रमजान : आधात्म, श्रद्धा आणि खाद्य पदार्थाची रेलचेल



जानमध्ये स्वत:ची थुंकीसुद्धा गिळायची नसती का हो? दिवसभर पाणीसुद्धा पित नाही का तुम्ही? तुम्ही लोकं रात्रभर खात असता का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे रमजान महिन्यात अमुस्लिम बांधवाकडून हमखास विचारली जातात. हे ऐकून थोडीशी चिडचीड होते, तरीही गैरसमज दूर करण्यासाठी अनिच्छेनं अशास्त्रीय प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात.

कधीकधी उत्तरं देताना स्वत:बद्दल लाज वाटू लागते. कारण, रमजानच्या बाबतीत असलेले गैरसमज अजुनही अमुस्लिमामधून काढू शकलेलो नाही. तर उलटपक्षी केवळ शिरखुर्मा आणि खाऊच्या व्यंजना पुरता रमजान माहिती असतो. क्वचित एखादाच असतो जो मोहल्ल्यात येऊन रमजान समजून घेतो.

तसं सध्या सोशल मीडियामुळे माहितीची देवाण-घेवाण झपाट्यानं वाढलीय. त्यामुळे रमजान, बकरईद, मुहर्रमचं महत्व सांगणारी मॅसेज् सिझनवारी मोबाईलची मेमरी व्यापत असतात. त्यामुळे माहितीत भर पडलीय. याआधी फक्त जाडजूड पुस्तकातच ही माहिती धुळ खात पडायची. या माहितीजालानं अनेकांच्या माहितीत मोठी भर टाकलीय. अजूनही माहिती स्वपुरतीच मर्यादीत आहे.

महिनाभरात मोहल्ल्यात आनंदाचं वातावरण असतं. या महिन्यात घरांत महिला मंडळाचं काम बरंच वाढतं. भल्या पहाटे तीनच्या सुमारास घरातल्या महिलांचा दिवस सुरू होतो. मध्यरात्री होणाऱ्या ‘तहज्जुद’च्या नमाजनंतर महिला सहरीच्या कामाला लागतात. सहरी म्हणजे, रोजा ग्रहण करण्यापूर्वीची न्याहरी किंवा जेवण. त्यासाठी प्रॉपर स्वंयपाक केला जातो.


सहरीची वेळ
स्वंयपाक तयार होताच गाढ झोपलेल्या मंडळींना उठवायची जबाबदारीदेखील गृहणीच सांभाळते. आंघोळी-ब्रश आटोपल्यानंतर सहरीचं जेवण घेतलं जातं. आमच्या लहाणपणी सहरी आटपायला फजरची अजान व्हायची. अर्थात फजरची अजान ही सहरी संपवण्याची प्रमाणवेळ समजली जायची. आता मात्र, रमजानचे विशेष टाईम-टेबल कार्ड पहिल्याच दिवशी वितरीत केले जातात. त्यात सहरी आणि इफ्तारची प्रमाणवेळ दिलेली असते.

योग्य वेळेवर सहरी आणि इफ्तार व्हावीत असा पायंडा आहे.. साधारण साडे-चार पावणेपाचपर्यंत सहरीची वेळ असते. गाढ झोपेतून उठल्यावर जेवण जातं का? हादेखील प्रश्न असतो. त्यामुळे अपरिहार्यपणे सहरी करावीच लागते. झोप आवरली नाही आणि सहरीची वेळ संपली की उपाशीपोटीच रोजा ग्रहण करावा लागतो. मेट्रो शहरात हे टाईमटेबल जरासं वेगळं असतं..

शहरी व्यस्तता लक्षात घेता वेळेत आठ-दहा मिनिटाचा फरक असतो. फजरच्या नमाजनंतर दिवस सुर्यास्तापर्यंत कुरआनचं पढन केलं जातं. महिनाभरात जास्तीत जास्त वेळा कुरआनचं अध्ययन व्हावं असा अलिखीत नियमच असतो. महिनाभरात साधारण तीन ते चार वेळा अख्ख कुरआन वाचलं जातं. तसंच नमाजही किमान पाच वेळा तरी पढन केली जावी.. यालाच इबादत म्हणतात.

लहानपणी मित्रांत जास्तीत-जास्त इबादत कोण करेल याची स्पर्धा आमच्याकडून लावली जायची. आजही घरची ज्येष्ठ मंडळी मुलांमध्ये धार्मिकता रुजवण्यासाठी अशी स्पर्धा लावतात.

घरातली जी मंडळी रोजा नाही त्यांच्यासाठी सकाळचा चहा-नाष्टा वेळेवर देणं ही घरातल्या गृहणीची जबाबदारी.. तसेच त्यांच्यासाठी दुपारचं जेवणही गृहणींना वेळेवर तयार करावं लागतं. नसता सासू-सासऱ्याची दिवसभर कटकट सुरु असते. संध्याकाळ सरता इफ्तारची तयारी गृहणीलाच करावी लागते. इफ्तारच्या अखेर वेळेपर्यंत गृहणी किचनमध्ये स्वंयपाक करत असते.

इफ्तारला कच्च्या (पेंड) खजूराला जास्त महत्व असते. दिवसभराचा रोजा गोड खाऊनच इफ्तार करायचा असतो. खजूर नसले की काहीतरी हलकं खाऊन इफ्तार केला जातो. एखादं खजूर खाऊन दोन घोट पाणी पिणं. त्यानंतर काहीतरी न्याहरी घेणं हा इफ्तारीचा बेसीक नियम आहे. अन्यथा बकाबका खाल्यानं अपचणाचे त्रास सुरु होतात. तसेच रिकाम्या पोटी जास्त पाणी पिल्यानं उलट्या व मळमळ होते.

इफ्तारनंतर एखाद्या तासानं व्यवस्थित जेवायचं असतं. इफ्तारनंतर जेवणाची तयारी शेवटी घरातल्या स्त्रीचीच जबाबदारी.. रात्री तरावीह म्हणजे विशेष नमाज होते. या नमाजमध्ये ३० दिवसात कुरआनचे दोन ते तीन सिपारे पठन केले जातात. त्यामुळे ही नमाज साधारण तासभर चालते.

नमाजनंतर घरातली सर्वांची जेवणं आटोपल्यानंतर महिलांना खरकटं स्वच्छ करुन झोपण्यास रात्रीचे बारा वाजतात. मग परत सकाळी उठून सहरीची तयारी.. उफ्फ किती ही मरमर एका स्त्रीची..!



रमजानची प्रतीक्षा

महिनाभर आधीच रमजानची तयारी सुरू असते. घरातल्या सर्व वस्तू घासून-पुसून स्वच्छ केल्या जातात. घरातलं धुणं काढलं जातं. घर-दुकानाला रंग-रंगोटी केली जाते. महिनाभर घरखर्चासाठी हात थोडासा सैलच केला जातो. घरात या महिन्यात बाहेरुन येणाऱ्यास आदरातिथ्थ करण्यास मोठं महत्व आहे. घरात येणारा प्रत्येक पाहुणा आणि आप्तस्वकीयांना इफ्तार करवल्याशिवाय जाऊ न देणं हे रमजानचं वैशिष्ट्य आहे.

रमजान महिन्यात खातीरदारी वा मेहमान नवाजीचं वेगळं महत्व असतं. असं सांगितलं जातं की, रमजान महिन्यात उपाशींना जेवू घालणं मोठ्या सत्कर्माचं काम आहे. रोजेदारांना इफ्तार करवणं म्हणजे मोठं पुण्य समजलं जातं. असं म्हंटलं जातं की, घरात येणारा प्रत्येकजण लक्ष्मी घेऊनच येतो. त्यामुळे महिनाभर इफ्तार पार्ट्या रंगत असतात.

बड्या प्रशस्त हॉटेलपासून ते एखाद्या टुरीस्ट हबला जाऊन इफ्तार पार्ट्या दिल्या जातात. घरात इफ्तारच्या मोठ्या जेवणावळी आणि पंगती बसवल्या जातात. मोठ्या आत्मियतेनं रोजेदारांना इफ्तार करवला जातो. इफ्तारनंतर जेवण आणि अनेकदा सहरीचीसुद्धा व्यवस्था केली जाते. सहरी आणि इफ्तार करवणं बरकतीचं अर्थात पुण्य असल्याचं मानलं जातं. महिनाभर मोहल्ल्यातून मस्जिदीमध्ये रोजेदारांसाठी पकवानाच्या थाळ्या पाठवल्या जातात. यात अमुस्लिमांची संख्यादेखील मोठी असते.

महिनाभर घरा-घरातलं वातावरण आधात्मिक होऊन जातं. घरातली मनोरंजनाची साधनं जसे - टीवी, रेडिओ, आदी या काळात बंद केली जातात. घरात प्रत्येकजण कुरआन आणि सिपारेंचं पढन करत असतो. (कुरआन ३० दीर्घ सूरह मध्ये विभागली आहे. यातून ३० छोटी-छोटी पुस्तिका तयार केली आहेत. याला सिपारे म्हणतात. सिपारे वाचायला आणि हाताळायला कुरआनपेक्षा सोयीची असते)

घरातली ज्येष्ठ मंडळी हातात तसबीरी घेऊन अल्लाहचा जप करत असतात. मोहल्ल्यातल्या मस्जिदी नमाजच्या पाचही वेळा भरुन जातात. रमजान काळातले शुक्रवार विषेश महत्वाची मानले जातात. यादिवशी छोट्या ईदसारखं वातावरण असतं. जुमाला सामूहिक नमाजनंतर शांती आणि भरभराटीसाठी विशेष दुआ केली जाते.

रमजान हा केवळ रोजा म्हणजे उपाशी राहण्याचा महिना नाही, तर हा आत्मशुद्धीचा महिना समजला जातो. महिनाभर अन्न-पाणी वर्ज्य करुन स्वत;चीच परीक्षा घेतली जाते. उपाशी राहणं हे केवळ रमजानचा हेतू नाही. तर रोजा ग्रहण करुन अल्लाहची आराधना करावी. उपाशी राहून आपल्या इंद्रीय शक्ती आटोक्यात आणता याव्यात. आपल्या नफ्स अर्थात उमाळ्या मारणाऱ्या इच्छांना तिलांजली देता यावी, त्यावर विजय मिळवता यावा. यासाठी रमजानचं विशेष महत्व आहे.

महिनाभरात सदाचार ग्रहण करावेत. वाईट विचार आणि कर्मांना थारा न देता चांगले आचरण करावं, हा सुप्त हेतू रमजानचा आहे. रोजा स्थितीत केवळ उपाशी राहून झोपा काढणे किंवा आराम करण्यास मनाई करण्यात आलीय. रोजा स्थितीतही आपली दिनचर्या थांबू न देता कामं करत राहावीत. असा नियम घालण्यात आला आहे. आपण वर्षभर बकाबका खातच असतो, किमान महिनाभर तरी शरीरातील अवयवांना आराम मिळावा हादेखील शास्त्रीय हेतू रमजानमागे असतो.


अखेरचा अशराह
रमजानच्या शेवटच्या दहा दिवसाचं खूप महत्व आहे. या काळात इबादतचा कालावधी वाढवला जातो. तसेच रोजे मीस होऊ नये याची विषेश काळजी घेतली जाते. 20 दिवसात अध्यात्मिक वातावरण तयार झाल्यानं, महिना संपतोय याची रुखरुख जाणवायला लागते. त्यामुळे महिन्याचे खास क्षण राखून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या योजल्या जातात. या दिवसात कुटुंबातले परगावी असलेले सदस्य मुळगावी परत येतात.

नातवं आणि मुलींना खास बोलावणं पाठवून आणलं जातं. आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचं खास सेलेब्रेशन सुरू होतं. खरेदी आणि हॉटेलिंगची आठवडाभर धूम असते. कुटुंबातील अनेकजण जमा झाल्यानं सहरी आणि इफ्तारी कौटुंबिक मेळावाच असतो. अलीकडे हॉटलिंगचं फॅड वाढलं तसं इफ्तारच्या पद्धतीदेखील बदलल्या आहेत.

सुरुवातीला फक्त हे फॅड महानगरापुरतं मर्यादित होतं. पण आता हे फॅड छोट्या शहरापर्यंतही येऊन पोहचलंय. छोट्या शहरात व्हेज-नॉनव्हेज खानावळी इफ्तारीचं 'खास इंतजाम' करतात. त्यात इस्लामी ढंगाच्या खानावळीत तर रुबाबच वेगळा असतो. इफ्तारीसाठी हॉटेलची खास सजावट केली जाते.

मित्र-मंडळी तसेच घरातलं अख्ख कुटुंब इफ्तार पार्टीसाठी हॉटेलला जातात. तसेच फँक्शन हॉलमध्ये खास इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं. मित्र-परिवार आणि नात्यातल्या मंडळींना खास मेजवानी दिली जाते. तसेच मदरसा आणि आश्रमशाळेतील मुलांना इफ्तारी आणि सहरीची सोय केली जाते.

ईदनंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्या आठवड्यातल्या एका ठराविक दिवशी अख्ख कुटुंब ‘बासी ईद’ साजरी केली जाते. त्यासाठी संपूर्ण कुटुंब टूरिस्ट हब किंवा शहरातील सार्वजनिक गार्डनला जातात. यातून कौटुंबिक आनंद मिळवणं हाच हेतू असतो. मुस्लिम राष्ट्रात तर रमजानसाठी महिनाभराची सुट्टी जाहीर केली जाते. आपल्याकडे तर खास रमजानसाठी उर्दू शाळांची वेळ अर्ध्यावर आणली जाते.

खाद्य पदार्थाची रेलचेल

रमजान महिना खाऊच्या वेगवेगळ्या पदार्थासाठीदेखील ओळखला जातो. घरात तर महिनाभर खाद्यपदार्थाची रेलचेल असते. दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद, भोपाळ, लखनऊ, मुंबई, म्हैसूर ही शहरं रमजानच्या विशेष खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध आहेत.. चवीष्ठ नॉनव्हेजची असंख्य प्रकार रमजान महिन्यात विशेष आकर्षणं असतात.

हैदराबादला हरीस आणि हलीम, औरंगाबादला फालुदा, मुंबईला मालपोवा, दिल्लीला पराठे रात्रभर ग्राहकांच्या सेवेत रुजू असतात. हॉटेलमध्ये सहरीची खास सोय केलेली असते. दिल्लीला चांदणी चौक, मुंबईला महमंद अली रोड, औरंगाबादला बुढ्ढी लेन, हैदराबादला चारमिनार अशी प्रसिद्ध ठिकाणं आहेत. जिथं खवैय्यांसाठी विशेष मेजवानी असते.

दूसरीकडे मार्केटची रमजानला वेगळी तयारी सुरु असते. खरेदीदाराच्या पसंती व आवडीनिवडी लक्षात घेता मार्केट सजवलं जातात. खाद्यवस्तु, कपडे आणि दागीण्यांची रेलचेल ग्राहकांना मार्केटकडे खुणावत असते. ईदला नवा कपडा घालणं सुन्नत समजलं जातं. सुन्नत म्हणजे शुभ, तसं नवीन कपडे घालावी अशी सक्ती किंवा अट नाहीये. प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार कपड्यांची खरेदी करतो. त्यामुळे घरात ईदला लग्नघरासारखी कपड्यांची खरेदी होते.

पुरुष मंडळी पठाणी, शेरवानी, कुडता-पायजमाला पसंती देतात. तर महिलांकडून जरीदार आणि टिकल्यांच्या वस्त्रांची मुख्यत्वे निवड केली जाते. पंजाबी ड्रेस आणि साडी या महिलांसाठी सदाबहार वस्त्रे मानली जातात. यासह रोज वापरण्यासाठी एखाद-दुसरा ड्रेस हमखास ईदला घेतला जातो.

घरात-दुकानावर तसेच ऑफीसवर काम करणारे एकूण सर्व सर्व्हंटलादेखील रमजानमध्ये कपडे घेतली जातात. जाळीदार टोप्या, उच्च दर्जाची अत्तरं रमजानचं खास आकर्षण असते. हजारो रुपये टोप्या आणि अत्तरांवर खर्च केली जातात.



दानाला महत्त्व

रमजान महिन्यात मोठ्या प्रमाणात दान-धर्म केला जातो. वर्षभरातील जकात या महिन्यात काढली जाते. जकात काढणे म्हणजे, आपल्या कमाईतून गरीबांसाठी विषेश समभाग काढला जातो. दर माणसी विशिष्ट ठराविक रक्कम जकात म्हणून काढली जाते. पैसा, कपडे, दागिणे, धान्य आणि गरजेच्या वस्तु या स्वरुपात ही जकात काढली जाते.

जकात काढण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे, समाजातील आर्थिक दुबळ्या गटांना ईद साजरी करण्याचा आनंद मिळावा. त्यासाठी प्रत्येकांनी आपल्या कमाईचा विशीष्ट्य भाग आर्थिक दुबळ्या गटांसाठी काढायचा असतो. ही जकात स्थावर मालमत्ता, रोकड आणि दागिण्यांच्या मार्केट व्यॅल्यूवेशनवर ठरवली जाते. इद-उल-फितरची नमाज होण्यापूर्वी जकात आर्थिक दुबळ्या गटांपर्यत पोहचवणं बंधनकारक असते.

शिरखुर्मा हे ईदचं वेगळंच आकर्षण असतं. शत्रूता विसरुन सर्वांना ईदच्या भेटीगाठी घेतल्या जातात. जुनी विखुरलेली नाती ईदला सावरली जातात. नवी नाती जुळवण्यासाठीदेखील ईदची निवड केली जाते. घरातल्या बच्चेकंपनी आणि लहान बहिणींना ईदी म्हणजे भेटवस्तु दिल्या जातात.

ईदला पाहुणे आणि मित्र-मंडळींना आग्रहानं बोलावलं जातं. त्यांचा विशेष पाहुणचार केला जातो. घरात बोलावून शिरखुर्मा, गुलगुले आणि लज्जतदार फुड खाऊ घातले जातात. तसेच येणाऱ्या प्रत्येकाला वेगवेगळ्या व्हरायटीची अत्तरं लावली जातात. महिनाभर रोजा असल्यानं अशक्तपणा येतो. हा अशक्तपणा घालवण्यासाठी शिरखुर्म्यात मुख्यत्वे ड्रायफ्रूटचा वापर केला जातो. दोन तीन वाट्या शिरखुर्माचं शरबत घेतल्यास तरतरी वाटायला लागते. ईदच्या दिवशी मित्र आणि पाहुण्यांना विशेष जेवणावळीदेखील दिल्या जातात.

कलीम अजीम, मुंबई

(लेखाचा संपादित भाग आजच्या लोकमत ऑक्सिजनमध्ये प्रकाशित झाला आहे.)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: रमजान : आधात्म, श्रद्धा आणि खाद्य पदार्थाची रेलचेल
रमजान : आधात्म, श्रद्धा आणि खाद्य पदार्थाची रेलचेल
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEioQQW11yLSGMDLhpKpG9LReXeMODKAflpvQgVfeEEyVwvJC5HP0m9JfgV-9CKyewU82vdoGCUL9ROebKTb2Gc6ILs9IuSCHhjtMryQE_G4kLKdIiVhB_2P6DN_q1cq1RZeoxEhjN7_wFUw/s640/13521915_1041766009233614_5482862723622415473_n.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEioQQW11yLSGMDLhpKpG9LReXeMODKAflpvQgVfeEEyVwvJC5HP0m9JfgV-9CKyewU82vdoGCUL9ROebKTb2Gc6ILs9IuSCHhjtMryQE_G4kLKdIiVhB_2P6DN_q1cq1RZeoxEhjN7_wFUw/s72-c/13521915_1041766009233614_5482862723622415473_n.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2016/07/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2016/07/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content