महात्मा गांधींविरोधी दुष्टप्रचार आणि वस्तुस्थिती

महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर

भारत देशातल्या गरीबातल्या गरीब आणि वंचिताला हक्क मिळावेत, त्याला आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांनीही आपले आयुष्य वेचले. हे दोन्ही दिग्गज नेते समकालीन ​​आहेत. या दोन्ही नेत्यांचे संबंध संघर्ष ते सामंजस्य अशा विविध पैलूंनी नटलेले आहेत. याचा अर्थ ते एकमेकांचे शत्रू होते असे नाही. हे विशेषकरून सांगण्याचे कारण आजकाल गांधी विरुद्ध आंबेडकर असे युद्ध पेटविले जात आहे. गांधी मुळात सनातनी कर्मठ होते का? डॉ. आंबेडकर आणि गांधीजींमध्ये मतभेद होते की शत्रुत्व? या दोन्ही राष्ट्रपुरुषांना एकमेकाच्या विरुद्ध उभे करून कोण स्वतःचा फायदा करू इच्छितो?

१९१५ साली दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी भारतात परत आले आणि त्यांनी अहमदाबादला साबरमती आश्रमाची स्थापना केली. आश्रम सुरळीत चालू असताना दूदाभाई, दादीबेन हे दलित जोडपे आणि त्यांची कन्या लक्ष्मी हे कुटुंब आश्रमात राह्यला आले. गांधीजींनी त्यांना आश्रमवासी म्हणून दाखल करून घेतले. मात्र त्यामुळे अनेकजण अस्वस्थ झाले. गांधीजींची थोरली बहीण रलीयात बहन या मुद्द्यावरून आश्रम सोडून गेली. खुद्द कस्तुरबांची मनस्थिती डळमळीत होती. गांधीजींचे निकटचे सहकारी मगनभाई ह्यांच्या पत्नीलाही दलित कुटुंबाचा आश्रमातील समावेश योग्य वाटला नाही. ह्या करामुळे आश्रमाला मिळणाऱ्या देणग्याही बंद झाल्या.

परिस्थिती इतकी बिकट झाली की उद्या काय? असा प्रश्न पडला. त्यावेळी गांधीजींनी न डगमगता आपण सारे ही जागा सोडून जवळच्या दलित वस्तीत राहायला जाऊ आणि कष्ट करून तेथे राहूअसा निर्णय घेतला. त्यांनी पुढे सांगितले की ज्यांना आश्रमाचे नियम मान्य नसतील त्यांनी आश्रम सोडून जावे. कस्तुरबांना त्यांनी कळविले की, ‘तू आश्रम सोडून गेलीस तर पत्नी म्हणून मी महिना सहा रुपये तुला पाठवेन.त्यांनी मगनभाईना सुचविले की त्यांनी आश्रमाच्या बाहेर राहून वर्षभरात कुटुंबाची समजूत काढावी. समजा परिवारातील सदस्य दलितांसोबत आश्रमात राह्यला तयार झाले नाहीत तर त्यांनी आपली दुसरी व्यवस्था बघावी, असं निर्वाणीचा इशाराही त्यांनी त्याच वेळी दिला. म्हणजे त्यांची पत्नी आणि निकटचा साथीदार त्यांना सोडून चालले होते, तरीही गांधीजींनी आपली अस्पृश्यताविरोधी भूमिका बदलली नाही, किंवा तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यांच्या ह्या ठाम भूमिकेमुळे साबरमती आश्रमातील व्यक्तींच्या मनात सुरुवातीला असलेला पंक्तीभेद कायमचा पुसला गेला. आश्रमाच्या संडासातील मैला वाहून नेण्याचे काम विनोबांचे बंधू बाळकोबानी घेतले. थोडक्यात १९२०च्या आतच अस्पृश्यता आणि विशिष्ट जातीने विशिष्ट कामे करणे ह्या जातिनिष्ठ संकल्पना त्यांनी आपल्या जीवनातून पुसून टाकल्या होत्या.

वाचा : गांधी हटवण्याची ‘लिटमस’ टेस्ट

वाचा : महात्मा गांधी तर आजही सुखरूप

संयुक्त मतदारसंघ X स्वतंत्र मतदारसंघ

१९३१मध्ये ब्रिटिश सरकारने गोलमेज परिषद आयोजित केली होती. या परिषदेत विविध धार्मिक, जातीय आणि आर्थिक गटांच्या प्रतिनिधींना पाचारण केले गेले. प्रत्येक गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व जाहीर करून वेगळ्या मागण्या करण्यास उत्तेजन देणे, पर्यायाने भावी राष्ट्राच्या उभारणीत अनेक ठिकाणी पाचर मारून ठेवणे हा त्यामागील हेतू होता. त्या काळी सर्व प्रौढ व्यक्तींना मतदानाचा अधिकार नव्हता; तो केवळ मालमत्ताधारक व्यक्तींपुरता मर्यादित होता. ह्या परिषदेत मद्रास इलाख्यातील जस्टीस पक्ष आणि मुंबई इलाख्यातील ब्राह्मणेतर पक्ष ह्यांनी ब्राह्मणेतर आणि मराठा जातींसाठी विभक्त मतदार संघाची मागणी केली. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ पूर्वीपासून होतेच. ह्या परिषदेत शिखांनाही स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले. (विभक्त मतदार संघ : असा मतदार संघ जेथे एक सर्वसाधारण उमेदवार असेल आणि त्याला त्या मतदार संघातील सर्व मतदार निवडून देतील. त्याच मतदार संघात एक अल्पसंख्याक उमेदवार असेल आणि त्याला तेच विशिष्ट अल्पसंख्यांक मतदार निवडून देतील.)

डॉ. आंबेडकरांचे म्हणणे होते की दलित हा वेगळा अल्पसंख्य गट असून तो हिंदू आणि मुसलमान या दोन्हीपासून समान अंतरावर असल्याने त्याला हिंदू किंवा मुसलमानांच्यात न मोजता स्वतंत्र जागा द्यायला हव्यात. गांधीजींची भूमिका होती की अस्पृश्यता हे हिंदूंचे पाप आहे. ते हिंदूंनीच निस्तरले पाहिजे. यातून हिंदूंची सुटका नाही. जर अस्पृश्यांकडून असे मांडले जात असेल की ते हिंदू धर्माचे घटक नाहीत, तर हिंदू समाजाकडून अस्पृश्यतेचे निर्मूलन होणार नाही. अस्पृश्याबद्दल तुमच्याशी आमचा संबंध नाहीअशी भूमिका घेणे हिंदू समाजाला सोयीचे ठरेल. म्हणून अस्पृश्य हा घटक हिंदू समाजापासून तोडू नये.

अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ दिल्यास त्यांचे मतदार अस्पृश्य असतील. विधिमंडळात त्यांचे निवडून गेलेले प्रतिनिधी अल्पसंख्यच असतील. त्यांचा सत्तेवर प्रभाव पडणार नाही. त्याचबरोबर बहुसंख्यांकांच्या मतदार संघातून निवडून आलेले प्रतिनिधी अल्पसंख्यांकांच्या भावनांची कदर करणार नाहीत. अस्पृश्य समाज हा अशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सवर्णांवर अवलंबून असल्याने स्पृश्य-अस्पृश्यातील तणावातून अस्पृश्यांचेच नुकसान होईल. मात्र संयुक्त मतदारसंघ स्वीकारल्यास प्रत्येक उमेदवाराला समाजातील सर्व गटांची मर्जी सांभाळावी लागेल. कोणताही उमेदवार अल्पसंख्याकांबाबत बेफिकीर राहू शकणार नाही. सनातनी हिंदूंना देखील मते मागायला दलितांपाशी जावे लागेल, पर्यायाने त्यांच्या मागण्यांचा विचार करावा लागेल ही गांधीजींची भूमिका होती. (संयुक्त मतदार संघ : सर्व मतदारसंघात काही मतदार संघ असे असतील की ते राखीव असून तेथे फक्त अल्पसंख्यांक उमेदवार उभे राहतील. मात्र त्यांना मतदान सर्व जातीधर्मातले मतदार करतील.) दलितांना विभक्त मतदारसंघ न देता दलितांसाठी विधिमंडळात राखीव जागा ठेवाव्यात म्हणजे उमेदवार अस्पृश्य, मात्र मतदान करणारे सगळे अशी गांधीजींची रचना होती.

१९३१च्या गोलमेज परिषदेपूर्वी १९१९ साली साउथ ब्युरो कमिशनपुढे आणि १९२७ साली सायमन कमिशनपुढे डॉ. आंबेडकरांनी साक्ष दिली. दोन्ही ठिकाणी ते म्हणतात की सरकार भविष्यात जर प्रौढ मतदानावर आधारित लोकशाही पद्धती लागू करणार असेल, सर्वांना मतदानाचा अधिकार दिला जाणार असेल तर मला विभक्त मतदार संघ नकोत, संयुक्त मतदारसंघ हवेत.

१९३१च्या गोलमेज परिषदेनंतर दलितांच्या विभक्त मतदारसंघाची मागणी मान्य झाली. गांधीजींनी येरवडा तुरुंगात कैद असतानाच विभक्त मतदारसंघाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले. आंबेडकर आणि गांधीजींमध्ये येरवडा तुरुंगात चर्चा झाल्या. आंबेडकरांनी विभक्त मतदारसंघाचा आग्रह सोडला व संयुक्त मतदार संघ मान्य केला. पुणे करारम्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या निवाड्याद्वारे दलितांना विभक्त मतदारसंघातून मिळणाऱ्या ७१ जागांच्या ऐवजी संयुक्त मतदारसंघातून १४८ मिळवून दिल्या.

या उपोषणाचे तीन परिणाम झाले. पहिला होता गांधीजींची मागणी मान्य होउन डॉ. आंबेडकर आणि गांधीजींमध्ये झालेल्या करारानुसार दलितांना संयुक्त मतदारसंघात ८६ जागा अधिक मिळणे. या उपोषणाचा दुसरा हेतू होता सवर्णांच्या मनात अस्पृश्यतेच्या कलंकाविषयी पश्चातापाची भावना जागविणे.

उपोषणादरम्यान गांधीजींच्या ह्या भावनेस ठिकठिकाणी प्रतिसाद मिळू लागला. देशभरात अस्पृश्यांसाठी मंदिरप्रवेश, सार्वजनिक विहिरी आणि पाणवठे खुले करणे, अस्पृश्य बालकांना शाळांमधून मुक्त प्रवेश, जाहीर सहभोजन असे कार्यक्रम आयोजित केले जाऊ लागले. अलाहाबादेतील सर्व मंदिरे अस्पृश्यांना खुली झाली. कलकत्याचे सुप्रसिद्ध कालीमंदीरही खुले झाले. मुंबईच्या प्रमुख देवळांमध्ये दलितांच्या मंदीर प्रवेशाच्या प्रश्नावर मतपेट्यातून जनमत चाचण्या घेण्यात आल्या.

मुंबईतील विठ्ठल रखुमाई मंदिरात एम.जी. राजा ह्या दलित नेत्यांनी आपल्या साथीदारांसह पूजेत भाग घेतला. बिहार पंजाबात देवळे खुली झाली. त्रिपुराच्या महाराजांनी आपल्या राज्यातील तमाम मंदिरे खुली केली. मद्रास आणि बनारसमधील सार्वजनिक सहभोजनात अनेक स्थानिक प्रतिष्ठीत आणि राजकीय पुढारी सामील झाले. विविध नगर परिषदांनी उपाहारगृहात सर्वांना मुक्त प्रवेश देण्याचा ठराव केला. तिसरा परिणाम म्हणजे गांधीजींच्या बरोबरीने वाटाघाटी करणारे डॉ. आंबेडकर हे भारतातील सर्व दलित नेत्यांमधील सर्वोच्च नेते ठरले.


गांधीजींचे अस्पृश्यतानिवारणाचे कार्य

पुणे करार झाल्यावर गांधीजींनी आपल्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला सुरुवात केली. पुण्याहून हरिजनपत्राचा शुभारंभ झाला. पहिल्या अंकासाठी त्यांनी डॉ. आंबेडकरांकडून संदेश मागितला. त्यात डॉ. आंबेडकरांनी म्हणतात, “आपण आपल्या नवीन हरिजनच्या पहिल्या अंकासाठी मला संदेश द्यायला सांगितला आहे. मी संदेश देऊ शकणार नाही असे मला वाटते. हिंदूंच्या नजरेत मजविषयी जी भावना आहे ती बघू जाता माझा संदेश त्यांना आदरणीय वाटेल याविषयी मला शंका आहे. मी तर माणसाने माणसाशी संवाद साधावा तसे लिहू शकतो. बहिष्कृतता हे जातिप्रथेचे उपउत्पादन (byproduct) आहे. जोवर जाती राहतील तोवर अस्पृश्यता राहील. जातिप्रथेचा नाश झाल्याशिवाय इतर कुठल्याही उपायाने दलित मुक्त होऊ शकणार नाहीत. हिंदू धर्मातून या घृणास्पद आणि दुष्ट सिद्धांताला घालवून जोवर त्याला शुद्ध केले जात नाही, तोवर संघर्ष अटळ आहे. यातून हिंदूंना वाचवायला कोणतीही शक्ती पुढे येऊ शकणार नाही. आणि त्यांच्या अस्तित्वाची खात्री देऊ शकणार नाही.”

डॉ. आंबेडकरांचे पत्र आणि संदेश संपूर्णपणे हरिजनच्या पहिल्या अंकात प्रकाशित झाला. गांधींनी यावर प्रदीर्घ टिपण लिहिले. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. यातल्या सैद्धांतिक चर्चेचे वेगळे मोल आहे, पण यातल्या मानवी पक्षाला उद्धृत करणे अधिक गरजेचे आहे. गांधी आपल्या निवेदनात म्हणतात, “डॉ. आंबेडकरांच्या मनात कटुता आहे. याची अनेक कारणे आहेत. ते उच्चविद्याविभूषित आहेत. सर्वसाधारण शिक्षित हिंदूजनांपेक्षा ते अधिक बुद्धिमान आहेत. हिंदुस्तानाबाहेर त्यांचा प्रेमाने सन्मान केला जातो, पण या देशातले हिंदूजन त्यांना सतत ते दलित असल्याचे स्मरण करून देतात. हे त्यांच्यासाठी लाजिरवाणे नसून ही हिंदूंसाठी शरमेची बाब आहे पण मी त्यांना खात्रीशीररीत्या सांगू इच्छितो की आज त्यांच्या संदेशाला अन्य नेत्यांच्या संदेशाइतका मान आणि आदर देऊन ऐकणारे हजारो हिंदू आहेत आणि त्यांच्या अभिप्रायानुसार कुणीही उच्च वा निम्न नाहीत. आज जरी (मला) वर्णाश्रमपद्धतीविरुद्ध लढण्याचे कारण नसले तरी भविष्यात वर्णाश्रम धर्मव्यवस्था जर गैरवर्तणूक करणारी वाटली तर हिंदू समाज त्याविरूद्ध झुंजेल. आपण सारे तेव्हा एकाच छावणीत असू.”

गांधीजींच्या वरील लिखाणातील शेवटच्या दोन ओळी फार महत्त्वाच्या आहेत. गांधीजी हे सतत विकसित होणारे व्यक्तिमत्व आहे. आज मला एखादी गोष्ट योग्य वाटत असेल, पण ती उद्या बदलू शकते. ही त्यांची भूमिका आहे. ते आपली भूमिका सतत तपासून घेऊन त्यात योग्य तो बदल करत असत.

१९३७ सालच्या प्रांतिक निवडणुकांमध्ये डॉ. आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाला महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळाल्या पण भारतात मिळाल्या नाहीत. त्या राखीव जागांवर बहुतांशी काँग्रेसचे दलित प्रतिनिधी निवडून आले. देशभरात काँग्रेसमध्ये दलित कार्यकर्ते फार पूर्वीपासून काम करत होते. ते या निवडणुकांमधून पुढे आले. डॉ. आंबेडकरांनी १९४२मध्ये ब्रिटिशांशी युद्धसहकार्य केले. ते मंत्रिमंडळात गेले. त्यांना तेथे कामगार खाते मिळाले. त्यांना असे वाटत होते की सत्तांतराच्या वाटाघाटीत दलितांचे प्रतिनिधी म्हणून ब्रिटिश आपल्याशी वाटाघाटी करतील. मात्र ब्रिटिशांनी त्यांना डावलले. तिथे त्यांना आपली फसवणूक झाली असे वाटले असावे.

डॉ. आंबेडकर आणि गांधीजी यांच्यात खरंच मतभेद होते का? याकडे आपण वळू.

ध्येये आणि उद्दिष्टे वेगळी असतात तेव्हा भूमिकांमधील फरकाला मतभेद म्हटले जाते. अस्पृश्यता आणि जातिव्यवस्था नष्ट करणे हे या दोन्ही दिग्गज नेत्यांचे ध्येय होते. आपण हे समजून घ्यायला हवे की गांधीजी आणि डॉ. आंबेडकर हे वेगवेगळ्या समाजांना आवाहन करत होते, ज्यांचे हितसंबंध एकमेकाच्या विरोधी होते. या दोघांच्या नात्यामधील हा भाग फार महत्त्वाचा आहे. ज्यांनी अस्पृश्यांना कमी लेखण्याचे पाप केले आहे त्यांना आपली चूक समजून यायला हवी. त्यांनी आपल्या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी प्रायश्चित घ्यायला हवेअसे गांधीजी मानत. म्हणूनच गांधीजींच्या दृष्टीने दलितांचा प्रश्न हा सवर्णाच्या आत्मशुद्धीचा होता. गांधी आवाहन करत होते सवर्ण जनतेला. हिंदू परंपरेमध्ये दलितांचे शोषण करून ज्यांना सर्वाधिक लाभ मिळत होता त्यांनाच गांधीजींनी आत्मशुद्धीचे आवाहन केले.

गांधीजींची संवादाची भाषा सर्व अडथळे तोडून सवर्णाच्या आत्मिक गाभ्यालाच भिडत असे. अस्पृश्यता आणि जातिप्रथा पाळणे हे लांच्छनास्पद काम आहे. याला आपण जबाबदार आहोत हे सवर्णाच्या मनावर ठसवायचे काम गांधीजींनी यशस्वीपणे पार पाडले. मी अस्पृश्यता पाळतो आणि जातिभेदाचा मला अभिमान आहे असे कुठलाही सवर्ण सांगू शकला नाही. अपवादाने जे सांगत होते त्यांनीच भयापोटी गांधीजींच्या खुनाचा कट रचला.

डॉ. आंबेडकर हे अस्पृश्य जातीत जन्माला आले होते. उच्चशिक्षित आणि उच्चपदावर असूनही त्यांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागत होते. त्यांना आपल्या पददलित, अशिक्षित आणि वंचित बांधवांना या जातिभेदाच्या आणि अस्पृश्यतेच्या बेड्यांतून तात्काळ मुक्त करून आत्मसन्मान प्राप्त करून द्यायचा होता. डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या बांधवांसाठी ही आत्मसन्मानाची आणि जीवनमरणाची लढाई होती. सवर्णांवर आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या पददलित समाजाला मुक्त करून आत्मसन्मान मिळवून देणे हे कठीण काम होते.

आजपर्यंत आपले सवर्णानी शोषण केले तर स्वातंत्र्य मिळाल्यावर कशावरून ते तसेच करणार नाहीत अशी शंका त्यांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक होते. त्यामुळे त्यांचे प्रमुख लक्ष्य पददलितांचा विकास आणि मुक्ती हे होते. गांधीजींना पददलितांना न्याय्य वागणूक आणि त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य हवे होते. त्यांच्या आदर्श स्वराज्यासाठी स्वातंत्र्य हे साधन होते. थोडक्यात दोघेही एकाच ध्येयाकडे जाण्यासाठी वेगवेगळ्या मार्गावरून निघाले, कारण त्यांचे आवाहन वेगवेगळ्या समाजांना होते.

आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की गांधीजींचा खून होण्यापूर्वीचे पाच खुनी हल्ले हे येरवडा करारानंतर म्हणजेच गांधीजींनी अस्पृश्यता निवारणाबाबत ठाम भूमिका घेऊन कामाला सुरुवात केल्यावरच झाले आहेत. गांधीजींचा खून पाकिस्तानला ५५ कोटी देण्यातून झालेला नाही, तर त्यांनी घेतलेल्या भूमिकांना जनतेने भरघोस प्रतिसाद दिला, अल्पसंख्याक आणि दलितांना आश्वस्त वाटू लागले. ते जेथे जात तेथे फाळणीचे दंगे थांबत असत. मंदिरे आणि पाणवठे दलितांसाठी खुले होत असत. त्यामुळे जातीयवादी आणि आक्रमक हिंदुत्वनिष्ठांचे धाबे दणाणले. या माणसाचे जनता ऐक लागली तर आपल्याला आवरते घ्यावे लागेल, याच भीतीपोटी त्यांनी गांधीजींचा खून केला आहे. हीच माणसे आज बाबासाहेब आणि गांधीजींना एकमेकाचे शत्रू म्हणून उभे करत गोंधळ माजवत आहेत. एकप्रकारे पुन्हा एकदा जातीच्या आधारावर गरीब आणि कष्टकरी वर्गात फूट पाडून ब्रिटिशांची फोडा आणि झोडानीती वापरण्याचा कार्यक्रम नव्याने सुरू झालेला आहे.

आज डॉ. आंबेडकर आणि गांधीजी आपल्यात नाहीत. येरवडा करार अजून अस्तित्वात आहे. उत्तर प्रदेशात मायावतीजी निवडून सत्तेवर आल्या, त्याला या कराराचा आधार आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. आजच्या काळाच्या संदर्भात गांधीजी व बाबासाहेब दोघांच्या मुद्द्यांची पुन्हा एकदा तपासणी घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर आजच्या काळाला आवश्यक असलेली दोघांमधील साम्यस्थळे अधोरेखित करणेही तेवढेच गरजेचे आहे.

देशात अनेक संस्कृती एकत्र नांदत आहेत. या देशाचा राष्ट्रवाद हा आक्रमक नाही तर सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे. आपल्या देशाच्या घटनेचा मूलभूत पायाही बहुविविधता आणि सहिष्णुता हाच आहे. भारतीय समाजाने ह्या उन्नत परंपरा आणि मूल्ये जतन करावीत अशी गांधीजी आणि बाबासाहेबांची इच्छा होती. या दोघांची पददलित समाजाच्या उत्थानाची तळमळ आजही आपल्याला स्वस्थ बसून देत नाही. सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि भारतीय घटना यांच्या आधारे या विविधतेने नटलेल्या समाजातील अन्याय्य आणि विषमतामूलक भाग काढून टाकून जगापुढे नवा आदर्श भारत उभा करायचा असेल, तर महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर ह्या दोघानाही आपल्याला एकत्र घेऊन पुढे जावे लागेल.

(वरील टिपण तयार करताना डॉ. भुजंग बोबडे, गांधी रिसर्च फौडेशन, जळगाव यांच्या प्रदीर्घ लेखाचे सहाय्य घेतले आहे)

 वाचा : सावरकर स्वातंत्र्यवीर कसे?

वाचा : ​यूसुफ मेहेरअली ‘चले जाव’ घोषणेचे जनक

गांधीजी आणि भगतसिंग : वस्तुस्थिती समजून घेताना (understanding facts)

भगतसिंगची फाशी वाचविण्यासाठी गांधीजींनी काहीच प्रयत्न केले नाहीत असं सगळीकडे ऐकू येत. भगतसिंगची फाशी वाचाविण्यासाठी गांधीजींनी कोणते प्रयत्न केले तसेच इतर क्रांतिकारकांना कशाप्रकारे कैदेतून सोडविले हे आपण सविस्तरपणे बघू.

भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांवर पोलीस अधिकारी सॉन्डर्सची १७ डिसेंबर १९२८ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्याचाखटला चालला होता. या खटल्यात भगतसिंगाचे दोन साथीदार जय गोपाल आणि हंसराज व्होरा यांनी सरकारी साक्षीदार म्हणून साक्ष दिली. लाला लजपतराय यांच्यावर अमानुष लाठीहल्ला करणाऱ्या स्कॉट या अधिकाऱ्याला त्यांना मारायचे होते. पण त्यांनी चुकून सॉन्डर्सवर गोळ्या झाडल्या. कैदेमध्ये भारतीय कैद्यांसोबत होणाऱ्या भेदभावाच्या निषेधार्थ भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला. तुरुंगात भगतसिंह आणि इतर कैद्यांनी केलेल्या अन्नसत्याग्रहाला काँग्रेसने पाठिंबा म्हणून लाहोर आणि पंजाबात सरकार विरोधात मोर्चे काढले होते. यात काँग्रेस आणि अकाली दल होते. कुठलीही हिंदुत्वाशी संघटना नव्हती. म्हणजे केवळ गांधीजीच नाही तर काँग्रेसदेखील प्रयत्न करीत होती, यात नेहरू आणि पटेल हेही आले. म्हणजे केवळ व्यक्तिगत नाही तर संघटनेच्या माध्यमांतून देखील प्रयत्न झाले.

१९३०मध्ये गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. त्याची चर्चा जगभर झाली. ब्रिटिश सरकारने काँग्रेस पक्षावर दडपशाही केली. गांधीजींसह सर्व काँग्रेसचे नेते कैदेत डांबले गेले. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना ७ ऑक्टोबर १९३० रोजी फाशी सुनावण्यात आली. गांधीजी २६ जानेवारी १९३१ रोजे जेलमधून सुटले. त्यावेळी भगतसिंग आणि साथीदारांची फाशी जवळजवळ नक्की झालेली होती. या शिक्षेच्या विरोधात प्रीव्ही कौन्सिल समोर केलेले अपील ११ फेब्रुवारी १९३१ रोजी फेटाळण्यात आले.

नेहरूंच्या पुढाकाराने मदन मोहन मालवीय यांनी १४ फेब्रुवारी १९३१ रोजी दया याचिका दाखल केली ती २० मार्चला फेटाळण्यात आली. १९ फेब्रुवारी ते ५ मार्च १९३१ रोजी गांधी आणि लॉर्ड आयर्विन यांच्यातील प्रदीर्घ चर्चा संपली आणि गांधी-आयर्विन करार झाला. या करारानुसार इंग्रजांच्या काही अटी मान्य केल्यावर ९० हजार पेक्षा अधिक भारतीय कैदी जेलमधून सुटले.

भगतसिंग आणि साथीदारांच्या फाशीवर व्हाइसरॉयने शिक्कामोर्तब करणे बाकी होते. गांधीजी मुलतः फाशीच्या शिक्षेच्या विरोधी होते. गांधीजींनी भगतसिंग आणि साथीदारांची फाशीची सजा रद्द करून जन्मठेप द्यावी या उद्देशाने १८ फेब्रुवारी, १९ मार्च आणि २३ मार्च रोजी तीन पत्रे लिहिली. या पत्रांमध्ये गांधीजींनी वेगवेगळ्या प्रकारे युक्तिवाद केला.

भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांची फाशी रद्द करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे, याची कुणकुण ते ब्रिटिश अधिकाऱ्यांना लागली. फाशी रद्द केल्यास आपण राजीनामा देऊ असे पंजाबचे गव्हर्नर केडर यांनी ब्रिटिश सरकारला कळविले. या गव्हर्नरने राजीनामा दिल्यास त्यांचे म्यानमार, अफगाणिस्तान आणि अरब देशातील सहकारी राजीनामा देतील असा ब्रिटिश सरकारला निरोप मिळाला. या राजीनामा प्रकरणाची बातमी गांधीजीना कळल्यावर ते व्हॉईसरॉयना भेटायला गेले आणि फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली.

२३ मार्चला गांधीजींनी लिहिलेल्या पत्रात सांगितले की फाशीचा निर्णय अनिश्चित काळासाठी स्थगित करावा. कृपया भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना जगण्याची एका संधी द्यावी. जर गांधीजींची विनंती मानली असती तर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी निषेध म्हणून राजीनामे दिले असते, ब्रिटनमध्ये लॉर्ड आयर्विनच्या विरोधात वातावरण तयार झाले असते आणि गांधीजींच्या विनंतीला मान दिला म्हणून गांधी अजून मोठे हिरो बनले असते. ब्रिटिश सरकारला हे परवडणार नव्हते. म्हणून इंग्रजांनी भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांना एका दिवस आधीच २६ मार्च १९३१ रोजी सायंकाळी ७.३३ वाजता फाशी दिली आणि या प्रखर क्रांतिकारकांचे अस्तित्व नष्ट केले आणि गांधीजींची जनतेत किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला.

भगतसिंगांना वाचाविण्यासाठी गांधी, नेहरू आणि पटेल यांनी आपापल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र यावेळी गोलमेज परिषदेत हजर असलेल्या मुस्लिम लीग, हिंदू महासभा, दलितांचे प्रतिनिधी आणि अनेक उदारमतवादी कायदेपंडीत यांनी भगतसिंगांच्या फाशीच्या शिक्षेला माफी द्यावी यासाठी शब्दही उच्चारला नाही. तसेच वि.दा. सावरकर आणि सरसंघचालक हेडगेवार यांनी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की समजा भगतसिंगांना माफी मिळाली असती तर त्यावर काही अटी लादल्या गेल्या असत्या. त्या अटी क्रांतिकारी आणि स्वाभिमानी स्वभावाच्या भगतसिंगानी मान्य केल्या असत्या का?

ब्रिटिशांच्या अटींवर पुढील आयुष्य जगणे त्यांना मानवले असते का? आणि आजच्या संदर्भात बघायचे झाले तर माफी मागून ब्रिटीशांच्या अटींवर उर्वरीत आयुष्य कंठणारा भगतसिंग आपला हिरो असता का? मुळात कोणत्याही प्रकारच्या क्षमायाचनेच्या विरोधात भगतसिंग होता. आपल्या हौतात्म्यामध्येच देशाचे हित आहे यावर त्याचा विश्वास होता. त्याच्या वडिलांनी, सरदार किशनसिंग यांनी फाशी रद्द व्हावी म्हणून ब्रिटिश सरकारकडे अर्ज केला हे कळल्यावर भगतसिंग आपल्या वडिलांवर चिडला. तुम्ही माझ्या पाठीत सुरा खुपसला आहे, असे तो वडिलांना खेदाने म्हणाला. शेवटपर्यंत भगतसिंग हेच म्हणत होता की फाशीच्या दोरापासून मला कोणीच रोखू शकत नाही.

इतर क्रांतिकारकांची सुटका

गांधीजी १९१५ साली आफ्रेकेतून परतले. त्यावेळी सावरकर अंदमानात कैदेत होते. १९१७ मध्ये मुंबई येथील प्रांतिक काँग्रेसमध्ये गांधीजींनी सावरकरांच्या सुटकेचा ठराव सर्व प्रतिनिधींच्या सहमतीने मंजूर करून घेतला. तसाच ठराव अखिल भारतीय काँग्रेसच्या काकीनाडा अधिवेशनात त्यांनी संमत करून घेतला. काही तज्ञांच्या मते या नंतरच ब्रिटिश सरकारने सावरकरांच्या अर्जांना सकारात्मक प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. १९३७ साली देशातील ६ राज्यात काँग्रेसची सरकारे आली. त्या राज्यातील राजबंद्यांची तात्काळ मुक्तता केली गेली. यामध्ये क्रांतिकारकांचाही समावेश होता. भगतसिंगांचे एक सहकारी विजयकुमार सिन्हा अंदमानमध्ये कैदी होते. त्यांची सुटका गांधीजींच्या प्रयत्नामुळे कशी झाली हे त्यांच्या चरित्रात सविस्तर दिलेले आहे.

भगतसिंग यांचे महत्त्वाचे सहकारी बटुकेश्वर दत्त गांधीजींच्या प्रयत्नाने जन्मठेपेची सजा भोगून १९३८मध्ये जेलमधून सुटले. १९४२च्या चळवळीत बटुकेश्वर दत्त सहभागी होते. भगतसिंहाचे वडील आणि सुखदेवचा भाऊ फाशी नंतर लगेच झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात गांधीजींना भेटायला गेले यापैकी कुणालाच गांधीजींनी केलेल्या प्रयत्नांबद्दल शंका नव्हती म्हणूनच हे घडू शकले. विश्वनाथ वैशंपायन, भवानी सहाय आणि ज्वालाप्रसाद या दिल्लीच्या तुरुंगातील क्रांतिकारकांच्या सुटकेसाठी गांधीजींनी सरकारकडे रदबदली केली. त्यांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून गांधीजी त्यांना तुरुंगात जाऊन भेटले. सरकारने त्यांची बिनशर्त मुक्तता केली.

पृथ्वीसिंह आझाद हे जन्मठेपेची शिक्षा झालेले कैदी, पोलिसांच्या तावडीतून निसटले. रशिया आणि अफगाणिस्तानात जाउन आले. मुंबईत परत येऊन वेगळे नाव घेऊन नोकरी करू लागले. त्यांना सुटकेचा मार्ग गांधीजींनी सुचविला. १९३८ मध्ये त्यांनी स्वत:ला अटक करून घेतली आणि १९४० मध्ये त्यांची सुटका झाली.

राहुल सांकृत्यायन यांनी पृथ्वीसिंह आझाद यांच्या चरित्रात गांधीजींच्या प्रयत्नांचा तपशील दिला आहे. १९४२मध्ये चंद्रपूर येथील चीमूरमध्ये पोलीस चौकी जाळून ठाणेदाराला मारले. पाच आंदोलकांवर खटला होउन मृत्युदंडाची शिक्षा झाली. वर्ध्याला आष्टी येथे सहाजण शहीद झाले, दहा जणांना फाशी आणि ६५ जणांना जन्मठेप सुनावण्यात आली. काही कारणांनी फाशी लांबत होती. दरम्यान गांधीजींनी त्यांच्या सुटकेचा प्रयत्न करण्यासाठी अनुसुयाबाई काळे यांना प्रयत्न करण्याची सूचना केली. त्यांच्या मदतीला के.एम. मुंशी हे जेष्ठ विधीज्ञ पाठविले. स्थानिक वकिलांच्या मदतीने फाशी लांबवत नेली आणि १९४७ मध्ये स्वातंत्र्य येत असल्याचे दिसले आणि त्यासुमारास या सर्व मंडळीना मोकळे करण्यात आले.

गांधीजींची अहिंसेवर पूर्ण श्रद्धा होती. मान क्रांतिकारकांच्या देशभक्तीबद्दल त्यांना पुरेपूर आदर होता. गांधीजींनी सत्याग्रहीच्या सुटकेसाठी जसे प्रयत्न केले तसेच क्रांतिकारकांचे प्राण वाचविले. त्यांनी क्रांतिकारकांच्या सुटकेसाठी किती प्रयत्न केले, अंदमानातून किती जणांची सुटका केली याची नोंद सरकारी कागदपत्रात आहे. या कामी नेता आणि पालक या दोन्ही भूमिका गांधीजींनी पार पाडल्या.

या १९३० आणि १९३१च्या काळात भारतात डॉ. हेडगेवार यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना फोफावलेली होती. त्यांनी तर आपल्या संघटनेला या कामात नव्हे तर स्वातंत्र्य आंदोलनातही उतरू दिले नाही. याच मंडळींचा हिंदू महासभा नावाचा पक्ष होता. त्यांनीही भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांच्या सुटकेबाबत चकार शब्दही काढला नाही. ब्रिटिश सरकारची माफी मागून सुटलेले विनायक दामोदर सावरकर या काळात गप्प होते.

आज गांधीजी आणि भगत सिंग यांच्यात नकली भांडण लावणारी मंडळी ही याच मंडळींची वारसदार आहेत. स्वातंत्र्य चळवळ आणि देश उभारणीच्या कामात ज्या विविध विचारांच्या नेत्यांनी हा बहुसांस्कृतिक, सहिष्णू आणि राज्यघटनेच्या आधारावर देश घडविण्यासाठी आपले जीवन वेचले तो इतिहास पुसून खोटा इतिहास रचण्याचे काम माफी मागणार्याांचे वारसदार करत आहेत. आपल्याला देशाचा खरा इतिहास जाणून घेउन त्याचे संवर्धन करायचे आहे कारण कारण त्यातच या देशाचे उज्वल भवितव्य दडलेले आहे.

वाचा : मौलाना आजाद : भारतरत्न नाकारणारा अवलिया

वाचा : हसरत मोहानी : संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे पहिले राष्ट्रवादी

गांधीजींची हत्या आणि ५५ कोटी

​​गांधीजींनी देशाची फाळणी केली. त्यांनी मुस्लिमांचे लाड केले. हिंदूंचा छळ केला. धार्मिक दंगे झाले. त्यांनीच पाकिस्तानला ५५ कोटी द्यायला लावले. त्यामुळेच नथूराम गोडसेने भडकून गांधीजींवर गोळ्या झाडल्या. असं सतत सांगण्यात येते. एखादी गोष्ट सतत सांगत राह्यली की ती आपल्याला खरी वाटायला लागते. ही प्रचाराची पद्धत हिटलरचा प्रचारमंत्री गोबेल्सची आहे. हे सतत आपण जे ऐकत आहोत ते कसं धादांत खोटे आहे ते आपण बघूच. त्याचबरोबर ते असं का करतात, त्यांचा हे करण्याचा हेतू काय तेही बघू.

आपल्या देशात गेली कित्येक शतके हिंदू आणि मुस्लिम एकत्र नांदत आहेत. घरात कधी-कधी भांडणे होतात तशी या दोघांच्यातही कधी-कधी भांडणे होतात, म्हणून कोणी घर तोडायला जात नाही. भांडणे कधी कधी होतात पण प्रेमासंबंधाचे धागे बळकट असतात. हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीसंगम इतका घट्ट आणि खोलवर आहे की त्यांना विलग करण्यासाठी ब्रिटिशांना खूप आटापिटा करायला लागला. स्वामी विवेकानंद म्हणाले आहेत, “मुसलमानांनी हिंदूंवर मिळविलेला विजय हा गोरगरिबांच्या आणि दलितांच्या उन्नतीला कारणीभूत झाला. म्हणूनच आमच्यापैकी एक पंचमांश लोक मुसलमान झाले. केवळ तलवारीच्या बळाने हे सर्व धर्मांतर घडले असे म्हणणे कमालीचे वेडेपणाचे ठरेल.” ते पुढे म्हणतात, “वेदांती आत्मा आणि इस्लामी देह धारण करूनच आधुनिक भारताची प्रगती होईल.”

न्यायमूर्ती रानडे यांनी सुद्धा हिंदू मुस्लिम एकतेचा पुरस्कार केला तर १९१६मध्ये लोकमान्य टिळकांनी लखनौ करार केला. या कराराप्रमाणे मुसलमानांना ५० टक्क्यापर्यंत राखीव जागा देण्यात आल्या होत्या. “परकीय सरकारशी भांडून यशस्वी होण्यासाठी हिंदू मुसलमानांनी आपापसातील भांडणे कसेही करून मिटविली पाहिजेत. सर्व धर्मभेद, जातिभेद आणि मतभेद मिटवून एकच मागणी केली पाहिजे.” या वृत्तीने टिळकांनी हा करार केला होता. (बिपीन चंद्र, भारत का स्वतंत्रता संग्राम, १४वी आवृत्ती, पान-१२०)

स्वामी विवेकानंद, न्या. रानडे आणि लोकमान्य टिळकांवर कुणीही मुस्लिम धार्जिणेपणाचा आरोप करत नाही, आणि गांधीजींनी मुस्लिमांच्या सवलतीसाठी काहीही केलेले नसताना त्यांच्यावर सरसकट आरोप केला जातो. मुस्लिमांचे लाड करणारे गांधीजी असा आरोप करतांना म्हटले जाते की गांधीजींनीच फाळणी केली. आता खरं काय आहे ते बघू.

१९३७ सालच्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात वि.दा. सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. म्हणजे दोन राष्ट्रे वेगवेगळी आहेत एक नव्हेत हे जीनांच्या आधी हिंदुराष्ट्रवादी सावरकरांनी मांडले. ते म्हणाले, “Indian cannot be assumed today to be a Unitarian and homogeneous nation. But on the contrary there are two nations in the main the Hindus and the Muslims (संदर्भ: समग्र सावरकर वाडमय, पान-२९६).

देशातील तापलेल्या वातावरणात अखंड हिंदुस्तानचा घोष करून तेल ओतायचे आणि दुसरीकडे द्विराष्ट्रवाद मांडत राह्यचा. १९४३ साली सावरकर म्हणतात, “I have no quarrel with Mr. Jinnah’s two nation’s theory. We the Hindus are a nation by ourselves; and it is a historical fact that the Hindus and Muslims are two nations.”

गांधींना उघड विरोध आणि जिना आणि ब्रिटिशांना छुपा पाठिंबा अशी कुटील नीती हिंदुराष्ट्राचे प्रवक्ते वि.दा. सावरकर खेळत होते. गांधीजींनी फाळणी होऊ नये म्हणून अतोनात प्रयत्न केले. जीनांच्या सोबत झालेल्या १३ बैठका निष्फळ ठरल्या. अखंड भारताच्या प्रमुखपदी जिनांना बसवावे ही मागणी गांधीजींनी केली. तीसुद्धा जीनांनी फेटाळून लावली. गांधीजींचे सर्व प्रयत्न असफल ठरविले गेले.

आता नवीन प्रश्न निर्माण होतात की फाळणी होत असताना हे हिंदुत्ववादी, म्हणजे अखंड हिंदुस्थानचे पुरस्कर्ते काय करत होते? हीच मांडली अहिंसेची टिंगल करून सशस्त्र क्रांतीचा उदोउदो करत होती. मग त्यांच्या बंदुका, पिस्तुले कुठे गेली होती? पाकिस्तानचे पुरस्कर्ते मुहंमदअली जिना, हैदराबादचे निजाम हे सगळे सुखात होते. या सशस्त्र क्रांतीच्या पुरस्कर्त्यांनी १९४७ पर्यंत एकही गोळी उडविली नाही. एकाही मुस्लिम शत्रूला किंवा ब्रिटिश शत्रूला त्यांनी मारलं नाही. फक्त त्यांची गोळी त्यांनी फक्त गांधीजींसाठीच का राखून ठेवली होती? आतापर्यंत आपण हिंदुत्ववाद्यांचा दुटप्पीपणा पाह्यला. आता आपण त्यांनी पसरविलेल्या अफवा आणि त्यांनी गांधीजींना का मारले असावे याकडे वळू.

‘भारताची फाळणी’ झाली. एका घराची दोन घरे झाली. दोन घरे करताना संपत्तीची वाटणी करावी लागते, तशीच दोन देश झाल्यावर संपत्तीची वाटणी करायचा करार झाला. पाकिस्तानला ७५ कोटी देण्याचे ठरले. त्यातले २० कोटी दिले गेले. त्यानंतरच्या काळात काश्मिरी टोळीवाल्यांनी काश्मीरवर आक्रमण केले. काश्मीरवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आक्रमण केले म्हणून आपण ५५ कोटी देउ नयेत अशी भूमिका मांडण्यात आली. मात्र हे पैसे देण्यात यावेत असा आग्रह लॉर्ड माउंटबेटन, चक्रवर्ती राजगोपालचारी आणि रिझर्व बँकेचे तत्कालीन गव्हर्नर सी.डी. देशमुख यांनी धरला. हे पैसे द्यावेत कारण तसा करार झालेला आहे आणि नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाने पहिल्याच आंतरराष्ट्रीय कराराचा भंग केल्यास जगभर विपरीत संदेश जाईल आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होईल, अशी त्यांची मांडणी होती. ही झाली ५५ कोटी रकमेची कहाणी.

मुळात गांधीजींनी ५५ कोटीसाठी उपोषण केलेच नव्हते. गांधीजींचे उपोषण १३ जानेवारी १९४८ साली सुरू झाले. १४ जानेवारीला पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने एकमताने घेतला. मात्र गांधीजींचे उपोषण १८ जानेवारीपर्यंत सुरू होते. उपोषण सुरू करण्याचा उद्देश आणि उपोषण सोडताना ज्या गोष्टींची गांधीजींनी हमी घेतली त्यातही ५५ कोटीचा उल्लेख नव्हता. (महात्म्याची अखेर, पान-४३).

वाटणीच्या करारामध्ये या ७५ कोटी रकमेसोबत अनेक साहित्याची वाटणी करायचे ठरले होते. तो करार वाचून ती वाटणी त्याप्रमाणे झाली का याची तपासणी कोणत्याही आरोप करणार्याने केली नाही. रेल्वेच्या काही वाघिणी भरून दारुगोळा आणि युद्धसाहित्य देण्याचेही या करारात नमूद केले होते. मात्र भारताने ते दिले नाही. याबद्दल ५५ कोटीबद्दल आरोप करणारे मौन का पाळतात? गंमतीचा भाग म्हणजे १४ जानेवारी १९४८ रोजी मंत्रिमंडळाने पाकिस्तानचे ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय एकमताने घेतला. या मंत्रिमंडळात हिंदू महासभेचे डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी होते. या निर्णयाला विरोध केला नाही किंवा मंत्रिमंडळाचा निषेध म्हणून राजीनामा देऊन बाहेर पडले नाहीत.

गांधीजींचा खून होण्यापूर्वी त्यांच्यावर एकून पाच खुनी हल्ले झाले हे कपूर कमिशन पुढे आलेल्या साक्षीवरून सिद्ध झाले आहे. २५ जून १९३४ रोजी पहिला हल्ला पुण्यात झाला. त्यांच्या गादीवर बॉम्ब टाकला गेला. सप्टेंबर १९४४ मध्ये सेवाग्राम आश्रमातून गांधीजी मुंबईला जायला निघाले असताना हिंदुमहासभेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यावेळी पोलिसांनी नथूराम गोडसे आणि ल ग थत्ते यांना अटक केली. २९ जून १९४६मध्ये गांधीजी मुंबई पुणे प्रवास करत असताना रेल्वेपुढे मोठ्या मोठ्या दरडी पसरण्यात आल्या.

आपल्याला हे दिसून येईल की गांधीजींवर झालेले हल्ले हे प्रामुख्याने महाराष्ट्रात झालेले आहेत. आणि पहिला हल्ला १९३४ मध्ये म्हणजे १९३२च्या येरवडा करारानंतर झाले आहेत.

अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ देऊ नयेत म्हणून गांधीजींनी उपोषण केले आणि शेवटी गांधी आंबेडकर करार झाला. या करारातून अस्पृश्यांना अपेक्षेपेक्षा खूपच जास्त राखीव मतदारसंघ मिळाले. त्यानंतर गांधीजींनी हरिजन सेवेस वाहून घ्यायचे ठरविले. गांधीजींनी देशभर झंझावाती दौरे केले. त्यांच्या प्रेरणेमुळे अनेक मंदिरे आणि पाणवठे दलितांसाठी खुले झाले. सामुदायिक भोजनाचे कार्यक्रम होउ लागते. खुलेआम आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार होऊ लागला, गांधीजींनी तर जाहीर केले की ते फक्त आंतरजातीय विवाहांनाच हजर राहतील. मात्र हे करत असताना गांधीजींची भाषा धर्माचीच होती. त्यांच्या भाषणातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जात नव्हत्या ते धर्माच्या गाभ्याच्या आधार घेऊन हिंदुजनांच्या सद्सद्विवेकबुद्धीला आवाहन करत असत. इथेच हिंदुत्ववाद्यांचे धाबे दणाणले.

गांधीजींच्या धार्मिक आवाहानांपुढे त्यांच्या प्रचाराचा प्रभाव पडेनासा झाला. सच्चा हिंदू आणि सच्चा मुसलमान यात मला फारका दिसत नाही हे गांधीजींचे सांगणे जनतेने स्वीकारले मात्र यातून अस्वस्थ झाले ते फाळणीची मागणी करणारे जिना आणि द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त मांडणारे हिंदुत्ववादी. ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा राजकारणाचा भाग म्हणून जिना आणि मुस्लिम लीगला दत्तक घेतले होते. मात्र स्वातंत्र्य चळवळीशी काहीही संबंध नसलेल्या रा स्व संघ आणि हिदुत्ववादी मंडळींना भारतीय जनतेने गांधीजींच्या विचाराचा केलेला स्वीकार भयानक अस्वस्थ करत होता.

भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या निर्णयाने देशात दंग्यांचा आगडोंब उसळला. सीमावर्ती भाग आणि देशातील काही भागात हिंदू मुस्लिमांनी एकमेकांची कत्तल सुरु केली. लाखो हिंदू आणि मुस्लिम यात मारले गेले. धार्मिक द्वेषाचे विष भारतीय मनात पसरू लागले. मात्र यावेळी दंगली थांबवायला जिना आणि त्यांची मुस्लिम लीग नव्हती. त्यांना त्यांचे पाकीस्तान मिळाले होते.

हिंदुत्ववादी मंडळी दंगल थांबविण्याच्या प्रक्रियेत कुठेच सामील नव्हती. फक्त महात्मा गांधी देशभर फिरत होते. त्यावेळीही गांधीजींचा प्रभाव सर्वांना कळला. हा माणूस जेथे जातो तेथील दंगे थांबतात. दोन्ही धर्मातील गुंडांना पश्चाताप होतो. हत्यारे स्वखुशीने त्यागली जातात. हिंदू मुस्लिम एकल येतात. समाजजीवन सुरळीत होते. म्हणजे जोपर्यंत गांधी जिवंत आहेत तोपर्यंत आपण शूद्रातिशूद्रांना परंपरेप्रमाणे वागवू शकणार नाही आणि हिंदू मुसलमानांमध्ये तेढ निर्माण करू शकणार नाही हे हिंदुत्ववाद्यांना स्पष्ट झाले. आपल्या विचारातील मोठा अडथळा गांधी हाच आहे हे त्यांना कळून चुकले.

न्यायालयात हे सिद्ध झाले की गांधींच्या खुनाचा कट १ जानेवारी १९४८ पूर्वीच रचण्यात आला होता. त्यावेळी ५५ कोटी हा विषय नव्हता. खुनाचे कारण वेगळेच आहे.

स्वातंत्र्य चळवळीतून निर्माण झालेला राष्ट्रवाद हा आक्रमक आणि हिंसक नाही तर सर्वसमावेशक आणि बहुसांस्कृतिकतेचा पुरस्कार करणारा आहे. या राष्ट्रवादाला संस्कृतीचे नेमके भान आहे. भारतीय संस्कृतीतील सर्वसमावेशकता, विविधता, अनेक चालीरीतीचा मिलाफ आणि त्यातील परस्पर प्रेम आणि सौहार्द यातूनच गांधीजींना सर्वधर्मसमभावाचा विचार पुढे न्यायचा होता. या विचारांच्या मिलाफातून नवीन सुंदर भारत घडविण्यास विरोध करणाऱ्या विचारांनीच गांधीजींना ठार मारले.

(सदरील लेख ‘गांधी समजून घेताना’ या पुस्तिकेतील आहे.)

मूळ पुस्तिका
गांधी समजून घेताना
पाने : १६
देणगी मूल्य : रुपये २/- 
प्रकाशक : सेवाग्राम कलेक्टीव्ह : द्वारा: मुंबई सर्वोदय मंडळ, शांताश्रम २९९ ताडदेव रोड, नाना चौक, मुंबई ४००००७

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: महात्मा गांधींविरोधी दुष्टप्रचार आणि वस्तुस्थिती
महात्मा गांधींविरोधी दुष्टप्रचार आणि वस्तुस्थिती
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj1DqnPjnjL5663RVU4DyetrKaew_sazmPuB9QEqKBg4mvv5XUYJ2Yp77XP04Uf26Ds2ftOi9sBSYpyv9zzteks3Jku6JJk0wLEP9zglIYJf0JJVOLXRuDW9LffrVDJKfCtcatAPAuxJw45QlCYsjEdCLpPxTiaDIAaEmIYs1ejVQSm3OpH4Up0Hz223IqD/w640-h426/mahatma_gandhi_master_mediator.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj1DqnPjnjL5663RVU4DyetrKaew_sazmPuB9QEqKBg4mvv5XUYJ2Yp77XP04Uf26Ds2ftOi9sBSYpyv9zzteks3Jku6JJk0wLEP9zglIYJf0JJVOLXRuDW9LffrVDJKfCtcatAPAuxJw45QlCYsjEdCLpPxTiaDIAaEmIYs1ejVQSm3OpH4Up0Hz223IqD/s72-w640-c-h426/mahatma_gandhi_master_mediator.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2023/01/blog-post_31.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2023/01/blog-post_31.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content