शरफुद्दीनची हत्या आणि Not In My Name चळवळ

गुरूवारी 29 जूनला प्रधानसेवक कथित गौरक्षकांच्या गैरकृत्यांविरोधात साबरमतीमध्ये सॉफ्ट भूमिका घेत होते. अगदी त्याचवेळी झारखंडमध्ये एक बेफाम झुंड अलीमुद्दीन अन्सारीचा बळी घेत होती. याचा अर्थ पंतप्रधानाच्या सूचना आणि आदेशांना रक्ताचा अभिषेक घालत हरताळ फासण्यात आला होता. अशा घटनांमधील वाढ पाहता स्टेट स्पॉन्सर्ड अर्थात सरकार पुरस्कृत या हिंसा असल्याची टीका अनेक स्तरांतून केली जातेय. ही झुंडशाही रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय. 
एमआयएमने मोदींच्या विधानावर टीका केली आहे. "हिंसाचारी लोकांना भाजप आणि संघच पाठिंबा देत आहे, म्हणूनच गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणाऱ्यांची हिंमत वाढत आहे. मोदींची नीती म्हणजे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत" अशा शब्दात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी भाजपला धारेवर धरलंय.. त्यामुळे मा. प्रधानसेवकांनी केलेलं वक्तव्य गौरक्षरकांविरोधात होते का त्यांच्या समर्थनार्थ अशी चर्चा सुरु झाली आहे. 
या चर्चेला विश्व हिंदू परिषदेने दुजोरा दिल्यासारख्या शब्दात पीएमच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. शुक्रवारी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत व्हीएचपीचे आंतरराष्ट्रीय सह सचिव सुरेंद्र जैन यांनी ‘पंतप्रधानांचं वाक्य एकतर्फी असून गोरक्षक चांगले काम करत आहेत’ अशी टीका केली. गेल्या वर्षी दिल्लीत मा. प्रधानसेवकांनी गोरक्षकांना धारेवर धरलं होतं. त्यावेळीदेखील व्हीएचपीनं संतप्त प्रतिक्रीया दिली होती. पीएमच्या आवाहनानंतरही गोमांसच्या संशयावरुन मारहाण होणाच्या घटना काही कमी झालेल्या नव्हत्या.
देशात 2014 साली सत्ताबदल झाला. काँग्रेसला दूर सारत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली. निवडणुकीच्या निकालानंतर विजयोत्सव साजरा करणाऱ्या उन्मादी कार्यकर्त्यांनी दक्षिणेकडील अल्पसंख्याकांच्या काही धार्मिक स्थळांवर हल्ला करत तोडफोड केली. या घटनेनंतर येत्या काळात देशात सामाजिक सुरक्षा आणि अल्पसंख्याकांच्या भवितव्याची स्थिती काय असेल याची स्थिती स्पष्ट झाली होती. यानंतर अगदी काही दिवसात 2 जून 2014ला पुण्यात आयटी इंजिनियर मोहसिन शेख यांची हत्या करण्यात आली. 
सत्ताबदलानंतर झुंडशाहीने केलेली देशातली ही पहिली हत्या होती. नागालँडच्या दिमापूरमध्ये 5 मार्च 2015 साली बांग्लादेशी असल्याच्या संशयावरुन 30 वर्षीय शरफुद्दीनची हजारोंच्या जमावानं शिरकाण केला. शरफुद्दीन हा माजी सैनिकाचा मुलगा होता. तर सोलापूरचा मोहसिन हा सामान्य कुटुंबातला. मोहसिन आणि शरफुद्दीनची हत्या ते धर्माने मुस्लीम असल्यानं झाली. 
शरफुद्दीनला बलात्काराच्या खोट्या तक्रारीखाली अटक करण्यात आली होती. जेल  फोडत त्याला बाहेर काढून झुंडीने त्याचा शिरकाण केला. तर मोहसिन नमाजहून परत येत असताना त्याच्या डोक्यावरची टोपी पाहून त्याला मारण्यात आले. सत्ताबदलानंतर घटलेल्या या दोन घटना झुंडशाहीच्या शक्ती वाढवणाऱ्या होत्या. या घटना देशात ‘मॉब लिचिंग’च्या लिटमस टेस्ट ठरल्या. मुस्लीम समाज आणि सरकारमधून काहीच प्रतिक्रीया येत नसल्याचं पाहून झुंडशाही वाढली.
येत्या काळात देशात याच मुद्द्यावरुन राजकीय उलथा-पालथी होऊ शकतात. काही महिन्यात गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत. गोरक्षेच्या नावाने बाहेर निघालेली ही उन्मादी झुंड गुजरातमध्ये भाजपला सत्तेची किल्ली वाटते. त्यामुळेच 'मॉब लिचिंग'ला सत्तेचं संरक्षण प्राप्त असल्याचं सांगण्यात येतंय.. एकीकडे सरकार पोलिटिकली करेक्टनेस म्हणून हिंसक प्रवृत्तीविरोधात कारवाईचं आश्वासन देत आहे. मात्र प्रत्यक्ष कारवाई मात्र शून्यच आहे. 
गोरक्षकांच्या उन्मादाविरोधात 'अनहद'च्या शबनम हाश्मी यांनी मानवाधिकार आयोगाला पुरस्कार परत केलाय. तर दुसरीकडे गोरक्षेच्या नावाने सुरु असलेल्या ‘मॉब लिंचिग’विरोधात देशभरात मोठ्या प्रमाणात लोकं रस्त्यावर येत आहेत. ‘नॉट इन माय नेम’ या स्लोगनअंतर्गत भारतभर मोहीम सुरु करण्यात आली आहे. 28 जूनला बुधवारी 6 मेट्रो शहरात मॉब लिंचिंगविरोधात लोकं रस्त्यावर उतरली होती. या अभियानामुळे सरकारचे धाबे दणाणले आहेत.
हैदराबाद, दिल्ली, तिरुअनंतपुरम, बंगळुरु, लखनऊ, मुंबईत हजारो लोकांसह फिल्म आणि स्पोर्ट्स सेलिब्रिटी मूक आंदोलनात होती. तर 29 जून गुरुवारीही अनेक शहरात ‘नॉट इन माय नेम’ या कॅम्पेनखाली एकत्र आली होती. पुण्यात कलेक्टर ऑफीस ते केल्वे स्टेशनमधील गांधी पुतळ्यापर्यंत ‘पीस मार्च’ काढण्यात आला. या मोर्चात अनेक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 
बीबीसीने हा मोर्चा अरब राष्ट्रात झालेल्या क्रांतीच्या मोर्चापेक्षा मोठा ठरू शकतं असं भाकीत केलंय. त्यामुळे या कॅम्पेनवर भाजप नेते टीका करत आहेत.. असं असलं तरी रस्त्यावर येणाऱ्यांचं 'कॅण्डल मार्च' सारखं होऊ नये म्हणजे झालं. 'सोशल मीडिया'च्या वर्च्युअल जगात वावरणारे तरुण-तरुणी या उन्मादाविरोधात जमत आहेत. आण्णा आणि रामदेव बाबांच्या आंदोलनासारखं या तरुणाईचा अन्य राजकीय पक्ष वापर करणार नाहीत हे कशावरुन.. त्यामुळे यंदा सजगतेनं तरुणांची एनर्जी वापरली पाहिजे. पीएमचं साबरमतीमधील विधानामुळे सरकार दबावाखाली असल्याचं स्पष्ट झालंय. 
मोर्चातून 'मॉब लिचिंग'विरोधात कडक कायद्याची मागणी होतेय. तर दुसरीकडे कथित गोरक्षक गोहत्येविरोधात कडक कायद्याची मागणी करत आहेत. असा कायदा झाला तर गायींच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज पडणार नसल्याचं गोरक्षक सांगत आहेत. सध्या यासंबधी कडक कायदा आहे. तरीही नव्या कायद्याची मागणी गोरक्षक का करत आहेत. कितीही कडक कायदा झाला तरी मॉब लिचिंग थांबणार का? हा प्रश्न शेवटी उरतोच ना! दुसरं असं की कायदा हातात घेण्याचा अधिकार या कथित गोरक्षकांनी कुणी दिला?
मोदींच्या आदेशानंतरही संशयाचा आधार घेत हत्याच करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. गुरुवारी साबरमतीमध्ये पीएमने गोरक्षकांना खडसावलं. याला प्रतिउत्तर देत काही तासातच गोरक्षकांनी पुन्हा एकाचा बळी घेतला. याचा अर्थ पीएमचं वाक्य आव्हान म्हणून गोरक्षकांनी स्वीकारलं.त त्यामुळे येत्या काळात हे हत्यासत्र थांबण्याऐवजी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतंय. दुसरीकडे अयूब पंडित, पहलू खान, जुनैद आणि अलीमुद्दीन यांचे मारेकरी अजुनही मोकाट आहेत.. त्यामुळे या आरोपींना अटक होणार याची शाश्वती राहिलेली नाहीये..

Not In My Name चळवळींवर हरिशचंद्र थोरात यांची टिप्पण्णी
ताजी बातमी चालत्या ट्रेनमध्ये जमावाने केलेल्या जुनैद खानच्या न्यायाची. त्याच्या आगेमागे या प्रकारच्या तथाकथित लोकन्यायाशी नाते सांगणाऱ्या अनेक घटनांची मोठीच्या मोठी रांग. खैरलांजीपासून सुरुवात केली की जुनैदपर्यंत येताना असंख्य घटनांच्या ठेचा लागतात. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, हरयाना, राजस्थान, काश्मीर, महाराष्ट्र यांसारख्या अनेक प्रांतांमध्ये रोजच्या रोज काहीतरी घडते आहे. कायदा हातात घेण्यासाठी वेगवेगळी निमित्ते पुढे आणली जात आहेत. 
धर्म, जात, आहार, राष्ट्रप्रेम, अस्मिता असे मुद्दे तर आहेतच. शिवाय मुले पळवणाऱ्या टोळीचा सदस्य आहे यासारखा समज करून घेऊन जमावाने एकांडय़ा माणसाचा बळी घेणेही आहे. अल्पसंख्याक आणि दलित तर निशाण्यावर आहेतच. गोमातेची नव्याने शिकवण्यात आलेली भक्तीही या मुद्दय़ांमध्ये प्रभावी आहे. या हिंसक लोकन्यायाच्या कल्पनेला विरोध करणारी चळवळ Not in My Name सामाजिक माध्यमांमधून जन्माला आली आहे आणि ती हळूहळू भारतातल्या शहरांपासून जगभर पसरू लागली आहे.
कल्पना करा की एखादा अनोळखी अपरिचित रस्त्यामधून चालला आहे. आक्षेपार्ह वाटेल असे काहीच तो चालणारा करत नाही. तो नुसताच चालतो आहे. त्याच्याकडे बघणारा चालणाऱ्याकडे कसा बघेल? चालणाऱ्याविषयी तो काय विचार करील? चालणाऱ्याचे कोणते चित्र बघणाऱ्याच्या मनात उमटेल? हे चित्र रंगवण्यासाठी बघणारा कोणती सामग्री वापरील
महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालणारा जो दुसराआहे त्याला उद्देशून बघणारा मीकोणती कृती करील? ही कृती तटस्थ निरीक्षकाची असेल? सहानुभवाची असेल? कुतुहलाची असेल? हिंसेची असेल? बघणारा मीआपल्या परिचितांना हाका मारील? त्यांच्यातील हिंसकतेला आवाहन करील? सावज आपल्या टप्प्यात आलेले आहे, असे सांगेल? एका बघणाऱ्याचे अनेक कृती करणारे होतील? रस्त्यावरचे दगड त्यांच्या हातातील शस्त्रे होतील? हा जमाव ख्रिस्त काळापासून चालत आलेली न्यायप्रक्रिया अंमलात आणू लागेल?
वरील परिच्छेदाच्या शेवटी येणारा आकृतिबंध गेल्या काही वर्षांत आपल्या सततच्या परिचयाचा झाला आहे. माणसं हिंस्र पशूसारखी झाली आहेत. विशिष्ट विचारसरणीतून निर्माण झालेली राजकीय यंत्रणाच नव्हे, तर साधी साधी माणसे खुनशी होत चालली आहेत. दुखणे अधिक खोलवर चरत गेले आहे. 
संपूर्ण समाज आतून पोखरला गेला आहे. भयग्रस्त झाला आहे. विवेकशीलतेचा अस्त झाला आहे आणि सामाजिक असंज्ञाचा मनमानी उद्रेक ठिकठिकाणी घडून येतो आहे. सामाजिक उभारणीचे मूलतत्त्व द्वेष झाले आहे. मानवी नात्यांच्या मुळांशी सामाजिक द्वेषभाव पेरला जातो आहे. हिंसा आणि भय या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन समाजधारणेच्या मुळावर उठणारे स्फोटक रसायन निर्माण होते आहे. हे असेच व्हावे अशी काही लोकांची खूप दिवसांची इच्छा फलद्रूप होते आहे. संस्कृती अस्मितेच्या राजकारणाचा बळी ठरते आहे.
समकालीन संस्कृतीचे काही अतिभयानक विशेष अलीकडे पुढे येऊ लागले आहेत असे या निमित्ताने म्हणता येते. त्यांतला पहिला विशेष म्हणजे संवादाच्या शक्यताच नाहीशा होणे, हा आहे. समाजाची, संस्कृतीची आणि माणसांची भाषेशी संबंध जोडण्याची क्षमता मोडकळीला आली की बोलण्याची प्रक्रिया यांत्रिक होऊ लागते. मी आणि माझे बोलणे यांतील संबंध संपला की भाषेतले शब्द पोरके होऊ लागतात, बोलणाऱ्याच्या संकल्पापासून तुटून बाजूला होऊ लागतात. अशा परिस्थितीत बोलण्याचे उत्तरदायित्व स्वीकारण्याची गरजच उरत नाही. तुमच्याऐवजी मी किंवा माझ्याऐवजी कोणीही बोलले तरी चालते. 
पाठवल्या जाणाऱ्या संदेशामागची संवाद-इच्छा कोठल्याही बिंदूशी जोडताच येत नाही. तयार संदेशांमार्फत काम भागते. नवे संदेश बनवण्याची गरजच पडत नाही. माणसांपेक्षा मोबाईल स्मार्ट होतात. तिथे संदेशांची जी देवाणघेवाण होत असते ती अशीच संवादशक्यता हरवलेली असते. तिथले संदेश विशिष्ट माणसाने दुसऱ्या एका विशिष्ट माणसासाठी निर्माण केलेले नसतात. ते कोणासाठीही चालू शकतात. मोबाइलमध्येच नव्हे तर अभिसरणाच्या इतर क्षेत्रांतही याच प्रकारचे व्यक्तिनिरपेक्ष संदेशनमुने संस्कृती निर्माण करते. ते प्रचारात आले की खराखुरा संवाद संपतो. 
आपल्या आणि दुसऱ्याच्या परस्परसंबंधांचा संभाषितावर परिणाम होत नाही आणि भाषेतील सामाजिक जाणीव कोती होत जाते. अशा परिस्थितीत कोणाला काही समजून देताघेता येत नाही. कोणाशी वाद घालता येत नाही. कोणाशी आपण असहमत आहोत हे सांगता येत नाही. विचारांची देवाणघेवाण करता येत नाही. वेगळ्या आणि दुसऱ्यांच्या विचारांसाठी प्रवेश बंद केला जातो. आपण आपल्या संभाषिताचे रूपांतर कडेकोट तुरुंगात करतो आणि दुसऱ्याच्या सर्जनशीलतेशी आणि दुसऱ्याशी होणाऱ्या संवादाशी किंचितसाही संबंध येऊ न देता जगू लागतो. 
संवादाची शक्यता समाजामध्ये उपस्थित असते तोपर्यंत जगण्याच्या दैनंदिन प्रक्रियांमध्ये वादविवादाच्या, चिकित्सेच्या, अनेकविधतेच्या, खुल्या मूल्यव्यवस्थेच्या यंत्रणा कार्यरत राहतात. संवादाच्या मुळाशी दुसऱ्याला समजून घेण्याची इच्छा असल्यामुळे समाजधारणेच्या मुळाशी एकमेकांना समजून घेणारी ज्ञानप्रक्रिया टिकून राहते. अशी ज्ञानप्रक्रिया टिकवून ठेवणारा समाज पारंपरिक, सनातनी, बुरसटलेला, द्वेषांध होत नाही. खऱ्याखुऱ्या संवादामुळे विचारांमधील आणि संबंधांमधील सर्जनशीलता निर्माण होते. या जिवंत, समंजस, शहाण्या सर्जनशीलतेशी असलेले आपल्या समाजाचे नाते कुंठित झाले असावे, असे एकूण परिस्थिती पाहाता वाटू लागते.
याच प्रकारचा समकालीन संस्कृतीचा दुसरा विशेष म्हणजे अस्मितेच्या बाधेतून होणारी दुसऱ्याची विकृत निर्मिती होय. हा दुसरा’ ‘माझ्याजडणघडणीसाठी अत्यंत आवश्यक असतो. समाजात वावरण्यासाठी या दुसऱ्याच्या नजरेतून माझ्याकडे पाहावे लागते. माझ्याजगाविषयीच्या आणि माझ्याविषयीच्या ज्ञानासाठी ही प्रक्रिया घडणे आवश्यक असते, असे अनेक समाजशास्त्रज्ञांनी आवर्जून सांगितले आहे. 
तथापि, ज्ञानाच्या या प्रक्रियेला अकारण अस्मितेचा रोग जडला की मी’ ‘माझ्याप्रेमात पडतो. मी, माझा धर्म, माझी जात, माझा देश, माझी संस्कृती यांविषयीच्या संकल्पनांच्या प्रभावामुळे मीचे प्रभावक्षेत्र सोडून बाहेर जाण्याची मला भीती वाटू लागते. ही भीती खरे तर दुसऱ्याविषयीची भीती असते. 
त्याच्याशी संवाद साधला तर मीची अनन्यता नष्ट होईल असे या भीतीचे स्वरूप असते. यातूनच दुसऱ्याचे चित्र जेवढे शक्य असेल तेवढे विकृत केले जाते. तो कसा अधम, दुष्ट, खुनशी, अमंगल, जगण्यास नालायक, अन्यायी वगैरे आहे हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगितले जाऊ लागते. त्याच्या चित्रामध्ये जमतील तेवढे काळे रंग भरले  आणि हे रसायन पुरेसे मुरले की आपल्यातील भीती हिंसकतेच्या रूपाने तिचा नेमका मार्ग शोधून काढते. या अधम दुसऱ्याला शिक्षा करणे हा आपला अधिकारच आहे असे आपल्याला वाटू लागते. 
आपण न्यायाचे पुतळे असून अन्यायाचे परिमार्जन करण्याचा अधिकार आपल्याला मिळाला आहे याची आपल्याला खात्री वाटू लागते. या अधिकाराचा संबंध सांस्कृतिक एकात्मतेशी असल्यामुळे त्याचा संसर्ग अत्यंत वेगाने होतो आणि कायदा हातात घेतलेला हिंसक जमाव आपल्या शक्तीचे प्रदर्शन करीत रस्त्यावरून फिरू लागतो. असहिष्णुता हा शब्द सौम्य वाटावा अशी क्रूर कृत्ये अत्यंत सहजतेने हा जमाव करू लागतो.
Not in My Nameच्या निमित्ताने या प्रक्रियेला विरोध करण्याची इच्छा अजूनही समाजामध्ये जिवंत आहे अशा खुणा दिसत आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. कुठल्याही राजकीय व्यासपीठावरून ही चळवळ पुढे आलेली नाही मात्र तिच्यामध्ये समाज, संस्कृती आणि राजकारण याविषयीच्या निरोगी धारणा आहेत, हीही मूल्ययुक्त गोष्ट आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळूरू, कोलकाता, लखनौ, हैदराबाद, चेन्नई, पटना, पुणे अशा शहरांमधून अनेक तरुण मुले स्वेच्छेने या चळवळीत सामील होत आहेत आणि कायदा हातात घेणाऱ्या हिंसक क्रूरकर्म्यांचा निषेध करत आहेत. अशा चळवळींचा अधिक विस्तार होणे, त्या अधिक मूलगामी होणे गरजेचे आहे. असे झाले तर समाजाची चिकित्सक आणि विवेकी वृत्ती जागृत करण्याची क्षमता त्यांच्यामधून खात्रीने उभी राहील.

हरिश्चंद्र थोरात, संपादकीय, मुक्तशब्द, जुलै 2017

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: शरफुद्दीनची हत्या आणि Not In My Name चळवळ
शरफुद्दीनची हत्या आणि Not In My Name चळवळ
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEifYVYnyMhcr9ayS86leCIA683aFozO4O9UV-8W9KvXCLNckA865ZgbpQedx2tKaJ_BT99KLapqx_atBo5A6iVMqfG6sUAH2YRGl2ySkhRPh84u7BeRPWxL1KZxpbRXmaRwI7_AYziUslC_/s640/_96735900_jharkhand2.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEifYVYnyMhcr9ayS86leCIA683aFozO4O9UV-8W9KvXCLNckA865ZgbpQedx2tKaJ_BT99KLapqx_atBo5A6iVMqfG6sUAH2YRGl2ySkhRPh84u7BeRPWxL1KZxpbRXmaRwI7_AYziUslC_/s72-c/_96735900_jharkhand2.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2017/07/not-in-my-name.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2017/07/not-in-my-name.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content