इस्लामशिवाय जग कसे असते ?

सीआयएमध्ये अधिकारी असलेल्या ग्रॅहॅम इ. फुलर यांनी मध्य पूर्व आशियातील प्रतिभावंत राजकीय विश्लेषक असा लौकिक कमावला. त्यांचे इस्लामविषयीचे आकलन वेगळे आहे. सध्या त्यांचे ‘A World Without Islam’ (प्रकाशक-बॅक बे बुक्स) हे पुस्तक जगभर चर्चेत आहे. त्याची ही ओळख…

समजा इस्लाम धर्म जन्मालाच आला नसता तर, जागतिक परिस्थिती आज आहे तशीच राहिली असती का? न्यूयॉर्क शहरातील जागतिक भांडवलशाहीचे प्रतिक असणाऱ्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या उत्तुंग इमारतींमध्ये विमाने घुसवून त्या पाडल्या गेल्या असत्या का? माद्रीदपासून लंडनपर्यंत आणि मुंबईपासून ते काल-परवा झालेल्या पॅरिस हल्ल्यांपर्यंतच्या घटना घडल्या असत्या का? सलमान रश्दींपासून ते शार्ली हेब्दोपर्यंत आविष्कार स्वातंत्र्याच्या विरोधात हिंसक प्रतिक्रिया उमटल्या असत्या का?

अर्थातच या प्रश्नांचे सामान्य ज्ञानाच्या आधारे येणारे एकच उत्तर आहे ते म्हणजे, नाही! मात्र जगातील प्रमुख म्हणजे ख्रिस्ती, ज्यू, हिंदू, बौद्ध आदी धर्मांच्या इतिहासाचा अभ्यास करून, जागतिक राजकारणाच्या इतिहासाचा काटेकोर मागोवा घेऊन, आर्थिक, सामाजिक, भूराजकीय घडामोडींमधील बारिक सारिक तपशीलांचा धांडोळा घेऊन या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेलो तर खूपच गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

कारण प्रश्न वरवर सोपा वाटला तरी त्याचे उत्तर मात्र फारसे सोपे नाही. ग्रॅहॅम फुलर यांनी या सोप्या वाटणाऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी वर उल्लेखिलेल्या सर्व गोष्टींचा काटेकोर अभ्यास केला. फुलर यांनी अभ्यासांती लिहिलेले `अ वर्ल्ड विदाऊट इस्लाम’ हे पुस्तक त्यामुळेच इस्लाम आणि मुस्लिमांच्या प्रश्नाचा अभ्यास करणाऱ्या किंवा त्याबाबत कुतुहल असणाऱ्या प्रत्येकाने वाचणे गरजेचे आहे.



ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम या तिन्ही धर्मांचा उदय हा एकाच भूप्रदेशातला. ख्रिस्ती धर्मात तर सुरुवातीला ज्यू असल्याशिवाय प्रवेशही वर्ज्य. ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करण्यासाठी ज्यू असण्याची काही गरज नाही, याची सेंट पॉल यांनी चळवळ उभारल्यानंतरच थेट ख्रिस्ती होता येऊ लागले. इस्लाम या दोन्ही धर्मांच्या किती तरी नंतर उदयाला आलेला आणि ज्यू व ख्रिस्ती धर्माच्या प्रेषितांना मानाचे स्थान देणारा धर्म.

कुरआनमध्ये सर्वाधिक कुठल्या स्त्रीचा उल्लेख झाला असेल तर तो मेरी किंवा मरियम हिचा. या अब्राहमिक म्हणजे प्रेषित अब्राहम किंवा इब्राहिम यांना मानणाऱ्या एकेश्वरवादी तिन्ही धर्मांमध्ये जशी समान सूत्रे आहेत तशीच विरोधीदेखील आहेत.

येशू हा देवाचा पुत्र असल्याचे ज्यूंना मान्य नाही, ज्यू हे देवाने निवडलेले लोक (चोजन पिपल) असल्याचे ख्रिस्ती आणि मुस्लिम दोघांनाही मान्य नाही. देवाने कुणालाही निवडलेले नसून देवासाठी सर्व समान आहेत, असे कुरआन सांगते आणि ज्यू धर्मापासून ख्रिस्ती धर्माला वेगळं काढताना सेंट पॉल यांनीही नेमका हाच संदेश दिला.

ज्यू आणि मुस्लिम एकमेकांवर टीका करताना ख्रिस्ती धर्माची चिकित्सा मात्र समान मुद्द्यावर करतात. देवाचा पुत्र ही संकल्पनाच मूळात एकेश्वरवादाच्या विरोधात असल्याचे या दोन्ही धर्मांचे म्हणणे आहे. देवाचे विभाजन होऊ शकत नाही आणि तो कुणाला जन्म देत नाही, असे एकदंर ज्यू आणि इस्लाम धर्मीयांचे म्हणणे आहे.

एकाच भूप्रदेशात विविध काळांमध्ये जन्माला आलेल्या या तीन प्रमुख धर्मांमधील समानतेच्या व भिन्नतेच्या कारणांची मिमांसा करत फुलर यांनी पुस्तकाची सुरुवात केली आहे.

मध्य युगापासून इस्लाम विरुद्ध ख्रिस्ती विरुद्ध ज्यू असा जो संघर्ष जन्माला आला, त्याच्या कारणांमध्ये धार्मिकतेचा भाग असला तरी तो प्रमुख भाग नाही. प्रमुख भाग हा सांस्कृतिक, पारंपरिक आणि स्थानिक घडामोडींचा आहे.



पाश्चिमात्य विरुद्ध पौर्वात्य हा जो सांस्कृतिक संघर्ष इस्लामच्याही पूर्वीपासून कित्येक शतके सुरू आहे, त्याचीच परिणती खाडी देश, किंवा सबसहारन मुस्लिम देश विरुद्ध पश्चिमी जग या सध्याच्या संघर्षात झाली आहे. खरेतर क्रुसेड्सच्या नावाखाली मुस्लिम विरुद्ध ख्रिस्ती हा रक्तरंजित इतिहास अनेकदा अतिरंजित रंगवला जातो, असे फुलर सांगतात.

अगदी पहिले क्रुसेड झाले तेव्हादेखील जेरूसलेममध्ये घुसलेल्या ख्रिस्ती क्रुसेडर्सनी तेथील केवळ मुस्लिमांचेच शिरकाण केले नाही तर या शहरातील प्रत्येक स्त्री, पुरुष, लहान मुलांना ठार केले. ज्यात ख्रिस्ती आणि ज्यू धर्माचेही लोक मोठ्या प्रमाणावर होते. तेथील चर्चेस आणि सिनेगॉगना मशिदींप्रमाणेच आगी लावण्यात आल्या व ती उद्ध्वस्त करण्यात आली.

इस्लामचे खलिफा उमर यांनी पॅलेस्टाईनवर कब्जा केला तेव्हा मात्र त्यांनी अशा प्रकारे शिरकाण न करता इतर धर्मीयांना संरक्षण दिल्याचे फुलर यांचे म्हणणे आहे. मुस्लिम विरुद्ध ख्रिस्ती असे अनेक रक्तरंजित संघर्ष इतिहासात आहेत. मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात ख्रिस्ती विरुद्ध ख्रिस्ती असे संघर्ष आहेत.

रोमन चर्च विरुद्ध कॉन्स्टॅन्टिनोपल येथील ऑर्थोडॉक्स चर्च यांच्यातील संघर्ष हा अधिक रक्तरंजित असल्याचे ऐतिहासिक दाखले फुलर देतात. बायझेन्टाइन (कॉन्स्टॅन्टिनोपल येथील ऑर्थोडॉक्स) पौर्वात्य चर्च विरुद्ध पाश्चिमात्य रोमन चर्च याला अनुक्रमे ग्रीक आणि लॅटिन या दोन भाषिकांमधील संघर्षाचीही पार्श्वभूमी आहे.



कॉन्स्टॅन्टिनोपलमधील व्यापारी बहुतांश लॅटिन भाषिक कॅथलिक होते. त्यांच्या विरोधात तेथील ग्रीक भाषिक ऑर्थोडॉक्स जनतेत इतका प्रचंड असंतोष होता की १२व्या शतकात त्या शहरातील तब्ब्ल ऐंशी हजार लॅटिन भाषिकांची ग्रीकांनी कत्तल केली होती. पुढे चौथ्या क्रुसेडच्या दरम्यान कॉन्स्टॅन्टिनोपलवर रोमन-लॅटिन सैनिकांनी हल्ला करून रक्तपात केला. यात तीन दिवस कॉन्स्टॅन्टिनोपलमधील ऑर्थोडॉक्स चर्चला मानणाऱ्यांची कत्तल केली गेली.

स्त्रियांवर बलात्कार केले गेले. चर्चेचस लुटली गेली, तोडली गेली, याचे दाखले फुलर यांनी दिले आहेत. पुढे कॉन्स्टॅन्टिनोपल तुर्की मुस्लिमांच्या हातात पडल्यावर पाश्चिमात्य ख्रिश्चनांना ख्रिस्ती साम्राज्य मुस्लिमांच्या हातात गेल्यासारखे वाटले तरी तेथील ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांनी मुस्लिम शासकांबरोबर जुळवून घेऊन मुस्लिम साम्राज्यातही आपले सहअस्तित्व राखले. किंबहुना मुस्लिम शासकांपेक्षा पाश्चिमात्य ख्रिश्चनांविरोधात त्यांचा राग अधिक होता.

ऑर्थोडॉक्स चर्चचा प्रभाव पूर्व युरोपात बल्गेरिया, रोमिनाया, रशिया यांच्यावर प्रचंड राहिला. मात्र पोलिश, झेक, स्लोव्हाक, क्रोट्स स्लोव्हेनियन आदींना पुन्हा रोमन चर्चने आपल्याकडे वळवले. युरोपीय देशांमधील आपापसातील संघर्षाला या दोन ख्रिस्ती धर्मपीठांमधील भांडणाची किनार आहे.

लक्षणीय मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांच्या राजकीय सामाजिक इतिहासाचे फुलर यांनी अत्यंत सम्यक विश्लेषण केले आहे. युरोपमधील मुस्लिम, रशियातील मुस्लिम, भारतातील मुस्लिम, चीनमधील मुस्लिम अशी विविध प्रकरणे या पुस्तकात आहेत. रशिया ऑर्थोडॉक्स चर्चला मानणारे राष्ट्र असल्यामुळे तसेच झारने तेथील प्रामुख्याने तातार वंशाच्या मुस्लिमांशी अत्यंत चांगला व्यवहार केल्याने रशियात फार मोठा ख्रिश्चन विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष कधीही उभा राहिला नाही.



बोल्शेविक चळवळीच्या काळातही मिर्झा सुलतान गॅलिएव्ह नावाच्या नेत्याने मुसलमानांना कम्युनिस्ट चळवळीत सक्रीय केले होते. लेनिनचा अत्यंत विश्वासू असलेला गॅलिएव्ह हा स्वतः नास्तिक मुस्लिम होता. मात्र मुस्लिमांना कम्युनिस्ट चळवळीत सक्रीय करायचे असल्यास त्यांना सांस्कृतिक आणि धार्मिक बाबतीत किमान स्वातंत्र्य द्यायला हवे, असे त्याचे म्हणणे होते.

गॅलिएव्हने मोठ्या प्रमाणात मुस्लिमांना कम्युनिस्ट चळवळीत पुढे आणल्याचे फुलर यांचे म्हणणे आहे. पुढे स्टालिन यांनी मात्र गॅलिएव्ह यांच्या भूमिकेला विरोध करत नास्तिकतेची कास धरल्याने गॅलिएव्ह यांचे स्टालिन यांच्याशी मतभेद झाले.

भारतीय मुस्लिमांबाबत बोलताना इस्लाम आणि हिंदू धर्माच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून तयार झालेल्या सुंदर सामाजिक-सांस्कृतिक फ्युजनबाबत फुलर सांगतात. मोगलांच्या आक्रमणानंतर काही प्रमाणात जीझियातून वाचण्यासाठी गरीब हिंदूंनी धर्मांतराचा मार्ग स्वीकारला, मात्र बहुतांश शूद्र जातींनी असमानतेच्या विरोधात इस्लाम स्वीकारल्याचे फुलर सांगतात. मात्र सांस्कृतिक देवाणघेवाणीतून भारतातील मुसलमानांमध्येही अश्रफ व अजलफ असा जातीभेद तयार झालाच हे देखील लेखक दाखवून देतो.

इस्लाममधील सुधारणावादाबाबत बोलताना रशियातील `जादीदीस्ट’ चळवळीचे उदाहरण फुलर देतात. रशियातील मुस्लिमांनी आधुनिक शिक्षणाची कास धरण्यात या चळवळीच्या योगदानाचीही माहिती फुलर देतात. मात्र एकंदरच जागतिक पातळीवर मुस्लिमांमध्ये आधुनिक विचारांबाबत राहिलेल्या नकारात्मक दृष्टिकोनाबाबत बोलताना फुलर त्याची जबाबदारी पाश्चिम युरोपीय वसाहतवादावर टाकतात.

युरोपीय वसाहती प्रामुख्याने मुस्लिम बहुलदेशांमध्ये झाल्यावर, त्यांनी मुस्लिम धर्मशास्त्र, संस्कृती आदींवर आक्रमण करून ते दाबून टाकले, असे त्यांचे म्हणणे आहे. जागतिक पातळीवर सध्या सुरू असलेल्या विविध हिंसक-अहिंसक घटनाक्रमांमध्ये ज्या पद्धतीने मुस्लिमांची प्रतिमा रंगविली जात आहे, ती किती आभासी आहे, याचा हे पुस्तक वाचताना वारंवार प्रत्यय येतो.



मात्र तरीही ज्या पद्धतीने आधुनिक विचारांची कास पाश्चिमात्य राष्ट्रांनी धरली, धर्मसत्तेविरोधात द्रोह करून नवे विचार, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, संस्कृती यांचा विकास केला; त्याचा आभाव इस्लामी संस्कृतीत राहण्यामागे नक्की कोणते कारण आहे, इस्लाममध्ये धर्मसत्तेविरोधातील तीव्र संघर्षांची कमतरता का राहिली, नास्तिकतेच्या विरोधातील कट्टरता आजच्या युगातही इतक्या प्रखरपणे मुसलमानांमध्ये का आहे, या प्रश्नांची उकल करण्यात ही मांडणी कुठे तरी कमी पडत असल्याचे दिसते.

जागतिक तसेच भारतीय राजकारणात सध्या मध्य बिंदूवर असलेल्या मुस्लिम प्रश्नांबाबत समजून घेण्यासाठी फुलर यांचे ‘अ वर्ल्ड विदाऊट इस्लाम’ वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र नाक्यावर केल्या जाणाऱ्या वरवरच्या चर्चेतून दूषित परंतु अत्यंत ठाम मानसिकता घडलेल्यांनी हे पुस्तक वाचल्यास त्यांचा भ्रमनिरासच होण्याची शक्यता अधिक आहे !

###
पुस्तकाचे नाव : A World Without Islam
लेखक : Graham E. Fuller
ISBN-13 : 978-0316201063
प्रकाशक : Back Bay Books (2 April 2012)
भाषा : English
पाने : 400 pages
पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी ‘A World Without Islam’

(ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांचे हे समिक्षण ५ डिसेंबर २०१५ला महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झालेले आहे.)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: इस्लामशिवाय जग कसे असते ?
इस्लामशिवाय जग कसे असते ?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjIRqhCtrR2mc8vuvCXwFimcWxAPZLH_eI-k0XSZGroL2LKhPYRwiG9awll3FezW9q-3Wvbj8inxQBniV6eXy6KYaMiffVQfSNYLGAYh9q8KSVmfMokD9eW6XhhbygS30zoJiiCWnu7Wcs-/w640-h400/1604190032492911-0.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjIRqhCtrR2mc8vuvCXwFimcWxAPZLH_eI-k0XSZGroL2LKhPYRwiG9awll3FezW9q-3Wvbj8inxQBniV6eXy6KYaMiffVQfSNYLGAYh9q8KSVmfMokD9eW6XhhbygS30zoJiiCWnu7Wcs-/s72-w640-c-h400/1604190032492911-0.png
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/11/blog-post_1.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/11/blog-post_1.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content