रमज़ान ईद आणि आईची लगबग

ला दागिने आवडत नाहीत, परंतु ईदच्या दिवशी सोन्याची अंगठी न विसरता घालतो. ती अंगठी किंमतीच्या दृष्टीने म्हणाल तर ​​फार मौल्यवान नाही. दहा ग्रॅम वजनाची. त्यात मढवलेला लाल खडा. माझ्यासाठी मात्र ती अनमोल आहे. माझ्या आईच्या अनेक आठवणी तिच्याशी निगडित आहेत.
आम्ही लहान होतो. आई पहाटे कधी उठायची, ती नेमकी वेळ आम्हाला कधीच सापडली नाही. आम्ही लवकर उठलो तरी ती आमच्या आधीच उठलेली असायची. एकटी काहीबाही कामं करताना दिसायची. ईदच्या दिवशीतर तिच्या अंगात हत्तीचं बळ आलेलं असायचं.
रमज़ानच्या महिन्यात आम्ही सगळेजण रोज़े धरायचो. रोज़ासाठी सहेरीकरावी लागे. सहेरी म्हणजे सूर्योदयापूर्वीचे जेवण. पहाटे चारच्या सुमाराला सहेरी व्हायची. सहेरीचा निम्मा स्वयंपाक आई रात्रीच करून ठेवायची. काही ताजे पदार्थ मात्र उत्तररात्री उठून करायची. त्या काळात चुलीवर स्वयंपाक व्हायचा. चूल पेटायला बराच वेळ लागायचा. आधी खोलीभर धूर. मान वाकवून चुलीत फुंकल्यानंतर पेट घेणार. ती आमच्यासाठी पाणी तापवून ठेवायची. थंडीच्या दिवसात तोंड धुवायला गरम पाणी लागायचे. ती आमच्या अगोदर तास-दीडतास उठून कामाला लागायची. सहेरी करून आम्ही परत झोपून जायचो. आई मात्र भांडी धूत बसायची. पहाटेची फजरची नमाज झाल्यावरच ती थोडा वेळ पडायची.
वाचा : रमजान : आधात्म, श्रद्धा आणि खाद्य पदार्थाची रेलचेल
वाचा : आमदाराच्या नियतीला लागले कुलूप
आईची लगबग
ईदच्या दिवशी रोज़ा नसतो. त्यामुळे सहेरीला उठण्याची दगदग नसते. आम्ही निवांत झोपायचो. पण, ईदच्या दिवशीही ती पहाटेच उठायची. चूल पेटवून पाणी तापवायला ठेवायची. अधून-मधून आम्हाला हाक मारायची. अंथरूण हलकेच बाजूला सारून म्हणायची, ‘उठा, पाणी तापलंय. पाहा, सगळी मुलं अंघोळी करून तयार झालीत. ईदच्या दिवशी अल्लाहच्या कृपेचा वर्षाव होत असतो. उठा पाहू.
आम्ही हो हो म्हणायचो. पुन्हा पांघरूण ओढून झोपायचो. शेवटी, हलवून ती आम्हाला उठवायची. पहाटेपासून तिच्या हाताला दम नसायचा. पाय भिरभिर फिरायचे. घराची साफसफाई करून नीटनेटके लावण्यापासून कोंबड्यांना दाणे टाकण्यापर्यंतची सगळी कामे ती एकटी करायची. ईदच्या दिवशी तिच्यावर दुप्पट कामे येऊन पडलेली असायची. ती झपाटल्यासारखी सगळी कामे करायची.
न्हाणीघरात साबण ठेवायची, टॉवेल लटकवायची. आमचे नवे कपडे काढून ठेवायची. तापलेलं पाणी काढून द्यायची. आम्ही एखाद्या राजकुमारासारखे अंघोळीला जायचो. तेवढ्यात पाठ चोळून द्यायला हजर. ईदच्या दिवशी होणारी अंघोळ इतर दिवसांपेक्षा वेगळी वाटे. खूप मजा वाटायची. कारण या अंघोळीनंतर आम्हाला नवे कपडे घालायला मिळायचे.
कपडे घालून झाल्यावर आई आमच्या डोक्याला सुगंधी तेल लावायची, पावडर चोपडायची. अन् तिने सुरमेदानी उचलली की आम्ही पळून जायचो. ती हाका मारीत आमच्या मागे यायची. आम्ही दार ओलांडून बाहेर गेलो की आईची पंचाईत व्हायची. ती बाहेर येऊ शकत नसे. ती कठोर पडद्याचे पालन करायची. घरातून हाका मारायची.
डोळ्यांत सुरम्याची कांडी फिरवायची आम्हाला भीती वाटे. आईच्या हाका वाढल्या की वडील बाहेर यायचे. त्यांच्या डोळ्यांच्या इशार्‍याने आमचे धाबे दणाणायचे. गाय बनून आत जायचो. आई आमचा हात धरून बसवायची अन् अलगद हातांनी सुरमा लावायची. सुरम्याची कांडी डोळ्यांजवळ आली की डोळे गच्च मिटले जायचे. आईच्या हातात जादू होती. ती हलकेच लावायची. सुरमा लावून झाला की, ती न चुकता माथ्याचं चुंबन घ्यायची. आम्ही धूम बाहेर पळायचो.
गल्लीत, रस्त्यावर पोरांचे घोळके असायचे. अंघोळी-पांघोळी करून नवनवे कपडे लेवून नटलेली मुलं. जणू गल्लीच्या बगिच्याला अचानक बहार आली आहे असे वाटायचे. अबोलीच्या मुलांसारखी छोटी-छोटी मुले एका रात्रीतून उमलल्यासारखी वाटायची. ही लहान मुले कुजबुज करायची. माझे कपडे असे, तुझे कपडे तसे, असे काहीबाही, जो तो खुशीत असायचा.
गल्लीच्या रस्त्यावर चिखल झालेला असायचा. घराघरांतील अंघोळीचे पाणी रस्त्यावर आलले असायचे. ढव साचले जायचे. नाल्या भरभरून वाहायच्या. सगळ्यांच्या आई-बाबांना आम्हा पोरासोरांची फार काळजी. नवे कपडे घालून बाहेर गेल्यावर, कोणी नालीत पडले तर कपडे घाण होतील. बदलायला दुसरे कपडे आहेत कुठे? एकुलत्या कपड्यांनी आपल्या लाडक्यांचे कौतुक पाहणार्‍या  गरीब आई-बाबांना आमचे बाहेर बागडणे आवडत नसे. लगेच हाका सुरू व्हायच्या. त्या वयात आई-बाबांच्या हाकांचा अर्थ कळत नसे. हिरमोड व्हायचा. घरात यावे लागायचे.
वाचा : मुहर्रम आहे तरी काय?
वाचा : मुसलमानांचे राजकीय व सांस्कृतिक आत्मभान 
आमच्या घरात आम्हा भावांच्या अंघोळी झाल्यानंतर बहिणी करायच्या. त्यांचे पाणी त्या स्वत:च घ्यायच्या. आई सगळ्यात शेवटी अंघोळ करायची. त्या काळी गॅसच्या शेगड्या नव्हत्या. चुली असायच्या. सरपण जाळायचे. त्यात एखादे ओले लाकूड लागले की सारे घर धुराने भरून जायचे. आई खोकू लागायची. बसल्या जागी तिरकी होऊन चुलीत फुंकायची. दम लागेपर्यंत फुंकून झाले की कधीतरी आगीचा भडका व्हायचा. हळूहळू धूर निघून जायचा. ईदच्या दिवशी सगळ्यांच्या अंघोळीचे पाणी तापायचे त्यामुळे आमच्या आईला वारंवार चुलीत डोके घालावे लागायचे.
आमचे वडील पांढरे कपडे घालायचे. पांढरा सदरा. पांढरा पायजमा. वरती पांढरी टोपी. सदर्‍याच्या खिशात बरीच कागदं असायची. ते फारसे घरी राहत नसत. आज गेले तर चार-चार दिवस येत नसत. त्या काळात त्यांचे कपडे कळकट-मळकट व्हायचे पण त्यांना त्याची फिकीर नसायची. आठ दिवसाला एकदा कपडे बदलायचे. शुक्रवारी अंघोळ करून धुतलेले कपडे घालून ते जुमाची नमाज़अदा करायला जायचे. ईदच्या आदल्या दिवशी ते कटिंग करायचे. खुरट्या केसांच्या खसखसी दाढीला आकार द्यायचे. ईदला अंघोळ करून नवे कपडे घालायचे, तेव्हा आमचे बाबा आम्हांला नवे नवे वाटायचे. ते दिवसभर घरीच असायचे. त्यामुळे आईसुद्धा खूष असायची.
अंघोळीने झालेला व्यायाम आणि बाहेर थोडं हुंदडून आलो की भूक लागायची. एव्हाना आईने शेवया शिजवून ठेवलेल्या असायच्या. आमच्या पोटात कावळे काव काव करू लागले की, ते आईला कसे ऐकायला जाते, हे कोडे आम्हाला कधीच उलगडले नाही. आम्ही सगळी भावंडं एकाच दस्तरखानवर चौतरफा बसायचो. कच्चून भूक लागलेली असायची.
गरम-गरम शेवया, त्यावर सायीचे दूध आणि साखर. पसरट काचेच्या वाट्या. अंगावर सांडता कामा नये.वडिलांची सक्त ताकीद असायची. नवे कपडे भरतील ही भीती. आई समजुतीच्या सुरात सांगायची. बेटा, प्याले उचलून खा म्हणजे खाली सांडणार नाही.ती आमच्या बरोबर खात नसे.
ईदगाहम्हणजे ईदच्या दिवशी सामूदायिक नमाज़ अदा करण्याचे ठिकाण. हे ठिकाण गावाबाहेर होते. गावातले सगळे मुसलमान तिकडे यायचे. साधारणपणे दहाच्या सुमाराला तेथे नमाज़ सुरू व्हायची. लोक नऊ-सव्वानऊला घर सोडायचे. आम्ही भावंडं हरवून जाऊ नये म्हणून हातात हात गुंफून, वडिलांच्या मागे चालत जायचो.
वाचा : खिलाफतीच्या बदल्यात गोरक्षण?
वाचा : ​'मनातील हिंदू-मुस्लिम बायसचे काय करायचे?' 
ईदगाह
ईदगाहमध्ये जाताना वडील कुराणातील काहीतरी (तकबीर) पुटपुटत राहायचे. त्यातील अल्ला हो अकबरएवढंच आम्हाला कळायचं. आम्ही तेच तेवढं म्हणत चालायचो. रंगीबेरंगी पक्ष्यांचे थवे उतरावेत तसे चहूबाजूंनी झुंडीच्या झुंडी ईदगाहकडे येताना दिसायच्या. माणसंच माणसं. जणू माणसांचा महासागर.
एरवी मळकट कपडे घालणारी गोरगरीब माणसं आज नवनवे कपडे परिधान करून आलेली. करीम सायकल रिक्षावाला, आमचा दूधवाला, मुन्शी, किराणा दुकानदार हे सगळे लोक नव्या कपड्यांमध्ये अगदी वेगळे दिसायचे. एरवी काचलेली ही माणसं आज चकाचक दिसायची. एखादं फुलाचं झाड लगडून जावं तसं. आमच्या आईला हे दृश्य कधीच पाहायला मिळालं नाही! कारण ती कधी ईदगाहवर आलीच नाही. ती घरात थांबायची. पुढे बहिणी मोठ्या झाल्यावर त्याही आईबरोबर घरीच थांबू लागल्या.
ईदगाहचं मैदान भलं मोठं होतं. तेथे अगोदरच जाय-नमाज़अंथरलेल्या असायच्या. लोक जास्त असायचे. त्या अपुर्‍या पडत. लोकांना हे माहीत असायचे. बरेच जण आपले अंथरूण बगलेत मारून आणायचे. आपापल्या चादरी अंथरून त्यावर बसायचे. अगदीच लहान मुलं असतील तर त्यांना ईदगाहच्या भिंतीच्या मागे सावलीत बसविले जायचे. आम्ही वडिलांच्या सोबत रांगेत बसायचो.
ऊन चटकायला लागायचे. पण काही तक्रार नसायची. सर्वांना ऐकू यावं यासाठी लाऊडस्पीकरचे कर्णे लावलेले असायचे. लांब ठेवलेल्या जनरेटरचा आवाज घुमत राहायचा. लोक जमले की वकीलसाहेब भाषण करायचे. एरवी सूट-बूट घालणारे वकीलसाहेब ईदच्या दिवशी शेरवानी घालून यायचे. त्यांचे जोशपूर्ण भाषण व्हायचे. ते सुरू असतानाच चंदा’ (निधी) गोळा करणारे कार्यकर्ते चादरीची झोळी करून रांगा-रांगातून फिरू लागायचे.
धार्मिक शिक्षण देणार्‍या शाळांना ही मदत असायची. तर कधी दंगल-पीडितांसाठी. आमचे वडील चार-आठ आणे आमच्या हातात द्यायचे. आम्ही झोळीत पैसे टाकून कृतार्थ व्हायचो. वकीलसाहेबांचे भाषण संपले की पेश-ईमामसाहेब उभे राहायचे. ते रमजानचं महत्त्व सांगायचे. नमाज़चा विधी समजावून द्यायचे. लोक कान देऊन ऐकायचे. आम्ही मुलांनी केलेली चुळबुळ शेजार्‍यांना आवडत नसे. ते आमच्यावर डोळे वटारायचे. पेश-ईमामसाहेबांचे प्रवचन संपले की, लोक आपापल्या जागेवर उभे राहायचे. सफ (रांग) सीधी करलो...अशा आरोळ्या व्हायच्या.
लोक आगेमागे होऊन रांग सरळ करायचे. काही काळ शांतता राहायची. थोड्या वेळानंतर अल्लाह हू अकबरअसा पेश-ईमामसाहेबांचा आवाज घुमायचा. लोक दोन्ही हात कानांपर्यंत न्यायचे व नमाज़ सुरू व्हायची. पेश-ईमामसाहेब कुरआनातील आयत (पवित्र वचन) म्हणायचे. तेवढे ऐकू येत राहायचे. बाकी सगळे शांत. सगळे हात बांधून उभे राहिलेले.
आम्ही लहान मुलं इकडे तिकडे पाहायचो. मोठी माणसं एकटक खाली पाहत राहायची. आम्हाला मागचं-पुढचं दिसत नसे. लोक सिजदा’ (नतमस्तक) करायला माथे जमिनीवर टेकवायचे. त्या वेळेस उभे राहून आम्ही सगळीकडे पाहून घ्यायचो. दूरदूरपर्यंत माणसंच माणसं दिसायची. एका शिस्तीने नतमस्तक झालेली. या एवढ्या सार्‍या गर्दीत माझी आई नसायची. ती कामाशी झुंजत घराच्या कोठडीत कैद असायची!
नमाज़नंतर दुआ’ (प्रार्थना) व्हायची. लोक दोन्ही पाय दुमडून व दोन्ही हात पुढे करून बसायचे. मनोभावे प्रार्थना करायचे. आम्हीदेखील अल्लाहपुढे हात पसरून परीक्षेत पास होण्याची आणि आई-वडिलांना दीर्घायुष्य मिळण्याची प्रार्थना करीत असू. पेश-ईमामसाहेब सगळ्यांसाठी दुवा करायचे. पाऊस पडू देत, रोग निवारण होऊ देत, जगात शांती आणि सौख्य नांदू देत, इथपासून आई-वडिलांची सेवा आमच्या हाताने घडावी, मुलांना नीट वळण लागावेपर्यंत असायची. प्रत्येक वाक्यानंतर लोक आमीन(कबुल हो) म्हणत. शेकडो मुखांतून एकाच वेळेस निघालेला आमीनहा शब्द त्या वातावरणात खूप गंभीर वाटायचा.
वाचा : संभ्रमित करणारा तलाकबंदी कायदा
वाचा : ‘धर्मनिरपेक्षतेचे कुली आम्हीच का व्हावे?’
ईद मुबारकचा सलाम
दुआ संपली आणि लोकांनी आपापल्या चेहऱ्यावर हात फिरवून घेतला की आलिंगनांचे सत्र सुरू व्हायचे. आमचे वडील सर्वप्रथम आम्हाला आलिंगन द्यायचे. ईद मुबारकम्हणायचे. एरवी वडिलांशी आमची लगट नसायची. त्यामुळे हे आलिंगन दुर्मिळ असायचे. खूप पावल्यासारखे वाटायचे! आपण मोठे झाल्यासारखे वाटायचे!
वडिलांचे मित्र त्यांना आलिंगन द्यायचे. त्यांपैकी काही आम्हालाही जवळ घ्यायचे. खूप लोक आलिंगन द्यायचे. पेश-ईमाम साहेबांना मुसाफा’ (हस्तांदोलन) करायला गर्दी उसळायची. सगळ्यांना आपापल्या घरी जाण्याची घाई असे. हातात हात गुंफून आम्ही परत निघायचो. येताना गप्प बसलेल्या भिकार्‍यांनी आता कोलाहल सुरू केलला असायचा. ते आरेडून ओरडून भिकेची याचना करायचे. आमचे वडील आमच्याकडे पाच-दहा पैशांचे नाणे द्यायचे. आम्ही ते भिकार्‍यांना द्यायचो. घर जवळ आले की, एकमेकांचे धरलेले हात सोडायचो आणि घराकडे धूम ठोकायचो. आईला ईद मुबारककरायची आमच्यात स्पर्धा लागायची. वडिलांना मागे सोडून देऊन आम्ही धावत घर गाठायचो.
आई चुलीजवळ बसलेली असायची. आम्ही नामज़ला गेलो तेवढ्या वेळात तिने अंघोळ केलेली, नवे कपडे घातलेले. ती पंजाबी पद्धतीचे शर्ट-सलवार नेसायची. वरती दुपट्टा असायचा. हलके रंग तिला आवडायचे. भडक रंगाचे कपडे आम्ही तिच्या अंगावर कधी पाहिले नाहीत. त्यामुळे ती अधिक मोहक वाटायची. सामान्यपणे तिच्या डोक्यावर पदर असायचा. ओले केस बांधून ती कामाला लागलेली असायची. छान दिसायची. अम्मीजान ईद मुबारकअसे ओरडत आम्ही घरात घुसायचो. ती आम्हाला कुशीत घ्याची. आपको भी सलामतम्हणायची. पढो लिखो, बहोत बडे बनो...नेक बनोवगैरे दुवा देत राहायची. आईचा ईद मुबारकझाला न् झाला तोच आम्ही बाहेर पळायचो.
गल्लीतील प्रत्येक घरात जाऊन ईद मुबारकचा सलाम करायचो. खालाजान असो की मावशी, खालू हजत असो की मामा, खुशिर्द आपा असो की गोदावरी ताई. सगळे मोठ्या प्रेमाने आमचा ईद मुबारकस्वीकारायचे. शंकरच्या आजोबाला गल्लीतले सगळे लहान-थोर आजोबाच म्हणायचे. जख्ख म्हातारा माणूस. निजामच्या काळात वावरलेला. जाड भिंगाचा चष्मा आणि हातात काठी नसेल तर त्यांना एक पाऊल टाकता येत नसे. त्यांना आवर्जून ईद मुबारककरायला आम्ही जायचो. 
वाचा : बौद्धिक मैफली मुसलमानात का नाहीत?
वाचा : अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा
ईदीची हूरहूर
आजोबा आम्हाला जवळ घ्यायचे. आलिंगन द्यायचे आणि न चुकता हातावर दहा पैसे ठेवायचे. दहा पैसे घेण्यासाठी गल्लीतील सगळी पोरं त्या दिवशी आजोबांना ईद मुबारककरायची. अशोक, लता यांच्या घरी ईद नसायची, तरी तेही जायचे. दहा-दहा पैसे मिळवायची मौज लुटायचे. आजोबा खूप प्रेमळ होते. दसर्‍याला आम्ही त्यांना आपट्याची पाने देऊन नमस्कार करायचो. ते आम्हाला आशीर्वाद द्यायचे.
आजोबांचे डोळे अधू झाले होते. ते चष्मा लावत असले तरी त्यांना दिसत नसे. तरीपण ईदचा चांद ते बघायचे! लगेच वसंत वाण्याकडे जाऊन दोन-तीन रुपयांचे दहा-दहा पैशाचे नाणे घेऊन यायचे. ईदच्या दिवशी आम्हा मुलांना ईदी दिलीच पाहिजे अशी जणू त्यांच्यावर सक्तीच होती. शंकरचे आजोबा वारले तेव्हा सार्‍या गल्लीने सुतक पाळले होते. मोठे लोक त्यांना गांधीबाबाम्हणायचे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा कोणी घेतली नाही !
शेवाया आणि शीर खोरमा
ईदच्या दिवशी वडील संपूर्ण दिवस घरीच थांबायचे. सगळे एकत्र बसून शीर खोरमाप्यायचो. आईच्या सारखा शीर खोरमागल्लीत कोणाच्याच घरी होत नसे. वडिलांचे मित्र त्यांना भेटायला यायचे. स्वयंपाकघरात बसून आई शीर-खोरम्याच्या वाट्या भरून एका तबकात द्यायची. आम्हाला सांभाळून न्यायला सांगायची. ती लोकांसमोर येत नसे. हे काम आम्ही आनंदाने करीत असू. ईदच्या दिवशी आमची आई, क्वचितच स्वयंपाकघराच्या बाहेर पडलेली दिसायची.
रोजगारासाठी मुंबईला गेलेला फैयाज यायचा. त्याचा रुबाब दांडगा. त्याचे कपडे भारी असायचे. चमचम करणारे. पायात बूट, पायमोजे, हातात दोन अंगठ्या, कानांत अत्तराचे बोळे, अत्तरही भारी. त्याचा सुगंध सर्वत्र दरवळायचा. आमच्या बाबांना तो भेटायला यायचा. शांत बसायचा. मुंबईत अद्याप घर मिळालं नाही. ते मिळालं की बायकोला घेऊन जाईन.म्हणायचा. विलायत सैन्यात होता. तोही आवर्जून यायचा. तो तगडा गडी.
उत्तर भारतात कोठेतरी त्याचा कँप होता. त्याची भाषा काहीशी वेगळी वाटायची. तो नोकरीला लागल्यापासून त्याच्या घरातील दैन्य संपले होते. ह्या लोकांना आमच्या वडिलांबद्दल नितांत आदर होता. कदाचित, अडचणीच्या काळात त्यांनी मदत केली असावी. आमच्या वडिलांनी आम्हाला त्याविषयी कधी काही सांगितले नाही.
वडील सरकारी बांधकामाचे ठेकेदार होते. त्यामुळे अनेक सरकारी अधिकारी त्यांच्या ओळखीचे होते. त्यांपैकी काहीजण यायचे. ते आले की वडील त्यांचेही आगतस्वागत करायचे. गल्लीतील बुजुर्ग मंडळी आली की ती बराच वेळ थांबायची. सगळे शीर-खोरमाखायचे. आईच्या हाताला चव होती.
अशोक, सैफ, खलील, शौकत आणि दिलीप ही आमची मित्रमंडळी. आईच्या हातचा शीर-खोरमा खाऊ घालण्यासाठी मी त्यांना बोलावून आणायचो. मजेत खायचो. भावाचे मित्र वेगळे. क्रिकेट खेळणारे. हुशार. सगळे यायचे. पण आईच्या मैत्रिणी नसायच्या! का बरे? त्या वयात त्याचे कारण लक्षात येत नसे. माझी आई जशी अकडून पडलेली असायची, तशाच त्याही आपापल्या घरात अकडून पडलेल्या असणार. त्या कश्या येतील?
ईदची सकाळ भुर्रकन निघून जायची. एरवी न दिसणारा एखादा नवल-पक्षी दिसावा अन् डोळे भरून पाहणेही होत नाही तेवढ्यात तो अदृश्य व्हावा, तशी ही सकाळ. कधी आली, कधी गेली लक्षातच यायचे नाही. दुपार मात्र रोजच्यासारखीच वाटायची. अंगावर नवे कपडे असायचे तेवढाच काय तो फरक. तेही मळू लागायचे.
दुपार झाली की जेवण वाढले जायचे. आम्ही सगळे बसायचो. आई वाढायला. ती आग्रह करून खाऊ घालायची. मटन, चिकन असायचे. आम्ही ताव मारायचो. सकाळपासून गोड खाल्लेले. त्याला या तिखट जेवणाचा उतारा. शीर-खोरम्याच्या वाट्या देता देता आईने स्वयंपाक केलेला असायचा.
तिने शीर-खोरमाकधी खाल्ला, हे आम्हाला कळायचे नाही. खाल्ला की नाही, याची विचारपूसही नसायची. दुपारी आमचे जेवण झाल्यानंतर ती एकटीच स्वयंपाकघरात जेवत असे. तिला पान खायची सवय होती. तेवढे मात्र ती तब्येतीने करायची. नंतर ती भांडे धूत बसायची. आम्ही हुंदडायला बाहेर. दुपारनंतर शेजार-पाजारच्या बाया घरी यायच्या. सगळ्याजणी आईला खालाजानम्हणायच्या. गल्लीतील गरिबांची यादी तिला पाठ होती.
आम्हाला हाक मारून बोलावून घ्यायची व त्यांच्यासाठी जेवण आणि शीर-खोरमानेऊन द्यायला लावायची. वडिलांकडे येणार्‍या-जाणार्‍यांचा राबता दिवसभर चालायचा. आईला वारंवार उठून शीर-खोरम्याच्या वाट्या भरून द्याव्या लागायच्या. ती विना तक्रार राबत राहायची. सगळी कामे ती एकाच वेळेस आणि व्यवस्थित करायची. असरच्या नमाज़नंतर ती परत स्वयंपाकाला जुंपली जायची.
वडील संध्याकाळी मग़रिबची नमाज अदा करायला मस्जिदीत जायचे. ते आले की दस्तरखान तयार असायचे. पुन्हा तोच शिरस्ता. रात्रीचे जेवण झाले की, आमची अंथरूणं टाकली जायची. आम्ही धिंगाणा करीत झोपून जायचो. दिवसभराच्या कामाने ती थकलेली असायची. तशात ती रात्री कधी जेवायची, आम्हाला कळायचे नाही. तिच्या डोळ्यांत झोप असायची अन् समोर भांड्यांचा डोंगर. ती घाशीत बसायची!
आमची ईद व्हायची, आईवर कामाचे सगळे ओझे टाकून! ती ते बिनतक्रार करायची. आम्ही खूष झालेले पाहून अल्लाहला धन्यवाद द्यायची. माझ्या घरची ईद माझ्या प्रिय आईला राबवून घेत होती!
वाचा : इस्लाम : ज्ञात आणि अज्ञातांचा शोध
वाचा : ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी
तिची अंगठी
आई खूप राबली. धुराच्या चुलीपुढे बसून तिचे डोळे गेले. ती म्हातारी झाली. घरात सुना आल्या, नातवंडे हाताला आली, हात हलकी करणारी माणसं घरात वावरू लागली. पण अब्बाजान निघून गेले. अब्बाजान जाताच ती खचली. तिला काम होईना. ईदच्या दिवशी ती गुमान बसून राहायची. आमच्या लहानपणीची ती लगबग नाही, धावपळ नाही. सारं सुनं-सुनं वाटायचं. माझी आई आजारी पडत गेली. तिला कॅन्सर निघाला. ऐकू येईना, चालता येईना, बोलता येईना. हत्तीचं बळ असणारी माझी आई, एखादं गाठोडं ठेवल्यासारखी गुमान पडून राहायची!
ईदच्या दिवशी न चुकता मी तिच्याकडे जायचो. ईद मुबारककरायचो. ती आवेगाने मला जवळ घ्यायची, कुरवाळायची. मनातल्या मनात आशीर्वाद द्यायची. अशाच एक ईदच्या दिवशी मी तिला सलाम केला. ईद मुबारकम्हणालो. तिने चाचपत माझा हात धरला. मीच असल्याची खात्री करून घेतली. स्पर्शाने माणसे ओळखायचे ती शिकली होती!
थरथरत्या डाव्या हाताने, तिच्याच उजव्या हातातील अंगठी काढण्याचा ती प्रयत्न करू लागली. मला काही कळेना. तिच्या अशक्त हाताने ती अंगठी निघणार नव्हती. मी राहू देअसे खुणविले. पण ती ऐकायला तयार नव्हती. बहिणीने मदत केली. ती अंगठी काढली. ती माझा हात चाचपू लागली. परत एकदा खात्री करून घेतली. अस्थिपंजर हातांनी तिने माझ्या बोटात ती अंगठी अडकवली. हातांनी माझे डोके शोधले. मी मान खाली वाकविली. तिने अत्यंत प्रेमाने माझे डोके कुरवाळले. एक उसासा सोडला. तिच्या कृश आणि सुरकुतल्या चेहर्‍यावर समाधान दिसत होते!
माझी थोरली बहीण म्हणाली, ‘ही अंगठी आईच्या लग्नात तिच्या आईने दिली होती. आपली आई तिच्या घरात सर्वात धाकटी होती. आपल्या घरात तू सर्वात धाकटा आहेस. तुला देण्याची इच्छा तिने बोलून दाखविली होती. आज ती पूर्ण झाली.
मी त्या अंगठीकडे आणि अस्थिपंजर झालेल्या माझ्या आईकडे पाहत राहिलो. आई आयुष्यभर आमच्यासाठी राबली. देण्यासारखे होते ते सगळे तिने आम्हाला दिले. आता ती काहीच करू शकत नव्हती. देण्यासारखी तिच्याकडे होती हातात एक अंगठी. तीही तिने आपल्या लाडक्याला देऊन टाकली.
काही दिवसांनी आई निघून गेली. आजही दर वर्षी ईद येते. ईदच्या दिवशी मी आवर्जून ती अंगठी घालतो. आईच्या ज्या हातांनी असंख्य कष्ट केले, त्या हातांचा मला स्पर्श जाणवतो आणि चाचपडणार्‍या हातांनी दिलेले आशीर्वाद बहरून येतात.

(सदरील लेख ईद या शीर्षकाखाली प्रकाशित झालेला आहे.)
सौजन्य :  नाते (2006)
लेखक – अमर हबीब
पान क्रमांक 13 ते 21
परिसर प्रकाशन, अंबाजोगाई

लेखकाचा मूळ पत्ता
अंबर, यादव हॉस्पिटल शेजारी, हौसिंग सोसायटी,
अंबाजोगाई- ४३१५१७ जिल्हा बीड 
मो. 8411909909
मेल- habib.amar@gmail.com


Twiter@kalimajeem

FB/Kalim Ajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: रमज़ान ईद आणि आईची लगबग
रमज़ान ईद आणि आईची लगबग
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiMgUw3Y7lNw3HsR9LmlGMkTxewp3gkD3Aro-n6WDGTd_XrKZDUWoDQgdORh2LnKKZq9S-vVTjiLI_svRRrX-k4ZhMzMrcsZQ8_JzAd23eP85Crj9f28Om00OfNdEPdD7s7WJFwSZ54LTuI/s640/Eid+2020.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiMgUw3Y7lNw3HsR9LmlGMkTxewp3gkD3Aro-n6WDGTd_XrKZDUWoDQgdORh2LnKKZq9S-vVTjiLI_svRRrX-k4ZhMzMrcsZQ8_JzAd23eP85Crj9f28Om00OfNdEPdD7s7WJFwSZ54LTuI/s72-c/Eid+2020.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/05/blog-post_76.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/05/blog-post_76.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content