सन १९९६ला पुढील वर्ग नसल्याने आंबाजोगाईच्या रविवार पेठेतली प्राथमिक शाळा सुटली.. रोजच्या येत्या-जात्या रस्त्यावर असूनही त्यानंतर कधी तिकडं फिरकणं झालं नाही. पण समोरून जाताना स्वाभाविक प्रत्येकवेळी नजर व चेहरा तिकडं वळत. आज तब्बल २८ वर्षांनंतर प्रवेश निर्गम उताऱ्यासाठी का होईना पायांनी शाळेकडे खेचलेच!
शाळेची जुनी इमारत पाहून मन बरचसं
नॉस्टॅल्जिक झालं. तिथं वावरणारी प्रशासकीय मंडळी नवीन व बिनओळखीची असली तरी ती शाळा,
त्या वर्गखोल्या, ते पटांगण, त्या भिंती, ती कपाटं माझ्या परिचयाची होती, जिथं माझं
बालमन अजूनही रमत, हुंदडत, बागडत, लपत-छपत, रुंजी घालत, खोड्या करत रेंगाळात पडलेलं होतं.
आत शिरताच पहिली नजर हेड मास्तरच्या ऑफिसवर पडली. त्याची उंची कशी काय तोकडी झाली बुवा, असा प्रश्न स्वाभाविक पडला. शिवाय भिरभिरते डोळे अनेक बदल सरसर टिपत गेले. जुनी नक्कल अर्जासोबत जोडली असल्याने त्यांचं काम खूप सोपं झालं होतं. बिनओळखीच्या हेड मास्तरनी लवकर करून देतो म्हटलं... पण तेवढ्यात मन काही शाळेबाहेर पडायला तयार नव्हतं.
उगाच काहीबाही प्रश्न विचारून, बोलतं करून, ओळख काढून
रेंगाळण्याचा विचार होता. पण सातवीच्या टीसीचं काम करीत बसल्याने ते जास्त वेळ देऊ शकले नाहीत. निर्गम उतारा झाला,
असा फोन तासा-दोन तासांनी आला, तसा सबीन व पुतण्या अदीबला घेऊन पाच-सात मिनिटात शाळेत दाखल झालो. उन्हाळी सुट्टी चालू असल्याने शाळा तशी रिकामीच होती.
मूळ काम दहा सेकंदात आटोपलं. मग काय मुलांना शाळा दाखविण्याच्या निमित्ताने पुन्हा तिथं बराच वेळ घुटमळत राहिलो. बालपणी ही जागा मोठी व विस्तिर्ण वाटायची. आता खूपच बंदिस्त व कंजेस्टेड जाणवते.. उंचीही डोक्याला लागते की काय असं सतत वाटत होतं. क्षेत्रफळ, आकार, भूरचना, स्वरूप गोगलगायसारखं आक्रसून गेलं की काय, असा भास झाला.
वाचा : जगण्याच्या धडपडीत हिरावलेली अनाम उत्कटता
वाचा : स्थलांतर : जगणे समृद्ध करणारा अनुभव
जून, १९८९ साली पहिल्या वर्गासाठी शाळेत दाखला घेतला होता. अम्मीने रँडम जन्मतारीख सांगून प्रवेश निश्चित केलेला. दुसऱ्याच वर्षी छोटा भाऊ सलीमही इथं आला. आम्हा दोन्ही भावंडाचं बालपण, भावविश्व याच शाळेने घडवलं. घरदार व पालकांपेक्षा अधिक वेळ या शाळेत गेला. त्यामुळे साहजिक शाळा घरासारखी, पालकासारखीच ‘आपली’ वाटते.
आतला परिसर मेंदूंच्या स्मृतिपटलावर कोरलेला होता. आजही तेच हुबेहुब दृश्य डोळ्यासमोर होतं. जणू पुनर्जन्म घेऊन असंख्य शतकानंतर करण-अर्जूनसारखं इथं पोहोचलो की काय, असं वारंवार वाटत होतं. तीच कौलारू, तीच पत्रे, छप्पर, सजावट, लाकूड, बांबू व त्यावरील धुळीने माखलेली जळमटं तशीच होती.
रंगसंगती, कड्या, खिडक्या, महिरप, दरवाजे, शहाबादी फरशी, तिचे उंटवटे-खोलगटे, पाण्याचा हौद, त्यावरील झाकण, काही जुनाट-मळकट रंग, भिंतीची ओल, पोटमाळे, माती, विटा.. खिळे, खुंट्या त्याच होत्या.. तेच प्रकाशमान.. तोच बांधीव आकार आणि तेच आगळं सौंदर्य! जशी सोडून गेलो होतो अगदी तशीच प्रत्येक वास्तूची ठेवण नजरेत भरत होती.
या तीन दशकात अंतर्गत सज्जा किंवा रचनेत कुठलाही बदल झालेला नव्हता. त्याची स्वरूप, कार्य, उपयुक्तता, सोयीही तशाच होत्या. तपशीलवार आरेखनाच्या शब्दजंजाळात पडायला नको. प्रत्येक घटकांचं सारखेपण, एकात्म तथा रचनात्मकता माझ्या सौंदर्यमीमांसेला उत्तेजन देत होती. एक-एक अनुभूती अवकाशीय होती. या अद्भूत वास्तूमध्ये वावरत असताना आधीच्या प्रत्येक हालचाली, कृती, व्यग्रता डोळ्यासमोर गतिमान होऊ लागल्या.
एक-एक वस्तू, साहित्य, घटकांना बोटांनी स्पर्श करून खात्री केली. त्या हलक्याशा स्पर्शाने असंख्य स्मृती मेंदू पटलावर स्वार झाल्या. सर्वांगीण चैतन्य पसरून गेल्या. मनातील भावनात्मकतेचा गुंता कल्लोळ करू लागला. उत्कटता ओथंबून आली. असंख्य आठवणी उन्मळून आल्या. काय व किती आठवू आणि काय व कसं साठवू असं झालं. मन जरासा गोंधळूनही गेलं.
पहिलीचा वर्ग पाहताना साठीकडे झुकणाऱ्या काशीबाई हातात खडू घेऊन ‘कार्ट्यांनो गप्प बसा रे...’ चिरकताना दिसल्या. त्यांची बुटकी उंची, चेहरा, वर्ण, वेणी, शब्द, करुणा व स्नेह आठवत राहिला. भिंती, फळ्याच्या बाजुची खिडकी न्याहाळली. भिंताडावर नव्या रंगाच्या घोषवाक्यांनी गर्दी केली असली तरी त्यावर लावलेली चित्रे, नकाशे, सुविचार, बाराखडी अजूनही जुनी अनुभूती देत होती.
मेन दरवाज्याकडे खाली वळताना शेजारची खोली म्हणजे आमचा तिसरीचा
वर्ग... (पूर्वी तो सहावीचा होता. इमारत विस्तारात तो बाहेर गेला.) तिथं सिरसाट बाई
खुर्चीवर बसल्या आहेत, असा भास झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील एक वांग की डाग - त्यावर नजर खिळली. त्यांच्या हाताला लावलेलं प्लॅस्टर व
त्यावरील लोखंडी क्लिप न्याहाळत राहिलो.. भिंतीवरील खिळे मारून चिकटवलेली चित्रे शोधू लागलो. सहावीच्या जीवशास्त्र
विषयाची एक आकृती बरेच दिवस भिंतीला घट्ट बिलगून बसलेली होती.
समोरच पाचवीचा वर्ग.. तिथं देशपांडेबाई आपल्या उंच स्वरात छडी उगारताना दिसल्या. त्यांचा इंग्रजीचा तास इतक्यात धडकी भरून गेला. त्यांचं दिसणं, बोलणं, रागावणं सर्वकाही फ्लॅशबॅक होतंय असं जाणवलं. बाई खूप प्रेमळही होत्या. सर्व स्टाफमध्ये आकर्षक दिसत... त्यांचे कपडे, साड्या महिला स्टाफच्या दैनंदिन चर्चेचा विषय.. त्यांची लुना आतमध्ये आणण्यासाठी खास घसरगुंडी करून घेतली होती. बाई शाळेत शिरताच आम्हा विद्यार्थ्यांमध्ये धडकी भरे... तर स्टाफमध्ये अनामिक उत्साह संचारे...
शाळेची वेळ सकाळी ८:४५ ते दुपारी ४:३० अशी.. मी घरून बरोबर आठ वाजेच्या ठोक्याला बाहेर पडे.. रमत, डुलत, इकडे-तिकडे पाहत पाच-दहा मिनिटात शाळेत पोहोचे. साडे आठला प्रार्थना सुरू होई..
वाचा : बालपणीचे मामाचे गाव कुठे हरवले?वाचा : वन वे तिकीट - घरदार सोडून स्वप्नांचा पाठलाग
पहिला वर्ग सुरू होताच, वर्गशिक्षिका बाई हजेरी रजिस्टर घेऊन दरवाज्यातून दाखल होत. त्यावेळी आम्ही सर्व विद्यार्थी मांडी घातलेल्या अवस्थेतून फरशीवरून उठून ताठ उभे राहत व ‘एक सात नमस्ते’चा सूर आळवित.. सर्वप्रथम हजेरी व नंतर शुद्धलेखनाच्या वह्या तपासल्या जात.. वह्यांवर सटासट लाल शाईचा परिणाम होई... ज्यांनी गृहपाठ केला नाही, त्यांना मार, छड्यांचा प्रसाद मिळताच शिकवणी वर्गाला सुरुवात होई.
तसा मी पहिल्यापासून फ्रंट बेंचरच होतो, पण पूर्ण वेळ माझं सारं लक्ष बॅक बेंचरवाल्यांकडे राही.. कारण तिथं खिदळणारे हास्यतुषार होते. खोड्या होत्या. कल्ला होता. उर्जा होती. मजा-मस्ती होती. गप्पा होत्या. भांडणं-तंटे होती. शोळेच्या बातम्या होत्या. नव्या माहितीची देवाण-घेवाण होती. गुपित गोष्टींवर उघड बोलणं होतं. बालसख्यांशी जवळीक होती, वर्गभर गोंधळ घालणारे जीवलग होते.
पाचवीच्या वर्गातील भिंतीवर लावलेलं माझे रेखाचित्र बराच वेळ आठवत व शोधत राहिलो. एका वॉलपीसची प्रतिमा भिताडावर फ्लॅश झाली. होय ते मीच लावलं होतं. ते टेलरिंग दुकानाच्या मशिनवर अब्बू नसताना त्यांना लपवून खास शिवून तयार केलं होतं. वहीचं खपट गोलाकार कापून त्यावर रंगबिरंगी कपड्यांचं कटिंग चढवलं होतं. साईडने त्याला फायबरच्या रंगीत काड्या लटकवल्या होत्या.
त्या दिवशी माझं ते वॉलपीस पाहून शिक्षिका व वर्गमैत्रिणी बराच वेळ त्याच्या सौंदर्याचं कौतुक करीत राहिल्या. सहावी-सातवीतही ते नवं-कोरं शिवून वर्गखोल्याच्या खुंट्यावर टांगलं होतं. आम्ही बालमित्रांनी केलेली वर्गाची अंतर्गत सजावट, शोभेचे साहित्य, कापसापासून तयार केलेली बदकं इत्यादीचा शोध घेत राहिलो. परंतु नव्या पेंटने रंगवलेल्या घोषवाक्यांनी माझा तो प्रयत्न अपयशी झाला.
शेजारच्या स्टाफरूममध्ये काही शिक्षिका बोलत बसल्या होत्या. मला त्यांच्यामध्ये देशपांडे, निकम व सिरसाटबाई दिसल्या... डोळ्यावरचा चष्मा नीट करताना धायगुडेबाई टिफीन उघडत होत्या. त्या खोलीत मुलांना प्रवेश बिलकूल नव्हता. पण कवायतीच्या तासात मात्र तिथं जाण्याची परमीशन होती. तिथं मागच्या भिंतीला खेटून घुंगरकाठी, डंबल्स, लेझीम ठेवलेली होती. ती बाहेर आणणं व आत ठेवणं इतक्या काळासाठी तिथं मुलं जाऊ शकत. बाकी वेळेत मुली किंवा शिक्षिकांचा तिथं राबता!
त्या खोलीच्या समोर हेड मास्तरचं केबिन व त्या समोरच चौथीचा वर्ग होता. आत जाऊन फळ्याच्या बाजूला असलेल्या खिडकीतून बाहेर डोकावलं. कागदाचे तुकडे, वह्यांचे पुठ्ठे, पेनची रिफिल बाहेर फेकताना शाईने बटबटलेला माझाच लांब झालेला हात दिसला. तिथून बाहेरचं रस्त्यावरील सर्व दृश्य दिसे. चौथीला असताना वर्षाअखेर वर्गशिक्षिका धायगुडेबाईंची बदली झाली. त्यांच्या जागेवर चव्हाण सर आले. धायगुडे विज्ञान शिक्षिका तर चव्हाण गणितं घेऊ काय तर आम्हा विद्यार्थ्यांना कोडं टाकू लागले. ते शाळेत कोणालाही आवडत नसे. त्याचही एक कारण होतं. शाळा सुटल्यावर ते अनेकदा बाराभाई गल्लीतून हातभट्टी पिऊन तर्राट होऊन डुलत-डुलत घरी जात... हे दृश्य हेड मास्तरसह शाळेतील प्रत्येकांनी पाहिलं होतं. त्यांच्या लहरी वृत्तीमुळे माझ्यासारख्या काही विद्यार्थ्यांचं गणित कच्च राहिलं ते शेवटपर्यंत.
प्रवेश दारातून आत शिरताच समोर ध्वजस्तंभावर नजर जाते.. त्याच्या बाजुला मोकळ्या जागेत दुसरीचा वर्ग भरे. दोन्ही बाजुंनी पत्रे टाकलेली ती अंगणासारखी जागा आहे. आता ध्वजस्तंभाला चिकटून स्लायडिंग गेट दिसलं. आधी ते नव्हतं. बहुधा जमीनमालकाने मागची जागा अधिग्रहित करून ती जोडली असावी.
एका बाजुला खराब झालेले बेंच, बाकडे ठेवलेली होती तर दुसऱ्या बाजुला स्टाफसाठी वॉशरुम होतं. त्यातले काही बाकडे जुनेच दिसले.. बहुधा आमच्या काळातीलच असावेत. ह्या जागेत पूर्वी सकाळची प्रार्थना होई. ती संपून वर्गाचे तास सुरू होईपर्यंत उशीर होत, त्यामुळे प्रार्थना बाहेर रस्त्यावर शिफ्ट केली गेली. दुसरीचा वर्ग सुरू होताच तिथला कल्ला संपूर्ण शाळेत गर्जत राही. तो शांत करण्यासाठी हेडमास्तर धर्मपात्रेंच्या बेलवर बेल वाजे.
विशेष कार्यक्रमासाठी ही जागा योग्य राही. राष्ट्रीय नेते, थोर महामानवांच्या जयंती, पुण्यतिथीचे खास कार्यक्रम इथंच होत. खाली मेन दरवाज्यापर्यंत आवाज येत व समोरचा आगंतुक स्पष्ट दिसे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून वर्गणी गोळा करून विद्येची देवी (?) सरस्वतीची मूर्ती आणली होती. त्यांचं लोकार्पण याचं ठिकाणी पार पडलं होतं.
तिथं जाऊन ध्वजस्तंभाला स्पर्श केला. सकाळचं जन-गन-मन, प्रतिज्ञा व प्रार्थनेचे शब्द कानावर पडू लागली. बलसागर भारत.., खरा तो एकची..., सरस्वती वंदना.. पसायदान, सारे जहाँ से अच्छा.. आदी गीते आठवली. गांधी जयंती, सावित्रीमाईवर केलेली भाषणं, फुलेंवरील वाचलेले निबंध आठवू लागले.
खालच्या मोकळ्या जागेत अम्मीचा टाहो ऐकून मनावर झालेल्या आघाताने डोळे डबडबले. त्या दिवशी चिंतेने ग्रासून आम्हा भावंडाना घरी घेऊन जाण्यासाठी अम्मी शाळेत आल्या होत्या. आदल्या दिवशी किल्लारीच्या भूकंपाने त्यांची लहान बहिण व माझी मावशी तसलीम खाला तिच्या संपूर्ण कुटुंबियासह जमीनीत गडप झाली होती. अम्मीने रडून-रडून इथंच संपूर्ण शाळा गोळा केली होती. त्यांना सांत्वन देण्यासाठी इथंच शाळेचा सर्व स्टाफ जमा झालेला. त्या स्टाफविषयी एकाएक कृतज्ञता वाटू लागली. अम्मीचा विलाप व शिक्षिकांचं त्यांना सावरणं डोळ्यासमोर तरळलं.
मुख्य दरवाज्याच्या बाहेरच समाज मंदिर आहे. त्याच्या दोन्ही बाजुला रस्ता. गेटसमोरील रस्ता किंवा मोकळी जागा मधल्या सुट्टीत हुंदडणे, मारा-मारी, कबड्डी, लपंडाव खेळायच्या कामी येई. अलीकडे रहदारी जास्त नसे. इथं आमची सकाळची प्रार्थना होई. १९९४ साली इथं व आसपासच्या जागेवर एक भलं मोठं मंडप टाकून स्नेहसंमेलन भरलं होतं. मातीवर पाणी शिंपडण्याचा कार्यक्रम बराच वेळ चालला होता.
हे स्नेहसंमेलन वेगवेगळ्या कारणांनी खूप गाजलं होतं. वर्गमित्र राजाचा बुलडॉगचा आयटम असो वा गल्लीतील राजूची अज़ान.. वर्गमैत्रिण राधाचं लांब-लचक भाषण... माझी घुंगरकाठी-डंबल्सची कवायत बरंच काही आठवत राहिलं.. या कार्यक्रमात बरीच वरीष्ठ पाहुणे मंडळी आली होती. बीडहून शिक्षणाधिकारी आल्याचं आठवतं. नंतर या सर्व मोकळ्या जागेवर डांबरीकरण करून दिल गेलं. त्यामुळे आमची पाय धुळीपासून वाचली.
याच शाळेत असताना १९९२ची दंगल अनुभवली, १९९३चा भूंकप सोसला, १९९४ची प्लेगची साथ पाहिली. त्या काळी होणारा सततधार पाऊस, (आता पर्जन्यमान खूपच घटलंय, आमच्या बालपणी अनेक आठवडे कोसळधार सुरू असे) मंगळवार दुपारचा सिनेमा... चंद्रकांता, श्रीकृष्णा, अलिफ लैला, शाळेतील शुक्रवारची विशेष प्रार्थना.. गळक्या भिंतीचे शेवाळ व त्यांचा सुवास... छताच्या बांबूचा भूंगा, पत्र्यांची छिद्रे... त्यातून वह्यावर झेलणारी सूर्यकिरणे... ऊनसावल्यांचा लपंडाव, जळमटं, पाली... किटक.. आतला उकाडा, बरंच काही डोळ्यासमोर गोंधळ घालत होता.
वाचा : सायगांव : आंबाजोगाई तालुक्यातील ‘मिनी गल्फ’
वाचा : लॉकडाऊन डायरी : भग्न मनाचे अस्वस्थ अवशेष
वाचा : कौतुक सोहळा मुंबई व्हाया अंबाजोगाई
आणखी थोडं निरखून पाहिलं, तर भावभावनेतील प्रत्येक घटक एक नजरेसमोर रुंजी घालत होतो. मानवी भावनांप्रमाणे ही वास्तूही माझ्याशी हितगुज करीत होती, काहीतरी मनातलं बोलत होती. काही अव्यक्त भावना सांगण्याचा प्रयत्न करीत होती.
अंगणातील पाण्याचा माठ, त्यावरील प्लास्टिक ग्लासचा गंध. हौद, त्याच्या पितळी तोट्या, त्यावर बिलगलेल्या मधमाश्या बरंच काही स्मृतीशी स्पर्धा करीत होत्या. वर्गाच्या भिंतीवर लावलेले नकाशे, त्यावर चिटकवलेला आपला नाचरा मोर, सूर्योदय-सूर्यास्ताची चित्रे... झिरमाळ्या... पताका... चित्रे, पाचवीच्या वर्गात मी लावलेली सात खंडाची नावं... काय-काय आठवू आता... ओह...
सावर रे मना..
आता वर्गा-वर्गांत आधुनिक बेंच टाकलेली दिसली.. पूर्वी दुसरीच्या एकाच वर्गात लांबडे बाकडे होती. एका बाकड्यावर चार-पाच जण बसत. पाटी-वही मांडीवर ठेवून लिहावं लागे. इतर वर्गात फरशीवर मांडी घालून बसायचो.. समोर एका लोखंडी पत्र्याच्या खुर्चीवर शिक्षिका बसत.. विद्यार्थी व शिक्षिकातील नातं थेट संवादी... त्यावेळी हिच वर्गखोली भली मोठी व मोकळी-मोकळी वाटून जायची. आता सहज न्याहाळताना एक-एक वर्ग खूपच आकसल्याचा भास होतोय.
पहिलीच्या वर्गात समोर जाऊन फळा पाहिला.. तो तसाच होता.. बहुधा नंतर कधीतरी काळा रंग चढवला असावा... त्यावरील उंटवटेही तेच होते. इतर वर्गात आता आमच्या काळातील गुळगळीत सिमेंटवर काळा रंग दिलेला तो फळा नव्हता. त्याची जागा आधुनिक बोर्डाने घेतली होती. त्याला कुठं असणार स्मृतीचा तो मृदगंध!
पहिली ते सातवी, एकूण ७ वर्ग शाळेत चालायची, आताही तेवढेच चालतात... तीन-चार गल्लीतील श्रीमंत, सधन, गरीब, शेतमजूर, कास्तकार, हमाल व रोजंदारीवर काम करणाऱ्या असंख्य श्रमिक कुटुंबाची मुलं शाळेत येत.. जवळपास ४००ची पटसंख्या असलेलं.. मिल्लियानंतरची मोठी शाळा होती.
शाळेतील बहुतांश विद्यार्थी आर्थिक मागास घटकातील होती. लटकलेली पारोसी चेहरे घेऊन शाळेत येत.. पायावर जखमा, मातीचे डाग, पांढरेफटक चेहरे.. विस्कटलेले केस, उसवलेले मळकट कपडे... बहुतांश मुलं हाफ पॅण्टवाले तर मुली स्कर्ट, फ्रॉक घालत. त्यांचेही चेहरे शुष्कच... दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत बरेचसे घरी जात, तर काही वर्गात रेंगाळत बसत. मोजकी मुलं टिफीन आणी.
दुपारी शाळा भरण्याच्या आधी पोहोचलो तर वर्गमित्र संजयच्या घरी जीवलगांसह जाणं होई. त्याचं घर जवळच होतं. त्याच्याकडे कबुतरे होती. कबुतरांचा ओढा तिकडे खेची. तो खूप बकाल घरातील होता. वडिल नव्हते. आई कुष्ठरोगाने ग्रासलेली. त्याच्या घरी स्वयपाक केला जात नसे. तो जेवायला बाहेर एखाद्या नातलगाकडे जात. आम्ही मित्र गेलो असता त्याचं कबुतरांना दाणे टाकण्याचं काम ओटपलं जाई. मग तो जरमनची ओबड-धोबड प्लेट व जरमनचा ग्लास घेऊन समोरच्या बिल्डिंगमध्ये जात.
तोपर्यंत आम्ही बाजुच्या पडक्या वाड्यातील फिरंगी चिंच उर्फ गोरटी इमली तोडत किंवा बोरं पाडून खाण्याचं काम करीत.. एकदा बोरांसाठी झाडावर मारलेला दगड माझ्या डोक्यात पडला. भळाभळा रक्त येऊ लागलं. वर्गमित्रांना वाइट वाटलं. त्यांनी विनवण्या केल्या की बाईंना सांगू नकोस... बाईंनाच काय तर मी अम्मीलाही ते कळू दिलं नव्हतं. सोबत भाऊ होता, त्यालाही तशी ताकिद दिली होती.
संजय संध्याकाळी शाळा संपल्यावर मंडी बाजारातील एका हॉटेलात कप-बशी विसळण्याचं काम करी. पाचवीनंतर तो पूर्णवेळ हॉटेलमध्ये काम करू लागला. अधून-मधून तो भेटायला शाळेत यायचा. सुरुवातीला आम्ही त्याला जाऊन भेटत.. पण हळूहळू भेटी कमी-कमी होत गेल्या. आजही तो रोजंदारीवर हॉटेलमध्ये काम करतो..
शाळेत अशी अनेक मुलं शिकत होती. २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्टला गरीब, गरजू निवडक विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळे. शाळेचा स्टाफ आठवडाभर आधी बाजारात फिरून कपड्यांच्या दुकानातील जुना, विना सेलचा माल, सदोष कपडे संकलित करीत. मग तो गणवेश शाळेतील गरजू मुलांमध्ये वाटून टाकत. मलाही नेहमी वाटायचं की आपल्याला एखादा ड्रेस मिळावा, पण ते झालं नाही.
माझे व माझ्या लहान भावाचे कपडेही जेमतेम होती. अब्बू टेलर असूनही आम्हाला नवीन कपडे मिळण्याची सोय नसे. वर्षातून एकदाच रमजान ईदला कपडे शिवली जायची. तीही खूप मिन्नती करूनच.
शाळा सरकारी होती, पण नाममात्र फी भरावी लागे. कदाचित तीन-चार रुपये असावी. भरण्याची ऐपत नसेल तर इबीसीची सवलत होती. इबीसी भरला तर ४०-६० पैसे.. बहुधा तिमाही की सहामाही असावी, आता आठवत नाही. तीही वेळेवर मिळत नसे. काहींचं वह्या-पुस्तकांशिवाय वर्षे सरून जात. फाटकं-तुटकं, विस्कटलेलं भविष्य घेऊन मुलं शाळेत येत. पण ना त्यांना पालकांची साथ होती ना व्यवस्थेची.. सातवीनंतर शाळेतील अनेक विद्यार्थ्यांची गळती होई. ही मुलं विट भट्ट्यावर, शेतात, गवंडीच्या हाताखाली, हॉटेलमध्ये कप-बशी विसळणे, उष्ट काढणं इत्यादी कामावर जुंपले जात. मुसलमान मुलांची संक्या खूप ोहती. त्यापैकी अनेकजण विट भट्ट्यावर बिगारी झाली. काही लोकूड तोड झाली. तर काही मंडी बाजारात माळवं विकू लागली. हमाली करू लागली.
परिसरातील ही एकमेव मराठी मीडियमची झेडपी शाळा... आज जराशी ओस पडली आहे. प्री-प्रायमरी इंग्रजीचं फॅड वाढल्यामुळे झेडपीच्या अनेक शाळा निर्मनुष्य होऊ लागल्या आहेत. या शाळेतही पहिल्यासारखे प्रवेश होत नाहीत, असं कळलं.
माझ्या प्रवेशापूर्वी शाळेचे पहिले दोन वर्ग शासकीय अपंग केंद्रासमोरील भागुराम जेथे यांच्या वाड्यात भरत.. (इथं पहिली व दुसरीत मी होतो. इथल्या आठवणी अजूनही मेंदूच्या हार्ड ड्राइव्हमध्ये तंतोतंत सेव्ह आहेत.. इथं एक सरकारी एकल शाळा चालत होती. टेंगुळवाले गुरुजी ती चालवत. एकाच खोलीत पाच वर्ग चालत. तिथली एक रांग म्हणजे एक वर्ग होता.) दुसरीच्या मध्यंतरात सर्व वर्ग पटाईत वाड्यात भरू लागली.. शेजारची जागा घेत पटाईत काकांनी शाळा विस्तारित करून दिली होती.
समोर मिल्लिया उर्दू शाळा (व ज्युनिअर कॉलेज) होती, गेल्या वर्षांपासून ती मंडी बाजारात शिफ्ट झालीय. तिथं बडे भय्या शिकायला होते.
मधल्या सुट्टीत अम्मी
भय्यासाठी आमच्याकडे डबा पाठवत.. आम्ही तो त्यांच्या शाळेत नेऊन देत. एकदा डबा देण्यासाठी गेलो
असता मधल्या सुट्टीची बेल वाजली. सेवकाने मेन स्लायडिंग गेट खेचून घेतलं. मला
बाहेर पडताच आलं नाही. एक तर टिफीनसाठी उशीर झाला होता, आता बाई रागावतील व चोप
देतील म्हणून मी हमसून-हमसून रडू लागलो. भय्याला ते लक्षात आलं. शोधत-शोधत धावतच माझ्याजवळ आले. त्यांनी मला गप्प केलं व सेवकाला गेट उघडून बाहेर सोडण्याची विनंती
केली. बाहेर पडताच एक मोठं संकट टळलं असं झालं होतं.
तेव्हा राम भालचंद्र विद्यालयाची नुकतीच सुरुवात झाली होती. त्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली. ही माध्यमिक शाळा समोरील समाज मंदिरात भरत. तितं दोनच खोल्या होत्या. बाकी समोरची जागा मोकळी होती. या जागेत त्यांची प्रार्थना भरे. कधी आमच्या प्रार्थनेत मिसळून तर कधी स्वतंत्रपणे ते प्रार्थना घेत. आठवी, नववी व दहावी हे तीन वर्ग दोन खोल्यात भरत.. या पाताळेश्वर महादेव मंदिराच्या (गेल्या २० वर्षात त्याचं नामांतर नंतर झालं.) भिंतीवर अजूनही राम भालचंद्र माध्यमिक विद्यालयाचा रंगवलेला बोर्ड दिसतो.
तिथं शिकवणारे एक शिक्षक - सिरसाट शाळा संपल्यानंतर क्रांती बुक सेंटरमध्ये पार्ट टाइम काम करत होते. तिसऱ्या वर्षी त्यांनी जागा बदलली. नंतर ही शाळा गणेश पार जवळील लालबहादूर शास्त्री चौकातील औसेकर वाड्याच्या बाजूला स्वतंत्र इमारतीत सुरू झाली. आजही याच वास्तुत ती आहे. याच चौकात १५ वर्षे आमचं टेलरिंगचं दुकान होतं.
मागे म्हटल्याप्रमाणे भालचंद्र समाज मंदिरात होती.
तिथं बाहेर एक शिवलिंग व महादेवाची पिंड आहे. आसपासचे काही लोक सकाळी येऊन दररोज
त्याची विधिवत पूजा करत. आठवड्यातून एक दिवस विशेष पूजा होई. त्यादिवशी स्वच्छ
पाण्याने शिवलिंग व पिंड धुतलं जात. त्यासाठी एक खास (दलित) चेहरा दोन-तीन कळशा पाणी आणत.
१५-२० मिनिटे त्याचा हा उपक्रम चाले. पूजा करताना तो जबड्यातून वेगवेगळी आवाज काढी. बरोबर साडे दहाच्या मधल्या सुट्टीत त्याची पूजा सुरू होई. आम्ही सर्व (त्यात काही मुस्लिमही) विद्यार्थी
कुतूहल म्हणून सारा उपक्रम पाहत बसू.
नवीन शाळा असल्याने विद्यार्थ्यांनी भरलेल्या रिक्शा लांबून गल्लीत येऊ लागली. त्याकाळी एक एसटी बस रविवार पेठ ते वरच्या (एसआरटी) दवाखान्यावर जात. सकाळी साडे आठला काशी विश्वनाथ वेसपासून तिचा प्रवास सुरू होई. दिवसातून तीन-चार फेऱ्या होत. ही बस मन्सुर हायस्कूलसाठी बागवान गल्लीच्या पौलीस चौकीपर्यंत येऊ लागली. शाळेची वेळ सोडली तर इतर वेळी गल्लीतील लोकांची चांगली सोय झाली. तीन-चार वर्षांनंतर ती कायमची बंद पडली.
मन्सुर सुरू झाल्याने झेडपीच्या आमच्या शाळेतील पटसंख्येवर परिणाम झाला. भालचंद्रने माध्यमिकची सोय केली त्यामुळेही पटसंख्या बरीचशी टिकून राहिली. किंबहुना काहीअंशी ती वाढलीदेखील... पण तीन-चार वर्षांत भालचंद्रने पहिलीपासून वर्ग सुरू केले, त्याचा या शाळेवर फारसा परिणाम होऊ शकला नाही. कारण भालचंद्र ज्या वस्तीत होतं, ती बहुतांशी शेतमजूर, कास्तकार, बिगारी कामगारांची होती. त्यांची मुल शाळेत न जाता उनाडक्या करीत फिरत किंवा आई-वडिलांसमवेत शेतीच्या किंवा विटभट्टीच्या बिगारी कामावर जाई.. भालचंद्र सुरू झाल्याने ही मुलं शाळेत जाऊ लागली होती.
संपूर्ण आंबाजोगाई शहरात
जिल्हा परिषदेच्या सुरू असलेल्या काही शाळांपैकी रविवार पेठेतली ही एक आहे. मंडी बाजारात बुरुजाजवळ झेडपीची मोठी कन्या शाळा होती. आता ती हळहळू अवसायानात जात आहे. त्याच्या समोर मुशीर मंजील निज़ाम सरकारची शाळा होती. तिचा कारभार झेडपीकडे होता. नंतर ती कायमची बंद झाली. तिची ऐतिहासिक इमारत अजून उभी आहे. गल्ली-परिसराची
लोकसंख्या वाढली पण झेडपी शाळेची पटसंख्या वाढू शकली नाही.
परिसरातील मध्यमवर्गीयांच्या
हातात पैसा खेळू लागल्यामुळे ती इंग्रजी मीडियम किंवा तत्सम उच्चभ्रू शाळेत आपली
मुलं पाठवू लागली. त्यामुळे अशा इंग्रजी मीडियम तथा खासगी शाळांची संख्या बरीच फुगली. पण जुन्या गुणवत्तेची बरोबरी कुठे?
शहरातील खोलेश्वर, योगेश्वरी या प्रतिष्ठित खासगी
शैक्षणिक संस्था आहेत. त्यांच्या स्वतंत्र शाळा व कॉलेज आहेत. ते आजही आपलं वैभव व
गुणवत्ता टिकवून आहेत. याच खोलेश्वर शाळेत प्रमोद महाजन विज्ञान शिक्षक होते.
योगेश्वरीला राष्ट्रीय शाळेचा दर्जा देऊन तिला नवसंजिवनी देण्याचं कार्य स्वामी
रामानंद तीर्थ यांनी केलेलं होतं.
आंबाजोगाई शहराची लोकसंख्या वाढली मात्र इथं पाहिजे तसं दर्जेदार शिक्षण विस्तारित होऊ शकलं नाही. आज बहुतांश विद्यार्थी पुण्यात स्पर्धात्मक परीक्षात, व्यावसायिक कोर्स तथा प्लेन बीएससीत रमली. पालकही शैक्षिक सजगता (?) म्हणून भरमसाठ पैसा खर्च करून मुलांना बाहेर शिकायला पाठवू लागली आहेत.
शेतकरी व अल्पभूधारक जमाती, मागास जातीतील सधन वर्ग, व्यापारी, शिक्षित घटकांची मुलं पुण्यात
राहून भरमसाठ पैसा खर्च करतात, तिथल्या सकल उत्पादनात भर टाकतात. वर्षभरात पुण्याला १०० कोटींचा व्यवसाय देतात, पण शेवटपर्यंत बाहेरचे, उपेक्षित,
स्थलांतरितच राहून जातात. गुणवंत किती होतात, हा प्रश्नही त्याकाळी होता, आजही आहे.
नक्कीच काहींनी आंबाजोगाई शहराचं वैभव वाढवलं, नाव मोठं केलं आहे.
‘लातूर पॅटर्न’ तयार होऊन तो गाजण्यापूर्वी
आंबाजोगाईला शिक्षणाचं माहेरघर समजलं जात. किशोर शांताबाई काळे यांनी आपलं
प्रसिद्ध आत्मकथन ‘कोल्ह्याट्याचं पोर’मध्ये इथल्या शैक्षणिक वातावरण, गुणवत्तेविषयी
विस्तारित कथन केलेलं आहे, जे पूर्वीचं शहराचं महात्म्य दाखवून देतं.
लक्ष्मण गायकवाड यांनी
आपल्या सुप्रसिद्ध ‘उचल्या’ आत्मकथनात आंबाजोगाईचा मोंढा बाजार, कार्यदक्ष पोलीस स्टेशन, परिसरातील शेती, इथली लोक, उत्पादित वस्तुंबाबत विस्ताराने
लिहिलं आहे. दिवंगत केंद्रीय संसद कार्यमंत्री प्रमोद महाजन, राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत
गोपीनाथ मुंडे यांचं शिक्षणही इथंच झालं. राज्याच्या आरोग्यमंत्री म्हणून गाजलेल्या
दिवंगत विमल मुंदडा यांचही शिक्षण इथंच झालं. दिवंगत किशोर शांताबाई काळे इथूनच
डॉक्टर होऊन नामांकित झाले.
स्वातंत्र्य चळवळीत योगेश्वरी राष्ट्रीय शाळा म्हणून गाजली. मराठवाड्याला मुक्ती संग्रामाचे दिवस दाखणारे एसआरटी इथलेच. मानवलोक स्थापन करणारे द्वारकादास लोहिया इथलेच.. थोर साहित्यिक व संघटक अमर हबीब, बालाजी सुतार, दासू वैद्य हे प्रतिभावान इथलेच...
एकेकाळी मेडिकल, इंजिनिअरिंग व शिक्षणशास्त्रासाठी
आंबाजोगाईला वेगळं महत्त्व व महात्म्य होतं. डी.एड., बी.एड. अभ्यासक्रमाची वासलात लागली
असली तरी आजही शहर मेडिकल-इंजिनिअरिंगसाठी प्रसिद्ध आहे. मेडिकल पीजीसाठी आजही आंबाजोगाईसाठी
अनेक जण इच्छुक असतात. गावातलं हे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मराठवाड्यातील सर्वांत
मोठं ग्रामीण रुग्णालय आहे. कोविडमध्ये अनेकांना जीवनदान याच हॉस्पिटलने मिळवून
दिलं.
इथल्या विविध जिल्हा परिषद शाळांनी अनेक पिढ्या घडवल्या. येथील महाविद्यालयांनी गावाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रज्वलीत केलं.
माझ्या या शाळेने भारताला मोठं मनुष्यबळ दिलंय.. देशाच्या सकल उत्पादनात भर टाकणारे माझ्यासारखे असंख्य
विद्यार्थी दिलेत.. आता हेच गाव शिक्षणासाठी लातूरला आपली मुलं पाठवू लागलं आहे.
औरंगाबादला प्रवेश घेऊ लागलं आहे. आता शहरात शिक्षणाचं बाजारीकरण फोफावलं आहे.
अनेक खासगी संस्थांच्या कृपेने गुणवत्ताहिन व्यावसायिक अभ्यासक्रमाची रुजुवात झाली.
JEE, NEET, MHT-CET तत्समचे भरमसाठ इन्स्टिट्यूशन्स आहेत. क्लासेसचा बाजारही फुगत चालला आहे. असो..
माझी झेडपीची ही शाळा गरीब,
निराश्रित, होतकरू व गरजवंताची पालक झाली. अनेक जण सातवीनंतर शिकू शकले नाहीत. अद्याप ही मंडळी बिगारी किंवा रोजंदारीच्या कामावर जुंपली आहे. ते चेहरे अधून-मधून
कुठे फिरताना दिसले की शाळा व त्यातील त्यांचा सुखद सहवास आठवतो.
प्राथमिक शाळा प्रत्येकांची एक हळवी मेमरी असते, ती पाहता, आठवता, विषय निघता प्रत्येकजण नेहमी सुखावून जातो.. शब्दात व्यक्त करता न येणाऱ्या असंख्य अव्यक्त भावना भरून येतात.
“कोई लौटा दे मेरे बीते हुए वह दिन.. वह पलछीन...
मैं अकेला तो न था, कई थे साथी मेरे...”
काही क्षणासाठी का असेना आज मी
या प्राथमिक शाळेचा विद्यार्थी झालो व भूतकाळातील हजारों स्मृती मनात रुंजी घालू
लागल्या.. कुठलेही कष्ट व परिश्रम न घेता बरंच काही भराभर आठवू लागलं..
काही क्षणासाठी ही वास्तू माझं व्यक्तिमत्व खुलवू पाहत होती. आपल्या व इतरांशी मैत्रीचे, ऋणाबंधाचे संबंध प्रस्थापित करू पाहत होती. एखादी वास्तू नजरेत का भरते, ती सुंदर का भासते, या सौंदर्यमीमांसेचं विश्लेषण करू पाहत होती. शाळेची ही भेट माझ्यासाठी सुखद, नवं बळ, शक्ती व जोम देणारी उत्साहवर्धक ठरली. वास्तुरचनेचा नवा परिचय घडवणारी ठरली. सौंदर्यशास्त्रात अधिकची भर घालणारी ठरली. स्वताला ओळखणारी, बालमनाशी संगती करणारी ठरली.
सोबत पुतण्या अदीब व
मुलगी सबीन होती. त्यांच्या अबोध प्रश्नांना उत्तरं देता देता मीही एकाच वेळी
जाणकार, तज्ज्ञ तर दुसऱ्याच वेळी कुतूहल क्षमवणारा लहान बालक झालो होतो. उत्तरे
देता-देता मीही भूतकाळात रमू लागलो, बागडू लागलो. त्या दोघांनाही भूतकाळ आवडतो. भूतकाळातील कथा,
किस्से, प्रसंग मन लावून ते ऐकतात.
बाहेर पडता-पडता संमती घेऊन सबीनने
एक प्रश्न टाकला..
“..अब्बू स्कूल के बारे में
इतना बड़ा बड़ा बोला करते हों, मगर यह तो बहुत छोटा है.. हमारे स्कूल से तो बहुत छोटा...!”
हे ऐकून लगेच अदीबही म्हणाला,
“अब्बू का मिल्लिया भी छोटा ही
दिखता...”
सबीनची पुण्यातली शाळा मोठी
व विस्तिर्ण आहे.. अदीबचं मुंबईतलं स्कूलही विस्तारित व उतुंग आहे. त्यांच्या
उत्तराला होकारार्थी प्रतिसाद देत त्यांना उद्देशून म्हणालो, “छोटा हुआ तो क्या हुआ, यह स्कूल
मेरा दोस्त हैं.. बहुत पुराना और जिगरी यार... मुझे तो आज भी याद करता हैं.”
मला माझी ही शाळा प्रशस्त व
विस्तिर्ण वाटते. शाळेतले अनेक बालमित्र आठवतात.. त्या सर्वांची नावं तोंडपाठ
आहेत.
सबीनला तिच्या दोन
वर्षांपूर्वीच्या वर्गमित्रांची नावं विचारली, दोन-तीनच्या पलीकडे तिला ती सांगता येत नव्हती...
प्रतिउत्तरादाखल सात-आठ नावं
पटापट सांगून म्हणालो.. “बोला था न यह स्कूल मेरा जिगरी दोस्त हैं...!”
कलीम अज़ीम, आंबाजोगाई
मेल: kalimazim2@gmail.com

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com