लव्ह जिहाद : द्वेशवाद्यांची नसती उठाठेव !

काही दिवसांपूर्वी पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये ‘सुंबरान’ मासिकाच्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर नवीन पुस्तके शोधत गॅलरीत फिरत होतो. पुस्तके चाळताना मित्राने आवाज दिला, “अरे, तुझ्या आवडीचा विषय ‘लव्ह जिहादवर पुस्तक आहे ..!” म्हणत त्याने पुस्तक माझ्या हातात दिलं.

मूळ हिंदी पुस्तकावरून मराठी अनुवाद केलेली ही पुस्तिका होती. कुतुहल म्हणून सहज चाळलं. ज्या तथाकथित मिथकाविरोधात गेल्या दोन-तीन वर्षापासून या संबंधी चर्चेतून, लेखातून, ब्लॉगच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करत होतो, चुकीच्या थेरी खोडून काढत होतो, तीच भंपक कल्पना त्यात मांडली होती. आपलं काम संपलेलं नाही, यासंदर्भात अजून बराच पल्ला गाठावा लागेल, असं वाटून गेलं.

द्वेशवादी (हिंदुत्ववादी) संघटनांनी मतांच्या (हिंदू) राजकारणासाठी जाणीवपूर्वक पसरवलेले हे अफवेचे बीज आहे. जातीय व सांप्रदायिक संघर्ष निर्माण व्हावा, मुस्लिमांचे चारित्र्यहनन व सामाजिक शत्रू करण व्हावे, हा यामागचा उद्देश आहे. याद्वारे काल्पनिक, स्वंयरचित आणि रक्तरंजित ‘कहाण्या’ सांगून जन-माणसाचे माथी भडकवण्याची कुटिल कारस्थान नियोजनपूर्वक तयार करण्यात आलं आहे, असे या रंगवलेल्या भाकडकथांमधून दिसून येते.

काही महिन्यांपूर्वीच्या अशा एका घटनेचा उल्लेख इथं करावासा वाटतो. त्या क्षुल्लक घटनेला धार्मिक रंग देऊन औरंगाबाद शहर पेटवण्याचं काम सामना सारख्या हिंदुवादी पक्षाच्या मुखपत्रानं केलं होतं. औरंगाबादला असताना त्याची भिती व दाहकता मी अनुभवली आहे.

ही घटना २५ ऑगस्ट २०१२ रोजीची आहे. घटनेत शहरातील एका महाविद्यालयातील शिक्षण घेण्याऱ्या ‘त्या’ दोघांनी प्रेमातून आंतरधर्मिय लग्न केलं व संरक्षणासाठी पोलीस ठाण्यात आले. मुलगा मुस्लिम आणि मुलगी सिंधी समाजातील एका विद्यमान आमदाराची जवळची नातेवाईक.

आमदार महाशयला ही बातमी कळताच त्यांनी मंबईतील होऊ घातलेला एका अपक्ष (प्रदीप जैस्वाल) आमदाराचा शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम घाईगडबडीने आटोपून थेट औरंगाबाद गाठलं. खासदार मित्रासह असंख्य कार्यकर्ते घेऊन हे महाशय पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांना अरेरावीची भाषा करत त्या मुलीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.

प्रभाग पोलिसांनी ताबा देण्यास नकार दिला असता, ठाण्यात कार्यकर्त्यासह धुडगूस घातला. पोलीस व मुलांकडील उपस्थित नातेवाईकाशी हुज्जत घालत बाचाबाची केली. प्रकरण चिघळले लक्षात येताच जिल्हाधिकाऱ्यांनी समज देऊन वेळ मारून नेली. (दुसऱ्या दिवशी सामनात आलेल्या वृत्तावरून).

लागलीच त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘शहर बंद’ची घोषणाबाजी सुरू केली. नंतर झालेला घटनाक्रम नमूद करणे गरजेचं नाही. पण दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुखपत्राने कहरच केला. कथित ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली मुखपृष्ठावर पूर्ण पानभर प्रक्षोभक बातम्या आल्या. (मुखपृष्ठाचा मजकूर ठरवणारा उपसंपादक हा मुस्लिम होता. त्याने वरीष्ठाच्या ऑर्डरप्रमाणे पहिल्या पानाचा लेआऊट व रचना केली होती, हे मला माझ्याच तिथं काम करणाऱ्या एका मित्रानं सांगितलं)

दै. सामना (प्रचार) दैनिकात यापूर्वीही अशा बातम्या अधून-मधून निरंतर येत राहतात. पण या बातम्या त्यापेक्षा खूप वेगळ्या होत्या. हे प्रक्षोभक वृत्त वाचून नक्कीच दंगल घडली असती. पण सुदैवाने हा पेपर टपरीवरच दिसतो, अन्य वृत्तपत्राने (सकाळ, लोकमत, दिव्य मराठी व अन्य शहरपत्रे) या घटनेला फारसं महत्त्व दिलं नव्हतं. दिशाभूल टाळून या पत्रांनी समर्पक सिंगल कॉलम बातमी लावली होती.

तथाकथित ‘लव्ह जिहाद’ हे धर्मांध राजकीय पक्ष व संघटनांनी निर्माण केलेली स्वरचित कुंभाड आहे. मुलांना आपल्या अधिकार क्षेत्रात अंकित ठेवणे त्यांच्यावर आपला अधिकार गाजवणे त्यासाठी सनातन्याकडून हे मिथक तयार करण्यात आलेलं आहे.

आपल्या विविध प्रकाशन संस्थाच्या माध्यमातून समाजात धार्मिक तेढ व जातीय संघर्षाला खतपाणी घालण्याचं काम या संस्था वेळोवेळी करत असतात. याच प्रकाशन संस्थांनी या फेक मिथकाला भिकारछाप संदर्भ देऊन पोसलं आहे.

मुलींसाठी स्कार्फबंदी, बुरख्यात फिरणाऱ्या मुलींवर पाळत ठेवणे, मुस्लिम मुलांची टेहाळणी करणे, हिंदू मुलींना नसते उपदेश करणे, प्रचारी साहित्य वाटप करणे, इत्यादी प्रकार सर्रास सुरू असतात. यासंबंधी शहरात मोठमोठे फलक लावण्यापर्यंत मजल जाते. (इकडे मुसलमानांतही नसते उपदेश करणारे वर्ग महिलांमध्ये चालतात.)

विशेष म्हणजे या संदर्भात हिंदू मुलींचे व तरुणांचे प्रबोधन करण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतलेला दिसून येतो. अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिर परिसरात अशा पित पुस्तिका वाटणार्‍या काही महिला मी पाहिल्या आहेत. अत्यंत विखारी व जहाल भाषेत मुस्लिम विरोधात अपप्रचार करत हिंदू तरुणांची डोकी भ्रष्ट करत असतात.

पत्रकारिता शिक्षणानिमित्त सुमारे तीन वर्ष औरंगाबाद शहरात होतो. या संघटनांनी कॉलेज तरुणाईविरुद्ध अनेक कारस्थाने केलेली मी पाहिली आहे. सहज रस्त्यावरून फिरणारे तरुण-तरुणी दिसले की त्यांना धमकवायचे, तंबी द्यायची, नसत्या चौकशा करायच्या, महाविद्यालयाच्या आवारात फिरून मुलींना धाक दाखवायचा, हाणामारी करायची इत्यादी प्रकार शहरात सर्रास घडतात.

आजही शहरात गुलमंडी, औरंगपुरा परिसरात तरुण-तरुणीचे पाठलाग करताना टोळके दिसून येतात. आता या संघटनांनी सोशल मीडियाच्या वापरातून खोट्या मिथकांना पसरवण्याचं काम सुरू केलं आहे. फेसबुकवरून धार्मिक तेढ निर्माण करणारे फोटो, मजकूर प्रसारित केले जाते. सध्या एक असाच फोटो खूप गाजतोय ‘हिन्दू मुलींशी लग्न करा आणि सहा मुलांना जन्मास घाला.’ किती हा गलिच्छ प्रकार.. महिलांची किती ही निंदानालस्ती! समाजात अशांतता पसरवण्याचा हा दूषित प्रकार नव्हे का?

महाविद्यालय, नोकरी व व्यावसायाच्या निमित्ताने मुलं-मुली एकत्र काम करतात, प्रवास करतात, वावरतात, फिरतात, पर्यटन करतात. व्यावसायिक व शैक्षणिक कामानिमित्त शहराबाहेरही दौरे होतात. कधी-कधी मैत्री व काळजीच्या सहवासामुळे उभयतामध्ये जवळचं नातं निर्माण होतं, यात गैर काय..? हिंदुवादी संघटनांच्या धास्तीने आता मैत्रीसुद्धा जात-धर्म बघून करायची का?

धर्म व राजकारणाच्या नावाने युवकांवर कसली ही आवाछिंत बंधने. तरुणाईचे मैत्र, सहवास, नात्याची वर्गवारी व विभागणी करणारे हे कोण आहेत? तथाकथित संस्कृती रक्षक म्हणवणारे ही गुंडाची टोळी तरुणाईच्या मुक्त जगण्यावर निर्बंध का लादत आहे? मुक्त वावरणाऱ्या युवकांना त्रास देण्याऱ्या या संघटनांना कायद्याचा वचक का नाही?

धर्मांशी काय संबध?

हिंदू धर्मभिमानी संघटना एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून समाजात धार्मिक संघर्ष घडवून आणतात. कुठलाही मुद्द्याला हिंदू धर्माशी निगडित करून त्याआड मुस्लिमद्वेषाची मोहीम राबवली जाते. नसत्या घटना समोर आणून जातीय संघर्ष घडवून आणण्याचा निष्फळ प्रयत्न ते वेळोवेळी करत असतात. अलीकडे प्रेमाला धर्मयुद्धाशी जोडून संघर्ष वाढवणे हे त्यांनी सोप धोरण अवलंबवलं आहे.

अलीकडे ‘जिहाद’ या शब्दाचं राक्षसीकरण सुरू झालं आहे. हिंदुवादी संघटना कुठल्याही मुद्द्याला हिंदू मुस्लिम तर करीत असताताच, त्यातल्या त्यात भर म्हणून त्याला धर्मयुद्ध म्हणजे ‘जिहाद’शी जोडत असतात.

धर्मयुद्ध अर्थात ‘जिहाद’ म्हणजे काय..? हे आधी समजून घेतलं पाहिजे. जिहाद हा अरबी शब्द आहे. त्याचा उर्दू अनुवाद करताना ‘जद्दोजहद’ असा अर्थ होतो. या शब्दातच जिहादची व्याख्या दडलेली आहे. जद्दोजहद म्हणजे संघर्ष. मग तो कोणत्याही गोष्टीचा असो, जीवनमान जगण्याचा, मिळकत कमविण्याचा, शिक्षणासाठीचा संघर्ष असो वा राजकीय व्यवस्था (कट्टरवाद्यांचा अभिप्रेत अर्थ) निर्माण करण्याचा.

अन्य व्याख्या करताना असे म्हणता येईल की ‘जिहाद’ म्हणजे ‘प्रयत्न.’ याचा अन्वयार्थ लावताना ही संकल्पना ज्या बाबीशी संदर्भित आहे, त्याच संबधी ही व्याख्या जोडली जाऊ शकते. जसे लादलेला अत्याचार, अन्याय परतवून लावण्यासाठीचा नियोजनपूर्वक ‘प्रयत्न.’

राजकीय अन्वयार्थ लावायचा झाल्यास इस्लामपूर्व काळात अस्तित्वात असलेली शोषणावर आधारित राज्यव्यवस्था उद्ध्वस्त करून त्याजागी न्यायावर आधारित प्रशासन जे इस्लामला अभिप्रेत आहे. म्हणजे समान न्याय्य या तत्त्वावर आधारित राजकीय पर्याय तो स्थापणे, त्यासाठी प्रस्थापितांशी (राजकीय व्यवस्था) संघर्ष (जिहाद) करणे होय.

प्रेषितांनी शोषण, अत्याचार व आर्थिक अन्यायावर आधारित राजकीय व्यवस्था उलथवून लावण्यासाठी पवित्र जिहाद (जो अल्लाहचा आदेश व धार्मिक नीती-नियमनाच्या तत्त्वाशी संबंधित म्हणजे न्याय्य या संकल्पनेशी सुसंगत) करण्याचे आवाहन आपल्या अनुयांयाना केले.

त्यानुसार प्रेषितांनंतरच्या चार खलिफांनी अन्यायावर आधारित अरबी द्वि-कल्पातील शोषणावर आधारित प्रस्थापित रोमन सत्ता नष्ट करत आर्थिक न्यायावर आधारित प्रशासन व्यवस्था निर्मिली. आर्थिक न्यायासाठी अधर्मीयांशी केलेले युद्ध असा जिहादचा एक अर्थ अभ्यासक मानतात.

द्वेशवादी संघटनांनी नियोजनबद्ध कृतीचा भ्रामक अर्थ देऊन प्रेमाला किंवा तथाकथित कृतीला ‘जिहाद’शी जोडले. अर्थात मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रेमाला समजून घेतले ते तर धर्म, जात व वर्ग नावाची संकल्पना गौण ठरते. मग या सर्वात धर्म कोठे आला? किंबहुना धर्मांध संघटनांनी प्रेमाला धर्माचा मुलामा चढवत त्याचे विकृतीकरण केले, असे म्हणता येईल. जर कुरआन आणि इस्लामच्या संकल्पनामध्ये बोलायचे झाल्यास इस्लामला गैरकिताबी (ज्यांच्यावर धर्मग्रंथ अवतरला आहे, त्याशिवाय) लग्न मान्यच नाहीत.

या संदर्भात कुरआन म्हणते, “अनेकेश्वरी महिलांशी त्यांनी श्रद्धा धारण केल्याशिवाय विवाह करू नका, एक श्रद्ध गुलाम महिला अनेकेश्वरी स्त्रीपेक्षा अधिक बरी आहे जरी ती (अश्रद्ध स्त्री) तुम्हाला अतिशय मोहक वाटत असली तरी. तसेच अनेकेश्वरी व्यक्ती श्रद्धा बाळगत नाहीत तोवर त्यांच्याशी विवाह करू नका. एक श्रद्ध गुलाम देखील अनेकेश्वरींच्या तुलनेत चांगला आहे ती (अनेकेश्वरी) कितीही आकर्षक असला तरी. असे लोक नरकाकडे बोलवतात आणि अल्लाह आपल्या इच्छेने तुम्हाला स्वर्गाकडे आणि क्षमेकडे बोलावतो. लोकांना बोध घडावा म्हणून तो आपली वचने स्पष्ट करतो.” (सुरह बकराह, २२१ : कुरआन)

मुळात इस्लामला मुस्लिम मुला-मुलींनी ईतर धर्मात लग्न करणे ही संकल्पना मान्य नाही. जर अशी लग्ने झालीच तर त्यातून घडणाऱ्या शरीरसंबंधाला हदीसमध्ये ‘जीना’ (बलात्कार) संबोधण्यात आलेलं आहे. जर असे वर्तन घडल्यास ते अ-ईस्लामिक मानले जाईल, असा समजदेखील देण्यात आला आहे. 

शक्य होईल तेवढे इस्लामधर्माचे अनुयायी या तत्त्वाचे पालन करतात. तसं पाहिलं गेलं तर इस्लाममध्ये लग्नापूर्वीच्या प्रेमाला स्थान नाही. मात्र लग्नानंतर पती-पत्नीच्या संबंधाने प्रेमाचा उल्लेख कुरआनमध्ये वारंवार आलेला आहे.

‘जिहाद’ या शब्दाचा राजकीय गैरअर्थ लावून हिंदू मूलतत्त्ववादी संघटनांनी समाजात विषपेरणी केली आहे. निकोप व उत्कट प्रेमाला धर्मीय राजकारणाशी जोडत हिंदूमध्ये धर्मयुद्धाचे (जिहादचे) आवाहन केले आहे.

कथितरित्या हिंदू मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करण्याचा व मुलींना सोडून देण्याचा अप्रचार निव्वळ राजकीय स्वरुपाचा आरोप आहे. वास्तविक त्याचे काही पुरावे व संदर्भ (हिंदुवादी प्रचारी साधने वगळता) आढळत नाही.

मान्य करूया की असे प्रकार होतात, तेव्हा मुस्लिम तरुणांनी हा पर्याय निवडण्याचे काही कारण नाही. त्याचे कारण असं की मुस्लिम समाजात कमी वयात लग्न केली जातात. एखादा छोटा व्यवसायिक असला तरी त्याला लग्नासाठी उच्चशिक्षित मुलगी सहज उपलब्ध असते. तसेच उच्चशिक्षित मुलगा कमी शिकलेल्या मुलीस मागणी घालतो. इतक्या सहज व सोप्या पद्धतीने लग्न जमत असतील तर हिंदुत्ववाद्याच्या आरोपाप्रमाणे ते का कृती करतील.

दुसरे म्हणजे निव्वळ मौज म्हणून जरी असा कृती घडत असतील तर आपल्याकडे त्यावर वचक बसविण्यासाठी नागरी कायदे आहेत. कौटुंबिक हिंचासार कायद्याखाली अशा आरोपींनी कडक शिक्षेची तरतूद आहे.

भाजपवाद्यांच्या आरोपांची दखल घेतली तर कथितरित्या फसवल्या गेलेल्या मुली पोलिसाकडे तक्रार का दाखल करत नाहीत? पण अशा प्रकारची एकही तक्रार पोलीस स्टेशनमध्ये आढळली नाहीये. याचा अर्थ हिंदुवादी समाजात विष कालवण्यासाठी नसत्या मुद्द्याला हात घालत धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करत आहे, असा अर्थ होतो.

राजकीय स्वार्थ

धर्म तत्त्वाचं तंतोतंत पालन करणाऱ्यांना कट्टर अशी उपमा दिली जाते. पालन करत नाही अशांना निधर्मी म्हटलं जातं. मधला जो वर्ग असतो तो थोडासा धार्मिक, थोडासा तर्कवादी व विवेकी असतो. हे तिनही घटक समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करतात. त्यातले काही राजकीय स्वार्थ साधत असताना धर्माचा वापर करतात. पण समाजात एक गट असाही आहे जो धर्मतत्त्व व राजकारण बाजूला ठेवून मुक्त जगत असतो.

बुरसटणाऱ्या रुढी, परंपरा जुगारून मानवी मूल्य जोपासणे अशा वर्गाचे कार्य असते. त्यांच्या प्रबोधनवादी विचारांतून तर्कावर आधारित नवा वर्ग जन्मास येत आहे. परिणामी आंतरधर्मीय संवाद वाढला आहे. पहिल्यासारखे धर्म, जाती व पंथावर आधारित संघर्ष आता कमी झालेले आहेत. त्यातून तरुण-तरुणी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करत आहेत. अशा लग्नसंबंधात वाईट काय आहे..?

शासनातर्फे आंतरजातीय विवाहासाठी अनुदान व संरक्षण दिले जाते. समाजात निर्माण झालेली जातिव्यवस्थेची दरी कमी करण्यासाठी असे लग्न होणे खूप गरजेचं आहेत, असे डॉ. आंबेडकर म्हणतात. महात्मा गांधींदेखील अशाच अर्थाचा संदेश देतात. पुरोगामी व प्रबोधनवादी परंपरा अशा लग्नासाठी प्रोत्साहित करतात. मात्र, सनातनी व धर्मभिमानी समुदाय, गट अशा कृतींना विरोध दर्शवतात. हे प्रकार रोखण्यासाठी विषारी प्रचार राबवतात.

अलीकडे माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार जातीयवादी संघटनांनी राबविला आहे. त्यातून दलितांवर अत्याचार व नरसंहार वाढला आहे. अशात हिंदुवादी मंडळी ‘लव्ह जिहाद’सारखी निर्रथक व्याख्या करून समाज नासविण्याचा प्रकार करत आहेत.

व्याख्याने, चर्चासत्रे आयोजित करून, प्रचारी साधने निर्माण करून समाजात धार्मिक द्वेष पोसला जात आहे. हिंदू समाजात विष म्हणून भिनलेल्य़ा जातिनिर्मुलनासाठी झटण्याऐवजी समाजात मुस्लिम द्वेष चेतवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शिक्षण, सण उत्सव आणि प्रसारमाध्यमातून हिंदूच्या धर्मांध संघटना मुस्लिमद्वेष आणि कडव्या हिंदुत्ववादाचा प्रसार करतात. सत्ताकारणासाठी धर्माचा वापर करणे नित्याचेच झाले आहे. दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख यांच्या विरोधात अपप्रचार; प्रसंगी त्यांच्यावर हल्ले, दंगे घडवून आणत धर्मांधता पोसली जात आहे.

हिंदुवादी संघटना व संघटनांनी प्रक्षोभक साधनांचा वापर करून समाजद्रोही कारस्थाने रचण्यापेक्षा लोकहिताचे प्रश्न मार्गी लावून ते सोडवावेत. जनतेच्या मुलभूत सुविधेसाठी आपला अनमोल वेळ द्यावा. एवढाच समाजिक सुधारणेचा पुळका असेल महात्मा गांधी, रानडे, गोखले व जोतीराव फुलेंचा प्रबोधनाचा मार्ग स्वीकारावा. फुलेंच्या पावलावर पाऊल ठेवत वाम (?) मार्गाला लागलेल्या हिंदू मुला-मुलींना योग्य मार्गदर्शन करून पाहिजे ती आर्थिक व सामाजिक मदत पुरवावी.

माणुसकी उजागर करणारी भावना म्हणजे प्रेम. उत्कट व निरागस प्रेमाची व्याख्या शब्दात करता येण्यासारखी नाही. प्रेम कल्पनांचा वावर असतो. प्रेम सुखद स्पर्श असतो. प्रेम भावनांचा उद्रेक असतो, प्रेम कधी कुणासोबत होईल याचा नेम नसतो.

प्रेम जात-पात, धर्म, वंश, वर्ण पाहत नाही. जाति-धर्माच्या पलीकडे जाऊन प्रेम वावरत असतो. प्रेम रंगाची बंधने झुगारून देतो. प्रेमाला दिसण्याची, सुंदरते, भाषेची आडकाठी नसते. किंबहुना या सर्वांच्या पलीकडे जे असते प्रेम, अशी प्रेमाची साधी व्याख्या करता येईल. पण काही द्वेशवादी संघटनांनी त्याचा राजकीय वापर करून समाजात तेढ निर्माण केला आहे.

आपल्या मातृ-पितृ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिंदू-मुस्लिम मिश्र विवाह केले आहेत. उदाहरण, मुख्तार अब्बास नकवी, शहानवाज हुसैन, आडवाणी आदी मंडळींनी दोन्ही धर्मात लग्नसंबंध जुळवले आहेत. हे कथित लव्ह जिहाद नाही का? कुठली ही दुटप्पी भूमिका...

भविष्यात धर्माची, तथाकथित बंधने झुगारून प्रेमविवाह होणारच. याला विरोध करणे चुकीचं आहे. जातिव्यवस्था हिंदू (आणि मुस्लिमही) समाजात निर्माण झालेला मोठा कलंक आहे. वर्षानुवर्ष चालत आलेल्या जुनाट परंपरा आपण कधी मोडणार? प्रत्येक पिढीने बदल घडवायचा असतो, हा बदल या पिढीने घडवला तर त्यात काय वाईट!

प्रेम कोणाशी करावं हे मूलतत्त्ववादी आणि धर्मांध संघटनांनी सांगायची काय गरज? नवी पिढी सुज्ञ आहे. आपला चांगला-वाईट निर्णय ती स्वत घेऊ शकते. तरुणाई या विषयावर विचार करण्यास सक्षम आहे. भलं-बुरं कळणारी ही पिढी आहे. स्वप्नातील समाज घडविण्याची ताकद या पिढीत आहे.

आदर्श समाजव्यवस्था कशी असावी हे तरुणाई शिवाय कोणाला कळणार! समाजव्यवस्थेला आधुनिक मुलामा चढत असताना, वाईट झुगारून चांगलं स्वीकारण्याची जबाबदारी तरुणाईची आहे. ऑनर किलिंगच्या नावाखाली आपल्याच पोटच्या मुलांना मारलं जात आहे. मनोज-बबली, रिजवानुर रहमान असे कितीतरी नावे आहेत, ज्यांच्या प्रेमभावनेची हत्या केली गेली.

खोट्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी, तरुण मुला-मुलींना घरात डांबून ठेवलं जात आहे. प्रेमविवाहाच्या माध्यमातून जातिव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाईचा तिरस्कार का केला जात आहे? संविधानिक मूल्य न मानणाऱ्या खाप पंचायतीचे दरवर्षी शेकडो बळी पडत आहेत. या पापाचे प्रायश्चित्त कधी होईल?

तरुणांच्या भावना कोणी समजून घ्यायला तयार नाहीत. आवांच्छित निर्णये नव्या पिढीवर का लादली जात आहेत. जाति-धर्माच्या नावावर तरुणांची घुसमट होत आहे. भावनिक पातळीवर तरुणांचे प्रश्न कोणी हाताळण्यास तयार नाही.
इश्क आजाद है, हिंदू न मुसलमान है इश्क,
आप ही धर्म है और आप ही इमान है इश्क
- साहिर लुधियानवी
समाजाची संवेदनशील मने का हरवत चालली आहेत? एखाद्या निर्ऱथक प्रश्नाला पुढे करून त्याला धार्मिक रंग दिला जात आहे. समाजातील वास्तविक प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन फालतू विषय चर्चेला आणून समाजाची दिशाभूल केली जात आहे. परिणामी समाजव्यवस्थेतील दरी वाढत चालली आहे. असे निकोप सहजीवन व भारतीय सभ्यतेसाठी घातक आहेत.

डोळ्यांवर लागलेली धार्मिक चश्मे काढण्याची वेळ आली आहे. धार्मिक मुद्दे संयतरित्या हाताळावी लागणार आहेत. यात तरुणाईने प्रचारी साधनांना भुलून हिंसक होण्याचे प्रकार बंद करण्याची गरज आहे. भलं-बरं आम्ही जाणतो, त्यामुळे अशा दुष्प्रचारांना का बळी पडावे?

सर्वसामावेशक विचार करण्याची ही वेळ आहे. २१व्या शतकात वावरताना जात धर्म विसरुन परिवर्तनवादी दृष्टिकोन बाळगण्याची ही वेळ आहे. जग पुढे जात आहे आणि आपण अजूनही त्याच बुरसटलेल्या संकल्पना घेऊन जगत का आहोत. 

जागतिक स्तरावर भारताचा बहुसांस्कृतिक देश म्हणून गौरव केला जात असताना, आपण अशा असांस्कृतिक घटनांना खत-पाणी घालणे, देशाच्या प्राचीन व महानतम संस्कृतीवर वज्राघात करण्यासारखे आहे.

(सदरील लेख मार्च-एप्रिल २०१३च्या ‘सुंबरान’ मासिकात प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: लव्ह जिहाद : द्वेशवाद्यांची नसती उठाठेव !
लव्ह जिहाद : द्वेशवाद्यांची नसती उठाठेव !
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgwmSzdaIYlKt91MWd3b7NZXX29C-SxdW4e6eQAC86joiu78txo1IQFN3-3qkqsFjK9xZCnaH07IIRMOWzweQZJ5s2-j_iTdYLj3UPMXwML1ZhyA2MsjppgzT6KgBwudFFE3mUlKEfxb1Wt/w640-h374/Sumbran+Love+Jihad.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgwmSzdaIYlKt91MWd3b7NZXX29C-SxdW4e6eQAC86joiu78txo1IQFN3-3qkqsFjK9xZCnaH07IIRMOWzweQZJ5s2-j_iTdYLj3UPMXwML1ZhyA2MsjppgzT6KgBwudFFE3mUlKEfxb1Wt/s72-w640-c-h374/Sumbran+Love+Jihad.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2013/04/blog-post_25.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2013/04/blog-post_25.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content