देव आनंद : जवांदिल आणि बहुअयामी व्यक्तिमत्त्व !


देव आनंदबद्दल नेहमी सांगितलं जाई की, ‘त्यांचे सिनेमे नेहमी काळाच्या पुढे असतात.’ ‘बाजी’, ‘जिद्दी’, ‘गाइड’, ‘प्रेम पुजारी’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘हम दोनो’ अशा अनेक चित्रपटांतून देव आनंदनी काळाच्या पुढचा विचार मांडला आहे. ‘गाइड’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘हम दोनो’ हे त्यांचे आवडते सिनेमे होते.

१९६५ साली त्यांनी ‘गाइड’सारखा ‘बोल्ड’ सिनेमा बनवला, जो काळाच्या खूप पुढे होता. १९५१ सालचा ‘बाजी’ एका शहरी पार्श्वभूमीवरील क्राइम थ्रिलर होता. १९७१ सालच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’मधील ड्रग्सचा विळखा, हिप्पी कल्चर, नातेसंबध, विभक्त कुटुंब असो वा १९६७च्या ‘ज्वेल थीफ’मधील चतुर चोर… त्याचबरोबर ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘काला पानी’, ‘गॅम्बलर’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘हीरा पन्ना’ हे सर्वच सिनेमे काळाच्या पुढे होते.

देव आनंद यांच्याबद्दल दोन गोष्टी सर्वांत जास्त चर्चिल्या जात असत. एक म्हणजे ‘गाइड’ सिनेमा आणि दुसरी म्हणजे त्यांची प्रेमप्रकरणं. २००७ साली प्रकाशित झालेल्या ‘रोमॅन्सिंग विथ लाईफ’ या आत्मकथेमध्ये त्यांनी या दोन्हींवर भरभरून लिहिलं आहे. लंडनमध्ये एका भव्य-दिव्य सोहळ्यात या पुस्तकाचं लोकार्पण झालं होतं. त्यानंतर भारतात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते दिल्लीत ‘रोमॅन्सिंग विथ लाईफ’चा प्रकाशन सोहळा पार पडला. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी देव आनंद यांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं. ते असं, ‘‘जे आपल्या आयुष्याबद्दल सत्य घटना प्रामाणिकपणे लिहू शकतात, त्यांनीच आत्मकथा लिहाव्यात. आत्मस्तृती आणि खोटे बोलणाऱ्यांनी आत्मकथा लिहिण्याची गरज नाही.’’

देव आनंद यांची आत्मकथा बरीच गाजली व वादही झाला. काही दिवसांतच ती बेस्ट सेलर ठरली. २०१७ला नवाजुद्दीन सिद्धिकीनं आपल्या ‘अॅन ऑर्डनरी लाईफ’ या आत्मकथेत मैत्रिणीचं नाव छापल्यानं वाद झाला होता. त्या वेळी मला देव आनंद यांचं वरील विधान वारंवार आठवत होतं. अखेर वाढत्या वादाला कंटाळून नवाजनं आत्मकथा मागे घेतली. २०१८ला प्रदर्शित झालेल्या ‘मंटो’च्या प्रमोशनच्या वेळी त्यानं म्हटलंय, ‘‘आत्मकथेत अजून वादग्रस्त सत्य लिहीन, पण यावेळी कुणाचंही नाव छापणार नाही.’’

वाचा : गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा

वाचा : मन तडपत 'रफी' गीत बिन

गाईड अप्रतिम निर्मिती

देव आनंद यांनी अनेकदा कबुली दिली की, मला ‘गाइड’बद्दल वारंवार बोलायला आवडतं. २०००साली दूरदर्शनवर ‘गाईड’ प्रथमच दाखवण्यात येत होता. सिनेमा सुरू होण्यापूर्वी मान्यवरांच्या प्रतिक्रिया डीडीनं दाखवल्या. त्यात देव ‘गाइड’बद्दल बोलताना म्हणाले होते की, 

‘‘गाइड’ला कुणीही वितरक मिळत नव्हता. या सिनेमासाठी दागिने, स्थावर मालमत्ता विकून पैसा लावला होता. सिनेमाच्या निर्मितीमुळे कर्जबाजारी झालो होतो. काय करावं सुचेना. अशी बोल्ड फिल्म बॉक्स ऑफिसवर टिकणार नाही. आम्ही आमचं नुकसान करणार नाही, अशी भूमिका सर्वच वितरकांनी घेतली होती. अखेर एक वितरक काही शो दाखवण्यासाठी तयार झाला. कसेबसे शो पार पडले. सिनेमा बघून लोकं कथानकाच्या प्रेमात पडले. मला हायसं वाटलं. हळूहळू वितरकानं शो वाढवले.’’

प्रत्येक मुलाखतीमध्ये देव आनंद यांचा मुख्य विषय ‘गाइड’च असायचा. मी त्यांच्या कितीतरी मुलाखती पाहिल्या-वाचल्या आहेत. त्या सगळ्यांमध्ये हेच दिसतं. १९६६साली प्रदर्शित झालेल्या ‘गाइड’नं पाच फिल्मफेअर अवार्ड पटकावून नवा उच्चांक बनवला होता. इतकंच नव्हे तर तो भारताकडून ‘ऑस्कर’साठी नामांकित झाला होता. जगभरात झालेल्या, होत असलेल्या विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये आजही ‘गाइड’ नियमित दाखवला जातो. असा मान मिळवणारा हा एकमेव सिनेमा असावा.

केसांचा टोपदार झुपका, सतत हलणारी मान, काळी पॅण्ट पांढरा शर्ट-कोट आणि संवाद फेकीची विशिष्ट शैली, अशी देव आनंदची छबी अनेक सिनेमांतून आपण पाहिली आहे. असं सांगितलं जातं की, रुबाबदार वेशात ते ज्या वेळी बाहेर पडत, त्या वेळी अनेक तरुणींना मूर्च्छा येत. कालांतरानं पांढरा शर्ट, कोट काळी पॅण्ट अशा वेशात त्यांना बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली. कारण अनेक मुलींनी देव आनंद यांना त्या रूपात पाहून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या.

वाचा : ..मुबारक बेगम कभी तन्हाइयों में हमारी याद आएगी

वाचा : 'सिनेअभिरुची' की 'पुणेरी' जाणिवांचा सांस्कृतिक वर्चस्ववाद

लागली बाजी

२६ सप्टेंबर १९२३ साली तत्कालीन अखंड पंजाबच्या गुरदासपूरमध्ये जन्मलेल्या देव आनंद यांना ९ भाऊ-बहीण होते. त्यांचे वडील - किशोरीमल एक वकील होते. इंग्रजी साहित्यात एम.ए. असलेल्या देव आनंद यांनी १९४६ साली ‘हम एक हैं’मधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण त्यांना यश १९४८ साली आलेल्या ‘जिद्दी’ सिनेमातून मिळालं. 

बॉम्बे टॉकीजचा हा सिनेमा इस्मत चुगताईंच्या कथेवर आधारित होता. या चित्रपटानंतर देव आनंद यांनी आपले मोठे भाऊ चेतन आनंदसोबत मिळून ‘नवकेतन फिल्म्स’ची स्थापना केली. १९५० साली आलेला ‘अफसर’ नवकेतन बॅनरची पहिली निर्मिती. हा सिनेमा साधारण ठरला. पण १९५१ साली आलेल्या ‘बाजी’नं मात्र मोठं यश मिळवलं. गुरुदत्तचं दिग्दर्शन आणि देव आनंद यांचा अभिनय असा सुरेख संगम दर्शकांनी हातोहात उचलून धरला. हा थ्रिलर सिनेमा सुपरहिट ठरला.

‘बाजी’नंतर एकाहून एक असे अनेक सरस सिनेमे नवकेतननं दिले. १९८० पर्यंत चेतन आनंद, देव आनंद आणि विजय आनंद हे त्रिकूट सिनेसृष्टीची शान समजली जात होती.

‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘फंटुश’, ‘कालापानी’, ‘तेरे घर के सामने’, ‘तेरे मेरे सपने’, ‘हिरा-पन्ना’, ‘इश्क इश्क इशक’, ‘अव्वल नंबर’, ‘गॅम्बलर’, ‘सेन्सॉर’पासून ते शेवटचा २०११ साली आलेला ‘चार्जशिट’ अशा कितीतरी सिनेमांची निर्मिती देव आनंद यांनी केली. 

नवकेतन व्यतिरिक्त इतर बॅनरखालीही त्यांनी काम केलं. जवळजवळ १०० सिनेमांमधून त्यांनी अभिनय केला आहे. १९९० पासून त्यांच्या अनेक चित्रपटांना यश मिळत नव्हतं. ‘एकापाठोपाठ सतत दर्जाहीन सिनेमे बनवतो’ म्हणून त्यांच्यावर टीकाही झाली. पण त्यांनी सिनेनिर्मिती थांबवली नाही. ‘थांबणं माझ्या स्वभावात नाही’ असं ते म्हणायचे. ४ डिसेंबर २०११ साली त्यांचं लंडनमध्ये निधन झालं. त्या वेळी ते रूटीन चेकअपसाठी गेले होते. नसिरूद्दीन शाह अभिनित ‘चार्जशिट’ची निर्मिती त्या वेळी ते करत होते.

वाचा : साहिर और नख्शब के अंदाज

हर फिक्र को...

नेहमी प्रसन्न आणि उत्साहित राहणारे देव आनंद आपल्या सुखासीन जगण्यासाठी प्रसिद्ध होते. ‘मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया, हर फ़िक्र को धुँए में उड़ाता चला गया’ हे एक गाणं नसून देव आनंद यांच्या जगण्याचं तत्त्वज्ञान होतं. ते मल्टिस्टार आणि बहुअयामी व्यक्तिमत्त्व होतं. ते अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन आणि लेखनही करत. संगीत आणि फिल्म मेंकिगची त्यांना चांगली समज आणि जाण होती.

त्यांच्या प्रेमप्रकरणांचे अनेक किस्से बॉलिवुडमध्ये प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी या प्रेमसंबंधांना कधीही नाकारलं नाही. आपल्या रोमँटिक आयुष्याबद्दल देव आनंद भरभरून बोलत. अभिनेत्री सुरैय्यासोबत त्यांनी सहा चित्रपटांमध्ये काम केलं. 

एकदा देव आनंद यांनी शुटिंग सुरू असताना सुरैया यांना पाण्यात बुडण्यापासून वाचवलं, तेव्हापासून सुरैय्या देव आनंद यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या. परंतु त्यांच्या आज्जीला देव आवडत नव्हते. त्यामुळे दोघांचं मीलन होऊ शकलं नाही.

देव आनंदनं एका सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी कल्पना कार्तिकशी अचानक विवाह केला. या धक्क्यातून सुरैया सावरू शकल्या नाहीत. परिणामी त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. एका मुलाखतीत देव आनंद यांनी कबुली दिली होती की, सुरैय्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. 

सुरैय्यानंतर अनेक अभिनेत्रीशी देव आनंद यांचं नाव जोडलं गेलं. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणतात, ‘मी संपूर्ण आयुष्य विचारांसोबत रोमान्स केला आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या हिरोइनसोबत मी रोमान्स केला आहे. जेव्हा तुम्ही काम करत असता, तेव्हा तुम्हाला कुणाशी तरी प्रेम करावं लागतं, नसता तुम्ही ते काम कसं करू शकाल?’

२०११ साली ‘हम दोनो’ सिनेमा कृष्णधवलचा रंगीत झाला. २००७ सालीच देव आनंदनी ‘हम दोनो’च्या रंगीत आवृत्तीची घोषणा केली होती. चार वर्षांत हा सिनेमा रंगीत झाला. फेब्रुवारी २०११ला औरंगाबादला असताना बोटावर मोजण्यइतक्या प्रेक्षकांत बसून मी हा सिनेमा पाहिला होता. 

मल्टिप्लेक्समध्ये देव आनंदच्या पोस्टरकडे पाहून बाहेर वावरणारी मंडळी नाक मुरडत होती, कदाचित त्यांना मुन्नीला बदनाम करणारा सिनेमा हवा असावा. पण त्याचवेळी देवला पडद्यावर पाहण्यासाठी आलेली मोजकी मंडळी दर्दी होती, हेदेखील विसरून चालणार नाही. दुर्दैव असं की हा रंगीत सिनेमा त्यांना वेदना देऊन गेला. सिनेमा आपलं निर्मितीमूल्यदेखील वसूल करू शकला नाही.

चिरतरुण व्यक्तिमत्व

देव आनंद नेहमी स्वत:ला तरुण म्हणवून घेत. २००७ साली आत्मकथेच्या प्रकाशनावेळी लंडनमध्ये काही जणांनी त्यांना त्यांचं वय विचारलं. त्या वेळी ते एकाला म्हणाले, ‘मी १८ वर्षांचा आहे’, दुसऱ्याला सांगितलं, ‘मी १०० वर्षांचा आहे’; तर तिसऱ्याला म्हणाले, ‘मी एजलेस आहे. वयाच्या सीमेच्या पलीकडचा मी आहे’. देव आनंद चिरतरुण व्यक्तिमत्त्व होतं. वयाच्या ८८व्या वर्षांतही ते तेवढ्याच उत्साहानं अक्टिंग, दिग्दर्शन, निर्मितीमध्ये रमत असत.

२००६ साली अतिथी संपादक म्हणून बीबीसीला लिहिलेल्या एका लेखात ते म्हणतात, ‘सुंदरता वस्तुंमध्ये नाही तर बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्यावर ती अवलंबून असते. तुमच्या डोळ्यांवर अवलंबून आहे की तुम्हाला कोण आणि काय सुंदर वाटेल. मला ज्या वेळी एका सुंदर मुलीला घेऊन सिनेमा बनवायचा आहे, त्यावेळी मी एका जेमतेम व कुरूप दिसणाऱ्या मुलीला घेऊन सिनेमा बनवेन आणि ती पडद्यावर सर्वांत जास्त सुंदर दिसेन. ‘हरे रामा हरे कृष्णा’च्या वेळी झिनत अमानला घेऊन मी हा प्रयोग करून दाखवला.’

देव सतत नवनव्या प्रयोगासाठी प्रसिद्ध होते. सिनेमात नवे विषय हाताळणं, नव्या तारकांना संधी देणं, सिनेमाचे वेगवेगळे फॉर्म त्यांनी वापरले. ‘गाइड’, ‘प्रेम पुजारी’, ‘ज्वेल थीफ’, ‘लॉकेट’, ‘लव्ह अॅट टाईम्स स्क्वेअर’ या सिनेमांत विविधरंगी छटा त्यांनी भरल्या होत्या.

सिनेतारकांचा राजकीय पक्ष

असाच एक प्रयोग त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करून केला. देव आनंद आणीबाणीत इंदिरा गांधींचे कट्टर विरोधक झाले होते. जनता पक्षाला त्यांनी पाठिंबा देऊ केला, पण जनता पक्षाचं सरकार फार दिवस टिकलं नाही. यामुळे देव आनंद संजय गांधींच्या निशान्यावर आले. कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही, असं ठरवून त्यांनी स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केला.

१९७९ साली ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ (NPI) नावाच्या राजकीय पक्षाची उभारणी केली. ‘रोमॅन्सिग विथ लाईफ’मध्ये राजकीय पक्षाच्या उभारणीवर काही पानं त्यांनी खर्ची केली आहेत. संजीव कुमार, एफसी मेहरा आणि जीपी सिप्पी असा दिग्गज मंडळींना घेऊन त्यांनी हा पक्ष उभारला होता. 

पक्षाची पहिली जाहीर सभा मुंबईत दादरच्या शिवाजी पार्कमध्ये झाली होती. हा असा पहिलाच प्रयोग होता, जिथं सर्वच सिनेसृष्टीतील महत्त्वाची नावं एकत्र येऊन देशातील राजकारणावर भाष्य करत होती. त्यांना ऐकण्यासाठी शिवाजी पार्कवर मोठा जनसमुदाय एकत्र आला होता. पक्षाचा उद्देश होता की, लोकसभेच्या चांगल्या उमेदवारांना पाठिंबा देणं, पण योग्य उमेदवार मिळाला नसल्यानं देव आनंदनी आपला राजकीय पक्ष बरखास्त केला.

आपल्या ७० वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत देव आनंद यांनी अनेक दर्जेदार सिनेमे केले. अनेक पात्रांत त्यांनी जीव ओतून अभिनय केला. जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या सुपरस्टार देव आनंदला आजही ट्यूब व केबलवर लोकप्रियता लाभते. एकही दिवसही असा जात नाही, ज्यावेळी कुठल्या फिल्मी चॅनलवर देव यांचा सिनेमे नसतात. प्रत्येक वयोगटात त्यांचे लाखो चाहते होते. त्यांच्या फिल्मी योगदानाबद्दल २००१मध्ये त्यांचा पद्मभूषण आणि २००२ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अशा हरहुन्नरी, जवादिल नायक अभिनेत्याला एका चाहत्याची स्मृतिवंदना.

कलीम अजीम, पुणे

मेल: kalimzim2@gmail.com

(सदरील लेख २०१८ला अक्षरनामा येथे प्रकाशित झालेला आहे)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: देव आनंद : जवांदिल आणि बहुअयामी व्यक्तिमत्त्व !
देव आनंद : जवांदिल आणि बहुअयामी व्यक्तिमत्त्व !
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBq9K_VmEolFtubkkGg-lFUethmYOwJp3Lf8s9XOFeklucZC7oLiLd9TtfPcSArw_vYBcZDOENafRkAqHbvLCgjHCvlDgegnYAqW_Ktep3DBNcatWs_ergtI-X_RHSyfDM8MkjvFfMNTAk/w640-h360/Dev_Anand.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBq9K_VmEolFtubkkGg-lFUethmYOwJp3Lf8s9XOFeklucZC7oLiLd9TtfPcSArw_vYBcZDOENafRkAqHbvLCgjHCvlDgegnYAqW_Ktep3DBNcatWs_ergtI-X_RHSyfDM8MkjvFfMNTAk/s72-w640-c-h360/Dev_Anand.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/09/blog-post_26.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/09/blog-post_26.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content