आंबाजोगाई : स्मृती भूतकाळी नव्हे वर्तमानी!

पुण्यात राहून अंबाजोगाईविषयी विचार करताना आणि त्यातही बालपणीचं गाव उभं करताना असंख्य स्मृतीचे पुस्तकी गठ्ठे डोळ्यासमोर येऊन आदळत आहेत. मी जरासा अती नॉस्टेलजिक असल्याने जुन्या घटना, प्रसंग, गोष्टी, गाव. शहर, त्यातील लोक, माझा विरंगुळा रमणाऱ्या बाबी आदींची गर्दी मेमरीत होत आहे.

शहर, बस स्टँड, गाव, गल्ली, मोहल्ला, घर, अंगण, माळवद, गच्ची, मुंडार, शाळा, घंटा, राष्ट्रगीत, प्रार्थना, वह्या, पुस्तके, निकमबाई, शुद्धलेखन, लाल पेन, दप्तर, मधली सुट्टी, हेडमास्तर, जयंती, स्नेहसंमेलन, रविवारची सुट्टी, झाडावरच्या चिंचा, खड्ड्यातीलं डुबक्या, पतंगबाजी, विट्टी-दांडू, ताई महोत्सव, कवि संमेलने, व्याख्याने, साहित्य मेळावे, पुस्तक प्रदर्शन, जाहिर सभा, भाषणे, अब्बूचं टेलरिंगचं दुकान, पुसकर काका, पंतगबाजी अबबब्... काय काय आठवू असं झालं आहे.

बालपणीचं अंबाजोगाई शहर सुटसुटीत व विखुरलेलं होतं. नागरिकरणाचा भौगालिक विस्तार सोडला तर आजही फारसा बदल जाणवत नाही. गल्ली, मोहल्ले, रस्ते, जुन्या इमारती, वाडे जुन्या खुणा शहराचा सांस्कृतिक वारसा जतन करून आहेत. शहरातील दोन्ही वेस, बुरुज अगदी दिमाखाने आजही तसेच उभे आहेत. खोलेश्वर, मुकंदराज, थोरले देवघर, काशी विश्वनाथ, किरमानी दरगाह, निजामकालीन इमारती इत्यादी जुन्या वास्तूंचं वैभव काळ आणि शहरवासीयांनी टिकवून ठेवलं आहे.

काही किरकोळ बदल मात्र जाणवतात. साहित्य निकेतनची अंतर्गत रचना जराशी बदलली आहे, पण बाकी अगदी १९९०-१९९५ सारखंच जाणवतं. रविवार पेठेतली पौलीस चौकी व आमची झेडपीची प्राथमिक शाळा तशीच आहे. मिल्लिया व कन्या शाळेचं स्वरूपही तसंच मोडकडीस आलेलं व जुनाट दिसते. मंडी बाजारातलं ग्रामीण रुग्णालय बांधकाम झाल्याने जरासं बदललं आहे. पण आजही माझ्या स्मरणी जुना बैठा आराखडाच आहे. वरच्या दवाखान्याची ओपीडी आजही लहानपणी हुंदडणाऱ्या माझ्या आवाजाने गजबजलेली दिसते. छताकडे नजर टाकली की, तेच जुनाट भिरभिरणारे पंखे बालपणीच्या बारीक नजरेच्या खानाखुना शोधू लागतात. सर्वंट क्वार्टर आजही नव्वदीतलंच आहे.

दवाखान्याच्या प्रवेशद्वाराची जुनी एकेरी कमान जाऊन आता दुहेरी, उंच आणि देखणी झाली. बाजारहाट मात्र थोडासा बदलेला दिसतो. मुंडेपीरची मस्जिद विकसित झाली आहे. सदर बाजारच्या चौकात वर्दळ वाढली आहे. मोंढा बाजारात मात्र इमारतीची संख्या वाढली आहे. न्यायमंदिर त्याच जागेवर आणि तसंच उभं आहे. ग्रामीण कोर्टाचं रुपडे मात्र पालटलं आहे. पोस्टाचा कायापालट झाला तर बीएसएनएलची इमारत ओस पडू लागली आहे. शिवाजी चौकातली जोगाईकडे जाणारी कमानही अनेक दिवस एकेरीच होती, आता दुहेरी झालीय. मास्टर प्लॅनने गुरुवार पेठेची रुपरेषाच बदलून टाकली. पण मला अजूनही त्यापूर्वीचं जुमेरात बाजार आठवतं. चौकातलं झेडपी शाळेची जुनी इमारत तशीच उभी आहे. तिथं चिंच, जांभूळ आणि बकुळीची झाडं अजूनही दिमाखाने डोलतात. चौकातलं सरदार हॉटेल आणि शिवाजीचा पुतळा आठवतोय.

पंचायत समितीची इमारत मात्र अगदी तशीच जुनाट आहे. आम्हाला वरच्या दवाखान्यात घेऊन जायला रविवार पेठेत येणारी सिटी बस मात्र बंद झाली. आजमभाईंचं पान शॉप आजही यादगार आहे. रात्री बारापर्यंतची गर्दी अजूनही तशीच सदाबहार आहे. याच आजमभाईंचा स्पेशल पान सतत तोंडात ठेवून उपचार करणारे गुप्ता डॉक्टर कोरोनात सोडून गेले. दबडगावकर गेल्यानंतर तेच आमचे फॅमिली डॉक्टर होते. अधून-मधून एमएम खानसाहेबची उपचार करीत. अजूनही ते सेवारत आहेत. मंडी बाजारातील जोगाईकडे जाणारी काही छोटी दुकाने तशीच आहेत. बाकीत भांडवलदारांनी चकचकीत मार्केट सजवलं आहे. संध्यासमयी देवीकडे जाणारी गर्दी मात्र आजही नव्वदीसारखी टवटवीत जाणवते. मिना बाजार व बॉम्बे जनरलने जुने रूप बदललं असलं तरी त्यांचं महात्म्य अंबानगरीने जपून ठेवलं आहे.

बस स्टँडवरील अहमदाबादकटिंगवाला, त्याच्या बोर्डावरील मिथूनचा फोटो, भारत वॉचचे अब्बूचे मित्र फखरुद्दीन यांचा हसरा चेहरा आठवतो. आज भारत वॉच त्यांचा मुलगा अजीम चालवतो. बागवान बंधूचे जुने फ्रूटचे स्टॉल आजही आहेत. बाबूभाईचा चहा, जाजूची पेपर एजन्सी इत्यादी बरंच काही आठवतं.

आमच्या पिढीने सागर टॉकीज बघितली होती. त्यात महिनाभर चाललेला माहेरची साडीआठवतो. त्याच पिढीने मोहन टॉकीजचे पालटलेलं स्वरुपही अनुभवलं. भिंतीवर लागणारी सिनेमाची पोस्टर आठवतात. बस स्टँडच्या नवनाथ रसवंतीच्या मागे एक आणि मंडी बाजारात राशदभाईंच्या भाजीच्या दुकानासमोरील भिंतीवर एक अशी दोन भली मोठी पोस्टर आठवतात.. हम आपके हैं कौन, राजा हिंदुस्तानी, जुरासिक पार्क, जीतइत्यादी धुसर पोस्टर नजरेसमोर येतात.

आता सगळीच वीडियो पार्लर आता बंद झाली. सुवर्णा, नटराज, अमित, गणेश, युनिव्हर्सल, भारत इतिहासजमा झालीत. कोंदट हवेत व घामाच्या दर्प दुर्गंधीत पहिलेले अमितचे मिथूनपट व युनिव्हर्सलचे हॉलीवूडपट स्मरतात. घमाघूम होत माँ कसम’, ‘दिलवाले’, ‘राजा हिंदुस्तानी’, आणि ममी, टायटॅनिकपाहताना आलेला फिल आजही मनात घर करून आहे. नटराजची चोरटी घुसखोरीआमच्या पिढीला माहीत असेल. आमच्या बालपणी मोहनजेमतेम तर वीडियो पार्लर तुफान गर्दीत चालत होती. त्यावेळी (आणि आजही) अंबानगरीत मनोरंजनाची साधने फारशी नव्हती. गल्लीतली मित्रंमंडळी परळीला नाथला, तर लातूरला रिगलला दर आठवड्याला जाऊन सिनेमा पाहत होती. गावातही असे अनेकजण होते.

तहसीलची निजामकालीन इमारत जमीनदोस्त करून तिथं पार्किग झाली आहे. त्या जुनाट इमारतीत शेकडो वर्षांची कागदपत्रे सुरक्षित होती. मात्र नव्या इमारतीने कारभार सुरू केला तशी बरीच कागदपत्रे आगीत भस्म झाली. आतली बाबुगिरीची चलती पहिल्यापेक्षा आता जरा जास्तच वाढली आहे. जुन्या कागदावर मोमीनाबादच्या नोंदी अजूनही आढळतात.

पब्लिक क्लबग्राऊंडमध्ये झालेल्या गोपीनाथ मुंडेंच्या सभा अजूनही नजरेसमोर येतात. इथंच एकदा ते म्हणाले होते, मला खासदार करा, जिल्ह्याला आयटी-बीटी सिटी करतो, रेल्वे आणतो.. पण... विलासरावच्या जन्मदिनी इथं झालेली इंदोरीकरांची कीर्तनं कानाला साद घालतात. समोरच्या वंजारी वसतिगृहाच्या ग्राउंडवर उड्डयनमंत्री शाहनवाज हुसैन उमा भारतीची तिरंगा यात्रा घेऊन आले होते. वाजपेयींनी एका मुसलमानांला मंत्री केल्याचं ते म्हणाले होते. मुंडन केलेल्या उमाभारती म्हणाल्या, जगभरात हिंदूंचा डंका वाजतोय!

योगेश्वरी कॉलेज ग्राउंडवर आडवाणी आले होते. उत्तरेत कुठेतरी सभेत त्यांच्यावर कोणीतरी चप्पल फेकली होती. त्यामुळे कॉलेजच्या ग्राउंडला ५० फुट व्यासाचं भलं मोठं बांबूचं कडं आणि अडथडे उभी केली होती. भाषणातील आडवाणीचे शब्द आठवत नाही, मात्र धुळीतील गर्दीचा माहौल मात्र आजही स्मरतो.  पब्लिक क्लबमध्ये विलासरावांची भाषणे, काँग्रेसच्या प्रचार सभा, सातपुतेंची आमदारकीची निवडणूक, विमलताईंच्या कोपरा सभा, नगर परिषदेची रणधुमाळी बरंच काही आठवतं.

ओळखीचे काही चेहरे मात्र पिकलेले व थकलेले जाणवतात. काही जुनी खोड स्मृतिपटलावरून हळूहळू अदृष्य होऊ लागली आहेत. इथले नागरिक, प्रसिद्ध लोक, मान्यवर, लेखक, अभ्यासक, पत्रकार आठवतात. देवीच्या दागिण्याची चोरी, त्यासाठी गोपीनाथ मुंडेंनी केलेलं भिक मांगो आंदोलन आजही आठवते. जिल्हा निर्मितीसाठी झालेले मोठे आंदोलन, राजकीय नेत्यांची आश्वासने, शासकीय हॉस्पिटसचा भ्रष्टाचार बरेच काही नजरेसमोर येतात.

बालपणीच्या अनेक घटना आठवतात व त्यातून झालेलं प्रबोधन, शिकलेला धडा, आलेले अनुभव; त्याचा व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर पडलेला प्रभाव व त्यातून समृद्ध झालेले आयुष्य असं बरंच काही इतिहासात घेऊन जातो.

वास्तविक, आमच्या एकुण भावंडापैकी मिच खरा अंबाजोगाईकर! कारण माझा जन्म वरच्या दवाखान्यात झाला. बाकी सर्वांचा चौघांचा जन्म अजोळी झाला. माझ्या जन्माची नोंद नगरपरिषद व इतर ठिकाणी आढळते. मेंदूवर जोर दिला तर बालपणीच्या अनेक घटना, प्रसंग आठवतात. पण ज्यातून शिकता आलं नाही, जीवन समृद्ध होऊ शकलं नाही, विचारांची प्रगल्भता, सामाजिक प्रबोधन होऊ शकलं नाही किंवा तसा मानस घडू शकला नाही, त्या सर्व माझ्या लेखी निर्रथक ठरतात. पण निवडक घटनांना उपरोक्त चौकटीत बसविता येऊ शकते. त्यातील काही त्रोटक घटना, प्रसंग व त्याला जोडून असलेल्या स्मृतिसंवेदनांची मांडणी करण्याचा हा प्रयत्न आहे.

१९९६चा विल्स वर्ल्ड कपमला आठवतो. त्यावेळी टेलिव्हीजन संच फार कमी कुटुंबात होते. त्यातही क्रिकेट मॅच दूरदर्शनवर दाखवला जात नव्हता. अर्थातच क्रिकेट मॅच बघण्याचा नाही तर ऐकण्याचा कार्यक्रम होता. माझ्या सातवी बोर्डाच्या परीक्षांचा तो काळ! बड्या मंडळीमध्ये क्रिकेटविषयी गप्पा चालायच्या. त्यामुळे आम्हा लहानग्यचांनाही त्यांचा कुतुहल होतं. कपिल, अजहर, कुंबळे, सदगोपन रमेश इत्यादी खेळाडूची नावे त्याचवेळी पाठ झाली होती. मोठ्या संख्येने ऐकला जात असलेला हा खेळ प्रत्यक्ष स्टेडियमवर कसा खेळला जात असेन असंही त्यावेळी वाटायचं. कारण रात्रीही सामने चालतात असं त्यावेळी ऐकलं होतं.

आपणही घरात क्रिकेटी सामने ऐकू असं वाटलं. त्यासाठी अब्बू नसताना आम्ही भावंडांनी आलमारीवर ठेवलेला मोठा (दोन बाय दीड आकाराचा) रेडियो सेट खाली काढला. त्यात बरीच धुळ भरली होती. प्लग लावून चालू करण्याची बरीच खटाटोप केली. पण तो काही चालू झाला नाही. ही धडपड पाहून दादा (आजोबा) म्हणाले, अरे वो बहुत दिन से बंद हैं, अब चालू नही होगा. इसके मॅकेनिक भी अब नही मिलेगे!” असे दोन रेडियो (बंद अवस्थेत) आमच्याकडे होते. अर्थात आमचं घरं रेडियोचे लायसन्सधारी होतं. ती दोन लायसन्स आजही जपून ठेवली आहेत. बहुधा त्यावेळी टिव्हीसुद्धा लायसन्सवाला असावा!

बालपणी राजमा आजींशी गप्पा मारणे हा आम्हा भावंडाचा आवडता छंद होता. रोज संध्याकाळी दारावरील पायऱ्यावर त्या आपलं बस्तान मांडत. तिसरी-चौथीत असताना त्यांच्याकडून अनेक कथा, किस्से, प्रसंग ऐकली आहेत. त्यांच्याकडून पोलीस अॅक्शनचा प्रसंग आम्हाला नेहमी ऐकू वाटायचा. पण आजी वारंवार टाळत. खूपच जिद्द केली की, मग त्या ऐकवायच्या.. त्यात आर्य समाजींच्या धमक्या, तेल्या-वाण्याचा रूबाब, कल्ला झाला की वरती गच्चीवर जाऊन तांसतांस आडवं पडून राहणं, घर सोडून जाणे, जंगलात पळून जाणे, जीव वाचवण्याच्या धडपडी, लुटालूट, हल्ले बरंच काही सांगत. एक किस्सा तीन-तीनदा सांगून झालेला असायचा. हे प्रसंग कथन करताना प्रत्येक वेळी त्यांचे डोळे डबडब भरून यायचे. पोलीस अॅक्शन त्यांच्यासाठी वेदनादायी व दुख:द स्मृती होत्या. त्यात त्यांनी माहेरची आप्त-स्वकीय गमावली होती. कदाचित त्यामुळेच त्या त्याबद्दल बोलणे टाळत.

पण आमचे काही नातेवाईक, पाहुण्यांना पोलीस अॅक्शनमद्ये स्पेशल ट्रिटमेंटही मिळाली आहे. म्हणजे हिंदू बांधवांनी त्यांचं जीवावर उदार होऊन हल्लेखोरापासून संरक्षण केलं आहे.

आमचा जातसमुदाय बलुतेदारी वर्गातला आहे. फार पूर्वी आत्तार बिरादरी सुगंधी, उटणे आदींचा व्यापार करीत. अबीर, इत्र म्हणजे अत्तर इत्यादी सुगंधी द्रव्याच्या व्यवसायात होते. अभ्यासक मानतात की, त्यावरून आत्तार हे नाव पडलं असावं. कालांतराने त्यांनी व्यवसाय बदलला. त्यामुळे आत्तार त्या अर्थाने जात नसून फिरस्ती व्यावसायिक जमात आहे. अत्तार, तांबोळी, मनियार इत्यादी व्यावसायिक मागास जातीतून आमच्या पूर्वजांनी कित्येक वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारला. धर्म बदलला पण व्यवसाय मात्र तेच राहिले. आमच्या आजोबांचं नाव उस्मान आतार होतं. आतारीहा त्यांचा व्यवसाय! म्हणजे बांगड्या, हळदी कुंकू, कडदोरे, पोळ्याचे बैलाचे गोंडे, दातवण, मंगळसूत्र, मणी, जोडवी इत्यादींची विक्री करणे. म्हणजे आमचा आतार समुदाय प्राचीन भारतीय संस्कृतीशी नाळ जोडणारी बिरादरी आहे. गरोदर महिला, अबोध बालक, विवाहिता, नवविवाहिता, सवाष्णीन असो किंवा विधवा इत्यादींच्या सांस्कृतिक व त्या अर्थाने पारंपरिक वस्तू, अलंकार, पूजा सामग्री इत्यादींची विक्री करतात.

पोलीस अॅक्शनच्या काळात ग्रामीण भागातील गैरमुस्लिम समुदायांनी आत्तारांना संरक्षण दिलं. त्याची कारणे सांस्कृतिक, पारंपरिक व धार्मिक होती. त्यांच्या मते आतार, मनियार हिंदू परंपरा व संस्कृतीचे रक्षणकर्ते आहेत. बांगड्या, पूजा सामग्री, बाळसं, लग्न, सोहळे, आणि स्त्रियांच्या सौभाग्याची प्रतीक असलेली साधने तो गरजवंतापर्यंत पोहोचवतात. उपरोक्त वस्तू भारतीय परंपरा व संस्कृतीत आपलं विशेष स्थान टिकवून आहेत. त्यामुळेच आत्तार, मनियारांना थेट स्वंयपाक घरातपर्यत सहज प्रवेश असावा. परिणामी हैदराबाद मुक्तीच्या काळात मराठवाड्यातील अनेक भागात आत्तार, तांबोळी, मनियारांचं संरक्षण केल्याचं नातेवाईक सांगतात. पण राजमा आजींचं कुटुंब दुर्दैवी ठरलं. असो.

राजमा आजी आम्हाला भांवडांना नेहमी सत्कार्य करण्याचे, चांगलं वागण्याचे उपदेश करत राही. मूल्यशिक्षण, मोठ्यांचा आदर, सन्मान, खोटे न बोलणे, चांगल्या सवयी, लवकर उठणे, जेष्ठाची सेवा, नमाज इत्यादी बरच काही वारंवार सांगत. मी मात्र जरासा अबोल होतो. पण नवीन काही समजून घेण्याबाबत बडे भय्याचं कुतुहल खूपच जास्त होतं. त्यांच्या एखाद्या प्रश्नांतून आम्हाला बरीच माहिती मिळायची. कुटुंबातील सोयरीक, सदस्याची नावे, वंशावळ, आजोबाचं दुकान, व्यापार, दर महिन्याला उत्तर भारताची वारी, काका, अब्बूंच्या खोडी, सवयी बरच काही सांगत. मगरिबची अजान झाली की त्यांची सभा विसर्जित होत. आजोबा घरात येण्यापूर्वी त्यांची आत जाण्याची घाई असे.

आजोबाशी कधी मोकळेपणाने बोलल्याचं आठवत नाही. प्रारंभी तेही आत्तारीचा फिरस्ती व्यवसाय करायचे. नंतर मात्र त्यांनी बैठी दुकान थाटलं. सत्तर-ऐंशीच्या दशकात आजोबांचं मंडी बाजारात फाइन जनरल स्टोरनावाने मोठे दुकान (बॉम्बे जनरलच्या शेजारी) होतं. आसपाच्या ग्रामीण भागातून होलसेलचे अनेक ग्राहक दुकानात येत. अनेक वषे हे दुकान चालू होतं. यशस्वी व्यावसायिक म्हणून बरेच प्रसिद्ध होते. कालांतराने आर्थिक डबघाईमुळे दुकान बंद करावं लागलं. दुकान आणि एक घर विकावं लागलं. दुकान त्यांचा जीव की प्राण होता. एकट्याच्या बळावर त्यांनी तो अधिक समृद्ध व विस्तारित केला होता. एकाएकी बंद झाल्याने त्यांच्या मनाने घोर घेतला. मग त्यांनी अनेक वर्षे मस्जिदमध्ये इमामात केली. कालांतराने इमामात सुटली. मग त्यांनी वृद्धापकाळात विरंगुळा म्हणून छोटेसं किराना दुकान थाटलं. फाइन जनरलचा उर्वरित मालही त्यात ठेवला.

आमचं घर बागवान गल्लीत शाहबटाव चौकात होतं. तर दुकान आधी जुन्या पोलीस चौकाजवळ वाघमारेंच्या शेजारी होतं. अनेक दिवस आजोबांनी हे दुकान चालवलं. त्यानंतर ते दुकान आमच्या चांद चाचाकडे गेलं. तिथंच अब्बूने पेटिंग आणि टेलरिंगचा व्यवसाय जमवला होता. मोट्या काकांना अंबासाखरला नोकरी होती. शाळा सुटली की, आम्ही भावंडं दिवसभर दुकानात असत. अब्बू करीत असलेली दोन्ही काम बारकाईने पाहत. आर्थिक तंगीमुळे आजोबांनी तेही दुकान रॉकेलवाल्या मुख्तारभाईंना विकलं. त्यानंतर मात्र अब्बूच्या दुकानाची पंचायत झाली. काही दिवस बागवान मस्जिदच्या शेजारी दुकान जमवलं. पण लवकरच ते कालिदास पुसकर यांच्या दुकानात आले. पुसकर एसआरटी कॉलेजमध्ये ग्रंथपाल होते. पण त्यापेक्षा त्यांची कीर्ती एक प्रसिद्ध ज्योतिष म्हणून होती.

हे दुकान मोठे होतं. समोर मोठी जागा व ओटा होता. एका भागात अब्बूने मशिन लावल्या. तर दुसरा भागात पलंग टाकून आरामगृह केलं. नंतर आजोबांनी इथं पुन्हा किराना दुकान मांडलं. आम्ही भावंडं दुकानात बसून त्यांची मदत करीत असू. रोज सकाळी नऊच्या सुमारास ते सामान आणायला हातरिक्षात बसून मंडीबाजारात बडेराकडे जात. अकराच्या सुमारास परत येत. त्यांचा मित्र गोतावळा फार मोठा होता. तसंही वृद्धांना काही काम नसते, त्यामुळे अनेकजण त्यांच्याकडे येऊन बसायची. ओट्यावर आजोबांच्या मित्रांची मैफल जमायची. स्वाभाविक त्या वृद्धाचे अनुभवविश्व, उपदेश, शिकवणीची भर आम्हा भावडांच्या व्यक्तिमत्व विकासात पडू लागली. आम्ही भावंडं आजोळी असताना १९९६च्या मे महिन्यात त्यांचं निधन झालं.

आमचे अब्बू उत्तम कलावंत आहेत. त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षण काळात आर्ट पेंटिगमध्ये त्यांचा कोणी हात धरू शकत नव्हता, असं त्यांचा बालमित्र रमाकांत वाघमारे यांनी आम्हाला भावंडांना अनेकदा सांगितलं आहे. पेंटिग त्यांची पॅशन होती. सुंदर व हुबेहुब चित्र काढण्यात ते पारंगत होते. कॉलेजवयात अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या होत्या. एकेकाळी कला प्राध्यापक होते. पण फार काळ त्यात ते रमले नाहीत. पुढे त्यांनी टेलरिंगसोबत साइन पेंटिगचा व्यवसाय सुरू केला.

बाराभाई गल्लीत बिस्मिल्लाह किराना स्टोअर त्यांनी रंगवलेला शेवटचा बोर्ड! त्यांनतर त्यांनी कधी ब्रश हाती घेतला नाही. पण १९९१च्या नगर परिषदेच्या निवडणुकीत मिरशाह नूरशाह या गल्लीतील काँग्रेसच्या उमेदवाराच्या अतिहट्टामुळे त्यांनी ब्रश हाती धरला व त्यांच्या प्रचारार्थ भिंतीवर प्लेक्सबोर्ड रंगवले. अब्बूसोबत आम्ही भावंडे एक-एक करून जात होतो. अब्बूचं हे काम रात्रीच चालायचं. भल्या पहाटे काम संपवून ते घरी यायचे. मला वाटते आठवडाभर त्याचं हे काम सुरू असावं.  अब्बूसोबत मी एक दोनदा गेल्याचं आठवतं. अब्बूने काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेला पंजाचा फॉरमॅट पुठ्ठ्याने तयार केला होता. दोन बाय तीनचा तो पुठ्ठा वाहून नेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. डोक्यावर घेऊन जाताना माझ्याकडून तो खाली उभाच पडला. त्याचा अंगठा तुटला गेला. मला अब्बू काय म्हणतील अशी भीती वाटली. पण अब्बू काही म्हणाले नाहीत.

बोर्ड लिहून झाला की अब्बू पुठ्ठ्याला भिंतीवर टेकवून ब्रशने पंजा काढत. तुटलेला अंगठा अंदाज्याने जोडत. माझ्या मते भिंतीवर प्रचार बोर्ड रंगवलेली ती शेवटची निवडणूक असावी. त्यांनतर १९९५ साली मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. सेशन यांनी घडवून आणलेल्या सुधारणा कार्यक्रमात बोर्ड रंगवण्याची प्रक्रिया बंद झाली. असो. पण लहानपणी लोकशाही दृढीकरणाच्या प्रक्रियेत थोडा-बहुत का होईना आपला हातभार लागलेला आहे. त्या निवडणुकीत मिरशाह बहुमताने निवडणून आले आणि नगर परिषदेत उपाध्यक्षही झाले.

शाळेतला तिरंगा

शाळेत पंधरा ऑगस्टच्या आदल्या रात्री अब्बू आमच्यासाठी नवीन गणवेश शिवायचे. रात्रीतून काज-बटण व इस्त्री करून कपडे रेडी केली जात. अनेकदा ईदला नवीन ड्रेस मिळायचा नाही, पण १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला हमखास मिळायचा. नवा ड्रेस घालून आम्ही भावडं प्रभात फेरीला जात. घरी टेलरिंगचं दुकान असल्याने आम्हा सर्व भावंडाना शिलाईचं कौशल्य शाळेतच आत्मसात झालं. असंच एकदा १५ ऑगस्टचे कपडे लवकरच तयार करून झाले. त्यावेळी सहज सूचलं आपणही तिरंगा का शिवू नये?

अब्बूंचं लेडिज टेलरचं दुकान असल्याने उरलेल्या रंगीत कापडाच्या चिंध्या खूप होत्या. पोतं पालथं करून ध्वजासाठी साजेशी तुकडे काढली. पाच-दहा मिनिटात सुरेख तिरंगा तयार झाला. इस्त्री करून रेडी केलं. रात्रीचं दहाएक वाजले असतील. तोपर्यंत सगळे झोपी गेले होते. पण मला झोप काही येत नव्हती. स्वहस्ते तिरंगा तयार झाल्याने मनस्वी आनंद होत होता. उद्या शाळेत खिशातून काढून सर्वांना कधी दाखवू असं झालं होतं. मनात कितीतरी नियोजने चालू होती. पण एका विचार खूप जास्त बरा आणि प्रभावी वाटला.

नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठलो. आंघोळ करून कपडे घालून रेडी झालो. पावणेआठला शाळेत पोहोचायचं होतं. अजून बराच वेळ होता. लहान भावाला तयार केलं. तो आणि मी मुंडारीजवळ आलो. अलगद भोक करून उभा काटकी त्यात रोवली. वरच्या कोपऱ्याला सेफ्टी पीन लावली, त्यात दोरा घालून शिवलेला तिरंगा हळहळू वरती नेला. खालच्या टोकाला बांधून टाकला. आम्ही दोघां भावंडांनी त्यास एक जोरदार सॅल्यूट केला. राष्ट्रगीत म्हटलं आणि उत्साहात शाळेत गेलो. पुढे १०-१२ वर्ष मी अशा प्रकारे घराच्या मुंडारीवर तिरंगा फडकवत होतो. पहिला तिरंगा फडकवला त्यावेळी मी चौथीत असेन!

आमचं घर चौकात आहे. चारही रस्त्यावरून ते दिसते. त्यादिशी बागवान गल्लीत आमचीच मुंडार तिरंग्याने सजलेली असायची. त्यादिवशी वारंवार गल्लीत जाऊन मुंडारीला पहात असू. तिरंगा फडकवून आम्ही भावडं स्वत: स्वत:ची कौतुक रंगवून घेत होतो. पुढे प्रभातफेरीनंतर वर्गमित्रांना घरी आणून हा डोलणारा तिंरगा दाखवणे असा छंदच जडला. कालांतराने तो तिरंगा अधिक सुरेख आणि शानदार करण्याचा प्रयत्न करू लागलो. प्रारंभी १० बाय ५ इंचाचा हा ध्वज वाढत-वाढत दीड फुटावर नेला. त्यासाठी वर्षभर चांगले कापड निवडणे व ते जतन करून ठेवणे असा बालउद्योग त्याकाळी सुरू होता.

सहावीत बड्या एका माणसाने सांगितलं की, असा व्यक्तिगत तिरंगा फडकवणे बेकायदा आहे. पोलिसांनी पाहिलं तर शिक्षा होऊ शकते. भीती मनात दडली. दुसऱ्या वर्षी भित-भीतच मुंडारीवर झेंडा फडकवला. अन् नेमका घात झाला.

घराजवळ जुनी पौलीस चौकी आहे. तिथं प्रत्येक राष्ट्रीय सणाला ध्वजवंदन होतो. तीन-चार पोलीस सकाळीच तिरंगा फडकवायला येतात व संध्याकाळी विसर्जित करतात. त्यादिवशी सायकलीवरून जाणाऱ्या एका पोलिसांची नजर माझ्या तिरंग्यावर गेली, त्याने चौकशी केली व दुकानावर जाऊन अब्बू-आजोबांना समज दिली. मग आजोबांनी मला धारेवर धरत ध्वज तत्काळ काढायला सांगितलं. घाईघाईने घरी जाऊन विर्सजनापूर्वीच ध्वज खाली उतवरला. पण त्यादिवशी खूप अवस्थ होतो. दिनसभर करमत नव्हतं. उगाच वाटून गेलं, त्या पोलिसाने का पाहिलं! सरकार असा का नियम बनवते, शासनाने प्रत्येक नागरिकांना का असा अधिकार दिला नाही, ना ना विचार डोक्यात येत राहिले.

बहुधा १९९८-९९ला मेनकापडी तिरंगा ध्वज मार्केटमध्ये सर्रास विक्रीला येऊ लागले. लोक घेऊन ते आपल्या सायकलीवर, गाडीवर, दाराच्या चौकटीवर मिळेल त्या दर्शनी जागेवर लावू लागले. माझी डेअरिंग वाढली. मग मीही छाती ताणून आपला कापडी तिरंगा मुंडारीवर आणखीन उंच लावला. २००५ साली घराची ती मुंडार व लादणी कोसळेपर्यंत मी ध्वज चढवत होतो.

आम्ही पाहतो तसं अब्बूचं टेलरिंगचं दुकान गल्लीतच आहेत. पुसकर यांच्या वाड्यात अनेक दिवस ते राहिलं. १९९७ साली कालिदास पुसकर यांचं अपघातात निधन झालं. त्यानंतर आम्हाला ते दुकान सोडावं लागलं. जवळपास सात-आठ वर्षे आमचं दुकान तिथं होतं. त्यानंतर मनियार गल्लीच्या कोपऱ्यावर मंदिराच्या समोर आम्ही दुकान नेलं. तिथंही तब्बल ११ वर्षे होते. २०१२ साली बागवान गल्लीत आमचं नवीन घर बांधून तयार झालं, मग अब्बूनी दुकान तिथं शिफ्ट केलं. तिथं अजूनही अब्बू टेलरिंग करतात.

आमच्या दुकानात वयाने ज्येष्ठ असलेली मंडळी नियमित येऊन बसायची. अशा अनेक ज्येष्ठांच्या सहवासात आम्हा भावंडाचं बालपण गेलं. नेहमी चांगले बोल आमच्या कानावर पडत राहिले. व्यापार, इतिहास, शायरी, कथा, प्रसंग, अनुभव कानावर पडत होते. त्यातून आमचं बालपण अधिक समृद्ध व हेल्दी झालं. दिवसभर दुकानात असल्याने इतर उद्योगात फारसं लक्ष नसायचं किंवा अब्बूंची भेदक नजर आम्हाला ते करण्यापासून रोखायची. पण अब्बू बाहेर गेले की, आम्ही भावंडं एक-एक करून ग्राउंडवर निसटत असू.  

अब्बू परत येईपर्यंत गोट्या, विटी दांडू, लंपडाव इत्यादी खेळात रमणे होई. मोठे बंधू नेहमी दुकानात असत त्यामुळे त्यांना फारसं खेळता आलं नाही. मला आठवतं त्यांनी चौथीच्या वर्गात असताना शिलाई काम शिकलं होतं. त्यानंतर ते अब्बूच्या हाताखाली सतत काम करीत राहात. भय्या मिल्लिया शाळेत होते. त्यांची शाळा साडेबाराला सुटायची. भय्या आले की अब्बू बाहेर जात. व अब्बूचं काम भय्या सांभाळत. हे सत्र भय्याच्या पदव्यूत्तर शिक्षणापर्यंत सुरू राहिलं. २००९ साली भय्या बीएडसाठी औरंगाबादला गेले, त्यानंतर ते स्थान माझ्याकडे आलं.

भय्या दुकानात असल्याने मी व माझा लहान भाऊ सलीम आम्ही मस्त हुंदळत असू. शाळा सुटली की, मित्रांसमवेत कधी त्यांच्या शेतावर तर कधी घरी जाऊन, काहितरी खेळ जमवत. रविवारी अमृतेश्वरच्या डोंगर-दऱ्या कपारीत कारेबारे शोधून खात फिरणे आवडता छंद होता. दोन-तीन तास मस्त आवारगी करीत फिरत असो. सोबतीला कधी चुलत भाऊ तर कधी गल्लीतले सहकारी असत. घराच्या पाठीमागे मोठी आमराई होती. तिथं जाऊन हुंदळणे, झाडावर उड्या मारणे, आदी खेळ खेळत होतो. पलीकडे सोनाराची आमराई होती. आजोबा सांगायचे अशा आमराई गावात अनेक ठिकाणी होत्या. म्हटलं जातं की गावाला पूर्वी जोगाई असं नाव होतं. हे गाव आंब्यासाठी प्रसद्ध होतं. गावात आंब्याची मोठी व्यापारी बाजारपेठ होती. कदाचित आंबा हे विशेष गावाच्या नावाशी जोडलं गेलं असावं. पुढे आंब्याची जोगाई असा उच्चार झाला असेल. मग पुढे त्याचं अप्रभ्रंश होऊन आंबाजोगाई असं नाव पडलं असावं. निजामकालीन दप्तरी आंबाजोगाई अशाच नोंद आहे. कालांतराने निजाम सरकारने गावाचं गाव मोमिनाबाद केलं. स्वातंत्र्यानंतर शहराला पूर्वीचं आंबाजोगाई नाव बहाल झालं. असो.

शाळेत पाचवी-सहावीत महात्मा गांधी यांच्याविषयी स्वावलंबनाचा एक धडा शिकलो होतो. बालकांनी आपली काम आपणच करावी, शक्य होईल कुटुबाला आर्थिक हातभार लावावा, असा त्याचा सारांश होता. योगायोगाने आम्ही भावडं किराना दुकान चालवत होतो. अर्थात आजोबांना मदत करीत होतो. पण त्याचवेळी आम्ही स्वतंत्रपणे भाजलेली पापडही विकत होतो. म्हणजे घर ते आजोबांच्या किराना दुकानापर्यंत पापड घेऊन जाताना, रस्त्यात पप्पड लो पप्पड.. ओरडत. त्या छोट्याशा प्रवासात कधी बारा आणे तर कधी सव्वा रुपयाचे पापड आम्ही विकत. स्वावलंबनाच्या धड्यानंतर मला स्वतच्या ह्या कामाचं विशेष कौतुक वाटून गेलं.

रविवारी पतंगबाजी करणे हाही आमच्या विरंगुळ्याचा महत्त्वाचा भाग होता. त्यानंतर आम्ही भावंडानी एकत्र सल्ला-मसलत करीत पतंग तयार करण्याचा छोटासा व्यापार सुरू केला. तीन-चार वर्षे आम्ही तो सुरू ठेवला. किराना दुकानात विक्रीसाठी ठेवत. आजोबाच्या निधनानंतर किराना दुकान बंद झालं. त्यानंतर अब्बूच्या टेलरिंग दुकानात आम्ही तो व्यापार शिफ्ट केला.

चार आणे ते एक रुपया अशा किमतीत ती पतंग विकली जात. वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे व स्टाइलचे पतंग आम्ही तयार करत होतो. बाहेर जाऊन वेगवेगळ्या रंगाचा ताव आणणे, मोंढा बाजारात जाऊन बांबू आणणे, हाही आमच्या दिनक्रमाचा भाग झाला. त्या व्यापारातून आम्ही त्यावेळी बरेच पैसे जमवले होते. एका सीजनमध्ये दोनशे-तीनशे रुपये आम्हाला सुटायचे. मग त्या पैशातून आई आम्हा भावंडाना कपडे, स्वेटर आणीत.

त्याच काळात आम्ही दुकानासमोर छोटीशी पान टपरी सुरू केली होती. आता हे आमचं हक्काचं व स्वमालकीचं दुकान होतं. मंडी बाजारातील पराग जनरलमधून पान मटेरियलचं साहित्य आणून त्या टपरीवर विकत होतो. मिनी गुटका, स्टार, ५५५ सारखा पान मसाला, चारमिनार, बर्कली सिगारेट त्यावेळी विकल्याचं आठवतं. अर्थातच उद्योजक होण्याचे बीज बालपणीच आमच्यामध्ये पोसले गेले. त्यातून सलीमभाईने वेगेवेगळे व्यवसाय लहानपणीच केले. कधी भाजीचा ठेला चालवला, कधी पेप्सी विकली, कधी काही, कधी काही...

दहावी-बारावीत आम्ही टेलरिंगचा व्यवसाय पूर्णपणे चालवू लागलो. दहावीनंतर मी प्रशांतनगर येथील राहुल टेलर इथं कारागिरी सुरू केली. तब्बल-चार-पाच वर्षे मी तिथं मुख्य कारागीर होतो. साहजिक त्या दुकानाची सगळी जबाबदारी माझ्याकडेच होती. सगळा व्यापार एकट्याने सांभाळला. २००७ साली स्वत:च मोठे टेलरिंगचं दुकान थाटण्याच्या तयारीत होतो. त्यासाठी अतिरिक्त मशीन आणून ठेवल्या होत्या. पण ऐनवेळी निर्णय बदलला आणि पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला स्थलांतरित झालो. पण आजही घरी आलो की, दुकानात बसणे व कपडे शिवणे हा आवडीचा भाग असतो.

माझी व लहान भावाची शाळा जेथे वाड्यात होती. १९८९ शौक्षणिक वर्षात अम्मीने मला पहिल्याच्या वर्गात टाकलं.  अम्मीच्या मते त्यावेळी माझं शाळेचं वय झालेलं नव्हतं. पण चुलत भावाशी खेळण्यात होत असलेल्या सततच्या भांडणामुळे वैतागून त्यांनी आम्हा भावंडाना बळंच शाळेत घालण्याचा निर्णय घेतला. त्याच वर्षी आमच्या बागवान गल्लीत मन्सूर उर्दू प्रायमरी शाळा सुरू झाली होती. मी जसा शाळेत जाऊ लागलो, तसंच चुलतीने तिच्या मुलांना मन्सूरमध्ये दाखल केलं.

घरापासून माझी ही झेडपीची शाळा सहाशे-सातशे मिटरवर होती. त्याच वाड्यात गुरुजींची (नाव आठवत नाही) आणखी एक एकल शाळा होती. एकाच खोलीत ते चार वर्ग चालवीत. चार रांगेत चार वर्ग होते ते. मुली-मुली एकाच ओळीत बसवायचे. चौथीसाठी आमच्या झेडपीच्या शाळेत इथले विद्यार्थी शिफ्ट होत. तिसरीपर्यंतचे वर्ग याच वाड्यात होते. काशीबाई पहिल्या वर्गशिक्षक होत्या. फार प्रेमळ बाई होत्या. बुटक्या व गोऱ्यापान होत्या. चेहरा नेहमी हसता. पहिल्याच दिवशी त्यांनी मला गोंजारलं. जवळ घेतलं. निकमबाई दुसरीच्या वर्गशिक्षिका होत्या. चौथीनंतरचे वर्ग पटाईत वाड्यात भरायचे. पुढे सगळेच वर्ग इथं शिफ्ट झाले. आजही ही शाळा तिथचं आहे.

याच शाळेत मी सातवीपर्यंत शिक्षण घेतलं. पुढे आठवीला शिवाजी चौकातील झेडपी शाळेत मला अब्बूंनी घातलं. माझे सर्व मित्र योगेश्वरीत होते, मी मात्र एकटा झेडपीत होतो. माझं मन करमेना. पण एक होतं, घरातून बाहेर पडताना मजा वाटायची. खूप काही बघायला, अनुभवायला मिळायचं. इथं खऱ्या अर्थाने मला नवा अवकाश अनुभवता आलं. माझ्या बुजरेपणाला जणू आव्हानच मिळालं होतं. एकटेपणा, तुटलेपणा, एकांतवासात मी इथं तीन वर्षे काढली. तुटलेपणाने आत्मविश्वास गमावला व तो परत हाशील करण्याचं बळही दिलं.

इथं माझ्या हाती बराच रिकामा वेळ होता. साडे अकरा ते साडे चार अशी शाळेची वेळ! अर्ध्या-पाऊण तासाची मधली सुट्टी असायची. त्यात शाळेच्या परिसरातील वेगवेगळी झाडं न्याहाळत फिरणे, हिरवळीवर लोटांगण घालणे, बाजारात फिरून येणे, हा माझा उद्योग होता. उर्दू आणि मराठी माध्यम एकत्रच होतं. योगेश्वरी, खोलेश्वरनंतर गावातील सर्वांत मोठी ही शाळा होती. एका अर्थाने ही शाळा तालुक्यातील झेडपी शांळाचं मुख्यालय होती. सरकारकडून येणारी शालेय साधने, वह्या, पुस्तके, प्रश्नपत्रिका इत्यादी इथूनच तालुक्याला वितरित केली जात. पुढे इथं पंचायत समितीच्या एका विभागाचं कार्यालय इथं आलं. आज शाळा बंद झाली पण ते कार्यालय मात्र अजूनही आहे. एका अर्थाने ह्या कार्यालयाने शाळेला मरणकळा दिल्या, असंही म्हणता येईल. गेली चार-पाच वर्षे त्या शाळेचं नेमकं स्टेटस मला माहीत नाही. पण ऐकलंय की, शाळा बंद झाली आहे.

शाळेतून घरी येताना साहित्य निकेतन ग्रंथालयात वृत्तपत्र वाचन हादेखील एक सुरुवातीला विरंगुळा, नंतर छंद व पुढे सवयीचा भाग झाला. रविवारी सकाळी अकराला साहित्य निकेतनला हजर होई. विकएंडच्या फिल्मी पुरवण्या, साहित्यिक लेख, ललित मंथन वाचल्यानंतर त्याच तंद्रीत दिवस जात. १९९७-९८ पासून चंपक, लोकमतची चित्रगंधा, रविवार पुरवणी (नाव आठवत नाही) सकाळचं सुटीचं पान, रविवार पुरवणी (नाव आठवत नाही) तरुण भारतची सदाफुली, नवभारतची ग्लॅमर पुरवणी, चित्रलेखा, श्री तशी सौ, सरस सलिल, मार्मिक वाचायचो.

२००३ साली युंगाडाचा माजी हुकूमशाह इदी अमीनचे रियाधमध्ये निधन झालं. त्यावेळी गावकरीच्या रविवार पुरवणीत त्याच्याविषयी एक व्यक्तिलेख आला होता. त्यात इदीचा मानवभक्षक क्रूर चेहरा, त्याची राजकीय धोरणे, अनिर्बंध हुकूमशाही सत्ता इत्यादींवर सविस्तर विवेचन वाचून मी दिवसभर तनावात होतो. आपण सर्वकाही प्रत्यक्ष पाहिलंय असा भास मला त्यादिवशी झाला होता. अर्थात चार-पास तास मी भयाण विचारचक्रातून जात होतो. असो.

रविवारच्या पुरवण्या व विशेषांक वाचल्याशिवाय स्वस्छ बसवत नसे. तत्पूर्वी किराना दुकानात आलेली रद्दी पूर्ण वाचन किंवा चाळल्याशिवाय तिचा रद्दी म्हणून वापर सुरू होत नव्हता. त्यातून काढलेली कात्रणे आजही माझ्याकडे संरक्षित केलेली आहेत. इतकंच काय तर अब्बू नवीन शालेय पुस्तके आणताच, ते सर्वप्रथम पूर्ण वाचून काढायची माझी सवय होती. शालेय काळातील सर्वच प्रश्नपत्रिका माझ्याकडे संग्रही आहेत. तसंच गेल्या वीस वर्षापासूनचे निवडक वृत्तपत्रे, कात्रणे, लेख, बातम्या माझ्या फाइलीत संरक्षित आहेत. बालपणी वाचनाची जडलेली सवय आज प्रगल्भ होत ती अधिक सरस, चुझी आणि चोखंदळ झाली आहे.

सुरुवातीला मिळेल ते वाचलं, अरुण शौरींचा आंबेडकर, तसलिमा नसरिन, आसाराम ट्रस्टचा पंचामृत, भगवतगीता; हळुहळू चांगलं शोधायला लागलो. ताई इतिहासाची विद्यार्थिनी व भाऊ हिंदीचा; रशियन राज्यक्रांती पासून माओ, मार्क्स, चीनचा इतिहास, मुघलशाही नजरेखालून जात होतं. महाश्वेता देवी, ममता कालिया, राही मासूम, यशपाल, प्रेमचंद यांनी वाचनात रमवलं. घरात वृत्तपत्र नियमित येत, त्यातूनही वाचनाचा छंद जोपासण्यास फारच मदत झाली. त्यातूनच लिहू लागलो. दहावीत छोटीशी कथा लिहून बाजीला दाखवली होती. अनेक दैनिकांना वाचकांची पत्रे लिहिली, काही छापूनही आली. वाचनाच्या गोडीने जर्नालिझमपर्यंत पोहचवलं.

१९९९ साली घरात टीवी आला, तसं कारगिल युद्ध सुरू झालं. बातम्यातून युद्धाविषयी कळू लागलं. पुढे गुजरात दंगलीची भयाण दृष्य हृदयावर लाख जखमा करून गेल्या. टिव्हीमुळे वाचनात खंड पडू लागला. पण लवकरच टीव्ही बोअर वाटू लागलं. शक्तिमान मालिकेचा सूर ऐकून किळस यायची. पण जेव्हा घरात टिव्हीही नव्हता त्यावेळी मोगली, चंद्रकांता, अलिफ लैला, शांती मालिका पाहण्याची मजा वगळीच होती. मंगळवारी तिसऱ्या मधल्या सुट्टीत शाळेला टांग देऊन अपंग शाळेत (डॉ. जानुल्ला यांच्या बंगल्यात शासकीय अपंग शाळा होती. आमच्या लहानणीच शाळा मोरेवाडीला शिफ्ट झाली.) दूरदर्शनवर आलेला सिनेमा पाहणे व दुसऱ्या दिवशी धोंगडे सरांचा मार खाणे दोन-तीन महिने सुरू होतं.

बालपणी घडलेल्या वेगवेगळ्या घटनांनी माझा मानस घडविला. त्यात १९९३ची दंगल, १९९३चा किल्लारी भूकंप (माझी मावशी तिच्या दोन वर्षांच्या चिरमुड्यासह जमीनीत गडप झाली होती.), १९९४ची प्लेगची साथ, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचा हल्ला, त्यानंतरची गावातील होळीची दंगल, सिमीची नावे गावातील तरुणांची धरपकड, गुजरात दंगल, दिल्ली ब्लास्ट इत्यादी घटनांनी माझ्या बालमानसावर परिणाम घडवून आणला. वर्ल्ड ट्रेड सेंटरचा हल्ला आणि गुजरातच्या दंगलीने आपण मुस्लिमअसल्याची आणि काहीतरी वेगळेच आहोत, ही जाणीव सर्वप्रथम झाली.

बालपणी इतिहास खेचत होतं तर साहित्य खुलवत होतं. २००९ साली अंबाजोगाई सोडेपर्यंत साहुत्य निकेतन, नगर परिषदेचं बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचा नियमित सदस्य/वाचक होतो. आंबेडकर वाचनालयात सध्यानंद, आज, इंडियन एक्सप्रेस, मिलाप वायाचला मिळायचे. आलटून-पालटून सर्व चाळायचो. लोकसत्तेत अमर हबीब यांचं संवादसदर आवडायचे. आसाराम लोमटे, सुधींद्र कुलकर्णी, कुमार केतकर, खुशवंत सिंग, मुद्राराक्षस, असगर अली, नामदेव ढसाळ यांचे सदर वाचून डोकं गरगरायचं.

गवळीपुऱ्यातील पब्लिक ग्राऊंडला १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला होणारे झेंडा वंदन जाम आवडत असे. तसंच ह्या ग्राऊंडला लागणारी सर्कसही अनेकदा पाहिली आहे. मौत का कुंआमधील बाईकचा आवाज आमच्या बागवान गल्लीतील घरापर्यंत यायचा. एका वर्षी या सर्कसमधील हत्ती करंटने मेला, त्यादिवशी अख्खं गाव हळहळलं होतं.

एकेकाळी शैक्षणिक व सांस्कृतिक शहर अंबानगरीची ओळख होती. किंबहुना आजही आहेच! पण शैक्षणिक सधी लातूर, बीड, औरंगाबादला वाढल्याने हा वारसा विस्तारित झाला. पण शहर सुसंस्कृत (?), सामाजिकृष्ट्या शांत व राजकीयदृष्ट्या विचार असं हे शहर आहे. पालक, घर, गल्ली, मोहल्ला, परिसर, शाळा, व्यक्ती, त्यांचा अनुभव, भांडण, तंटे, वाद, मित्रांचा गोतावळा, बाजार, व्यापार, दुकान, सांस्कृतिक कार्यक्रम, किर्तने, सप्ताह, ताई महोत्सव, व्याख्यानमाला, साहित्यसभा, परिषदा, संमेलने आदींनी माझं व्यक्तिमत्व घडवलं. त्यातून प्रगल्भता तर आलीच पण जगाकडे पाहण्याचा स्वतंत्र दृष्टिकोन लाभला. जो दैनंदिन आयुष्यात एक चांगला माणूस म्हणून वावरताना नित्य उपयोगी पडतो. मनाच्या जाणिवा व वेदना स्थलांतरित असल्याने फार संवेदनशील व पाल्हाळिक झालो.

गाव सोडून एक दशकाचा इतिहास लोटला. हा काळ आठवून फास्ट फॉरवर्डिंग करून क्षणात मागं जाता येईल, असं राहून-राहून वाटतं. पण ते शक्य नाही. वर्षातून दोन-तीनदा घराकडे जाणं होतं. पुण्यात राहून शहर नेहमीच आठवतं. कदाचित त्यामुळेही माझ्या शहराविषयीच्या जाणिवा, स्मृती, संवेदना आणि आठवणी भूतकाळी नसून वर्तमानी आहेत.

 (सदरील कथन आंबाजोगाई बहुभाषिक साहित्य पत्रिकेसाठी लिहिला होता.)

कलीम अजीम

मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: आंबाजोगाई : स्मृती भूतकाळी नव्हे वर्तमानी!
आंबाजोगाई : स्मृती भूतकाळी नव्हे वर्तमानी!
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2022/09/blog-post_1.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2022/09/blog-post_1.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content