उद्धव-राज : केवळ राजकीय युती पुरेशी नाही !


द्धव-राज यांच्या राजकीय युतीचं राज्यभरातील मुसलमानांनी स्वागत केल्याचं दिसतं. पण अनेकांना अजूनही राज ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर संदेह वाटतो. स्वाभाविक राज ठाकरेंची भूमिका किंवा राजकीय निर्णय संधीसाधू वृत्तीचे राहिलेले आहेत. दर निवडणुकीला ते कोणाच्या तरी दारात दिसतात. त्यामुळे इतक्या लवकर त्यांच्यावर भरवसा करणं उचित नसल्याची भावना आहे. मुसलमानांसह सामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना वेगळी मेहनत घ्यावी लागेल.

मुसलमानांवरील राज ठाकरेंचे आक्षेप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा व बौद्धिक सत्रातून आलेले वाटतात. त्यात इस्लाम व मुस्लिम द्वेष ठासून भरलेला आढळतो. त्यात सुधारणा किंवा सर्वहिताची नव्हे पण द्वेश व तिरस्काराची किनार अधिक दिसते.

वेगवेगळ्या धार्मिक संस्कृती एकत्र असलेल्या मानवी समाजातली वृत्ती-प्रवृत्तीत दोष, उणीवा आढळतात. त्याला धर्मसंस्कृतीशी जोडणं अव्यवहारी आहे. जगाच्या पाठीवरील कुठल्याही मानवी समाजात अशा उणीवा, दोष, चुकीच्या सवयी, एकांगी वृत्ती व एककल्ली मानसिकता असते. त्या बदलण्यासाठी सामाजिक, आर्थिक व राजकीय तथा सांस्कृतिक प्रबोधनाची गरज असते. पण ते न करता नुसते हल्ले चढवणे सयुक्तिक नसते.

सुधारणांच्या उद्देशाने केलेले कुठलेही उपदेश, कृती स्वीकार्य असते. पण फुटकळ लाभासाठी एखाद्या समुदायाचं सतत अमानवीकरण करणं तथा त्यांचं सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय उद्धवस्तीकरण घडविल्यास समाज-संस्कृती कोसळून पडते. सहजीवन, समन्वय, सलोख्याचे आधार निसटू लागतात. असे सामाजिक आघात व भविष्यकालीन संकटाकडे दुर्लक्ष करून राष्ट्रीय स्वयसेवक संघ आपलं स्वार्थी हिंदू राष्ट्रवादी राजकारण रेटू पाहत आहे. अशा प्रयत्नांना राज ठाकरे यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या राजकीय नेत्याची साथसंगत मिळणं निकोप राजकारणाच्या दृष्टीने हितावह नाही.



वास्तविक, राज ठाकरे यांची जडणघडण ज्या शिवसेनेत झाली, ती दक्षिण भारतीयांची विरोधक व मुस्लिमांविषयी राजकीय आकस बाळगणारी होती. राज शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी पक्षाची विचारसरणी भाजपसारखीच मुस्लिमद्वेषी होती. त्यामुळे मराठी मुसलमानांविषयी राज ठाकरेंची मानस प्रतिमा बदलू शकली नाही. नंतरही त्यांनी कधी मुसलमानात मिळण्याची तसदी घेतल्याचं आढळत नाही. किंबहुना नेहमी घृणा व तिरस्कृत भावनेनेच त्यांनी या समाजाकडे पाहिलं.

नव्या पक्षात केवळ मुस्लिम द्वेश केल्याने त्यांना राजकीय अनुयायी मिळणार नव्हते. शिवाय आता मुस्लिम द्वेषी राजकारणाचे ते तिसरे भागीदार झाले होते. त्यामुळे पर्याय म्हणून त्यांनी उत्तर भारतीयांचा विरोध सुरू केला व राजकीय स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या नव्या भूमिकेला राजकीय कारकीर्द घडवू पाहणारे अनुयायी लाभले. मराठी प्रदेशातील मुस्लिम तरुणही राजकीय संधीच्या शोधात मोठ्या संख्येने त्यांच्यामागे गेले. त्यांना पाठिंबा दिला. खळखट्याकचे खटले अंगावर घेतले व तुरुंगावासही भोगला. अद्याप कोर्ट-कचेऱ्याच्या चकरा मारत आहेत.

२०१४च्या मोदींच्या लाटेत मनसे नगण्य झाला. तरीही पक्षप्रमुख मोदी-भाजपचे सार्वजनिक समर्थक होते. २०१९ला शिवसेनेने राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. तीन पक्षाचं सरकार म्हणजे कॉमन मिनिमम प्रोगॅम आलं. ते राबविण्यासाठी शिवसेनेने वादग्रस्त मुद्दे बाजुला ठेवले. सत्तेत सहभागी असताना उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षाने सांप्रदायिक राजकारणापासून अंतर राखलं. कालांतराने ही तडजोड पुढे शिवसेनेची वैचारिक भूमिका म्हणून पुढे आली. नवा धर्मनिरपेक्ष विचार स्वीकारल्याने शिवसेनेला नवे अनुयायी लाभले.

कोरोना काळात देशभरात मुस्लिमद्वेषी मोहिम राबवली जात असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून मुस्लिम जनतेच्या मागे ठामपणे उभे राहिले. त्यांनी मुस्लिमांच्या निस्पृह सामाजिक सेवेची दखल घेतली. मुसलमानांनी या स्नेहभावाला बळकटी दिली. तेव्हापासून उद्धव ठाकरे व शिवसेनेसोबत मुसलमानांचे आत्मिय संबंध निर्माण होऊन ते वृद्धिंगत झाले.

भाजपने छळलं म्हणून किंवा सेना भाजपविरोधी झाली म्हणून मुस्लिम सेनेच्या मागे गेले नव्हते तर विचारपूर्वक गेले होते. उद्धव ठाकरेंच्या बदलेलल्या राजकीय भूमिकेचं स्वागत करण्यासाठी गेले. मन व मेंदूने गेले. समाजाने उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षाला भरभरून प्रेम दिलं व स्वीकारलं. लोकसभा निवडणुकीत ‘खान की बाण’ विसरून सेनेची साथसंगत केली. कर्मठ भूमिका शिथिल केल्याचा तथा हिंदुत्व धोरणात मुसलमानांना सामावून घेण्याचा उद्धव ठाकरेंना लोकसभेत विजयाच्या रुपाने राजकीय लाभ झाला.

परिणामी उद्धव ठाकरेंच्या सर्वसमावेशी हिंदुत्व धोरणावर भाजपने प्रश्न केला. अशा वेळी राज ठाकरेंना वाटलं उद्धव गेल्याने हिंदुत्व राजकारणाची पोकळी भरून काढता येईल. त्यांना वाटलं की, आपली लयास गेलेली राजकीय शक्ती हिंदुत्वाच्या नावाने प्राप्त करता येईन. मग त्यांनी पक्षाच्या झेंड्यासह विचारसरणी बदलली. पहिल्याच भाषणात त्यांचं हिदुत्व मुस्लिम द्वेषाच्या राजकारणावर आधारलेलं दिसून आलं.



मनसे प्रमुखांच्या हिंदुत्व धोरणात मुस्लिमद्वेश ठासून भरलेला दिसला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील मुस्लिमद्वेष गळून पडल्याने तो आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भोंगा बंदीचं राजकारण ही मुस्लिमद्वेषी कृती होती. कारण ते फक्त मस्जिदीच्या भोंग्यावर बोलत होते, त्याचवेळी इतर धार्मिक स्थळातून होणाऱ्या किंवा सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर ते गप्प राहिले. मुळात ध्वनी प्रदूषण म्हणून नव्हे तर मुस्लिमविरोधाचा उपक्रम म्हणून त्यांनी भोंगाबंदीची घोषणा केलेली होती. पण ती सपेशल आपटली. बलाढ्य हिंदू राष्ट्रवादी सत्ता पक्षापुढे त्यांचा निभाव लागणे कठिण होतं. कारण भाजपच्या राजकीय हिंदुत्वाला सॅफ्ररॉन कॅपिटलची जोड होती. त्यामुळे व्यावहारिक पातळीवर मनसेचं हिंदुत्व नाणं बाजारात कॅश होऊ शकलं नाही.

तत्पूर्वी २०१४ला मोदी समर्थक असलेले राज ठाकरे २०१९ला कट्टर भाजप-मोदीविरोधी झाले. ‘लाव रे तो व्हीडियो’ म्हणत सत्तापक्षाची पोलखोल केली. २०२४ येता पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली. त्यासाठी दिल्ली दरबारी तासंतास रेंगाळत बसले, शेवटी हाताला काहीच लागलं नाही. परिणामी लोकसभेत ‘एकला चलो रे’ची भूमिका स्वीकारली. भाजपशी झालेल्या या अघोषित युतीने जनतेच्या मनात संभ्रम तयार झाला. बरेच कार्यकर्ते पक्ष सोडून गेले. अनेकांनी पक्षप्रमुखांच्या लहरी भूमिकेवर उघड संदेह व्यक्त केला.

जाहीर सभांना प्रचंड प्रतिसाद देणाऱ्या मतदारांनी प्रत्यक्ष निवडणुकीत मनसेला नाकारलं. पक्षाची मान्यता संकटात आली. पण पक्षप्रमुखाने भाजपशी जवळीक काही सोडली नाही. निवडणुका व राजकारणाच्या पलीकडचे हितसंबंध व व्यवहार जपणं अधिक महत्त्वाचं होतं. त्याप्रमाणे त्यांनी भाजपच्या वरीष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या.

मुस्लिम विरोधाचा झेंडा मिरवणाऱ्या पक्षाने विधानसभेत मुसलमानांना उमेदवारी दिली. कारण पक्ष विस्ताराला कार्यकर्ते व निधी लागतो. निवडणुकीत दोन्ही मिळण्याची संधी असते. निवडणुकीनंतर निकाल समोर होता. मतदारांनी पुन्हा मनसेला नाकारलं.

शिवसेनेत फूट, भाजपचं भांडवली राजकारण, आक्रमक हिंदुत्व कार्ड, दलित-मुस्लिम मतांची निष्क्रियता, निवडणूक व्यवस्थापनात शिरलेल्या कॉर्पोरेट कंपन्या, अमाप पैसा, बिघडलेली राजकीय संस्कृती अशा अनेक आव्हानात पक्षाला उभारी देणारी अजून एक संधी म्हणून महापालिका निवडणुका समोर आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही मुंबई महापालिकेतील सत्ता अबाधित ठेवायची आहे. पण एकट्याने किंवा इंडिया आघाडीच्या सहयोगाने ते शक्य दिसत नव्हतं. कितीही राजकीय शक्ती लावली तरी धर्मसत्ता व धनसत्ता त्यातही सूडतंत्राच्या द्वेषी राजकारणात टिकाव लागेल तरी कसा? अशा स्थितीत राज ठाकरेंशी कौटुंबिक व राजकीय नातं विकसित झालं. राज ठाकरेंसाठी ही युती म्हणजे नवी संधी होय. पण आता केवळ मराठीचा झेंडा हाती घेऊन उपयोग नाही. कारण मराठी भाषेच्या चळवळीचे कर्ते तुम्ही नाहीत, त्याचे कर्ते अकादमिक विद्वान व भाषाप्रेमी आहेत.

भाजपला कुठल्याही स्थितीत मुंबईची महापालिका मिळवायची आहे. त्यासाठी मुंबईतील हिंदी भाषिकांना संघटित करण्यासाठी सत्तापक्षाने त्रिभाषा सूत्र आणलं. लोकसभेत भाजपला हिंदी भाषकांकडून भरभरून मते मिळाली. त्यामुळे त्यांना पुन्हा भाषिक मुद्द्यावर गायपट्ट्यातील मतदारांना एकत्रित करणं गरजेचं होतं. ते काम भाजपने यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. अशा स्थितीत मराठी अस्मितेच्या नावाने लढणाऱ्या पक्षापुढे अनेक आव्हाने आहेत.



आज महाराष्ट्राला राज ठाकरेंची ओळख संधीसाधू राजकारणी अशी आहे. अशा स्थितीत केवळ मराठी अस्मिता पुरेशी नाही. आज बेरोजगारी, आर्थिक तंगी, बकालतेने सामान्य जनतेला (मतदार) घेरलं आहे. छोटा, मध्यम व लघू व्यवसायिक, दुकानदार, नोकरदार कर्जबाजारी झालेला आहे. मध्यमवर्गीय आर्थिक तंगीत आहे. शेती व शेतकरी संकटात आहे. शेतजमीनी आकसत चाललेल्या आहेत. अशी स्थितीत मतदारांना जगण्याचं बळ देणं व त्यांना स्थैर्यता मिळवून देण्यासाठी दीर्घकालिक योजना हव्यात. नगरपालिका/महापालिकेचा सामान्य लोकांच्या जीवनमानाशी संबंध असतो. घरपट्टी, दुकाने, परवाना, लायसन्स, व्यापार-धंद्याशी त्याचा संबंध असतो. रस्ते, ड्रेनेज, वाहतूक, आरोग्य सुविधा, मूलभूत शिक्षण, पिण्याचे स्वच्छ पाणी पालिका पुरवत असते. त्यामुळे या निवडणुकींच्या निमित्ताने जनतेच्या प्रश्नांशी थेटपणे राबता करता येऊ शकतो. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील पराभव किंवा विजय १०० ते १००० मतांवर अवलंबून असतो. त्याकरिता धर्मांध, जातीय व सांप्रदायिक राजकारण करण्याऐवजी किंवा त्या प्रकारची राजकीय संस्कृतीला खतपाणी घालण्याऐवजी सर्वहिताचं राजकारण नक्कीच फायदेशीर सौदा ठरू शकतो. या परिस्थितीत राज ठाकरेंना जनविश्वास जिंकण्याची संधी आहे. त्यासाठी त्यांना धर्मांध, जातीय व मुस्लिमद्वेषी भूमिकेला तिलांजली द्यावी लागेल.

पक्ष स्थापनेनंतर उत्तर भारतीय हटाव, अशी भूमिका घेतली पण पर्याय काय दिला? मराठी लोकांच्या रोजगाराचं काय? मतदारांनी प्रायोगिक तत्वावर नाशिकची सत्ता दिली. तिथं किती प्रयोग राबविले? आताही केवळ मराठीचा मुद्दा उपस्थित करून अस्मितेचा खेळ करणं तोट्याचा सौदा ठरू शकतो.

शिवाय मागास जात समुदाय तथा सर्व धर्म-समुदायाला जोडून घेण्याची मनसेला संधी आहे. अशावेळी केवळ भाषिक मुद्द्यावर आदळआपट करणे अव्यवहार्य ठरू शकते. मुंबई व उपनगरात शिंदेसेनेने मतं वळू शकतील पण इतर शहरी तथा ग्रामीण भागासाठी काय मुद्दा आहे? धार्मिक अल्पसंख्याकाविषयी भूमिका काय?

वास्तविक, मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी राज ठाकरेंना अजून बरीच मजल गाठावी लागणार आहे. केवळ शिवसेनेसोबत युती केल्याने राजकीय लाभ मिळतील, अशा गफलतीत राहणं मनसेला धोक्याचं ठरू शकतं. सर्वप्रथम सततच्या बदललेल्या भूमिकेमुळे गमावलेला विश्वास पुन्हा प्राप्त करण्यापासून सुरुवात करावी लागेल.

कलीम अज़ीम, पुणे
६ जुलै २०२५
मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: उद्धव-राज : केवळ राजकीय युती पुरेशी नाही !
उद्धव-राज : केवळ राजकीय युती पुरेशी नाही !
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiM8ke93_r0h6L1ypN9fDEIRhr_4FDWKyygdpMZ_3jp5bNfVkCJqgvYS5yd4yo40mpmbjU-8kxbGgFPI2F-wA18T_A8kMgyVG3Yh3aabzZAHY1TPck9VtmnvVWQrsOGR5sjH2r-1KmwqFIh7U-XiOqr1dGh0nLIMDYUvqp8QHEHju8ojX-9n3AZDPS1UdhL/w640-h356/Raj-Udhdhav.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiM8ke93_r0h6L1ypN9fDEIRhr_4FDWKyygdpMZ_3jp5bNfVkCJqgvYS5yd4yo40mpmbjU-8kxbGgFPI2F-wA18T_A8kMgyVG3Yh3aabzZAHY1TPck9VtmnvVWQrsOGR5sjH2r-1KmwqFIh7U-XiOqr1dGh0nLIMDYUvqp8QHEHju8ojX-9n3AZDPS1UdhL/s72-w640-c-h356/Raj-Udhdhav.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2025/07/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2025/07/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content