खिलाफतीच्या बदल्यात गोरक्षण?


 
महात्मा गांधी यांच्या यांच्या जन्माला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने जगभरा विषेश कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहेत. भारतातही गांधींचा हा जन्मसोहळा  कृतज्ञता वर्ष म्हणून साजरा केला जात आहे.  खिलाफत चळवळीलादेखील १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने  गांधीजींच्या आत्मकथेतील  एक प्रकरण  नजरिया वाचकांसाठी देत आहोत.
राष्ट्रीय सभेतर्फ पंजाबातील डायरशाहीची चौकशी चालली होती. या सुमारालाच माझ्या हाती एक जाहीर निमंत्रण आले. त्यावर मरहूम हकिमसाहेब व भाई असफअली यांची नावे होती. श्रद्धानंदजी हजर राहायचे आहेत, असाही उल्लेख होता. मला असे पुसट स्मरण आहे, की ते उपाध्यक्ष होते. खिलाफतीसंबंधी नवीन उपस्थित झालेल्या परिस्थितीचा विचार करण्यासाठी व युद्धसमाप्तीनिमित्त व्हावयाच्या उत्सवामध्ये भाग घ्यावा किंवा नाही, याचा निर्णय करण्यासाठी दिल्लीमध्ये हिंदू-मुसलमानांची एक सभा व्हायची होती. तिचे ते निमंत्रण होते. ही सभा नोव्हेंबर महिन्यामध्ये होती असेही स्मरते.
निमंत्रणपत्रिकेमध्ये असा उल्लेख होता, की सदर सभेत खिलाफतीच्या प्रश्नाचा विचार होईल, एवढेच नव्हे तर गोरक्षणाच्या प्रश्नाचीही चर्चा होईल; आणि गोरक्षण साधण्याची ही उत्तम संधी आहे. मला हे वाक्य: झोंबले. त्या निमंत्रणपत्रिकेचे उत्तर देताना मी हजर राहण्याचा प्रयत्न करीन असे लिहिले. त्याबरोबर आणखी असेही लिहिले, की खिलाफत व गोरक्षण एकत्र करून त्यांना परस्परातीत सौद्याचे स्वरूप देऊ नये, तर प्रत्येकाचा विचार त्याच्या स्वतंत्र गुणदोषानुसार व्हावा.
सभेला मी हजर राहिलो. समाज बरा जमला होता. पुढे-पुढे जशी हजारांनी गर्दी जमत असे, त्या मासल्याची मात्र ही सभा दिसली नाही. या सभेता स्वामी श्रद्धानंदजी हजर होते. त्यांच्याबरोबर मी वरील विषयासंबंधाने बोलणे करून घेतले. त्यांना माझे म्हणणे पसंत पडले व ते सभेपुढे मांडण्याचे काम त्यांनी माझ्यावरच सोपविले. हकीमसाहेबांबरोबरही मी बोलून घेतले. माझे म्हणणे एकढेच होते, की दोन्ही प्रश्नांचा विचार त्या-त्या बाबीच्या गुणदोषानुसार स्वतंत्रपणे व्हावा. खिलाफतीचा प्रश्नामध्ये जर तथ्य असेल, त्या बाबतीत सरकारकडून जर खरोखरच अन्याय घडत असेल, तर मुसलमानांना पाठिंबा देणे हिंदूंचे कर्तव्य आहे. मग त्यांनी त्याच्याबरोबर गोरक्षण जोडू नये. अशा तऱ्हेची कसलीही अट घालणे हिंदूना शोभणार नाही.
खिलाफतीच्या कामी मिळणाऱ्या मदतीची किंमत म्हणून मुसलमानांनी गोवध बंद केला तर त्यांनाही ते शोभणार नाही. शेजारधर्म म्हणून किंवा आपण एकाच भूमीची लेकरे म्हणून, आणि हिंदूंच्या भावनांना मान देण्यासाठी त्यांनी स्वतंत्रपणे गोवध बंद केला तर ते चांगले दिसेल. तसे करणे त्यांचे कर्तव्यही आहे. परंतु तो स्वतंत्र प्रश्न आहे. जर हे त्यांचे कर्तव्य असेल व तसे ते समजत असतील, तर मग हिंदू खिलाफतीच्या कामी मदत करोत अथवा न करोत, मुसलमानांनी गोवध बंद केला पाहिजे. अशा तऱ्हेने दोन्ही प्रश्नांचा विचार पृथक झाला पाहिजे, व म्हणून सभेमध्ये फक्त खिलाफतीच्या प्रश्नाची चर्चा व्हावी, असा मी माझा युक्तिवाद मांडला. सभेला तो योग्य वाटला. गोरक्षणाचा प्रश्न चर्चेला निघाला नाही. पण मौलाना अब्दुल बारी यांनी सांगून टाकले की,हिंदूंची खिलाफतीला मदत होवो किंवा न होवो, आपण एका मुलखातील असल्यामुळे मुसलमानांनी हिंदूंच्या समाधानार्थ गोवध बंद केला पाहिजे.” एके वेळी असे दिसू लागले होते, की खरोखरच मुसलमान गोवध बंद करतील.
कित्येकांची अशी सूचना होती, की पंजाबचा प्रश्नही खिलाफतीच्या जोडीला घ्यावा. मी त्या बाबतीत आपला विरोध दर्शविला. पंजाबचा प्रश्न स्थानिक स्वरूपाचा आहे. पंजाबच्या दुःखाचे निमित्त करून आपण सबंध साम्राज्याचा ज्याच्याशी संबंध पोचतो अशा तहाच्या उत्सवापासून दूर राहू शकत नाही. असल्या बाबतीत खिलाफतीच्या जोडीला पंजाबचा प्रश्न नेऊन बसविल्याने आपण अविवेकाच्या आरोपाला पात्र होऊ. हे माझे म्हणणे सर्वांना पसंत पडले.
सभेत मौलाना हसरत मोहानी होते. त्यांची माझी ओळख पूर्वीच झाली होती. पण ते कसे लढवय्ये आहेत हे याच वेळी माझ्या प्रत्ययास आले. येथपासूनच आमच्यामध्ये मतभेद होण्यास सुरुवात झाली व तो अनेक बाबतीत शेवटपर्यंत कायम राहिला.
अनेक ठरावांपैकी एक असा होता, की हिंदू-मुसलमान सर्वांनी स्वदेशी व्रताचे पालन करावे, व त्यासाठी परदेशी कापडाचा बहिष्कार करावा. खादीचा अद्याप पुनर्जन्म झाला नव्हता. हसरतसाहेबांना हा ठराव मान्य होण्यासारखा नव्हता. त्यांना तर इंग्रजी साम्राज्याने खिलाफतीच्या बाबतीत न्याय दिला नाही, तर त्याबद्दल सूड उगवायचा होता. म्हणून त्यांनी फक्त ब्रिटिश मालावर शक्य तोपर्यंत बहिष्कार घालावा असे सुचविले. मी एकंदर ब्रिटिश मालाचा बहिष्कार कसा अशक्य आहे व अयोग्यही आहे, यासंबंधीचा माझा नेहमीचा युक्तिवाद मांडला. तो आता सर्वांच्या माहितीचा झालेला आहे. मी आपल्या अहिंसा वृत्तीचेही प्रतिपादन केले. सभेवर माझ्या म्हणण्याचा खोल परिणाम झालेला दिसला.
हसरत मोहानींचे भाषण ऐकताना लोक असे हर्षनाद करीत होते की मला वाटले, की माझ्या पुंगीचा आवाज यापुढे कोण ऐकतो? पण मी माझ्या धर्माला जागले पाहिजे, मी आपला धर्म लपवून ठेवता कामा नये, असे समजून मी बोलायला उठलो. लोकांनी माझे भाषण खूप लक्षपूर्वक ऐकले. विचारपीठावर तर मला संपूर्ण पाठिंबा मिळाला, व माझ्या पुष्ट्यर्थ एकावर एक भाषण होऊ लागली. पुढाऱ्यांच्या लक्षात आले की, ब्रिटिश मालाच्या बहिष्काराच्या ठरावाचा उपयोग काही व्हायचा नाही, तो उपहासाला मात्र कारण होईल. साऱ्या सभेमध्ये असा मनुष्य हुडकून काढावा लागला असता, की ज्याच्याजवळ कसलीही ब्रिटिश वस्तू नाही. जी गोष्ट करणे सभेला हजर राहिलेल्या लोकांनाही अशक्य होते, ती गोष्ट करण्याच्या ठरावापासून फायदा होण्याऐवजी नुकसानच होणार हे पुष्कळांच्या लक्षात आले.
“तुमच्या विदेशी वस्त्राच्या बहिष्काराच्या ठरावाने आमचे समाधान होण्यासारखे नाही. आम्ही आपल्याला पाहिजे तेवढे सर्व कापड पैदा करणार केव्हा आणि विदेशी वस्त्राचा बहिष्कार साध्य होणार केव्हा? आम्हाला तर असे काही तरी पाहिजे, की जेणेकरून ब्रिटिश लोकांवर ताबडतोब परिणाम होऊ शकेल. तुमचा बहिष्कार राहू द्या, पण त्याहून अधिक परिणामकारक असे काही तरी आपण आम्हाला दाखविले पाहिजे.असे मौलाना मोहानी आपल्या भाषणात म्हणाले. मी ते भाषण ऐकत होतो. विदेशी वस्त्र बहिष्कारापलीकडे काहीतरी अधिक व नवीन असे दाखवून देणे जरूर आहे असे मला वाटले. विदेशी वस्त्राचा बहिष्कार ताबडतोब होणार नाही हे मलाही त्यावेळी जाणवत होते. पुरेशी खादी उत्पन्न करण्याची शक्ती आपण मनात आणल्यास आपल्यामध्ये आहे, हे जे माझ्या मागाहून लक्षात आले, ते त्यावेळी समजले नव्हते. नुसत्या गिरण्यांवर भिस्त ठेवल्यास त्या दगा देतील हे मला कळत होते. मौलानासाहेबांनी आपले भाषण पुरे केले, त्या वेळी मी आपला जबाब योजित होतो.
ऊर्दू किंवा हिंदी शब्द मला सुचेना. अशा तऱ्हेच्या खास मुसलमानांच्या बैठकीमध्ये पूर्वपक्ष उत्तरपक्ष यांनी भरलेली भाषणे करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. कलकत्त्याच्या मुस्लिम लीगमध्ये मी बोललो होतो; पण ते अवघ्या काही मिनिटांचे व हृदयस्पर्शी असे भाषण होते. पण येथे तर मला विरुद्ध मते असलेल्या समाजाची समजूत घालावयाची होती. पण मी भीडभाड सोडून दिली होती. दिल्लीच्या मुसलमानांसमोर मला अस्सल उर्दूमध्ये आलंकारिक भाषण करावयाचे नव्हते, पण माझ्या म्हणण्याचा सारांश मोडक्यातोडक्या हिंदीत समजावून सांगावयाचा होता. तेवढे मला नीट करता आले. हिंदी-ऊर्दू मिश्रित हीच राष्ट्रभाषा होऊ शकेल याचे ही सभा प्रत्यंतर होती. मी इंग्रजीत भाषण केले असते तर माझे गाडे चाललेच नसते. मौलानासाहेबांनी जे आव्हान दिले ते देण्याचा प्रसंगही आला नसता व मला उत्तरही सुचले नसते.
योग्य हिंदी किंवा ऊर्दू शब्द सुचेना याची मला शरम वाटली, पण मी जवाब तर दिलाच. मला ' नॉन-को-ऑपरेशन' हा शब्द सापडला. मौलाना भाषण करीत असतानाच मला एकसारखे वाटत होते, की ज्या सरकाराशी ते हर तऱ्हेने सहकार्य करीत आहेत, त्या सरकारचा विरोध करण्याच्या बाता व्यर्थ आहेत. तलवारीने विरोध करायचा नाही, त्या अर्थी सहकार्य न करणे हाच खरा विरोध आहे, असे माझ्या मनाने घेतले. व मी 'नॉन-को-ऑपरेशन' (असहकार) शब्दाचा या सभेत प्रथम उपयोग केला. मी आपल्या भाषणात त्याच्या समर्थनपर मुद्दे मांडले. त्या वेळी या शब्दामध्ये काय-काय येऊ शकते त्याची जाणीव मला झाली नव्हती. त्यामुळे मी तपशिलात शिरलो नाही. मी एवढे सांगितल्याचे मला आठवते, की “मुसलमानबंधूंनी आणखी एक ठराव फार महत्त्वाचा असा केला आहे. ईश्वर करो आणि तसा प्रसंग न येवो! पण जर का तहाच्या अटी त्यांच्या विरुद्ध गेल्या तर ते सरकारला मदत द्यायची बंद करतील. मला वाटते, की तसे करण्याचा प्रजेला हक्क आहे. आपण सरकारचे किताब बाळगून ठेवण्यास किंवा सरकारची नोकरी करण्यास बांधलेले नाही. सरकारचे हातून खिलाफतीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नाच्या बाबतीत आपले अनिष्ट आचरले जात असताना आपण सरकारला साहाय्य कसे करावे? म्हणून खिलाफतीचा निकाल आपल्याविरुद्ध गेल्यास साहाय्य बंद करण्याचा आपल्याला हक्क आहे.”
परंतु या गोष्टीचा प्रचार होण्यास यानंतरही अनेक महिने लोटले. कित्येक महिनेपर्यंत तो शब्द सभेच्या अहवालामध्येच गाडलेला राहिला. एका महिन्याने अमृतसरची राष्ट्रीय सभा झाली. तेथे मी सहकार्याच्या ठरावाला दुजोरा दिला. त्यावेळी मला अशी आशा वाटत होती की, हिंदू-मुसलमानांना असहकाराचा प्रसंगच येणार नाही.

माझे सत्याचे प्रयोग
पान -४५३-३५६
नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद
अठ्ठाविसावे पुनर्मुद्रण
एप्रिल-२०११

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: खिलाफतीच्या बदल्यात गोरक्षण?
खिलाफतीच्या बदल्यात गोरक्षण?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEguN_pse4ucFG6Ymu6IOE37bwECP8fU-Q-j9neknZ4Ym7SNPELdRWCr-Nh8niBqz4BQW2pzlR3hUGkT4OJ35GY9T5ptUWyXkPMl8C6gmfUor3u-1hrfIzkRGQYNCV_ruSqnd7WTKVy33RrX/s640/_109025452_gettyimages-514079662.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEguN_pse4ucFG6Ymu6IOE37bwECP8fU-Q-j9neknZ4Ym7SNPELdRWCr-Nh8niBqz4BQW2pzlR3hUGkT4OJ35GY9T5ptUWyXkPMl8C6gmfUor3u-1hrfIzkRGQYNCV_ruSqnd7WTKVy33RrX/s72-c/_109025452_gettyimages-514079662.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/10/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/10/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content