जगण्याच्या धडपडीत हिरावलेली अनाम उत्कटता

शाळेत असताना लोकमतची मैत्र पुरवणी वाचायची सवय लागली. दहावीत गेल्यावर जणू तिचं व्यसनच जडलं. पण उघडपणे वाचायची कुठं सोय होती? जणू ती काली गंगा किंवा पोलीस टाइम्स आहे, असं त्याचं व्हायचं. घरात वृत्तपत्र आलं की, पटकन मैत्र काढून कुठेतरी दडवून (त्यातील कथित उत्तान फोटो व त्याचा विषय घरातील मोठ्यांच्या लक्षात येऊ नये व त्यांनी ती फाडून टाकू नये म्हणून) ठेवायचं.. मग रात्री उशीरा किंवा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मोठ्यांचं लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी बसून ते वाचणं होई.. त्यातील लेखन, टिपण वाचून आपण आकाशात भरारी घेतो आहोत, असं उगाच वाटायचं.. वाचता-वाचता उगीच उठ-बैस कर, वातावरणातील हवा शोषून घे, उर्जा भरून घे... काहीतरी पॉझिटिव्ह वाइब्ज मिळवल्याचा भास होई.

पुढारीची ‘बहार’, गावकरीची ‘सदाफुली’ किंवा लोकमतची ‘चित्रगंधा’ वाचताना पेज थ्री कल्चरचा भाग व्हावा, असंही वाटून जाई... (त्यासाठी मी फॅशन इन्स्टिट्यूटच्या CETची दिल्या होत्या. त्यात अपयश आलं मग पटकथा लेखक व्हावं असंही वाटून गेलं. मग घरी न कळवता पुण्यात येऊन FTIIची प्रवेश परीक्षाही दिली होती.) सेलिब्रिटीच्या गॉसिप्स वाचून किळस येई, पण उर्वरित भागात गॉसीपशिवाय कुठलाच आशय नसे, त्यामुळे तेही वाचणं भाग होई.. या सर्वच आशय, टिपणातून प्रेम, जिवलग, साथी, पार्टनर, मैत्रिण, सखी असावी अशा कल्पना भरारी घेत... त्यातून अनामिक उर्जा मनात साठवली जाई.

आंबाजोगाई सारख्या लहानशा शहरात कुठे एखादा मुलगा-मुलगी एकत्रित वावरताना, फिरताना दिसली की उगाच अनेकांची डोळे वटारली जात. खुलेपणाची सवय नसल्याने नकळत कधी ती वृत्ती आपल्याही स्वभावाचा भाग होऊन जाई. आमची आंबानगरी तसं शिक्षणाचं केंद्र.... लातूर (पॅटर्न) खूप नंतर डेव्हलप झालं. शहरात मेडिकल, इंजिअरिंग, फार्मसी तथा तत्सम व्यावसायिक प्रतिष्ठित कॉलेजे आहेत. त्यात शहरातील बड्या घरची मुलं-मुली शिकायला असतात. घरापासून दूर असल्याने त्यांच्यामध्ये स्वाभाविक जरासा मुक्तपणा असतो... टाइट जिन्स घातलेल्या, रस्त्यात हिंडणाऱ्या, सिगारेटी फुंकणाऱ्या मुली पाहून जळफळाट होई.... त्यांचं हसणं-खिदळणारं दृश्य पाहून आम्हा नागरी मुलांना त्यांचा उगाच हेवा वाटे... आपणास असा मुक्तपणा कधी मिळेल का, असंही वाटून जायचं. हे पाहून आमच्या काही मित्रात सूडबुद्धी निर्माण व्हायची, मग त्याचा बदला ते थियटरच्या गर्दीत तर कधी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत रेटारेटी करून विकृतपणे उपभोगत...

मुद्दा असा की, मैत्रिण म्हणून असेल किंवा सखी तथा तत्सम मुलींचा सहवास लाभणं फार दुरापास्त होतं. अशावेळी वृत्तपत्रीय पुरवण्या ‘दिल के दर्द पर मरहम’चं काम करायची... वाचायची सवय असल्याने उद्दीपित व उत्तेजित विचार-कल्पनांचा निचरा व्हायचा.. ज्यांचं वाचन नाही, त्यांच्या घालमेलीची कल्पना होत नाही.

घर तर सोडाच वाचनालयातही मैत्र किंवा इतर तत्सम उत्तान चित्र असलेली पुरवणी हाती दिसली की, शेजारच्या लोकांची डोळे वटारली जात... तिथं एखादी पुरवणी बळकावण्यासाठी तासंतास उगाच निरर्थक काळपट जिल्हा दैनिकं चाळावी लागत.. त्यातही एखादी पुरवणी हाती लागली की, दुसरा तो मिळवण्यासाठी सलगी करूनच असे... आमच्या शाळेसमोरील सागर टॉकिजवर लागलेलं टायटॅनिकचं पोस्टर आमच्या वर्गमित्रापैकी कुणीही एका नजरेत पाहिलेलं आठवत नाही. मीही ते अगदी चोरूनच पाहिलं होतं.. त्यातही इंग्रजी सिनेमे बरे नसतात, असा समज असल्याने त्याविषयी कधीही ब्र उच्चारला जात नसे.

जसं वय कळू लागलं तसंच रस्त्यावरील किंवा शाळेतील मुलींकडे कधीही थेटपणे पाहणं होऊ शकलं नाही. नेहमी चोरुनच हा कार्यक्रम उरकला जाई... त्याविषयी बोलणं तर दुरापास्तच.. अशा या वातावरणात आम्ही (पिवळं साहित्य नव्हे) मैत्र किंवा चिंत्रगंधा वाचून समजूतदार गेलो. त्यातील प्रेमाचे धुमारे झेलत, उत्कटता कुरवाळत, आपल्या स्वप्नकल्पनांना रंगवत गेलो.. पण, सारंकाही रहस्य व गुपित असल्याने अज्ञान व अपसमज घेऊनच पौगंड होत गेलो. त्यामुळे पुढेही आयुष्यात नुसताच रितेपणा राहून गेला..

बारावीनंतर पदवीसाठी २००९ साली औरंगाबाद विद्यापीठात आल्यावर मनात उत्साह होता की, कॉलेज जगणं होईल... दंगा-मस्ती होईल.. दोस्ती, प्यार, अफेअर, हुदडंग होईल.. लेक्चरमध्ये दंगा होईल. वर्गात मुलींचा सहवास लाभेल.. पण दुर्दैव सारं कल्पनारंजन अडगळीतच राहिलं... कारण आम्ही कॉलेज नव्हे तर विद्यापीठात होतो... जिथं सहकारी विद्यार्थ्यांना सर व मुलींना मॅडम म्हणायची पद्धत रुढ होती... एका गंभीर वातावरणात आलो होतो..

आमच्या तीस-पस्तीस विद्यार्थ्यांच्या तरण्या मुलात एकच कन्या होती.. तीही जमान्याच्या कथित सो कॉल्ड सौंदर्यशास्त्र न मोडणारी... त्यातही तिची नेहमीची गैरहजेरी.. पण विभागात इतर सिनियर व जुनिअर मुलींचा सहवास लाभला... ‘मैत्र’ या नात्याचं विरुद्ध लिंगी आत्मीय नातं मात्र लोकलज्जेपोटी तयार होऊ शकलं नाही... कारण बामूतील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भेटणाऱ्या साऱ्या सखीदेखील बुजऱ्या व लोकलज्जेत गुरफटलेल्या असत. काहींना उगाच हवेत राहण्याची सवय... त्यामुळे त्यांच्याशी गवसणी घालणं कधी जमलंच नाही... कारण आम्ही जन्म घेतला ती मातीही दुष्काळी मराठवाड्याचीच होती... त्यामुळे हवाहवासा वाटणारा सहवास लाभू शकला नाही.

कधी सोनेरी महाल किंवा हिस्टरी गार्डनला उमललेलं जोडपं दिसायचं.. त्यावेळी मनात शांतता एकवटून येई.. का माहीत नाही, पण उगाच समाधानाचा आव दाटून येई... मैं नही तो और सहीं.. असावं कदाचित... त्यातच आपली खुशी किंवा लोमडी के अंगूर खट्टे असंही असावं.. एनएनएसमध्ये मात्र हक्काचा मुक्तपणा होता. दिल से दोस्ती व्हायची. जवळचा सहवास लाभल्याने इमोशनल गुंतवणूक होई. पण तोही जास्त काळ टिकाव धरत नसे... निवासी कॅम्प संपला की, हुंदके व रडारडीच्या पातळीवर तो संपून जाई.. असंच पदवीचे तीन वर्षे सरले.

पदव्युत्तरसाठी पुण्यात आलो. इथं मात्र मुक्त वातावरणात असंख्य मित्र व मैत्रिणी लाभल्या.. आयुष्यात मुलींचा सहवास का महत्वाचा असतो, ते त्यांच्याशी बोलल्यावर जाणवत राहिलं.. नारी म्हणून नव्हे तर स्त्री म्हणून समजून घेणं, त्यांच्या सवयी, भावना, वर्तनाचं निरिक्षण गरजेचं होऊन गेलं... आयुष्यात प्रथमच मुलींशी बोलत होतो. त्यांना समजून घेत होतो. त्यातून संकोचाची अस्पष्ट रेषा गळून पडली. भोगवती म्हणून नव्हे तर माणूस म्हणून तिला समजून घेता आलं. जीव ओवाळणाऱ्या मैत्रिणीही लाभल्या. त्यातून ‘कथित अडचणी’च्या पलीकडे जाऊन आदर, सन्मानाचं एक नातं तयार झालं. निखळ मैत्री, सहवास, ग्रुप संवाद, पर्सनल चॅट होत राहिला.

पुण्यात अनेक नाइटआऊट झाले. त्यातून मैत्रीचं नातं फुलत, विकसित होत गेलं. काहींशी प्रेम व मैत्रीच्या पलीकडे अनाम नातं तयार झालं. ज्यामुळे नकळतपणे इतरांना अक्षम्यपणे दुखावणं झालं. तुझे याद ना मेरी आई.. असंही काहीवेळा घडलं. दिल अपना प्रीत पराईही कधी झालं... पण वक्त के हाथो आम्ही कठपुतली ठरतो. लग्नानंतर प्रकर्षाने वाटत राहिलं, आता वेळ टळून गेली. कस्मेवादे, प्यार, वफा सब किस्मत की बाते...

आजही मैत्रिण म्हणून अनेक मुलींचा सहवास लाभतो. वैचारिक मेळाव्यात अनेक सखी भेटतात. त्यापैकी काही घरी येतात, आम्हीही सहकुटुंब त्यांच्या घरी जातो. मिखळ मैत्री या नात्याने त्यांचा सहवास व सहअस्तित्व नेहमी मोलाचा ठरतो.

आता नेहमीप्रमाणे व्हॅलेटाइन येतो आणि जातो.. लग्नापूर्वी त्याचं आकर्षण असे. का माहीत नाही, पण त्याविषयी किमान बोलणं होई.. कुणाविषयी तरी अमानिक ओढ वाटे.. पण नंतर वैचारिक घुसमटीने भांडवली जगाचा टीकाकार केलं तसं त्या आनंदातही त्रुटी दिसू लागल्या. सांप्रदायिक वातावरणात माणूसपणा शोधण्याच्या तगमगीने जगण्याचा आनंद हिरावून घेतला.. शिवाय प्रेम या संकल्पनेला भांडवली स्वरूप आलं. बाजार उभं राहिल्याने त्यातील आनंद, उत्कटता व आसक्ती निघून गेली.. अशा कमोडिटी बाजारात माणूसपणाचं नातं, मैत्री टिकून ठेवण्यासाठी माझीच काय तर अवघ्या विश्वाची धडपड सुरू आहे.

प्रेम व स्नेह या दोन घटकांच्या वावरात निखालसपणा हिरावतो की काय अशी भिती सतावू लागते. भूतकाळ आठवताना असंख्य स्मृती डोळ्यासमोर येतात.. जो हमने दासतां अपनी सुनाई आप क्यूं रोये... कुणाचं ऐकून असं होतं.. मग हळूच डोळे पाणावतात.... कारण आपली कहाणीही सांगायची राहून गेलेली असते. सकाळचा दिवस संध्याकाळी भूतकाळ होतो तशी, आयुष्याची तीन दशके भूतकाळ झाली.

आज तो स्मरताना उर्जा येते, हुरुप एकवटावा लागतो.. पण जगण्याची धडपड पिच्छा सोडत नाही.. त्यातही प्रेम, स्नेह व आनंद टिकवून ठेवणं आव्हानात्मक ठरू लागलं आहे....

मैत्री दिनाच्या, प्रेम दिनाच्या सदिच्छा...
कलीम अज़ीम, पुणे

मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: जगण्याच्या धडपडीत हिरावलेली अनाम उत्कटता
जगण्याच्या धडपडीत हिरावलेली अनाम उत्कटता
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgZYrNqpVFFh63J-Epfs9ON1shVSXW3gM0_1LY9DhpdXyEBUJjsKfJywe66EcZUqwmwbZ7bHc2vdCPqpqSnXzPDskEkVYusHLraLRGtat7uqdeuBZdUtoB6ljH1Lxxg4N7fzS0HRFZU_tnDK7NqDoQvFBef4u1D1N8DLlw8Gptyk7BEGJzvfDiHyY5j_AYp/w640-h360/Goa%20Beach%20Kalim.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgZYrNqpVFFh63J-Epfs9ON1shVSXW3gM0_1LY9DhpdXyEBUJjsKfJywe66EcZUqwmwbZ7bHc2vdCPqpqSnXzPDskEkVYusHLraLRGtat7uqdeuBZdUtoB6ljH1Lxxg4N7fzS0HRFZU_tnDK7NqDoQvFBef4u1D1N8DLlw8Gptyk7BEGJzvfDiHyY5j_AYp/s72-w640-c-h360/Goa%20Beach%20Kalim.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2024/02/blog-post_14.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2024/02/blog-post_14.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content