फ्रांसचा सेक्युलर इस्लाम फोबिया

गेल्या काही वर्षांपासून कुरआनचे एक वचन नित्य चर्चेत असते; ते असे, एका निष्पापाची हत्या करणे म्हणजे संपूर्ण मानवजातीची हत्या करणे होय.अलीकडे सूरह अल माईदाहमधील ह्या वचनाचा वापर केवळ सार्वजनिक व्यवहारात मिरवण्यासाठी व प्रभाव पाडण्यासाठी होत असतो. कारण अंमलबजावणीच्या पातळीवर हे वचन कधीचे बाजूला झाले आहे.

जगभरातील मुस्लिमांमध्ये एक गट असा आहे, जो छुप्या पद्धतीने का होईना इस्लामच्या नावाने होत असलेल्या हिंसेचे समर्थन करतो व त्यास गैर मानत नाही. ही वृती इस्लामच्या अंगभूत मुल्यांशी प्रतारणा करणारी आहे. इस्लाममध्ये हिंसक विचारांना थारा नाही. वस्तुस्थिती अशी की मुस्लिमाकडून अविचारी पद्धतीने ज्या काही हिंस्र घटना घडतात, त्या इस्लामच्याच नावाने होतात. अशा हिंसक धर्मवाद्यामुळे इस्लामची नको तितकी बदनामी झालेली आहे. मूठभर लोकांमुळे सबंध धर्म टीकेच्या केंद्रस्थानी येतो. अशा वर्तनामुळेच जगभरात इस्लाम विरोधकांची चलती झाली आहे. या सर्वांचा भयावह परिणाम जगभरात अ-राजकीय झालेल्या सामान्य वर्गाला भोगावा लागतात.

फ्रांस कार्टून प्रकरणाच्या निमित्ताने ही चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेली आहे. तिथे प्रेषित मुहंमद (स) यांचे रेखाचित्र क्लासरुममध्ये दाखविल्याने एका शिक्षकाचा शिरच्छेद झाला. सॅम्युअल पेटी नावाच्या या शिक्षकांची हत्या एका अल्पवयीन मुलाने केली.

मृताच्या शोकसभेत फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत इस्लामला जगभरात संकटातसापडलेला धर्म म्हटले. ह्या विधानावरून जगभरात फ्रांसीस राष्ट्रध्यक्षाच्या निषेधाचे मोर्चे काढले जात आहेत. निदर्शने, निषेध सभा, निंदा प्रस्ताव, बहिष्कार मोहिमा राबविल्या जात आहेत. लोकशाही राज्य व्यवस्थेत संविधानिक चौकटीत राहून निषेध व विरोध करण्याचा अधिकार प्राप्त होतो. पण त्यातून लाभ होणार नसेल तर ती कृती निर्रथक ठरते.

उलट अशा कृती संबंधित घटकांना प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवून देतात. मुळात अशा सवंग लोकप्रियतेसाठीच अशा प्रकारची कृत्य केली जातात. या विरोध प्रदर्शनाच्या निमित्ताने उजवे आणि प्रतिगामी घटक इस्लामफोबियाला खतपाणी घालत आहेत. ट्विटर व तत्सम सोशल साईटवर द्वेष व विषाची पेरणी सुरू आहे. परिणामी सामान्य मुस्लिमांमध्ये इस्लामचा चुकीचा अर्थ प्रचारित होत आहे. जे वर्तमान स्थितीत अधिक धोकादायक आहे.

या आक्रमक धोरणातून २९ ऑक्टोबरला फ्रांसच्या नीस शहरात आणखी एक धक्कादायक घटना घडली. एका हल्लेखोराने चर्चमध्ये घसून तीन जणांची चाकूने हत्या केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या या निषेध मोहिमेतून आणखी किती डोकी भ्रष्ट करायची आहेत. या द्वेशपेरणीकडे दुर्लक्ष करून निर्बुद्धपणे मोर्चे काढले जात आहेत. परिणामी अशा मोर्चांवर बोट उगारुन गैरमुस्लिमांच्या मनात इस्लाम व त्याच्या अनुयायाबद्दल भिती व दहशत निर्माण होणे स्वाभाविक आहे. अशावेळी प्रदर्शने व निषेध सभा सकारात्मक न राहता गैरअर्थ काढणारी ठरतात.

जर कुठलीही कृती नियोजनबद्ध, ठरवून आणि जाणून-बुजून होत असेल तर त्याची कारणमीमांसा तपासणे आवश्यक ठरते. पण अनेकदा ते होत नाही. एक ठराविक वर्गगट तमाशा बघण्यासाठीच उद्दिपित करून आणि ठरवून ही कृती करत असेल तर त्याला प्रतिसाद का द्यावा? हा इस्लामची व त्याच्या अनुयायाची बदनामी करण्याचा कट असू शकतो, हे का लक्षात येऊ नये? प्रत्येक वेळी अशा निर्रथक कृत्त्यांची दखल घेणे आवश्यक आहे का?

ठरवून केलेल्या कृतीपासून अलिप्त राहण्याचे व प्रतिकार न करण्याचा संदेश इस्लाम देतो. सूरह बकराहची २०८वी आयत म्हणते, “श्रद्धावंत लोकांनो, तुम्ही संपूर्ण इस्लामचा स्वीकार करा. सैतानाच्या वाटेला जाऊ नका. तो तुमच्याकरिता उघड शत्रू आहे.

वाचा: अशालिन ‘हेब्दो’ आणि इस्लाम फोबिया

वाचा : ‘शार्ली एब्दो’ हा निषेध आणि तो निषेध!

वाचा : ‘इस्लाम खतरे में’लाच रस्त्यावर उतरणार का ?

प्रेषितांचा संपूर्ण जीवनपट पाहिला तर त्यांच्या सहिष्णू व सदवर्तनाचे शेकडो उदाहरणे आहेत. अशा संयत, मितभाषी, मृदुस्वभावी व्यक्तीच्या सन्मानार्थ हिंसक कृत्य करणे योग्य आहे का? शिवाय कुरआनदेखील असे कृत्य व कथित ईशनिंदेचे (ब्लासफेमी) समर्थन करत नाही.

मौ. वहिदुद्दीन खान टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखात म्हणतात, “कुरआनमध्ये २०० वचने आहेत, ज्यातून हे दिसून येते की पैंगबरांच्या समकालीन व्यक्तींनी वारंवार अशी कृत्य केली आहेत, ज्याला आपण आज ईशनिंदा म्हणतो. ...असा अवमान शारीरिक शिक्षेचा नाही तर बौद्धिक चर्चेचा विषय राहिला आहे.” (१० जानेवारी २०११).

इस्लामचे प्रसिद्ध विचारवंत जावेद अहमद गामिधी म्हणतात, “अशा प्रकरणाला दुर्लक्ष करणे योग्य आहे. विरोध प्रदर्शन करून इतरांना प्रेषितांचा आदर करण्यासंबंधी गळ घालू नये. त्याऐवजी प्रेषितांचे व्यक्तिमत्व, त्यांचे क्रातिकारी कार्य व विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संस्थात्मक किंवा व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करावे.

श्रद्धाशील मुस्लिम अल्लाहची आराधना करतो. अल्लाहवर त्याचा विश्वास असतो. मग संबंधित कृतीची शिक्षा व निर्णय तो अल्लाहवर का सोपवत नाही! प्रेषितांचा अवमान करणाऱ्या विकृतांसाठी कुरआन म्हणते, “तुमच्या पूर्वीच्या प्रेषितांचीही थट्टा केली गेली. ज्यांनी बंड केले त्यांना मी ढील दिली आणि मग मी त्यांना धरले. किती भयानक माझी ती शिक्षा?” (सुरह अर्रअद, ३२)

व्यंगचित्र प्रकरणात कुठलीही प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्याचे मत असगर अली इंजिनियर व्यक्त करतात. प्रेषितांच्या अवमानासाठी रेखाचित्र काढण्याचे निंदनीय कृत्य निसंदेह क्लेशकारक आहे, एक श्रद्धावंत म्हणून त्याच्या वेदना होणे स्वाभाविक आहे. कुठलाही संवेदनशील व्यक्ती या घटनेचे समर्थन करू शकत नाही. पण त्यांच्या उत्तरार्थ हिंसक कृत्य करणे उचित नाही. प्रेषितांचे आदर्श जीवन व तत्त्वज्ञान याची संमती देत नाही.

वाईट कृत्याला प्रतिकार करण्यासाठी समर्थ नसाल तर त्याचा निषेध करा, ही ईमानची अट आहे. मग कोरोना संक्रमणाच्या काळात जाहीररित्या हजारोंच्या संख्येने प्रदर्शने करणे योग्य आहे का? असे मोर्चे मुस्लिमाबद्दल अपसमज पसरविण्यासाठी वापरली जातात, हे कोरोनाकाळात दिसून आले.

वास्तविकवेळोवेळी प्रेषितांची उपहासात्मक चित्रे काढून मुस्लिमांचा ठरवून रोष ओढवून घेतला जातो. अशा कृती घडल्या की मुसलमान अस्वस्थ होतातप्रतिक्रिया देतातहिंसा करतात. परिणामी कट्टरकर्मठअसहिष्णू ठरवून त्यांना झोपडले जाते. उत्तरादाखल बहुतेकवेळा विकृतांना टोकाची व हिंसक प्रतिक्रियाच अपेक्षित असते. मग अशा नियोजनबद्ध कुकर्माला मुस्लिमांनी बळी का पडावे!

इस्लामवर टीका करणे, निंदानालस्ती करणे म्हणजे मुस्लिमांना डिवचण, उत्तेजित करणे, उद्दीपित करण्याचा हा प्रकार असतो. पण त्यावर हिंसक प्रतिक्रिया न देता शांत राहण्यातच शहाणपणा असतो. अशावेळी मुस्लिमांनी संयम व सभ्यतेने वागले पाहिजे. टीकाकारांना आक्रमकरित्या नव्हे तर विचारांच्या पातळीवर, लेखनीतून उत्तरे देणे अपेक्षित आहे.

वाचा  : आईएस के जाल में फंसने से बचना होगा

वाचा : रोहिंग्या मुस्लिमांचं काय करायचं?

अपप्रचाराचा इतिहास

प्रेषितांचे अवमान व उपमर्द करण्याची ही प्रथा आजची नाही तर फार जुनी आहे. सहाव्या शतकात समान हक्क आणि आर्थिक न्यायाच्या तत्त्वाचा पुरस्कार करत इस्लाम आला. मुळात प्रेषितांनी नवा धर्म आणला नव्हता, तर अस्तित्वात असलेल्या अब्राहमी धर्माची पुनर्स्थापना केली होती. प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या मते, “प्रेषितांनी म्हटले आहे, की नवा धर्म स्थापन करण्यासाठी आलो नाही, तर अल्लाहने निर्माण केलेल्या मागील धर्मात अनिष्ट गोष्टी निर्माण झाल्या आहेत, त्या दूर करून मूळ धर्म सुधारण्यासाठी आलो आहे.” (दिव्य मराठी, २५ डिसेंबर २०१५).

अर्थात प्रेषित इब्राहिम यांच्या वंशातूनच ज्यू, ख्रिस्ती आणि पैगंबर मुहंमद (स) यांच्या इस्लाम धर्माचा विकास झालेला दिसतो. प्रेषितांनी तत्कालीन अनाचार, सरंजामशाही व शोषणावर आधारित व्यवस्था नाकारत आर्थिक समानतेला अनुसरुन राज्य स्थापन केले.

प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला हादरे बसल्याने व ती संपुष्टात आल्याने प्रेषितांविरोधात बदनामीची मोहीम सुरू झाली. पैगंबरांचे अस्तित्व नाकारणे, याचे उद्दिष्ट्य होते. यापूर्वी प्रेषित इसा यांनादेखील ज्यू धर्मियांकडून असाच विरोध झाला होता. त्यांच्याविरोधातही मोहिम राबवली गेली. कारण त्यांनीदेखील शोषणावर आधारित व्यवस्थेला खिंडारे पाडली होती.

कालांतराने पैंगबरांच्या रुपाने ख्रिस्ती सरंजामी राज्यकारभाराला आव्हान मिळाले. विशेष म्हणजे पैगंबरपूर्वीच्या प्रेषितांना इस्लामने कधी नाकारले नाही. कुरआनचे एकूण तत्त्वज्ञान या प्रेषितांच्या उपदेशाचाच सार म्हणूया. पण ज्यू-ख्रिस्तींनी मात्र पैगंबराना नाकारले. कारण त्यांनी मानवी मुल्यांची प्रतारणा करत उभ्या राहिलेल्या साम्राज्यवादाला नाकारत पर्यायी राजकीय व्यवस्था निर्मिली.

प्रेषितांनी ख्रिस्ती धर्मात सामील होण्याच्या प्रलोभनाला थारा न दिल्याने त्यांच्याविरोधात बदनामीची मोहीम सुरू झाली जी अद्याप कायम आहे. यामुळेच ज्यू, ख्रिस्ती लेखक, अभ्यासक आणि विचारवंत सातत्याने प्रेषितांचा अवमान करत असतात. असगर अली म्हणतात, “पाश्चात्त्य समाज इस्लाम आणि मुस्लिमांप्रती स्वस्थचित्त राहू शकत नाही. इस्लामला ते नेहमीच उपरा व शत्रुत्व असलेला धर्म म्हणून पाहतात.” (आधुनिक जगाचा इस्लाम, अक्षर प्रकाशन)

वाचा : इस्लामशिवाय जग कसे असते ?

वाचा : मदीनेतील ज्यू धर्मीयांचा अरबांशी संघर्ष

वाचा : इस्लामचा अवास्तव संदर्भ जिथेतिथे कशासाठी?

सिलेक्टिव्ह धर्मनिरपेक्षता

फ्रांसमध्ये सेक्युलर व्यवस्था असल्याचे प्रचारित केले जाते. तिथे ख्रिस्ती धर्मियांना विशेषाधिकार आहेत. कॅथोलिक शाळांना सार्वजनिक अनुदान व सवलती दिल्या जातात. फ्रांसमध्ये ११ आधिकारिक सुट्यामध्ये ६ कॅथोलिक महत्त्व असणाऱ्या दिवसांच्या आहेत. प्रशासनात ख्रिस्ती प्रतीकांची रेलचेल आहे.

फ्रांसच्या राष्ट्रीयवर्तनातून असे दिसते की, त्याची धर्मनिरपेक्षता म्हणजे मुसलमानांच्या धार्मिक मुद्द्यांना अस्वीकार करणे होय. हे सेक्युलर धोरण इस्लामविरोधापासून सुरू होते व प्रेषितांच्या अवमानापर्यंत संपते, असे गेल्या दशकभरातील विविध घटनांमधून दिसून आले. अभिव्यक्तीच्या नावाने इस्लामद्वेशाचे प्रयोग तिथे सातत्याने होतात.

प्रसारमाध्यमातून इस्लाफोबिय़ाला बळकटी देणारा आशय सातत्याने प्रसारित होतो. काल्पनिक साहित्यातून इस्लामद्वेशाला प्रोत्साहित केले जाते. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राष्ट्रप्रमुख याविरोधात चकार शब्द काढत नाहीत. इतरांचा धर्म, श्रद्धा आणि महामानवांची थट्टा करणे अभिव्यक्ती व इस्लामच्या द्वेशाला बळकटी देणे म्हणजे धर्मनिरपेक्षता; हे कसले धोरण?

असगर अली म्हणतात, “बुरखा घालणाऱ्या शाळकरी मुलींमुळे फ्रान्सचे शासन व राज्यकर्ते अस्वस्थ झाले. तिथल्या सरकारने हिजाब घालण्याला बंदी घातली आहे. शाळकरी मुलींनी हिजाब घातल्यामुळे फ्रांसच्या धर्मनिरपेक्षतेला कोणत्या प्रकारे धोका संभवतो हे समजणे खरोखर कठीण आहे.

अल जझिराचे विविध रिपोर्ट सांगतात की, २०१५च्या शार्ली एब्दो प्रकरणानंतर फ्रान्समध्ये मुस्लिमांना छळण्याचे प्रकार वाढले आहेत. धर्मनिरपेक्ष धोरणाच्या नावाने मुस्लिमांचे धार्मिक हक्क काढून घेणे, बुरखाबंदी, हिजाबबंदी, बुर्किनीबंदी करणे, सार्वजनिक सुरक्षेच्या नावाने पाळत ठेवणे इत्यादी प्रकार सुरू आहेत.

स्थानिक फ्रांसीसी मुस्लिमांना आपल्या धर्म श्रद्धेमुळे वर्णद्वेश आणि धार्मिक भेदभावाला सामोरे जावे लागते. स्थानिक मुस्लिमांच्या मते जाणून-बूजून त्यांना डिवचण्याचे प्रयत्न सुरू असतात. बऱ्याच काळापासून फ्रांसमध्ये इस्लाम इन फ्रांसला इस्लाम ऑफ फ्रांसमध्ये बदलण्याची मोहिम सुरू आहे. रॅडिकलायजेशन रोखण्याच्या नावाखाली मुस्लिमांच्या नागरी हक्काशी खेळले जात असल्याचा फ्रांसवर आरोप आहे. (बीबीसी, प्रवीण शर्मा, ७ ऑक्टोबर २०२०).

दोन वर्षांपूर्वी  दि गार्डियनमधला शाहिस्ता अजीज यांचा एक लेख वाचण्यात आला. त्या म्हणतात, “फ्रान्सीसी मुस्लिमांसाठी सार्वजनिक वातावरण भयग्रस्त बनले आहे. त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणे बंद केले असून त्यांना घरीच शिक्षण दिले जाते.

ऑक्टोबर महिन्यात मॅक्रोन यांनी एक वादगस्त कायदा संसदेत मांडला. त्याला इस्लामिक आक्रमतेविरुद्ध युद्धअसे म्हटले जात आहे. विधेयकात परदेशी इमामना फ्रान्सच्या मस्जिदीत नमाजचे नेतृत्व करण्यास बंदी घालण्यात आली आहे. घरात लहान मुलांना इस्लामी शिक्षण देण्यावरदेखील बंदी असेल. याशिवाय त्यात आणखी बऱ्याच वादग्रस्त तरतूदी आहेत. मुस्लिम व गैरमुस्लिम बुद्धिजीवी वर्ग व मानवी हक्क संघटनांनी विधेयकाला विरोध केला आहे. साम्यवादी गटांनी विधेयकाला इस्लामफोबियाच्या बळकटीचे हत्यार म्हटले आहे.

प्रेषितांवर जगभरातील मुस्लिमांची श्रद्धा आहे. त्यांच्या चित्रांना व प्रतीकृतींना निशिद्ध समजले जाते, अशावेळी ठरवून मुस्लिमांच्या धर्मश्रद्धांना तडा देणे कसली अभिव्यक्ती व कुठे सेक्युलर धोरण? बहुसांस्कृतिकतेचा पुरस्कार करत स्थानिक मुस्लिमांच्या धर्मश्रद्धेचा आदर होऊ शकत नाही का? कॅथोलिक धार्मिक विशेषाधिकार मात्र मुस्लिमांच्या धार्मिक विश्वासाचे रॅडिकलाइजेशन नावाने बंदोबस्त करणे ही कसली धर्मनिरपेक्षता?

वाचा : मुस्लिम समाज पुन्हा ज्ञान-विज्ञानाची वाट धरू शकेल?

वाचा : हिटलर : एक अटळ आत्महत्या

वाचा : ‘धार्मिक-सांस्कृतिक विविधता संपवण्याचा डाव’

फ्रांसमध्ये बऱ्याच काळापासून बहुसांस्कृतिकतेवर आधारित सेक्युलर धोरणे निर्माण करण्याची मागणी आहे.  यात बहुधर्मीय व विविध देशातील सांस्कृतिक प्रतीकांना स्थान द्यावे, अशा विचार मांडला जात आहे. अभ्यासकांच्या मते यूरोपीयन राष्ट्रात बहुसांस्कृतिकतेसाठी कुठलीही संविधानिक व्यवस्था नाही. मध्य-पूर्व आणि दक्षिण युरोपसह अनेक देशात राष्ट्रीयता आणि नागरिकता ख्रिस्ती धर्म विशेष म्हणजे कॅथोलिक किंवा ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती धर्माशी जोडलेली असते. त्यात बाहेरून आलेल्या अन्य धर्माच्या नागरिकाना स्थान नसते. (बीबीसी, जुबैर अहमद, २२ ऑक्टोबर २०२०) अशा परस्परविरोधी घटकांमुळे यूरोपीयन राष्ट्रात वैचारिक संघर्ष अटळ होऊन बसला आहे.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मॅक्रोन यांचे धोरण काही बाबतीत रास्त असले तरी त्यांनी उघडपणे इस्लामविरोधात भूमिका घेतलेली दिसून येते. शार्ली एब्दोच्या कार्टूनला त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानले. अशा अभिव्यक्तीशी तडजोड नाही, असेही ते म्हणाले. याचा अर्थ इस्लामद्वेशाची पेरणी करतच राहू, असे त्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सूचवले आहे. पण त्यांच्यावर टीकेच्या भडिमारासह तयार होणाऱ्या मीम्सवर त्यांना आक्षेप वाटतो. अभिव्यक्तीचे हे दुटप्पी धोरण नाही का?

बहुसांस्कृतिकचे महत्त्व

न्यूजीलँडमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात क्राईस्टचर्च मस्जिदीवर एक माथेफिरूने दहशतवादी हल्ला केला. या घटनेत ५० नमाजी मारले गेले तर ५० जखमी झाले. इस्लामफोबियातून ही घटना घडली होती. पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांनी मुस्लिमांना विश्वास दिला की या कठिण प्रसंगी देश पाठिशी आहे.

त्यांनी मोहल्ल्यात जाऊन दौरे, संमेलने घेतली, बैठका घेतल्या. रमजानच्या काळात मस्जिदीमध्ये जाऊन प्रवचने दिली. दहशतीत लोटलेल्या व हताश झालेल्या मुस्लिमांना त्यांनी शब्द दिला की अशा घटना पुन्हा होणार नाही. यशस्वीरित्या त्यांनी मुस्लिमांचा विश्वास संपादन केला. निरिश्वरवादी असूनही त्यांनी ख्रिस्ती आणि इस्लामी धर्मश्रद्धांना देशात आदराचे स्थान दिले. इस्लामफोबियाला वेळीच आवर घातला.

त्याचदरम्यान जर्मनीच्या चांसलर अंजेला मर्कल यांनी इस्लामला देशाचा अविभाज्य अंग मानले. अल्पसंख्यांकांना दहशतमुक्त जगण्याचा विश्वास दिला. नुकतेच ब्रिटेनने सर्व धर्मांना सामावून घेणारे प्रतीक म्हणून डायव्हर्सिटी क्वॉइनजारी केले. धर्मा-धर्मात होणारा संघर्ष टाळणे व बहुसांस्कृतिकतेला प्रोत्साहित करण्यासाठी प्रशासनाचा हा प्रयोग आहे. वास्तविक हीच खरी सेक्युलर भूमिका! पाश्चात्त्य देशात बहुसांस्कृतिकता जोपासण्याचे असे प्रयत्न सातत्याने होत आहेत. या तुलनेत फ्रांसचे इमॅन्युअल मॅक्रोन व त्यांचे कथित सेक्युलर धोरण संशयास्पद वाटते.

दशकभराचा काळ पाहिला तर दिसते की फ्रांसने प्रतिगामी शक्तींना इस्लामविरोधात प्रोत्साहित करण्याचे धोरणे राबवली. फ्रांसचे हे धोरण म्हणजे धार्मिक संघर्ष पेटवणे व विसंवादाची दरी वाढविण्यास फायदेशीर ठरले.

वाचा : दहशतवाद आणि मुस्लिम प्रबोधनाची दिशा

वाचा : मक्केचा चक्रावणारा व रक्तरंजित इतिहास

वाचा : मुसलमानांचे राजकीय व सांस्कृतिक आत्मभान

तुर्कीची संशयास्पद भूमिका

या संबंध प्रकरणात तुर्कस्तानची भूमिका प्रखरपणे दिसून आलेली आहे. फ्रांससोबत त्याचा जुना वाद आहे. अजरबैजान व आर्मेनिया युद्धात ही दोन्ही राष्ट्रे एकमेकांविरोधात उभी ठाकली आहेत. याच मुद्द्यावरून गेल्या दोन महिन्यापासून दोघांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. शिवाय अन्य प्रकरणातही दोघांची धुसफूस आहे. तुर्कीने आपल्या स्वार्थी धोरणासाठी मुस्लिम जगताला फ्रांसविरोधात डिवचले आहे.

कथाकार सआदत हसन मंटोंच्या भाषेत सांगायचे झाल्यास तुर्कीला हिंदी मुस्लिमांशी कधीही आपुलकी नव्हती. हेच इतर प्रदेशातील मुस्लिमांना लागू पडते. तुर्की फ्रांससोबतची आपली व्यक्तिगत खुसपट काढण्यासाठी जगभरातील मुस्लिमांचा वापर करत आहे, हे राजकारण समजून घ्यावे लागेल. धार्मिक प्रश्नांचे राजकीय धोरण स्वीकारलेल्या अशा नेतृत्वापासून चार हात लांब राहण्याची ही वेळ आहे. धार्मिक प्रश्नांची राजकीय मक्तेदारी करणाऱ्या घटकापासून मुस्लिमांनी सावध भूमिका घेतली पाहिजे.

तुर्की जगातील इस्लामी जगताचे धार्मिक नेतृत्व करू पाहत आहेत. याउलट सौद घराणे अमेरिकेच्या साम्राज्यवादी धोरणाला चिकटून आहेत. त्यामुळे ते तुर्कस्तानला आपला नेता कधीच मानणार नाहीत. अशा परिस्थितीत अन्य प्रदेशातील अरबेत्तर मुस्लिमांनी अशा दांभिकाचे नेतृत्व का स्वीकारावे?

वास्तविक मॅक्रोन यांनी मांडलेले संकट इस्लाम नसून मुस्लिम जगतातील ऐतिहासिक व राजकीय धोरणामध्ये निहित आहे. प्रत्येकांनी नेतृत्व व वर्चस्ववादाचे धोरण स्वीकारले आहे. त्यातून धर्माला व धर्मतत्त्वाला हवे तसे वळविण्याचे मध्ययुगीन धोरणे राबविली जात आहे. अरबेत्तरांनी या बदलणाऱ्या घटनांचा विचार करण्याची गरज आहे.

कलीम अजीम, पुणे

मेल-kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: फ्रांसचा सेक्युलर इस्लाम फोबिया
फ्रांसचा सेक्युलर इस्लाम फोबिया
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgfxWhoRGhYFDekFUgpN9XOL2Otbb2Gun-hPkCZkBZu86ZUwI3rUgUiFBAmQJwcDMrDYSY-Blt_LYS-FtiMYaumpbmJsmXDkcTba-Rv2hTWr4jcv97URFU21lFQ46QYEj6I8Zca_Y4M0xaIDMYzNOmpHmjXdWApT5TxV2zwnjKwxFSlFoTHafCXdLq8eg/w640-h400/Macron's%20clash%20with%20Islam.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgfxWhoRGhYFDekFUgpN9XOL2Otbb2Gun-hPkCZkBZu86ZUwI3rUgUiFBAmQJwcDMrDYSY-Blt_LYS-FtiMYaumpbmJsmXDkcTba-Rv2hTWr4jcv97URFU21lFQ46QYEj6I8Zca_Y4M0xaIDMYzNOmpHmjXdWApT5TxV2zwnjKwxFSlFoTHafCXdLq8eg/s72-w640-c-h400/Macron's%20clash%20with%20Islam.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/11/blog-post_46.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/11/blog-post_46.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content