब वर्गाचे कल्याण आणि त्यासाठी न्याय व समता हे इस्लामचे उद्दिष्ट होते.
मुहंमद (स)
पैगंबरांनी ते उद्दिष्ट इसवीसन ६१० ते ६३२ या केवळ २२ वर्षांच्या काळात साध्य केले,
त्यालाच ‘आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय अशी तीन स्तरीय समग्र क्रांती’
म्हटले जाते.
वरील विवेचनातील
समग्र क्रांतीचा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवला तरी दक्षिणेतील येमेनपासून
उत्तरेतील सीरिया आणि पुढे चीनपर्यंत अरबांचा आयात-निर्यातीचा मोठा व्यापार होता,
याकडे तरी देशपांडे यांनी लक्ष द्यायला
हवे होते. पण ते त्यांनी दिलेले नाही.
उलट, ज्या प्रदेशांत ख्रिस्ती हा मुख्य धर्म आहे तेथील
लोकांचे जीवनमान चांगले कारण विज्ञानालाच चर्चने आश्रय दिला आणि चर्चने ‘संदर्भीकरण’ केले, असे प्रतिपादन करून ख्रिश्चन समाजाच्या सुखी जीवनाचे श्रेय त्यांच्या
धर्माला देणे हीच लेखाची दिशा ठरली.
वास्तव मात्र
देशपांडे समजतात त्यापेक्षा खूप वेगळे आहे. पंधराव्या शतकाच्या सुरुवातीपासून
युरोपात रेनेसाँ (प्रबोधन), व्यक्तिस्वातंत्र्य जपणारा प्रॉटेस्टंट-वाद आणि ‘एन्लायटनमेंट’ (उद्बोधनवाद) अशा तीन चळवळी झाल्या.
वरवर पाहाता या
चळवळी एकमेकांपासून भिन्न दिसत असल्या तरी (कॅथोलिक) चर्च किंवा धर्मसत्तेशी
त्यांचा संघर्ष पुढली काही शतके अविरतपणे चालला होता. कारण पारंपरिक समाज धार्मिक
प्रथापरंपरांच्या प्रभावात अडकून पडलेले असतात व त्यामुळे त्यांची मने आणि बुद्धी
धर्मसत्तेची (इथे चर्चची) गुलाम झालेली असतात.
या गुलामगिरीतून
त्यांना मुक्त केल्याशिवाय कुठल्याही समाजाची प्रगती होऊ शकत नाही, याची पुरेपूर जाणीव उपरोक्त चळवळींमधील विचारवंत
आणि अभ्यासकांना होती; त्याचबरोबर याच
काळात या विचारवंतांना ग्रीक ज्ञानाची आणि संस्कृतीची ओळख झाली. त्यानंतर झालेल्या
घडामोडींतून धर्मपरंपरांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची प्रेरणा युरोपीय
विचारवंतांना मिळाली. याच काळात युरोपात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. उपरोक्त
तीन चळवळींमुळे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला.
वाचा : अशालिन ‘हेब्दो’ आणि इस्लाम फोबिया
विज्ञान आणि औद्योगिक क्रांती
रेनेसाँच्या
चळवळीमुळे जगाला गॅलिलिओपासून पुढचे, उत्तुंग प्रतिभेचे वैज्ञानिक मिळाले. त्यांनी लावलेल्या शोधांमुळेच
युरोपात सामाजिक क्रांती घडून आली, तर दुसरीकडे औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ (जेम्स वॉटच्या वाफेच्या
इंजिनानंतर) रोवली गेली. वरील तीन चळवळी व त्यांना समांतर असे वैज्ञानिक शोध तसेच
औद्योगिक क्रांती यांमुळे मानव (केवळ ख्रिस्ती समाज नव्हे) बौद्धिकदृष्टय़ा प्रगल्भ
व आर्थिकदृष्टय़ा समृद्ध होऊ शकला; पण या प्रगल्भतेशी वा समृद्धीशी धर्माचा कसलाही
संबंध नव्हता. हा मुद्दा देशपांडे यांनी विचारात घेतलेलाच नाही.
लेखाचे शीर्षक जरी ‘इस्लामने मूळ संदेशाकडे वळावे’ असे देण्यात आले असले तरी मुळात हा लेख
ख्रिश्चनिटी, मग इस्लाम, परत ख्रिश्चनिटी असा आलटून पालटून दोन्ही
धर्माविषयी आहे. पण इस्लामचे खच्चीकरण व त्याविषयीचे दूषित पूर्वग्रह, त्यासाठी ख्रिश्चनिटीचे उदात्तीकरण हा लेखाचा
गाभा राहिला आहे.
अर्थात
ख्रिश्चनिटीने -त्यातही लेखक ज्यावर भर देतात त्या कॅथोलिक पंथाने- संदर्भीकरणावर
भर दिल्यामुळेच वैज्ञानिक, भौतिक, औद्योगिक प्रगती घडू
शकली हे जर वास्तव असते, तरीही ठीक होते.. पण वस्तुस्थिती नेमकी उलट आहे. ती अशी की, साधारण पंधरावे शतक ते अठरावे शतक या ४००
वर्षांच्या काळात युरोपमध्ये जी विविधांगी क्रांती झाली तिचा ख्रिश्चनिटी या
धर्माशी दूरान्वयानेही संबंध नव्हता.
‘सीआयए’ या अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेच्या ‘नॅशनल इंटलिजन्स कौन्सिल’चे उपाध्यक्ष ग्रॅहॅम फुलर (आता निवृत्त) यांनी ‘अ वर्ल्ड विदाऊट इस्लाम’ नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. इस्लाम आणि मुस्लिम
राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा ग्रंथ म्हणजे एक पाठय़पुस्तकच (देशपांडे
यांच्या वाचनात हे पुस्तक आले नसावे असे वाटते, कारण ते त्यांनी वाचले असते तर प्रस्तुत लेख
वेगळय़ा पद्धतीने लिहिला असता. हा ग्रंथ त्यांनी आताही जरूर वाचावा).
वाचा : अर्तुगल गाज़ी क्रुसेडप्रणित नृशंसतेची पार्श्वभूमी
वाचा : दहशतवाद आणि मुस्लिम प्रबोधनाची दिशा
ग्रॅहॅम फुलर यांनी या ग्रंथात म्हटले आहे की, जगात इस्लामविषयी जितके गैरसमज आहेत तितके इतर कुठल्याही धर्माविषयी नाहीत. ते गैरसमज निराधार असल्याचेही फुलर यांनीच मान्य केले आहे. पण इथे त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो. जगात फक्त इस्लाम हा एकच धर्म हिंसाचारी आहे.. इतर सारे धर्म धुतल्या तांदळासारखे आहेत, असे म्हणता येईल का- याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल.
ख्रिश्चन आणि
मुस्लीम यांच्यातील भौतिक प्रगतीतील कमी-अधिकपणा स्पष्ट करण्यासाठी देशपांडे यांनी
‘संदर्भीकरणा’ची संकल्पना मांडली आहे पण तिच्या अर्थाचे
तर्कशुद्ध स्पष्टीकरण त्यांनी दिलेले नाही. ख्रिस्ती धर्मीयांनी (विशेषत:
कॅथॉलिकांनी) सक्रियपणे संदर्भीकरणाचा (कॉन्टेक्स्च्युअलिझमचा) अवलंब केला असे
लेखात म्हटले आहे आणि पुढे व्यवसाय आदी उभे करणे हे सारे संदर्भीकरणामुळेच घडले
असेही सूचित केले आहे.
व्यवसायासाठी- नफा
कमावण्यासाठी – संस्थांना कर्ज
देताना व्याज घेणे, असा काही अर्थ
देशपांडे यांच्या विवेचनातून निघत होता. धर्माच्या वाटचालीच्या इतिहासातून या ‘संदर्भीकरणा’विषयी अधिक काही समजून घ्यावे यासाठी वसई येथील ‘विचार मंच’ या ख्रिस्ती संस्थेतील माझ्या काही मित्रांना
संदर्भीकरणाचा अर्थ विचारला, पण यापैकी कुणीही मला या शब्दाचा अर्थ सांगू शकले नाहीत, त्यामुळे हा मुद्दा येथेच सोडून पुढे जाणे बरे
असे वाटते.
प्राचीन आणि
मध्ययुगीन काळाचा- अगदी भारताचाही- इतिहास नुसता चाळून जरी पाहिला तर राजकीय आणि
सामाजिक पातळय़ांवर किती हिंसाचार घडत होता याची कल्पना येऊ शकेल. भारतातील
जातिव्यवस्थेत हिंसाचार ठासून भरलेला आहे; त्याची वर्तमान रूपे आजही दिसतात.
‘सुसंस्कृत’ समजल्या जाणाऱ्या अमेरिका, जर्मनी वा फ्रान्ससारख्या राष्ट्रांतही भरपूर
प्रमाणात हिंसाचार घडतो, त्याबद्दल फारसे कुणी बोलत नाही म्हणून तिथे हिंसाचारच नाही असे
समजायचे का? नागरी वस्तीच्या
शहरांवर अणुबॉम्ब टाकणाऱ्या अमेरिकेने या शतकात इराकवर बॉम्बहल्ले करून देश भाजून
काढला. पुढे इराककडे रासायनिक संहार-अस्त्रे असल्याचा अमेरिकेचा आरोप सिद्ध होऊ
शकला का? पण असे प्रश्न
विचारायचे नसतात. कोणाच्याही हिंसाचाराचे समर्थन करण्याचा येथे हेतू नाही.
मात्र प्रगती,
हिंसाचार यांची चर्चा करताना धर्माच्या
चष्म्यातून का पाहावे, हा प्रश्न आहे.
न्यायाच्या बाबतीत सर्वाना समन्यायाने वागवावे, ही अपेक्षाही आहेच.
*इस्लामचे ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांचा हा लेख लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेला आहे. लेखकाच्या परवानगीने त्यांच्या फेसबुक पेजवरून आम्ही तो घेतला आहे.)
लेखकाचा मेल-arumukadam@gmail.com
(पूर्वप्रकाशन : लोकसत्ता, विशेष, १५ नोव्हेंबर २०२०)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com