जेव्हा गोबेल्सने आपल्या ६ मुलांना विष पाजून केली आत्महत्या!

हिटलरच्या मृत्यूची बातमी एका दिवसानंतर म्हणजे १ मे रोजी रात्री १० वाजून २६ मिनिटांनी जर्मन नागरिकांना देण्यात आली. बातमीत म्हटलं होतं की, सोव्हिएत सैनिकांशी लढताना आज दुपारी राइक चॅन्सेलरी येथे हिटलर मारले गेले. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सोव्हिएत सैनिकांशी लढा दिला.

३० एप्रिल १९४५ रोजी अजून चॅन्सेलरीच्या बागेत हिटलरचे शरीर पूर्णपणे जळालेदेखील नव्हते, तेव्हाच त्यांच्या साथीदारांनी जवळ येत असलेल्या सोव्हिएत सैन्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यांनी आपला प्रतिनिधी म्हणून जनरल क्रेब्स यांना सोव्हिएत सैन्याचे जनरल मार्शल झुकोव्ह यांना भेटण्यासाठी पाठवलं. 

इयान करशॉ हिटलर चरित्रात लिहितात, “जनरल क्रेब्सला पाठवण्याचा फायदा असा होता की त्यांनी यापूर्वी मॉस्कोमध्ये जर्मन लष्करी अटॅशे म्हणून काम पाहिलं होतं. शिवाय त्यांना रशियन भाषा अवगत होती. क्रेब्स रात्री १० वाजता गोबेल्स आणि बोरमन यांचे पत्र आणि पांढरा ध्वज घेऊन सोव्हिएत छावणीकडे निघाले. सकाळी ६ वाजता परत येऊन त्यांनी सांगितलं की, सोव्हिएत सैन्य बिनशर्त आत्मसमर्पण करण्याचा आग्रह धरत आहे. १ मे रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आम्ही त्यांना आमची इच्छा कळवावी, अशी त्यांचं म्हणणं आहे.”

हे ऐकून गोबेल्स आणि त्यांच्या इतर साथीदारांचे चेहरे पडले आणि प्रत्येकजण आपला जीव वाचवण्याचा खटाटोप करू लागला. पण हिटलरच्या जवळच्या सहकाऱ्याने - गोबेल्सने आधीच ठरवलं होतं की तोही हिटलरसारखेच मरण स्वीकारणार होता. एक दिवस आधीच म्हणजे ३० एप्रिल रोजी हिटलरने आत्महत्या केल्यानंतर गोबेल्सची पत्नी मॅग्डा गोबेल्सने पहिल्या लग्नातून जन्मलेल्या तिच्या मुलाला एक पत्र पाठवले, ज्यात तिनं पती आणि चार मुलांसह आपण आत्महत्या करणार असल्याचं कळवलं.

१ मे रोजी सांयकाळी डॉक्टर हेलमट गुस्ताव कुंज यांनी गोबेल्सच्या सहा मुलांना, हेल्गा, हिल्डा, हेलमट, होल्डे, हेडा आणि हीडे यांना मॉरफ़ीनचं इंजेक्शन दिलं, जेणेकरून त्यांना झोप येईल.

जोरकिम फ़ेस्ट त्यांच्या ‘इनसाइड हिटलर्स बंकर’ ह्या पुस्तकात लिहितात, “यानंतर हिटलरचे खासगी चिकित्सक लुडविग स्टंपफेगर यांच्या उपस्थितीत, कोणीतरी या मुलांचे तोंड उघडले आणि मॅग्डाने हायड्रोजन सायनाइडचे काही थेंब त्यांच्या घशात टाकले. फक्त हेल्गा ह्या त्यांच्या मोठी मुलीने विरोध दर्शवला. या १२ वर्षीय मुलीच्या अंगावरील ओरखड्यांवरून अंदाज लावता आला की, तिने अशा प्रकारे विष प्राशनाचा विरोध केला होता. या सर्वांचा क्षणार्धात मृत्यू झाला. यानंतर मॅग्डा गोबेल्स बंकरमध्ये पोहोचली, तेव्हा नवरा (गोबेल्स) त्यांची वाट पाहत होता. त्यांनी त्याला फक्त तीन शब्द म्हटले, ‘काम झालं आहे.’ त्यानंतर ती हमसून हमसून रडू लागली.

वाचा : हिटलर : एक अटळ आत्महत्या

वाचा : हिटलरविरोधात लढणारी विरांगना : नूर इनायत खान

गोबेल्स आणि त्यांच्या पत्नीनेही सायनाइड गिळले

रात्री साडेआठ वाजता गोबेल्सने काही न बोलता अचानक टोपी आणि ग्लव्स घातले. ते आणि त्यांची पत्नी बंकरच्या पायऱ्या चढू लागले. तीन दिवसांपूर्वी हिटलरने दिलेला पक्षाचा गोल्डन बॅज मॅग्डाने परिधान केला होता. पायरी चढताना गोबेल्सनी त्यांच्या टेलिफोन ऑपरेटर रोहस मिशला म्हटलं, “तुझी आता गरज नाही.”

रिचर्ड जे. इव्हान्स त्यांच्या ‘द थर्ड राइक अॅट वॉर’ पुस्तकात लिहितात, “बंकरमधून बाहेर पडण्यापूर्वी गोबेल्स जोडपं थोडं थांबलं आणि नंतर सायनाईडची एक कॅप्सूल चघळली. काही सेकंदातच दोघांचा मृत्यू झाला. एसएसच्या एका सैनिकाने दोघे मरण पावल्याची खात्री करून घेण्यासाठी त्यांच्या शरीरावर दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर दोघांच्या मृतदेहाला आग लावण्यात आली.

हिटलर आणि इव्हा ब्रॉऊनला जाळल्यानंतर फारच कमी पेट्रोल शिल्लक राहिलं होतं. त्यामुळे गोबेल्स आणि मॅग्डा यांचे मृतदेह पूर्णपणे जळू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी सोव्हिएत सैन्य चॅन्सेलरीमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी दोघांच्या मृतदेहाची सहजपणे ओळख पटवली.

जेव्हा सोव्हिएत सैनिकांनी रीच चॅन्सेलरीमध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांना जनरल बर्गडॉर्फ आणि जनरल क्रेब्स एका टेबलावर बसलेले दिसले. त्यांच्यासमोर दारुच्या अर्ध्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या आणि ते दोघेही जिवंत नव्हते. तत्पूर्वी बंकरमध्ये असलेल्या सर्व महत्त्वाच्या फायली जाळून टाकण्यात आल्या.

एसएस सैनिकांनी कुठूनतरी पेट्रोलची सोय केली आणि हिटलरच्या अभ्यास कक्षाला आग लावली. मात्र वेंटिलेशन सिस्टम बंद असल्याने आग अधिक पसरू शकली नाही आणि खोलीतील फक्त फर्निचर नष्ट होऊ शकले.

वाचा : सावरकरांच्या बढाईकरणाचं सांस्कृतिक षड्यंत्र !

वाचा : गांधी हटवण्याची ‘लिटमस’ टेस्ट

गोरिंगनेही गिळले विषारी कॅप्सूल

बंकरमध्ये राहणारे बाकीचे लोक रात्री अकराच्या सुमारास बाहेर पडण्यात यशस्वी झाले. सर्वजण कसे तरी अंडरग्राउंड असलेले रेल्वे स्टेशन फ़्रीडरिचस्ट्रासला यशस्वीपणे पोहोचू शकले. त्यांच्या आजूबाजूला विध्वंस माजले होते आणि सर्वत्र सोव्हिएत बॉम्ब पडत होते.

इसान करशॉ हिटलर चरित्रात लिहितात, “हिटलरचे आणखी दोन सहकारी बोरमन आणि स्टंपफेगर कसे तरी इनव्हॅलिड स्ट्रासेपर्यंत पोहोचले. जेव्हा त्यांनी तिथं रेड आर्मी पाहिली तेव्हा त्यांनीही अटक टाळण्यासाठी विष प्राशन केलं. हिटलरप्रमाणेच त्यांच्या अनेक साथीदारांना भीती होती की, त्यांच्यावर खटला चालवला जाईल. त्यांची सार्वजनिकरित्या हेटाळणी केली जाईल आणि त्यांच्या मृतदेहाची विटंबना होईल.”

९ मे १९४५ रोजी अमेरिकन सैन्याने हिटलरचे आणखी एक साथीदार हरमान गोरिंगच्या बावारिया स्थित निवासस्थानात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी स्वत: शरणागती पत्करली.

रिचर्ड जे. इव्हान्स लिहितात, “त्याचा असा समज होता की, अमेरिकन त्यास पराभूत राजवटीतील एक महत्त्वाची व्यक्ती मानतील. तसंच शरणागतीच्या अटींवर वाटाघाटीची बोलणी करण्यासाठी त्याचा वापर करतील. अमेरिकन कमांडरने त्याच्याशी हस्तांदोलन केलं आणि त्याला खाण्यास भोजनही दिलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर यांना जेव्हा हे कळलं, तेव्हा त्यांनी ताबडतोब गोरिंगला तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. त्याच्या अमली पदार्थांच्या व्यसनावर बंद लावली आणि त्याची चौकशी सुरू करण्यात आली.

गोरिंगला त्याने केलेल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नव्हता. परिणामी त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. फाशी देण्याऐवजी गोळीबार पथकाकडून मारण्यात यावे, अशी विनंती गोरिंगने केली. त्याची विनंती धुडकावून लावल्यावर त्याने एका गार्डच्या मदतीने विषारी कॅप्सूल हस्तगत केली आणि १५ ऑक्टोबर १९४६ रोजी आत्महत्या केली.

वाचा : ‘मारो-काटो’ संस्कृतीचे समर्थन धोकादायक

वाचा : फ्रांसचा सेक्युलर इस्लामफोबिया

हिमलरनेही केली आत्महत्या

हेनरिक हिमलरचाही असाच शेवट झाला. त्यांनी कसं तरी एल्बे नदी पार केली पण ते ब्रिटिश सैनिकांच्या हाती लागले. हिमलरने त्यावेळी अतिशय घाणेरडे कपडे घातले होते. जेव्हा त्यांना कळून चुकलं की, आपला खेळ संपला आहे, त्यावेळी त्यांनी डोळ्यांवरील पॅच काढून चष्मा चढवला. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ विषाची एक छोटी कुपी आढळून आली.

असे असूनही ब्रिटिश अधिकाऱ्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. रिचर्ड जे. इव्हान्स लिहितात, “जेव्हा डॉक्टरांनी हिमलरला तोंड उघडण्याचा आदेश दिला, तेव्हा त्यांना त्यांच्या दातांमध्ये एक काळी वस्तू दिसली. जेव्हा त्याने आपले डोके प्रकाशाकडे वळवले, तेव्हा हिमलरने त्वरीत दातांनी त्या काळ्या वस्तूला चावून टाकलं. त्यांनी ग्लास सायनाइड कॅप्सूल चावली होती. मरण येण्यासाठी त्यांना फक्त काही सेकंद लागले. त्यावेळी ते फक्त ४४ वर्षांचे होते.”

बर्लिनमध्ये आत्महत्यांची संख्या अचानक वाढली

हिमलर पाठोपाठ आणखी एक एसएस अधिकारी, ओडिलो ग्लोबॉकनिक यानेदेखील विष प्राशन केले. अर्न्स्ट ग्राविट्ज़नेही स्वत:ला आणि त्याच्या कुटुंबाला हँडग्रेनेडने उडवले. आणखी एक एसएस अधिकारी आणि मानसिकदृष्ट्या आजारी व शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तींच्या इच्छामरणाची व्यवस्था पाहणारे फिलीप बोहेलर यांनीदेखील १९ मे १९४५ रोजी पत्नीसह आत्महत्या केली.

राइक सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख अरविन बुमकेनेही स्वत:ला मारून टाकले. हिटलरचे अतिजवळचे मुख्य लष्करी अधिकारी फील्ड मार्शल वॉल्टर मॉडेल यांनी हत्यार खाली ठेवण्याची शरम टाळण्यासाठी डज़लडॉर्फ़जवळील जंगलात स्वतःवर गोळी झाडून घेतली. रुडॉल्फ हेसला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनी आपल्या आयुष्याची शेवटची वर्षे तुरुंगात एकाकी घालवली. १९८७मध्ये वयाच्या ९३व्या वर्षी तुरुंगात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

क्रिस्टियन गोएसचेल यांनी त्यांच्या ‘सुसाइड अॅट द एंड ऑफ द थर्ड रीच’ या पुस्तकात लिहिलं आहे की, “सरकारी आकडेवारीनुसार बर्लिनमध्ये मार्चमध्ये २३८ आत्महत्या झाल्या होत्या. परंतु एप्रिलमध्ये त्यात वाढ होऊन त्यांची संख्या ३८८१ झाली. बहुतेक सुसाईड वर्तमान परिस्थिती आणि सोव्हिएत हल्ल्याचा भीतीने झालेली असल्याचं सांगितलं गेलं. बहुतेक पालकांनी आपल्या मुलांना मारून स्वतःचा जीव घेतला.”

वाचा : काफ़िराना : सांप्रदायिक व धर्मांधतेला नेमस्त उत्तर

वाचा : ‘काश्मिर फाइल्स’च्या अनुपम अंकलना पत्र

आइशमान इस्रायली हेरांच्या हाती

जर्मन लेबर फ़्रंटचे प्रमुख रॉबर्ट ले यांना अमेरिकन सैन्याने तिरोलच्या टेकड्यांवर पकडले. २४ ऑक्टोबर १९४५ रोजी त्याने न्युरेमबर्ग येथील तुरुंगातील शौचालयात स्वत:च्या हातांनी गळा दाबून आत्महत्या केली. माजी परराष्ट्र मंत्री जोआकिम रिबेनट्राप आणि हिटलरचे मुख्य लष्करी सल्लागार अल्फ़्रेड जोडी यांना १६ ऑक्टोबर १९४६ रोजी गोळ्या घालण्यात आल्या. त्यांच्या निधनावर फार कमी लोकांनी शोक व्यक्त केला.

आणखी एक युद्ध गुन्हेगार अॅडॉल्फ आइशमन बनावट ओळखपत्रांच्या मदतीने भूमिगत होण्यात यशस्वी झाला. त्याने अर्जेंटिना गाठले. तिथली जुआन पेरो सरकार अनेक नात्झी आणि एसएस सैनिकांना आश्रय देत होती.

मे १९६०मध्ये फ्रिट्झ बेअर या जर्मन ज्यूने आइशमानची राहण्याची जागा शोधून काढली. त्यानंतर इस्रायली हेरांनी त्याचं अर्जेंटिनामधून अपहरण केलं. त्याला जेरुसलेममध्ये आणून त्यावर नरसंहाराचा खटला चालवला गेला. परिणामी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ३१ मे १९६२ रोजी त्याला फाशीवर चढवण्यात आलं.

सोव्हिएत महिला सैनिकांनी इवा ब्राउनचे कपडे पळवले

हिटलरच्या मृत्यूनंतर लढाई थांबविण्याचा आदेश जारी झाला. परंतु बर्लिनच्या काही भागांमध्ये २ मे आणि त्यानंतरच्या दिवशीही लढाई सुरूच होती. चीफ़ इंजीनियर जोहानेस हेंटशेल बंकरमध्ये लपून बसले होते. २ मे रोजी त्यांना बंकरला जोडून असलेल्या बोगद्यातून काही महिलांचे आवाज ऐकू आले. थोड्या वेळाने त्यांनी पाहिलं की रशियन गणवेशातील १२ महिला बोगद्यातून बाहेर आल्या. त्या रेड आर्मीच्या मेडिकल कॉर्प्स युनिटच्या सदस्य होत्या.

जोरकिम फ़ेस्ट आपल्या ‘इनसाइड हिटलर्स बंकर’ पुस्तकात लिहितात, “त्या सैन्याची पुढारी असलेल्या एका महिलेने हेंटशेलशी प्रभावी जर्मन भाषेत विचारले, हिटलर कुठे आहे? त्यांचा पुढचा प्रश्न हिटलरच्या पत्नीबद्दल होता. त्यांनी हेंटशेलला म्हटलं की, त्यांनी सर्वांना इवा ब्राउनच्या खोलीपर्यंत घेऊन जावं. तिथं पोहोचल्यावर त्या महिलांनी इवा ब्राऊनचे वॉर्ड रोब उघडले आणि त्यांनी सोबत आणलेल्या पिशव्यामध्ये जे काही होतं ते भरलं. सर्वजण खोलीतून बाहेर पडले, तेव्हा त्यांना अत्यानंद झाला होता, कारण त्यांच्या हातात इवा ब्राउनचे अंडरगार्मेंट्स होते.”

वाचा : इस्लामशिवाय जग कसे असते ?

वाचा : आयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल!

हिटलरने सुरू केलेल्या युद्धात ५ कोटी लोक मारले गेले

२ मे १९४५ रोजी बर्लिनमध्ये काही जर्मन सेनापतींनी आपल्या सैनिकांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगितले. ह्या कृतीचं समर्थन करीत त्यांनी म्हटलं की, हिटलरने स्वतःला मारून आम्हा सर्वांना परिस्थीतीवर सोडून दिलं आहे. 

हेनरिक ब्रेलोएर यांनी त्यांच्या ‘गेहाइम उमवेट’ या पुस्तकात लिहिलं आहे की, “हिटलरच्या मृत्यूवर जर्मनीमध्ये शोक व्यक्त करणारे कोणतेही दृश्य दिसले नाही. आठ वर्षांनंतर जेव्हा स्टॅलिनचा मृत्यू झाला, त्यावेळी जसे रशियन लोक रडले, तसे कोणीही (हिटलरच्या मृत्युवर) जर्मन रडताना दिसला नाही. सकाळच्या प्रार्थनेवेळी काही शाळांमध्ये हिटलरच्या मृत्युची वार्ता आली, त्यावेळी काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले गेले.”

मानवी इतिहासात याआधी कधीही अशा नासधूसीला एका व्यक्तीला जोडून पाहिले गेलं नव्हतं. हिटलरने त्या युद्धाला सुरुवात केली होती, ज्यात ५ कोटी लोकांचा जीव गेला. एकट्या बर्लिनवर विजय मिळवण्यासाठी सोव्हिएत युनियनने आपले ३ लाख सैनिक गमावले. सुमारे ४०,००० जर्मन सैनिकही मारले गेले. तर ५ लाख जर्मन सैनिक युद्धकैदी बनले. 

सोव्हिएत सैन्याने २ मे १९४५ रोजी ३ वाजता राइक चॅन्सेलरीमध्ये प्रवेश केला. त्यांना कोणत्याही प्रतिकाराला सामोरं जावं लागलं नाही. लेफ़्टिनेंट इवान क्लिमेंको हिटलरच्या बंकरमध्ये प्रवेश करणारे पहिले सोव्हिएत सैनिक होते. त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना ‘हिरो ऑफ द सोव्हिएत युनियन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

(सदरील लेख रेहान फ़जल यांनी बीबीसीसाठी लिहिला होता. त्याचा ‘नजरिया’ ब्लॉगसाठी मराठी अनुवाद कलीम अजीम यांनी केलेला आहे.)

मेल-kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: जेव्हा गोबेल्सने आपल्या ६ मुलांना विष पाजून केली आत्महत्या!
जेव्हा गोबेल्सने आपल्या ६ मुलांना विष पाजून केली आत्महत्या!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9InGRVE-iKwdWb-3sALUmynKFOLmKndej5wQNqmQN5wqEoyVwsQ_lv_4dVR4FZns5qwAzCtBNhb2LY6HErbLbwE2lIpkxjGVCF4HHIRug8vZJoyLbS4ex6FFEUH0FLgdXcmVlbSWZjCHZEmK6XnD4pAB5XMbD0rxAIKM6Mum39sIJNPdawicECW4ngA/w640-h400/Globels.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9InGRVE-iKwdWb-3sALUmynKFOLmKndej5wQNqmQN5wqEoyVwsQ_lv_4dVR4FZns5qwAzCtBNhb2LY6HErbLbwE2lIpkxjGVCF4HHIRug8vZJoyLbS4ex6FFEUH0FLgdXcmVlbSWZjCHZEmK6XnD4pAB5XMbD0rxAIKM6Mum39sIJNPdawicECW4ngA/s72-w640-c-h400/Globels.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2022/05/blog-post_4.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2022/05/blog-post_4.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content