अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

अंबाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला मराठवाडीअसं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता. 
सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत. 
मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र, अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू, समाध्या, मंदीरे, मस्जिद, ख्रिश्चन स्मशानभूमी, सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे.
अंबाजोगाई शहरावर आणि हैदराबाद संस्थानावर जवळपास सव्वादोनशे वर्षे निजामची सत्ता होती, असा इतिहास सांगतो. तसं पाहीलं तर हैदराबाद संस्थानचा विस्तार हा आज अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या तीन राज्यातील काही प्रदेशावर होता. यात महाराष्ट्रातील संपूर्ण मराठवाडा, कर्नाटकातील बीदर, रायचुर, गुलबर्गा आणि आंध्रप्रदेशातील आदिलाबाद, करीमनगर, निझामाबाद, वारंगल, हैदराबाद, कलगोंडा आणि अलफ ई बल्र्दा यांचा समावेश होता.
साधारणतः ३१ जुलै १७२४ ते १७ सप्टेंबर १९४८ अशी सलग २२५ वर्षे हे हैदराबाद संस्थान अस्तित्वात होते. मराठवाडा, गुलबर्गा आणि हैदराबाद या संस्थानचा कारभार पाहण्यासाठी तीन स्वतंत्र निझामांची नियुक्ती करण्यात येत असत आणि या तीनही विभागावर नियंत्रण हैदराबाद येथून पंतप्रधान करीत असत.

१८६०च्या दशकाच्या काळात हैदराबाद संस्थानचे पंतप्रधान म्हणून सालारजंग हे काम पाहात होते. त्यांनी संस्थानच्या विकासाच्या दृष्टीनं अनेक विकासात्मक कामे केली. 
विशेषतः संस्थानमधील विभागात आज ज्या ऐतिहासिक वास्तू दिमाखाने उभ्या आहेत, त्या सर्व पंतप्रधान सालारजंग यांच्याच कार्यकाळात झाल्या असल्याचे सांगितलं जातं. या कालावधीत मराठवाडा विभागावर मीर महेबुब अलीहा सहावा निजाम हा १८६१ ते १९११ या कालावधीत काम पाहात होता. अंबाजोगाई शहरात  आज उभ्या असलेल्या आनेक दिमाखदार इमारती याच कालावधीत निर्माण झाल्याचं सांगितलं जातं.
हैदराबाद संस्थानविरोधात विरोधात १९३८ पूर्वी चाळीसएक वर्षांपूर्वी पासून लोकजागृतीच्या माध्यमातून बंड झाले होते. मात्र या चळवळीला खरी सुरुवात १९३८ साली स्वामी रामानंद तीर्थ यांनी महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. १९३८ ते १७ सप्टेंबर १९४८ अशी सलग १० वर्षे ही हैदराबाद मुक्ती संग्रामाची चळवळ चालली. 
१९३८ पूर्वी या चळवळीचे नेतृत्व लोकमान्य टिळकांनी केलं होतं. अंबाजोगाई येथे लोकमान्य टिळकांचे समर्थक भाऊसाहेब चौसाळकर, नारायणराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली भगवानराव पुराणीक,  डॉ. व्यंकटराव जोशी,  रघुनाथराव नागापूरकर, किशनराव कुर्डुकर, राम कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वदेशीच्या चळवळी सुरु केल्या होत्या. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर या चळवळीचे नेतृव पुढे महात्मा गांधी यांनी स्वीकारले.
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाईत चळवळीची खरी सुरुवात झाली. स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांच्या उपस्थितीत १९३५ साली योगेश्वरी मंदीर परीसरातील शाळेच्या प्रांगणात "परदेशी कपड्यांची होळी" करण्यात आली. पुढे स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, नृसिंह राव भातांब्रेकर, रावसाहेब देशमुख,  आचार्य ग. धो. देशपांडे, व्ही. डी. देशपांडे, श्रीनिवास खोत, धोंडीराम पवार, वामनराव ठाकूर, अँड. आर. डी. देशपांडे,  चंदुलाल बिहारीलाल गुप्ता, राम मुकद्दम, अशा नव्या लोकांनी ही चळवळ पुढे नेली.
हैदराबाद संस्थानात या काळात मराठी, तेलुगु आणि कन्नड या तीन भाषा बोलणारे नागरीक होते. यांची संख्या तब्बल ८५ टक्के होती. तर मुसलमानांची संख्या फक्त १५ टक्के होती, मुस्लिम दखनी होलत असे. निजाम राजवटीमुळे या १५ टक्के मुस्लिमांना सरकारी सेवेत ८० टक्के जागा होत्या. 
एवढेच नव्हे तर ८५ टक्के हिंदुंच्या शिक्षणासाठी उर्दु ही एकमेव भाषा होती. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे बंड हे तसे दुहेरी बंड होते. हैदराबाद संस्थानवर राज्य करणारा निजाम हा पहिला शत्रू तर हिंदुस्थानावर राज्य करणारा ब्रिटिश हा दुसरा शत्रू असे हे दुहेरी बंड होते.
मराठवाडा विभागातील अंबाजोगाई त्याकाळी मोमीनाबादम्हणून ओळखलं जात होतं. या ठिकाणी निजाम सैन्यदलाचा तळ असल्यानं त्याकाळी या विभागाला जिल्ह्याचा दर्जा होता. त्यामुळे साहाजिकच या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी मोठमोठ्या कार्यालयीन इमारती, सैन्यदलातील अधिकाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थाने होती.
पोहण्यासाठी तलाव, गोळीबारचा सराव करण्यासाठी बंकर, दळणवळण व्यवस्थेसाठी पोस्ट ऑफीस, आपसी तंटे मिटवण्यासाठी जिल्हा न्यायालय, घोडदळासाठी स्वतंत्र तळ, घोड्याच्या निवासासाठी स्वतंत्र बंकर, घोड्याच्या देखभाल आणि उपचारासाठी स्वतंत्र दवाखाना, पोलीस स्टेशन, पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था अशा कितीतरी सोयी-सुविधा या ठिकाणी करुन ठेवण्यात आल्या होत्या. यापैकी अनेक वास्तू मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीच्या खुणा दाखवत आजही दिमाखाने उभ्या आहेत.
सैन्यदलाचे तळ असल्यानं अंबाजोगाईला विशेष महत्त्व होतं. सैन्यदलाच्या देखभालीसाठी, विशेषतः कोणी परकीय शत्रू या तळावर चाल करुन येतो का, याची टेहाळणी करण्यासाठी या शहराच्या मध्यभागी  प्रचंड महाकाय बुरुज बांधण्यात आला होता. या बुरुजावर जाऊन टेहाळणी करण्यासाठी बुरुजाच्या मध्यभागी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 
पुढे हैदराबाद संस्थानमध्ये त्याकाळी होणाऱ्या प्रमुख घटना समजण्यासाठी १९४२ साली इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावल्यानंतर या बुरुजावर एक मोठा रेडिओ ठेवण्यात आला. दररोज सायंकाळी या रेडिओवरुन हैदराबाद संस्थानमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती निजाम राजवटीतील प्रमुख केंद्र असलेल्या हैदराबाद येथून दिली जायची.
निजाम सरकारातील सैन्यदलातील अधिकारी, निजाम संस्थानचे कर्मचारी व प्रमुख जनतेला या घडामोडी ऐकण्यासाठी परवानगी असायची. हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा तीव्र झाल्यानंतर हे रेडिओचे केंद्र उध्दवस्त करण्यासाठी त्याकाळी धोंडीराम पवार, वामनराव ठाकूर, श्रीनिवास खोत व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी उठाव केला व हे केंद्र नष्ट केल्याचा उल्लेख मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासात आहे.
अंबाजोगाई शहरात त्याकाळी इ.स. १८१३ ते १९४८ या कालावधीत हैदराबाद संस्थानच्या रक्षणासाठी निजामाने आपल्या सैन्य दलाची व्यवस्था एकदम चोख आणि नियोजनबद्ध ठेवली होती. हे सैन्यदल "हैदराबाद काँन्टिजेंट" या नावानं ओळखलं जात असत. 
या काँन्टिजेंटमध्ये ५०० घोडदळ आणि पायदळाचे सैन्य असे.  आज ज्या परिसरात स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय अध्यापक महाविद्यालय, कृषी महाविद्यालयाची इमारत, फालोअर्स क्वार्टर, चांदमारी, कंपनी बाग, जनावरांचा दवाखाना परीसर आहे. या परिसरात निजाम सैन्यदलाचे भरती केंद्र, प्रशिक्षण केंद्र, रेसिडेंट विभाग अशी  विभागवार आखणी करण्यात आली होती. 
वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीसरात घोडदळ, शासकीय अध्यापक महाविद्यालय परीसरात अधिकाऱ्यांची निवाससस्थाने, फालोअर्स क्वार्टर विभागात सैनिकांची घरे, चांदमारी परीसरात बंकर (फायरींग प्रशिक्षण केंद्र), जनावरांच्या दवाखाना परीसरात स्वतंत्र घोड्यांचे हाँस्पिटल, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी स्वतंत्र ख्रिश्चन स्मशानभूमी तर कंपनी बाग परीसरात आधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र अद्यावत स्विमिंग टँक आणि अधिकारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या विरंगुळ्यासाठी स्वतंत्र बाग अशी ही रचना होती.
निजाम राजवटीत सुद्धा सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी १८८४ साली सर्वप्रथम येथे न्यायालय सुरु करण्यात आलं होतं. खोलेश्वर मंदिरातील सभागृहात सुरुवातीला हे न्यायालय चालवले जात असे. यास जिल्हा न्यायालयाचा दर्जा होता. या न्यायालयात त्यावेळी ४१२ खेड्यांची प्रकरणं चालत असत. यासाठी याच काळात एक स्वतंत्र इमारत बांधण्यात आली होती. 
अनेक दरवाजे असलेल्या या इमारतीचे वैशिष्ट्य असे होते की, आतून कोणत्याही दरवाजापासून बंद करण्यास सुरुवात केली तरी फक्त एकच दरवाजा बाहेरील कुलूप लावण्यासाठी उघडा राहायचा. याच इमारतीत पुढे सरकारी न्यायालयाचे कामकाज चालले. पुढे ही इमारत २०१२ साली या ठिकाणी स्वतंत्र नवी इमारत बांधण्यासाठी पाडण्यात आली.
अंबाजोगाई येथे त्याकाळी निजाम सरकारची महत्त्वाची कार्यालये होती. या सर्व कार्यालयांचा व्यवहार सुरळीतपणे चालावा, वरीष्ठ व कनिष्ठ कार्यालयाशी ही सर्व कार्यालये पत्रव्यवहाराच्या माध्यमातून जोडली जावीत म्हणून या ठिकाणी १८९८ साली पोस्ट कार्यालयाची स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. 
अंबाजोगाई शहरातील पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय, सबजेल, हायस्कूल, पब्लिक क्लब, बीअँडसी या देखण्या इमारती ही साधारण याच कालावधीत बांधण्यात आल्याचं सांगितलं जातं.
निजामकाळात अंबाजोगाई हे तसे महत्त्वाचं शहर होतं. १८४८ साली या गावची लोकसंख्या तशी वीस हजाराच्या आसपास होती. या गावातील प्रत्येक विभागात पाण्याचे स्वनिर्मित साठे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतं. सैन्यदलाचं तळ असलेल्या विभागात तर दोन मोठी तळी आणि जवळपास वीस विहिरी असा प्रचंड पाणीसाठा या विभागात होता. याशिवाय जुन्या शहरातील प्रत्येक विभागात प्रत्येक मंदीराजवळ स्वतंत्र चार-दोन कुंड आणि पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र तीर्थांचीही सोय असायची. पाण्याचं योग्य नियोजन निजाम काळातील अंबाजोगाईत होते याची बरीच उदाहरणे देता येतील.
निजाम हा पंथाने सुन्नी मुसलमान होता. त्या काळातील जातनिहाय आकडेवारीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेला आहे. मुस्लिम ११टक्के, दलित १८टक्के तर हिंदू ७१ टक्के अशी ही संख्या होती. असे असल्यामुळे निजामाने राज्यात सर्वधर्मसमभावाचे धोरण त्याकाळी राबविले होते. धर्मांतराची मोहीम निजामाने राबवल्याचा उल्लेख सापडत नाही, तसेच हिंदुंचे एकही देवस्थान त्यांनी पाडले असल्याचा उल्लेख नाही. उलट अनेक हिंदू देवस्थानासाठी निजामाने आर्थसाह्य केल्याचा उल्लेख आढळतो. 
शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान यांनी तर जगप्रसिद्ध वेरुळ-अजिंठा लेण्यांच्या संरक्षणासाठी १९१४ साली स्वतंत्र पुराण वस्तू संशोधन खात्याची निर्मिती ही केल्याचा उल्लेख आहे. डॉ. मजदानी हे या विभागाचे प्रमुख होते आणि यांच्याकडे अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी मंदिर, खोलेश्वर मंदिर, हत्तीखाना, मुकुंदराज समाधी मंदिर, संकलेश्वर मंदिर, दासोपंत समाधी, जुन्या शहरातील गणेश मंदिर यांचा समावेश होता. निजामाने हिंदू देवतांचा आदर करीत सांस्कृतिक जीवनाचा मौलिक ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्न केले.
१९३८ साली सुरु झालेली मराठवाडा मुक्ती संग्रामाची चळवळ १९४८ साली अंतीम टप्प्यात आली. १८ सप्टेंबर रोजी भारतीय सैन्यदलाला जेंव्हा पोलीस अँक्शन करण्याचे आदेश मिळाले तेंव्हा भारतीय सैन्य दलात आणि निजाम सैन्य दलात लढाई होईल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र त्यावेळी अंबाजोगाई केंद्रावर नियंत्रण ठेवणारे निजाम राजवटीतील डेप्युटी कलेक्टर नझर अली रझवी यांनी समयसुचकता दाखवली. 
त्यांनी सैन्य दलातील अधिकारी आणि शहरातील जबाबदार नागरिक यांची तातडीने एक बैठक बोलावली. संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली आणि आपण त्यांच्याशी लढलो तर विनाकारण रक्तपात होईल तेंव्हा भारतीय सैन्यास प्रतिकार न करता पांढरे निशान दाखवून शरणागती स्वीकारावी असे सर्वानुमते ठरले. 
भारतीय सैन्यासमोर स्वतः कॅप्टन रझवी यांनी निजाम राजवटीतील सर्व सैन्यदलासोबत शरणागत पत्करली. कँप्टन नझर अली रझवी यांच्या पुढाकाराने आणि समंजसपणामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामाची ही चळवळ कसल्याही प्रकारचा रक्तपात न होता अंबाजोगाई येथे थांबली.
मराठवाडा मुक्ती संग्रामाची चळवळ संपून आज जवळपास ७० वर्षाचा कालावधी पूर्ण होतो आहे.  मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीच्या १८६० ते १९०० या चाळीस वर्षाच्या कालावधीत बांधण्यात आलेल्या इमारतींच्या माध्यमातून या काळातील अनेक आठवणी अंबाजोगाईकरांच्या मनात आजही घर करुन आहेत. या एतिहासिक इमारतींचे जतन होणे गरजेचे आहे.

सुदर्शन रापतवार, अंबाजोगाई
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
मेल-sudarshanrapatwar@gmail.com
(सर्व फोटो सुदर्शन रापतवार)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा
अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjN5TEa8FXbOuCtqf9QA1GrT_awxladdxPtafA8U5mIZKcudEZvchmX1Z7eyyNJwurxkvgOGKn4FJplJlB6cj2hodZZ7Sq6i_TGqV-OO2V752HKhFXxdlu8HnIfyIVGnqTKCUcFhT4il_qW/s640/Ambajogai.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjN5TEa8FXbOuCtqf9QA1GrT_awxladdxPtafA8U5mIZKcudEZvchmX1Z7eyyNJwurxkvgOGKn4FJplJlB6cj2hodZZ7Sq6i_TGqV-OO2V752HKhFXxdlu8HnIfyIVGnqTKCUcFhT4il_qW/s72-c/Ambajogai.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/09/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/09/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content