‘बेगमात के आंसू’ : १८५७ बंडातील राजकन्यांच्या व्यथा

भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा म्हणून १८५७च्या विद्रोहाला इतिहासाच्या पुस्तकात नमूद करण्यात आलेले आहे. साम्राज्यवादी सत्तेच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी देशवासीयांनी उभा केलेला हा पहिला स्वातंत्र्याचा लढा होता. यापूर्वी १८०६मध्ये वेल्लोर आणि १८४०-५०मध्य वहाबींच्या बंडाळीतून असे प्रयोग झाले होते. ब्रिटिश आमदानीतील शिपाई, शेतकरी, कामगार, छोटे व मध्यम व्यापारी, लेखक, कलावंत, साहित्यिक व राजकीय पुढाऱ्यांच्या मदतीने उभे राहिलेले हे बंड पारतंत्र भारतातील एक काळोखमय अध्याय आहे.

अल्प काळातच जुलमी ब्रिटिश सत्तेने हे बंड नृशंसपणे मोडून काढले. लाखो निष्पाप नागरिकांची क्रूरपणे हत्या घडवून आणली. येणाऱ्या कित्येक पिढ्याच्या मानवी मेंदू व स्मृतिपटलावर या प्रतिहल्ल्याच्या जखमा कोरल्या गेलेल्या आहेत. या घटनेनंतर भारतातील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिप्रेक्ष्य पूर्णत: बदलून गेला.

इतिहासाच्या विविध पुस्तकातून १५० वर्षापूर्वी या बंडाची दाहकता आपल्याला दिसून येते. ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्यवादी सत्तेला ज्यांनी-ज्यांनी विरोध केला, त्यांचा वंशविच्छेद घडवून आणला गेला. विरोधकांना नामोहरम केले गेले. शोषणावर आधारित राणीची सत्ता स्वीकारण्यास मजबूर केले गेले.

दुसरीकडे आंग्लविद्याविभूषित, प्रशासकीय शिवाय व्यापारी वर्गाने इंग्रजांसाठी हेरगिरी केली. उठावकऱ्यांची माहिती सरकारला पुरवली. परिणामी ब्रिटिशांच्या प्रतिशोधाच्या हल्ल्यात अनेकजण भरडली गेली. घर-दार, जमीन-जुमला, शहरे-गाव सोडून हजारोंच्या संख्येने स्थलांतरे झाली.

आई-वडिल, बाप-मुलगा, नाती-गोती, शेजारी-पाजारी सर्वांची ताटातूट झाली. पैसा व संपत्तीच्या हव्यासपोटी दीर्घकाळाचे मित्र शत्रू झाले. अशा अनेक शब्दातित वेदनांवर ख्वाजा हसन निजामी यांनी ‘बेगमात के आंसू’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात १८५७च्या उठावानंतर देशोधडीला लागलेल्या बहादूरशाह जफर यांच्या कुटुंबाच्या वेदनादायी कथा मांडल्या आहेत. निजामी यांनी मुघल राजपरिवारातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या व्यथा-कथा त्यांच्याच भाषेत  शब्दबद्ध केल्या आहेत.

वाचा  : यूसुफ मेहेरअली ‘चले जाव’ घोषणेचे जनक

वाचा : मौलाना आजाद : भारतरत्न नाकारणारा अवलिया

वाचा : हसरत मोहानी : संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे पहिले राष्ट्रवादी

लेखक ख्वाजा हसन निजामी यांचा जन्म १८७३ सालचा. म्हणजे १८५७च्या उठावानंतर १६ वर्षांनी ते जन्मले. निजामुद्दीन परिसराचे निवासी होते. पुरानी दिल्लीत त्यांचे बालपण गेले. निजामुद्दीन परिसरात ते भटकत. तिथे त्यांना अस्त-व्यस्त कपड्याचे, चिंध्या पांघरलेली, केस विस्कटित झालेली बटबटीत चेहऱ्यांची लोक सतत दिसायची. वडिलांना विचारल्यावर कळले की ते “मुघल राजपरिवारातील लोक आहेत. मन:शांतीसाठी अधून-मधून ते निजामुद्दीन दरगाहला येत असतात.”

ब्रिटिश सत्ता स्थिरस्थावर झाल्यानंतर काही वर्षांनी मुघल परिवारातील लोक पुरानी दिल्ली परिसरात राहायला आली होती. निजामींचे बालपण आणि शिक्षण पदच्युत मुघल शहजाद्यांच्या मुलांबरोबर झाले. राज परिवारातील लोकांच्या सहवासात राहिल्याने अनेक लोकांच्या भेटी झाल्या. त्यांच्या दु:खद वेदना समजून घेतल्या. पुढे त्यांनी या विषयावर अनेक पुस्तके लिहिली.

‘बेगमात के आंसू’ पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलेल्या मजकूरावरून कळते की, ८५ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी त्यांनी तब्बल ५०० पुस्तके लिहिली आहेत. ‘बेगमात के आंसू’देखील मूळ उर्दू भाषेत लिहिलेला एक अप्रतिम दस्तऐवज आहे. नॅशनल बुक ट्रस्टने त्याचा विविध प्रादेशिक भाषेत अनुवाद केलेला आहे.

पुस्तकात मुघल राज परिवारातील महिलांच्या वेदनादायी कथा आहेत. ज्या महिला लाल किल्ल्यातील राज महालात विलासी व सुखवस्तु जीवन जगत होत्या. महागड्या वस्तूंचा उपभोग घेत होत्या. भरजरी कपडे, सुरेख दागिणे घालत होत्या. परंतु ब्रिटिशांच्या सत्तेला मान्य करण्यास मुघलांनी नकार दिल्याने त्यांचे शाही जगणे क्षणार्धात संपुष्टात आले. ब्रिटिशांची आज्ञा न मानणाऱ्या मुघल शहजाद्यांचे सिर कलम करण्यात आले. पुरुषांना गोळ्या घालण्यात आल्या, अनेकांना भर चौकात फासावर लकटवण्यात आले. शाही महिलांची बेअब्रू झाली. त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.

ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी सत्तेने मुघल परिवाराशी अमानवी व्यवहार केला. बहादूरशाह जफर यांना अटक करून रंगूनला (म्यानमार) पाठवण्यात आले. राण्यांशी अभद्र व्यवहार करण्यात आला. राजपरिवारातील व्यक्तींच्या दिल्ली व आसपासच्या परिसरातून शोध घेत क्रूरतेने त्यांच्या हत्या करण्यात आल्या. सत्तेचा वारस संपवण्यासाठी मुघलांचा वंशविच्छेद केला गेला.

पुरुषाच्या हत्या तर शाही बेगमांचा छळ करून त्यांचे हाल हाल करण्यात आले. देशोधडीला लागलेल्या, उद्ध्वस्त झालेल्या, गुलामीचे जगणे जगत असलेल्या अशा बेगमांना शोधून त्यांचे जीवनकथन ख्वाजा हसन निजामी यांनी मांडले आहेत. 

७०-८० पानाच्या या छोटेखानी पुस्तकात एकूण ११ प्रकरणे आहेत. सात बेगम (महिला) तर उर्वरित पुरुषांच्या वेदनादायी कथा निजामींनी दिल्या आहेत. कुठलाही अभिनिवेष न बाळगता अतिशय तटस्थपणे व अतिशयोक्तपणा न आणता थेटपणे मांडणी केली आहेत. त्यातल्या काही वेदनादायी कथा प्रातिनिधिक स्वरूपात देत आहे. पुस्तकातील पहिले प्रकरण कुलसूम जमानी बेगम या बहादूरशाह जफर यांच्या मुलीचा वेदनामय प्रवास सांगणारा अध्याय आहे. ही राजकन्या इंग्रजांच्या हल्ल्यानंतर राजमातेसह घराबाहेर पडते.

त्या रात्री बादशाह बहादूरशाह जफर राजकन्येला जवळ बोलावत म्हणतात, “कुलसुम, तुला मी अल्लाहच्या हवाली केलं आहे. नशिबात असेल तर आपली पुन्हा भेट होईल. तू तुझ्या पतीबरोबर कुठेतरी निघून जा. मी ही चाललो आहेत. या शेवटच्या क्षणी तुम्हा मुलांना नजरेआड करावं अशी अजिबात इच्छा नाही. पण काय करणार? भीती वाटते की, तुम्ही माझ्या बरोबर राहिलात तर उद्ध्वस्त व्हाल. कदाचित इथून दूर गेलात तर अल्लाह कृपेने सर्वकाही बरेही होईल.”

कुलसुम जमानी त्या रात्री पती झियाउद्दीन, आपल्या एक वर्षांच्या मुलीला व राजमाता (बहादूरशाह यांच्या पत्नी) नूरमहल व उमर सुलतान (बादशाहचे मेहुणे) व एका अन्य महिलेसोबत पहाटे बाहेर पडल्या. कुठे जावे, काय करावे, कुठे रहावे याची कुठलीच सोय व नियोजन नव्हते.

कुलसूम म्हणतात, “लाल किल्ल्याचा शेवटचा निरोप घेऊन आम्ही कोराली नावाच्या गावात पोहोचलो आणि आमचा रथ हाकणाऱ्या सारथ्याच्या घरी उतरलो. जेवणाकरता त्याने बाजरीची भाकरी आणि ताक दिले. इतकी भूक लागली होती की ते पदार्थ बिर्याणीपेक्षाही चविष्ट लागले. एक दिवस तर ठीक पार पडला. पण दुसऱ्या दिवशी आसपासच्या गावातले जाट व गुजर, कोराली गावात लुटालूट करायला आले. सगळे दाग-दागिणे, कपडे ते लोक लुटून घेऊन गेले.”

पढे : सिराज उद् दौला की वह माफी जिससे भारत दो सौ साल गुलाम बना

पढ़े : किसान और मजदूरों के मुक्तिदाता थें मख़दूम मोहिउद्दीन

वाचा : स्वातंत्र्य चळवळीत मुसलमानांचा सहभाग

कोराली गावातून हे कुटुंब मेरठ जिल्ह्यातील आजरा गावी आले. तिथे राजवैद्याचे घर होते. राजवैद्याने त्यांना पाहून “तुम्हा मंडळींना ठेवून घेऊन मला माझे घर उद्ध्वस्त करायचे नाही म्हणत” हाकलून लावले. कुलसूम म्हणतात, “ती वेळ हताश होण्यासारखीच होती. इंग्रजी सैन्य पाठलाग करत असेल ही भीती. त्यात आमच्या दुर्दैवाने जो तो आम्हाला टाळत होता. आमच्या नजरेच्या इशाऱ्यावर नाचणारे लोक आज आमचे तोंड पहायला तयार नव्हते.”

तिथून हे कुटुंब पुन्हा ओसाड माळरानावर रस्ता दिसेल तसा चालायला लागले. त्यांच्या ताफ्यावर इंग्रजी सैन्याचा हल्ला झाला. योगायागाने त्याच रस्त्यावरून एक नवाब जात होता. त्याच्या खासगी रखवालदाराने ब्रिटिश सैन्य तुकडीशी झुंज देऊन राजपरिवाराला वाचवले. कुलसूम म्हणतात, “समोर शेतांमध्ये तयार पीके उभी होती. आम्ही त्यात लपलो. शत्रूने आम्हाला पाहिले की चुकून गोळी या बाजूला उडाली काही कळले नाही, पण एक गोळी शेतात आणि तिने आग भडकली. सगळे शेत जळायला लागले आम्ही पळायला सुरुवात केली. पण नशीब तरी असे की आम्हाला पळतादेखील येत नव्हते. गवतात अडकून आम्ही वारंवार पडत होतो.”

कुलसूम जमानीचे कुटुंब महिनोन्महिने चालत, पडत, रखडत हजारो किलोमीटरचा प्रवास करत हैदराबादला दाखल झाले. सीताराम पेठेत भाड्याचे घर घेतले. उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नव्हते. झियाउद्दीन यांनी एक अंगठी प्रवासात विकली होती. त्यातल्या पैशातून प्रवास व हैदराबादचा खर्च काही दिवस भागला. पण पुढे काय असा प्रश्न पडला.

झियाउद्दीन सुलेखनकार होते. त्यांनी हजरत मुहमंद (स) यांचे गुणवर्णन एका बेलगुट्टीवर काढले व चारमिनारजवळ विकणे सुरू केले. निजाम सरकारच्या हेरांना मुघल बादशाहचे वंशज शहरात आल्याची खबर लागली. मग हा व्यवसायही सपुष्टात आला. उदरनिर्वासाठी झियाउद्दीन यांनी एका नवाबच्या मुलांना अरबी शिकवण्यास प्रारंभ केला. अशा रीतीने दिवस कंठत होते.

प्रकरणाचे शेवटची वाक्ये फार उद्बबोधक आहेत. कुलसुम जमानी म्हणतात, “इथे (दिल्ली) इंग्रज सरकारने फार उदार होऊन दहा रुपये महिना पेन्शन मंजूर केली होती! ही रक्कम ऐकून प्रथम मला तर हसूच आले. वाटले, माझ्या वडिलांचा एवढा मोठा प्रदेश ताब्यात घेऊन त्याचा १० रुपये मोबदला देत आहेत! पण नंतर विचार आला प्रदेश कुणाच्या बापाचा नाही, परमेश्वराचा आहे. त्याला वाटेल त्याच्या तो हवाली करतो, वाटेल त्याच्या हातून काढून घेतो. माणसाची तर स्वत:च्या श्वासावरही मालकी नसते.”

बहादूरशाह जफर यांची दुसरी नात दाराबख्त यांची मुलगी गुलबानो बेगम यांचीदेखील कथा अशी विदारक आहे. दाराबख्त अकाली वारल्याने पोरकी गुलबानो आजोबाची (बादशाह) लाडकी झाली. गदरच्या नऊ महिन्यानंतर गुलबानो एका कबरस्तानात अखेरची घटका मोजत पडली होती.

निजामी लिहितात, “(बापाची कबर पाहून) ती जोरात किंचाळली आणि म्हणाली, ‘बाबा मी तुमची गुलबानो आहे. मी एकटी आहे. हा पहा, मला ताप आला आहे. ..मला फार थंडी वाजते आहे. या फाटक्या रजईशिवाय माझ्याजवळ पांघरायला काही नाही. माझ्या आईची आणि माझी ताटातूट झाली आहे.

मला महालातून हाकलून दिलं आहे. बाबा आपल्या कबरीत मला घ्या. ..मला परवापासून काही खायला मिळाले नाही. या ओल्या जमीनीचे खडे मला बोचत आहेत. मी वीटेवर डोकं ठेवून झोपले आहे. माझा छपरी पलंग कुठे गेला? माझी शाल कुठे आहे? माझी रेशमी गादी कुठे गेली? बाबा, बाबा.. उठा ना. किती वेळ झोपाल? आई ग, इतकं दुखतंय, श्वास तरी कशी घेऊ!”

नरगिस नजर बहादूरशाह जफर यांचा मुलगा मिर्झा शाहरुख यांची मुलगी. गुलबानोसारखी चैनीत वाढलेली. त्या रात्री बादशाह महाल सोडून निघून गेले. कुटुंबातील सर्वांना एकाच ठिकाणी जाणे शक्य नव्हते. सर्वचजण संधी मिळेल तसे कुठे कुठे पळून गेले. बिचारी नरगिस एकटीच गाझियाबादला दासीकडे निघून गेली. त्या घरात नरगिस तीन-चार दिवस आरामात राहिली.

सैनिक गाझियाबादला लूटालूट करण्यात येत आहे ही बातमी कळताच तिने आपल्याकडचे दागिणे जमीनीत पुरले. सैन्य हुदडंग माजवत आले. नासधुस करून सर्वकाही लुटून नरगिसशी अभद्र व्यवहार करत तिला कैद करून घेऊन गेले. रस्त्यात सैन्याच्या तुकडीवर गुज्जरांनी हल्ला केला. सैन्य संख्येने कमी असल्याने त्यांचा निभाव लागू शकला नाही. गुज्जर टोळक्यांनी नगरिसला ताब्यात घेतले व निघून गेले. टोळीनी तिच्या अंगावरील असलेले दागिणे काढून घेतले. शिवाय अंगावरील महागडे कपडेदेखील काढून घेतले. मळकट आणि फाटके वस्त्र तिला देण्यात आले.

गुज्जरांनी नरगिसला एका मुसलमान पटवाऱ्याला मोठ्या रकमेच्या मोबदल्यात विकले. पटवाऱ्याने नरगिसला आपल्या गावी आणले व आपल्या मुलाशी तिचे लग्न लावले. चार महिन्यानंतर इंग्रजी लष्कर पोहोचले. नरगिसला संरंक्षण दिल्याच्या आरोपावरून बाप-मुलाला कैद केले. नरगिसला दिल्लीत आणून एका शिपायाकडे सोडण्यात आले.

शिपायाच्या बायकोला रुपवान नरगिस घरात सहन झाली नाही. तिने तिला घरातून हाकलून लावले. शिपायाने नरगिसला एका वृद्ध मित्राकडे सोपवले. त्याच रात्री काही लोकांनी वृद्धाच्या घरावर हल्ला केला व नरगिसला उचलून नेले. ती माणसे नरगिसच्या शोहरच्या गावची होती.

नरगिस त्यातील एका पटवारीकडे मोलकरीण म्हणून तीन-चार वर्षे राहिली. नरगिसला घरकाम करण्याची, शेणाच्या गोवऱ्या थापण्याची, सडा टाकण्याची, धारा काढण्याचे माहीत नव्हते. शारीरिक, मानसिक छळ सहन करत ती निमूटपणे राहिली. चार वर्षांनंतर तिच्या सासरा-नवऱ्याची सुटका झाली. अखेर नवऱ्याने तिला आपल्या घरी नेले. १८७७ साली ती मरण पावली.

वाचा: काफ़िराना : सांप्रदायिक व धर्मांधतेला नेमस्त उत्तर

वाचा : मदीनेतील ज्यू धर्मीयांचा अरबांशी संघर्ष

वाचा : इस्लामशिवाय जग कसे असते ?

पुस्तकातील सर्वच व्यथा इथे देणे शक्य नाही. परंतु सर्वच कहाण्या यातनामय संघर्षाचा जीवघेणा प्रवास आहेत. हे छोटेखानी पुस्तक वेदनांचा, शोषणाचा, क्रूरतेचा, छळाचा, अमानवीपणाचा आणि उद्ध्वस्तीकरणाचा दस्तऐवज आहे.

लेखक ख्वाजा हसन निजामी यांनी शोषित, पीडित बेगमांच्या दु:खद कथा त्यांच्याच शब्दात मांडल्या आहेत. निजामी यांची लेखन शैली अप्रतिम आहे. उर्दूचे तत्कालीन मोठे लेखक व प्रसिद्ध इतिहासकार असल्याने त्यांच्या लेखनाचे टीकात्मक समीक्षण करण्याची ही जागा नाही. परंतु त्यांच्या लेखनात कुठेही कृत्रिमता आणि निवेदनाचा भडीमार जाणवत नाही. तसेच भडकपणाही दिसत नाही. जशा कथा ऐकल्या अगदी तशाच तटस्थपणे ते मांडत जातात. सहजपणे बेगमांची दुखे, त्रास, भोग, फरफट वाचकांच्या निदर्शनास येत राहते.

स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासापासून अनभिज्ञ असलेल्या नव्या पिढीसाठी हे पुस्तक फायदेशीर ठरू शकते. या उठावाच्या वेळी बहादूरशाह जफर अगदी थकलेले, उतारवयात आलेले, बलहीन झालेले होते. सर्व प्रशासकीय व्यवहार इंग्रजी सत्तेने कुटिल डाव आखून आपल्या ताब्यात घेतले होते. त्यांनी किंवा राजपुत्रांनी इंग्रजांना आव्हान देण्याची कल्पनाही केलेली नसावी. परंतु अनिच्छेने, नाईलाजाने १८५७च्या बंडात सामील झाले होते.

बंडखोराच्या प्रशासकीय मंडळाला अनियंयत्रित सत्ता मिळाली होती. जो-तो सत्तेची फळे चाखण्यास आतूर झालेला होता. जिकडे-तिकडे अंधाधुंदी माजली होती. युरोपियन आणि विरोधकांच्या हत्या केल्या जात होत्या.

प्रशासकीय मंडळाच्या अनियंत्रित सत्ताकारणाचा बळी मुघल राजपरिवार ठरले. हेदेखील नाकारता येत नाही की मुघल कुटुंबातील काहीजण सत्तेच्या लालसेपोटी यात हातभार लावत होते. परंतु ब्रिटिश सत्तेला आव्हान दिल्याने बलहीन व निष्क्रिय झालेल्या मुघल बादशाह बहादूरशाहचा वंशविच्छेद घडवून आणला गेला.

ख्वाजा हसन निजामी यांनी या पुस्तकातून उठावानंतरच्या सुड हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या राजपरिवाराच्या वेदनादायी कथा-व्यथा मांडल्या आहेत. प्रथम ‘गफ्रे दिल्ली के अफसाने’ शीर्षकाने हे पुस्तक प्रकाशित झाले त्यावेळी त्यावर बंदी आणण्यात आली.

स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत या पुस्तकाच्या विविध भाषांमध्ये हजारो आवृत्या प्रकाशित झालेल्या आहेत. प्रत्येकवेळी वाचकांनी त्याला हातोहात घेतले. स्वातंत्र्य चळवळ समजून घेण्यासाठी वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे.

नॅशनल बुक ट्रस्टने अगदी अल्प दरात पुस्तक उपलब्ध करून दिले आहे. शिवाय त्याची पीडीएफ कॉपीदेखील इंटरनेटवर सहज उपलब्ध होऊ शकते. तासा-दोन तासात पुस्तक वाचून होऊ शकते. या निमित्ताने एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दस्तऐवज नजरेखालून घालता येईल.

###

पुस्तकाचे नाव : बेगमात के आंसू

भाषा : उर्दू, हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती

लेखक : ख्वाजा हसन निजामी

प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट

पृष्ठे : ७०        

किंमत : ६० रुपये

##

कलीम अजीम, पुणे

मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,43,इस्लाम,38,किताब,18,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,276,व्यक्ती,7,संकलन,62,समाज,234,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ‘बेगमात के आंसू’ : १८५७ बंडातील राजकन्यांच्या व्यथा
‘बेगमात के आंसू’ : १८५७ बंडातील राजकन्यांच्या व्यथा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuSrhAmZI0DesW78SSZNkjntD2Q3BV6eBlglFDCe4VCdkhrjct7SNJUhHUTUAXZ08FOKuM94A8YAfNBHqwGKSk8VDl7IibDz_rcsWgJo6SWyOd1AsJU3YfIZU5DQ23DFp0E2mgWf94zCiYHTrFKC6fGuTRiAAsU0VORltXtsPr4ipRSiZKfbvgA_2RAg/w640-h400/bahadur%20shah%20Jafar%201857.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuSrhAmZI0DesW78SSZNkjntD2Q3BV6eBlglFDCe4VCdkhrjct7SNJUhHUTUAXZ08FOKuM94A8YAfNBHqwGKSk8VDl7IibDz_rcsWgJo6SWyOd1AsJU3YfIZU5DQ23DFp0E2mgWf94zCiYHTrFKC6fGuTRiAAsU0VORltXtsPr4ipRSiZKfbvgA_2RAg/s72-w640-c-h400/bahadur%20shah%20Jafar%201857.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2022/08/blog-post_15.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2022/08/blog-post_15.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content