सायगांव : आंबाजोगाई तालुक्यातील ‘मिनी गल्फ’

आंबाजोगाई तालुक्यातील सायगांव मुस्लिम बहुल गाव आहे. १३३४.३१ हेक्टरवर पसरलेल्या गावची लोकसंख्या ५,००० हजार आहे. त्यात ७५ टक्के मुस्लिम समुदाय तर उर्वरित २५ टक्के बिगरमुस्लिम आहेत. मुस्लिमात शेख, सय्यद, पठाण आणि बाकी ओबीसी आहेत. तर बिगरमुस्लिमात मराठा, दलित, वाणी जातिसमुदाय आहे.

गावाच्या दक्षिणेकडे आंबाजोगाई ८ किलोमिटर अंतरावर तर पूर्वेकडे लातूर ३५ किलोमिटर अंतरावर आहे. गाव लातूर-औरंगाबाद रस्त्यावर वसलेलं आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला वस्ती आहे. पण मुख्य वस्ती दक्षिणेकडे आहे. राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजुला हॉटेल, खानावळ, विविध दुकाने आहेत. एक किलोमिटरपर्यंत हा रस्ता गजबजलेला असतो. गावापासून तीन किलोमिटर अंतरावर आंबाजोगाईचा प्रसिद्ध साखर कारखाना आहे.

गावात बहुसंख्य घरं सिमेंट क्रांक्रिटची व नव्या धाटणीची आहेत. कुठलाही तंटा-बखेडा, वाद-विदाद, जातीय तेढ गावात नाही. प्रत्येक वयोगटातील ग्रामस्थांना गावातील शांत वातावरणाचा अभिमान वाटतो. प्रत्येकजण तसं आवार्जून बोलून दाखवतो.

गाव हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे. गावाला ५०० वर्षाचा इतिहास आहे. परंतु २०० वर्षांचा इतिहास गावकऱ्यांना तोंडपाठ आहे. मुस्लिम समुदायाचं सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक वर्चस्व असलं तरी गाव एकात्मतेसाठी प्रसिद्ध आहे.

ग्रामस्थ व परिसरातील प्रतिष्ठित मंडळी सांगतात त्याप्रमाणे गेल्या १०० वर्षात या गावात हिंदू-मुस्लिम असा वाद कधीही निर्माण झाला नाही. विशेष म्हणजे तालुक्यातील अनेक गावात गेल्या १० वर्षांत किरकोळ जातीय तंटे व सांप्रदायिक वाद निर्माण झाले, पंरतु सायगांव मात्र त्यास अपवाद ठरलं. इथं कधीही तंटा-बखेडा निर्माण झाला नाही. या पाच दशकात सांप्रदायिकतेचं किरकोळ प्रकरणही नोंदवलं गेलेलं नाही.

गावचे सरपंच कैलास मस्के म्हणतात, “माझा जन्म याच गावचा. माझं वय ३५ आहे. मी मोठा होत गेलो, तेव्हापासून गावात तंटा पाहिला नाही. आजोबा, आई-वडिलाकडून आम्ही कधी गावात सामाजिक वाद किंवा जातीय तेढ निर्माण झाल्याचं ऐकलं नाही.”

‘महात्मा गांधी तंटामुक्त योजने’त गावाचा क्रमांक अग्रस्थानी होता. गावचं वैशिष्ट्य म्हणजे कायदा अस्तित्वात आल्यापासून अॅट्रासिटीची एकही केस नाही. बीड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी म्हणून निवृत्त झालेले व वयाची सत्तरी पार केलेले गौस हाशमी सांगतात, “याच गावात माझा जन्म झाला. माझे वडिल-आजोबाही सांगत की, गावात कधीही हिंदू-मुस्लिम वाद झाला नाही. मी पाहतो तेव्हापासून हिच स्थिती आहे. इथं बहुतांश लोक शेती करणारे आहेत. कृषी संस्कृतीचे ते वाहक आहेत. सामाजिक सलोखा व सद्भाव गावचं वैशिष्ट्य आहे. रोजंदारी मजुरी करून किंवा शेतीवर उदरनिर्वाह करतात. इथला समाजघटक परस्परावर अवंलबून आहे, त्यामुळे स्वाभाविक त्यांच्यात एकीचा भाव येतोच!”

गावातील दिनेश नेवल या २४ वर्षींय मराठा तरुणाला ज्यावेळी आम्ही गावाविषयी विचारलं, तेव्हा त्यानेही अगदी ठणकावून सांगितलं की, “…विषयच नाही! गावात भांडण किंवा सामाजिक वाद कधी झाला नाही. येणाऱ्या काळातही तसं काही घडण्याची शक्यता नाही. कारण सर्वांची आमचं चांगलं पटतं.. ”

गावात लहान-मोठ्या ७ मस्जिदी आहेत. तर एक देऊळ आहे. हे हनुमान मंदिरही खूप जुनं आहे. २०१० साली मुस्लिम समुदायांनी त्यांचा जिर्णोद्धार करून दिला. त्याचं नुतनीकरण केलं. मंदिर मुस्लिमांनी बांधून दिलेलं असल्याचं गावकरी अभिमानाने सांगतात. विशेष म्हणजे हे मंदिर गावातील सुप्रसिद्ध दरगाहच्या अगदी समोर आहे. गावातील अल्पसंख्य समुदायात मराठा व त्यानंतर दोन नंबरवर दलित आहेत. गावगाड्यात येणारे अनेक घटक मुस्लिमांशी संबंधित आहेत. बहुतांश मुस्लिम शेतकरी आहेत.

धम्मानंद मस्के एक तरुण ग्रामस्थ आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं, “गावात माझा मुस्लिम समुदायाशी नित्य संबंध येतो. रमजान व नमाज़ सोडली तर मी त्यांच्या अनेक सण-उत्सवात सामील झालो आहे. त्यांच्या घरी जाऊन बिनदिक्कत जेवलो आहे. त्यांची वागणूक आमच्याशी सलोख्याची आहे. त्यांच्याशी बोलताना आम्हाला कधीही परकेपणा जाणवत नाही.”

आंबाजोगाईचे जेष्ठ पत्रकार व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब म्हणतात, “कुठल्याही ग्रामीण भागात हिंदू-मुस्लिम द्वेष तीव्रतेने पसरतो. ते अधिकाधिक, विकराळ होत जातं. ज्या गावात मुस्लिम लोकसंख्या कमी आहे तिथं वाद, भांडणं, दंगली होतात. परंतु सायगावात ९० टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. त्यामुळे तिथं वाद किंवा तंट्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”

ग्राम पंचायत कार्यालयात क्लर्क पदावर काम करणारे ५८ वर्षीय सय्यद नजीर एजाज़ म्हणतात, “मागास वस्तीत मुस्लिम ग्रामस्थांनी दलित बांधवांसाठी समाज मंदिर बांधून दिलं आहे. दलित समुदायही मुस्लिमासोबत सहजीवनात आहे. खडकपुरा ही गावातील मिश्र वस्ती आहे. तिथं दोन्ही समुदाय एकत्र राहतात. दलितही मुस्लिमांच्या सर्व सण-उत्सवात सहभागी होतात. त्यांनाही कधी असुरक्षित वाटत नाही.”

आंबाजोगाई-लातूर हायवेवर वसलेल्या या गावाचं प्रमुख उत्पन्नाचं साधन शेती आहे. परंतु हल्ली शेतीला जोडउद्योग व इतर व्यवसायात ग्रामस्थ प्रामुख्याने दिसतात. परिसर पानथळ असल्याने ऊसशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. जवळच (३ किलोमिटर) असलेल्या आंबासाखर व पूर्वेकडे वीस मिनिटाच्या अंतरावर असलेल्या रेणा कारख्यान्याला गावचा ऊस जातो. दुसरं प्रमुख पीक सोयाबीनचं आहे. आंबाजोगाईच्या बाजारपेठेत सर्वाधिक सोयाबीन येणाऱ्या इतर गावात सायगाव आहे.


स्थलांतरितांचं गाव

निज़ाम संस्थानात गावातील अनेक मंडळी मोठमोठ्या हुद्द्यावर होती. नोकरीनिमित्त त्यातील अनेकजण त्यावेळी हैदराबादला स्थायिक झाली. फाळणीनंतर काही देशांतर करून कराची, लाहौरला स्थायिक झाली. पण ही संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे.

दुसरं सर्वांत मोठ स्थलांतर १९७०च्या दशकात झालं. स्वाभाविक त्याचं कारण त्यावेळचा दुष्काळ होता. दुष्काळाचा सर्वांत मोठा फटका गावाला बसला. प्रमुख उत्पन्नाचं साधन असलेली शेती संकटात आली. त्यामुळे अनेकांनी स्थलांतर केलं. पैकी काही हैदराबाद तर बहुतांश मुंबईत दाखल झाली. मुंबई महानगर असल्याने वेगवगळ्या सेवा पुरवठादार क्षेत्रात ती विखुरली.

१९९०साली भारताने ‘खाऊजा’ धोरण स्वीकारलं. जागतिकीकरणाचा थेट लाभार्थी म्हणूनही या गावाकडे पाहिलं जातं. ‘खाऊजा धोरणा’मुळे गावचा सर्वांगिण विकास घडला. गावात परकीय चलन आल्याने तालुक्याच्या उत्पन्नात भर झाली. शेती व स्थावर मालमत्तेचे भाव गगनाला भिडले. शेतीवर आधारित उत्पन्नाची साधनांचे विकेंद्रीकरण झालं व गावाची सेवा पुरवठादार म्हणून ओळख निर्माण झाली.

नोकरीनिमित्त २००८ साली मुंबईत स्थायिक असलेले ४२ वर्षीय नवाज़ खान या विषयी खूप रोचक माहिती देतात. म्हणतात, “दुष्काळानंतर सतत स्थलांतरं होत राहिली. पण हे स्थलांतरच गावच्या व ग्रामस्थांच्या विकासाला हातभार लावणारं एकमेव कारण ठरलं. गावकऱ्यांनी आपल्यासोबत अनेक नातलग व मित्रांना मुंबईत आणलं. हे स्थलांतर म्हणजे आखाती देशातील प्रवेशद्वार होतं.”

ऐकेकाळी सायगावची ओळख ‘मिनी गल्फ’ अशी होती. कारण गावातील बहुंताश मंडळी आखाती देशात स्थिरस्थावर होऊ लागली होती. मुंबईत आल्याने परदेशात जाऊन रोजगार करता येतो, हे त्यांना कळू लागलं. त्यातून १९७५-७८ नंतर दोन-तीन कुटुंब कुवैत, दुबई व सौदी अरेबियाला गेली. नवाज़ सांगतात, “त्यांनी तिथं लेबर व ड्रायव्हिंग काम स्वीकारलं. पुढं त्यांनी हळूहळू आपल्या नातेवाईकांना तिथं नेलं. त्यानंतर हळूहळू गावातील लोक परदेशात जाऊ लागली. १९८० पर्यंत २० लोक स्थायिक झाली होता.”

नवाज़ पुढे सांगतात, १९९१-९२ साली इराक-कुवैत युद्ध झालं. त्यामुळे गावातील कुवैतला गेलेले हाजी खान गावी परत आले. २०-२५ वर्ष आखाती देशात काढल्याने त्यांचे तिथं संपर्क तयार झाले होते. त्यांनी गावी येऊन इथल्या गरीब, अल्पभूधारक व गरजवंताना श्रमिक म्हणून आखाती देशातील व्हिसा मिळवून दिला. त्यांनी खूप कमी पैशात अनेकांना आखाती देशात पाठवलं. मग तिथून गावात आखाती देशात रोजगारासाठी जाणं वाढलं.”

हाजी खान आणि निसार अहमद खान या दोन लोकांनी प्रामुख्याने गावातील मंडळीला आखाती देशात पाठवलं. सायगांवचं परकीय देशांशी व्यावसायिक संबंध निर्माण करण्यात या दोन लोकांचा खूप वाटा आहे. एका अर्थाने या दोन लोकांनी गावातील लोकांचा आर्थिक विकास घडवून आणला. ही दोघेजण मुंबईत एजंट होते. गल्फ रिटर्न असल्याने त्यांनी सर्वसामान्य लोकांचं विश्वास संपादन केलं होतं.

या दोन लोकांच्या दूरदृष्टी धोरणाने गावातील अनेकांना रोजगार मिळवून दिला. इतकंच नाही तर त्यांनी कामवलेल्या परकीय चलनातून देशाच्या आर्थिक विकासात उल्लेखनीय योगदान लाभलं. आज १०० पेक्षा अधिक जण आखाती देशात आहेत.

वर्तमान स्थितीत या स्थलांतरितात उच्चशिक्षण घेऊन गेलेली मोठी पिढी आहे. त्यापैकी अनेक इंजिनियर, मेडिकल क्षेत्रात आहेत. टेलरिंग, ट्रान्सपोर्टेशन, कंस्ट्रक्शन इत्यादी व्यवसायासाठी जाणारे अजूनही आहेत. काही युरोपियन देशातही गेल्याचं सांगितलं जातं.

चाळीस वर्षीय जमशेद गल्फ स्थलांतराविषयी बोलतात, “गावातील लोक सौदी अरेबिया, कुवैत, हाँगकाँग, दुबई, बहरिन इत्यादी देशात आहेत. त्यांच्यामुळे गावात मोठं परकीय चलन येते. त्यातून त्यांच्या कुटुंबियांचा विकास तर झालाच. पण जिल्ह्यात गावाला ‘मिनी गल्फ’ म्हणून ओळख मिळाली.”

परकीय चलन येऊ लागल्याने स्वाभाविक ग्रामस्थांचा वैयक्तिक आर्थिक विकास झाला. प्रथम तर ग्रामस्थांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षण दिलं. त्यानंतर आपली घरे बांधली. शेती घेतली. शिवाय स्थावर मालमत्तेत गुंतवणूक केली. मागणी वाढल्याने स्वाभाविक जमीनीचे दरही वाढले. परिणामी गावच्या महसूलात मोठी वाढ झाली. नवाज़ यांच्या मते, परकीय चलन येऊ लागल्याने ३०-४० टक्के कुटुंबीय आर्थिक विकास साधू शकले.

अमर हबीब म्हणतात, “स्थलांतरातून व्यक्तिगत विकास घडतो, याचं उदाहरण म्हणजे सायगाव आहे. अनेकांनी आखाती देशात स्थलांतर केल्याने गावात परकीय चलन आलं व त्यातून गावातील लोकांचा विकास घडला. ऐकेकाळी गाव ट्रान्सपोर्टेशनसाठी प्रसिद्ध होतं. गावात प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक बसेस होत्या. या खासगी वाहतूक व्यवस्थेमुळे अनेकांना रोजगार लाभला व आंबाजोगाई तथा लातूरकरांची सोय झाली.”


१९९७ ते २०१० पर्यंत गावातील बहुतांश मंडळी ट्रान्सपोर्टेशनमध्ये होती. गावात अनेक लग्झरी बसेस होत्या. आजही बसेस आहेत, पण स्पर्धा वाढल्याने रोजगार जेमतेम राहिला आहे, असं नवाज सांगतात. आज गावातील अनेकजण जमीन खरेदी-विक्री व्यवहारात आहेत. मुख्यत: शेतजमीनीत ही गुंतवणूक केली जाते. या शिवाय हॉटेलिंग व ट्रान्सपोर्टेशन व्यवसायातही मोठी मंडळी सक्रिय आहे.

आंबाजोगाई-लातूर हायवेवर गाव असल्याने राज्य महामार्गावर ग्रामस्थांनी अनेक हॉटेल्स थाटली आहेत. गावची मुख्य बाजारपेठ आंबाजोगाई असली तरी मोठे-मोठे व्यवसाय गावात आहेत. हॉस्पिटल्सची संख्याही लक्षणीय आहे. विशेष म्हणजे हे सर्व क्लिनिक किंवा दवाखाने गावातील मंडळींची आहे. गावात सरकारी इस्पितळ नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी हेच दवाखाने घेतात.

गावात जिल्हा परिषदच्या दोन शाळा आहेत. नवाज़ खान यांच्या मते, “गावची पहिली शाळा फार जुनी आहे. तिच्या इमारतीवर १८८३ साल वर्ष कोरलेलं आहे. तिचं बांधकाम युरोपीयन शैलीची आहे.” तर गौस हाशमी सांगतात, “१९६८ साली उर्दू माध्यमाची माध्यमिक शाळा स्थापन झाली. नंतर त्यात मराठी मिडियमही आलं. मी त्याच शाळेचा विद्यार्थी आहे. तिथं मी नोकरीही केली आहे. तीन वर्ष मी त्याचा मुख्याध्यापक होतो.”

गावात जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत. त्या उर्दू-मराठी मिश्रित आहेत. पैकी एक मुलींची स्वतंत्र शाळा आहे. ही शाळा आठवी वर्गापर्यंत आहे. नववीसाठी पुढे त्यांना कॉमन शाळेत जावं लागतं. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी आंबाजोगाई किंवा लातूरला जातात. बहुतांश मुलं जवळ असल्याने आंबाजोगाईची निवड करतात. लातूरला राहून मेडिकल, इंजिनिअरिंगची तयारी करणारे विद्यार्थीही बरेच आहेत.

गौस हाशमी म्हणतात, “गावातील लोकांच्या हाती पैसा खेळू लागल्याने त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी शिक्षण देणं सुरू केलं आहे, गावात एक-दोन प्री प्रायमरी इंग्रजी मीडियमच्या शाळा आहेत. शिवाय दोन-तीन बसेस भरून आंबाजोगाईतील प्रतिष्ठित इंग्रजी शाळेत जातात. उच्चशिक्षण व व्यावसायिक शिक्षणातही गावचा टक्का वाढू लागला आहे.”

आज गावातील बहुतांश विद्यार्थी मेडिकल, इंजिनिअरिंग व आयटी क्षेत्राची निवड करत आहेत. शिक्षण घेऊन पुणे, मुंबई आणि हैदराबादला नोकरी करतात. गावाची साक्षरता दर तब्बल ७६ टक्के आहे. नव्या पिढीतील प्रत्येकजण शिक्षित आहेत. तरुण मुले सरासरी पदवीपर्यंत शिक्षण घेतात. गावातील बिगरमुस्लिमही शिक्षण घेतात. काही प्रमाणात त्यांनीही स्थलांतर केलेलं आहे.

गेल्या ५ दशकापासून गावातील बहुतांश मुस्लिम तरुण शिक्षण क्षेत्राकडे वळली आहेत. आजही गावात ५० पेक्षा अधिक शिक्षक नोकरीनिमित्त विविध ठिकाणी कार्यरत आहेत. पैकी मुंबईत अनेकजण आहेत.

७० वर्षीय गौस हाशमी निवृत्त शिक्षक आहेत. बीड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी म्हणून ते निवृत्त झालेले आहेत. आपल्या सेवाकाळात त्यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक मानाची पदं भूषवली आहेत. अनेक राज्यस्तरीय समितींवर कामं केलेली आहेत. हाशमीसारखे अनेक निवृत्त शिक्षक गावात व गावाबाहेर स्थायिक आहेत.

गौस हाशमीदेखील स्थलांतरामुळे गावचा विकास झाल्याचं कबुल करतात. त्यांचा एक मुलगा आखाती देशात कॉप्युटर इंजिनिअर आहे. लाखभर पगारातून अर्धी रक्कम तो गावी पाठवतो. म्हणतात, “गावातील लोक राज्यभरात स्थलांतरित झालेली आहेत. मुंबईत तब्बल २०० गावकरी आहेत. त्यांचं गावात नियमित येणं-जाणं असतं. त्यांची घरे इथंच आहेत.”

गावचं वैशिष्ट्य असं की, इथले बिगरमुस्लिमही अस्सखलित उर्दू बोलतात. जनाब नजीर एजाज यांनी आम्हाला सांगितलं की, “बिगर मुस्लिमांशी बोलल्यावर जाणवत नाहीत की त्यांची मातृभाषा मराठी असावी. त्यांचे शब्द, हेल, उच्चार शुद्ध उर्दू व दखनी आहेत. भाषेवरून हिंदू मुस्लिम भेद असा ओळखता येणार नाही.” धम्मानंद यांच्याशी बोलताना मी मुद्दामहून हिंदुस्तानी भाषेचा वापर केला. तेव्हा जाणवलच नाही की, ते बिगरमुस्लिम आहेत.

निज़ामीत इथंल शिक्षणाचं माध्यम उर्दूच होतं. विलीनीकरणाच्या अनेक वर्षांनी मराठी भाषिक शाळा सुरू झाला. होण्यापूर्वी सर्वजण उर्दूतून शिक्षण घेत होते. नंतर मराठीमुळे त्यांची सोय झाली.

गावातील दलित समुदाय हा शेतमजूर, कास्तकार व श्रमिक आहे. त्यांची गावात जवळपास २०० घरे आहेत. हात पडेल ती कामे हा समुदाय करतो. नोकरी व रोजगारांची विवंचना आहे. समाजातील बहुतांश तरुण आंबाजोगाईत जाऊन रोजंदारीचं काम करतात.

धम्मानंद मस्के याचं वय ३० आहे. त्यांच्या तीन-चार पिढ्या गावात गेल्या आहेत. दहावीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं आहे. गेली सात-आठ वर्षांपासून ते शेतमजूर आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की, “गावातील दलित समुदाय हा पूर्णत: मोलमजुरीची कामं करतो. बहुतेक शेतीत काम करतात. गावात शाळा असल्याने सर्वांचं दहावीपर्यंत कसंबसं शिक्षण होतं. पुढे शिक्षणासाठी आंबाजोगाईला जावं लागतं. आर्थिक तंगी असल्याने प्रत्येकांना ते शक्य होत नाही.”

राजकीय तीर्थक्षेत्र

गावात १९५८ साली ग्राम चावडी होती. नंतर १९६२ साली त्यांची ग्रामपंचायत झाली. १९६५ पर्यंयत सरपंचाची निवड बिनविरोध होते असे. १९६५ नंतर निवडणुका होऊ लागल्या. डिसेंबर २०१४ पहिलं आरक्षण ओबीसीसाठी पडलं. नंतर २०२२ साली अनुसूचित जातीसाठी सरपंचपद राखीव झालं. डिसेंबर २०२२ला निवडणुका होऊन कैसाल मस्के सरपंच झाले. तत्पूर्वी गावचा सरपंच मुस्लिम समुदायाचा होता.

रफीक कुरैशी उपसरपंच आहेत. ते ओबीसी जमातीचे आहेत. मुस्लिमबहुल असल्याने स्वाभाविक गावच्या राजकारणात गेल्या पाच दशकापासून मुस्लिम समुदायाचा प्रभाव जाणवतो. त्यामुळे स्वाभाविक आरक्षण पडल्याने काहीअंशी नाराजी होती. पण लवकरच सर्वांनी निर्णय स्वीकारला. मस्के यांचा जनसंपर्क चांगला आहे.

लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकीत गाव आपलं वेगळं वैशिष्ट्य नेहमी अधोरेखित करतो. राज्य विधीमंडळ तथा लोकसभेत जाण्यासाठी इच्छुक प्रत्येक उमेदवार प्रचार सभेसाठी गावात हमखास येतो. त्याचं कारण गावात मुस्लिम मतदारांचं मोठं संख्याबळ आहे. पण इतकच कारण पुरेसं नाही. गावात हजरत सादिक अली शाह यांची दरगाह आहे. त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी अनेक दिग्गज राजकीय नेते गावात हमखास येतात.

विलासराव देशमुख यांचा सायगावला नेहमी राबता होता. राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सायगांव वाऱ्या नेहमी चर्चेत असत. केवळ निवडणूक काळात नाही तर एरवीही त्यांचं जाणं-येणं असे. दरगाहचे वर्तमान मुरशद (सेवेकरी) अख्तर अली यांच्याशी त्यांची मैत्रीपूर्ण संबंध होते. विलासराव हयात असेपर्यंत सायगावला नियमित येत होते.

माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचंही नेहमी सायगावला जाणं-येणं होतं. हे गाव त्यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात येतो. इथल्या गावकऱ्यांनी आपली मतं अनेकदा मुंडेच्या पारड्यात टाकली आहेत. आता धनंजय मुंडे व पंकजा मुंडेही गावात येतात, असं ग्रामस्थ सांगतात.

जिल्हा परिषद असो व पंचायत समिती निवडणुकीत गावाला अनन्यसाधारण महत्व लाभतं. राजकीय नेते आपल्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी गावात येतात. सादिक अली शाह हुसैन यांच्या दरगाहची जियारत करून प्रचाराला सुरुवात करतात.

ग्राम दरगाह
हजरत सादिक अली शाह यांच्या स्मृतिस्थळाविषयी गावात वेगवगेळ्या अख्यायिका आहेत. एक कथा ईस्ट इंडिया कंपनीशी जोडली गेली आहे. १८५७ साली मेरठ, कानपूर व दिल्लीत स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध लढलं गेलं. स्थानिक नबाव, हिंदू राजे व दिल्लीतील बहादूरशाह जफर यांच्याकडे लढ्याचं नेतृत्व होतं. परंतु कंपनी सरकारने तो अल्पकाळात नृशंसरित्या मोडून काढला. त्यानंतर दिल्लीतील मुघल कुटुंबियावर जणू संक्रांत आली.

कंपनी सरकारने मुघल राजपरिवारातील पुरुषांना निवडून निवडून मारणं सुरू केलं. त्यामुळे शाही घराण्यातील अनेक कुटुंब जीव वाचवण्यासाठी वेगवगेळ्या ठिकाणी पळून गेली. काही देशोधडीला लागली.

महाराष्ट्रात मुंबई, औरंगाबादला आल्याचे ऐतिहासिक संदर्भ आढळतात. नवाज़ खान सांगतात, “आम्ही ऐकतो की १८५७च्या उठावानंतर मुघल कुटुंबातील एक तरुण भटकत भटकत आमच्या गावी आला. तो एकाकी होता. एकटा राहत होता, मिळेल ते खात व जगत.. दिलं तेवढं खात. मिळालं नाही तरी वनस्पती खाऊन जगत.. अधून-मधून अनेक वेळा अदृष्य होत. अन्न-पाण्यासाठी ग्रामस्थ शोधत तेव्हा त्याचा काहीच पत्ता लागत नसे. गावकऱ्यांना लवकरच कळलं की, हे व्यक्तिमत्व काही साधंसुधं नाही. हळूहळू त्यांची गूढता व रहस्यवाद ग्रामस्थांना कळू लागला. मग ते त्यांची अधिक काळजी घेऊ लागले. ते पुढे हजरत सादिक अली शहा म्हणून नावारुपास आले.”

हाशमी सांगतात, “सादिक अली संत प्रवृत्तीचे होते. अडीअडचणीला ग्रामस्थांना मार्गदर्शन करत. त्यातूनच त्यांची ओळख निर्माण होऊ लागली. ते निरग्रही होते. लोक त्यांना मान-सन्मान देऊ लागले.”

थोडक्यात असं कळतं की, सादिक अली शाह हुसैन हे सुफी प्रवृत्तीचे होते. जनकल्याणासाठी त्यांनी आपली हयात खर्ची घातली. येत्या जानेवारी महिन्यात सादिक अली शाह बाबांचा ११५वा उरूस आहे. त्याचा अनुमान लावला तर १९०८ साली त्याचं निर्वाण झालं असावं, अशी शक्यता नवाज खान वर्तवतात.

जमशेद अली म्हणतात, “सादिक अली शाह हुसैन यांच्याकडे धारुरच्या आसपासचे एक मारवाडी ग्रहस्थ नियमित येत. त्यांना मूल नव्हतं. कालांतराने त्यांना मूल झालं. ते मूल बाबांचा सेवेकरी म्हणून त्या मारवाड्याने सोडलं. सादिक अली शाह यांच्या निर्वाणानंतर ते मूल त्यांच्या स्मृतिस्थळाशेजारी राहू लागलं. पुढे ते पन्नाशाह बाबा (मुरशद) म्हणून नावारूपास आले.”

ग्रामस्थ सांगतात, पन्ना अली शाह मुरशदपासून सेवेकरींची परपंरा सुरू झाली. पुढे अता अली शाह मुरशद झाले व त्यांनतर पुन्हा नारायण कुलकर्णी व नंतर नूर अली शाह मुरशद झाले. त्यांच्या काळातच वर्तमान मुरशद अख्तर अली शाह आले. त्यावेळी त्यांचं वय जवळपास १५ वर्ष असावं. १९८४ पासून ते गद्दानशीन आहेत. आज त्याचं वय ६५ आहे.

अख्तर अली दरगाह परिसराच्या बाहेर पडत नाहीत. आतच त्यांचं निवास आहे. ग्रामस्थ त्यांना आत जाऊन भेटतात. राजकीय मंडळी त्यांच्या सल्ला मागायला येते. ‘सब का भला होगा’, म्हणत मुरशद सर्वांना आशीर्वाद देतात.

हजरत सादिक अली शाह यांची पुण्यतिथी दरवर्षी साजरी केली जाते. त्यादिवशी गावात उरूस भरतो. हा ऊरुस म्हणजे गावची जत्रा होय!

दिनेश नेवल हा २४ वर्षीय मराठा तरुण आहे. त्याने आम्हाला गावजत्रेची म्हणजे माहिती दिली. तो म्हणतो, “त्या काळात मुंबईत, पुणे व इतर ठिकाणाहून गावकरी गावात परत येतात. हा गावा मोठा उत्सव असतो. मोठी खरेदी-विक्री गावात होते. अनेक दिग्गज मंडळीही गावात येतात. आठ दिवस गावचं वातावरण भारवून टाकणारं असतं.”

जमशेद अली सांगतात, “गावात त्यावेळी लाखभर लोक असतात. त्यात स्थलांतरित वगळता, मोठी संख्या मुंबईकर लोकांची असते. इतर ठिकाणाहूनही अनेकजण येतात. तब्बल आठ दिवस हा उत्सव चालतो. उरुसासाठी खास राजस्थानहून उंट मागवले जातात. त्यावर संदल मिरवणूक काढली जाते. चार दिवस वेगवेगळे विधी चालतात. नंतर चार दिवस कव्वाली होते. प्रतिष्ठित कव्वाल गायक बोलावले जातात.”

नवाज खान यांच्या मते, “ऐकेकाळी सायगावच्या उरुसातील कव्वाली संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध होती. प्रसिद्ध व महागडे गायक बोलावून त्यांना मान-पान दिला जातो. लोक खूप आवडीने त्यांचं सादरीकरण ऐकतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून खास कव्वाली ऐकण्यासाठी लोक येतात. बाहेरूनही खास कव्वाली ऐकण्यासाठी लोक येऊन इथं राहतात.”

सादिक अली शाह हुसैन याचं स्मृतिस्थळ गावात एकोपा व सलोखा वृद्धिगत होण्यास महत्वाचा दुवा आहे. तेही एक कारण आहे की, गावात शांतता, सद्भावना टिकून आहे. गावातील बिगरमुस्लिम समुदाय दरगाहला नियमित जातो. उपास, नवस, कंदुरी करतो. गावजत्रेत उत्साहाने सामील होतो.

कलीम अजीम, पुणे 

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,25,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,302,व्यक्ती,23,संकलन,65,समाज,265,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,54,
ltr
item
नजरिया: सायगांव : आंबाजोगाई तालुक्यातील ‘मिनी गल्फ’
सायगांव : आंबाजोगाई तालुक्यातील ‘मिनी गल्फ’
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjrjPOjaFNHHV4Mk9c-BsaaN0mgTJOCYmgFJzjX-IxhqHX6cz0_FVkAjAKaPgjDJVun821JI1wD0I6t7AAnHktQCQkxcKBt6uZz36ZcA2-A7oVXlo7hboQVZzhW26_PQwcA_e1ekbeP2mxlBufREaYmDnP0EeYpy8FTgwvb7qy07__sWXQB2sN2nozFm4Dw/w640-h380/Saigovn%20Grampanchayat.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjrjPOjaFNHHV4Mk9c-BsaaN0mgTJOCYmgFJzjX-IxhqHX6cz0_FVkAjAKaPgjDJVun821JI1wD0I6t7AAnHktQCQkxcKBt6uZz36ZcA2-A7oVXlo7hboQVZzhW26_PQwcA_e1ekbeP2mxlBufREaYmDnP0EeYpy8FTgwvb7qy07__sWXQB2sN2nozFm4Dw/s72-w640-c-h380/Saigovn%20Grampanchayat.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2024/01/blog-post_2.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2024/01/blog-post_2.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content