
मोदींच्या सत्ताकाळात नथुराम गोडसेला थोर पुरुष घोषित करण्यात आलेलं आहे. वास्तविक तो हल्लेखोर होता. गांधीजींचा खुनी होता. धर्मांध व दहशतवादी होता व आहे. पण त्याची खरीखुरी प्रतिमा दडपून टाकून त्याचं गौरवगान केलं जातं. त्याने केलेला गुन्हा हा ‘महापाप’ नसून ‘राष्ट्रीय कर्तव्य’ आहे, असं प्रचारित केलं जात आहे.
नथुरामला
देशभक्त म्हणणारे भाजप-संघाचे वाचाळ पुढारी त्याच्या गुन्ह्याला किरकोळ व सामान्यीकरण
करण्याचा प्रयत्न करतात. ही प्रक्रिया आजची नाही, खूप
जुनी आहे. आज फक्त त्या कानगप्पा किंवा कुजबूज मोहिमेचे वाहक सत्तेत बसल्याने
दुष्प्रचाराला मान्यता मिळवून देण्याचे प्रयत्न होत आहेत.
दुर्दैव
म्हणजे, गांधीहत्येचं पाप महाराष्ट्राच्या माथ्यावर राहिलं. त्यातही पुणे
शहर या कट-कारस्थानाचं केंद्र होतं. गांधींचे
मारेकरी पुणेरी होते. याच पुण्यात गांधीहत्येचा कट रचून तो पूर्णत्वास नेण्यात
आला. हिंदुत्वनिष्ठ अशी प्रतिमा असलेल्या के.एम. मुन्शी यांनी न्या. कपूर आयोगाला म्हटलं
होतं, “पुण्यामध्ये गांधीविरोधी गट होता आणि या गटाचा
राजकीय खून करण्यावरच भर होता.”
वास्तविक,
पुण्यातील ब्राह्मणवृंद पुराणमतवादी व कर्मठ विचारांचे होते.
त्यांनी जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याला प्रचंड विरोध केला. त्यांच्या
दृष्टीने फुले ध्रमद्रोही होते. मुळात फुले पेशवाप्रणित ब्राह्मणी धर्म संस्कृती व
त्यात अंतर्भूत असलेली वर्णीय वर्चस्ववादाची उतरंड मोडून मानवमुक्तीचा विचार मांडत
होते. परिणामी सनातनी ब्राह्मणांनी त्यांच्या हत्येचा कट रचला. पण त्यात ते अपयशी
ठरले. परंतु जोतीरावांच्या निधनानंतर त्यांची सत्यशोधकी विचारपरंपरा व त्यांच्या
ब्राह्मणेत्तर चळवळीची हत्या करण्यात मात्र त्यांना यश आलं.
महात्मा
फुलेंच्या निधनानंतर पुण्यातील राजकीय व सामाजिक चळवळीचं नेतृत्व सुधारकी ब्राह्मण
रानडे-गोखलेंकडे आलं. त्यात टिळकही होते. टिळकांची सामाजिक ओळख पुराणमतवादी अशी
होती. जात-वर्ग रचना व वर्णवर्चस्वाचे कडवे समर्थक होते. त्यांचे विचार फुलेंच्या
मानवमुक्तीच्या प्रक्रियेला खंड पाडणारे होते. त्यांना व त्यांच्या इतर सनातनी
मित्रांना वाटत होतं की, ब्रिटिशांकडून
स्वराज्य मिळवून आपलं स्वदेशी (पेशवाई) राज्य
स्थापन करता येईल. त्या दृष्टीने ते प्रयत्नशील होते.
१८८५ साली
महाराष्ट्रात अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना होऊन राजकीय स्वातंत्र्याची चळवळ
सुरू झाली होती. त्यावेळी पुण्यातील धर्मनिष्ठ ब्राह्मणांना वाटत होतं की या
(ब्राह्मण) नेतृत्वाच्या मदतीने पुन्हा पेशवाई स्थापन करता येईल. पण राजकारणातील
महात्मा गांधींच्या आगमनामुळे (१९१३) त्यांच्या या प्रयत्नांना खिळ बसली.
वाचा : महात्मा गांधींविरोधी दुष्टप्रचार आणि वस्तुस्थिती
गांधीजींनी
प्रारंभीच्या काळातच अस्पृश्य प्रथेविरोधात चळवळ सुरू केली. हळूहळू ते वर्ण व
जातव्यवस्थेविरुद्ध उभे राहिले. त्यांनी हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था, ब्राह्मण्य,
जातीय भेदाभेद, कर्मठ धर्मपरंपरा, रुढींवर
आघात केले. त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक बदलाच्या या प्रगोयाने अनेक विरोधक जन्मास घातले. थोडक्यात त्यांनी धर्माच्या नावाने सुरू असलेल्या शोषण व विषमतेला आव्हान
दिलं होतं. परिणामी ते धर्मनिष्ठ पुरोहितवाद्यांच्या निशान्यावर आले. हिंदू महासभा
व पुढे आरएसएसने त्यांचा टोकाचा विरोध सुरू केला.
गांधीजी व
त्यांच्या सुधारकी विचारांना पुण्यातून सर्वाधिक होऊ लागला. टिळकांच्या निधनांनतर
शहरातील ब्राह्मणवृंद हवालदिल झाले होते. त्यांच्यापुढे नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला.
त्यांच्या दुर्दैवाने त्यावेळी तसं नेतृत्व नव्हतं. तोपर्यंत गांधीजींनी सामाजिक व
राजकीय पातळीवर अनेक उपक्रम सुरू करून देशभरात ख्यातकीर्त होऊ लागले होते.
गांधींजा हा राजकीय उदय पुण्यातील ब्राह्मणवृंदासासाठी धडकी भरवणारा ठरत होता.
त्यामुळे
गांधीजींच्या खुनाचा पहिला प्रयत्नही पुण्यातूनच झाला. गांधी ‘हरिजन
यात्रे’निमित्त पुण्यात आले होते. त्यातच पुणे नगरपालिकेने २५ जून १९३४ला
गांधीजींना मानपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला जाताना
टाऊन हॉलजवळ त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर हँड ग्रेनेडचा हल्ला झाला. पण,
सुदैवाने गांधीजी त्यातून बचावले.
कारण,
कार्यक्रमस्थळी गांधीजींची गाडी उशीरा पोहोचली होती. आधी
पोहोचलेल्या गाडीच्या बॉनेटवर ग्रेनेड पडलं. बाजूला जाऊन त्याचा स्फोट झाला. या हल्ल्याविषयी
गांधीजींनी म्हटलं होतं, “हरिजन
कार्यकरिता आलो असताना अशी घटना घडणं दुर्दैव आहे.” गांधीजींचं
हरिजन कार्य म्हणजे जात-वर्ण मुक्तीची चळवळ होय. स्वाभाविक ब्राह्मणवृंदासाठी ही
कृतीला हिंदू धर्मावरील संकटासारखी होती. त्यामुळे ‘हिंदू
धर्म खतरे में’ ही घोषणा त्यांनी दिली होती.
हल्ला
करणाऱ्या या गटामध्ये नथुराम गोडसे, नारायण
आपटे व त्याच्या चमूचा सहभाग होता.१ या बॉम्ब
हल्ल्यात लक्ष्मण बळवंत भोपटकर (१८८०-१९६०) जखमी झाले. भोपटकर हिंदू महासभेचे
सदस्य-अध्यक्ष होते. हल्ल्यात बचावले म्हणून त्यांचं अभिनंदन करणारी एक सभा
पुण्यात भरवण्यात आली. महाराष्ट्र मंडळात झालेल्या या सभेचे अध्यक्ष तात्यासाहेब
केळकर होते.
“मला
मारण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता”, असं
भोपटकरांनी सत्कार भाषणात म्हटलं. स्वाभाविक गांधी हत्येचा प्रयत्न फसला होता.
त्यावरून जनसामान्य व पोलीस प्रशासनाचं लक्ष वळविण्यासाठी त्यांनी हे विधान केलं
होतं. तसंच आपलं महत्त्व वाढविणं त्यामागचा हेतू होता. कारण नथुराम चमूला त्यांना
वाचयावचं होतं. कारण ते नथुरामचे निकटचे मित्र होते.
पुढे
त्यांनी गांधी हत्येच्या खटल्यात सावरकर, नथुराम व
इतर आरोपींचं वकीलपत्र स्वीकारलं. रोचक बाब म्हणजे हा खटला त्यांनी विनामोबदला
लढला. त्यांनी हल्लेखोरांना निष्पाप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. सावरकरांना
खटल्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न चालविला. याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी
डॉ. आंबेडकरांचीही भेट घेतली होती.
रोचक बाब
म्हणजे पुण्यातील वर्तमानपत्रांनी गांधीजींच्या हल्लेखोरांना पाठिशी घालण्याचा
पूरेपूर प्रयत्न केला. हत्येच्या प्रयत्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी दिशाभूल
मोहिम राबविली. त्यात ‘सकाळ’ने
महत्त्वाची भूमिका वठवली. पत्राने आक्रमक हिंदुत्ववाद्यांची तळी उचलून धरली.
पुण्याबाहेर लक्ष वळविण्याचे प्रयत्न केले.
‘सकाळ’मध्ये
प्रकाशित काशीमधील गांधीजींच्या बहिष्कार मोहिमेचा आशय : “निरनिराळ्या
बुलेटिनद्वारे महात्मा गांधींची चळवळ ही आपल्या सनातन धर्मावरील एक प्राणांतिक
संकट असून ते दूर करण्यासाठी प्रत्येक सनातन्याने कसून प्रयत्न केला पाहिजे असा
प्रचार चालू आहे.”२
उपरोक्त घटनेनंतर अजून एक बॉम्बहल्ला पुण्यात झाला. त्यात एन.आर. आठवले नावाच्या इसमाला जेरबंद आलं. आठवले हा हिंदू महासभेचा कार्यकर्ता होता. पोलिसांनी त्याचा जबाब घेतला. त्यात उघड झालं की, नथुराम गोडसे संपादक असलेल्या ‘अग्रणी’च्या नारायण आपटेने त्याला बॉम्ब फेकण्यास सांगितलं होतं.
१९३४चा
प्रयत्न फसला. या घटनेनंतर आचार्य
जावडेकर यांनी स्पष्टपणे दिशानिर्देश केले की गांधींच्या हरिजन उद्धाराच्या
कार्यामुळे संताप झाल्याने हे दृष्कृत्य घडलं. त्यांनी म्हटलं होतं,
“सनातनी हिंदू म्हणून घेणाऱ्या लोकांना गांधींना मारलं तरच हिंदू
धर्म सुरक्षित राहिल असे वाटत होते.”३
लक्ष
वळवून झाल्यानंतर दहा वर्षांनी या धर्मांधानी पुन्हा १९४४ला पाचगणीत तोच प्रयत्न
करून पाहिला. त्यातील प्रमुख हल्लेखोर नथुराम होता. परंतु वेळीच तिथं उपस्थित
लोकांनी त्याच्या मुसक्या आवळल्याने त्याचा प्रयत्न फसला. घटनास्थळी काँग्रेस नेते
भि.दा भिलारे होते. त्यांनी या संदर्भात न्या. कपूर आयोगाला साक्ष दिली होती.
त्याविषयी त्यांनी अनुभव मासिकात लिहिलं होतं, “मी
नथुराम गोडसेच्या हातातून सुरा काढून घेतला.”४
१९४४ साली
गांधीजी पुण्यात येरवडा तुरुंगात होते. मलेरिया झाल्याने त्यांची सुटका करण्यात आली.
हवापालट म्हणून गांधीजी पाचगणीला गेले. त्यांचा माग काढत पुण्याहून खास बस करून
१८-२० जणांची टोळी पाचगणीला पोहोचली. त्यात नथुराम होता. जाण्यापूर्वी त्याने
आपल्या ‘अग्रणी’ वृत्तपत्र
कचेरीत सांगून ठेवलं होतं की, “पाचगणीतून
महत्त्वाची बातमी येईल.”
गांधी
मुक्कामी असलेल्या ‘दिलखुश’
नावाच्या एका बंगल्यापुढे येऊन नथुराम व त्याच्या माथेफिरू टीमने विरोधी घोषणा दिल्या. ही बाब गांधीजींच्या
कानावर गेली. त्यामुळे त्यांनी नथुरामशी चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला. परंतु
त्याने तो नाकारला. संध्याकाळी गांधीजींची प्रार्थनासभा सुरू झाली. नेहरू शर्ट,
पायजमा व जॅकेट घातलेला नथुराम विरोधी घोषणा देत गांधीच्या दिशेने
धावला. त्याच्या हातात सुरा होता. तेव्हा मणिशंकर पुरोहित व भिलारे गुरुजींनी
त्याला पकडले.५
वाचा : सावरकरांच्या बढाईकरणाचं सांस्कृतिक षड्यंत्र !
वाचा : सावरकर स्वातंत्र्यवीर कसे?
दिशाभूल
मोहिम
जून,
१९४६ साली पुन्हा असाच एक प्रयत्न महाराष्ट्रात घडला. गांधीजी
मुंबईहून रेल्वेने पुण्याकडे येत होते. नेरळ-कर्जत
स्टेशनच्या दरम्यान रेल्वे अपघात करून गांधींना संपवण्याचा डाव आखला गेला. परंतु
मोटारमनच्या प्रसंगावधानाने दुर्दैवी घटना टळली. याविषयी प्यारेलाल यांनी
विस्ताराने लिहिलं आहे. ते नोंदवतात, २९
जूनच्या रात्री गांधींना घेऊन एक खास रेल्वे पुण्याकडे वेगात निघाली. रेल्वे रुळावर
टाकण्यात आलेल्या दरडीवर धडकली. रेल्वेमार्गावर मुद्दामच या दरडी टाकण्यात आलेल्या
होत्या. इंजिन ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळेच अपघात टळला. नाहीतर गाडी उलटून
प्राणहानी झाली असती.६
या घटनेने
गांधीजी प्रचंड व्यथित झाले होते. त्यांनी ३० जून रोजी पुण्यात झालेल्या प्रार्थना
सभेत आपली वेदना कथन केली. म्हणतात, “परमेश्वराच्या
कृपेने मी सात वेळा अक्षरशः मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप परत आलो आहे. मी कोणाला
कसलीही इजा केलेली नाही. माझे कोणाशी शत्रुत्वही नाही;
मग माझे इतक्या वेळा प्राण घेण्याचे प्रयत्न का व्हावेत हे समजत
नाही. माझा प्राण घेण्याचा कालचा प्रयत्न
फसला आहे. मी इतक्यात मरणार नाही. मी सव्वाशे
वर्ष जगणार आहे.”७
२०
जानेवारी १९४८ पूर्वी हत्येचे एकूण सात प्रयत्न झाले होते, असं
गांधीजी खुद्द सांगतात. दुसऱ्या दिवशी झालेल्या प्रार्थनासभेत त्यांनी हल्लेखोर मदनलाल
पाहवाला क्षमा केली. त्यांनी हल्ल्याच्या उद्देशाविषयी चर्चा केली. म्हणाले,“मी
हिंदू धर्माचा शत्रू आहे, असे बहुधा
त्याला (हल्लेखोर) वाटले असावे.”८
थोडक्यात,
गांधीजींची हत्या गोडसे सांगतो तसं ५५ कोटी किंवा इतर अन्य
कारणामुळे झाली नव्हती. तर पराकोटीचा मुस्लिमद्वेश व जातिअंत कार्यक्रमातील
गांधीजींचे प्रयत्न हा त्यामागील मुख्य हेतू होता. त्याविषयी
एकूण सर्व माहिती पत्र, खुलासे,
संदर्भ व घटनाक्रम सार्वजनिक चर्चाविश्वाचा भाग आहेत.
वर्ण
व्यवस्थेविरोधात त्यांचा मुक्तिलढा या हल्ल्यामागील मुख्य हेतू होता. परंतु
या सर्वांकडे कानाडोळा करून फाळणी व ५५ कोटी ही कारणं पुढे दामटली जातात. वास्तविक,
त्यात मुस्लिम एंगल आणून ते दृष्कृत्य कसं योग्य होतं,
असं प्रचारित केलं जातं. त्याचा हेतू सामान्याचा बुद्धिभेद घडविणे
व वस्तुस्थितीपासून त्यांची दिशाभूल असा असतो. ‘हत्या’ की ‘वध’ हा
पुन्हा एक नवीन खल आहे. त्यात तुर्त जाण्याची गरज नाही.
वस्तुत: गांधीजींविषयी
असलेली पूर्वग्रह व विविध द्वेषजाणिवा त्यांच्या हत्येमागे आहेत. गांधीजींनी
वारंवार उल्लेख केला आहे की, हल्लेखोरांना
वाटतं की मी हिंदू धर्माचा विरोधी आहे. म्हणजे गांधीजींना ठाऊक होतं की हल्लेखोर
त्यांच्या जीवावर का उठले. २० जानेवारी १९४८ला दिल्लीत बिर्ला हाऊसला झालेल्या
प्रार्थनासभेत मी हिंदू विरोधी नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी हल्लेखोर व
त्याच्या मागे असलेल्या विखारी शक्तींना उपदेश दिला होता की “दृष्कृत्यापासून
परावृत्त व्हा. हिंदू धर्माचे रक्षण करण्याचा हा मार्ग नव्हे. माझ्या मार्गानेच
हिंदू धर्माचे रक्षण होईल.”
वाचा : महात्मा फुले आणि सर सय्यद अहमद खान
वाचा : आंबेडकरांच्या हिंदुत्वाचे अश्रू
दुसरं
म्हणजे जर फाळणी किंवा ५५ कोटी एकमेव कारण असतं तर हिंदुत्ववाद्यांच्या निशान्यावर
माउंटबॅटन व बॅ. जिन्ना का नव्हते? स्वाभाविक,
नसणार! कारण हिंदू महासभा बॅ.
जिन्नांच्या मुस्लिम लिगसोबत सत्तेची लाभधारक होती.
वि.दा.
सावरकर अखिल भारतीय हिंदू
महासभेचे अध्यक्ष होते. नथुराम हा आरएसएस व हिंदू महासभेचा पदाधिकारी होता. तो
सावरकरमित्र होता. याच सावरकरांनी बॅ. जिन्नाच्या खूप आधी दोन राष्ट्राचा विचार मांडला
होता. तोच विचार मुस्लिम लिगने उचलला. त्यामुळे एका अर्थाने सावरकर फाळणीचे कर्ते आहेत.
या संद्रभात डॉ. आंबेडकर सावरकर व जिन्नांना
एका माळेचे मणी म्हणतात. हेही कारण पुढे करणं म्हणजे शुद्ध सावरकरी थाप आहे. तरीही
सावरकर गांधीहत्येसाठी टपून होते.
गृहमंत्री
सरदार पटेल यांनी म्हटल्याप्रमाणे “सावरकरांच्या
नेतृत्वाखालील हिंदू महासभेच्या एका गटाने महात्मा गांधीच्या खुनाचा कट केला व तो
आमलात आणला होता.”१०
न्या. कपूर आयोगानेही स्पष्टपणे नोंदवलं हे की, “...या
सर्व तथ्यांच्या प्रकाशात गांधी हत्येचा कट सावरकर व त्यांच्या गटाने आखला हे
निर्विवाद सत्य आहे.”
वास्तविक,
मागे म्हटल्याप्रमाणे महात्मा गांधी हिंदू धर्मातील
स्पृश्य-अस्पृश्यता, जातभिमान, वर्णव्यवस्था,
धार्मिक पुराणमतवादातून आलेल्या व प्रस्थापित झालेल्या परंपरा,
रुढी-प्रथेविरोधात जनमोहिम राबवित होते. हिंदुत्ववादी या क्रियेला
धर्मावरील संकट समजत होते. ब्राह्मणांना गांधी नकोसे होते. कपूर आयोगाने गांधी
हत्येत सामील असलेल्या ब्राह्मण आरोपींची नावं नोंदवली आहे, त्यात देशपांडे, आपटे,
गोडसे, चव्हाण, मोडक,
जोग, सावरकर, दामले, कासर, कासकर,
जोशी, जोगुलकर होते.
गांधी वर्णव्यवस्थेविरोधी
उभे होते. त्याचप्राणे ते सामाजिक सद्भाव वृंद्धिगत ठेवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांना
हिंदू व मुस्लिमांची एकदिली हवी होती. फाळणीनंतर ठिकठिकाणी उद्भवलेल्या जातीय
दंगलीत त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य केलं. गांधीजी उभं करू पाहत असलेले
हिंदू-मुस्लिमांचे शांततापूर्ण सहजीवन हिंदुत्ववाद्यांना नकोसं होतं. या एका
प्रमुख कारणामुळे गांधीहत्येचं पातक घडलं. महाराष्ट्र व पुण्याच्या माथ्यावर
गांधीहत्येचा कलंक लागला.
पुण्यातील
सनातनी ब्राह्मणांनी गांधीजींच्या हत्येचं कारस्थान रचलं. ३० जानेवारी १९४८ पूर्वी
या हल्लेखोरांचे विकृत व हिडीस स्वरूप दिसून आलेलं होतं. हत्येनंतरही गांधीविषयी
द्वेश व तिरस्कार कमी झालेला नाही. आजही तो विविध
मार्गाने दिसून येतो.
गांधीहत्येनंतरही
दीर्घकाळ पुण्यातील ब्राह्मणवृंद गांधीजीविषयी द्वेष व तिरस्कार तर नथुराम व
त्याच्या मित्राच्या बाबतीत कौतुकाने भारलेले होते. त्याचं एक विकृत प्रदर्शन दीड
दशकानंतर दिसून आलं. गांधी हत्येच्या १६
वर्षांनंतर त्यातील मुख्य आरोपीपैंकी असलेले गोपाळ गोडसे, विष्णू
करकरे व मदनलाल पाहवा जन्मठेप भोगून १२ ऑक्टोबर १९६४ला सुटले. करकरे व गोडसे
पुण्यात आले त्यावेळी (नोव्हेंबर, १९६४) शहरातील
सनातनी ब्राह्मणांनी सत्यनारायणाची कौटुंबिक महापूजा घातली. पूजेची आमंत्रण
पत्रिका तयार करून ती वाटण्यात आली. त्यात लिहिलं होतं की देशभक्तांच्या
तुरुंगातून बाहेर येण्याचा आनंद साजरा करण्यासाठी पूजा आयोजिण्यात आली आहे आणि आपण
सर्वांनी येऊन त्यांना शुभेच्छा द्याव्यात.११
पूजेनंतर
पुण्यातील भिकारदास मारुतीजवळ असलेल्या उद्यान कार्यालयात दोघांच्या अभिनंदनाचा
जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. त्याला पुण्यातील सुमारे ३०० लोक हजर होती.१२
या
कार्यक्रमात उपस्थितांकडून गांधीजींची पुन्हा एकदा यथेच्छ बदनामी करण्यात आली.
त्याचप्रमाणे नथुराम गोडसेला ‘शिवाजीपूत्र’ घोषित करण्यात आलं. त्याविषयी ‘साप्ताहिक
साधना’मध्ये प्रकाशित वृत्तात ग.प्र.
प्रधान लिहितात, “आपटे व गोडसे यांचा हुतात्मा म्हणून
गौरव करण्यात आला. गोडसे शिवाजीचा बच्चा होता असे म्हणून शिवाजी महाराजांची बदनामी
करण्यात आली. गोडसेने श्रीकृष्णाची शिकवण पाळली असे सांगून श्री. न.गो. अभ्यंकर
यांनी भगवद्गीता व श्रीकृष्ण यांचा आतापर्यंत कोणी केला नसेल इतका अपमान केला.”१३
या मेळाव्याला ‘तरुण भारत’चे तत्कालीन संपादक (टिळकांचे नातू - मुलीचा मुलगा) गजानन विश्वनाथ केतकर हजर होते. त्यांनी आपल्या भाषणात धर्मनिरपेक्ष परंपरा व राष्ट्रीय चळवळींची बदनामी केली. गांधीहत्येचं समर्थन तर नथुरामचं उदात्तीकरण केलं. प्रधान लिहितात, “ग.वि. केतकर यांचा तर उत्साह उतू चालला होता. “मी गोडसेपेक्षा कमी शूर नव्हतो” हे त्या मेळाव्याला सांगण्यासाठी “मला गोडसे खून करणार आहेत” हे माहीत होते, हे त्यांनी सांगितलं.”१४
गजानन केतकर स्वागतपर भाषणात म्हणाले, “गोडसे म्हणाले होते की ‘गांधी म्हणतात मी १२५ वर्षं जगणार आहे. मात्र त्यांना १२५ वर्ष जगू कोण देईल? ...मी नथुरामला विचारलं होतं की त्याला गांधींना ठार करायचं आहे का? त्याला होकार देत नथुरामने म्हटलं की गांधींमुळे देशात आणखी समस्या निर्माण होऊ नये, असं त्याला वाटतं.”१५
तिथं
ग.वि. केतकरांसह न.गो. अभ्यंकर, विसुभाऊ
बापट इत्यादींची जहाल भाषणे झाली. नथुरामचे मृत्यूपत्र वाचून दाखवण्यात आलं.
त्याचप्रमाणे नारायण आपटे व नथुरामला हुतात्मा म्हणून गौरवण्यात आलं.
वरील
संदर्भातून दिसतं की, “गोडसे
गांधींजींचा खून करणार आहे”, हे मला
माहीत होतं, असं गजानन केतकर तिथं बरळले. तिथं हीही चर्चा
झाली की कोणाकोणाला माहीत होतं की, नथुराम
गांधींजींचा खून करणार आहे.
या सत्कार
सोहळ्यानंतर एका आठवड्याने ही बातमी बाहेर पडली. ‘इंडियन
एक्सप्रेस’ने १४ नोव्हेंबर १९६४ रोजी दिलेल्या बातमीत केतकर यांची मुलाखत
घेतली होती. बातमीत तो फोटोही छापण्यात आला ज्यात नथुरामच्या फोटोला हार घालून
त्यास श्रद्धांजली वाहण्यात आली होती.
केतकर
मुलाखतीत म्हणतात, “तीन
महिन्यांपूर्वीच नथुराम गोडसेने गांधी हत्येची योजना मला सांगितली होती. २०
जानेवारी १९४८ रोजी मदनलाल पाहवाने गांधीजींच्या प्रार्थना सभेत बॉम्ब फेकला होता.
त्यानंतर दिगंबर बडगे पुण्यात माझ्याकडे आला होता आणि त्याने पुढच्या योजनेविषयी
मला सांगितलं होतं. गांधींची हत्या होणार आहे, हे
मला ठाऊक होतं. याची वाच्यता मी कुणाकडेही करू नये, असं
गोपाळ गोडसेने मला सांगितलं होतं.”१६
या
बातमीने पुण्यात प्रचंड गजहब माजला. ‘केसरी’च्या संपादकाला (गांधीहत्येच्या वेळी
ग.वि. केसरीचे संपादक होते.) गांधी हत्या व हल्लेखोरांविषयी माहिती होती, मग
हत्येत त्यांचाही सहभाग होता का? त्यांनी ही
माहिती पोलीस व सरकारला का दिली नाही? असे
प्रश्न उपस्थित झाले.
प्रकरण
देशभर गाजलं. परिणामी गजानन केतकरांनी सारवासारव करण्याचा दुबळा प्रयत्न केला.
म्हटलं, मी बाळुकाका कानिटकरामार्फत ही माहिती
मुख्यमंत्री बाळासाहेब खेरांपर्यंत पोहोचवली होती. म्हणजेच गांधीहत्येची ठपका
त्यांनी पुन्हा काँग्रेसवर ठेवण्याचा प्रकार केला.
प्रकरण
चिघळलं. झाल्या प्रकरणामुळे महाराष्ट्राची देशभर बदनामी झाली. नेहरूंचे (मे, १९६४)
नुकतच निधनं झालं होतं. देश दुखवट्यात होता. त्या वातावरणात ही बातमी आली. परिणामी
तिने राज्यात हाहाकार माजवला. परिवर्तनवादी वर्तुळात असंतोष निर्माण झाला.
दिल्ली, राज्य
विधीमंडळ व पुणे महापालिकेत या विकृत प्रकरणावर तुफान चर्चा झडली. परिणामी गजानन
केतकरांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर माहिती दडविण्याचा खटला भरण्यात आला. गोपाळ
गोडसेलाही पुन्हा अटक झाली. प्रकरणाची सरकारने दखल गंभीर घेतली. याच प्रक्रियेत गांधीहत्येच्या
चौकशीसाठी न्या. कपूर आयोगाची स्थापना झाली. आयोगाला गांधींची हत्या सुनियोजित कट
होता का? त्यात कोण कोण सहभागी होतं?
इत्यादीचा तपास करावा असं सांगण्यात आलं.
प्रकरण चिघळले
लक्षात येताच नेहमीप्रमाणे आरएसएसने आपले हात झटकले. तथाकथित मान्यवरांचा व गजानन
केतकरांचा आपला संबंध नसल्याचे संघाचे ब.ना. भिडे यांनी पत्रक काढलं. प्रचंड
टीकेनंतर अखेरीस केतकरांकडून संपादक पदाचा कारभार काढून घेतला गेला. राजीनामा
नाट्यावर प्रा. प्रधान लिहितात, “एक गोष्ट
यावेळी निःसंदिग्धपणे सांगितली पाहिजे की हे माफी मागण्याचे व राजीनामा देण्याचे
नाटक चालू असले तरी ज्या मनोवृत्तीतून गोडसेने महात्मा गांधींचा खून केला तीच
लोकशाहीविरोधी मनोवृत्ती या प्रसंगाने व्यक्त झालेली आहे.”
प्रधान
पुढे अत्यंत आक्रमक भाषेत हल्ला चढवतात, “श्री.
अभ्यंकर यांनी संघाचा राजीनामा दिला असला, तरी
इतकी वर्षे संघात अधिकारपदावर असलेला मनुष्य अशा समारंभात जाऊन बोलतो, यावरून
या मनोवृत्तीचा व संघाचा संबंध नाही, असे
म्हणता येईल का? ज्या
घरात पवित्र वातावरण असते तेथील मुले छिनाल निघत नाहीत. अभ्यंकर हे ‘संघ प्रॉडक्ट’
आहेत. विसुभाऊ बापट यांचा व संघाचा आणि जनसंघाचा संबंध सर्वश्रुत आहे. या दोन व्यक्ती
ज्या वातावरणात वाढल्या त्या वातावरणात लोकशाहीचे संस्कार असते तर राजकीय
प्रतिस्पर्ध्याचा खून करून आपले ध्येय साध्य करू पाहणाऱ्या नथुरामवर त्यांनी
स्तुतिसुमने उधळली नसती.”१७
वाचा : चिकित्सा डॉ. आंबेडकरांच्या ‘मुस्लिमविरोधा’ची !
वाचा : दादुमियाँ : ‘धास्तावलेला’ हिंदुत्ववादी लेखक
पुण्यातील
वृत्तपत्र सृष्टीतील अनेक मान्यवरांनी ग.वि. केतकर, अभ्यंकर
व बापट यांची पाठराखण केली. गांधीजींच्या हल्लेखोरांचं उघड समर्थन केलं. “झाल्या
प्रकरणावर पडदा टाकावा, अशी
हाकाटी सुरू झाली.”१८ ‘केसरी’ने
व त्यांच्या विविध उपसंपादक व संपादकांनी उघड भूमिका घेत आरोपींची बाजू घेतली.
समर्थन करणारे केसरीचे हे संपादक म्हणे नेहरूंच्या निधनानंतर केसरीच्या कचेरीत
आनंदाने नाचले होते.
ग.वि.
प्रखर हिंदुत्वनिष्ठ होते. त्यांनी एका ख्रिस्ती महिलेचं धर्मांतर घडवून आणलं होतं
व नंतर तिच्याशी लग्न केलं. या प्रकारानंतर त्यांना केसरीचं संपादकपद सोडावं
लागलं. कारण केसरीतील ब्राह्मणवृंदाना हे परधर्मातील लग्न पटलं नाही.
नंतर
अमलाबाई नाव धारण केलेल्या केतकर पत्नीने आत्मकथन लिहिलं. त्यातून केतकरांचा
हिंदुराष्ट्रवादी चेहरा बाहेर पडतो. विशेष म्हणजे ते कांग्रेसी होते.
काँग्रेसमध्ये राहूनच ते हिंदू महासभावादी व संघवादी विचार बाळगून होते. ते प्रचंड
विखारी भाषेत लेखन करीत. पुढे
गांधीहत्येची माहिती दडवून ठेवल्याच्या खटल्यातून १९७४ला त्यांची मुक्तता झाली.
सुटकेनंतरही
त्यांनी व त्यांच्या वारसदारांनी गांधीजीविषयी प्रचंड द्वेश बाळगला. त्याचा वारसा
आजही देशभरात दिसून येतो. याचाच भाग म्हणून
गांधीहत्येला योग्य ठरवून नथुरामचं गौरवगान केलं जातं. पण गांधीहत्येचं पाप जसं
महाराष्ट्राच्या माथ्यावर तसंच गांधीद्वेशातही हा राज्य अग्रणी दिसतो.
द्वेष व
विखाराने कुठलाही कल्याणकारी विचार जन्म घेऊ शकत नाही, ही
विकृती नव्या विकृतीला जन्म देते. त्यामुळे अशा विकृत मनोवृत्तीपासून सावध
राहण्याची व त्यांना नामोहरम करण्याची गरज असते.
संदर्भ सूची :
१) महात्म्याची
अखेर, जगन फडणीस, पान-६८, सहावी
आवृत्ती, लोकवाङ्मयगृह, मुंबई-२००९
२) उपरोक्त, पान-७२
३) श.द.
जावडेकर, जीवन रहस्य, उद्धुत
जगन फडणीस, पान-७४
४) अनुभव, ऑक्टोबर, १९९७
पुणे
५) फडणीस, उपरोक्त, पान, ७६
६) प्यारेलाल, पूर्णाहुती, खंड-१, पान-३१३, नवजीवन
प्रकाशन, अहमदाबाद-२००२
७) फडणीस, उपरोक्त, पान-८३
८) दिल्ली
डायरी, पान-३८०, नवजीवन
प्रकाशन, अहमदाबाद-१९४८
९) उपरोक्त, पान-३८०
१०) सरदार पटेल
करस्पॉन्डन्स, खंड ६, पान-५६
११) ग.प्र.
प्रधान, साप्ताहिक
साधना, २१ नोव्हेंबर
१९६४
१२) बीबीसी
हिंदी, रजनीश कुमार, ३०
जानेवारी २०२०
१३) उपरोक्त, प्रधान
१४) उपरोक्त, प्रधान
१५) बीबीसी, रजनीश
कुमार, ३०
जानेवारी २०२०
१६) उपरोक्त, रजनीश
कुमार
१७) प्रधान, उपरोक्त
१८) पंढरीनाथ
पाटील, साप्ताहिक
साधना, २८ नोव्हेंबर
१९६४
कलीम अज़ीम, पुणे
मेल : kalimazim2@gmail.com
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com