शोषित महिलांचा 'बदनाम' लेखक : मंटो


लुधियानाच्या सामरा गावात तब्बल १०६ वर्षापूर्वी एक ‘बदनाम लेखक’ जन्मला. या लेखकाचं नाव होतं सआदत हसन मंटो. मंटो नावानं तो प्रसिद्ध आहे. आज ११ मे मंटो यांचा वाढदिवस. त्यानिमित्तानं एक सहृदयी वाचक म्हणून मंटोला अधोरेखित करावसं वाटलं. 
२००९ साली मंटोचं जन्मशताब्दी वर्ष साजरं झालं. यावेळी मुंबईत बुऱ्हानी कॉलेजमध्ये एक मोठा समारंभ घेण्यात आला. या सोहळ्याचं राइटअप वाचून मी मंटोकडे आकर्षित झालो. त्यावेळी मी बामू युनिव्हर्सिटीत जर्नलिझमचं शिक्षण घेत होतो. 
योगायोगानं विद्यापीठाच्या भव्य लायब्ररीतून समग्र मंटो माझ्या हाती लागला. अगदी अधाशासारखं दोन-एक महिन्यात वाणी पब्लिकेशनचे दस्ताऐवज हे चार खंड वाचून काढले. त्यानंतर मी मंटोच्या राईटिंगनं केवळ प्रभावित झालो नाही तर लेखनामुळे दु:खाच्या एका वेगळ्या पैलूशी मी समरुप झालो.
हिंदीमुळे मला मंटो कळला. तसं पाहिलं तर मंटोचं सारं लिखाण हे उर्दूत आहे. आज भारतातील प्रत्येक भाषेत मंटो लिप्यंतरित झाला आहे. मराठीत मंटोच्या काही कथा अनुनादीत झालेल्या आहेत. या भाषांतरीत कथांमध्ये मटोचा तो मर्मबंध नसला तरी मंटो ओळखीसाठी त्या मदत करतात. त्यांचं भाषांतर अगदी सुमार आहे. पण अगदी नवीन असणाऱ्यांना ते वाचायला हरकत नाही.
मंटोच्या बऱ्याच कथा वेदनेचं एक भयाण जग उलगडून दाखवतात. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेदना व दुख मंटोच्या मनावर कोरल्या गेल्या. अनेक दिवस जनरल डायरच्या आदेश मंटोच्या कानात कल्लोळ माजवित होत्या. 
याकाळी दुखाच्या आणि वेदनेच्या एका भयाण डोहातून मंटो जात होते. त्यांनी इथूनच आपल्या लिखाणाला सुरुवात केली. जालियनवाला बाग घटनेनं त्यांना तमाशा लिहिण्यास मजबूर केलं. या कथेतून त्यांनी ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावण्याचं स्वप्न पाहिलं. मंटोची ही पहिली कथा. यापूर्वी मंटो काही सिने मॅगझीनसाठी रिपोर्टिंग करत होते.
प्रगतिशील लेखक संघाच्या ग्रुपमध्ये अनेक दर्जेदार लेखक व कलावंत होते. कैफी आझमी, कृष्णचंदर, इस्मत चुगताई, साहिर लुधियानवी आदी लेखकांवर बोल्शेविक क्रांतीचा मोठा प्रभाव होता. लेनिनच्या रशियन राज्यक्रांतीनंतर जगभरात डावा विचार रुजण्यास सुरुवात झाली होती. 
भारतातही प्रगतिशील लेखक चळवळ (तरक्कीपसंद तहरिक) स्थापना झाली. यातून शोषित-पीडितांचा आवाज बाहेर पडला. भांडवलवाद्यांच्या धोरणाचा विरोध करत समान न्यायाचा पुरस्कार करणारी वर्गविरहित व वर्णविरहित विचार पुढे आला. त्यातून अनेक मोठं कार्य उभं राहिलं. त्या चळवळीचे एक सदस्य मंटो होते. तत्कालीन सिनेमा व साहित्याचा आढावा घेतल्यास समाजातील प्रत्येक पैलूंचे दर्शन या कलाकृतीमधून होत असे.
११ मे १९१२ साली जन्मलेल्या मंटोंनी केवळ ४३ वर्ष आयुष्य लाभलं. त्यातही बरंचसं आयुष्य स्थलांतरामध्ये गेलं. त्यांचे शिक्षण अमृतसरमध्ये झालं. दहा वर्षापर्यंत त्यांनी घरीच राहून पारंपरिक शिक्षण घेतलं. त्यानंतर गवर्नमेंट मुस्लिम हायस्कूल मध्ये चौथीपासून ते मॅट्रिक आणि कॉलेजचं अर्धवट शिक्षण झालं. मंटो नेहमी शाळा, वह्या पुस्तकापासून लांब पळत असे. पण जालियनवाला बागेचं दृष्य त्यांच्या मनावर खोलवर जखमा करून गेलं.
मुंबईत ते कसेबसे स्थिरावले. पण देशाच्या विभाजनामुळे ते फार व्यथित झाले. जसे मौलाना आझाद फाळणीच्या वेदनेतून सावरले नाहीत अगदी तसंच मंटोबद्दल झालं. मंटोंना अनिच्छेनं पाकिस्तानवासी बनावं लागलं. पण शेवटपर्यंत त्यांचे मन मुंबईतल्या गल्ल्यामध्ये भटकत फिरत राहिलं.
मंटोच्या कथा नेहमी चर्चेचा विषय असायच्या शोषित महिला मंटोच्या कथानकाच्या नेहमी केंद्रबिंदू राहिल्या आहेत. शोषणाला बळी ठरलेली महिला केंद्रस्थानी ठेवून मंटोनं अनेक धीरगंभीर कथा लिहिल्या आहेत. त्यात काली शलवार, बू, हत्तक, ठंडा गोश्त, उपर, नीचे और दरमियाँ अशा कथा मानवी पाशवीपणाचं वेगळं दर्शन देतात. 
मंटोवर अश्लिल लेखनाच्या ठपका ठेवत अनेकदा खटले भरवण्यात आले. मात्र तक्रारपक्ष आणि कोर्ट ते आरोप सिद्ध करू शकले नाहीत. यावर मंटो म्हणतात, “तुम्हाला जर माझ्या कथा घाणेरड्या वाटत असतील, तर त्या तुम्ही राहत असलेल्या समाजातूनच मी घेतल्या आहेत. मग तो समाज घाणेरडा कसा? माझ्या कथांमधून मी फक्त जे सत्य आहे तेच माडतो.”
बूकथेत घाटन लडकीचं, शरीरविक्रय करणाऱ्या मराठी (घाटन) मुलीचं पात्र मंटोनं रेखाटलं आहे. कथेतून खोलीची दुर्गंध ते भोगणाऱ्या ग्राहकाच्या शरीराचा दुर्गंध याचा प्रवास मांडला आहे. जबरी भोगणाऱ्या पोलिसापेक्षा बीएमसीच्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा दुर्गंध घाटन महिलेला कसा जवळचा वाटतो, याची मांडणी मंटो 'बू'मध्ये करतात. 
मंटो यांनी मुंबईत दीर्घकाळ वास्तव्य केलं. बदनाम म्हणवणाऱ्या कामाठीपुरा भागात मंटोंचा निवास होता. फरास रोडचं पहिलं घर सुटल्यानंतर मंटो नागपाड्यात राहायला गेले. कारण त्या महिलांचं दु:ख त्यांना आपलं वाटत होतं. त्यामुळे तो परिसर सोडवत नव्हता. या महिलांच्या सुंदरतेपेक्षा त्यांच्या गलिच्छ म्हणवणाऱ्या वस्त्या मंटो यांना नेहमी आकर्षित करायच्या. त्यामुळे कधीही प्रकाशझोतात न आलेलं भयाण वास्तव त्यांनी आपल्या कथांमधून मांडलं..
वाचा : तत्त्वज्ञानाच्या प्रदेशात इकबालीज्म
सआदत हसन मंटो यांच्या कथा समाजाला हादरे देणाऱ्या होत्या. तसंच त्या कथा खूप अस्वस्थ करून जाणाऱ्या होत्या. आजही त्या तशाच वाटतात. तितक्याच अस्वस्थ करून जातात. सबंध आयुष्यात त्यांनी घेतलेले अनुभव, बघितलेलं जग आपल्या कथांमध्ये उतरवलं. मंटो कथांतून समाजाच्या त्रुटींवर व दोषांवर बोट ठेवतात. मंटो विचाराने डावे होते. अनेक कथांमध्ये शोषित वर्गाच्या समस्या प्रकर्षानं मांडलेल्या दिसतात.
सिनेक्षेत्रात पत्रकार व संवादलेखक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. रेडिओवरही त्यांनी नभोनाट्याच्या माध्यमातून समाजातील दोषांवर बोट ठेवलं. काही सिनेमाच्या कथाही त्यांनी लिहिल्या. इथंही लेखनाचे केंद्रबिंदू या महिलाच होत्या. मिर्झा गालीब या सिनेमाचं लेखन मंटोनं केलं.सिनेमाची सुरुवातच एका गझलनं होते. त्याचा शेर आहे,.
या रब वो ना समझे हैं ना समझेंगे मेरी बात
दे और दिल उनको जो ना दे मुझको ज़ुबां और’
दुसऱ्या महायुद्धानंतर 'मुफ्तनोश' शीर्षकाचा एक लेख मंटोनं लिहिला होता.  म्हणजे फुकटे; दुसऱ्या महायुद्धानंतर भारतात अनेक जिवनावश्यक वस्तुंचा तुटवडा झाला होता. त्या वस्तुत सिगारेटदेखील होतं. सिगारेट मिळत नसल्यानं कवी, रायटर, आर्टिस्ट, पेंटर लोकांचे हाल सुरू होते. तलफ कशी भागवायची असे प्रश्न कलावंत लोकांना पडले. 
मंटोच्या मते ही कलाकार लोकं सिगारेटची थोटकं जरी दिसली की उचलून तोंडात कोंबायचे. मंटोकडे अनेक महागड्या सिगारेटी स्टॉकमध्ये होत्या, लोकं त्याच्याकडे सिगारेटी मागायला यायचे. मंटो या फुकट्यानं त्रस्त झाले होते. त्या सहवेदना व्यक्त करण्यासाठी मंटोनं हा लेख लिहिला होता.
अलीगडच्या पार्श्वभूमीवर मंटोनं हा लेख शब्दबद्ध केलाय. लेखनाची स्टाईल वाचनीय आहे. उपाहात्मक शैलीनं मंटोनं हा लेख खुलवला आहे. या एका लेखावर बऱ्याच शॉर्ट फिल्म तयार झालेल्या आहेत. पाकिस्तानमध्ये या लेखावर स्ट्रिट प्ले देखील होतात. यू ट्यूब सर्च केलं मुफ्तनोशवर अनेक शॉर्ट फिल्म समोर येतील. काही व्हिडिओ निवेदन स्टाईलमध्ये देखील व्हाईस ओव्हर स्वरूपात देण्यात आलेले आहेत.
१९४८ साली मंटो यांनी मुंबई सोडली. फाळणीनंतर देशातलं वातावरण बिघडलं होतं. अशा वातावरणाचे बळी मंटो ठरले. मंटोंना भारत सोडून जायचं नव्हतं. पण सिनेक्षेत्रातील प्रतिस्पर्धीच्या त्यांच्याविरोधात कुरघोड्या सुरू होत्या. मंटोच्या कानावर हे सर्व येत होतं. एकवेळ अशी आली की सिनेक्षेत्रात त्यांच्याविरोधात मोठी कारस्थान रचलं गेलं. अशी अख्यायिका आहे की, कट रचून त्यांना भारताबाहेर पाठवलं गेलं. 
असं सागितलं जातं की, बॉम्बे टॉकीजच्या एका प्रोजेक्टवर मंटो काम करत असताना, कुणीतरी मुंबईत वातावरण कमालीचं बिघडल्याचा निरोप दिला. यासाठी त्यांना सेफ जागेत जाण्याचा सल्लाही देण्यात आला. त्यानुसार मंटोंना समुद्री बंदरावर नेण्यात आलं.. तिथून त्यांची जबरदस्तीने पाकिस्तानला रवानगी करण्यात आली. 
मंटोच्या सिनेक्षेत्रातील प्रतिस्पर्ध्यांनी ही कुरघोडी केल्याच्या कता आजही मुंबईत ते राहत असलेल्या भागात ऐकायला मिळतात. मंटो अनिच्छेनं पाकिस्तानला पोहचले. या घटनेचा मंटोच्या मनावर खोलवर परिणाम झाला. यानंतर त्यांनी फाळणीची व्यथा आपल्या कथानकाच्या केंद्रस्थानी ठेवली.. टोबा टेक सिंह, खोल दो, खुदा की कसम सारख्या कथांतून त्यांनी देश विभाजनाचं दु:ख मांडलं. या कथा वाचताना आजही मनात कालवाकालव होते. फाळणीच्या वेदना मनावर विषारी जखमा करून जातात.

मंटोंचं बरेचसं लेखन उर्दूतूनच आहे. उर्दूतलं त्यांचं साहित्य एज्युकेशनल पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलं आहे, तर त्याचा अनुवाद करून समग्र साहित्य वाणी प्रकाशनने प्रकाशित केलं आहे. १९३० ते १९५० या काळात मंटोंनी एकाअर्थी बोल्ड लिखाण केलं. 
आज अनेक विषयावर सिनेक्षेत्रात बोल्ड मांडणी केली जाते पण मंटोच्या कथानकावर अनेक दर्जेदार सिनेमे तयार झाले आहेत. यात काली सलवार, मिर्जा- गालिब, शिकारी, बदनाम, अपनी नगरियां याचा सामावेश आहे. यासह भारत आणि पाकिस्तानात मंटोच्या कथानकावर अनेक शॉर्टफिल्म तयार झाल्या आहेत. 
२००२ साली 'काली शलवार' नावाचा एक हिंदी सिनेमाही तयार झाला आहे. यात केके मेनन याने मंटोची भूमिका साकारली आहे. एनएफडीसीनं त्याची निर्मिती केली आहे. शिवाय अनेक सिनेमे पाकिस्तानात मंटोच्या कतावर तयार झालेले आहेत. 
वाचा : संमेलन संपले, अखिल भारतीयच, पण मुस्लीम मराठी!
वाचा : गुलजारांचं पोरकट अनुवाद मागे
भारतात आरजे सायमा हिनं त्यांच्या अनेक कथांवर रेडिओ शो केलेले आहेत. मंटोच्या कथांची ही सीरिज यट्यूबवर ऑडिओ फॉर्मेटमध्ये आहेत.
भारत-पाक या दोन्ही देशातल्या रेडिओंनीही बराच वेळ मंटोंच्या साहित्यासाठी दिला आहे. मंटोच्या आयुष्यावर हिंदीत अजून एक सिनेमा येतोय. अभिनेत्री नंदिता दास या सिनेमाची निर्मिती करत आहेत. नवाजुद्दीन सिद्दिकीनं यात मंटोची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर सिनेमाची चर्चा जोरात सुरू आहे. अशा 'बदनाम' लेखकाला एक वाचक म्हणून माझ्या सहवेदना आणि सलाम...
लेखाच्या शेवटी मंटो यांनी आपल्या कबरीवर लिहिण्यासाठी केलेली नजम आणि त्या कबरीचा फोटोही इथं देतोय..
'यहाँ सआदत हसन मंटो दफ़्न है।
उसके सीने में फ़न्ने-अफ़सानानिगारी के
सारे अस्रारो-रुमूज़ दफ़्न हैं-
वह अब भी मानो मिट्टी के नीचे सोच रहा है
कि वह बड़ा अफ़सानानिगार है या ख़ुदा।'
कलीम अजीम, पुणे

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: शोषित महिलांचा 'बदनाम' लेखक : मंटो
शोषित महिलांचा 'बदनाम' लेखक : मंटो
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjvu_ILnzTMlVD0tcLIK3Nx8BCBBwr0J7OhCQKfc6RuH5_ZGR3wVrSBg08KvB-Kdh2DFypQH7nuDMdKGwsCDbFYxYkD6kcXJ9n0sUSaWYYsO-6buZFAgnmsptC6ymWv50y004ia811wmI0O/s640/18424247_1394515057280747_373928049381170891_n.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjvu_ILnzTMlVD0tcLIK3Nx8BCBBwr0J7OhCQKfc6RuH5_ZGR3wVrSBg08KvB-Kdh2DFypQH7nuDMdKGwsCDbFYxYkD6kcXJ9n0sUSaWYYsO-6buZFAgnmsptC6ymWv50y004ia811wmI0O/s72-c/18424247_1394515057280747_373928049381170891_n.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2017/05/blog-post_9.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2017/05/blog-post_9.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content